रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१
द. मा. - पाहिलेले, ऐकलेले
मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१
राजीव-स्मृती नि खारीचा वाटा!
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं आपल्याला, आपल्या सभोवतालाला अनेक धक्के दिले. जवळची माणसं पाहता पाहता कायमची दूरच्या प्रवासाला गेली. त्यातल्या काहींचं निधन 'अकाली' शब्दाची व्याप्ती पुरेशी स्पष्ट करणारं होतं. त्यापैकीच एक म्हणजे काँग्रेसचे तरुण खासदार राजीव सातव. मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात त्यांच्या निधनाची बातमी अक्षरशः कोसळली. अवघा महाराष्ट्र, देश हळहळला. पक्षीय अभिनिवेश लांब ठेवून लोक मोकळेपणानं आपल्या दुःखाला वाट मोकळी करून देत व्यक्त होत राहिले. त्यात हळहळ होती, खंत होती. पक्षीय राजकारण ह्या दुःखापासून शेकडो मैल दूर होतं.
राजीव सातव ह्यांच्या निधनाला जेमतेम चार महिने झाले. त्यांचा आज (दि. २१ सप्टेंबर) जन्मदिन. ह्यानिमित्ताने कळमनुरी येथे आज 'संसदरत्न राजीव सातव स्मृतिपुष्प' ह्या स्मृतिग्रंथाचं प्रकाशन होत आहे. नांदेडच्या अभंग पुस्तकालयानं प्रकाशित केलेलं हे पुस्तक कॉफी-टेबल आकाराचं आणि २७२ पानांचं आहे. सातव ह्यांच्या निधनानंतर अवघ्या चार महिन्यांत त्यांच्या कारकिर्दीचा सर्वांगीण आढावा घेणारा हा स्मृतिग्रंथ प्रकाशित होत आहे. ह्या कामात सहभागी होण्याची संधी मिळाली, ते काम उत्तम होईल, ह्यासाठी चांगल्यापैकी हातभार लागला, ह्याचं मोठं समाधान आहे.
पुस्तकाचे संपादक व नांदेडचे पत्रकार संजीव कुळकर्णी ह्यांनी जूनमध्ये ह्या पुस्तक-प्रपंचाची कल्पना दिली. त्यासाठी आम्ही एकदा औरंगाबाद येथे भेटलोही. तिथं त्यांनी सातव ह्यांचे स्वीय सहायक दत्ता सुतार ह्यांचा लेख संपादनासाठी दिला. (खरं म्हणजे नंतर लेख पाहिल्यावर लक्षात आलं की, त्याचं पुनःलेखनच करणं आवश्यक आहे.) दरम्यान, पुस्तक अधिक विविधांगी व्हावं, ह्यासाठी मीही काही लेखकांची नावं सुचविली. त्यापैकी पत्रकार मंगेश वैशंपायन व अभिजित घोरपडे ह्यांना ती कल्पना पसंत पडली आणि त्यांनी लिहिण्याचं मान्य केलं. मंगेशनं तर लेख माझ्याकडेच पाठवून 'पुढचं सगळं तूच बघ' असं सांगितलं. राजीव ह्यांचा महाविद्यालयीन सहअध्यायी असलेल्या एकालाही लेखाची विनंती केली होती. 'मला आवडेल लिहायला,' असं कळवून त्याला काही लिहायला जमलंच नाही. नगर जिल्ह्यातील एका नेत्यालाही ह्याबाबत विनंती केली. 'माझे चांगले संबंध होते त्यांच्याशी. नक्की लिहिणार मी,' असं आश्वासन देणाऱ्या त्या नेत्यानं नंतर फोनला उत्तर दिलं नाही आणि न लिहिण्यासाठी काही सबबही सांगितली नाही. असो!
आमच्या 'शब्दकुल मीडिया'तर्फे दोन पुस्तकांच्या (त्यानंतर आणखी दोन) संपादनाची-निर्मितीची कामं झाली आहेत. शब्दांकनापासून, लिहिण्यापासून, मुद्रितशोधन-ब्लर्ब ह्यापासून ते थेट पृष्ठरचनेपर्यंत. छापण्यास तयार, अशा स्वरूपात. नगरचे उद्योजक दिलीप चंदे ह्यांच्या व्यक्तित्वाचा व कर्तृत्वाचा सर्वांगीण आढावा घेणारं 'समर्पयामी' सहा वर्षांपूर्वी प्रकाशित झालं. कॉफी-टेबल बुक पद्धतीची त्याची निर्मिती आहे. एकदम वेगळी, आकर्षक. त्याचे चार विभाग आहेत. चारही विभागांना नेमकी शीर्षकं व त्याला जुळणारा श्लोक/अभंग आहे. हे पुस्तक पाहण्यासाठी म्हणून संजीव कुळकर्णी ह्यांना दिलं होतं. आनंदाची बाब म्हणजे 'संसदरत्न'ची निर्मिती 'समर्पयामी'च्या धर्तीवर, ते डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आली. साधारण तोच आकार, ('समर्पयामी' चौरस, तर हे आयताकृती.) तीच पद्धत. तिथं चार विभाग होते, इथं तीन आहेत. म्हणजे 'समर्पयामी'च्या कामाला एक प्रकारे मिळालेली ती दादच होय.
