स्वातंत्र्यदिन संपता संपता रात्री उशिरा बातमी कळली - अजित
वाडेकर गेले. ते त्या अर्थाने माझ्या पिढीचे नायक क्रिकेटपटू नाहीत. आवडीनं
क्रिकेट पाहायला - म्हणजे आकाशवाणीवरची कॉमेंटरी ऐकायला नि वृत्तपत्रांतल्या
बातम्या वाचायला शिकलो,
तेव्हा वाडेकर खेळत नव्हते.
कॉमेंटरीमधले धावांचे आकडे सोडले, तर बाकी काही कळायचं नाही, तेव्हाची गोष्ट सांगतोय. तर वाडेकरांनी तेव्हा निवृत्ती जाहीर केली होती. अगदी नुकतीच. इंग्लंडचा ‘तो’ दौरा संपला होता. सर्व बाद ४२ असा ‘पराक्रम’ भारताच्या नावावर नोंदला गेला तो याच कुप्रसिद्ध दौऱ्यात. वाडेकर-बेदी वाद सुरू झाले म्हणतात, ते याच दौऱ्यात. बरंच वाईट लिहिलं जात होतं, ते याच दौऱ्याबद्दल. बॅटच्या स्वरूपातील विजय स्तंभावर दगडफेक वगैरे, भारतीय क्रीडाप्रेमींचे लाडके प्रकार करून झाले होते. त्यानंतर लगेचच क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालचा वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. ती संधी साधून लगेचच वाडेकरांनी मदतनिधी सामना मिळवला. ते निवृत्त झाले आणि मन्सूरअली खान पटौदी पुन्हा एकदा भारतीय संघाचे कर्णधार बनले. एक वर्तुळ पूर्ण झालं. पटौदींचं कर्णधारपद काढून वाडेकर. आणि त्यांच्यानंतर पुन्हा पटौदी. सुनील गावसकर नावाचा दबदबा तेव्हा सुरू झाला होता. भारतीय फिरकीचा चौकोन जोरात होता.
कॉमेंटरीमधले धावांचे आकडे सोडले, तर बाकी काही कळायचं नाही, तेव्हाची गोष्ट सांगतोय. तर वाडेकरांनी तेव्हा निवृत्ती जाहीर केली होती. अगदी नुकतीच. इंग्लंडचा ‘तो’ दौरा संपला होता. सर्व बाद ४२ असा ‘पराक्रम’ भारताच्या नावावर नोंदला गेला तो याच कुप्रसिद्ध दौऱ्यात. वाडेकर-बेदी वाद सुरू झाले म्हणतात, ते याच दौऱ्यात. बरंच वाईट लिहिलं जात होतं, ते याच दौऱ्याबद्दल. बॅटच्या स्वरूपातील विजय स्तंभावर दगडफेक वगैरे, भारतीय क्रीडाप्रेमींचे लाडके प्रकार करून झाले होते. त्यानंतर लगेचच क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालचा वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. ती संधी साधून लगेचच वाडेकरांनी मदतनिधी सामना मिळवला. ते निवृत्त झाले आणि मन्सूरअली खान पटौदी पुन्हा एकदा भारतीय संघाचे कर्णधार बनले. एक वर्तुळ पूर्ण झालं. पटौदींचं कर्णधारपद काढून वाडेकर. आणि त्यांच्यानंतर पुन्हा पटौदी. सुनील गावसकर नावाचा दबदबा तेव्हा सुरू झाला होता. भारतीय फिरकीचा चौकोन जोरात होता.
खेळत नसले, तरीही ‘अजित
वाडेकर’ नाव माहीत होतं. त्याबद्दल प्रेम होतं आणि
कौतुकही वाटत होतं. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतानं वेस्ट इंडिजला तिथल्या बेटांवर
धूळ चारली आणि त्याच वर्षी ‘गणपतीबाप्पा मोरया...’ म्हणत इंग्रजांना त्यांच्या भूमीवर खडे चारले होते. इंग्लंडच्या त्या
दौऱ्यावर बाळ ज. पंडित यांनी लिहिलेलं ‘१९७१चा पराक्रमी दौरा’ हे
पुस्तक वाचलं होतं. त्यामुळेच वाडेकर तेव्हा खेळत नसले, तरी
ते ‘अनोळखी’ राहिले नव्हते.
