मुख्य सामग्रीवर वगळा

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

...चला पुस्तकांचं सोनं लुटू!



‘वाचावं की वाचू नये’, असा ‘हॅम्लेट’ कधीच होत नाही माझा.
‘हे आधी वाचू की ते वाचू?’, असा प्रश्न असतो.
तुम्हाला माहितीये का, पुस्तकं वाचणारा जगातला
पहिल्या क्रमांकावरचा देश आपला आहे.
आमची पिढी वाचत नसती, तर झालो असतो
आपण जगात नंबर वन?
--------------

‘मोरू’ आणि त्याचे बाबा ही मराठी साहित्यातली तशी ऐतिहासिक पात्रं. नवरात्र संपून दसरा उजाडला की, त्या दोघांची कोणाला ना कोणाला आठवण होतेच.

सोनं लुटायचं म्हणून मोरूला दसऱ्याच्या दिवशी बाबा उठवित. काळ बदलला आहे. साडेतीन मुहूर्तांसह आणखी काही मुहूर्त इंटरनेटकृपेने आले आहेत. त्यांना ‘डेज’ म्हणतात. काळाबरोबरच चालत आता काही विशिष्ट दिवशीही त्याला झोपेतून जागं करणं, बाबांना आपलं कर्तव्य वाटते.

काळाप्रमाणे भाषाही बदलली आहे. पूर्वीसारखं ‘मोऱ्या’ असं खेकसत त्याच्या कटिप्रदेशाशी आपल्या चरणकमलानं आघात करणं बाबांनी सोडलं आहे. ते आता ‘मोरूबाळ’ असं संबोधतात. 'खेकसत म्हणणे, आय लव्ह यू' कादंबरी त्यांनी वाचलेली आहे. पण वसकणं सोडून ते 'गुड मॉर्निंग, बेटा' म्हणतात. मोरूही त्यांचा उल्लेख (पाठीमागे) ‘आमचा बाप’ असा थेट न करता, ‘आमचे पिताश्री’ असा करतो. (त्यात आदर असतो की उपहास, हा संशोधनाचा विषय आहे.)

त्या दिवशी असंच झालं. सवयीप्रमाणे बाबा मोरूला उठवायला गेले. त्याच्या प्रायव्हसीचा भंग होऊ नये आणि उपचार म्हणून त्यांनी दारावर दोनदा ‘टक टक’ केलं. प्रतिसादाची वाट न पाहताच घुसले. मोरू आपला पसरलेलाच. डोळ्यांसमोर मोबाईल. परमपूज्य पिताश्रींच्या आगमनाची दखल घेतल्या न घेतल्यासारखं त्यानं केलं. मोबाईलवरची त्याची नजर हटत नाही, हे पाहून पूर्वीच्याच (लाडक्या) भूमिकेत जात बाबा खेकसलेच!

‘‘मोऱ्या, सकाळी उठल्यापासूनच मोबाईल! किमान आजच्या दिवशी तरी पुस्तक हातात धर की रे.’’

‘‘माझी परीक्षा संपून आठवडा झालाय, बाबा. मग आता कसलं पुस्तक हातात घेऊ म्हणताय?’’

बाबांना चिडल्यासारखं वाटू लागलं. म्हणाले, ‘‘अभ्यासाचं पुस्तक म्हणत नाहीये मी. आज जागतिक पुस्तक दिवस आहे. विल्यम शेक्सपीअर माहितीये ना? त्या महान लेखकाचा जन्मदिन आहे आज. चारशे आठवा. आठ वर्षं झालीत चारशे पार होऊन..!’’

‘‘त्या गुगलमध्ये सारखं डोळे खुपसून बसलेला असतो. एवढंही माहीत नाही? त्या ऐवजी पुस्तकात थोडं डोकं खुपसत जा.’’ बाबांचा सात्त्विक वगैरे म्हणणारा संताप शब्दांमधून झिरपत ईअरफोनला भेदत मोरूच्या कानापर्यंत पोहोचला.

‘‘अच्छा, पुस्तक दिनाचं महत्त्व सांगताय तुम्ही बाबा. या मुहूर्तावर सकाळी सकाळी मी एखादं पुस्तक हातात घेऊन बसावं, अशी तुमची अपेक्षा आहे. म्हणजे ‘किमान आजचा दिवस तरी’ मी पुस्तक वाचावं. असंच ना?’’

