Monday 24 September 2018

पासवर्डपायी परवड!


गोष्ट आठ-दहा महिन्यांपूर्वीची आहे. कदाचित वर्षभरापूर्वीची. अजूनही ती आठवण झाली की, अस्वस्थ व्हायला होतं. अस्मादिकांचा कासिम झाला होता तेव्हा! जीव तडफडत होता नुसता. घुसमट सुरू होती. एवढ्या कष्टानं जमवलेला खजिना डोळ्यांदेखत गुडूप होणार असं दिसत होत. गुप्तधन होणार त्याचं! या खजिन्याची कधीही आठवण झाली की, तडफड वाढायचीच. त्याचा लोभ काही सुटणारा नव्हता. त्यासाठी किती कष्ट केले, किती वेळ घालवला, हे माझं मलाच माहीत. खजिन्यापायी कासिमचा तर जीवच गेला होता. माझी फक्त अस्वस्थता वाढणार होती, वाढत होती.

हा कासिम कोण? फाssर पुरातन इसम आहे तो. आखातातला. अलिबाबा आणि चाळीस चोर गोष्टीतला कासिम. अरेबियन नाइट्समधल्या एक हजार एक रात्रींतली किंवा अलिफ़ लैलामधली प्रसिद्ध गोष्ट. तिचा नायक अलिबाबा. कासिम त्याचा भाऊ. अलिबाबाला धमकावून डाकूंच्या खजिन्यावर हात मारायला गेला आणि परतीच्या वेळी घोळ झाला. तिथल्या रत्ना-माणकांनी डोळे दिपले आणि गुप्त खजिन्याचं बंद झालेलं दार उघडायचा पत्ता विसरला. परवलीचा शब्द. गव्हा उघड’, जवसा उघड’, सातू उघड... असं बरंच काही. पण तिळा उघड काही आठवलं नाही. पुढची कथा सगळ्यांनाच माहिती आहे...

कासिम आणि माझ्या गोष्टीतलं साम्य हा परवलीचा शब्दच आहे. फक्त हल्ली तो जरा आधुनिक झाला आहे. पासवर्ड म्हणतात त्याला. तोच विसरून गेलो होतो. दोन गोष्टींमधला फरक एवढाच की, पासवर्ड आठवत नसल्यानं कासिम आत अडकून पडला आणि परवलीचा शब्द विसरून गेल्यानं मी बाहेरच थांबलो. खजिन्यात भर टाकायची होती; पण प्रवेश निषिद्ध अशी सूचना सारखी मिळत होती.

आधुनिक माध्यमांबरोबर असावं म्हणून अडीच-तीन वर्षांपूर्वी हौसेनं अनुदिनी (म्हणजे ब्लॉग हो!) सुरू केली. सुरुवातीच्या उत्साहात त्यावर बरंच काही लिहिलं. प्रतिक्रियाही चांगल्या येत होत्या. नंतर अधूनमधून लिहिलेलं त्यावर टाकत राहिलो. काही लिहिणं जमलं नाही, तरी ब्लॉगवर जाऊन फेरफटका मारणं ठरलेलं. कोण येऊन काय वाचून गेलं याचा आढावा घेत होतो. त्याचा पासवर्ड तोंडपाठ झालेला. कुणी ऐन सकाळी उठवून विचारलं तरी क्षणात तो सांगितला असता. ऐन सकाळी हा शब्दप्रयोग खटकतो ना? बाकीचे ऐन मध्यरात्री म्हणतात. ते त्या वेळी गाढ झोपेत असतात म्हणून. आपलं तसं नाही बुवा. आपण मध्यरात्री छान टळटळीत जागे असतो आणि सकाळी घोरत असतो. त्यामुळं योग्य तोच शब्दप्रयोग केलाय!

