मुख्य सामग्रीवर वगळा

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

डिजिटल कुलपाची विसरलेली पासवर्ड-की

डिजिटल अकाउंटचे पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठीच्या किल्ल्या. प्रतीकात्मक चित्र.
(सौजन्य - https://img.magnific.com/)
..................
आपला हक्काचा खजिना डोळ्यांदेखत गायब होणार,
अशी भीती कधी वाटली? मला तर वाटली बुवा.
आठवला अलिबाबाच्या गोष्टीतला 'कासिम'.
परवलीचा शब्द विसरला आणि गुहेत अडकला.
डिजिटल युगात इ-मेलचा 'पासवर्ड' विसरतो,
तेव्हा काय होतं? 'फरगॉट पासवर्ड'च्या चक्रव्यूहात
अडकल्यानंतरची रंजक, हसवणारी सफर!
----------------
गोष्ट आठ-दहा महिन्यांपूर्वीची आहे. कदाचित वर्षभरापूर्वीची. अजूनही ती आठवण झाली की, अस्वस्थ व्हायला होतं. अस्मादिकांचा ‘कासिम’ झाला होता तेव्हा! जीव तडफडत होता नुसता. घुसमट सुरू होती.

एवढ्या कष्टानं जमवलेला खजिना डोळ्यांदेखत गुडूप होणार असं दिसत होतं. गुप्तधन होणार त्याचं! या खजिन्याची कधीही आठवण झाली की, तडफड वाढायचीच. त्याचा लोभ काही सुटणारा नव्हता.

...कारण त्यासाठी किती कष्ट केले
, किती वेळ घालवला, हे माझं मलाच माहीत. खजिन्यापायी कासिमचा तर जीवच गेला होता. माझी फक्त अस्वस्थता वाढणार होती, वाढत होती.

हा कासिम कोण? फाssर पुरातन इसम आहे तो. आखातातला. ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ गोष्टीतला कासिम. ‘अरेबियन नाइट्स’मधल्या एक हजार एक रात्रींतली किंवा ‘अलिफ़ लैला’मधली प्रसिद्ध गोष्ट. तिचा नायक अलिबाबा. कासिम त्याचा भाऊ.

‘तिळा उघड’ आठवलं नाही

अलिबाबाला धमकावून डाकूंच्या खजिन्यावर हात मारायला गेला आणि परतीच्या वेळी घोळ झाला. तिथल्या रत्ना-माणकांनी डोळे दिपले आणि गुप्त खजिन्याचं बंद झालेलं दार उघडायचा पत्ता विसरला. परवलीचा शब्द. ‘गव्हा उघड’, ‘जवसा उघड’, ‘सातू उघड’... असं बरंच काही. ‘तिळा उघड’ काही आठवलं नाही. पुढची कथा सगळ्यांनाच माहिती आहे...

कासिम आणि माझ्या गोष्टीतलं साम्य हा परवलीचा शब्दच आहे. फक्त हल्ली तो जरा आधुनिक झाला आहे. ‘पासवर्ड’ म्हणतात त्याला.

तोच तो, पासवर्ड विसरून गेलो होतो. दोन गोष्टींमधला फरक एवढाच की
, ‘पासवर्ड’ आठवत नसल्यानं कासिम आत अडकून पडला आणि ‘परवलीचा शब्द’ विसरून गेल्यानं मी बाहेरच थांबलो. खजिन्यात भर टाकायची होती; पण ‘प्रवेश निषिद्ध’ अशी सूचना सारखी मिळत होती.

आधुनिक माध्यमांबरोबर असावं म्हणून अडीच-तीन वर्षांपूर्वी (२०१५) हौसेनं अनुदिनी (म्हणजे ‘ब्लॉग’ हो!) सुरू केली. सुरुवातीच्या उत्साहात त्यावर बरंच काही लिहिलं. प्रतिक्रियाही चांगल्या येत होत्या. नंतर अधूनमधून लिहिलेलं त्यावर टाकत राहिलो.

काही लिहिणं जमलं नाही
, तरी ब्लॉगवर जाऊन फेरफटका मारणं ठरलेलं. कोण येऊन काय वाचून गेलं याचा आढावा घेत होतो. त्याचा पासवर्ड तोंडपाठ झालेला.

कुणी ऐन सकाळी उठवून विचारलं तरी क्षणात तो सांगितला असता.
‘ऐन सकाळी’ हा शब्दप्रयोग खटकतो ना? बाकीचे ‘ऐन मध्यरात्री’ म्हणतात. ते त्या वेळी गाढ झोपेत असतात म्हणून. आपलं तसं नाही बुवा. आपण मध्यरात्री छान टळटळीत जागे असतो आणि सकाळी घोरत असतो. त्यामुळं योग्य तोच शब्दप्रयोग केलाय!

