अटलांटा (१९९६)
आधुनिक ऑलिंपिकची शताब्दी साजरी करणाऱ्या ह्या स्पर्धेत मान्यताप्राप्त सर्व १९७ राष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे संघ सहभागी झाले. दिग्गज मुष्टियोद्धा महंमद अली ह्याच्या हस्ते ऑलिंपिकची ज्योत पेटविण्यात आली. भारतीय चाहत्यांना हॉकी संघाकडून अपेक्षा होत्या. त्या फलद्रूप झाल्या नाहीतच; उलट संघ अजून एक पायरी खाली उतरला! पण काहीसा दिलासा दिला तो लिएंडर पेस ह्याने. टेनिसच्या एकेरी स्पर्धेत त्याने कांस्यपदक पटकाविले. कुस्तीगीर खाशाबा जाधव ह्यांच्यानंतर भारताचे हे पहिलेच व्यक्तिगत पदक होय.
पुरुष विभागात सहभागी १२ देशांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली. ‘अ’ गटामध्ये भारतासह स्पेन, जर्मनी, पाकिस्तान, अर्जेटिंना व यजमान युनायटेड स्टेटस, अर्थात अमेरिका ह्यांचा समावेश होता. ‘ब’ गटात द नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका व मलेशिया संघ होते. पात्रता फेरीत खेळून ह्या ऑलिंपिकसाठी निवड झालेल्या भारताकरिता स्पर्धा निराशाजनक ठरली. मागच्या स्पर्धेच्या तुलनेत आपण एक स्थान खाली ढकलले गेलो. द नेदरलँड्स, स्पेन, इंग्लंड ह्यांनीही पात्रता फेरीतूनच प्रवेश मिळविला होता. ज्याला हरवून आपण ऑलिंपिकसाठी पात्र ठरलो, त्या हॉलंडने (द नेदरलँड्स) सुवर्णपदक जिंकले, हा एक योगायोगच!
दोन विजय, बरोबरीतील दोन लढती आणि एक पराभव अशा कामगिरीमुळे भारत गटात तिसऱ्या क्रमांकावर राहिला, साखळी सामन्यांमध्ये आपल्याला जेमतेम आठ गोल करता आले. पहिल्याच सामन्यात अर्जेंटिनाकडून ०-१ पराभूत झाल्यानंतर जर्मनीला १-१ असे थोपविणे भारताला साध्य झाले. मुकेशकुमारच्या गोलमुळे ही बरोबरी साधता आली. एरवी उपान्त्य वा अंतिम सामन्यात गाठ पडणाऱ्या आशिया खंडातील पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतील, म्हणजे भारत व पाकिस्तान ह्यांच्यातील लढत एकही गोल न होता बरोबरीत सुटला.
अमेरिकेवर मिळविलेल्या ४-० विजयात धनराज पिल्लेचा वाटा दोन गोलचा होता. गटात अव्वल ठरलेल्या आणि अंतिमतः रौप्यपदक जिंकणाऱ्या स्पेनला पराभवाचा धक्का दिला तो आपणच. गेविन फरेराचे दोन आणि साबू वर्की ह्याचा एक गोल ह्यामुळे भारताने स्पेनवर ३-१ अशी मात केली. बाद फेरी गाठता आली नाही आणि मग क्रमवारी ठरविण्यासाठी झालेल्या लढतींमध्ये भारताला खेळावे लागले. सलग चौथ्या ऑलिंपिकमध्ये ही वेळ आली. त्या सामन्यांतही दोन पराभव पत्करावे लागले – आधी दक्षिण कोरियाविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये आणि नंतर इंग्लंडविरुद्ध (३-४). परिणामी भारत आठव्या क्रमांकावर राहिला.