ते असो. मुद्द्यावर आलेलं चांगलं. ब्लॉगचं तसं बरं चाललं होतं. अधूनमधून लिहीत होतो आणि वाचकही मधूनमधून वाचत होते. पण दीड वर्षापूर्वी काही तरी झालं आणि रागाच्या भरात ब्लॉगची सगळी कवाडं बंद करून टाकली. कुणालाही तिथं जाता येणार नाही, असा पक्कं सेटिंग (ब्लॉगच्या वापरकर्त्यानं वापरायची सेटिंग्ज!) करून टाकलं. गुहेच्या तोंडावर अगदी पक्की शिळा बसवून टाकली! एवढा बंदोबस्त केल्यानंतर कुणालाच तिथं जाणं शक्य नव्हतं. असे चार-पाच महिने सहज गेले. मध्येच एखाद्या दिवशी लिहिण्याची उबळ यायची. ब्लॉगवर टाकावं, खूप जणांनी वाचावं आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडावा, असं वाटायचं. कम्प्युटर सुरू करीपर्यंत सगळा उत्साह मावळलेला. आतून आलेलं खूप काही संगणकाच्या पडद्यावर उमटायचंच नाही. स्वप्नाचे रंग फिकटून जात.

ब्लॉगला नियमित भेट देणाऱ्या वाचक-स्नेह्यानं एके दिवशी सहज विचारलं, तुम्ही ब्लॉग लिहिणं बंदच करून टाकलं की काय? आम्हालाही तिथं जाता येत नाही. एकदम कुलूपबंद! कारण तरी सांगा...

आपणही ब्लॉग सुरू केला होता, हे तेव्हा एकदम आठवलं. आपल्याला लिहिताही येतं, याची आठवण झाली. बऱ्याच महिन्यांत पांढऱ्यावर काही काळं केलं नाही, याची लाज वाटू लागली. (एव्हाना ब्लॉगला मिळालेल्या थोड्या-फार वाचकांचा समज ब्लॉगवाल्यानं कंटाळून तोंड काळं केलं असा झाला नसता तरच नवल!) तो फोन येऊन गेला आणि त्यानंतर दोन-तीन दिवसांतच कमालीच्या प्रसववेदना सुरू झाल्या. मनातलं हे लिहिलंच पाहिजे, असं वाटत होतं. संगणक सुरू केल्यानंतरही या वेदना थांबल्या नाहीत. दोन-तीन तासांच्या खटपटीनंतर चौदाशे शब्दांचा लेख तयार झाला. एव्हाना उत्तररात्रीचे तीन वाजले होते. मनाशी म्हटलं की, आता एवढा उशीर झालाच आहे, तर लेख ब्लॉगवर टाकूनच आडवे होऊ.

नव्यानं उत्साह शिरला. कष्टसाध्य लेख पुन्हा दोन-तीन वेळा वाचून काढला आणि त्यातल्या शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त केल्या. आता पाच-दहा मिनिटांचंच काय ते काम.
इ-मेल सुरू करायचा. ब्लॉगरवर जायचं. तिथं न्यू पोस्टवर क्लिकून त्या चौकटीत लेख चिकटवून टाकायचा. पब्लिश अशी आज्ञा दिली की, झाला लेख प्रसिद्ध! मग सगळ्या ओळखीच्यांना इ-मेल पाठवून द्यायची. ब्लॉगवर नवीन लेख. सवड मिळाली की अवश्य वाचा... अशी विनंती. सात-आठ महिन्यांनी ब्लॉगला भेट देत होतो. त्यामुळं नवथर धडधड पुन्हा एकदा जाणवली.

इ-मेल सुरू केला. पत्ता टाकला. पुढची चौकशी झाली पासवर्डची. आपण परवलीचा शब्द एवढ्या दिवसांनंतरही विसरलो नाही, याची खात्री होती. त्यानुसार तो टंकलाही तिथल्या चौकटीत.

पुढच्याच क्षणी आत्मविश्वासाच्या प्रचंड फुगलेल्या फुग्याला टाचणी! ‘तुमचा पासवर्ड चुकीचा आहे, पुन्हा प्रयत्न करा,’ अशी सूचना झळकली. उत्तेजित झाल्यामुळं एखादं अक्षर मागं-पुढं झालं असावं, असं वाटलं. परवलीचा शब्द पुन्हा टंकित केला. पुन्हा तीच सूचना आली.

