मुख्य सामग्रीवर वगळा

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

कळियांसी आला...

काही दिवसांपूर्वी, दीड-एक वर्षापूर्वी बायको एका नातेवाइकाच्या वास्तुशांतीला गेली होती लातूरला. त्यानं परतभेट म्हणून दोन रोपं दिली. त्यातलं एक मोगऱ्याचं. दुसरं असंच काही तरी; नेमकं आठवत नाही. मोगरा, निशिगंध, जाई-जुई, पारिजात...ही आवडती फुलं माझी. मंद दरवळणारी. त्यामुळे मोगऱ्याचं रोप पाहिलं आणि लगेच ताब्यात घेतलं. ते वाढवण्याची, फुलवण्याची जबाबदारी माझी, असं जाहीर केलं.

आमचं घर म्हणजे छोटा फ्लॅट. त्याला मागच्या बाजूला बाल्कनी आहे. काही कुंड्या वगैरे ठेवायच्या तर तिथंच. तिथं वर्षातले बाराही महिने उन्ह येत नाही. दक्षिणायनाच्या वेळी दुपारचा काही वेळ उन्ह पडतं. त्यामुळे की काय, कुणास ठाऊक, पण तिथं छोटी बाग फुलविण्याचा आमचा प्रयत्न काही यशस्वी झाला नाही आजवर. तुळशीची दोन रोपंही चांगली वाढून मग जळून गेली.

बाल्कनीतल्या दोन-तीन कुंड्यांमध्ये काही तरी वाढवायचंच, असं या वेळी ठरवूनच टाकलं होतं. त्यानुसार आधी तुळशीच्या मंजिऱ्या चुरगाळून टाकल्या. एकाच कुंडीत दोन-चार रोपं आल्यावर, त्यातल्या एकाला दुसऱ्या कुंडीमध्ये अगदी निगुतीनं हलवलं. दोन्ही रोपं छान वाढली. त्यांच्या साथीनं आत्मविश्वासही. बंगल्यातल्यासारखी बाग फुलवणं काही शक्य नाही, पण आपल्यापुरती दोन फुलझाडं वाढवता येतील, असं वाटू लागलं.

आत्मविश्वास असा वाढलेला असतानाच हातात हा मोगरा आला. त्याची विधिवत कुंडीत प्रतिष्ठापना केली. प्लास्टिकचीच कुंडी. कारण मातीची जड कुंडी बाल्कनीच्या जाळीला अडकवणार कशी? मोगरा आणि आधी लावलेली तुळस कशी वाढवायची, याचं नियोजन केलं होतं. बायको रोज पाणी घालायचीच. मोगऱ्याला मात्र मी आठवणीने पाणी घालत होतो. त्याची जादा पानं खुडत होतो. तुळशीची पिकलेली-वाळलेली पानं तोडून ती मोगऱ्याच्या कुंडीत टाकायची. चहाचा गाळ आठवणीनं या दोन्ही कुंड्यांमध्ये टाकायचा. कारण त्याचं चांगलं खत होईल, असं मला (उगीचंच) वाटत होतं. चहाचा गाळ असा टाकण्यास बायकोचा विरोध. मग तिची नजर चुकवून तो टाकण्याचं काम आलंच.

चांगली वाढलेली  तुळशीची 
दोन्ही रोपं मधल्या काळात खंगली. त्यांची पानं झडू लागली. मग पुन्हा काळजी. आधीचा अनुभव लक्षात घेऊन मंजिरी काढून ठेवल्या होत्या. पण तो तेवढा आठवडा गेला आणि तुळशीची दोन्ही रोपं वाचली. व्यवस्थित.

बाजूच्या एका कुंडीत नुसताच चहाचा गाळ टाकत राहिलो. त्यात अशाच टाकलेल्या लिंबाच्या बियांतील दोन अंकुरल्या. त्याची आता चांगली फूटभर रोपं तयार झाली आहेत. त्यांच्या वाढत्या वयाला त्या छोट्याशा कुंडीत किती वाव मिळेल, याची थोडी शंकाच आहे. त्याचं एखादं पान तोडून कुस्करल्यावर एकदम प्रसन्न करणारा मंद आंबूस गंध येतो.

तर गोष्ट मोगऱ्याची सांगत होतो. मोगऱ्याचं ते बाळरोप कुंडीत रुजलं. चहाचा गाळ-फळांच्या सालींचे तुकडे-तुळशीची वाळलेली पानं असं खत त्याला देत होतो. नियमित पाणीही घालत होतो. पानांवरची धूळ जावी म्हणून कधीमधी सचैल स्नानही घातलं जाई त्या रोपाला. हळुहळू पानांच्या संख्येत वाढ होऊ लागली. उंचीही वाढू लागली. रोप जसजसं वाढत चाललं, तसतशी खालची पानं हळुवारपणे तोडून टाकू लागलो.

