मुख्य सामग्रीवर वगळा

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार... सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य - आयसीसी) ------------------ भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली ओव्हल म...

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही.
किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही!
दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र
आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड.
बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६!
-----------


वाचकांची पत्रे सर्वोत्तम पत्र बक्षीस केसरी खिडकी ब्लॉग


‘लवकर उठायचंच आज’ असा निश्चय करून (नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘शतायुषी’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘पत्रकार’ ह्या नात्यानं पहिली नोकरी.

हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘कॅम्पस इंटरव्ह्यू’मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच.

संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे.’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅)

कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी बोलावून घेतले. अभ्यास कसा चालू आहे, ह्याची चौकशी केली. दिवाळी अंक कोणता हे सांगितले.

सरांशी बोलत असतानाच त्यांच्या कक्षात डॉ. अरविंद संगमनेरकर आले. पांढराशुभ्र सफारी. (हा त्यांचा आवडता वेष, हे नंतर लक्षात आलं.) त्यांच्याशी प्र. ना. सरांनी ओळख करून दिली. परीक्षा मेच्या शेवटी संपत होती. जूनपासून लगेच मी कामाला जायला सुरुवात करायची, असं ठरलं.

आधीचे दोन महिने संध्याकाळी चार-पाच तास. मग अंकाच्या कामाला गती आली आणि मी दुपारी साडेबारा-एकच्या दरम्यान जाऊ लागलो. त्या दिवशीही तसाच गेलो. खाली प्रशस्त रुग्णालय आणि त्याच्या वरच्या मजल्यावर आमची संपादकीय विभागाची खोली. बहुसंख्य वेळ तेथे मीच राजा असायचो. म्हणजे एकटाच बसून काही ना काही करत होतो.

... तर गोष्ट ‘त्या दिवसाची’ आहे. काम सुरू केले आणि इंटरकॉमवरून निरोप आला - ‘सरांनी बोलावलं आहे.’ केबिनमध्ये डॉक्टर एकटेच होते. रुग्णतपासणीचा पहिला टप्पा संपलेला होता. अंकाचं दिवसभरातलं तातडीचं काम काय आहे, हे त्यांनी सांगितलं. आधी सांगितलेलं काम कोठपर्यंत आलंय, ह्याचा आढावा घेतला.

दैनिक केसरीतील सर्वोत्तम पत्राचे बक्षीस
तुमचा फोटो छापून आलाय
बोलणं संपलंय हे ओळखून निघालो, तेवढ्यात डॉक्टर म्हणाले, ''आणि हे काय हो! तुमचा फोटो छापून आलाय ‘केसरी’मध्ये आज.'' टेबलाच्या खणातून त्यांनी अंक काढून दाखवला. कौतुकाने हसले.

ही बातमी डॉक्टरांपर्यंत पोहोचल्यानं रंगा खूश होता. दोन जिने चढून कामाच्या ठिकाणी बसलो.  पुन्हा एकदा इंटरकॉम वाजला. बाहेरचा फोन होता. मधुकाका - (कै.) मधुकर कुलकर्णी – बोलत होते. त्यांच्या आवाजातली खुशी लपत नव्हती. कारण तेच - त्यांच्या धाकट्या आणि लाडक्या पुतण्याचा फोटो छापून आलेला.

मधुकाकांचा फोन
मधुकाकांच्या नजरेतून हे सुटणारं नव्हतंच. कारण गुप्तचर विभागात काम करताना त्यांचं दिवसभरातलं सर्वांत महत्त्वाचं काम असायचं, सगळी मराठी वृत्तपत्रं, साप्ताहिकं बारकाइनं वाचायची. त्यातल्या काही नोंदी काढायच्या. फोटो पाहिला आणि लगेच त्यांनी फोन केला.

‘माझा फोटो छापून आलाय,’ असं मार्केटिंग करायच्या आधीच दोन महत्त्वाच्या व्यक्तींना ते कळालं आणि त्यांनीच कौतुकानं सांगितलं होतं! आता तातडीनं करायचं पहिलं काम होतं, ते म्हणजे ‘केसरी’चा अंक विकत घेणं.

दैनिक केसरीमध्ये ह्या दोन-चार दिवसांत कधी तरी छायाचित्र प्रसिद्ध होणार हे माहीत होतं. पण नेमकं कधी, त्याचा पत्ता नव्हता. त्यामुळे तातडीने बाहेर पडून अंक विकत घेतला. तो नंतर कोठे तरी गेला. मधुकाकांनी आठवणीनं कार्यालयातून अंक आणला. त्याचंच मधलं पान संग्रहात आहे.