मग कळफलकाकडं ध्यान दिलं. कॅप्स लॉक चुकून सुरू नाही राहिलं ना, ते पाहिलं. तसं काही नव्हतं. पुन्हा परवलीचा शब्द, आणि पुन्हा तीच सूचना! सलग तिसऱ्या वेळी चूक. आता म्हटलं कंट्रोल-अल्टनं आपण चुकून इंग्रजीचं देवनागरी तर केलेलं नाही ना? तेही तपासून पाहिलं.

चौथ्या वेळी सगळं नीट तपासलं. कळफलक इंग्रजीच बडवतोय, कॅप्स लॉक जागच्या जागी. अप्पर केस, स्पेशल कॅरॅक्टर, अंक असं सगळं मनाशी घोकत एक-एक अक्षर डोळे फाडून टंकित करत राहिलो. या वेळी चूक होणारच नाही! सहा महिने झाले असले, तरी ब्लॉगचा पासवर्ड विसरणं शक्यच नाही, असं मनानं मनालाच तोऱ्यानं सांगितलं.

अरे बापरे! चुकीच्या परवलीच्या शब्दामुळं इ-मेलचा दरवाजा काही उघडतच नव्हता. पासवर्ड आपल्या खरंच लक्षात आहे ना?’, अशी शंका आली. तिळा उघडऐवजी मी  ज्वारी उघड’, मका उघड’, बाजरी तर बाजरी उघड असं काही वापरत नव्हतो ना? त्याची अकरा अक्षरं तर नक्की होती. बारावं अक्षर बहुतेक चुकत होतं असं वाटलं. ते कोणतं असावं, हे काही आठवत नव्हतं. की शेवटच्या अक्षराची पुनरावृत्ती होती? अंकाच्या जागी विशेष चिन्ह नि चिन्हाच्या जागी अंक असा तर काही गोंधळ होत नव्हता ना?

एव्हाना उत्तररात्र संपून पहाटेची चाहूल लागली होती. परवलीचा शब्द उद्या शोधू म्हणत झोपायची तयारी केली. झोपेत हेच मनात घोळवत ठेवायचं, असं ठरवलं. म्हणजे मग झालेली छोटी चूक कधी तरी साखरझोपेत लक्षात येईल. लेख तर तयारच आहे. तांत्रिक बाबी राहिल्यात फक्त.

दुसरा दिवस. परत एकदा इ-मेलची कवाडं उघडण्याचा प्रयत्न. परवलीच्या शब्दाचे वेगवेगळे प्रयोग करूनही दाद मिळाली नाही. सगळं काम संपल्यावर, कार्यालयातून रात्री घरी आल्यावर बघू म्हटलं.

त्या रात्री नेट लावून बसायचं ठरवलं. कुठल्याही परिस्थितीत आज ब्लॉगची खिडकी उघडायचीच आणि नवा लेख तिथं डकवायचाच. ठरवलंच होतं तसं. तांत्रिक मजबुरी आडवी आली! स्थिती जैसे थे होती. आपण पासवर्ड विसरलो आहोत, असं एका पराभूत क्षणी मनाला मान्य करायला लावलं. वाढत्या वयानुसार स्मरणशक्ती नव्हे, तर विस्मरणशक्ती तल्लख होत आहे, असंही टोचून बोलून घेतलं स्वतःला.

चूक झाली खरी; ती दुरुस्त केल्याशिवाय स्वस्थ बसवणार नव्हतं. पुढची पायरी. नवीन पासवर्ड मागवणं. त्या सगळ्या तांत्रिक पायऱ्या ओलांडून गेल्यावर इ-मेल सेवा पुरवणाऱ्याकडून पर्याय आले दोन - एक तर या इ-मेल अकाउंटशी जोडलेल्या इ-मेलला दुवा येणार किंवा मोबाईलवर कोड. इ-मेलला मोबाईल क्रमांक जोडलेला नव्हता. खात्रीच होती. म्हणून जोडलेल्या इ-मेलवर क्लिक केलं.

पण चुकून मोबाईलही जोडला असेल तर? आणि बायकोचा नंबर तिथं दिला असेल तर? अतिआत्मविश्वास नको म्हणून तिचा मोबाईल तपासला. तिथं काही एसएमएस आलेला नव्हता.