हिवाळा आला. थंडी कडाक्याची पडली. एक दिवस पाणी घालताना लक्षात आलं की, मोगऱ्याची चार-पाचच पानं तरतरीत आहेत. बाकीची सर्व कोमेजून गेली आहेत. ती तोडून टाकली. पाणी थोडंसंच घातलं. परत पुढच्या आठवड्यात पाहिलं, तर दोनच पानं टवटवीत. बाकीची तीन-चार पानं आधीसारखी कोमेजलेली. पाणी घालून दुसऱ्या दिवशी पाहिलं तर त्यांनी मान टाकलेली.

आता शिल्लक दोनच पानं! ही दोन पानं गेली, तर रोप गेलं, हे लक्षात आलं. त्यामुळं काळजी घेतली. कुंडीतली माती थोडी भुसभुशीत केली. पाणी बेताबेतानंच घातलं.

अजून एक आठवडा गेला. कुंडी खाली घेतली, तर दिसलं, ती उरलीसुरली दोन्ही पानं कोमेजलेली. रोपाची अवस्था एखाद्या वाळल्याखडंग काटकीसारखी. निव्वळ काटकीच. पानं झडलेली. दुर्मुखलेली. आयुष्य संपलेली काटकी. एवढी काळजी घेऊनही मोगरा काही वाचलाच नाही! वाईट वाटलंच. जड मनानं तीही पानं तोडून टाकून दिली. आणखी एका स्वप्नावर माती लोटल्यासारखं...

तुळशीच्या रोपांना पाणी घालता घालता सवयीनं मोगऱ्याच्या कुंडीतही पाणी टाकत राहिलो. ते वठलेलं रोप जीव धरणार नाही, हे पुरतं कळलं असूनही. मग कधी तरी महिन्याने ती (नसलेल्या) मोगऱ्याची कुंडी खाली घेतली. आणि बघतो तर काय? त्या वाळलेल्या काटकीला दोन चिमुकली पानं फुटलेली! अरे व्वा!!

पुन्हा पानं फुटल्याचं पाहून लॉटरी लागल्याचाच आनंद. मनानं सांगितलं, हे रोप आता जगणार! वा रे पठ्ठे!! पुन्हा चहाचा गाळ, भाज्यांची थोडी देठं वगैरे आणि नियमित पाणी. पानांची संख्या अगदी हळुहळू वाढू लागली. त्या वाळक्या काटकीनं थोडी हिरवाई अंगी ल्यालेली.

गावाला गेलो होतो दोन दिवसांपूर्वी. काल संध्याकाळी परतलो. एवढ्या कडक उन्हात रोपं तहानलेली असतील, हे लक्षात आलं. त्यामुळं पाणी घालण्यासाठी कुंडी खाली घेतली. आनंदाश्चर्याचा धक्काच. त्या इवल्याशा रोपाला सगळ्यात खाली एक कळी आली होती. टपोरी कळी. पांढऱ्याशुभ्र मोगऱ्याची कळी. त्याच क्षणी तो मोगऱ्याचा धुंद वास आला. थंडगार वाऱ्याची झुळूक आल्यासारखं वाटलं. आज सकाळी पुन्हा पाहिलं तर त्या कळीला जोडून अजून एक छोटी कळी आलेली...

मी वाट पाहिली. आता अजून वाट पाहणार आहे. दोन-चार दिवसांनी त्या कळ्या फुलतील. एक फूल देवाजवळ जाईल आणि दुसरं माठात. कालपासून मी फार खूश आहे!
---------------

`फुललेला` आम आदमी
(चोवीस/एप्रिल/पंधरा)

टिप्पण्या

  1. सहर्ष अभिनंदन ! आपण ठरवल्याप्रमाणे अनुदिनीला सुरुवात केलीत ! मनःपूर्वक शुभेच्छा !
    मंगेश नाबर

    उत्तर द्याहटवा
  2. निसर्ग व निर्माणक्षम एक ध्येयवेडा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘ळ’च्या अढळपदासाठी