सुतार ह्यांचा हा लेख खरंच फार सुंदर आणि खूप काही सांगणारा आहे. त्यामुळे त्याला शीर्षकही वैशिष्ट्यपूर्ण हवं, असं ठरवलं होतं. त्यानुसार लेखाला एक नव्हे, तर पाच शीर्षकं दिली -
'आकाशी तो चमचमणारा अवचित कोसळला तारा...', हे मला आवडलेलं शीर्षक.
पण जातीचा उपसंपादक एकाच शीर्षकावर कधी समाधान मानत नाही. तो हातचे असावेत म्हणून अजून दोन-तीन शीर्षकं मनात योजून ठेवतो. मी नुसती मनात योजून न ठेवता आणखी शीर्षकं दिली - 'उल्कापात!', 'लखलखत्या ताऱ्याचा अस्त', 'हे दुःख कोण्या जन्माचे...' आणि 'राजकारणातील संत'. त्यातलं कोणतं शीर्षक निवडलं हे आता पुस्तक पाहूनच समजेल.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. विश्वजित कदम, कळमनुरीच्या महाविद्यालयाचे प्राचार्य व सातव ह्यांचे कॉलेजमित्र डॉ. बबन पवार ह्यांचेही लेख संपादनासाठी माझ्याकडे आले. त्या लेखांचं संपादन करताना सातव ह्यांच्याविषयी नवं काही समजलं. मंगेशच्या लेखातून त्यांची लोकसभेतील आणि विशेषतः गेल्या वर्षी शेतकरी कायद्यांच्या विरोधातली कामगिरी लक्षात आली. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर व संजीव कुळकर्णी ह्यांचेही लेख प्रकाशनाआधीच वाचायला मिळाले... एक नजर टाकण्यासाठी, त्यामध्ये काही कमी-जास्त नाही ना, हे बारकाईने बघण्यासाठी म्हणून. काम संपता संपता विविध वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या-लेखांचं संकलन असलेला एक लेखही संपादकांनी पाठवला. तोही नीटनेटका करून दिला. सुरुवात आणि शेवट आकर्षक! त्यात काही गुजराती दैनिकांची कात्रणं होती. अलीकडे दोन महिन्यांत दोनदा मी गुजरातेत जाऊन आल्याने मला गुजराती वाचता येतं, असा का कोण जाणे त्यांचा समज झालेला.
![]() |
गुजरातमधील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेलं दुःख. |
लेखकांनुसार, म्हणजे राजकीय नेते, पत्रकार-संपादक, कार्यकर्ते-स्नेही-मित्र असे विभाग पुस्तकात करावेत, असं उशिरा ठरलं. ह्या विभागांची शीर्षकं देण्याची जबाबदारीही माझ्याकडे आली. चार विभाग करावेत असं माझं मत होतं. त्यानुसार त्याला नावं सुचविली - 'राजस सुकुमार...', 'श्रेयस', '...अधुरी एक कहाणी', 'नेता... खरा नि हिरा', 'चमक विजेची, परी क्षणाची...'. ह्या शीर्षकाच्या विभागात काय असेल ह्याचा अंदाज येण्यासाठी स्वतंत्र सात-आठ ओळीही लिहिल्या.
पुस्तकाचे तीन विभाग ठरले व त्यानुसार शीर्षकंही निवडली. त्यानंतर प्रश्न आला तो विभागणी करणाऱ्या ह्या पानांच्या मागे मजकूर काय टाकायचा? अवांतर वाचन त्यासाठी उपयोगाला आलं आणि ह्या तिन्ही विभागांना सोयीचा होईल, असा मजकूर मिळाला मला.
संपादन, पुनःलेखन, शीर्षकं देणं हे माझं आवडतं काम. ह्या पुस्तकाच्या निमित्ताने ते करताना बरं वाटलं. एका तरुण नेत्याच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा हा स्मृतिग्रंथ आहे. त्याच्या निर्मितीत चांगला हातभार लागल्याचं समाधान मोठंच आहे.