|
प्रशिक्षक सेड्रिक डी'सूझा ह्यांची शापवाणी खरी ठरली! ( छायाचित्र सौजन्य : स्पोर्ट्स्टार) |
गटबाजी, बेदिली ह्याचे ग्रहण भारतीय संघाला लागलेच होते. ऑस्ट्रेलियात दोन वर्षं आधी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत पाचवे स्थान मिळविल्यामुळे प्रशिक्षक सेड्रिक डी'सूझा फारच आशावादी होते. पण ऑलिंपिकआधी झालेल्या पात्रता स्पर्धेतील 'पराक्रमा'मुळे ते फारच व्यथित झाले. ह्या स्पर्धेत भारत-मलेशिया लढतीत ठरवून गोलशून्य बरोबरी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे ऑलिंपिक शर्यतीतून कॅनडा बाहेर पडला नि मलेशिया पात्र ठरला. ह्यात काही वरिष्ठ खेळाडूंचा सहभाग होता आणि बहुसंख्य खेळाडूंना असं काही ठरलं असल्याची कल्पना नव्हती. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने ह्या सामन्याची चौकशी केली; पण ठोस पुरावे आढळे नाहीत, एवढंच! ह्या बरोबरीत 'सुटलेल्या' सामन्यानंतरच्या पत्रपरिषदेत संतप्त डी'सूझा ह्यांनी 'हा संघ काही करणार नाही. अटलांटामध्ये अनर्थ होणार' असं केलेलं भाकित खरं ठरलं! परगटसिंगसाठी ही अखेरची स्पर्धा ठऱली.
‘अ’ गटातून स्पेनने चार व जर्मनीने तीन सामने जिंकून अनुक्रमे पहिला दुसरा क्रमांक मिळविला. पाकिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर आला. पाकिस्तानने सहावे स्थान मिळविले. गटामध्ये अव्वल ठरलेल्या स्पेनने सर्वांत मोठा विजय यजमान संघाविरुद्ध ७-१ मिळविला. ‘ब’ गटात अव्वल स्थान मिळविले नेदरलँड्सने. त्यांची कामगिरी चार विजय व एक बरोबरी अशी होती. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या ऑस्ट्रेलियाने तीन विजय व प्रत्येकी एक बरोबरी आणि पराभव अशी कामगिरी केली. अवघ्या एकाच विजयाची नोंद केलेल्या इंग्लंडला तिसऱ्या व दक्षिण कोरियाच्या संघाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गटसाखळीतील सहा सामने बरोबरीत सुटले; त्यापैकी तीन मलेशियाचे होते!
आशियाई संघ उपान्त्य फेरीत नाही, असे आठ वर्षांनंतर पुन्हा याच स्पर्धेत पाहायला मिळाले. पहिल्या उपान्त्य लढतीत स्पेनने ऑस्ट्रेलियावर २-१ असा निसटता विजय मिळविला. दुसऱ्या सामन्यात द नेदरलँड्सने जर्मनीला ३-१ असे सहज पराभूत केले. व्हॅन डेन होनर्टने हॅटट्रिक साधली. कांस्यपदकाच्या चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने जर्मनीला ३-२ हरविले. अंतिम लढत २ ऑगस्ट रोजी झाली. त्यात नेदरलँड्सने स्पेनेच आव्हान ३-१ गोलफरकाने मोडून काढत पहिले सुवर्ण जिंकले. विजेत्या संघाच्या फ्लोरिस इयान बोव्हेलँडरचे दोन गोल या लढतीत महत्त्वाचे ठरले.
महिला विभागात आठ संघ सहभागी झाले व त्यांच्यात साखळी पद्धतीने प्राथमिक लढती झाल्या. दक्षिण कोरिया वगळता अन्य एकही आशियाई संघ स्पर्धेत नव्हता. साखळी लढतींमध्ये सहा विजय व एक बरोबरी यासह ऑस्ट्रेलियाने अव्वल क्रमांक पटकावला. दुसरे स्थान दक्षिण कोरियाने, तिसरे ग्रेट ब्रिटनने व चौथे द नेदरलँड्स संघाने मिळविले. अमेरिकेचा पुरुषांचा संघ एकही सामना जिंकण्यात अपयशी ठरला असताना महिलांनी मात्र दोन लढती जिंकल्या. स्पेनला मात्र एकाही सामन्यात विजयाची नोंद करता आली नाही. साखळीमध्ये एकूण सहा सामने बरोबरीत सुटले.