ते असो. मुद्द्यावर आलेलं चांगलं. ब्लॉगचं तसं बरं चाललं होतं. अधूनमधून लिहीत होतो आणि वाचकही मधूनमधून वाचत होते. पण दीड वर्षापूर्वी काही तरी झालं आणि रागाच्या भरात ब्लॉगची सगळी कवाडं बंद करून टाकली. कुणालाही तिथं जाता येणार नाही, असा पक्कं ‘सेटिंग’ (ब्लॉगच्या वापरकर्त्यानं वापरायची सेटिंग्ज!) करून टाकलं.

गुहेच्या तोंडावर घट्ट शिळा

गुहेच्या तोंडावर अगदी पक्की शिळा बसवून टाकली! एवढा बंदोबस्त केल्यानंतर कुणालाच तिथं जाणं शक्य नव्हतं. असे चार-पाच महिने सहज गेले. मध्येच एखाद्या दिवशी लिहिण्याची उबळ यायची. ब्लॉगवर टाकावं, खूप जणांनी वाचावं आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडावा, असं वाटायचं. कम्प्युटर सुरू करीपर्यंत सगळा उत्साह मावळलेला. आतून आलेलं खूप काही संगणकाच्या पडद्यावर उमटायचंच नाही. स्वप्नाचे रंग फिकटून जात.

ब्लॉगला नियमित भेट देणाऱ्या वाचक-स्नेह्यानं एके दिवशी सहज विचारलं, ‘तुम्ही ब्लॉग लिहिणं बंदच करून टाकलं की काय? आम्हालाही तिथं जाता येत नाही. एकदम कुलूपबंद! कारण तरी सांगा...’

आपणही ब्लॉग सुरू केला होता, हे तेव्हा एकदम आठवलं. आपल्याला लिहिताही येतं, याची आठवण झाली. बऱ्याच महिन्यांत पांढऱ्यावर काही काळं केलं नाही, याची लाज वाटू लागली. (एव्हाना ब्लॉगला मिळालेल्या थोड्या-फार वाचकांचा समज ‘ब्लॉगवाल्यानं कंटाळून तोंड काळं केलं’ असा झाला नसता तरच नवल!)

प्रसववेदना सुरू

तो फोन येऊन गेला आणि त्यानंतर दोन-तीन दिवसांतच कमालीच्या प्रसववेदना सुरू झाल्या. मनातलं हे लिहिलंच पाहिजे, असं वाटत होतं. संगणक सुरू केल्यानंतरही या वेदना थांबल्या नाहीत. दोन-तीन तासांच्या खटपटीनंतर चौदाशे शब्दांचा लेख तयार झाला. एव्हाना उत्तररात्रीचे तीन वाजले होते. मनाशी म्हटलं की, आता एवढा उशीर झालाच आहे, तर लेख ब्लॉगवर टाकूनच आडवे होऊ.

नव्यानं उत्साह शिरला. कष्टसाध्य लेख पुन्हा दोन-तीन वेळा वाचून काढला आणि त्यातल्या शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त केल्या. आता पाच-दहा मिनिटांचंच काय ते काम -

इ-मेल सुरू करायचा.
‘ब्लॉगर’वर जायचं. तिथं ‘न्यू पोस्ट’वर क्लिकून त्या चौकटीत लेख चिकटवून टाकायचा. ‘पब्लिश’ अशी आज्ञा दिली की, झाला लेख प्रसिद्ध! मग सगळ्या ओळखीच्यांना इ-मेल पाठवून द्यायची. ‘ब्लॉगवर नवीन लेख. सवड मिळाली की अवश्य वाचा...’ अशी विनंती. सात-आठ महिन्यांनी ब्लॉगला भेट देत होतो. त्यामुळं नवथर धडधड पुन्हा एकदा जाणवली.

इ-मेल सुरू केला. पत्ता टाकला. पुढची चौकशी झाली पासवर्डची. आपण परवलीचा शब्द एवढ्या दिवसांनंतरही विसरलो नाही, याची खात्री होती. त्यानुसार तो टंकलाही तिथल्या चौकटीत.
Incorrect Password! संगणकावर चुकीचा पासवर्ड टाईप केला. स्क्रीनवर इशारा झळकला.
आत्मविश्वासाच्या फुग्याला टाचणी
लावणारा तो मेसेज!
.......

आत्मविश्वासाचा फुटलेला फुगा

पुढच्याच क्षणी आत्मविश्वासाच्या प्रचंड फुगलेल्या फुग्याला टाचणी! ‘तुमचा पासवर्ड चुकीचा आहे, पुन्हा प्रयत्न करा,’ अशी सूचना झळकली. उत्तेजित झाल्यामुळं एखादं अक्षर मागं-पुढं झालं असावं, असं वाटलं. परवलीचा शब्द पुन्हा टंकित केला. पुन्हा तीच सूचना आली.

