‘हॉकीचा जादूगार’ अशीच ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद सिंह यांची आज (२९ ऑगस्ट) जयंती. आणि आज आपला राष्ट्रीय क्रीडा दिनही. अफाट
क्रीडाजगतातल्या एका जादूगाराचं कायमस्वरूपीचं स्मरण. अशा जादूगाराची आठवण की,
ज्याच्यामुळे ऑलिंपिकमधलं आपलं एक सुवर्णपदक निश्चित असे. योगायोगाने सध्या आशियाई
क्रीडा स्पर्धा चालू आहे. त्यात आपली कामगिरी अत्युत्कृष्ट होत नसली, तरी
भूतकाळाएवढी निराशाजनक नक्कीच नाही. अगदी अलीकडच्या काही वर्षांपर्यंत ऑलिंपिक आणि
आशियाई स्पर्धा आटोपल्यानंतर आपल्याकडे सामूहिक रडगाण्याचा कार्यक्रम असे.
गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत... ‘एवढा आपला १०० कोटींचा देश
आणि ऑलिंपिकमध्ये एक पदक नाही!’ हेच सूत्र पकडून
कट्ट्यांवरच्या गप्पांमध्ये तावातावानं मतं मांडली जात आणि संसदेतही ‘अभ्यासपूर्ण’ चर्चा होई. रडगाण्याचं आणि चर्चेचं
निहित कर्तव्य संपल्यानंतर पुढच्या ऑलिंपिक किंवा आशियाई स्पर्धेपर्यंत क्रिकेटच
आपला राष्ट्रीय खेळ असे! हे चित्र नव्या सहस्रकात थोडं
बदललं. अभिनव बिंद्राच्या सुवर्णपदकानं ‘येस्स! वी कॅन...’ असा विश्वास आपल्या क्रीडाक्षेत्रात
जागवला.
‘खेळायचं कशासाठी?’ या सनातन प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण फारशा
गांभीर्यानं केला नाही. आपल्या देशात क्रीडा-संस्कृती आहे का आणि असलीच तर ती कशा
पद्धतीची आहे, ती बदलली पाहिजे का, तीत काय बदल करावे लागतील, याबद्दल विचार
करायचं आपण टाळतो. आंतरराष्ट्रीय पदकविजेते एका रात्रीतून घडत नसतात, हे आपल्याला
तत्त्व म्हणून मान्य आहे. पण त्यासाठी किती कठोर मेहनत घ्यावी लागते, पद्धतशीर
नियोजन करावं लागतं, शिल्पासारखा खेळाडू घडवावा लागतो, याकडं आतापर्यंत आपलं बरंचसं
दुर्लक्ष झालं. देश पातळीवर खेळाडू घडवण्याचं काम काही प्रमाणात भारतीय क्रीडा
प्राधिकरण (‘साई’-SAI) करीत आहे. पण या प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीबद्दलही आजवर बरंच उलट-सुलट
बोललं गेलं आहे. शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या पहिल्या सरकारच्या काळात
राज्यात क्रीडापीठाची आणि त्याच्याशी संलग्न क्रीडा प्रबोधिनींची स्थापना झाली. पण
दोन दशकांनंतरही ‘प्रबोधिनी’चा ठसा ठळकपणे
उमटला आहे, असं म्हणता येणार नाही. छोट्या-मोठ्या गावांमध्ये, शहरांमध्ये
वर्षानुवर्षे क्रीडा मंडळं, क्लब चालू आहेत. त्यातले काही यथावकाश बंद पडतात, काही
नव्याने सुरू होतात. नवे खेळाडू येतात, जुने सगळं पचवून मैदानापासून दूर जातात.
विशिष्ट ध्येय समोर ठेवून आणि
त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून (पदकविजेते) खेळाडू घडवणं, हे दीर्घ मुदतीचं काम
आहे. तसं ते कालही होतं आणि आजच्या इन्स्टंटच्या जमान्यातही आहे. अशा पद्धतीनं काम
करणाऱ्या संस्था तुरळक का होईना आहेत आणि काही नव्यानं उभ्या राहत आहेत. नगरची ‘मॅक्सिमस स्पोर्ट्स अॅकॅडमी’ त्यापैकीच एक. नगरमध्ये प्रसिद्ध असलेल्या फिरोदिया कुटुंबाचा आधार या
प्रबोधिनीला आहे. शांतिकुमार फिरोदिया
मेमोरिअल फाउंडेशननं चार वर्षांपूर्वी, म्हणजे ऑक्टोबर २०१४मध्ये अॅकॅडमीची मुहूर्तमेढ रोवली. बॅडमिंटनपासून सुरुवात
झालेल्या प्रबोधनीनं नंतरच्या काळात ज्यूदो आणि तिरंदाजी या दोन खेळांकडेही लक्ष
वळवलं. कोणत्याही खेळात सर्वांत मूलभूत गोष्ट म्हणजे तंदुरुस्ती, खेळाडूची टिकून
राहण्याची क्षमता (दमसास). त्याची काळजी घेणाराही स्वतंत्र विभाग ‘मॅक्सिमस’मध्ये आहे.