वाडेकर, सोलकर, एंजिनीअर यांच्या चपळ
क्षेत्ररक्षणाच्या किती तरी दंतकथा आम्ही मित्र एकमेकांना डोळे मोठे करून
पुनःपुन्हा सांगत होतो आणि चेहऱ्यांवर उद्गारवाचक चिन्हं आणत होतो.
त्याच काळात ‘क्रीडांगण’चा दिवाळी अंक वाचण्यात आला. तेव्हा ते मासिक होतं. त्यात ‘वाचकांच्या प्रश्नांना अजित वाडेकरांची उत्तरं’ असं
काहीसं सदर होतं. एका वाचकानं विचारलं होतं, ‘क्रिकेटपटूंनी
केस वाढवावेत का?’ वाडेकरांनी नेमकं काय उत्तर दिलं
होतं, ते आता आठवत नाही. पण त्यात त्यांनी एकनाथ सोलकरचा
उल्लेख केला होता. ‘केस लांब असले म्हणजे खेळ तेवढाच
चांगला होतो, असं काही नाही,’ अशा
आशयाचं उत्तर देताना त्यांनी बिशनसिंग बेदी यांच्या लांब केसांचा उल्लेख केला
होता. बेदींना टोमणा! वाडेकर आणि बेदी यांच्यातील वाद
इंग्लंड दौऱ्यात गाजले होतेच. पण त्या दोघांमध्ये खरोखर, अगदी
आपल्या गल्लीतल्या पोरांसारखं भांडण असल्याचा बोध त्या उत्तरावरून अस्मादिकांनी
करून घेतला.
‘किशोर’नं बहुतेक त्याच वर्षीच्या दिवाळी अंकात ‘मोठ्यांचं बालपण’ हा विषय घेतला होता. त्यात
वाडेकर होते. त्यांचे लहानपणीचे किस्से वाचायला मिळाले. त्याच एक-दोन वर्षांत कधी
तरी विविध भारतीवरून त्यांचा आवाजही ऐकायला मिळाला. 'क्रिकेट विथ विजय मर्चंट' हा अडीचचा कार्यक्रम झाला की, दर रविवारी दुपारी तीन वाजता ‘फौज़ी
भाईयों के लिए’ विविध
भारतीचा ‘विशेष जयमाला’ कार्यक्रम
असे. त्यात सेलेब्रिटी एक तास बोलत आणि आपल्या आवडीची गाणी ऐकवत. वाडेकरांच्या
पत्नीचं नाव रेखा असल्याचं त्याच कार्यक्रमातून कळलं. ‘मेरे
सपनों की रानी कब आएगी तू...’ हे तेव्हाचं सुपरहीट गाणं
त्यांनी पत्नीचं नाव घेऊन ऐकवल्याचं आठवतंय. पक्कं!
अजित वाडेकर यांची कधी भेट होईल, हे
स्वप्नातही आलं नव्हतं. किंबहुना तसं स्वप्न वगैरे काही पाहिलंही नव्हतं. लहान
असताना पुण्यात स्टेट बँकेचे आंतरविभागीय क्रिकेट सामने पाहिले होते. तिथं
पीवायसीच्या किंवा जिमखान्याच्या मैदानावर गुंडप्पा विश्वनाथ खेळताना दिसला. वाडेकर स्टेट बँकेतच. पण
ते बहुतेक आजारी असल्यामुळं खेळत नव्हते म्हणे.
पण वाडेकर यांची भेट होणं, त्यांच्याशी दोन-पाच मिनिटं
बोलणं माझ्या नशिबात सटवाईनं लिहून ठेवलेलं होतं. फार वर्षांपूर्वीची गोष्ट
ही. माझी पत्रकारिता सुरू झाली तेव्हाची. ते वर्ष १९८९ असावं. रोटरी
क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अजित वाडेकर
नगरला आले होते. क्लबचे अध्यक्ष स्टेट बँकेचे मोठे अधिकारी होते. वाडेकर त्याच बँकेत खूप वरिष्ठ अधिकारी. सरव्यवस्थापक किंवा तत्सम पदावर. भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापकपदाच्या भूमिकेत जायला वेळ होता अजून त्यांना. निवडसमितीमध्ये तर फार नंतर होतेे ते.