पदकांसाठीच्या लढती १ ऑगस्ट रोजी झाल्या. साखळीत प्रत्येकी तीन विजय, दोन बरोबरी व दोन पराभव अशी सारखीच कामगिरी असलेल्या इंग्लंड (तिसरा क्रमांक) व नेदरलँड्स (चौथा क्रमांक) यांच्यामध्ये कांस्यपदकाची लढत झाली. नियमित व जादा वेळेत गोलफरक कोराच राहिल्याने सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटवर लागला. त्यात नेदरलँड्सने ४-३ अशी बाजी मारली. तुलनेने अंतिम सामना काहीसा एकतर्फी ठरला. त्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण कोरियावर ३-१ असा सहज विजय मिळविला. ॲनन ॲलिसनचे दोन गोल ऑस्ट्रेलियाला सुवर्णपदक जिंकून देण्यासाठी मोलाचे ठरले. दक्षिण कोरियाकडून एकमेव गोल चो युन-जंगने केला.
सिडनी (२०००)
तब्बल ४४ वर्षांनंतर पुन्हा एकदा ऑलिंपिकचे यजमानपद ऑस्ट्रेलियाने स्वीकारले. मावळत्या सहस्रकातील अखरचे ऑलिंपिक सहभागाच्या संख्येने नवा विक्रम नोंदविणारे ठरले. एकूण १९९ देश व १०,६५१ खेळाडू त्यात सहभागी झाले. हॉकीमध्ये निराशेची मालिका चालूच राहिली. सोल आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऑलिंपिकमध्ये प्रवेश करणाऱ्या भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. ती फारशी फलद्रुप ठरली नाही. फक्त क्रमवारीत भारत एक जागा वर आला. आशेचा एक किरण दाखविला वजन उचलण्याच्या स्पर्धेत कर्नम मल्लेश्वरी हिने. तिने कांस्यपदक जिंकले.
पुरुषांमध्ये द नेदरलँड्सने आपले सुवर्ण कायम राखण्यात यश मिळविले. पाकिस्तान व दक्षिण कोरिया या दोन आशियाई देशांनी उपान्त्य फेरी गाठली. दक्षिण कोरियाने रौप्यपदक जिंकून आशियाई दबदबा राखला.
‘ब’ गटाची क्रमवारी ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, भारत, अर्जेंटिना, पोलंड व स्पेन अशी राहिली. गटात सहा लढती बरोबरीत सुटल्या. ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान मिळविताना तीन लढती जिंकल्या व दोन अनिर्णीत राखल्या. प्रत्येकी दोन विजय व बरोबरी आणि एक पराभव, गोलसरासरीही समान यामुळे दुसऱ्या क्रमांसाठी भारत व दक्षिण कोरिया यांच्यात चुरस होती. तथापि उभय देशांतील सामन्यात भारत पराभूत झाल्याने उपान्त्य फेरी गाठण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अपूर्णच राहिले.
समीर दादच्या दोन गोलांमुळे भारताने सलामीच्या लढतीत अर्जेंटिनाला ३-० अशी धूळ चारली. तिसरा गोल होता मुकेशकुमारचा. नंतर मुकेशकुमार व बलजितसिंग ढिल्लाँ ह्यांच्या एक-एक गोलमुळे ऑस्ट्रेलियाशी २-२ अशी बरोबरी साधून संघाने अपेक्षा काहीशा वाढविल्या. हा आलेख पुढच्याच सामन्यात खाली आला. दक्षिण कोरियाकडून आपण २-० असा पराभव स्वीकारला.