मग कळफलकाकडं ध्यान दिलं. ‘कॅप्स लॉक’ चुकून सुरू नाही राहिलं ना, ते पाहिलं. तसं काही नव्हतं. पुन्हा परवलीचा शब्द, आणि पुन्हा तीच सूचना! सलग तिसऱ्या वेळी चूक. आता म्हटलं ‘कंट्रोल-अल्ट’नं आपण चुकून इंग्रजीचं देवनागरी तर केलेलं नाही ना? तेही तपासून पाहिलं.

चौथ्या वेळी सगळं नीट तपासलं. कळफलक इंग्रजीच बडवतोय, ‘कॅप्स लॉक’ जागच्या जागी. अप्पर केस, स्पेशल कॅरॅक्टर, अंक असं सगळं मनाशी घोकत एक-एक अक्षर डोळे फाडून टंकित करत राहिलो. या वेळी चूक होणारच नाही! सहा महिने झाले असले, तरी ब्लॉगचा पासवर्ड विसरणं शक्यच नाही, असं मनानं मनालाच तोऱ्यानं सांगितलं.

अरे बापरे! चुकीच्या परवलीच्या शब्दामुळं इ-मेलचा दरवाजा काही उघडतच नव्हता. ‘पासवर्ड आपल्या खरंच लक्षात आहे ना?’, अशी शंका आली.

ज्वारी, मका की बाजरी?
‘तिळा उघड’ऐवजी मी  ‘ज्वारी उघड’, ‘मका उघड’, ‘बाजरी तर बाजरी उघड’ असं काही वापरत नव्हतो ना? त्याची अकरा अक्षरं तर नक्की होती. बारावं अक्षर बहुतेक चुकत होतं असं वाटलं. ते कोणतं असावं, हे काही आठवत नव्हतं. की शेवटच्या अक्षराची पुनरावृत्ती होती? अंकाच्या जागी विशेष चिन्ह नि चिन्हाच्या जागी अंक असा तर काही गोंधळ होत नव्हता ना?

एव्हाना उत्तररात्र संपून पहाटेची चाहूल लागली होती. परवलीचा शब्द उद्या शोधू म्हणत झोपायची तयारी केली. झोपेत हेच मनात घोळवत ठेवायचं, असं ठरवलं. म्हणजे मग झालेली छोटी चूक कधी तरी साखरझोपेत लक्षात येईल. लेख तर तयारच आहे. तांत्रिक बाबी राहिल्यात फक्त.

दुसरा दिवस. परत एकदा इ-मेलची कवाडं उघडण्याचा प्रयत्न. परवलीच्या शब्दाचे वेगवेगळे प्रयोग करूनही दाद मिळाली नाही. सगळं काम संपल्यावर, कार्यालयातून रात्री घरी आल्यावर बघू म्हटलं.

त्या रात्री नेट लावून बसायचं ठरवलं. कुठल्याही परिस्थितीत आज ब्लॉगची खिडकी उघडायचीच आणि नवा लेख तिथं डकवायचाच. ठरवलंच होतं तसं. तांत्रिक मजबुरी आडवी आली! स्थिती जैसे थे होती.

तल्लख विस्मरणशक्ती
आपण पासवर्ड विसरलो आहोत
, असं एका पराभूत क्षणी मनाला मान्य करायला लावलं. वाढत्या वयानुसार स्मरणशक्ती नव्हे, तर विस्मरणशक्ती तल्लख होत आहे, असंही टोचून बोलून घेतलं स्वतःला.

चूक झाली खरी; ती दुरुस्त केल्याशिवाय स्वस्थ बसवणार नव्हतं. पुढची पायरी. नवीन पासवर्ड मागवणं. त्या सगळ्या तांत्रिक पायऱ्या ओलांडून गेल्यावर इ-मेल सेवा पुरवणाऱ्याकडून पर्याय आले दोन - एक तर या इ-मेल अकाउंटशी जोडलेल्या इ-मेलला दुवा येणार किंवा मोबाईलवर कोड. इ-मेलला मोबाईल क्रमांक जोडलेला नव्हता. खात्रीच होती. म्हणून जोडलेल्या इ-मेलवर क्लिक केलं.

पण चुकून मोबाईलही जोडला असेल तर? आणि बायकोचा नंबर तिथं दिला असेल तर? अतिआत्मविश्वास नको म्हणून तिचा मोबाईल तपासला. तिथं काही एसएमएस आलेला नव्हता.

