Sunday 7 October 2018

राष्ट्र, समाज आणि अर्थ


वर्षानुवर्षे चाललेल्या व्याख्यानमालांना श्रोते येत नाहीत, चित्र-शिल्पप्रदर्शनांना प्रेक्षक मिळत नाहीत, आगाऊ प्रसिद्धी करूनही मैफलीला गर्दी कमीच होते... सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना असलेली ही खंत अलीकडे नेहमीच ऐकायला मिळते. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करू पाहणाऱ्या कार्यक्रमांना न मिळणारा किंवा कमी प्रमाणात मिळणारा प्रतिसाद नवा राहिला नाही. नगरमध्ये महिनाअखेरीस कलापिनी कोमकली यांची मैफल झाली. रसिक श्रोत्यांची वाट पाहत तिचा श्रीगणेशा थोडा उशिराच झाला. इथेच काही महिन्यांपूर्वी झालेल्या विभागीय साहित्य संमेलनालाही साहित्य रसिकांची अलोट गर्दी लोटली, असं काही चित्र दिसलं नव्हतं. या पार्श्वभूमीवर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेली व्याख्यानमाला मात्र तुलनेने यशस्वी झाली. तिन्ही व्याख्यानांना हजाराच्या आसपास श्रोते उपस्थित होते. काही ऐकण्यासाठी, नवं समजून घेण्यासाठी नागरिक येतात, हे दृश्य चांगलं होतं. सांस्कृतिक क्षेत्रात काही करू इच्छिणाऱ्यांची उमेद वाढवणारं होतं, हे नक्की.

नगरमधील पं. दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेनं ही व्याख्यानमाला सुरू केली. पंडित दीनदयाळ उपाध्याय व्याख्यानमालेचं यंदाचं तिसरं वर्षं होतं. खलिस्तानवादी अतिरेक्यांच्या हल्ल्यातून अनेकदा बचावल्यामुळे जिंदा शहीद अशी ओळख असलेल्या मनिंदरजितसिंग बिट्टा यांच्या भाषणानं व्याख्यानमालेची सुरुवात झाली आणि अर्थक्रांतीचे अनिल बोकील यांच्या व्याख्यानानं समारोप झाला. व्याख्यानमालेचं उद्घाटन संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक श्री. नानासाहेब जाधव यांच्या हस्ते झालं.

बिट्टांकडून महाराष्ट्र पोलिस लक्ष्य
दहशतवादाची राजनैतिक लढाई असा श्री. बिट्टा यांच्या व्याख्यानाचा विषय होता. त्यांचं भाषण आवेशपूर्ण झालं खरं; पण मूळ विषयाचा ऊहापोह काहीसा कमीच झाला. मैं हारा हूँ तो राजनीतिक आतंकवाद से हारा हूँ, हमें नही पता, हम आज कैसे जिंदा है? यह बोनस की जिंदगी है, पार्टी की बात मत करो, प्रथम राष्ट्र!’ या त्यांच्या आवेशपूर्ण वाक्यांना श्रोत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. श्री. बिट्टा युवक काँग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष होते. काँग्रेसचा हा नेता संघाच्या व्यासपीठावर कसा?’ या अनेकांच्या मनातल्या प्रश्नाला त्यांनी भाषणातच मैं जिस पार्टी में था या हूँ..., मैंने अपने नेताओं से बहुत मार खाया अशा सूचक विधानांनी उत्तर दिलं. भाषणाच्या उत्तरार्धात त्यांनी महाराष्ट्र पोलिसांवर सडकून टीका केली. आपले अनुभव सांगत महाराष्ट्र पोलिस सुरक्षेबाबत भयंकर गाफील असल्याचा आरोप करताना ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही इथे सुरक्षित नाहीत. आपण सुरक्षिततेबाबतचा व्हिडिओ घेऊन मुंबईतल्या एका आयपीस अधिकाऱ्याला भेटलो, तेव्हा त्याने आप तो काँग्रेस लीडर हो ना?’ असा प्रश्न विचारला! हा ढिसाळपणा पाहून काही अधिकाऱ्यांना इथं पुन्हा २६/११ घडावं असं तर वाटत नाही ना, अशी शंका येते.’’