दुसरं इ-मेल खातं तपासणं आलं. ते सुरू केलं. अकाउंट आयडी व्यवस्थित टाकला. दोन-दोनदा तपासला. मग परवलीचा शब्द. हे इ-मेल अकाउंट दीड-दोन वर्षांत कधी उघडलेलंच नव्हतं. जुना पासवर्ड लक्षात होता. (असा आपला एक समज.) तो अगदी काळजीपूर्वक टंकित केला. ताकही फुंकून फुंकून प्यावं लागत होतं.

दगा, पुन्हा एकदा दगा! याही इ-मेल आयडीचा पासवर्ड पूर्णपणे विस्मरणात गेलेला. भरपूर कामाच्या वेळी तो बदलला होता, एवढं लगेच आठवलं. आठवला नाही तो बदललेला पासवर्ड.

डेड एंडला येऊन पोहोचलो होतो. पुढं रस्ताच नव्हता. दोन इ-मेल आयडी. आणीबाणीच्या प्रसंगासाठी दोन्ही एकमेकांना जोडलेले आणि दोन्हींचे पासवर्ड हरवून गेलेले. स्मृतिकोशाच्या एखाद्या भिंतीला जळमटासारखे लटकलेले असावेत. सापडत मात्र नव्हते ते. एकदम हताश व्हायला झालं. एवढ्या हौसेनं ब्लॉग चालू केला आणि एका क्षणी त्याला मूर्खासारखं कुलूप ठोकलं. आता त्या कुलपाची किल्लीच हरवली होती. चावी बनवून देणाऱ्या दुकानालाही कुलूप! त्या आठ-दहा दिवसांत बरेच प्रयत्न केले. पण हाती आलं शून्य.

ब्लॉगमध्ये खजिना होता खजिना. साधारण ३०-३५ लेख, १०-१२ कविता आणि थोडं किरकोळ. प्रत्येक लेखाची प्रत संगणकाच्या स्मृतीत होतीच. पण ऐन वेळी तिथं पानावर दुरुस्त्या करून वाढवलेली मजा त्यात साठवलेली नव्हती. आणि प्रतिक्रियांचं काय? काही काही लेखांवर २०-२ प्रतिक्रियांचा पाऊस. त्यातल्या बऱ्याच मोठ्या माणसांच्या. कौतुकाच्या, शाबासकीच्या. काही तर प्रमाणपत्र म्हणून आयुष्यभर अभिमानानं मिरवण्यासारख्या. त्या कुठून परत मिळतील? खजिना आहे तिथंच होता. सुरक्षित. फक्त त्याच्यापर्यंत आता पोहोचता येणार नव्हतं. आपल्याच हातानं मी तिथं जाण्याची वाट बंद करून टाकली होती. कायमची?

एक दिवस वाटलं की, हॅकरकडून हे काम करून घ्यावं. कारण नेहमी वापरात असलेला इ-मेल आयडीचा पासवर्ड एकदा-दोनदा चोरीला गेला होता. त्यामुळं हॅकरकडून कुलूप तोडून घेणं सोपं वाटलं. पण तसं ओळखीचं कोणीच नाही. त्याची सॉफ्टवेअर असतात म्हणे. मुलाजवळ ही कल्पना बोलून दाखवली, तर त्यानं उडवूनच लावलं - ते काय एवढं सोप्पंय होय! परवडणारेय का सॉफ्टवेअर ते?’ ब्लॉगकडे जाणारी वाट अधिकाधिक अवघड होत चालली होती. तिच्यावरचे काटेकुटे वाढतच चाललेले. ब्लॉगचा वाचक असलेल्या एका आयटी तज्ज्ञाला ही अडचण सांगितली. इ-मेलचा पासवर्ड अगदी मुलाच्या समोरही कधी टंकित केला नाही. पण त्याला सगळी माहिती व्हॉट्सॲपवरून कळवून टाकली. दोन-तीन दिवसांनी त्याचं उत्तर आलं - काही तरी गडबड आहे. तुमचे दोन्ही मोबाईल पासवर्ड रिकव्हरीसाठी येणाऱ्या नंबरशी जुळत नाहीत. कुठं तरी, काही तरी चुकतंय.