‘ऑलिंपिकमध्ये
सहभाग आणि पदक’ हेच लक्ष्य ठेवून ‘मॅक्सिमस’ची सुरुवात करण्यात आल्याचं प्रबोधिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप
जोशी यांनी सांगितलं. क्रीडा-संस्कृतीच्या माध्यमातून शहर बदलण्याच्या, शहरवासीयांची वृत्ती सकारात्मक बनविण्याच्या प्रयत्नांची ही सुरुवात असल्याचं
सांगतानाच ‘त्यात आम्हाला नक्की यश येईल’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बॅडमिंटन म्हणजे प्रबोधिनीचा
पहिला आणि खास खेळ. प्रबोधिनीचे सर्वेसर्वा, उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांना त्यात
विशेष रस. (कै.) शांतिकुमार फिरोदिया यांचाही ओढा बॅडमिंटनकडे होता. त्यातूनच
साधारण २० वर्षांपूर्वी
त्यांनी नगर क्लबवर खास प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं. ‘मॅक्सिमस’ची बीजं आहेत ती आधी सुरू झालेल्या बॅडमिंटन अॅकॅडमीमध्ये. तिचंच हे विस्तारित आणि व्यापक रूप. ‘आपल्याला वेग, शेवटपर्यंत टिकून राहण्याची
क्षमता आणि ताकद यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. खेळाडूंना अगदी तरुण वयातच या गोष्टी
शिकवल्या पाहिजेत,’ असं मत असणारे प्रसिद्ध बॅडमिंटनपटू जे.
बी. एस. विद्याधर यांचं मार्गदर्शन नगरच्या खेळाडूंना मिळतं ते ‘मॅक्सिमस’मुळंच. प्रकाश पडुकोण यांच्यानंतर ‘ऑल इंग्लंड
बॅडमिंटन’ स्पर्धा जिंकलेले पुलेला गोपीचंद अॅकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक आहेत. त्यांच्या ‘गुरुकुल’च्या हातात ‘मॅक्सिमस’नं हात मिळवला आहे. नगरच्या खेळाडूंना नवं आणि मूलभूत काही शिकायला मिळावं
म्हणूनच ही युती आहे. इथं आपलं नाणं खणखणीत वाजविणाऱ्या खेळाडूंना पुढे विद्याधर,
गोपीचंद यांच्या प्रबोधिनीत शिकण्याची संधी मिळणार आहे.
बॅडमिंटन म्हणजे नगरमधली सध्याची ‘इन थिंग’ आहे. सर्व
वयोगटांतली मंडळी रोज आवर्जून कोर्टवर दिसतात. त्यामुळंच की काय, प्रबोधिनीत
सर्वाधिक संख्या आहे ती बॅडमिंटनच्या खेळाडूंची. सध्या १०० खेळाडू नियमित प्रशिक्षण घेतात.
याशिवाय २० खेळाडू
प्रतीक्षायादीवर आहेत. ही संख्या एकदम वाढलेली नाही. पहिल्या वर्षी ती ३०-४० होती; मग दुप्पट झाली आणि
यंदा तिनं शतक गाठलं. खेळाडूला प्रवेश मिळाला की, लगेच बॅडमिंटनचे धडे शिकवायला
सुरुवात होत नाही. आधीचे तीन महिने प्रत्येकाला ‘फिजिकल
फिटनेस’ अजमावून पाहावा लागतो. त्यानंतर त्याला खेळाच्या
अगदी मूलभूत गोष्टी शिकवल्या जातात. तिथं धडे गिरवल्यानंतर त्याची वरच्या तुकडीत
रवानगी होते. सध्या वाडिया पार्क स्टेडियमच्या बॅडमिंटन क्रीडागारात रोज सायंकाळी ४ ते ५, ५ ते ६, ६ ते ७ आणि ७ ते ९ या चार
तुकड्यांमध्ये बॅडमिंटनपटू शिकताना दिसतात. शेवटच्या तुकडीतले विद्यार्थी म्हणजे
जणू हुश्शार मुलांची ‘स्पेशल बॅच’. त्यांना स्पर्धात्मक पातळीचं प्रशिक्षण दिलं जातं. या तुकडीतल्या
खेळाडूंना पहाटे ५.३० ते सकाळी ७.३० या दोन तासांचं प्रशिक्षण सक्तीचं
आहे. सर्वोत्तम १० खेळाडूंना
विद्याधर यांच्या विजयवाडा येथील अॅकॅडमीत
प्रशिक्षणाची संधी मिळेल. त्यासाठी त्यांना येणाऱ्या खर्चातील निम्मा वाटा ‘मॅक्सिमस’ उचलणार
असल्याचं संदीप जोशी यांनी सांगितलं. बॅडमिंटनची दर तीन महिन्यांनी स्पर्धा होते.
