सोमवार, ५ जुलै, २०२१

सुवर्ण पदार्पण

ऑलिंपिक, भारत आणि हॉकी - 

आधुनिक ऑलिंपिकचा अध्याय (ज्याचा उल्लेख जागतिक पटलावर नेहमीच Modern Olympics असा होतो) सुरू झाला, त्याचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष. अथेन्समध्ये (ग्रीस) ६ ते १५ एप्रिल १८९६ असे दहा दिवस झालेल्या पहिल्या ऑलिंपिक खेळाची व्याप्ती किती मोठी होती? आता मजा वाटते वाचताना, जागतिक पातळीवर क्रीडा क्षेत्रात एका नव्या अध्यायाची सुरुवात करणाऱ्या ह्या स्पर्धेत डझनभर देशांतून २०८ खेळाडू सहभागी झाले होते. ह्याच आकड्यांनी सव्वाशे वर्षांत किती मोठा टप्पा गाठला आहे. टोकियो निप्पॉन महोत्सवात २०६ देशांच्या १२ हजार खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. अर्थात कोविड-१९ महामारीमुळे ही संख्या घटेलही कदाचित.

पहिल्या ऑलिंपिकमध्ये एकूण ४३ क्रीडाप्रकार होते. त्यात हॉकीसह अन्य कोणताच सांघिक खेळ नव्हता. ह्या जागतिक क्रीडा महोत्सवात येण्यास हॉकीला साधारण एक तप वाट पाहावी लागली. नंतरच्या वाटचालीतही काही अडथळे आलेच.

लंडन (इंग्लंड), १९०८

ऑलिंपिकच्या चौथ्या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या फिल्ड हॉकीचा (आता इथून पुढे आपण त्याला फक्त ‘हॉकी’च म्हणू.) पहिल्यांदा समावेश झाला. लंडन (इंग्लंड) येथे २७ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर १९०८ असा दीर्घ काळ हे ऑलिंपिक झाले. हॉकीमध्ये यजमान इंग्लंड, आयर्लंड, वेल्स, स्कॉटलंड, जर्मनी आणि फ्रान्स हे सहा संघ सहभागी झाले होते. स्पर्धा बाद पद्धतीने खेळविली गेली व सहा सामने झाले. यजमानांनी सुवर्णपदक, आयर्लंडने रौप्य आणि वेल्स व स्कॉटलंड ह्या संघांनी कांस्यपदक जिंकले. (आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या संकेतस्थळावर ही सर्व पदके आता ग्रेट ब्रिटनच्या नावावर दिसतात.) जर्मनी पाचव्या आणि फ्रान्स सहाव्या क्रमांकावर राहिले. आयर्लंड व वेल्स संघांना थेट उपान्त्य फेरीत प्रवेश मिळाला.

सुवर्णपदक जिंकणाऱ्या इंग्लंडने सलामीच्या लढतील फ्रान्सचा १०-१ आणि अंतिम लढतीत आयर्लंडचा ८-१ असा पराभव केला. पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून रेगी प्रिडमोर व स्टॅन्ली शॉव्हेलर यांनी प्रत्येकी तीन गोल करीत ऑलिंपिकमधील पहिल्या दोन हॅटट्रिकची नोंद केली.

लढती अशा झाल्या –

२९ ऑक्टोबर : इंग्लंड विजयी विरुद्ध फ्रान्स १०-१.

स्कॉटलंड वि. वि. जर्मनी ४-०

उपान्त्य सामने - 

३० ऑक्टोबर : इंग्लंड वि. वि. स्कॉटलंड ६-१

आयर्लंड वि. वि. वेल्स ३-१

अंतिम सामना - ३१ ऑक्टोबर : इंग्लंड वि. वि. आयर्लंड ८-१

पाचवा आणि सहावा क्रमांक ठरविण्यासाठी झालेल्या लढतीत जर्मनीने फ्रान्सवर १-० फरकाने विजय मिळविला.

जेत्या इंग्लंडने तीन सामन्यांत २४ गोल केले. प्रिडमोरने दोन हॅटट्रिक नोंदवित एकूण १० गोलांची नोंद केली. त्याला शॉव्हेलर (७) व गेराल्ड लोगन (५) ह्यांची चांगली साथ मिळाली. फ्रान्स व जर्मनी ह्या संघांनी केलेले एकमेव गोल अनुक्रमे लुई पुपॉन आणि फ्रित्झ यांची कमाई होती. एकच सामना खेळून त्यात पराभव पत्करणारा वेल्स संघ विनासायास कांस्यपदकाचा मानकरी झाला.