करमाळ्यात बातमी पोहोचली
करमाळ्याला माझ्या घरी ही बातमी दुपारी उशिरा कधी तरी कळली. वडिलांना तर शाळेतून आल्यावर संध्याकाळी. अंक पाहण्यासाठी वाचनालयात गेले, तर ते बंद झालेले. दोन-तीन ठिकाणी चौकशी करून अखेर त्यांना रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास एका प्राध्यापकाच्या घरी ‘केसरी’चा अंक पाहायला मिळाला!

तिसरे पत्र होते पुण्यातले. आधी जेथे काम करत होतो, त्या ‘व्यापारी मित्र’ मासिकातील सहकारी व तेथे टपाल आणून देणाऱ्या पोस्टमनदादा ह्यांचे. पोस्टमनदादांचे नाव नारायण मड्डी किंवा असेच काही होते. त्यांनीच अंक पाहून बाकीच्या सहकाऱ्यांना माहिती दिली. त्यावर मड्डी, विलास लांडगे, खांबे, पुन्हा पत्रकारितेत सहकारी बनलेला प्रसाद घारे आणि आणखी एक जण.

त्या काळी ‘केसरी’ महिन्यातील सर्वोत्तम वाचकाच्या पत्राला बक्षीस देत असे. बक्षिसाची घोषणा पत्रलेखकाच्या छायाचित्रासह आणि अत्यल्प माहितीसह ‘वाचकांची पत्रे’ सदरामध्ये केली जाई.

बक्षीस मिळत नाही म्हणजे काय..?

आपण एवढा काळ (म्हणजे जेमतेम तीन-साडेतीन वर्षे) वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये नियमित पत्रं लिहितो आणि ‘केसरी’चं बक्षीस मिळत नाही, म्हणजे काय, असं काही तरी डोक्यात होतं. एकदा तरी ते मिळवायचंच असं मनाशी ठरवलेलं.

हा फोटो प्रसिद्ध झाला आणि मीही. अभिनंदन करणारी चक्क तीन पत्रे आली. दोन करमाळ्याहून – श्री. राजाभाऊ देवी आणि श्री. संजय ढोके ह्यांची.

त्याच महिन्यात ज्येष्ठ साम्यवादी नेते श्रीपाद अमृत डांगे ह्यांना लोकमान्य टिळक पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं होतं. ह्या देशात आज ना उद्या कम्युनिस्टांचे राज्य येईल, असा आशावाद त्यांनी पारितोषिक स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात व्यक्त केला होता.

बातमी वाचून ट्टॉक!
त्या कार्यक्रमाची बातमी ‘केसरी’मध्ये नव्हे, तर ‘सकाळ’मध्ये वाचली आणि मी ‘टॉक्क’ केलं. बक्षिसाच्या पत्राची हमखास हमी देणारा विषय मला सापडला होता. अगदी धोरणीपणे केलेली ती आयुष्यातली पहिली (आणि बहुदा एकमेव!) कृती होय!!

त्या धोरणीपणातला आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे पत्रात कोठेही अनवधानाने श्री. डांगे ह्यांचा अनमान होणार नाही किंवा त्यांचे मोठेपण नाकारणारा सूर उमटणार नाही, ह्याची काळजी घेतली. (दुर्दैवाने त्या पत्राचे कातरण आता नाही. वाचक म्हणून वृत्तपत्रांना जेवढी पत्रे लिहिली, त्या सगळ्याची कातरणे मध्यंतरी वैतागून रद्दीत घातली. )

अपेक्षा होती, त्याप्रमाणे दोन दिवसांत ते पत्र प्रसिद्ध झाले. त्या दिवसातले सर्वांत मोठे पत्र म्हणून – तीन स्तंभी शीर्षक असलेले.

त्यानंतर ज्याची वाट बघत होतो, तेही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घडले. ‘केसरी’चे सहसंपादक श्री. एकनाथ बागूल ह्यांच्या सहीचं पत्र सप्टेंबरच्या आठवड्यात आलं. (ते स्वतःचं नाव ‘अेकनाथ’ असं लिहीत. सावरकर ह्यांच्या धाटणीने. त्यावरून ते सावरकरवादी आहेत, असा समज करून घेतला होता.😀 ) ‘जुलै महिन्यातील बक्षिसाचे पत्र म्हणून तुम्ही ९ जुलै रोजी लिहिलेल्या ‘कम्युनिस्टांचे राज्य कोणाच्या बळावर येणार?’ या पत्राची निवड झाली आहे. त्यासाठी छायाचित्र आणि अल्पपरिचय पाठवावा,’ असं त्यांनी लिहिलं होतं.