दुसरं इ-मेल खातं तपासणं आलं. ते सुरू केलं. अकाउंट आयडी व्यवस्थित टाकला. दोन-दोनदा तपासला. मग परवलीचा शब्द. हे इ-मेल अकाउंट दीड-दोन वर्षांत कधी उघडलेलंच नव्हतं. जुना पासवर्ड लक्षात होता. (असा आपला एक समज.) तो अगदी काळजीपूर्वक टंकित केला. ताकही फुंकून फुंकून प्यावं लागत होतं.

... अरे देवा! हाही पासवर्ड विसरला!!
दगा, पुन्हा एकदा दगा! याही इ-मेल आयडीचा पासवर्ड पूर्णपणे विस्मरणात गेलेला. भरपूर कामाच्या वेळी तो बदलला होता, एवढं लगेच आठवलं. आठवला नाही तो बदललेला पासवर्ड. अजिबात नाही आठवला.

पासवर्ड विसरल्यावर निर्माण होणारा गोंधळ. स्मरणशक्तीला द्यावा लागणारा ताण.
‘तिळा उघड’ की ‘तांदळा उघड’?
कसाला नि धसाला लागलेली
स्मरणशक्ती.
.......
‘डेड एंड’ला येऊन पोहोचलो होतो. पुढं रस्ताच नव्हता. दोन इ-मेल आयडी. आणीबाणीच्या प्रसंगासाठी दोन्ही एकमेकांना जोडलेले आणि दोन्हींचे पासवर्ड हरवून गेलेले. स्मृतिकोशाच्या एखाद्या भिंतीला जळमटासारखे लटकलेले असावेत. सापडत मात्र नव्हते ते.

एकदम हताश व्हायला झालं. एवढ्या हौसेनं ब्लॉग चालू केला आणि एका क्षणी त्याला मूर्खासारखं कुलूप ठोकलं. आता त्या कुलपाची किल्लीच हरवली होती. चावी बनवून देणाऱ्या दुकानालाही कुलूप
! त्या आठ-दहा दिवसांत बरेच प्रयत्न केले. हाती आलं शून्य.

ब्लॉगमध्ये खजिना होता खजिना. साधारण ३०-३५ लेख, १०-१२ कविता आणि थोडं किरकोळ. प्रत्येक लेखाची प्रत संगणकाच्या स्मृतीत होतीच. पण ऐन वेळी तिथं पानावर दुरुस्त्या करून वाढवलेली मजा त्यात साठवलेली नव्हती.

त्या कुठून परत मिळतील?
आणि प्रतिक्रियांचं काय
? काही काही लेखांवर २०-२५ प्रतिक्रियांचा पाऊस. त्यातल्या बऱ्याच मोठ्या माणसांच्या. कौतुकाच्या, शाबासकीच्या. काही तर प्रमाणपत्र म्हणून आयुष्यभर अभिमानानं मिरवण्यासारख्या. त्या कुठून परत मिळतील? खजिना आहे तिथंच होता. सुरक्षित. फक्त त्याच्यापर्यंत आता पोहोचता येणार नव्हतं. आपल्याच हातानं मी तिथं जाण्याची वाट बंद करून टाकली होती. कायमची?

एक दिवस वाटलं की, ‘हॅकर’कडून हे काम करून घ्यावं. कारण नेहमी वापरात असलेला इ-मेल आयडीचा पासवर्ड एकदा-दोनदा ‘चोरीला’ गेला होता. त्यामुळं हॅकरकडून कुलूप तोडून घेणं सोपं वाटलं. तसं ओळखीचं कोणीच नाही. त्याची सॉफ्टवेअर असतात म्हणे.

मुलाजवळ ही कल्पना बोलून दाखवली
, तर त्यानं उडवूनच लावलं - ‘ते काय एवढं सोप्पंय होय! परवडणारेय का सॉफ्टवेअर ते?’

अवघड वाटे, काटेकुटे
ब्लॉगकडे जाणारी वाट अधिकाधिक अवघड होत चालली होती. तिच्यावरचे काटेकुटे वाढतच चाललेले. ब्लॉगचा वाचक असलेल्या एका आयटी तज्ज्ञाला ही अडचण सांगितली. इ-मेलचा पासवर्ड अगदी मुलाच्या समोरही कधी टंकित केला नाही. पण त्याला सगळी माहिती व्हॉट्सॲपवरून कळवून टाकली.

दोन-तीन दिवसांनी त्याचं उत्तर आलं - काही तरी गडबड आहे. तुमचे दोन्ही मोबाईल पासवर्ड रिकव्हरीसाठी येणाऱ्या नंबरशी जुळत नाहीत. कुठं तरी
, काही तरी चुकतंय.

