मुख्य सामग्रीवर वगळा

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

भारत जिंकला रडतखडत नि कण्हत-कुथत!

 


अशक्य ते शक्य करण्याचा प्रयत्न आणि बेथल धावबाद.
मोठा अडथळा दूर झाल्याचा आनंद भारतीय खेळाडूंना आवरता न येणाराच...
...........
भारतीय संघ जिंकला! धापा टाकत, दमत, कण्हत आणि कुथत!!
संजू सॅमसन ह्याची सामन्याचा मानकरी म्हणून भले निवड झाली असो.
सामन्याचा हीरो होता जेकब बेथल
!
ह्या विजयामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत गेला आहे,
 तो अनेक अनुत्तरित प्रश्न आणि डोक्याला खुराक देणाऱ्या
अडचणींचे ओझे बरोबर घेऊनच
!
--------------------------

सांगा कसं जिंकायचं?

अडीचशे धावा केल्यानंतर अगदी हसत-खेळत, प्रतिस्पर्ध्याला दमवत, आक्रमक खेळत?

वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघ जिंकला! कसा? तर धापा टाकत, दमत, कण्हत आणि कुथत!!

टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा पहिला उपान्त्य एकतर्फी झाला आणि दुसरा त्याच्या अगदी टोकाचा. क्रिकेट संकेतस्थळांचे ‘मॅच प्रेडिक्टर’ भारताच्या विजयाची हमी देणारी कोणतीही टक्केवारी दाखवत असोत; ही लढत शेवटच्या दोन षट्कांपर्यंत अतिशय चुरशीची झाली.

हा सामना मुंबईऐवजी पर्थ किंवा अ‍ॅडलेड येथील मैदानांवर, द लॉर्ड्स किंवा ओव्हलच्या स्टेडियमवर, कोलंबो किंवा कँडी... असा अन्य कोठे खेळला गेला असता, तर हाच निकाल लागला असता का? ह्याचं उत्तर देणं मोठं कठीण आहे. घरच्या मैदानावर, नेहमीच्या वातावरणात खेळताना सूर्यकुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांची मोठी दमछाक झाली. कशीबशी अंतिम फेरी गाठली ह्या संघाने. हा निकाल दिलासा देणारा नक्कीच नाही. उलट अंतिम सामन्यासाठी इशारे देणारा असा हा विजय आहे.

ह्या तीनच दिवसांत सर्वांचा लाडका ठरलेला संजू सॅमसन ह्याची सामन्याचा मानकरी म्हणून भले निवड झाली असो. सामन्याचा हीरो होता जेकब बेथल!

संजू सॅमसन चांगलाच खेळला. सलग दुसऱ्या सामन्यातील त्याच्या अर्धशतकामुळे (आणि हुकलेल्या दुसऱ्या शतकाची चुटपुट लावणाऱ्या खेळीमुळे) भारताला इंग्लंडविरुद्ध धावांचा डोंगर उभा करता आला.

निर्णायक लढतीत भारताने मिळविलेल्या विजयात संजूचा वाटा मोठाच. पण ह्या उत्तुंग धावसंख्येचा पाठलाग निडरपणे करणारी जेकबची खेळीही तेवढीच महत्त्वाची.

संजू सलामीला आलेला. जेकब चौथ्या क्रमांकावर. दोन गडी झटपट बाद झाल्यावर. दडपणाखाली. संजूच्या ८९ धावा ४२ चेंडूंमध्ये. जेकबने ४८ चेंडूंमध्ये १०५ धावा केलेल्या. त्या करताना ‘आपण लढतीतून अजून बाहेर पडलो नाही’ असा समोरच्या सहकाऱ्याला दिलासा देणाऱ्या. योगायोग असा की, ह्या दोघांचेही चौकार व षट्कार समान – आठ आणि सात. ह्याचा दुसरा अर्थ असा की, संजूपेक्षा जेकब एकेरी-दुहेरी धावा अधिक पळाला. तेही धावांचा पाठलाग करताना.

पहिल्या काही मिनिटांतच पाहुण्यांचा कर्णधार हॅरी ब्रुक ह्यानं संजूवर कृपा केली होती. डावातलं तिसरं षट्क टाकणाऱ्या जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर हॅरीनं संजूचा झेल सोडलेला. त्या जीवदानाचा त्यानं पुरेपूर फायदा उठवला.

षट्कार मारण्याच्या प्रयत्नात संजू बाद झाला, तेव्हा संघाच्या दीडशेहून अधिक धावा झालेल्या. तेव्हा जवळपास सहा षट्कांचा डाव बाकी होता. ‘अब तुम्हारे हवाले वतन साथीयों...’ असं म्हणण्याचं स्वातंत्र्य त्याला होतं.