शेवटचाही प्रयत्न फसला. मनात आशा होती, एक ना एक दिवस यश येईलच. खजिन्याचं कुलूप उघडेलच. ते लेख, त्या प्रतिक्रिया पुन्हा वाचायला मिळतील. नक्कीच.

असंच एक दिवस नेहमीच्या वापराच्या अकाउंटमधल्या जुन्या इ-मेल तपासून काढून टाकत होतो. अचानक शोध लागला. चूक लक्षात आली. त्या वेळी कार्यालयात होतो म्हणून आर्किमिडीजसारखं पळत सुटलो नाही. चुकीच्या किल्लीनं नाही, तर चुकीचं कुलूप उघडू पाहत होतो मी. इ-मेल आयडीच चुकीचा टंकित करत होतो. त्यातल्या दोन अक्षरांचा पार विसर पडला होता.

घरी आल्याबरोबर संगणक सुरू केला. इ-मेल आयडी व्यवस्थित भरला. नंतर तोच पासवर्ड टाकला. एंटरचं बटन दाबलं आणि खुल जा सम सम’! त्या पडद्यानं सहा महिन्यांच्या गैरहजेरीतलं सगळं काही भराभर समोर आणून ओतलं. परवलीचा शब्द विसरणार नाही, हा आत्मविश्वास खराच होता तर!

एक मोठाच धडा शिकायला मिळाला या प्रकारातून. पासवर्ड आणि पिन कुठं लिहून ठेवू नका, अशी सूचना तज्ज्ञ नेहमीच देत असले, तरी ती धुडकावून लावायचं ठरवलं. कारण एवढं सगळं काही लक्षात ठेवणं शक्य नाही. प्रत्येक खेपेला नेमक्या वेळी स्मरणशक्ती दगा देणार नाही, याची खातरी उरली नव्हती. तसे अनुभव त्या आधी दोन-तीन वेळा आले होते. पण त्यावाचून काही अडलं नव्हतं. त्यामुळं तिकडं दुर्लक्ष केलं होतं.

पहिलं इ-मेल अकाउंट होतं रीडिफमेलचं. महिन्यातून कधी तरी एकदा तिथं जाऊन इ-मेल तपासत होतो. तिथं फार काही ठेवलंच नव्हतं. शेवटचं उघडलं तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसकडून आलेली इ-मेल पाहायला मिळाली. त्यात सामान्य मतदाराशी संपर्क साधत पक्षानं आवाहनही केलं होतं - आमच्या चुका सांगा. त्या दुरुस्त करून आपण पुढे जाऊ.’ त्या इ-मेलनं पराभवानंतर काँग्रेसला आठवला आम आदमी’’ अशी छान बातमीही मिळाली. आता तो इ-मेल आयडी इतिहासजमा झाला. त्याचा पासवर्ड विसरला. पासवर्ड परत मिळवण्याच्या बाकीच्या नोंदीही विसरून गेलो.

असंच एकदा डेबिट कार्डाचा पिन विसरला. मित्राला घेऊन जेवायला निघालो होतो. त्या आधी एटीएममधून पैसे काढायला गेलो. मित्र कुरकुरत होता. कार्डनंच पैसे देऊ ना,’ असं म्हणाला. त्याचं ऐकलं नाही. पिन विसरल्याचं लक्षात आल्यावर परत घरी जाऊन पैसे आणले. चार किलोमीटरचा हेलपाटा पडला. जेवण करून बिलाचे पैसे देताना मित्राला म्हणालो, ‘‘कार्डनं बिल देऊ म्हणत होतास. इथं आल्यावर पिन आठवत नाही, हे कळल्यावर काय केलं असतं?’’ काडीनं दात कोरत तो उत्तरला, ‘‘तसं झालं असतं तर मी दिले असते पैसे. तेवढे आहेत माझ्याकडे!’’