-------------
#RajeevSatav #SansadRatna #ShabdkulMedia #AbhangNanded #Kalamnuri #Corona #SocialMedia #Congress #GujaratCongress #RajeevSatav_Memoirs
शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१
राहू जपून, थोडं अजून...
मत्प्रिय भक्तांनो...
नमस्कार, प्रणाम, नमस्ते.
वणक्कम.
सलाम वालेकुम.
सत् श्री अकाल.
आणि, हाय..!
हे म्हणजे अगदी रेडिओवरच्या निवेदकांसारखं झालं ना? त्या 'एफ. एम.'वरच्या चिवचिव चिमण्या नि मिठूमिठू पोपट करतात तसं. एका दमात सगळ्यांना साद घालायची! अभिवादन करतानाच सगळ्यांना आपलंसं करायचं.
... तर सांगायचा मुद्दा तुम्ही सगळेच माझे आहात की. मांडवात आरती म्हणताना काय, विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचताना काय... तिथं कुणी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन नसतो. तिथं दिसतो तो माझा भक्तच. म्हणून मग मी पण थोड्या वेळासाठी 'आर. जे.' झालो. कसं वाटतंय 'आरजे गणेशा' किंवा 'आरजे विनायका' ऐकायला? की 'आरजे विघ्नहर्ता' अधिक योग्य राहील?
रेडिओवरनं आठवलं, खरं तर ठरवलं होतं की, तुम्हाला 'मित्रों...' अशी साद घालायची. नंतर विचार केला नको बुवा. तशी हाक मारली की, सावरून बसता तुम्ही. हातातलं सगळं काम सोडून रेडिओ, टीव्ही.पुढं ठाण मांडता. मग त्याच्यावरून पुढचे काही दिवस फेसबुक, ट्विटर इत्यादी माध्यमांतून एकमेकांवर तुटून पडता. 'भक्त'-'अंधभक्त'-'गुलाम' ही आणि अशी शेलकी विशेषणं वापरता. नको म्हटलं. तुम्ही सगळेच्या सगळे माझे लाडके भक्त. माझ्या 'मन की बात'वरून तुमच्यात लठ्ठालठ्ठी नको. ह्या उत्सवाच्या काळात तर नकोच.
![]() |
छायाचित्र सौजन्य - www.devillierart.com |
निघण्याची सगळी तयारी करून, आवरून बसलो होतो. अकरा दिवसांच्या मुक्कामासाठी नवी पितांबरं, उपरणी भरून झाली. ह्या उत्सवाच्या दिवसात खिरापत, पंचखाद्य, फळं, पेढे, मोदक ह्याचा मारा होणार हे माहिती असल्यानं श्रावणात एकभुक्तच राहिलो होतो. मोदकांच्या कल्पनेनंच तोंडाला पाणी सुटलं होतं. पार्वतीआईनं नेहमीप्रमाणं मायेनं नि काळजीनं सल्ला दिलाच निघताना, 'थोडं जपून खा रे बाळा! तळलेलं कमी खा.' 'मोदक श्रेष्ठ कोणते? तळणीचे की उकडीचे?' तुमचा हा फेसबुकीय वाद आमच्या मातुःश्रींपर्यंत पोहोचलेला आहे बरं! आपला मतलब त्या तसल्या कळकट, शिळ्या वादाशी नाही; ताटभरून मोदक असल्याशी!!
मेघराजाच्या रूपात तांडव करून बाबा दमले होते. त्यामुळे लांबूनच त्यांचा निरोप घेतला. तेवढ्यात आमचे मूषकमहाराज आले नि म्हणाले, ''देवाधिदेवा, अहो काय चाललंय पृथ्वीवर, तुमच्या प्रिय भारतवर्षात! केवढी गर्दी बघा ती. तुमची मूर्ती, नारळ, फुलं-दूर्वा, सजावटीचं साहित्य घेण्यासाठी रस्ते कसे वाहताहेत बघा. अहो, जिकडं बघावं तिकडं 'ट्राफीक ज्याम' दिसतंय. कसं काय होणार हो!''
मी म्हणालो त्याला, ''बा मूषका, इतकी वर्षं मला घेऊन जातोस आणि ही गर्दी, हा उत्साह पहिल्यांदाच पाहिल्यासारखं काय सांगतोस. नवं काही बोल.. ट्विटरवरचा नवा ट्रेंड सांग, फेसबुकवरचा खमंग रंगलेला वाद सांग...''
हा थट्टेचा सूर मूषकराजांना पटलेला नाही, हे त्यांच्या इवल्याशा चेहऱ्यावर लगेच दिसलं. ''गणराया, गांभीर्यानं घ्या मला कधी तरी. नेहमीसारखी परिस्थिती राहिलेली नाही सध्या. ती कोरोना महामारी आलेली लक्षात आहे ना तुमच्या. यंदा मार्च, एप्रिल, मे महिने कसे गेले आठवतंय ना?''