नंतरच्या लढतीत स्पेनविरुद्धचा निसटता विजय (३-२) मिळविला, तो ढिल्लाँचे दोन व दिलीकुमार तिर्कीचा एका गोलमुळे. आता उपान्त्य फेरीत जागा मिळविण्याची संधी वाटत होती. पण पोलंडविरुद्ध तिर्कीच्या गोलमुळे आघाडीवर असतानाही अखेरच्या मिनिटाला पोलंडने बरोबरी साधली. ती चूक अंतिमतः नडली. पुन्हा पाच ते आठ क्रमवारीसाठी खेळणे भाग होते. इंग्लंडकडून २-१ पराभूत झाल्यावर सातवा क्रमांक मिळविताना आपण पुन्हा एकदा अर्जेंटिनाला ३-१ हरविले.
भारतीय हॉकी महासंघ आणि वादविवाद हे नाते ह्या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा दिसून आले. संघ निवडताना कमालीची गुप्तता पाळण्यात आली. ऑस्ट्रेलियात दोन चाचण्या घेतल्यानंतर परगटसिंगला नारळ देण्याचा निर्णय झाला. प्रशिक्षकपदाची जबाबदारीही से़ड्रिक डी'सूझा ह्यांच्याकडून वासुदेवन भास्करन ह्यांच्यावर सोपविण्यात आली. संघ आक्रमक खेळेल, प्रतिस्पर्ध्यांच्या चालींना तसेच चोख उत्तर देईल, अशी तयारी भास्करन ह्यांनी करून घेतली होती. तथापि पोलंडविरुद्धच्या शेवटच्या मिनिटातली बचावपटूंची ढिलाई अडवी आली.
‘अ’ गटात पाकिस्तान, द नेदरलँड्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, मलेशिया व कॅनडा ह्यांचा समावेश होता. गटातील तब्बल आठ सामने बरोबरीत सुटले. पाकिस्तान, नेदरलँड्स व जर्मनी ह्यांनी प्रत्येकी दोन सामने जिंकल्यामुळे गटातील पहिले दोन क्रमांक ठरविण्यासाठी कमालीची चुरस होती. एकही पराभव नसल्यामुळे पाकिस्तान अव्वल स्थानी राहिला. द नेदरलँड्सने गोलसरासरीच्या जोरावर दुसरे स्थान मिळविले.
‘ब’ गटात ऑस्ट्रेलियाने पोलंड, अर्जेंटिना व दक्षिण कोरिया यांच्याविरुद्ध विजय मिळविला, तर स्पेनविरुद्धची लढत बरोबरीत सुटली. दक्षिण कोरियाशी पोलंड व अर्जेंटिना यांनी बरोबरी साधली. अर्जेंटिना व पोलंड यांच्यातील बरोबरीत सुटलेल्या सामन्यात तब्बल १० गोल झाले.
उपान्त्य फेरीचे दोन्ही सामने २८ सप्टेंबर रोजी झाले. दक्षिण कोरिया-पाकिस्तान ही आशियाई देशांमधील लढत मोठ्याच चुरशीची झाली. त्यात दक्षिण कोरियाने १-० बाजी मारून पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली. दुसरा सामनाही असाच अटीतटीचा झाला. नियमित वेळेत बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी स्ट्रोकच्या मदतीने निर्णय झाला. त्यात द नेदरलँड्सने यजमानांना ५-४ असे पराभूत केले. कांस्यपदकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर ६-३ विजय मिळविला. त्यात ट्रॉय एल्डरने हॅटट्रिक नोंदविली. अंतिम सामना ३० सप्टेंबर रोजी अतिशय चुरशीने खेळला गेला. सुवर्णपदक राखू इच्छिणाऱ्या द नेदरलँड्सला दक्षिण कोरियाने जादा वेळेनंतरही ३-३ असे बरोबरीत अडविले. द नेदरलँड्सचा कर्णधार स्टिफन व्हीन याची हॅटट्रिक हे या सामन्याचे वैशिष्ट्य. त्यानंतर पेनल्टी स्ट्रोकवर लढतीचा निर्णय झाला आणि द नेदरलँड्सने कसाबसा ५-४ असा विजय मिळवत सुवर्ण राखले! स्पर्धेत सर्वाधिक १३ गोल करण्याचा पराक्रम अर्जेंटिनाच्या जॉर्ज लोंबी याने केला.