एका ज्येष्ठ व्यंग्यचित्रकाराची मध्यंतरी इ-मेल आली. ते कुठं तरी परदेशात आहेत आणि पासपोर्ट, पाकीट हरवल्यानं अडचणीत आहेत, असं त्यात लिहिलं होतं. लक्षात आलं की, गडबड आहे. त्यांच्याशी लगेच मोबाईलवरून संपर्क साधला. तुमचा मेल आयडी हॅक झाला आहे. लगेच पासवर्ड बदलून टाका,’ असं मी सांगत होतो. वयोमानपरत्वे त्यांना ते ऐकू येत नव्हतं. पण ते गावीच आहेत, एवढं त्या संवादावरून निश्चित कळालं. त्यांना एक दीर्घ एसएमएस पाठवला. तो वाचून त्यांनी पासवर्ड बदलला आणि दुसऱ्या दिवशी आभार मानणारा संदेशही पाठवला.

हे असे दोन-तीन अनुभव आल्यानं ठरवलं. सगळी इ-मेल अकाउंट आणि त्यांचे पासवर्ड, पिन, पॅन, आधार इत्यादी नेहमी लागणाऱ्या गोष्टींची नोंद करून ठेवायची. स्मरणशक्तीवर फाजील विश्वास टाकायचा नाही. संगणकात एक फाईल करून ठेवली. खरं तर हा संगणक मी आणि घरी आल्यावर मुलगा यांच्याशिवाय दुसरं कुणीच वापरत नाही. पण जरा काळजी घ्यायची म्हणून मुलानं त्या फाईलला पासवर्ड द्यायला सांगितलं. म्हणाला, सोपा ठेवा एकदम पासवर्ड. तुमच्या लगेच लक्षात येईल असा. नको नको म्हणताना पासवर्ड-पिन नोंदीच्या फाईलला पासवर्ड दिला.

...परवाच लक्षात आलं. एक छोटीशी गडबड झालीय. त्या फाईलचा परवलीचा शब्द सोपा असूनही आठवत नाही. कोणता? तिळा उघड की तांदळा उघड?



(चित्रं संकेतस्थळांच्या सौजन्यानं)

26 comments:

 1. बहारदार लेख. माझीही अशीच परवड उडालेली आहे.... कित्येकदा !

  ReplyDelete
 2. खूपच दमछाक झाली तुमची. होतं असं बरेचदा. माझेही तीन-चार मेल आयडी आहेत. ऑफिसमधल्या वेगवेगळ्या सॉफ्टवेअरची वेगवेगळे पासवर्डस आहेत. नेमक्या वेळी नेमका पासवर्ड आठवत नाही. सगळं काम खोळंबून बसतं. अशावेळी वेगवेगळ्या अकाऊंट्सचे युजरनेम आणि पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवलेलंच योग्य. राहिलं ब्लॉग पोस्ट करायचं, तर आता तेही सोप्प काम झालंय. अगदी मोबाईलवरूनही तुम्ही एखादा विषय सुचला की त्यावर लगेचच लिहू शकता. प्ले स्टोअर मध्ये ब्लॉगर ऍप आहे. आणि सॅमसंगचा फोन असेल तर बोलून मराठीत टाईप करायचं तंत्रज्ञान आहे. वेळही कमी लागतो, आणि किरकोळ दुरुस्त्या लगेचंच करता येतात. मी शक्यतो तेच वापरतो.

  ReplyDelete
 3. विनोदी लेख टाईमपास म्हणून वाचता-वाचता लाखमोलाचा संदेश/इशारा मिळाला. स्मरणशक्तीवर फाजील आत्मविश्वास न ठेवता, उद्याच सर्व पासवर्ड, पिन, कोडस (महत्वाचं म्हणजे - अकाउंटच्या नावासह) लिहूनच ठेवतो....

  ReplyDelete
 4. खूप छान.............लिहित राहा........शुभेच्छा

  ReplyDelete
 5. फार छान. पासवर्ड विसरल्याचा अगदी असाच अनुभव मलाही आला आहे.
  - राजगुरू पारवे, औसा (जि. लातूर)

  ReplyDelete
 6. भारीच रंगवलाय लेख. मला संगणकाचं तांत्रिक ज्ञान अजिबात नाही. तरीही तुमची शैली आवडली.
  - सीमा मालाणी, संगमनेर

  ReplyDelete
 7. मस्तच... परवलीचा शब्द, म्हणजे आजच्या युगातील पासवर्ड विसरण्याचा गाढा अनुभव मला आहे. माझं इ-मेल अकाउंट प्रामुख्याने आमची टायपिस्ट हाताळते. त्यामुळे माझ्यापेक्षा तिलाच पासवर्ड माहीत असतो. किंबहुना इ-मेल अकाउंट वापरताना तिलाच पासवर्ड विचारावा लागतो.