वाडेकर नगरमध्ये येतात म्हटल्यावर माझ्यातल्या
हौशी क्रीडा पत्रकाराला उबळ आली. कार्यालयीन वेळ सोडून करण्याचं हे काम आवडीनं अंगावर घेतलं होतं. वाडेकर यांना भेटलंच पाहिजे, त्यांची मुलाखत घेतलीच पाहिजे. ते आपलं कर्तव्यच आहे, असं वाटलं. आता त्यांना भेटायचं म्हणजे कसं नि कुठं? अगदीच नवखा असल्यामुळं 'सोर्सेस' वगैरे म्हणतात, ते नव्हते. कार्यक्रम ज्या वेळेत होता, ती वेळ कार्यालयात बसून काम उरकण्याची. कमी मनुष्यबळाच्या कार्यालयात काम करण्याचं हे मोठं दुःख. त्यानं नेहमीच साथ दिली. (त्याची दुसरी चांगली बाजू म्हणजे, कुणावाचून काही अडत नाही! एकट्याच्या बळावर काम रेटायचं शिकतो माणूस.)
कसंबसं काम संपवून कार्यालयातून पळ काढला
आणि कार्यक्रमस्थळी गेलो. म्हणजे सहकार सभागृहात. तिथं
पोहोचल्याबरोबर कळलं की, कार्यक्रम कधीच संपला. वाडेकरसाहेब आता जेवायला गेले. हे
जेवायचं स्थळ म्हणजे एक क्लब. खास मेंबर लोकांचा क्लब. तो शहरापासून बऱ्यापैकी लांब.
'जिथं शहाणे जायला घाबरतात, तिथं मूर्ख बेधडक घुसतात,' या उक्तीला अनुसरून थेट त्या क्लबच्या दिशेनं सायकल हाणली. वाडेकर भेटणारच, असं वाटत होतं. पण बोलतील का? मनात ती शंका मात्र होती. कार्यालयातून निघताना शहाणपणा केला होता - वाडेकरांना विचारायच्या प्रश्नांची यादीच केली होती. न्यूजप्रिंटवर लिहिलेली.
'जिथं शहाणे जायला घाबरतात, तिथं मूर्ख बेधडक घुसतात,' या उक्तीला अनुसरून थेट त्या क्लबच्या दिशेनं सायकल हाणली. वाडेकर भेटणारच, असं वाटत होतं. पण बोलतील का? मनात ती शंका मात्र होती. कार्यालयातून निघताना शहाणपणा केला होता - वाडेकरांना विचारायच्या प्रश्नांची यादीच केली होती. न्यूजप्रिंटवर लिहिलेली.
क्लबवर पोहोचलो. रोटरी क्लबच्या स्थानिक अध्यक्षांना
भेटून ओळख वगैरे सांगितली. परप्रांतातले होते साहेब. स्टेट बँकेचा
नगरमधला सर्वांत मोठा अधिकारी. माझ्या फाटक्या अवताराकडे पाहूनही
त्यांनी काही शंका घेतली नाही. ‘वाडेकरसाहेब जेवत आहेत. हात धुवून येतील
एवढ्यात,’ असं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर दोन-पाच मिनिटांत साक्षात अजित वाडेकर आले.
वातावरण क्लबमध्ये असावं तसंच होतं. हिरवळ, मंद प्रकाश वगैरे.
वाडेकरांना पाहून आपण सेलेब्रिटीला भेटतोय असं काही वाटलंच नाही. जेवण झाल्यानं तेही
निवांत होते, प्रसन्न दिसत होते. मुलाखत
पाहिजे म्हटल्यावर एकेरी नावानं उल्लेख करून म्हणाले, ‘‘सतीश, आता या वेळी मुलाखत घेणं
तुला तरी योग्य वाटतंय का सांग...’’