शेवटचाही प्रयत्न फसला. मनात आशा होती, एक ना एक दिवस यश येईलच. खजिन्याचं कुलूप उघडेलच. ते लेख, त्या प्रतिक्रिया पुन्हा वाचायला मिळतील. नक्कीच.

अहो, कुलूपच चुकीचं होतं!
असंच एक दिवस नेहमीच्या वापराच्या अकाउंटमधल्या जुन्या इ-मेल तपासून काढून टाकत होतो. अचानक शोध लागला. चूक लक्षात आली. त्या वेळी कार्यालयात होतो म्हणून आर्किमिडीजसारखं पळत सुटलो नाही. चुकीच्या किल्लीनं नाही, तर चुकीचं कुलूप उघडू पाहत होतो मी. इ-मेल आयडीच चुकीचा टंकित करत होतो. त्यातल्या दोन अक्षरांचा पार विसर पडला होता.

घरी आल्याबरोबर संगणक सुरू केला. इ-मेल आयडी व्यवस्थित भरला. नंतर तोच पासवर्ड टाकला. एंटरचं बटन दाबलं आणि ‘खुल जा सम सम’! त्या पडद्यानं सहा महिन्यांच्या गैरहजेरीतलं सगळं काही भराभर समोर आणून ओतलं. परवलीचा शब्द विसरणार नाही, हा आत्मविश्वास खराच होता तर!

एक मोठाच धडा शिकायला मिळाला या प्रकारातून. ‘पासवर्ड’ आणि ‘पिन’ कुठं लिहून ठेवू नका, अशी सूचना तज्ज्ञ नेहमीच देत असले, तरी ती धुडकावून लावायचं ठरवलं. कारण एवढं सगळं काही लक्षात ठेवणं शक्य नाही.

प्रत्येक खेपेला नेमक्या वेळी स्मरणशक्ती दगा देणार नाही
, याची खातरी उरली नव्हती. तसे अनुभव त्या आधी दोन-तीन वेळा आले होते. पण त्यावाचून काही अडलं नव्हतं. त्यामुळं तिकडं दुर्लक्ष केलं होतं.

पहिलं इ-मेल अकाउंट होतं रीडिफमेलचं. महिन्यातून कधी तरी एकदा तिथं जाऊन इ-मेल तपासत होतो. तिथं फार काही ठेवलंच नव्हतं. शेवटचं उघडलं तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसकडून आलेली इ-मेल पाहायला मिळाली. त्यात सामान्य मतदाराशी संपर्क साधत पक्षानं आवाहनही केलं होतं - ‘आमच्या चुका सांगा. त्या दुरुस्त करून आपण पुढे जाऊ.’

त्या इ-मेलनं
‘पराभवानंतर काँग्रेसला आठवला ‘आम आदमी’’ अशी छान बातमीही मिळाली. आता तो इ-मेल आयडी इतिहासजमा झाला. त्याचा पासवर्ड विसरला. पासवर्ड परत मिळवण्याच्या बाकीच्या नोंदीही विसरून गेलो.

असंच एकदा डेबिट कार्डाचा ‘पिन’ विसरला. मित्राला घेऊन जेवायला निघालो होतो. त्या आधी एटीएममधून पैसे काढायला गेलो. मित्र कुरकुरत होता. ‘कार्डनंच पैसे देऊ ना,’ असं म्हणाला. त्याचं ऐकलं नाही. ‘पिन’ विसरल्याचं लक्षात आल्यावर परत घरी जाऊन पैसे आणले. चार किलोमीटरचा हेलपाटा पडला.

जेवण करून बिलाचे पैसे देताना मित्राला म्हणालो
, ‘‘कार्डनं बिल देऊ म्हणत होतास. इथं आल्यावर ‘पिन’ आठवत नाही, हे कळल्यावर काय केलं असतं?’’ काडीनं दात कोरत तो उत्तरला, ‘‘तसं झालं असतं तर मी दिले असते पैसे. तेवढे आहेत माझ्याकडे!’’

एका ज्येष्ठ व्यंग्यचित्रकाराची मध्यंतरी इ-मेल आली. ते कुठं तरी परदेशात आहेत आणि पासपोर्ट, पाकीट हरवल्यानं अडचणीत आहेत, असं त्यात लिहिलं होतं.

मेल आयडी हॅक
लक्षात आलं की, गडबड आहे. त्यांच्याशी लगेच मोबाईलवरून संपर्क साधला. ‘तुमचा मेल आयडी हॅक झाला आहे. लगेच पासवर्ड बदलून टाका,’ असं मी सांगत होतो. वयोमानपरत्वे त्यांना ते ऐकू येत नव्हतं. पण ते गावीच आहेत, एवढं त्या संवादावरून निश्चित कळालं. त्यांना एक दीर्घ एसएमएस पाठवला. तो वाचून त्यांनी पासवर्ड बदलला आणि दुसऱ्या दिवशी आभार मानणारा संदेशही पाठवला.