मूषकराजांचं ऐकावं म्हणून मग मीही एक नजर टाकली, तर काय. सांगत होता ते खरंच होतं की. केवढी गर्दी! नजर टाकावी तिकडं माणसंच माणसं दिसत होती. हातात पिशव्या, एकमेकांना धक्का देत, वाहनांची दाटी चुकवत वाट काढणारी. रस्त्याच्या कडेला बसलेले विक्रेते. कुणाच्या नाकावर मास्कच नाही, तर कुणी तो हनुवटीवर अडकवलेला. कुणी खोकतोय, तर कुणी थुंकतोय. अरे! एवढ्यात सगळं विसरलात की काय, सोळा-सतरा महिने अनुभवलेलं. तो कोरोनानामक राक्षस अर्धमेला झाल्यासारखा वाटत असला, तरी अजून पूर्णपणे खतम नाही झालेला. लस घेतली असेल तुम्ही. पण म्हणून काय झालं! कोरोनाला आव्हान न देता 'तू परत ये, तू परत ये...' असं आवाहन करत असल्यासारखंच वाटलं मला ते सगळं चित्र पाहून.
नाही म्हटलं तरी हे उघड्या डोळ्यांनी बघितल्यावर हादरलोच थोडा मी. म्हणूनच पत्र लिहायला बसलो लगेच. निघण्याची घाई-गडबड सुरू असताना, वेळ काढून लिहितोय. प्रत्येक मंगल कार्याची पहिली अक्षता देऊन तुम्ही मला मनोभावे आमंत्रण देता. उत्सवाचं तुमचं आमंत्रण मिळालंय. 'पुढच्या वर्षी लवकर या' असं तुम्ही मागच्या वर्षी बऱ्यापैकी शांतपणे सांगितलं होतं. म्हणून यंदा थोडं निवांत जावं असं ठरवलं होतं. यायचं तर असतंच की दर वर्षी.
कोरोनामुळं गेल्या वर्षी परिस्थिती नाजूकच होती. म्हणून उत्सव जपूनच साजरा केला ना तुम्ही. विनाकारण बाहेर पडायचं नाही, मोठ्या संख्येनं सगळ्यांनी जमायचं नाही. सूर्य मावळला की, आपापल्या घरात बसायचं... हे सगळे नियम तुम्ही पाळले ना गेल्या वर्षी पाच-सहा महिने? त्याचे चांगले परिणामही दिसले. हो ना? पण काय सांगावं, यंदाही परिस्थिती फार काही बदललेली नाही बुवा. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपण सगळे चांगलेच पोळून निघालो, आठवतंय ना? आत्ता आत्ताची तर गोष्टंय ती. तिसऱ्या लाटेचा इशारा सगळे तज्ज्ञ देत असताना एवढे कसे बेफिकीर! डॉक्टरचं, कंपौंडरचं कुणाचंही ऐका... पण भल्याचं असेल ते ऐकाच बुवा.
![]() |
छायाचित्र सौजन्य - www.peepsburgh.com |
दर वर्षी एक तरी गाणं हिट होतच असतं उत्सवाच्या निमित्तानं. ते 'ज्वेल थीफ'मधलं गाणं तुम्हाला सांगितलंच. पुढं कधी तरी 'गाओ ओम शांति ओम...' आलं. शांतता पाळायला एवढं ओरडून, ढणढण वाजवतं सांगावं लागतं होय. त्या वर्षी हा शांतिजप ऐकताना कान किटून गेले माझे. परत काय आहे की, मला एकाच वेळी अनेक गाणी ऐकणं भाग असतं. एका मंडपाचा ध्वनिवर्धक माझ्या समोर लताबाईंनी गायिलेली आरती ऐकवत असतो, तर दुसऱ्या मंडपाचा कर्णा 'चल छय्या, छय्या' म्हणत माझ्या कर्णाकडेच रोखलेला असतो. 'शांताबाई, शांताबाई...' असं कोण कुणाला पुकारतंय हे ऐकावं म्हटलं तर तिसरीकडून 'पार्वतीच्या बाळा...' अशी लडिवाळ हाक कानी पडते. 'देवा श्री गणेशा' एका बाजूला चालू असतं, तर लांबून कुठून तरी 'देवा हो देवा गणपति देवा...' असं मला आळवत कुणी 'हमसे बढकर कौन?' अशी प्रौढी मिरवत असतं.