  पण पासवर्ड लेखाचा विषय होऊ शकतो; तोही इतक्या सुंदर पद्धतीने हे माहीत नव्हतं.... खूपच छान!
  -प्रबोधचंद्र सावंत, पुणे

  ReplyDelete
 8. खूपच छान. पासवर्ड विसरल्यानंतर खूप त्रास होतो. पण कुणालाही ते सांगता येत नाही. तुझा हा सहजसुंदर लेख आपणच अनुभवत आहोत, असं जाणवतं.
  - रवींद्र चव्हाण, पुणे

  ReplyDelete
 9. सतीश, झकास... अगदी नेहमीसारखंच लिहिलं आहेस.
  - जगदीश निलाखे, सोलापूर

  ReplyDelete
 10. छान!
  मस्तच!
  आपलीच फसगत, घालमेल इतक्या खुसखुशीत पद्धतीने शब्दबद्ध झालेली अलिकडे वाचायला मिळाली नाही.
  ...आणि ही तर संगणकाबाबत घडलेली. जी आता अक्षम्य गुन्हा होऊन बसणार आहे. कारण तुम्ही जिवंत असल्याचा तो एक पुरावा आहे. कारण सगळी सरकारी, बॅंकेची, याची-त्याची कागदपत्रे आता तिथेच येणार आहेत.
  *सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तू पासवर्ङ विसरला त्याचा फटका आम्हाला बसला आहे... कारण आम्ही चांगले लेख वाचायला मुकलो. त्यामुळे परत अशी चूक होणार नाही, अशी अपेक्षा!* 😝😝😝

  ReplyDelete
 11. खूप दिवसांनी एक सुंदर लेख वाचला. हा अनुभव मीही घेतला आहे. पासवर्ड विसरल्यानंतर होणारी मनाची घालमेल तू छान शब्दांकित केली आहेस. अलीकडे फोनमधील इंटर्नल मेमरी संपली किंवा डेटा संपला तरीही ठोके वाढतात बाबा . फारच हळवं झालंय मन या बाबतीत. इकडे अमेरिकेत असताना जावयाकडून काही गोष्टी शिकून घेतोय मी . तरीही विस्मरणाचा धोका वाढलाच आहे. वय वाढेल तसं हे अटळ दिसतंय.
  - सुभाष नाईक, अमेरिका

  ReplyDelete
 12. काय मजेशीर अन् हॉरर लेख आहे! खूप बारकाईने वाचला. अन् पहिल्यांदा भिंतीवर परवलीचा शब्द लिहिला. चक्क उर्दूतून!

  यात प्रत्येकासाठी धडा आहे. अलिबाबा, कासीम, अन् बंद शिळा यातून बालपणीच्या कथा आठवल्या. खूपच सुंदर मांडणी.
  - आरिफ शेख, श्रीगोंदे

  ReplyDelete
 13. मस्त लिहिलं आहे...
  - आकाश थोरात, नगर

  ReplyDelete
  Replies
  1. परवलीची परवड झकास!
   आम्ही तो संकेतशब्दाचा गोंधळ बऱ्याच वेळा घालून झालाय. परगावात केलेल्या सोन्याच्या खरेदीनंतर कार्डाचा पिन नंबर न आठवणं आणि ऐन निकडीच्या देवाणीत बँकेचा पासवर्ड तीनही वेळा चुकणं हे तर झालंच पण भलत्या लॅपटॉपचा संकेत भलत्यालाच वापरून बायकोला शेजारणीच्या नावाने हाक मारण्यासारखा अपराधही या पामरांनी केला आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद तर झालाच पण शिवाय आपणच एकटे ढ नाही हा दिलासा देखील मिळाला.
   त्यातून आम्हीही 'ऐन सकाळ'वालेच! त्यामुळे परवड फारच जिव्हाळ्याची वाटली.
   मजा आली.