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर श्री. बिट्टा यांनी स्तुतिसुमनं उधळली. मोदी यांनी संपूर्ण जगात पाकिस्ताला नागडं केलं आहे, त्यांच्या काळात जवानांना पूर्ण मोकळीक देण्यात आली आहे, आता गोळीचं उत्तर गोळीनंच दिलं जातं, असं ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात देशात कुठं तरी बॉम्बस्फोट, दहशहतवादी हल्ले झाले का? हे मंत्र्यांनी सांगितलं पाहिजे ना! का हा प्रचारही मीच करायचा?’, असंही त्यांनी विचारलं. सर्व काळ, सर्वांसाठी घराचे दरवाजे उघडे असलेला एकमेव मंत्री म्हणजे नितीन गडकरी, नागपुर में संस्कार और संस्कृति का एक बडा मंदिर है ही त्यांची विधानं सूचक होती. खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी भिंद्रानवाले याचा उल्लेख संत असा केल्यानं आपण उद्विग्न आहोत, असं सांगून श्री. बिट्टा म्हणाले, ‘‘तब्बल ३६ हजार खून करणारा संत कसा? त्याचा इतिहास मी सांगतो. मी बदललो नाही आणि बदलणारही नाही.’’

शहरी नक्षलवादावर प्रकाश
दुसरं व्याख्यान शहरी नक्षलवाद या विषयावर कॅप्टन स्मिता गायकवाड यांचं झालं. लष्करात अधिकारी म्हणून काम केलेल्या गायकवाड यांनी बहुराष्ट्रीय कंपनीत प्रेझेंटेशन करावं, तशा तयारीनं हे माहितीपूर्ण व्याख्यान दिलं. माहिती आणि वस्तुस्थिती यावरच बोलणार असं सुरुवातीला स्पष्ट केल्याप्रमाणेच त्या दीड तास बोलल्या. त्यात अभिनिवेश नव्हता, शब्दांची आतषबाजी नव्हती नि कसलेल्या वक्त्याप्रमाणं आविष्करण नव्हतं. पण त्यांनी दिलेल्या माहितीनं जमलेले हजार-बाराशे श्रोते विचार करते झाले.

कॅप्टन गायकवाड यांनी या विषयाचं गांभीर्य अतिशय ठामपणे समजावून सांगितलं. पारदर्शिकांची जोड, पूरक आकडेवारी आणि माहिती असल्यानं व्याख्यान परिणामकारक झालं. प्रामुख्याने पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना ऐकायला जमलेल्या तरुण श्रोत्यांना त्यांनी या विषयाचं गांभीर्य पटवून दिलं. त्या म्हणाल्या, ‘‘हा ज्वलंत विषय आहे. त्याचे परिणाम समाजाला पुढची काही वर्षं भोगावे लागणार आहेत. 'शहरी नक्षलवाद' या शब्दप्रयोगाचा वापर जबाबदारीनं करावा; नसता त्याचं गांभीर्य निघून जाईल. ही काल्पनिक कथा नव्हे; ऐंशीच्या दशकात त्याचा उगम झाला. कायद्यानुसार दहा लोकांना अटक झाली काय आणि जणू अघोषित आणीबाणी आल्याचा कांगावा सुरू झाला. समतेची किंवा विद्रोहाची गाणी गातात म्हणून त्यांना किंवा कबिर कला मंचाच्या कोणाला अटक झाली नाही. तसं करणाऱ्या कोणालाही या देशात अटक झालेली नाही. ही मंडळी वेगवेगळे बुरखे पांघरून सोयीस्कर खोट्या कथा प्रसृत करतात, (अप)प्रचार करतात. त्यांच्यापासून राष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका आहे.’’