हे असे दोन-तीन अनुभव आल्यानं ठरवलं. सगळी इ-मेल अकाउंट आणि त्यांचे पासवर्ड, पिन, पॅन, आधार इत्यादी नेहमी लागणाऱ्या गोष्टींची नोंद करून ठेवायची. स्मरणशक्तीवर फाजील विश्वास टाकायचा नाही. संगणकात एक फाईल करून ठेवली. खरं तर हा संगणक मी आणि घरी आल्यावर मुलगा यांच्याशिवाय दुसरं कुणीच वापरत नाही. पण जरा काळजी घ्यायची म्हणून मुलानं त्या फाईलला पासवर्ड द्यायला सांगितलं. म्हणाला, ‘सोपा ठेवा एकदम पासवर्ड. तुमच्या लगेच लक्षात येईल असा.’ नको नको म्हणताना पासवर्ड-पिन नोंदीच्या फाईलला पासवर्ड दिला.
कुलूपबंद झालेल्या डिजिटल खात्याची पासवर्ड रिकव्हरी (Password Recovery) करण्याची अडचण.

...परवाच लक्षात आलं. एक छोटीशी गडबड झालीय. त्या फाईलचा परवलीचा शब्द सोपा असूनही आठवत नाही. कोणता? तिळा उघड की तांदळा उघड?

....
(चित्रं संकेतस्थळांच्या सौजन्यानं)

टिप्पण्या

  1. बहारदार लेख. माझीही अशीच परवड उडालेली आहे.... कित्येकदा !

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच दमछाक झाली तुमची. होतं असं बरेचदा. माझेही तीन-चार मेल आयडी आहेत. ऑफिसमधल्या वेगवेगळ्या सॉफ्टवेअरची वेगवेगळे पासवर्डस आहेत. नेमक्या वेळी नेमका पासवर्ड आठवत नाही. सगळं काम खोळंबून बसतं. अशावेळी वेगवेगळ्या अकाऊंट्सचे युजरनेम आणि पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवलेलंच योग्य. राहिलं ब्लॉग पोस्ट करायचं, तर आता तेही सोप्प काम झालंय. अगदी मोबाईलवरूनही तुम्ही एखादा विषय सुचला की त्यावर लगेचच लिहू शकता. प्ले स्टोअर मध्ये ब्लॉगर ऍप आहे. आणि सॅमसंगचा फोन असेल तर बोलून मराठीत टाईप करायचं तंत्रज्ञान आहे. वेळही कमी लागतो, आणि किरकोळ दुरुस्त्या लगेचंच करता येतात. मी शक्यतो तेच वापरतो.

    उत्तर द्याहटवा
  3. विनोदी लेख टाईमपास म्हणून वाचता-वाचता लाखमोलाचा संदेश/इशारा मिळाला. स्मरणशक्तीवर फाजील आत्मविश्वास न ठेवता, उद्याच सर्व पासवर्ड, पिन, कोडस (महत्वाचं म्हणजे - अकाउंटच्या नावासह) लिहूनच ठेवतो....

    उत्तर द्याहटवा
  4. फार छान. पासवर्ड विसरल्याचा अगदी असाच अनुभव मलाही आला आहे.
    - राजगुरू पारवे, औसा (जि. लातूर)

    उत्तर द्याहटवा
  5. भारीच रंगवलाय लेख. मला संगणकाचं तांत्रिक ज्ञान अजिबात नाही. तरीही तुमची शैली आवडली.
    - सीमा मालाणी, संगमनेर

    उत्तर द्याहटवा
  6. मस्तच... परवलीचा शब्द, म्हणजे आजच्या युगातील पासवर्ड विसरण्याचा गाढा अनुभव मला आहे. माझं इ-मेल अकाउंट प्रामुख्याने आमची टायपिस्ट हाताळते. त्यामुळे माझ्यापेक्षा तिलाच पासवर्ड माहीत असतो. किंबहुना इ-मेल अकाउंट वापरताना तिलाच पासवर्ड विचारावा लागतो.