हे उत्साहभारित वातावरण मलाही फार सुखद वाटत असतं. कधीच कंटाळा येत नाही. वर्तमानपत्रांत देखाव्याची पान भरून छायाचित्रं येतात. 'देखावे पाहता पाय थकले, पण डोळे नाही निवले' हे नेहमीचंच यशस्वी वाक्य कुणा बातमीदार-उपसंपादकाला द्यायचं असतं. एखादा उत्साही उपसंपादक 'रंग गुलाली ढोल वाजती, आले आले गणपती' असं उत्सवी शीर्षक देऊन बहार आणत असतो.
![]() |
छायाचित्र सौजन्य - www.subpng.com |
पण यंदाही, सलग दुसऱ्या वर्षी ह्या सगळ्यावर नाही, पण बऱ्याचशा कार्यक्रमांपुढं फुली मारायचीच. नियम पाळू. मला छान मखरात बसवा, गौरींची मस्त सजावट करा...पण हे सगळं आपल्यापुरतं; त्याला सार्वजनिक स्वरूप नको. यंदाही सजावटीचा भव्य मांडव नको. दर्शनाला आणि आरतीला गर्दी नकोच. तुम्ही मनोमन केलेला नमस्कार माझ्यापर्यंत पोहोचणारच. आशीर्वादासाठी माझा हात उंचावलेलाच आहे. गाणी नको, ढोल-ताशे नको, पाय थिरकावणारा नाच नको आणि गर्दीचा उत्सवी उत्साह नकोच नको.
हे सगळं मलाही थोडंच गोड वाटतं? खंत आहेच की. चुकल्यासारखं वाटतंय. लागोपाठ दुसऱ्या वर्षी भक्तांपासून थोडं लांबच राहायचं? पण इलाज नाही. मला सांगा, मास्क लावलेल्या रूपात माझं दर्शन तुम्हाला आवडेल का? तुमचे फुललेले चेहरे बघताना माझी अवस्था 'रूप पाहता लोचनी, सुख जालें वो साजणी' अशी होते. तुम्ही मास्क बांधूनच येणार. मग मला तुमचा फुललेला चेहरा कसा दिसणार? आणि मास्क न लावताच आलात, तर मला नाही हं आवडणार. नकोच ते!
फ़िराक़ गोरखपुरीसाहेबांचा शेर आहे -
तुमको देखें कि तुम से बात करें
माझी अवस्था अगदी तशीच आहे मित्रांनो. पण सध्याचा काळ लक्षात घेऊन तुम्हाला जवळून पाहण्यापेक्षा हा दुरून संवाद साधणंच योग्य आहे, असं मला वाटतं. ती म्हण आहे ना, एका जत्रेनं देव काही म्हातारा होत नाही. एकच्या ऐवजी आपण दोन उत्सव म्हणू.
मला बोलावलंत, मी आलोय. दर वर्षीच्या उत्साहानंच तुम्ही 'आधी वंदू तुज मोरया' असं म्हणाच. ऐकताना छान वाटतं. पण तसं म्हणताना मी वर जे काही लिहिलंय ते ध्यानात घेऊन 'सगळं ऐकू तुझे मोरया' असंही वचन मला द्या. पुढच्या वर्षी धमाल करू. दोन वर्षांची कसर पुरेपूर भरून काढू. हो ना?
तस्मादैक्यं प्रशंसन्ति दृढं राष्ट्रहितैषिण:||
... ह्या श्लोकाचा भावार्थ असा की, ऐक्य हीच समाजाची ताकद आहे. ऐक्य नसलेला समाज आणि पर्यायाने तो देश दुबळा ठरतो. म्हणूनच राष्ट्रहिताचा विचार करणारे ऐक्याला प्रोत्साहन देतात. ह्या महामारीला पिटाळून लावण्यासाठी आपल्याला असंच ऐक्य दाखवावं लागेल.
यंदा निश्चयच करू. दीड वर्ष ठाण मांडून बसलेल्या ह्या कोरोना-विघ्नाला हरवू या, पुढच्या वर्षी दुपटीनं आनंद साजरा करू या. तुम्ही म्हणता ना मला, 'पुन्हा पुन्हा तुम्ही यावे, विद्या ज्ञान आम्हा द्यावे'. आतापुरतं एवढं ज्ञान बास झालं की.
काळजी करू नका, आवश्यक ती काळजी मात्र घ्या. बाकीचं पाहायला मी आहे ना समर्थ!
तुमचा सगळ्यांचा,
बाप्पा
.....
#Ganesh #GaneshFestival #Covid19 #socialmedia #facebook #twitter #bhakt #LordGanesh #mankibaat #गणेशोत्सव #होठों_में_ऐसी_बात
#भक्तांशी संवाद
रविवार, १५ ऑगस्ट, २०२१
...हा माझाच देश आहे!
नशिबाला बोल लावतो
कधी कधी शिव्या देतो
...तरी हा माझा देश आहे!