भौतिक सुख-संपन्नेतचं आयुष्य सोडून ही मंडळी आदिवासींसाठी काम करतात, असं वारंवार सांगितलं जातं याकडे लक्ष वेधून कॅप्टन गायकवाड म्हणाल्या, ‘‘तो खऱ्या अर्थानं समर्पण भाव असता, तर मीही त्यांना सलामच केला असता. पण आदिवासींसाठी काम करण्याचा दावा करणारी, 'आदिवासींच्या हक्काची लढाई' असं गोंडस नाव देणारी ही मंडळी (लोकशाहीवादी) व्यवस्था उलथवून टाकण्याच्या लढाईत त्यांचा प्याद्यासारखा वापर करीत आहेत. सकारात्मक काम करणारे, विकासाची वाट धरणारे आदिवासी नेतृत्व त्यांना मान्य नाही. तसे नसते तर त्यांच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या मंडळात (सेंट्ल कमिटी) आजपर्यंत एकाही आदिवासीला संधी का मिळाली नाही?’’

नक्षलवाडीचा (नक्षलबाडी) ५० वर्षांपूर्वीचा उठाव म्हणजे माओच्या विचारसरणीला पुढे नेणारा उठाव होता. त्यांच्या दृष्टीनं शहरांना महत्त्व का आहे, हे कॅप्टन गायकवाड यांनी मुद्देसूदरीत्या पटवून दिलं. त्या म्हणाल्या, ‘‘पद्धतशीर अपप्रचार करण्यात ही मंडळी फार तयारीची आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवरचा एखादा संदेश, पोस्ट काळजीपूर्वक पाहा आणि शेअर करा. त्यामागचा बोलविता धनी कोण आहे, हे ओळखायला शिकलं पाहिजे. शत्रू ओळखणं हेच मोठं काम आहे. यंदा २० मार्च रोजी ट्रेडिंग असलेल्या ‘#DalitLiveMatters’ हॅशटॅगच्या पोस्टपैकी निम्म्या पाकिस्तानातून टाकलेल्या होत्या. माओवाद्यांनी आजवर अनेक आदिवासींची हत्या केली. त्याविरोधात कोणी मानवाधिकारवाल्यांनी आजपर्यंत कधी आवाज का उठवला नाही? 'दलम'मध्ये भरती होणाऱ्या पुरुषांची सक्तीनं नसबंदी केली जातं. हे मानवी अधिकारांचं उल्लंघन नाही का?’’ एल्गार परिषदेत अडीचशे संघटना सहभागी होत्या, असं संयोजक सांगतात. पण आतापर्यंत चाळीस-पन्नास संघटनांचीच नावं पुढे येत आहेत, याकडेही लक्ष वेधताना त्यांनी एल्गार परिषद आणि भीमा कोरेगावचा हिंसाचार यातील संबंधही उलगडून दाखविला.