जयंतरावांच्या सहीचा चेक
फोटोपेक्षाही माझ्यासाठी महत्त्वाचं होतं तो ५१ रुपयांचं बक्षीस. यथावकाश जयंतराव टिळक अशी फर्डी सही असलेला चेकही मिळाला. तो सहीसाठी तरी ठेवायला हवा होता. पण त्या काळात ही रक्कम फार मोठी होती.

सतीश कुलकर्णी पत्रकार पत्रलेखक केसरी बक्षीस
दैनिकामध्ये छापून येणारा पहिलाच फोटो होता माझा.
त्यामुळे नवीन फोटो काढायचं ठरवलं. तो
कोठे काढला, ते लक्षात आहे. लालबहादूर शास्त्री रस्त्यावर थोडे पुढे 'जोशी स्टुडिओ' होता. त्यांचा मुलगा बहुतेक वृत्तविद्या अभ्यासक्रमाला आमच्या बरोबर होता. पंजाब नॅशनल बँकेत नुकताच रुजू झालेला शाळूसोबती अनिल कोकीळ ह्याला बरोबर घेऊन गेलो होतो.

बक्षिसाची बातमी अनिलला सांगितली, तेव्हा तो दुप्पट खूश झाला. पहिल्या पटीच्या खुशीचं कारण म्हणजे तो तेव्हा बासरी शिकत होता आणि त्यावर त्याला राष्ट्रगीताच्या दोन ओळी त्याच दिवशी विनासायास वाजवता येऊ लागल्या होत्या.

परिचय आणि छायाचित्र पाठविण्यासाठी 'केसरी'ने स्वतःच्या पत्त्याचं आणि टपाल हशील असलेले पाकीटही सोबत पाठविलं होतं. पण टपालाने पाठविण्याएवढा एवढा धीर कोणाला होता!

पत्रामधील सूचनांनुसार अल्पाक्षरी ओळख आणि ताजा करकरीत फोटो स्वहस्ते ५६८, नारायण पेठ ह्या पत्त्यावरील कार्यालयात देऊन आलो होतो.

आणि मग वाट पाहणे, एवढेच उरले होते.

ते सार्थकी लागले, ते ९ सप्टेंबर १९८६ रोजी. बरोबर चार दशकांपूर्वी. त्या छोट्या आठवणी मनातून जात नाहीत. म्हणून तर हा मोठा लेख लिहायचा घाट!

..............


https://www.googletagmanager.com/gtag/js?id=G-CQ7BFW379N"></script> <script>

टिप्पण्या

  1. कसे मंतरलेले दिवस असतील ना ते

    उत्तर द्याहटवा
  2. जुन्या काळातल्या अशा आठवणी फोटो काढल्यासारख्या स्मरणात राहतात. त्या आठवणींची कात्रणं ठेवण्याची गरज नसते. लेखामुळे त्या जमान्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. चाळीस वर्षांनी का असेना पण अभिनंदन करतो. 🙏


    उत्तर द्याहटवा
  3. वा सतीश, हे वाचून मलाच (चाळीस वर्षानंतर) इतका आनंद झालाय की तुला किती आनंद झाला असेल याची कल्पना करू शकतो. त्यावेळी आडात असेल तरच पोहऱ्यात यायचे आजच्या सारखं बटन दाबून पाणी चालू करता यायचे नाही.

    उत्तर द्याहटवा
  4. आपल्या चाळीस वर्षांपूर्वीच्या एका सुंदर आठवणीचे दर्शन झाले आणि मन अक्षरशः आनंदून गेले. ‘कम्युनिस्टांचे राज्य कोणाच्या बळावर येणार?’ या शीर्षकाचे आपले पत्र ‘केसरी’मध्ये प्रसिद्ध झाले आणि त्या महिन्यातील ‘पारितोषिकाचे पत्र’ म्हणून त्याची निवड झाली. त्याबद्दलची संपादकीय नोंद वाचताना तर एक वेगळाच आनंद झाला

    किती साधीशी ती नोंद… पण आज, ४० वर्षांनंतर ती वाचताना जाणवले की, त्या छोट्याशा नोंदीमध्ये, त्या पत्रात एका ज्येष्ठ पत्रकाराच्या प्रदीर्घ आणि समृद्ध प्रवासाची बीजे दडलेली होती!त्या वेळी कदाचित कुणालाही कल्पना नसेल की या पत्रलेखकाची लेखणी पुढे काही दशके समाजजीवनातील असंख्य घटना, व्यक्ती आणि आठवणी शब्दबद्ध करणार आहे.