  रचना - शब्दकुल ‘ ध ’ चा ‘ मा ’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं ! इतिहासाचा हा धडा आपण शिकलो, पण गिरवला नाही, असंच दिसत होतं. वर्तमानात ‘ ळ ’ चा ‘ ल ’ केला जात होता आणि ‘ च ल ता है... ’ अशी आपली त्याबाबतची वृत्ती होती. लोकमान्यांचं टिळक आडनाव हिंदीत बनायचं ‘ ति ल क ’ . बाळासाहेब ठाकरे ह्यांचं नाव हिंदी माध्यमांतून व्हायचं ‘ बाला साहब ’ . नाशिक जिल्ह्यात आहे मालेगाव आणि पुणे जिल्ह्यातलं ते माळेगाव. पण हिंदीत गेली की, दोन्ही गावं एक होतात. बातमी नेमकी कुठली ते कळायला मार्ग नाही. लोणावळे, जळगाव, भुसावळ, करमाळा आदी स्थाननामांतील आणि काळे, साळी, माळी, जगदाळे, बाळू आदी व्यक्तिनामांतील ‘ ळ ’ जाऊन तिथं ‘ ल ’ कसा येतो ? हिंदीमध्ये ‘ ळ ’ च्या जागी ‘ ल ’ का, हा प्रश्न पुण्यातील आयुर्विमा अधिकारी प्रकाश निर्मळ ह्यांना छळत होता. हा अक्षरबदल खटकत होता. त्यांनी दाद मागायचं ठरवलं. अक्षरांतर होऊ नये, ह्यासाठी २०१८ पासून प्रयत्न सुरू केले. ' ळ ' ऐवजी ' ल ' चा वापर चुकीचा आहे. हिंदीमध्ये ' ळ ' च वा...

द. मा. - पाहिलेले, ऐकलेले

'परमेश्वर प्रसन्न झाला, तर पुढचा जन्म मी लेखकाचाच मागीन! उत्तम लेखक होणे, हीच माझी महत्त्वाकांक्षा होती. माझ्या भाषेतील हजारो, लाखो लोकांच्या जीवनात माझ्या लेखनामुळे आनंद निर्माण करावा, हीच माझी इच्छा आहे...' ...आपल्या हजारो, लाखो चाहत्यांना हळहळ करायला लावीत, ह्या जगाचा काल निरोप घेतलेल्या प्रसिद्ध लेखक प्रा. द. मा. मिरासदार ह्यांचे हे म्हणणे आहे. नगरमध्ये २४ वर्षांपूर्वी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांची मुलाखत झाली. तिचा समारोप करताना त्यांनी ही इच्छा बोलून दाखविली. द. मा. मिरासदार आपल्या अनेकांचे आवडते लेखक. लहानपणी कधी तरी त्यांच्या कथांची ओळख झाली. बहुतेक जुन्या मॅट्रिकच्या (अकरावी) मराठी पाठ्यपुस्तकात त्यांची नागू गवळीची कथा होती. मी ऐकलेली-वाचलेली त्यांची ती पहिली कथा. आपल्या म्हशींवर लेकरांप्रमाणे प्रेम करणारा, कुंभकर्णी झोपेतच दोन-तीन चोरांना लोळवणारा नागू फार आवडला. मग संधी मिळेल, तेव्हा करमाळ्याच्या ज्ञानेश्वर वाचनमंदिरातून त्यांची पुस्तके आणून वाचू लागलो. भोकरवाडी आणि नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, आनशी, महादा, ज्ञानू वाघमोडे ह्य...

शहाणपणाची कवाडे उघडा

  अजून किती दिवस पाहायला मिळणार नाही हे दृश्य ? ( छायाचित्र सौजन्य : स्क्रोल / एचटी) ....................... ' T he only thing you absolutely have to know is the location of the library. ' अल्बर्ट आईनस्टाईन ह्यांचं हे प्रसिद्ध वाक्य आहे. ' सर्च एंजिन ' वर ' बुक कोट्स ' टाकलं की, पाच-पन्नास संकेतस्थळं सेकंदामध्ये त्यांचं हे उद्धृत ठळकपणे दाखवून देतात. माझ्या घरापासून वाचनालय जवळ आहे. तिथपर्यंत चालत जायला १०-१२ मिनिटं पुरेशी होतात. पण कित्येक दिवसांत ; नेमकं सांगायचं, तर २२ मार्चपासून तिथं जाताच आलं नाही. सहा महिने होऊन गेले त्याला. त्याच्या आधी १५ दिवस आणलेली अनुवादित कादंबरी पडून आहे. तिची पारायणंही शक्य होती. ' नगर वाचनालय ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा वाचनालयाचं स्थळ माझ्यासह सगळ्याच सभासदांना अगदी चांगलं माहीत आहे. पण आमच्यासारख्या सामान्यांच्या जगण्यात त्याचं नेमकं ' स्थान ' काय आहे (किंवा काय असावं!), हे प्रशासनाला किंवा राज्यकर्त्यांना उमगलेलं नाही. त्यामुळंच लाखभर पुस्तकं असलेल्या ह्या सार्वजनिक वाचनालयाचं दार अजून बंदच आ...