माझा चेहरा उतरला असावा खर्रकन आणि अजित वाडेकरांना ते मंद प्रकाशातही दिसलं असावं. माझी समजूत काढावी, असं त्यांनी ठरवलं बहुतेक. एक उपाय सुचल्याच्या सुरात ते म्हणाले, ‘‘एक काम कर. तू काढलेल्या प्रश्नांचा कागद दे मला. मी मुंबईला गेल्यावर त्याची उत्तरं लिहून ती सिंगसाहेबांकडे पाठवीन.’’ सिंगसाहेब म्हणजे स्टेट बँकेचे ते अधिकारी. मला तेवढ्यापुरतं खूश केलं त्यांनी.
माझा चेहरा उतरला असावा खर्रकन आणि अजित वाडेकरांना ते मंद प्रकाशातही दिसलं असावं. माझी समजूत काढावी, असं त्यांनी ठरवलं बहुतेक. एक उपाय सुचल्याच्या सुरात ते म्हणाले, ‘‘एक काम कर. तू काढलेल्या प्रश्नांचा कागद दे मला. मी मुंबईला गेल्यावर त्याची उत्तरं लिहून ती सिंगसाहेबांकडे पाठवीन.’’ सिंगसाहेब म्हणजे स्टेट बँकेचे ते अधिकारी. मला तेवढ्यापुरतं खूश केलं त्यांनी.
‘‘कुठं काम करतोस?’’, असंही विचारलं वाडेकर
यांनी. उत्तर ऐकल्यावर म्हणाले, ‘‘अरे, तुझ्यासारखा एवढा चांगला
मुलगा नि तिथं काय काम करतोस! मी त्या ह्यांना सांगून तुला त्या पेपरमध्ये घ्यायला
लावतो.’’ त्यांनी त्या वेळी घेतलेल्या नावाचा वृत्तपत्रसृष्टीत दबदबा होता आणि
त्यांचं दैनिकही फार मोठं मानलं जाई.
अजून थोड्या गप्पा-गोष्टी रंगल्या. सर्जेराव घोरपडे यांनी ‘क्रीडांगण’ मोठ्या हौसेनं सुरू केलं होतं. ते मासिक असताना त्याच्या संपादकीय किंवा
सल्लागार मंडळात अजित वाडेकर होते. ‘क्रीडांगण’मध्ये दीड वर्ष काम केल्याचं वाडेकरांना मी सांगितलं. त्या काळात मराठीत
क्रीडा पाक्षिकांची लाट आली होती. एकाच वेळी चार पाक्षिकं प्रसिद्ध होत -
पुण्यातून दोन आणि दोन मुंबईतून. त्यातल्या एका पाक्षिकाचे संपादक म्हणून अजित
वाडेकर यांचं नाव झळकत असे. भारतात झालेल्या रिलायन्स विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर त्या भरतीच्या
लाटेला ओहोटीही लागली. संपादक म्हणून वाडेकर यांचं नाव मिरवणारं पाक्षिकही बंद
पडलं. त्याबद्दल मी विचारलं. ‘‘अरे! आपल्या
मराठीत काय, तशीच नावं टाकतात...’’ असं काहीसं म्हणत त्यांनी त्या विषयावर फार बोलणं टाळलं. आता बोलणं
वाढवण्यासारखं फार काही राहिलं नव्हतं. त्यामुळं त्यांच्या हातात हात देऊन निरोप
घेतला...
मुलाखत दहा मिनिटांत संपवून आम्ही
परत सायकलच्या
पॅडलवर जोर मारत गावात.
उशीर झाल्यामुळं मेस बंद झाली होती. आता खिशातले पैसे
खर्च करून बाहेर हातगाडीवर काही तरी खाणं भाग. मुलाखत न मिळाल्याची खंत होतीच...
वाडेकर यांच्यासारख्या व्यग्र माणसाला, सेलेब्रिटी
क्रिकेटपटूला एका छोट्या शहरात, एका रात्री, पाच मिनिटांसाठी भेटलेल्या एका छोट्या पत्रकाराची आठवण राहणं अवघडच.
त्यामुळं माझ्या प्रश्नांना त्यांच्याकडून काही
लेखी उत्तरं आलीच नाहीत. त्यांना पत्र लिहून त्याचा पाठपुरावा करणं शक्य होतं. पण
ते काही लक्षात आलं नाही.