दोषांची परवचा म्हणतो
उणे-दुणेच काढत बसतो
तेच ते उगाळत राहतो
...तरी हा माझा देश आहे!
नळ कोरडाठक्क दिसतो
रस्त्यांवरचे खड्डे मोजतो
कुरकुर करीत कर भरतो
...तरी हा माझा देश आहे!
नियम सारे ठोकरतो
कायदे बहुदा मोडतो
मुर्दाडपणे पुढे जातो
...तरी हा माझा देश आहे!
व्यवस्थेच्या नावे बोटे मोडतो
नाहीच सुधारणार, शाप देतो
गरजतो अन् मनातच बरसतो
...तरी हा माझा देश आहे!
कामासाठी लाच देतो
हळूच वशिला लावतो
कधी फक्त तमाशा बघतो
...तरी हा माझा देश आहे!
परदेशाचे कौतुक गातो
संधी मिळता तिकडे जातो
तिथून इथे बोट दाखवतो
...तरी हा माझा देश आहे!
कधी शेतकऱ्यांसाठी हळहळतो
कधी कष्टकऱ्यांसाठी खंतावतो
कधी उपऱ्यांवर पार वैतागतो
...तरी हा माझा देश आहे!
लॉकडाऊन पुरता पाळतो
मनाविरुद्ध घरातच बसतो
लढून हरवू म्हणत राहतो
...तरी हा माझा देश आहे!
सांगितल्यावर टाळ्या पिटतो
अनामिकासाठी दिवा लावतो
मदतीसाठी पुढेही सरसावतो
...तरी हा माझा देश आहे!
सिंधूला सारखं चिअरिंग करतो
मग एक भाला काळजात घुसतो
...हा माझा, माझाच देश आहे!
ऑलिंपिक पदकाने खुशीत येतो
वर्ल्ड कप दिमाखात मिरवतो
नीरज, मीरा, दहिया माझे म्हणतो
...हा माझा, माझाच देश आहे!
वीरांची स्मृती जागवतो
तिरंग्याला सलामी देतो
मनाशी खूणगाठ बांधतो
...हा माझा, माझाच देश आहे!
नवीनवी स्वप्ने रोज पेरतो
आशेचे पाणी घालत राहतो
'उद्या आपलाच' मीच सांगतो
...हा माझा, हो माझाच देश आहे!
....
(चित्रांचे सौजन्य - https://hdpng.com आणि https://thumbs.dreamstime.com)
....
#India #IndependenceDay #MyCountry #मेरा_देश #15August #हा_माझाच_देश_आहे
बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१
पदकांसाठी झुंज
![]() |
लोव्हलिना बोर्गोहेन |
![]() |
रविकुमार दहिया...अंतिम फेरीत, पदक निश्चित |
उपान्त्य लढतीत मात्र त्याला अमेरिकेच्या डेव्हिड मॉरिस टेलर ह्यानं हरवलं. त्याचा हा विजय तांत्रिक गुणांवर होता. आता दीपकला कांस्यपदकासाठी खेळावं लागेल. महिलांच्या फ्री स्टाईल ५७ किलो गटात अंशू मलिक हिला बेलारूसच्या इरिना कुरचकिना हिनं ८-२ असं सहज हरवलं. अंशूला केवळ दोनदा एक-एक गुण मिळविता आला.
महिला हॉकीच्या चुरशीच्या उपान्त्य लढतीत अर्जेंटिनानं भारतावर २-१ विजय मिळविला. खेळाला सुरुवात झाल्यावर दुसऱ्याच मिनिटाला कर्णधार रानी रामपाल हिनं पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला. गुरजितकौर हिनं संधी न दवडता चेंडू गोल जाळ्यात धाडून संघाला आघाडीवर नेलं. अर्जेंटिनाची फॉरवर्ड मारिया होसे ग्रॅनातो पाचव्या मिनिटाला डाव्या बगलेतून चेंडू घेऊन एकटीच आतपर्यंत पोहोचली होती. भारताच्या बचाव फळीतील खेळाडूंनी संभाव्य धोका टाळला. त्यानंतर आठव्या मिनिटाला अर्जेंटिनाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ऑगेस्टिना गोर्सेलानी हिनं फटकावलेला चेंडू पुन्हा आपल्या बचाव फळीनंच अडवला. खेळाच्या पहिल्या सत्रात आपल्या मुलींनी चांगली कामगिरी केली. पहिलं सत्र संपता संपता नवनीत कौर व ऑगेस्टिना ह्यांची धडक झाली. त्यात दोघींनाही दुखापत झाली.