   Delete
 14. हे केवळ अप्रतिम.
  शेवटपर्यंत उत्सुकता कायम.
  त्यात अधूनमधून येणारी नर्म विनोदपेरणी.
  शब्दांचा सखोल वापर.
  हे म्हणजे तीन साडेतीन मिनिटे भीमसेन समेवर येत नाहीत तेव्हा जसे होते आणि शेवटी आभाळाकडे पाहून ती स्वरलड संपते तेव्हा जसे होते तस्से झाले!
  हे क्वचित होते.
  त्यासाठी रियाझ लागतो.
  शिवाय वेळप्रसंगी तार लागायला लागते.
  हे सगळे झालेय या बंदिशीत.
  मी थक्क व्हायचे देखील विसरून गेलोय...
  - प्रदीप रस्से, जळगाव

  ReplyDelete
 15. मस्तच लिहिलंय.
  एकूण काय काळ कोणताही असो; अलिबाबाचा असो की बिल गेटसचा असो. 'तिळा तिळा दार उघड; म्हणल्याशिवाय कोणतेही दार उघडत नाही! �� �� �� ��
  - वैजयंती डांगे

  ReplyDelete
 16. अगदी खुमासदार लिहीले आहे. पासवर्ड चं असंच होतं. आणि आता इतके पासवर्ड झालेत की बस. पण मोबाइल लिंक केला तर सोपे पडते...

  ReplyDelete
 17. खूप छान.............लिहित राहा........शुभेच्छा

  Anil Kokil

  ReplyDelete
 18. 'वाट चुकल्याचा आनंद', 'चिऊताई चिऊताई दार उघड', 'विसराळू विनू'... शालेय जीवनातील या गोष्टींची आठवण करून देणारा लेख 'पासवर्डपायी परवड'. वाचकांना हसवणं तसं अवघड; पण आपली परवड विनोद होऊन हसवते. कोणता पासवर्ड कशाचा हा गोंधळ - विस्मृतीत गेलेला पासवर्ड - फजिती - रिकव्हरीची कसरत - रिकव्हरीचा आनंद, अधुनिक जीवनातील या वैज्ञानिक फजितीच्या नेमक्या वर्णनाने संगणकही हसला असेल! चार्ली चॅप्लिन आज हयात असता तर..! आमिर खान यांच्यासाठी ही 'परवड' छोट्या फिल्मकरिता मार्मिक कल्पना/विषय ठरू शकते.
  - श्रीराम वांढरे, भिंगार (नगर)

  ReplyDelete
 19. सुरेख लेख. पासवर्ड विसरतो तेव्हा खरंच फार कठीण होतं सगळं.
  - अविनाश कांबळे, पुणे

  ReplyDelete
 20. जबरदरस्त! खूप वाचनीय. पासवर्ड विसरल्याचा प्रसंग आणि त्याला अलिबाबाचा संदर्भ. वा!
  - हरिहर धुतमल, लोहा (जि. नांदेड)

  ReplyDelete
 21. हा विषय सर्वांना जवळचा आहे. व्हिक्टोरिया 203 या सिनेमात अशोककुमार आणि प्राण 'बिनतालेकी चाभी लेकर फिरते है मारे मारे' दो बेचारे बिना सहारे हे गाणं म्हणत फिरतात ते आठवलं, इथे चावी चुकीची आहे. 'तिळा तिळा दार उघड,' हे उदाहरण बरोबरच वापरलं आहे. त्या कासिमसारखीच अवस्था पासवर्ड विसरल्यावर होते. मी वर्ड फाईलमध्ये स्टोअर केलेले पासवर्ड एका दुसऱ्या फोल्डरमध्ये ठेवतो. त्याला पासवर्ड ठेवत नाही. वय वाढत चालले की विस्मरणशक्ती वाढते हेच खरं!
  - राजेंद्र सहस्रबुद्धे, पुणे

  ReplyDelete
 22. वा, धमाल! पासवर्ड तयार करताना वाटतं, आपण कधी विसरणार नाही अशा खुबीनं तयार केलाय. रोज वापरात असला, तरी काही वेळा चकवा देतोच... आणि 'सिदंती मम गात्राणी...' अशी स्थिती उद्भवते...
  - विद्याधर शुक्ल, पुणे

  ReplyDelete

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...