नोटाबंदी आणि अनिल बोकील
पावणेदोन वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला आणि अर्थक्रांतीवर एकदम प्रकाशझोत पडला. आधी स्तुतिसुमनं आणि नंतर शिव्याशाप याचा अनुभव अर्थक्रांती प्रतिष्ठानाच्या पदाधिकाऱ्यांना या काळात आला आहे. व्याख्यानमालेचा समारोप करताना याचा उल्लेख करून अर्थक्रांतीचे संस्थापक अनिल बोकील म्हणाले, ‘‘आम्ही सोशल मीडियावर भरपूर शिव्या खाल्ल्या आहेत. नोटबंदी प्रकरणाला आम्हालाही 'जबाबदार' पकडलं गेलं; हे सगळं आमच्या गळ्यात घातलं गेलं आहे. नोटबंदी यशस्वी की अयशस्वी, असा प्रश्न विचारला जातो. या निर्णयाला यश किंवा अपयश या दृष्टिकोणातून पाहता येणार नाही. ती एका घटनेची सुरुवात आहे. नोटबंदी का झाली? रोखीतल्या व्यवहाराच्या पाऊलखुणा राहत नाहीत. भ्रष्टाचाराचं ते एक कारण बनतं. बँकिंग किंवा डिजिटल व्यवहारातून त्याचा मागमूस राहतो, पाऊलखुणा शोधता येतात. हे लक्षात घेतलं, तर नोटबंदी यशस्वी झाली की अयशस्वी झाली, हा प्रश्नच उद्भवत नाही. हा विकासाचा कार्यक्रम नाही, तर आपण एक वेगळी दिशा पकडलेली आहे. आपण नोटांकडून डिजिटल व्यवहारांकडे वळलो आहोत. त्यामुळे किती मानवी कामाचे तास वाचले, रांगेत जाणारा किता वेळ वाचला याचाही हिशेब मांडायला हवा.’’

आपली अर्थव्यवस्था, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यातील संबंध उलगडून दाखविताना श्री. बोकील म्हणाले, ‘‘आपण धर्मप्रधान व्यवस्थेकडून अर्थप्रधान समाजव्यवस्थेकडे वळलो आहोत. शेतकरीवर्गाला हे अजूनही पचवता आलेले नाही किंवा त्यांना ते पटलेलेच नाही. शेतकरी म्हणून त्याचा हात नेहमी देणारा होता आणि तो कायमच मोठा होता. विनिमयाचे साधन अन्नधान्याऐवजी पैसा झाला, तिथे बळिराजाचा कणा मोडला; शेतकरी तुटला. शेतकऱ्यांच्या बहुतेक आत्महत्या सामाजिक प्रतिष्ठेला कंटाळून झाल्या आहेत. शेतकऱ्यांना सामाजिक पत महत्त्वाची वाटते. कृषी संस्कृतीत ती महत्त्वाची असे आणि औद्योगिक संस्कृतीत आर्थिक पत महत्त्वाची आहे. शेतकऱ्याला कष्टाची भाषा कळली; पैशाची नाही. शेती-शेतकरी यांच्या दुरवस्थेचे सध्याचे मुख्य कारण ते आहे. पैसा बाजारू व्यवस्थेची गरज आहे. शेती व्यवस्थेची नाही.’’

पैसे मिळण्याची खात्री नसल्यानं तो साठवून ठेवण्याची वृत्ती वाढली. नळाला २४ तास पाणी येईल, याची शाश्वती असेल, तर कोण भांडी भरून ठेवील? नळ उघडला की, पाणी येत नाही. त्यामुळे साठवणुकीची वृत्ती वाढते. हा दोष व्यवस्थेचा असताना, आम्ही त्याला प्रवृत्तीचा मानतो, असं सांगताना श्री. बोकील यांनी पैशाबाबत विविध मुद्दे मांडले. ते म्हणाले, ‘‘पैसा, अर्थात चलन (करन्सी) विनिमयाचे साधन आहे. ती वस्तू नाही, नोट हे माणसाने तयार केलेले उत्पादन आहे. त्याचा निसर्गाशी काही संबंध नाही. ती बाळगून ठेवण्याची किंवा मालकी हक्क सांगण्याची वस्तू नाही. तो वस्तू म्हणून खिशात अडकून पडणे योग्य नाही, तर तो सार्वजनिक व्हायला हवा. नोटाबंदीतून हे साध्य होणे अपेक्षित होते.’’