    आपली आणि माझी ओळख ‘लोकसत्ता’मधील आपल्या कार्यकाळापासून झाली आणि हळू हळू त्या ओळखीचे रूपांतर जिव्हाळ्याच्या मैत्रीत झाले. विशेषतः २००१-०२ मध्ये रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचा अध्यक्ष असताना माझ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या प्रकल्पाची आपण आवर्जून दखल घेतलीत. माझ्यासाठी त्या उपक्रमांचे वृत्त आपण केवळ प्रसिद्ध केले नाही, तर त्यांना समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम मनापासून केलेत.

    आज मागे वळून पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते - पत्रकार म्हणून आपण केवळ बातम्या दिल्या नाहीत; आपण माणसांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण जतन करून ठेवलेत.

    आमच्यासारख्या असंख्य मित्रांच्या आयुष्यात घडलेल्या छोट्या-मोठ्या घटनांना आपल्या लेखणीने वर्तमानपत्राच्या पानावर स्थान दिले. त्या वेळी कदाचित त्या फक्त एक दिवसाची बातमी होती; पण आज त्या बातम्याच आमच्यासाठी आठवणींच्या अमूल्य ठेवी बनल्या आहेत.

    ...आणि म्हणूनच, आपल्या स्वतःच्या आयुष्यातील चाळीस वर्षांपूर्वीचा हा आनंदाचा क्षण पुन्हा आपल्या समोर आला आहे, हे पाहून मला विशेष आनंद झाला. आपण इतरांच्या आठवणी जपल्या; आज काळाने आपल्या स्वतःच्या आठवणीची एक सुंदर पानं पुन्हा आपल्या हातात आणून दिली आहेत!

    तरुण सतीशरावांच्या हातात असलेली लेखणी आजही तितक्याच ताकदीने चालत आहे, हे पाहणेही तितकेच सुखावह आहे. चार दशके उलटली, अनेक पाने बदलली, अनेक घटना इतिहासजमा झाल्या; पण लेखनाची ऊर्मी आणि पत्रकारितेवरील प्रेम मात्र अजूनही ताजे आहे, हीच आपल्या प्रवासाची खरी कमाई आहे.

    आपल्या ह्या आठवणीचा आनंद आपण एकट्याने घेऊ नये, असे मला वाटले. कारण या आठवणीत आपला वैयक्तिक आनंद आहे, आणि त्या आनंदात सहभागी होणे हा मित्र म्हणून माझाही आनंद आहे. ह्या निमित्ताने आपल्या लेखणीला, आपल्या प्रदीर्घ पत्रकारितेला आणि आपल्या जिव्हाळ्याच्या मैत्रीला मनःपूर्वक सलाम!
    🌹🙏🏻🌹
    चाळीस वर्षांपूर्वीच्या त्या ५१ रुपयांच्या पारितोषिकापेक्षा आज आपल्या आयुष्याने मिळवलेली माणसांची श्रीमंती किती तरी अनमोल आहे.

    आपली लेखणी अशीच अविरत चालत राहो, जुन्या आठवणींना नवा उजाळा देत राहो आणि नव्या पिढ्यांसाठी अनुभवांचा हा अमूल्य ठेवा निर्माण करत राहो हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
    🌹🌹🌹🌹🌹🌹
    आपला स्नेहांकित,
    विनायक पवळे

    उत्तर द्याहटवा
  5. खरंचअगदी कौतुकास्पद .. सुंदर आठवण .. अविस्मरणीय...
    किती अभिमान वाटला असेल त्या वेळी आई-वडिलांना ...
    पुत्र असावा ऐसा गुंडा
    त्याचा तिन्ही लोकी झेंडा... 👍🙏

    वृत्तपत्रात फोटो येणं त्या काळी निश्चित अलभ्य लाभच...
    👍🙏😊
    - शोभा देवी, पुणे

    उत्तर द्याहटवा
  6. मस्त... तुझे ‘केसरी’मधील दिवस आठवले.
    - अनंत दसरे, नगर

    उत्तर द्याहटवा
  7. खूपच छान आहे लेख हा! मी त्या वेळी सहा वर्षांचा होतो!
    - डॉ. निरंजन पेहेरे