आपल्या आधी दोन आणि समोर चार गडी बाद होत असल्याचे पाहणाऱ्या जेकबला ही मुभा नव्हती. संघ जिंकायचा असेल तर आपल्यालाच खेळावं लागेल, ह्याची जाणीव असल्यामुळं दुसरी धाव घेताना तो बाद झाला. त्या वेळी संघाला विजयासाठी २९ धावा आवश्यक होत्या. तो धावचित झाला आणि भारतीय संघानं खऱ्या अर्थानं निःश्वास टाकला.

बेथल सुदैवी नव्हता, असं नाही. त्याचं शतक साजरं झालं ते सुटलेल्या झेलाच्या षट्कारावर. पण अक्षर पटेल ह्यानं प्रयत्न करूनही न झालेला तो झेल अवघड होता. त्यात यश मिळतं तर अक्षरच्या नावावर आणखी एका अफ्लातून झेलाची नोंद झाली असती. त्याच्या अफाट क्षेत्ररक्षणाचा आजच्या विजयातील मोठा वाटा विसरता येणार नाही.

पहिल्या सहा षट्कांमध्ये बिनीचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतरही इंग्लंड संघानं प्रयत्न सोडले नाहीत. ह्या झुंजारपणाला दाद द्यायलाच हवी. आणि ही कडवी झुंज दिली बेथलं ह्यानं.

विजयासाठी १८ चेंडूंमध्ये ४५ धावांची गरज असताना जसप्रीत बुमराह ह्यानं टाकलेलं अठरावं षट्क कमाल होतं. त्यात त्यानं फक्त सहा धावा दिल्या. नंतरच्या षट्कात पहिल्याच चेंडूवर बेथल ह्यानं षट्कार ठोकल्यानंतरही हार्दिकनं नऊच धावा दिल्या. शिवाय त्यानं सॅम करन ह्याला तिलक वर्माच्या हाती झेल द्यायला भाग पाडलं होतं. भारताचा विजय तिथे नक्की झाला होता. ‘किती धावांनी?’, एवढाच प्रश्न होता.

अखेरच्या षट्कात हे अंतरही झपाट्यानं कमी झालं. आता सामना आपलाच ह्या समजुतीनं कर्णधारानं चेंडू शिवम दुबे ह्याच्या हाती सोपवला. वेस्ट इंडिजविरुद्ध दोनच षट्कांत ४६ धावांची खिरापत वाटणाऱ्या दुबेवर हा मोठाच विश्वास दाखवलेला. जोफ्रा आर्चर ह्यानं त्याला तीन षट्कार मारले. दुबेनं २२ धावा दिल्या. अर्थात त्यानं फलंदाजीत बढती मिळाल्यावर २५ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या, हे विसरता येणार नाही. पण षट्कामागे पावणेबारा धावा मोजणारा अक्षरही तेथे चालला असता.

ह्या सामन्यात ४० षट्कांत ४९९ धावा झाल्या. अनेक विक्रम रचले गेले. दोन्ही संघांकडून ३९ चौकार आणि ३४ षट्कारांची आतषबाजी झाली. मग गोलंदाजांचं काय? सामन्यात एकूण १२ खेळाडूंनी गोलंदाजी केली. त्यापैकी बुमराह व हार्दिक पंड्या ह्या दोघांनीच षट्कामागे दहापेक्षा कमी धावा दिल्या. फलंदाजांना दिवाळी साजरी करता यावी म्हणून गोलंदाजांनी शिमगा करावा, हे काही योग्य नाही.

अहमदाबादेत विजेतेपदासाठी भारतीय संघाला चिवट न्यू झीलँडशी लढावे लागणार आहे. वरुण चक्रवर्तीनामक शस्त्र धार पूर्णपणे गमावून बसल्याचे दिसते. एक एकच सामना वाट्याला आलेले कुलदीप यादव व महंमद सिराज आणि चपळ क्षेत्ररक्षणामुळे मैदानात उठून दिसणारा रिंकू ह्यांचा संघात समावेश होईल का? काही दिवसांपूर्वी संजू सॅमसन ट्रोलरचे आवडते गिऱ्हाईक होते. त्याची जागा आता अभिषेक शर्मा ह्यानं घेतली आहे. अभिषेकला संघाबाहेर ठेवण्याचं धाडस कोणी करील? की एका स्फोटक खेळीच्या अपेक्षेवर त्याला पुन्हा संधी दिली जाईल?

इंग्लंडवर फक्त सात धावांनी विजय मिळविलेला भारतीय संघ अंतिम फेरीत गेला तो अनेक अनुत्तरित प्रश्न आणि डोक्याला खुराक देणाऱ्या अडचणी घेऊनच!

….

(छायाचित्रे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद व भारतीय क्रिकेट मंडळ ह्यांच्या संकेतस्थळांवरून साभार.)

….




टिप्पण्या

  1. अगदी बरोबर. कण्हत कुथत जिंकला भारतीय संघ. शेवटच्या तीन षटकांपर्यंत सामना हातातून जाईल अशी अवस्था होती. इंग्लंड संघ हरला असला तरी या सामन्यात हिरो ठरला जेकब!