‘‘आजच्या दिवशी म्हणजे? रोजच वाजत जा असं कित्येक वर्षांपासून सांगतोय मी. रोजचं सोडा, आठवड्यातला एखादा दिवस तरी पु्स्तक धरत जा हातात,’’ बाबा तळमळीने म्हणाले.

‘‘बाबा, वाचून फायदा काय? म्हणजे पुस्तकंच का वाचायची?’’. मोरूनं भाबडेपणानं विचारलेला हा प्रश्न म्हणजे ऑफस्पिनर अश्विननं टाकलेला लेगस्पिन! किंवा हरभजननं टाकलेला ‘दूसरा’!! मोरूला इतकी वर्षं पुरेपूर ओळखून असलेल्या बाबांना हे पुरतं माहीत होतं. त्यांची अवस्था ‘मैं इधर जाऊँ या उधर जाऊँ’ अशी गंडलेल्या फलंदाजासारखी झालेली...

‘‘पुस्तकाच्या वाचनाचे फायदे सांगता येतील का तुम्हाला बाबा? म्हणजे ‘वाचाल तर वाचाल’ अशी वर्षानुवर्षं वाचत आलेली सुभाषितं नका सांगू. ‘ज्याचं मस्तक पुस्तकात, त्याच्या मस्तकात पुस्तक!’, हे सुभाषितही माहिती आहे मला.’’

‘‘...आणि हो, ती खास आजचा दिवस साजरा करण्यासाठी इंटरनेटवरून शोधून काढलेली कोटही ऐकवू नका.’’ मोरून पुढचा गुगली किंवा दूसरा टाकला.

‘‘मोरू, मोरू... पुस्तकवाचनाचे किती म्हणून फायदे सांगू तुला,’’ बाबा म्हणाले. त्यांनी आठवायला सुरुवात केली. मनातल्या मनात यादी सुरू झाली. बाबा सांगू लागले -
  • पुस्तकं वाचल्याने आपल्या जगाबाहेर काय चाललंय, हे कळतं.
  • काय होतं पुस्तकं वाचल्यानं? ज्ञान मिळतं, मनोरंजन होतं, माहितीच्या साठ्यात भर पडते.
  • पुस्तकं वाचायला लागला की, तुमची एकाग्रता आपोआप वाढते. त्याचा फायदा अभ्यास करताना, तुमचा व्यवसाय वा नोकरी करताना होतो.
  • तर्क करण्याची शक्ती वाचनातून विकसित होते.
  • तुमच्या भाषेत सांगायचं तर पुस्तकं वाचण्याएवढं दुसरं चांगलं ‘स्ट्रेस बस्टर’ नाही.
  • समजा तुला फिजिक्सचा पेपर अवघड गेला. तो ताण विसरायला म्हणून तू द. मा. मिरासदार यांचं ‘माझ्या बापाची पेंड’, पु. ल. देशपांडे यांचं ‘खोगीरभरती’, शंकर पाटील यांचं ‘खुळ्याची चावडी’, शरद वर्दे यांचं ‘फिरंगढंग’ किंवा ‘बोलगप्पा’... असं कुठलंही पुस्तक वाचायला घे. हवं तर शिरीष कणेकरांचं निवड. आठ-दहा पानं वाचली की, तू फिजिक्स वगैरे सगळं विसरून जाशील. खरं म्हणजे ऐन परीक्षेच्या वेळी तसं ते विसरल्यामुळेच तुला या ‘स्ट्रेस बस्टर’ची गरज पडलीय.
बाबांना नेमक्या वेळी फिजिक्सचा पेपर आठवल्यामुळं मोरूचा स्ट्रेस किंचित वाढलेलाच.

फायद्याची यादी पुढे चालू राहाते -
  • ‘मस्तकात पुस्तक’ वगैरे तुला आवडत नाही. पण वाचनामुळे मेंदूला चालना मिळते. कल्पनाशक्ती सुधारते.
  • आपलं जग, आपली (आणि इतरांचीही) संस्कृती, आपला इतिहास याची उमज वाढते ती वेगवेगळी पुस्तकं वाचल्यानेच. विविध दृष्टिकोण वाचल्यामुळं खरं-खोटं कळायला लागतं.
  • वाचनामुळे प्रेरणा मिळते. जग बदलून जातं. मला स्वतःला ‘एक होता कार्व्हर’सारखी अनेक पुस्तकं प्रेरणा देणारी वाटतात.
  • वाचनामुळे संवाद करण्याची क्षमता अधिक चांगली होते.
  • महत्त्वाचं म्हणजे भरपूर वाचलं की (थोडं तरी) चांगलं लिहिता येतं. मी नाही का दोन वर्षांपासून साप्ताहिक सदर लिहितोय...
आता बाबा स्वतःच्या सदराबद्दल आणि त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल भरभरून बोलू लागणार हे मोरूच्या आतल्या आवाजानं सांगितलं. त्यानं ब्रेक लावला.