महिला
सहभागी संघांची संख्या दोनाने वाढून दहा झाली. त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली. दोन्ही गटांतील पहिले तीन संघ अव्वल साखळीसाठी निवडण्यात आले. त्यांच्यातील साखळी सामन्यांनंतर पहिल्या दोन क्रमांकांमध्ये सुवर्ण व रौप्यपदकांसाठी आणि तिसऱ्या व चौथ्या क्रमांकांच्या संघांमध्ये कांस्यपदकासाठी लढती झाल्या. ‘अ’ गटातून ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना व स्पेन आणि ‘ब’ गटातून न्यूझीलंड, चीन व द नेदरलँड्स यांनी अव्वल साखळी गाठली. दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी तीन सामने बरोबरीत सुटले. प्राथमिक गटवार साखळी सामन्यांमध्ये एकही विजय नोंदविता न आलेला एकमेव संघ होता दक्षिण आफ्रिकेचा.
अव्वल साखळी स्पर्धेतही अपराजित राहत ऑस्ट्रेलियाने पहिले स्थान मिळविले. पाचपैकी चार सामन्यांत विजय व स्पेनविरुद्ध बरोबरी अशी त्यांची कामगिरी राहिली. अर्जेंटिनाने तीन विजय व दोन पराभव अशी कामगिरी करून अंतिम फेरी गाठली. नेदरलँड्सने तिसरे व स्पेनने चौथे स्थान मिळविले. अव्वल साखळीत पाचव्या व सहाव्या क्रमांकावर राहिलेल्या चीन आणि न्यूझीलंड यांनीही एक-एक विजय मिळविला होता. पण तीन लढती बरोबरीत सोडविणारा स्पेनचा संघ कांस्यपदकासाठीच्या लढतीसाठी पात्र ठरला. त्या सामन्यात त्यांना द नेदरलँड्सने दोन गोलने सहज पराभूत केले. अंतिम लढतील ऑस्ट्रेलियापुढे अर्जेंटिनाचा टिकाव लागला नाही. अॅलिसन अॅनन, ज्युलिएट हॅस्लॅम व जेनी मॉरिस यांनी प्रत्येकी एक गोल केला. स्पर्धेत सर्वाधिक सहा गोल ऑस्ट्रेलियाच्या निकोल हडसन हिने केले. अर्जेंटिनाच्या ओनेटो व्हॅना पाओला हिने पाच गोलची नोंद केली.
अथेन्स (२००४)
अथेन्सच्या निमित्ताने ऑलिंपिक तब्बल १०८ वर्षांनी ‘माहेरी’ परतले. म्हणून तर या ऑलिंपिकचं घोषवाक्य ‘वेलकम होम’ होतं. सहभागी देशांची व प्रेक्षकांची वाढलेली संख्या ह्या माहेरपणाचं वैशिष्ट्य. त्याच बरोबर हॉकीमध्ये सहभागी होण्यासाठी यजमानांनी केलेली लढाई फोल ठरली. खरं तर यजमानांना थेट प्रवेश असतो; पण ग्रीसचा दर्जा पाहून आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ व आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटना यांनी ‘व्हेटो’ वापरला. त्याविरुद्ध यजमानांनी क्रीडा लवादाकडं दाद मागितली. अखेर ऑलिंपिक पात्रता स्पर्धेतून पात्र ठरलेल्या कॅनडाशी ग्रीसने तीन लढती खेळून व त्यात जिंकून ऑलिंपिकमध्ये सहभागी व्हावं, असा निर्णय झाला. त्यात ग्रीसच्या पदरी अपयशच आले.