    पण पासवर्ड लेखाचा विषय होऊ शकतो; तोही इतक्या सुंदर पद्धतीने हे माहीत नव्हतं.... खूपच छान!
    -प्रबोधचंद्र सावंत, पुणे

    उत्तर द्याहटवा
  7. खूपच छान. पासवर्ड विसरल्यानंतर खूप त्रास होतो. पण कुणालाही ते सांगता येत नाही. तुझा हा सहजसुंदर लेख आपणच अनुभवत आहोत, असं जाणवतं.
    - रवींद्र चव्हाण, पुणे

    उत्तर द्याहटवा
  8. सतीश, झकास... अगदी नेहमीसारखंच लिहिलं आहेस.
    - जगदीश निलाखे, सोलापूर

    उत्तर द्याहटवा
  9. छान!
    मस्तच!
    आपलीच फसगत, घालमेल इतक्या खुसखुशीत पद्धतीने शब्दबद्ध झालेली अलिकडे वाचायला मिळाली नाही.
    ...आणि ही तर संगणकाबाबत घडलेली. जी आता अक्षम्य गुन्हा होऊन बसणार आहे. कारण तुम्ही जिवंत असल्याचा तो एक पुरावा आहे. कारण सगळी सरकारी, बॅंकेची, याची-त्याची कागदपत्रे आता तिथेच येणार आहेत.
    *सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तू पासवर्ङ विसरला त्याचा फटका आम्हाला बसला आहे... कारण आम्ही चांगले लेख वाचायला मुकलो. त्यामुळे परत अशी चूक होणार नाही, अशी अपेक्षा!* 😝😝😝

    उत्तर द्याहटवा
  10. खूप दिवसांनी एक सुंदर लेख वाचला. हा अनुभव मीही घेतला आहे. पासवर्ड विसरल्यानंतर होणारी मनाची घालमेल तू छान शब्दांकित केली आहेस. अलीकडे फोनमधील इंटर्नल मेमरी संपली किंवा डेटा संपला तरीही ठोके वाढतात बाबा . फारच हळवं झालंय मन या बाबतीत. इकडे अमेरिकेत असताना जावयाकडून काही गोष्टी शिकून घेतोय मी . तरीही विस्मरणाचा धोका वाढलाच आहे. वय वाढेल तसं हे अटळ दिसतंय.
    - सुभाष नाईक, अमेरिका

    उत्तर द्याहटवा
  11. काय मजेशीर अन् हॉरर लेख आहे! खूप बारकाईने वाचला. अन् पहिल्यांदा भिंतीवर परवलीचा शब्द लिहिला. चक्क उर्दूतून!

    यात प्रत्येकासाठी धडा आहे. अलिबाबा, कासीम, अन् बंद शिळा यातून बालपणीच्या कथा आठवल्या. खूपच सुंदर मांडणी.
    - आरिफ शेख, श्रीगोंदे

    उत्तर द्याहटवा
  12. मस्त लिहिलं आहे...
    - आकाश थोरात, नगर

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. परवलीची परवड झकास!
      आम्ही तो संकेतशब्दाचा गोंधळ बऱ्याच वेळा घालून झालाय. परगावात केलेल्या सोन्याच्या खरेदीनंतर कार्डाचा पिन नंबर न आठवणं आणि ऐन निकडीच्या देवाणीत बँकेचा पासवर्ड तीनही वेळा चुकणं हे तर झालंच पण भलत्या लॅपटॉपचा संकेत भलत्यालाच वापरून बायकोला शेजारणीच्या नावाने हाक मारण्यासारखा अपराधही या पामरांनी केला आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद तर झालाच पण शिवाय आपणच एकटे ढ नाही हा दिलासा देखील मिळाला.
      त्यातून आम्हीही 'ऐन सकाळ'वालेच! त्यामुळे परवड फारच जिव्हाळ्याची वाटली.
      मजा आली.

      हटवा
  13. हे केवळ अप्रतिम.
    शेवटपर्यंत उत्सुकता कायम.
    त्यात अधूनमधून येणारी नर्म विनोदपेरणी.
    शब्दांचा सखोल वापर.
    हे म्हणजे तीन साडेतीन मिनिटे भीमसेन समेवर येत नाहीत तेव्हा जसे होते आणि शेवटी आभाळाकडे पाहून ती स्वरलड संपते तेव्हा जसे होते तस्से झाले!
    हे क्वचित होते.
    त्यासाठी रियाझ लागतो.
    शिवाय वेळप्रसंगी तार लागायला लागते.
    हे सगळे झालेय या बंदिशीत.
    मी थक्क व्हायचे देखील विसरून गेलोय...
    - प्रदीप रस्से, जळगाव

    उत्तर द्याहटवा
  14. मस्तच लिहिलंय.
    एकूण काय काळ कोणताही असो; अलिबाबाचा असो की बिल गेटसचा असो. 'तिळा तिळा दार उघड; म्हणल्याशिवाय कोणतेही दार उघडत नाही! �� �� �� ��
    - वैजयंती डांगे

    उत्तर द्याहटवा
  15. अगदी खुमासदार लिहीले आहे. पासवर्ड चं असंच होतं. आणि आता इतके पासवर्ड झालेत की बस. पण मोबाइल लिंक केला तर सोपे पडते...