![]() |
जल्लोषाची एकच संधी. |
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीपासून अर्जेंटिनानं आक्रमण चालू ठेवलं आणि त्याचं त्यांना लगेच फळही मिळालं. सतराव्या मिनिटाला मोचिया रोसिओ सँचेझ हिला पेनल्टी कॉर्नरची संधी साधणं जमलं नाही. पण त्यातून मिळालेल्या आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार मारिया नोएल बारिओनुएव्हो हिनं बरोबरी साधणारा गोल केला. बरोबरीमुळं सावध झालेल्या भारतीय खेळाडूंना आक्रमणावर भर दिला. वंदना कटारिया हिने उजव्या बगलेतून चेंडू घेऊन मुसंडी मारली होती. पण वर्तुळाजवळ आल्यावर तिनं लालरेम सियामी हिच्याकडं पास दिला. तिला चेडूवर नियंत्रण ठेवता न आल्यानं एक मोठी संधी हुकली. त्यातून सव्विसाव्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर गुरजितने घेतला. गोलरक्षक मारिया बेलेने सुची हिला चकवणं तिला जमलं नाही. लगेचच मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर आपल्याकडून फटकाच मारला गेला नाही. पुढच्या मिनिटाला अर्जेंटिनानं रचलेली चाल त्यांना पेनल्टी कॉर्नर देऊन गेली. ऑगेस्टिनाचा फटका बचाव फळीनं अडवला. मध्यंतराला खेळ थांबला तेव्हा बरोबरी होती.
उत्तरार्धाच्या पहिल्या सत्रात अर्जेंटिनानं आक्रमक पवित्रा कायम ठेवला. त्यातून त्यांना पस्तिसाव्या मिनिटाला लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. ऑगेस्टिनाचा पहिला फटका बचाव फळीनं अडवला. त्यानंतर मात्र मारिया नोएलन गोलरक्षक सविता पुनिया हिला चकवून अर्जेंटिनाला आघाडीवर नेलं. अडचणीत भर म्हणून की काय एकोणचाळिसाव्या मिनिटाला पंचांनी ग्रीन कार्ड दाखवल्यामुळे नेहा गोयल हिला मैदानाबाहेर जावं लागलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात अर्जेंटिनाचा वरचष्मा दिसून आला. आक्रमण, पास देणं आणि चेंडूवरचा ताबा ह्या बाबतीत संघ वरचढ ठरला.
सामन्याच्या चौथ्या आणि निर्णायक सत्रात आपल्या मुलींनी जोरदार प्रयत्न सुरू केले. नवनीतकौरने पन्नासाव्या मिनिटाला रचलेली एक सुरेख चाल वाया गेली. पुढच्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर पुन्हा गुरजितनेच घेतला. पण गोलरक्षक सुची सावध होती. तिने मोठा सूर मारत चेंडू अडवला. त्यानंतरची नऊ मिनिटं आटोकाट प्रयत्न करूनही भारताला संधी साधता आली नाही. अखेरच्या क्षणी नवनीतकौर हिने मारलेला फटका गोलरक्षक सुची हिने पुन्हा एकदा जिवाच्या आकांताने अडवला आणि अर्जेंटिनाची अंतिम सामन्यातली जागा निश्चित केली.
ही लढत बऱ्यापैकी चुरशीची झाली, तरी आपण नेमबाजीत काहीसे कमी पडलो. चारपैकी एकाच पेनल्टी कॉर्नरवर आपल्याला गोल करता आला. अर्जेंटिनाला सहा पेनल्टी कॉर्नर मिळाले. चेंडू ताब्यात ठेवण्यातही अर्जेंटिनाचा संघ किंचित वरचढ ठरला. आता कांस्यपदकाच्या लढतीत भारतीय मुलींपुढे इंग्लंडचे आव्हान आहे. त्यांना आज द नेदरलँड्सने सहज हरवून अंतिम फेरी गाठली.
(सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.)
...
#Tokyo2020 #LovlinaBorgohain #RaviKumarDahiya #NeerajChopra #IndiainOlympics #DeepakPuniya #Athletics #Javelinthrow #boxing #wrestling
सोमवार, २ ऑगस्ट, २०२१
बीजिंगपासून टोकियोपर्यंत
![]() |
पुरुषांच्या ‘ब’ गटात भारताचा सलामीचा सामना आयर्लंडशी झाला. पुढे जाणाऱ्या मायकेल डार्लिंगला अडवणारा सरदार सिंग. (ऑलिंपिक समितीच्या संकेतस्थळाच्या सौजन्याने) |
आधीचे भाग इथे वाचा
https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey1.html
https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey2.html
https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey3.htm
https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey4.html
https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey5.html
https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey6.html
https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey7.html
https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey8.html
.....