हॉकीमध्ये पदक मिळावं असं भारतीयांना वाटत असलं, तरी तसं काहीच घडलं नाही. आपण क्रमवारीतली सातवी जागा सोडलीच नाही. पण भारताची पाटी सलग तिसऱ्या ऑलिंपिकमध्ये कोरी राहिली नाही. एक झळाळतं रौप्यपदक नावापुढं लागलं. ही कामगिरी केली राज्यवर्धनसिंग राठोड ह्यानं. नेमबाजीमध्ये त्यानं 'डबल ट्रॅप'मध्ये देशाला पहिलं रौप्यपदक मिळवून दिलं.
स्पर्धेत उपान्त्य फेरी गाठली ती तीन युरोपीय देश व ऑस्ट्रेलिया ह्यांनी. तीनपैकी एकाही आशियाई देशाला बाद फेरी गाठणे जमले नाही. सिडनीमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या दक्षिण कोरियाला आठव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. पाकिस्ताननं पाचवं स्थान मिळविलं. ह्या स्पर्धेतून नवा सुवर्णपदकविजेता मिळाला.
द नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, दक्षिण आफ्रिका व अर्जेंटिना अशी ‘ब’ गटातील अंतिम गुणस्थिती राहिली. भारताची सुरुवात द नेदरलँड्सविरुद्धच्या पराभवाने झाली. गोलफलक १-३ होता. हा एकमेव गोल केला गगन अजितसिंगने आणि तोही अखेरचा मिनिट राहिला असताना. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४-२ अशा गोलफरकाने विजय मिळाला. धनराज पिल्ले, बलजित ढिल्लाँ, दिलीप तिर्की व गगन ह्यांनी प्रत्येकी एक गोल केला. गटातला हा एकमेव विजय.
त्यानंतर भारताला सूर सापडलाच नाही. ऑस्ट्रेलियाकडून ४-३ पराभव झाला, तो शेवटच्या काही मिनिटांत. दीपक ठाकूरने सहाव्या मिनिटाला गोल करून आघाडी मिळवून दिली. त्यानंतर कांगारूंनी सलग तीन गोल चढवले. पण गगन व अर्जुल हलप्पा ह्यांनी अनुक्रमे पन्नासाव्या व बावनाव्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली. पण अखेरच्या मिनिटाला कांगारूंनी विजयी गोल केला. न्यूझीलंडकडून २-१ असा पराभव झाल्यामुळे भारताच्या सर्व आशा मावळल्या. ह्या सामन्यातील आपला एकमेव गोल धनराज पिल्लेने केला. अखेरच्या साखळी सामन्यात अर्जेंटिनानेही २-२ अशी बरोबरी साधली. हे दोन्ही गोल गगन अजितसिंगचे होते. पाकिस्तानविरुद्ध ०-३ असा पराभव स्वीकारल्याने क्रमवारीत बढती मिळविण्याची भारताची आशा मावळली. नंतर दक्षिण कोरियाला ५-२ हरवून भारताने सातवा क्रमांक टिकविला, एवढॆच!
|
धनराज पिल्ले. अथेन्स ऑलिंपिकसाठी अचानक निवड. |
भारताच्या खराब कामगिरीचं विश्लेषण करताना त्याच त्याच गोष्टी समोर येत राहिल्या - संघात बेदिली, प्रशिक्षकाची आश्चर्यकारक निवड. जर्मनीच्या गेऱ्हार्ड राश ह्यांची प्रशिक्षकपदी कशी निवड करण्यात आली, ह्याचं आश्चर्य अनेकांनी बोलून दाखवलं. राशची आखणी संघातील अनेक खेळाडूंना मान्यच नव्हती म्हणे. प्राथमिक संघात नाव नसलेल्या धनराज पिल्ले ह्याची अचानक निवड झाली. तीही धक्कादायक वाटली अनेकांना. त्याची ही चौथी स्पर्धा. संघाच्या तंदुरुस्तीच्या नावानंही आनंदीआनंदच होता!