    उत्तर द्याहटवा
  16. खूप छान.............लिहित राहा........शुभेच्छा

    Anil Kokil

    उत्तर द्याहटवा
  17. 'वाट चुकल्याचा आनंद', 'चिऊताई चिऊताई दार उघड', 'विसराळू विनू'... शालेय जीवनातील या गोष्टींची आठवण करून देणारा लेख 'पासवर्डपायी परवड'. वाचकांना हसवणं तसं अवघड; पण आपली परवड विनोद होऊन हसवते. कोणता पासवर्ड कशाचा हा गोंधळ - विस्मृतीत गेलेला पासवर्ड - फजिती - रिकव्हरीची कसरत - रिकव्हरीचा आनंद, अधुनिक जीवनातील या वैज्ञानिक फजितीच्या नेमक्या वर्णनाने संगणकही हसला असेल! चार्ली चॅप्लिन आज हयात असता तर..! आमिर खान यांच्यासाठी ही 'परवड' छोट्या फिल्मकरिता मार्मिक कल्पना/विषय ठरू शकते.
    - श्रीराम वांढरे, भिंगार (नगर)

    उत्तर द्याहटवा
  18. सुरेख लेख. पासवर्ड विसरतो तेव्हा खरंच फार कठीण होतं सगळं.
    - अविनाश कांबळे, पुणे

    उत्तर द्याहटवा
  19. जबरदरस्त! खूप वाचनीय. पासवर्ड विसरल्याचा प्रसंग आणि त्याला अलिबाबाचा संदर्भ. वा!
    - हरिहर धुतमल, लोहा (जि. नांदेड)

    उत्तर द्याहटवा
  20. हा विषय सर्वांना जवळचा आहे. व्हिक्टोरिया 203 या सिनेमात अशोककुमार आणि प्राण 'बिनतालेकी चाभी लेकर फिरते है मारे मारे' दो बेचारे बिना सहारे हे गाणं म्हणत फिरतात ते आठवलं, इथे चावी चुकीची आहे. 'तिळा तिळा दार उघड,' हे उदाहरण बरोबरच वापरलं आहे. त्या कासिमसारखीच अवस्था पासवर्ड विसरल्यावर होते. मी वर्ड फाईलमध्ये स्टोअर केलेले पासवर्ड एका दुसऱ्या फोल्डरमध्ये ठेवतो. त्याला पासवर्ड ठेवत नाही. वय वाढत चालले की विस्मरणशक्ती वाढते हेच खरं!
    - राजेंद्र सहस्रबुद्धे, पुणे

    उत्तर द्याहटवा
  21. वा, धमाल! पासवर्ड तयार करताना वाटतं, आपण कधी विसरणार नाही अशा खुबीनं तयार केलाय. रोज वापरात असला, तरी काही वेळा चकवा देतोच... आणि 'सिदंती मम गात्राणी...' अशी स्थिती उद्भवते...
    - विद्याधर शुक्ल, पुणे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘ळ’च्या अढळपदासाठी

  रचना - शब्दकुल ---------- हा लढा केवळ एका अक्षराचा नाही. मराठीच्या अस्मितेचे अढळपद टिकवून ठेवण्याचा संघर्ष आहे.  'तिलक' किंवा 'जलगाव' ही मोडतोड थांबविण्यासाठी पुण्याच्या श्री. प्रकाश निर्मळ ह्यांनी केंद्रीय मंत्रालयांपर्यंत चिवट पाठपुरावा केला. केंद्रीय हिंदी संचालनालयाने अखेर विस्तारित वर्णावलीत 'ळ'  स्वीकारला. ऋग्वेदापासून ते आधुनिक उपबोलींपर्यंत ५० कोटी जनतेच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या 'ळ' अक्षराची ही रंजक भाषिक यात्रा. सोबत प्रकाश निर्मळ ह्यांची मुलाखत... ---------------- ‘ ध ’ चा ‘ मा ’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं ! इतिहासाचा हा धडा आपण शिकलो, पण गिरवला नाही, असंच दिसत होतं. वर्तमानात ‘ ळ ’ चा ‘ ल ’ केला जात होता आणि ‘ च ल ता है... ’ अशी आपली त्याबाबतची वृत्ती होती. लोकमान्यांचं टिळक आडनाव हिंदीत बनायचं ‘ ति ल क ’ . बाळासाहेब ठाकरे ह्यांचं नाव हिंदी माध्यमांतून व्हायचं ‘ बाला साहब ’ . नाशिक जिल्ह्यात आहे मालेगाव आणि पुणे जिल्ह्यातलं ते माळेगाव. पण हिंदीत गेली की, दोन्...

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...
html