‘‘आम्ही, म्हणजे हल्लीची मुलं, वाचतच नाही, हे तुम्ही कशावरून ठरवता बाबा? फेसबुक, एक्स, इन्स्टा, चॅट हे सगळं सांभाळत आम्हीही वाचतो. पुस्तक थेट हातात कमी घेत असू. इंटरनेटवरच्या ‘अर्काइव्ह’सारख्या ग्रंथालयातून जुन्या पुस्तकांच्या पीडीएफ वाचत असतो. ‘पब्लिक लायब्ररी ऑफ इंडिया’, प्रोजेक्ट गुटेनबर्गची ‘फ्री इ-बुक्स’, ‘ई-साहित्य’... असं बरंच कुठून कुठून खूप काही वाचत असतो. तुम्हाला वाटतं आम्ही मोबाईलमध्ये, कम्प्युटरमध्ये डोळे खुपसून बसलोय. दिसतं तसं नसतं, बाबा...’’

‘‘...आणि खरं सांगू बाबा तुम्हाला, ‘वाचावं की वाचू नये’, असा ‘हॅम्लेट’ कधीच होत नाही माझा. ‘हे आधी वाचू की ते वाचू?’, असा प्रश्न असतो. तुम्हाला माहितीये का, पुस्तकं वाचणारा जगातला पहिल्या क्रमांकावरचा देश आपला आहे. आमची पिढी वाचत नसती, तर झालो असतो आपण जगात नंबर वन?’’ मोरूलाही सात्त्विक संताप आलाय, हे बाबांनी ओळखलं.

मोरू पुढं सांगू लागला, ‘‘पुस्तक दिनानिमित्त तुम्हाला एखादं छान पुस्तक भेट द्यायचंय. त्यासाठीच मी एवढ्या सकाळी सकाळी मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसलोय.’’

आता बाबांचे डोळे किंचित पाणावलेच. पुस्तकांचं सोनं लुटायचंय, या कल्पनेनं त्यांना भरून आलं.
........
जागतिक पुस्तकदिनानिमित्त दैनिक सकाळमध्ये बरोबर वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेला लेख.
धन्यवाद श्री. निरंजन आगाशे.
........

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘ळ’च्या अढळपदासाठी

  रचना - शब्दकुल ---------- हा लढा केवळ एका अक्षराचा नाही. मराठीच्या अस्मितेचे अढळपद टिकवून ठेवण्याचा संघर्ष आहे.  'तिलक' किंवा 'जलगाव' ही मोडतोड थांबविण्यासाठी पुण्याच्या श्री. प्रकाश निर्मळ ह्यांनी केंद्रीय मंत्रालयांपर्यंत चिवट पाठपुरावा केला. केंद्रीय हिंदी संचालनालयाने अखेर विस्तारित वर्णावलीत 'ळ'  स्वीकारला. ऋग्वेदापासून ते आधुनिक उपबोलींपर्यंत ५० कोटी जनतेच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या 'ळ' अक्षराची ही रंजक भाषिक यात्रा. सोबत प्रकाश निर्मळ ह्यांची मुलाखत... ---------------- ‘ ध ’ चा ‘ मा ’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं ! इतिहासाचा हा धडा आपण शिकलो, पण गिरवला नाही, असंच दिसत होतं. वर्तमानात ‘ ळ ’ चा ‘ ल ’ केला जात होता आणि ‘ च ल ता है... ’ अशी आपली त्याबाबतची वृत्ती होती. लोकमान्यांचं टिळक आडनाव हिंदीत बनायचं ‘ ति ल क ’ . बाळासाहेब ठाकरे ह्यांचं नाव हिंदी माध्यमांतून व्हायचं ‘ बाला साहब ’ . नाशिक जिल्ह्यात आहे मालेगाव आणि पुणे जिल्ह्यातलं ते माळेगाव. पण हिंदीत गेली की, दोन्...

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...
html