सुवर्णपदकाची हॅटट्रिक साधण्याच्या ईर्ष्येने उतरलेल्या द नेदरलँड्सने पाचही सामने जिंकले. ऑस्ट्रेलिया व दोन स्पर्धांनंतर ऑलिंपिक सहभागाची संधी मिळालेल्या न्यूझीलंड ह्यांनी प्रत्येकी तीन विजय मिळविल्याने त्यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी चुरस होती. पण एका सामन्यातील बरोबरी ऑस्ट्रेलियाला लाभदायक ठरली. ह्या गटातील सामन्यांमध्ये गोलांचा वर्षाव झाला नाही; तथापि ऑस्ट्रेलियाने दोन लढतींमध्ये चार-चार गोल चढविले.
साखळीनंतर ‘अ’ गटाची क्रमवारी स्पेन, जर्मनी, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, ग्रेट ब्रिटन व इजिप्त अशी राहिली. पहिल्या तिन्ही संघांनी प्रत्येकी तीन विजय मिळविल्याने चुरस होती. दोन पराभव झाल्याने पाकिस्तान आपोआप तिसऱ्या क्रमांकावर गेला. दोन-दोन सामने बरोबरीत सोडविणाऱ्या स्पेन व जर्मनी यांच्यात अव्वल स्थानासाठी चुरस होती. सरस गोलफरकामुळे स्पेनने गटात पहिला क्रमांक मिळविला. स्पेनचे जर्मनी व दक्षिण कोरिया ह्यांच्याविरुद्धचे सामने चुरशीचे होत बरोबरीत राहिले. पण इंग्लंड, पाकिस्तान व इजिप्त यांच्याविरुद्धचे सामने त्यांनी निर्विवाद जिंकले. जर्मनीने इंग्लंड व इजिप्तविरुद्ध मोठे आणि पाकिस्तानविरुद्ध निसटता जय मिळवला. त्यांनाही दक्षिण कोरियाने बरोबरीत अडविले. गटात सर्वाधिक १९ गोल पाकिस्तानने केले. इंग्लंडला तर त्यांनी ७-० अशी धूळ चारली. खरी धमाल दक्षिण कोरियाने केली. दुबळ्या इजिप्तविरुद्ध त्यांनी ११ गोल करीत जुन्या आशियाई कौशल्याची आठवण करून दिली. एकही सामना जिंकता न आलेल्या इजिप्तने ३० गोल स्वीकारले आणि केले फक्त २, तेही इंग्लंड व जर्मनीविरुद्ध.
दोन्ही उपान्त्य सामने २५ ऑगस्ट रोजी झाले. पहिल्या चुरशीच्या सामन्यात द नेदरलँडसने जर्मनीला ३-२ चकविले. मॅककॅन व शूबर्ट यांच्या प्रत्येकी दोन गोलांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने स्पेनला ६-३ नमवले. कांस्यपदकासाठीची जर्मनी व स्पेन ह्यांची लढत जादा वेळेत गेली. जर्मनीने ४-३ असा विजय मिळवित बारा वर्षांनंतर पदक जिंकले. दि. २७ ऑगस्टला झालेल्या अटीतटीच्या अंतिम लढतीने हॉकीला नवा विजेता मिळवून दिला. नियमित वेळेत १-१ अशी बरोबरी झाली. जादा वेळेत ऑस्ट्रेलियाच्या जेमी ड्वायर याने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत संघाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या पहिल्या सहा खेळाडूंमध्ये पदकविजेत्या संघांचे कोणीच नव्हते. पाकिस्तानच्या अब्बास सोहेल याने सर्वाधिक ११ गोल केले. दुसरा क्रमांक लागला दक्षिण कोरियाच्या ली जुंग-सिऑन ह्याचा (१०). भारताकडून सर्वाधिक सात गोल गगन अजितसिंगने केले.