    उत्तर द्याहटवा
  2. छान लिहिले आहे. शेवटी जिंकणे महत्त्वाचे! रविवारची वाट आतुरतेने पाहू !

    उत्तर द्याहटवा
  3. विश्लेषण अगदी बरोबर आहे पण ते करताना आपल्या संघाला इतके तुच्छ लेखणेही बरोबर नाही.. मुद्दा किंचित सौम्य भाषेतही मांडता आला असता.. कण्हत..कुंथत वगैरे अलंकारिक शब्द लेखकाची भाषेवरील पकड जरी दाखवत असले तरी त्याचबरोबर ते आपल्याच खेळाडूंची लाज काढतायत हे लेखकाच्या "तल्लख" बुद्धीला कळले असते तर बरे झाले असते.. यात सामन्याच्या विश्लेषणापेक्षा स्वतःची शब्दसंपत्ती दाखवण्याची हौस जास्त दिसतेय..इंग्लंडने शेवटपर्यंत लढत देऊनही भारताने सामना जिंकला यात सारे आले..

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘ळ’च्या अढळपदासाठी

  रचना - शब्दकुल ‘ ध ’ चा ‘ मा ’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं ! इतिहासाचा हा धडा आपण शिकलो, पण गिरवला नाही, असंच दिसत होतं. वर्तमानात ‘ ळ ’ चा ‘ ल ’ केला जात होता आणि ‘ च ल ता है... ’ अशी आपली त्याबाबतची वृत्ती होती. लोकमान्यांचं टिळक आडनाव हिंदीत बनायचं ‘ ति ल क ’ . बाळासाहेब ठाकरे ह्यांचं नाव हिंदी माध्यमांतून व्हायचं ‘ बाला साहब ’ . नाशिक जिल्ह्यात आहे मालेगाव आणि पुणे जिल्ह्यातलं ते माळेगाव. पण हिंदीत गेली की, दोन्ही गावं एक होतात. बातमी नेमकी कुठली ते कळायला मार्ग नाही. लोणावळे, जळगाव, भुसावळ, करमाळा आदी स्थाननामांतील आणि काळे, साळी, माळी, जगदाळे, बाळू आदी व्यक्तिनामांतील ‘ ळ ’ जाऊन तिथं ‘ ल ’ कसा येतो ? हिंदीमध्ये ‘ ळ ’ च्या जागी ‘ ल ’ का, हा प्रश्न पुण्यातील आयुर्विमा अधिकारी प्रकाश निर्मळ ह्यांना छळत होता. हा अक्षरबदल खटकत होता. त्यांनी दाद मागायचं ठरवलं. अक्षरांतर होऊ नये, ह्यासाठी २०१८ पासून प्रयत्न सुरू केले. ' ळ ' ऐवजी ' ल ' चा वापर चुकीचा आहे. हिंदीमध्ये ' ळ ' च वा...

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...

गावसकर नावाचं गारूड आणि 'क्रीडांगण'चा विशेषांक

  ते वर्ष महत्त्वाचंच होतं. आता इतिहासात स्थान मिळवलेल्या अनेक घडामोडी त्या वर्षात घडल्या. उदाहरणार्थ, इदी अमिन ह्यांनी लष्करी उठाव करून युगांडाची सत्ता ताब्यात घेतली. चीननं अमेरिकेच्या टेबल टेनिस संघाला आमंत्रण देऊन ‘ पिंगपाँग डिप्लोमसी ’ सुरू केली. अमेरिकेनं सव्विसावी घटनादुरुस्ती करून मतदाराचं वय १८ वर्षावर आणलं. भारत आणि सोव्हिएत रशिया ह्यांनी २० वर्षांच्या मैत्री करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ‘ द न्यू यॉर्क टाइम्स ’ नं ‘ पेंटॅगॉन पेपर्स ’ प्रसिद्ध करून युद्धखोर अमेरिकी सरकारचा खोटारडेपणा उघडकीस आणला. ‘ वॉल्ट डिस्ने वर्ल्ड थीम पार्क ’ चं उद्घाटन झालं. वगैरे वगैरे... ते वर्ष होतं १९७१. हिमाचल प्रदेशाच्या रूपानं भारतात अठरावं राज्य निर्माण झालं. पश्चिम बंगालला महापुराचा आणि ओडिशाला (तेव्हा ओरिसा) वादळाचा महाभयंकर तडाखा बसला. वरच्या सगळ्या घटना-घडामोडी महत्त्वाच्या आहेत. पण सर्वसामान्य भारतीयांसाठी त्याहून खूप खूप महत्त्वाचं असं ह्याच वर्षानं दिलं. पूर्व पाकिस्तानातील मुक्ती वाहिनीच्या हाकेला प्रतिसाद देत आपल्या सैन्यदलानं पाकिस्तानची नांगी ठेचली ती हेच वर्ष संपता संपता. बा...