#भारतआणिऑलिंपिक #हॉकीचे_सुवर्णयुग #OlympicsHockey #IndiaInOlympics
#Olympics #India #hockey #TokyoOlympics #GoldMedal #MensHockey #WomensHockey
#Beijing 2008 #London2012 #Rio2016 #TokyoFirstFour
रविवार, १ ऑगस्ट, २०२१
देणाऱ्याने नि खाणाऱ्याने...
तसं पाहिलं तर खाण्याशी आपल्या सगळ्यांचा नित्य संबंध असतो. असं असतानाही 'खाण्या'बाबत पोलिस खात्याकडंच सगळे बोट दाखवतात. ह्या आठवड्यात तसंच झालं. पुण्यातली बिर्याणी गाजली. मसालेदार नसलेलं, फार तेलकट नसलेलं असं सात्त्विक नि साजूक तुपातलं खाणं अचानक चर्चेत आलं. त्यावरून आठवली एक जुनी रचना. आठ वर्षांपूर्वी, तेव्हाच्या मंत्र्याने पोलिसांच्या 'खाण्या'बद्दलच जाहीर विधान केलं होतं. त्या वेळी लिहिलेली ही विरुपिका....
![]() |
(अर्कचित्र सौजन्य - https://www.pngitem.com) |
देणाऱ्याने देत जावे
लिहून गेलेत विंदा
खाणाऱ्याने खात ऱ्हावे
सांगून राह्यलेत आबा
पगार म्हणे नाही पुरत
'हप्ता'ही त्यात नाही सरत
खिशात काहीच नाही उरत
म्हणूनच खाती परत परत
जेवण करायला पोटभर
लागतात रुपड्या बारा
तेवढाही पगार मिळेना
गरिबीचे वाजले तीन-तेरा
ज्याच्या हाती आहे पद
त्याने थोडी खावी साय
टिकवणार नाही हातावर
त्याची उद्धरावी आय-माय
मिळेल जेव्हा संधी तेव्हा
मटकावून टाकावे लोणी
कशाला उगा डोळेझाकणी
पाह्यला ते वेडंय का कुणी?
तलाठी अडवितोय सात-बारा
पाटकरी जिरवून राहिलाय झरा
रावसाहेबांना आणि भाऊसाहेबांना
भरवावाच लागतो की रोज तोबरा
'तराजू'ही तिकडे झुकतो
पारड्यात ज्या पैसा पडतो
कसला न्याय नि कसलं काय
पदरात पडेल ते आपलंच हाय
शिक्षण, पाणी, वीज, महसूल
हरेक खात्याचा एक उसूल
उद्याचं कोणी काय पाह्यलंय
आत्ताच दाबून करा वसूल!
झाल्या कामाशी असे मतलब
दाबावी जमेल तशी मूठ
नीती, तत्त्व, शील-चारित्र्य
बाता सगळ्या, सारेच झूठ!
इकडे चरत तिकडे चरत
यांचे पोट नाहीच भरत
'आब्बा', 'आब्बा' करत
कोणीच कसे नाही ढेकरत?
तणकट हे कसलं माजलंय
तुम्हाला अन् पिकाचं पडलंय
चोरसाहेब मलिदा चाखतोय
धनी बिचारा धत्तुरा खातोय
कायदा मोडतोय
पैसा मोजतोय
देशातला आम आदमी
सुखात की हो जगतोय...
उंदराला असते मांजर साक्ष
कशाला तिरपा भोळा कटाक्ष?
आठवडाभर म्हणे राहून 'दक्ष'
साफ कसे होतील सगळे कक्ष?
एवढं एक आता करा राव
सगळ्यांनी मिळून लावा नेट
सगळ्या सगळ्या ऑफिसातले
जाहीर करून टाका रेट!
.
.
.
देणाऱ्याचे हात घ्यावे,
काही तरीच सांगताय विंदा!
खाणाऱ्याचे तोंड दाबावे
बघताय काय तुम्ही आबा?
- 'हप्ता'भर 'भुकेला' आम आदमी
..........
पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस
स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाच...
-
रचना - शब्दकुल ‘ ध ’ चा ‘ मा ’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं !...
-
'परमेश्वर प्रसन्न झाला, तर पुढचा जन्म मी लेखकाचाच मागीन! उत्तम लेखक होणे, हीच माझी महत्त्वाकांक्षा होती. माझ्या भाषेतील हजारो, लाखो लोक...
-
कोजागरी पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी व्हॉट्सॲपवर संदेश आला. बहुतेक फॉरवर्ड केलेलाच असावा. पण वाचण्यासारखा. वाचून गालातल्या गा...






