    उत्तर द्याहटवा
  8. सतीश तुझी ही खूपच सुरेख आठवण आहे. तेव्हा मी आठवीत असेन आणि नंतर बरोबर चौथ्या वर्षी म्हणजे 1990 मध्ये नगर केसरी माझं वाचकांचे पत्र अगदी चौकटीत छापून आलं तेव्हा मला झालेला आनंद शब्दात न मावणाराच होता. तिथं माझ्या पत्रकारितेची पेरणीही झाली असावी असं मला वाटतं. माझं ते पत्र शास्त्र काट्याच्या कसोटीवर घासून छापणारे होते केसरीचे एक उपसंपादक. त्यांचं नाव सतीश. स. कुलकर्णी !

    उत्तर द्याहटवा
  9. श्री सतीश कुलकर्णी साहेब,

    आजकाल सोशल मीडियावर कितीतरी अपलोड झालेले फोटो दुसऱ्या दिवशी पडद्याआड होतात.

    मात्र एकेकाळी वृत्तपत्र हा एकच प्रतिभाशाली मीडिया असताना फोटो सहित लेख छापून येणं हे दुर्मिळच होतं. कारण सारं काही तावून-सुलाखून होतं. लेखकाचे प्रामाणिक कष्ट होते.

    आज चाळीस वर्षानंतरही आपलाच फोटो आपल्याला आठवणीचा हिंदोळा देतोय. असे अनेक हिंदोळे आपण अनुभवात असाल.
    म्हणूनच आपण आपल्या खिडकीमध्ये प्रपंच करत आहात.

    धन्यवाद 🙏

    श्रीराम वांढरे.
    भिंगार, अहिल्यानगर.

    उत्तर द्याहटवा
  10. किती छान आठवण आहे.... 😍
    - उमेश आठलेकर, पुणे

    उत्तर द्याहटवा
  11. खूप हृदयस्पर्शी आठवण..!
    जीवनभर पुरणारी साठवण!!
    🌷🌷🌷
    - प्रमोद शाह, पुणे

    उत्तर द्याहटवा
  12. 😃 कसलं छान!
    - ऐश्वर्या देशपांडे, सोलापूर

    उत्तर द्याहटवा
  13. कॉलर टाईट....
    सुंदर आठवणी.....🪈
    बासरीची आठवण...🫡
    - अनिल कोकीळ, पुणे

    उत्तर द्याहटवा
  14. ष्रिय सतिश अतिशय सुंदर आठवण.
    त्याकाळात आपला फोटो वृत्तपत्रात छापुन येणे हि अतिश दुर्मीळ व अभिमानास्पद घटना होती
    जुन्या काळाची सुखद आठवण करुन देणारा लेख.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘ळ’च्या अढळपदासाठी

  रचना - शब्दकुल ---------- हा लढा केवळ एका अक्षराचा नाही. मराठीच्या अस्मितेचे अढळपद टिकवून ठेवण्याचा संघर्ष आहे.  'तिलक' किंवा 'जलगाव' ही मोडतोड थांबविण्यासाठी पुण्याच्या श्री. प्रकाश निर्मळ ह्यांनी केंद्रीय मंत्रालयांपर्यंत चिवट पाठपुरावा केला. केंद्रीय हिंदी संचालनालयाने अखेर विस्तारित वर्णावलीत 'ळ'  स्वीकारला. ऋग्वेदापासून ते आधुनिक उपबोलींपर्यंत ५० कोटी जनतेच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या 'ळ' अक्षराची ही रंजक भाषिक यात्रा. सोबत प्रकाश निर्मळ ह्यांची मुलाखत... ---------------- ‘ ध ’ चा ‘ मा ’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं ! इतिहासाचा हा धडा आपण शिकलो, पण गिरवला नाही, असंच दिसत होतं. वर्तमानात ‘ ळ ’ चा ‘ ल ’ केला जात होता आणि ‘ च ल ता है... ’ अशी आपली त्याबाबतची वृत्ती होती. लोकमान्यांचं टिळक आडनाव हिंदीत बनायचं ‘ ति ल क ’ . बाळासाहेब ठाकरे ह्यांचं नाव हिंदी माध्यमांतून व्हायचं ‘ बाला साहब ’ . नाशिक जिल्ह्यात आहे मालेगाव आणि पुणे जिल्ह्यातलं ते माळेगाव. पण हिंदीत गेली की, दोन्...

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...