महिला
स्पर्धा खेळविण्याच्या पद्धतीत पुन्हा एकदा बदल करण्यात आला. सहभागी १० संघांची दोन गटांमध्ये विभागणी करून साखळी पद्धतीने सामने झाले. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ पदकांच्या लढतीसाठी पात्र ठरले. ‘अ’ गटामध्ये चीन व अर्जेंटिना यांनी पहिले दोन क्रमांक मिळवून बाद फेरी गाठली. त्यानंतर जपान, न्यूझीलंड व स्पेन यांचा क्रमांक लागला. चीन चारही सामने सहज जिंकले. अर्जेंटिनाचा तेवढाच एक पराभव साखळीत झाला. मात्र अर्जेंटिनाने चीनला २-३ अशी कडवी लढत दिली. स्पेनचा सर्व सामन्यांमध्ये पराभव झाला.
द नेदरलँड्स, जर्मनी, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका अशी ‘ब’ गटातील क्रमवारी राहिली. नेदरलँड्सने सर्व सामने जिंकताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोलांचा षट्कार चढविला. दक्षिण आफ्रिकेने साखळीतील पाचपैकी दोन गोल याच सामन्यात केले. गोलफरक उणे असूनही जर्मनीने बाद फेरी गाठली, ती दोन विजयांमुळे. दक्षिण आफ्रिकेने एकमेव विजय मिळविला तो जर्मनीविरुद्ध आणि ३-० असा एकतर्फी! एक-एक सामना जिंकणाऱ्या दक्षिण कोरिया व ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत बरोबरीत (२-२) सुटली. उपान्त्य फेरीचे सामने २४ ऑगस्टला झाले. दोन्ही सामने अतिशय चुरशीचे होऊन निकालासाठी पेनल्टी स्ट्रोकचा आधार घ्यावा लागला. अर्जेंटिना व नेदरलँड्स यांच्यातील लढतीत गोलफलक जादा वेळेनंतर २-२ असा राहिला. पेनल्टी स्ट्रोक्समध्ये नेदरलँड्सने ४-२ अशी बाजी मारली. चीन-जर्मनी सामन्यात जादा वेळ देऊनही गोलफलक कोरा राहिला. ही चुरस पेनल्टी स्ट्रोकच्या खेळीतही कायम राहिली आणि अखेर ४-३ अशा निसटत्या विजयाने जर्मनीने अंतिम फेरी गाठली. कांस्यपदकाच्या लढतीत लुसियानाने अखेरच्या मिनिटात केलेल्या फिल्ड गोलमुळे अर्जेंटिनाने चीनला हरविले.
दि. २६ ऑगस्टला झालेला अंतिम सामना चुरशीने खेळला गेला. त्यात जर्मनीने नेदरलँड्सवर २-१ मात करून पहिले सुवर्ण पटकाविले.
.........
(संदर्भ - olympics.com, sportskeeda.com आणि विकिपीडिया, भारतीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, भारतीय हॉकी ह्यांची संकेतस्थळे.)
........
आधीचे भाग इथे वाचा
https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey1.html
https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey2.html
https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey3.html
https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey4.html
https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey5.html
https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey6.html
https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey7.html
----------------------
#भारतआणिऑलिंपिक #हॉकीचे_सुवर्णयुग #OlympicsHockey #IndiaInOlympics
#Olympics #India #hockey #TokyoOlympics #GoldMedal #MensHockey #atlanata96
#sydney2000 #athens2004 #TotalHockey #CedricDSouza #DhanrajPillay
खुपच छान लेख!!
उत्तर द्याहटवा💐💐👍👍