आता रात्री वाडेकर यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर हे सगळं पुन्हा आठवलं.
तब्बल २९ वर्षांनंतरही लक्षात राहिलेल्या आणि
पुढंही नेहमी लक्षात राहतील एवढ्या गोष्टी त्या
पाच-दहा मिनिटांनी दिल्या. त्या अशा - १) अजित वाडेकर यांना अगदी थोडा वेळ का
होईना थेट भेटण्याचं, त्यांच्याशी बोलण्याचं भाग्य मला लाभलं. २) भारताचा लाडका आणि यशस्वी
कॅप्टन असलेल्या माणसाच्या हातात हात मिळवता आला! ३) त्यांनी एकेरी नावानं, आपुलकीनं हाक मारली. ४) उगीच
आढेवेढे न घेता, मुलाखत आता कशी शक्य नाही, हे प्रांजळपणे सांगितलं. ५) त्या
छोट्याशा संवादाच्या वेळात त्यांनी मला आपणहून नव्या, चांगल्या नोकरीचं आश्वासन दिलं होतं. आणि ६) माझ्या ढोबळ,
टपोऱ्या हस्ताक्षरातला न्यूज प्रिंटचा तो पिवळा कागद
काही काळ का होईना वाडेकरांजवळ राहिला. त्या रूपाने मीच त्यांच्या बरोबर आणखी
बराच काळ होतो की.
... या छोट्या आणि अविस्मरणीय अनुभवाबद्दल, मनापासून
आभार अजित वाडेकर!
(छायाचित्रं - ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ आणि ‘एशियन एज’ यांच्या संकेतस्थळांवरून साभार.)
मस्तच. तुमच्यातला संवेदनशील पत्रकार अशाच मोठ्यांच्या छोट्या छोट्या भेटीतून घडला असणार नक्की!
उत्तर द्याहटवासहज चालविलेल्या लेखणीतून साकारलेला सुंदर लेख
उत्तर द्याहटवाआठवणींचा अविस्मरणीय पट
उत्तर द्याहटवाखरंच सुंदर! अजित वाडेकर सरांविषयी थोडक्यात पण सखोल लेखन. मनाला भावतं ते.
उत्तर द्याहटवा- अजय कविटकर, नगर
मस्त! तुम्ही वाडेकरांना प्रत्यक्ष भेटल्याचं चित्र उभं राहिलं वाचून.
उत्तर द्याहटवा- अपर्णा देगावकर, पुणे
मस्तच. खूप छान आठवणी.
उत्तर द्याहटवा- अभय ढोले, पुणे
मनोज्ञ लेख. शेवट खासच!
उत्तर द्याहटवा- डॉ. ऊर्मिला चाकूरकर, पैठण
लेख वाचला. फार छान लिहिलं आहेस.
उत्तर द्याहटवा- रवींद्र चव्हाण, पुणे
... 'छोटीशी मुलाखत' असली, तरी एकदम भारी!
उत्तर द्याहटवा- शिरीष बापट, नगर
खूप छान झाला आहे रे लेख.
उत्तर द्याहटवा- विनायक लिमये, पुणे
खूप छान!
उत्तर द्याहटवा- सुनील लांजेवार, औरंगाबाद
खूप छान शब्दांकन. आवडले. काही माणसे असतातच अशी थोर की त्यांचे स्मरण सदैव राहते.
उत्तर द्याहटवा- स्वाती वर्तक
अजित वाडेकर सर जाऊन अवघे काही तास होत नाहीत, तोच आपण त्यांच्या आठवणींचा लेख लिहून त्यांना आपल्या मनाच्या खिडकीत बसवता व २९ वर्षांपूर्वीच्या त्यांच्या ऋणातून मुक्त होता हा आपल्या मनाचा मोठेपणाच आहे. गावसकर सर असेतोपर्यंत मला क्रिकेट खेळ आवडत असे. नंतर मात्र जसजसे राजकारणी, उद्योगपती आर्थिक लोभापायी गिधाडं बनून या खेळाचे लचके तोडू लागली तसतसा या खेळाचा बाजार झाला.
उत्तर द्याहटवा- श्रीराम वांढरे, नगर
या लेखातून तुमचं क्रीडाप्रेम जाणवलं. लेखनशैलीही. विशेष मजकूर नसतानाही तुम्ही हे लिहिलंत.