सारे काही व्यवस्थेने बिघडलेले आहे. पंतप्रधान मोदी एकटे काही करू शकणार नाहीत, असेही श्री. बोकील म्हणाले. मराठा समाजाच्या मूकमोर्चांबद्दल ते म्हणाले, ‘‘लाख लाख तरुण मुलांचे मूकमोर्चे शांततेत निघतात. लोकशाही व्यवस्थेत आपल्या म्हणण्याकडे लक्ष वेधण्याचा याहून वेगळा काय आविष्कार असू शकतो? प्रश्न गुणवत्तेचा किंवा बुद्धिमत्तेचा नाही, तर कमी व्याजदरात भांडवल उपलब्ध करण्याचा आहे. आपली उत्पादने गुणवत्तापूर्ण नाहीत, असे नाही. समस्या त्याच्या निर्मितीखर्चाची आहे. आपला देश उष्ण कटिबंधाचा आहे. त्यामुळे सलग साडेतीन तास एवढेच काम करणे शक्य आहे. त्याचा विचार न करता शीत कटिबंधातील देशांप्रमाणे कामाची वेळ आठ तास ठेवली गेली. आपल्याकडे आठ तासांत काम साडेतीन तासांचेच होते. संघटित रोजगाराच्या क्षेत्रात कामाची वेळ सरसकट सहा तास ठेवावी; पगार आहे तेवढाच ठेवावा. दोन पाळ्यांमध्ये काम सुरू करावे. त्यामुळे बेरोजगार असलेल्या लाखो तरुणांना काम मिळेल. पगारावरचा खर्च त्यामुळे दुप्पट होईल; पण कार्यक्षमता साडेतीन तासांवरून सात तासांवर पोहोचेल. ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती मानून त्यांना महागाई निर्देशांकाशी निगडीत 10 हजार रुपये निवृत्तीवेतन सुरू करावे. या साऱ्यातून सकळ राष्ट्रीय उत्पादनाप्रमाणे सकळ राष्ट्रीय समाधान वाढेल!’’


भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू आणि श्री. विश्वास नांगरे पाटील यांची व्याख्यानं नियोजनानुसार झाली नाहीत. पण श्री. नांगरे यांची व्हिडिओ क्लिप दाखवून संयोजकांनी तरुण श्रोत्यांची नाराजी काहीशी दूर केली. झालेली तिन्ही व्याख्यानं चांगली आणि वेगळं काही सांगणारी होती. त्यांना श्रोत्यांचा लाभलेला प्रतिसाद संयोजकांना सुखावून गेला असणार, हे निश्चित. सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्याशी निगडीत किंवा त्यांना आपल्या वाटणाऱ्या मुद्द्यांशी निगडीत नवे काही ऐकायला हवे असते. त्यातून अधिक माहिती मिळविण्याची त्याची इच्छा दिसून येते. राष्ट्र, समाज आणि अर्थ या विषयांवर झालेल्या व्याख्यानमालेतील तिन्ही भाषणांनी तेच दाखवून दिले.

(लेख किंवा त्याचा संपादित भाग पूर्वपरवानगीशिवाय अन्य कोणत्याही माध्यमामध्ये वापरू नये, ही विनंती.)


3 comments:

  1. व्याख्यानांचे उत्कृष्ट संकलन.
    - राजगुरू पारवे, औसा (जि. लातूर)

    ReplyDelete
  2. सतीश, मस्त! व्याख्यानमालेला आल्यासारखे वाटले. वाचताना ऐकल्याचे समाधान मिळाले.
    - मंदार देशमुख, नाशिक

    ReplyDelete
  3. अतिशय तपशीलवार माहिती. एखाद्याला काही कारणाने या व्याख्यानमालेला उपस्थित राहता आलं नसेल, तर हा वृत्तान्त वाचून त्याचं नक्कीच समाधान होईल. अशा प्रकारचे वृत्तान्त किंवा लेख हल्ली वृत्तपत्रांमध्ये वाचायला मिळत नाहीत. एखाद्या कार्यक्रमाबद्दल अशा पद्धतीचं सुरेख आणि परिपूर्ण लिखाणही दुर्मिळ झालं आहे. या सुंदर लेखाबद्दल आभार.
    - प्रदीप रस्से, जळगाव

    ReplyDelete

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...