त्यामुळे स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्यातील प्रशिक्षणार्थींना होतो आणि त्यातून
त्यांना स्वतःमधील उणिवा-क्षमतांची जाणीव होते.
‘मॅक्सिमस’च्या बुद्धिबळ शिबिरात चाल शिकवताना
शार्दूल गागरे.
|
‘मॅक्सिमस
स्पोर्ट्स अॅकॅडमी’चं काम तंत्रशुद्ध रीतीनं चालतं. एखाद्या
खेळाडूला प्रवेश मिळाला की, लगेच दुसऱ्या दिवशी त्याला तो खेळ शिकवायला सुरुवात
होते, असं मुळीच नाही. संबंधिताची शारीरिक क्षमता, आवड, कल हे सगळं तपासून खेळाची
निवड केली जाते. याचं कारण साधं आहे. कोणत्या वयात खेळायला सुरुवात करावी, कोणता
खेळ योग्य आहे, याचं तंत्रशुद्ध ज्ञान फारच कमी मुलांच्या पालकांना असतं. क्रिकेट
आणि बॅडमिंटन सध्या गाजणारे खेळ आहेत, म्हणून बहुसंख्यांची ओढ तिकडेच असते. ‘मॅक्सिमस’मध्ये दाखल झाल्यानंतर आधीचे तीन महिने ‘फिजिकल फिटनेस’ विभागात घालवावे लागतात. त्यातून
मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण होते. ही मुले, त्यांचे पालक यांच्याशी संदीप जोशी व्यक्तिगत
पातळीवर संवाद साधतात. या गप्पांमधून ते मुलांचं मानस जाणून घेतात. या चर्चेनंतर
मुलासाठी कोणता खेळ योग्य हे निश्चित केलं जातं. शारीरिक तंदुरुस्तीबाबत ‘अॅकॅडमी’ एवढी आग्रही का आहे?
या प्रश्नाचं उत्तर देताना जोशी म्हणाले की, यातून मुलांची क्षमता किती नि काय
आहे, हे समजून येतं. त्यानुसार मुलांसाठी योग्य असलेला खेळ निवडता येतो. दुसरं
म्हणजे परीक्षेच्या किंवा सुटीच्या काळात मुलं खेळायला येत नाहीत. त्यामुळं वर्षभर
शिकलेलं या गैरहजेरीत विसरायला होतं. तंदुरुस्तीचे व्यायाम घरीही करता येतात.
त्यातून खेळाबद्दलची ओढ कायम राहते.
![]() |
संकल्प थोरातला अत्याधुनिक सायकलची भेट.
|
गुणी खेळाडूंना मदतीचा हात देण्यातही
‘मॅक्सिमस’ आघाडीवर
आहे. हे खेळाडू ऑलिंपिक मान्यताप्राप्त खेळाचेच हवेत, असा त्यासाठी कटाक्ष आहे. असं
पुरस्कृत करण्याआधी खेळाडूची पूर्ण माहिती मिळविली जाते. त्याची कामगिरी काय,
त्याचं सातत्य कसं आहे, या खेळाला किती भवितव्य आहे, हे बारकाइनं पाहिलं जातं.
त्या त्या खेळातल्या तज्ज्ञाचंही मत घेतलं जातं. वर्षभरात साधारण १०-१५ खेळाडूंना
पुरस्कृत केलं जातं. शांतिकुमार फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनतर्फे ही मदत दिली जाते. रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेले बॅडमिंटून खेळाडू मनू अत्री व
सुमित रेड्डी, बुद्धिबळ खेळाडू शार्दूल व शाल्मली गागरे यांना आतापर्यंत अशी मदत
मिळाली आहे.
![]() |
‘खेलो इंडिया’त चमकलेली भाग्यश्री फंड.
|
ऑलिंपिकमध्ये भारतासाठी पदक
जिंकावं, हेच उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून अॅकॅडमीचं काम सुरू आहे. त्यामुळं तिथलं
कामकाजही त्याला अनुसरूनच चालतं. शिस्त आणि नियम
यांच्या पालनावर भर आहे. खेळाचं प्रशिक्षण दिलं जातंच; पण आहाराबाबतही मार्गदर्शन केलं जातं.