उत्तर द्याहटवा- सीमा मालाणी, संगमनेर
सतीश, अतिशय सुंदर लिहितोस! Great...
उत्तर द्याहटवा- गिरीश शाह, दिल्ली
अजित वाडेकर यांच्या भेटीची सुरस आठवण वाचली... छान वाटले. आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीच्या दिवसांत अशा मोठ्या सेलेब्रिटींच्या भेटी आपल्या करीअरच्या वाटचालीसाठी प्रेरक ठरतात, हा मुद्दा लक्षात आला..!
उत्तर द्याहटवा- महेश घोडके, नगर
अत्यंत छान वाटले वाचून. पोदार महाविद्यालयातून १९६१च्या सुमारास इराणी कॅप्टन फारूक इंजिनीयर, अरुण सावंत, मोहन देसाई, तर 'रुईया'मधून अजित वाडेकर कॅप्टन, विलास गोडबोले, भिसे खेळायचे. इंटरकॉलेजिएट सामने.
उत्तर द्याहटवाआम्हाला 'पोदा' मधून शिकवायला मार्शल पाटील, एम. एस. नाईक व वेस्ट इंडिजचे चार्ली स्टेयर्स असत. अजित तसा अबोल, मितभाषी. त्यामुळे शिवाजी पार्कच्या मनोहर हर्डिकर सांगे त्यांची जास्त घसट, तऱ विजय मांजरेकर, रमाकांत देसाई एकदम खुल्ले वागणुकीस. या लेखामुळे अशा आठवणी घोंघावयाला लागल्या.
- भाल पाटणकर, मुंबई
'पंडितांचं पुस्तक वाचल्यामुळे वाडेकर 'अनोळखी' राहिले नव्हते.' आणि 'त्या पिवळ्या कागदाच्या रूपाने मी बराच काळ त्यांच्याबरोबर राहिलो.' ही दोन्ही वाक्यं फार फार आवडली.
उत्तर द्याहटवालहानपणी मेरी क्यूरीचं चरित्र वाचल्यावर मी तिला माझी जिवाभावाची मैत्रीण बनवली होती. मी जिथे जिथे असेन तिथे तिथे बापडी मारी स्क्लोडोव्हस्का माझ्या मनाच्या टांग्यातून येत असे.
मधु मंगेश कर्णिकांचं 'सोबत' पुस्तक वाचून मी त्यात एक पिंपळपान ठेवलं होतं. तेवढ्यानेच त्या पुस्तकातल्या देखण्या, मायाळू निसर्गावर माझी हक्काची मोहर उमटली होती! त्या ओळखीची, जवळिकीची खूण पटली आणि या नव्या खिडकीशी माझं आपुलकीचं नातं जुळलं.
कोवळ्या जर्नालिस्टचा नवथर बुजरेपणा, कुणी वलयांकित व्यक्तीने 'सतीश!' अशी हाक मारल्यावर कृतकृत्य वाटणं, काम होणार नाही हे कळल्यावर होणारी प्रचंड निराशा अशा साऱ्या छटा वाचकांपर्यंत प्रामाणिकपणे जशाच्या तशा पोचल्या. तो पिवळा कागद हरवल्याबद्दल वाडेकरांचा रागही आला.
पण तुम्हाला तसा राग आलाच नाही. त्यामुळे लेखाची उंची एकाएकी वाढली. रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेतली, युवराजाच्या रथासमोर आपला रत्नहार फेकणारी षोडशी आठवली.
मुलाखत झालीच नाही, फारसं काही घडलंच नाही, साधं उत्तरदेखील आलंच नाही. तरीही, लेखकाच्या सकारात्मक मनोवृत्तीमुळे वाचकांच्या मनांत बरंच काही घडलं.
फारच छान, मस्त झालाय लेख!
- डॉ. उज्ज्वला दळवी
लेख उत्तम जमलेला आहे. वाडेकर सर आणि तुम्ही या दोघांचीही आकर्षक व्यक्तिमत्त्वं खुलून आलेली आहेत.
उत्तर द्याहटवा- हेली दळवी