ज्यातून प्रेरणा मिळते अशा कार्यक्रमांचं आयोजन, क्रीडाविषयक चित्रपट-माहितीपट
खेळाडूंना दाखविले जातात. खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या योजना असतात. अॅकॅडमी
निःशुल्क नाही. कोणतीही गोष्ट मोफत मिळाली की, तिचं महत्त्व राहत नाही, हे जाणून
नाममात्र शुल्क घेतलं जातं. तथापि त्यातून सगळा खर्च भागत नाही. मग तो वाटा
नरेंद्र फिरोदिया उचलतात. गुणवान खेळाडूंसाठी वेगळा विचार सुरू आहे. बॅडमिंटनच्या
तिमाही स्पर्धेत पहिले तीन क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना शुल्क माफ केलं जातं.
![]() |
श्रेया गहिलेचा अचूक नेम करंडकावर!
|
बॅडमिंटनप्रमाणंच सध्या तिरंदाजी
व ज्यूदो यांचंही प्रशिक्षण इथं सुरू आहे. फुटबॉल आता लवकरच सुरू होईल. सध्या
सुरेखा शिरसाट (ज्यूदो), जितेंद्रकुमार, रोहित शर्मा व तेजस पवार (बॅडमिंटन),
पल्लवी सैंदाणे (फुटबॉल) असे मार्गदर्शक आहेत. येत्या काही काळातच ‘मॅक्सिमस’ रायफल
शूटिंग, टेबल टेनिस, लॉन टेनिस या खेळांकडं वळणार आहे. ‘मॅक्सिमस स्टेडियम’चं कामही लवकरच सुरू होईल. अॅकॅडमीचे धुरिण सध्या आणखी मोठी स्वप्नं पाहत
आहेत. नेमबाजीची स्वतंत्र अॅकॅडमी येत्या दोन वर्षांत सुरू करण्याचं आणि ‘साई’च्या धर्तीवर निवासी प्रबोधिनी स्थापन करण्याचा
त्यांचा मानस आहे. अॅकॅडमीचा आजवरचा प्रवास नि त्याची गती पाहिली, तर ही स्वप्नं
साकार होण्यात फार काही अडचण येईल, असं मुळीच वाटत नाही.
‘मॅक्सिमस’. हा शब्द आहे मूळचा लॅटिन. म्हणजे Greatest, Largest. मराठीत महत्तम. या शब्दाला जागणारी भव्यदिव्य स्वप्नं ‘मॅक्सिमस अॅकॅडमी’ पाहत आहे. या स्वप्नांना क्रीडा
दिनी नवे पंख फुटावेत...
--------
या खेळाडूंना मिळाली
मदत
🏆 बॅडमिंटन - मनू अत्री - रिओ
ऑलिंपिक, २०१६
🏆 बॅडमिंटन - सुमित रेड्डी - रिओ ऑलिंपिक, २०१६
🏆 बुद्धिबळ - ग्रँड मास्टर शार्दूल गागरे
🏆 बुद्धिबळ - वूमेन्स इंटरनॅशनल मास्टर शाल्मली गागरे
🏆 क्रिकेटपटू - प्रणव धनवडे – शालेय स्पर्धेत एका डावात १००९ धावा करण्याचा जागतिक विक्रम
🏆 कुस्ती - भाग्यश्री फंड - ‘खेलो इंडिया’मध्ये
सुवर्णपदक आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्णपदके.
🏆 कुस्ती - सोनाली मंडलिक -
राष्ट्रीय मानांकित खेळाडू
🏆 सायकलिंग - संकल्प थोरात -
गुवाहाटीतील शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सांघिक तिसरा क्रमांक.
🏆 मुष्टियुद्ध - आरती भोसले -
राष्ट्रीय खेळाडू
🏆 तिरंदाजी - अभिजित रिंढे
🏆 चालण्याची शर्यत - सुवर्णा कापसे
- राष्ट्रीय खेळाडू
🏆 चालण्याची शर्यत - पूजा कापसे -
राष्ट्रीय खेळाडू
----
(कृपया, लेखी परवानगीशिवाय हा लेख किंवा त्यातील भाग कोणत्याही माध्यमासाठी वापरू नये.)
Thank you so much Satish Sir...for such a wonderful article...very well written and expressed, we will try our best for the betterment of our mother land, our country.
उत्तर द्याहटवाThe day will not far away when the whole Indian Sports will reach the new Era...
लेख छान आहे. नगरमध्ये इतकी चांगली अॅक्टिव्हिटी चालू आहे, हे या लेखामुळं समजलं. खूपच चांगलं काम सुरू आहे.
उत्तर द्याहटवा- विनय गुणे, संगमनेर
खेळाबाबतचा, विशेष करून 'मॅक्सिमस' बाबतचा लेख 'मॅक्सिमस'च आहे. स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी, कॉलेज याच्या निर्मितीची गरज दर्शविणारा, क्रीडाविश्वाला प्रोत्साहन देणारा लेख आहे. (अर्थात क्रिकेटची गुलामगिरी सोडून!)
उत्तर द्याहटवा- श्रीराम वांढरे, भिंगार (नगर)