पदार्पण झाल्यानंतरही हॉकीचा प्रवास सुकर नव्हता. पुढचं ऑलिंपिक स्वीडनच्या राजधानीत, स्टॉकहोम येथे ५ मे ते २७ जुलै १९१२ ह्या काळात पार पडलं. तिथली कवाडं हॉकीसाठी बंदच राहिली. त्यानंतरच्या म्हणजे सहाव्या आधुनिक ऑलिंपिकचं (१९१६) यजमानपद जर्मनीला मिळालं होतं. तथापि पहिल्या महायुद्धामुळं ह्या ऑलिंपिकची नोंद इतिहासात ‘रद्द’ अशीच  झाली.

अँटवर्प (बेल्जियम), १९

महायुद्ध लादलं गेल्यामुळं बेल्जियमच्या जनतेला जे काही सोसावं लागलं, त्यावर हळुवार फुंकर मारायची अशा उदात्त हेतूनं सातव्या ऑलिंपिकचं यजमानपद ह्या देशाला मोठ्या सन्मानपू्र्वक देण्यात आलं. अँटवर्प येथे २० एप्रिल ते १२ सप्टेंबर दरम्यान हे खेळ पार पडले. इथं हॉकीला पुन्हा एकदा संधी मिळाली.

ह्या स्पर्धेत हॉकीतील सहभागी संघांची संख्या घटून चारवर आली. त्यांच्यामध्ये १ ते ५ सप्टेंबर दरम्यान साखळी पद्धतीने एकूण सहा सामने खेळले गेले. जिंकणाऱ्या संघास तीन गुण व हरणाऱ्या संघास शून्य, अशी गुणरचना होती. इंग्लंड (ग्रेट ब्रिटन), डेन्मार्क, बेल्जियम व फ्रान्स हे संघ सहभागी झाले. ऑलिंपिक हॉकीमध्ये जिंकलेले पहिले सुवर्णपदक इंग्लंडने तिन्ही सामने जिंकून राखले. डेन्मार्कला रौप्य व यजमानांना कांस्यपदक मिळाले. फ्रान्सने इथेही शेवटचा क्रमांक सोडला नाही.

लढती अशा झाल्या –

१ सप्टेंबर : इंग्लंड विजयी विरुद्ध डेन्मार्क ५-१

बेल्जियम वि. वि. फ्रान्स ३-२

३ सप्टेंबर : इंग्लंड वि. वि. बेल्जियम १२-१

डेन्मार्क वि. वि. फ्रान्स ९-१

४ सप्टेंबर : फ्रान्सची इंग्लंडला पुढे चाल.

५ सप्टेंबर : डेन्मार्क वि. वि. बेल्जियम ५-२

इंग्लंडने दोन सामन्यांत १७ गोल केले व त्यांच्यावर फक्त दोन गोल झाले. रौप्यपदकविजेत्या डेन्मार्कने तीन लढतीत १५ गोलांची नोंद केली खरी; पण त्यांनी आठ गोल स्वीकारले. बेल्जियमने सहा व फ्रान्सने तीन गोलांची नोंद केली. पहिलं महायुद्ध नुकतंच संपलं होतं. त्यात युरोपातील सर्वच देश पोळून निघाले होते. त्यामुळे की काय, इथल्या स्पर्धा-शर्यतींची तपशीलवार माहिती मिळत नाही. ऑलिंपिक समितीच्या संकेतस्थळावर हॉकीसह बऱ्याच खेळांचे निकाल नाहीत. जागतिक हॉकी महासंघाच्या संकेतस्थळावरही सांख्यिकी माहिती उपलब्ध नाही.

रसिकांचं शहर आणि कलानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरिसची ओळख १९२४च्या ऑलिंपिकच्या निमित्ताने क्रीडानगरी अशीही झाली. पण याही ऑलिंपिकमध्ये हॉकी पुन्हा एकदा मैदानाबाहेरच राहिली.


पहिलं सुवर्णपदक जिंकणारा भारतीय संघ (छायाचित्र सौजन्य - olympics.com)

ॲमस्टरडॅम (द नेदरलँड्स), १९२८

समावेश, पुन्हा वगळणे, मग स्पर्धाच रद्द अशी अडथळ्यांची शर्यत हॉकीच्या नशिबी ऑलिंपिकमध्ये होती. ॲमस्टरडॅम ऑलिंपिकपासून (१७ मे ते १२ ऑगस्ट) ह्यात बदल झाला. आपल्या देशासाठीही ह्या ऑलिंपिकचं महत्त्व फार वेगळंच आहे. हॉकी आपला राष्ट्रीय खेळ आहे की नाही, ह्या मुद्द्यावर अलीकडे वाद होऊ लागला आहे. पण हॉकीनंच आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात नाव मिळवून दिलं, एवढं नक्की.

ॲमस्टरडॅमच्या स्पर्धेत भारतीय संघ पहिल्यांदा उतरला आणि पदार्पणातच सुवर्णपदक जिंकत वेगळ्या इतिहासाची पायाभरणी केली. ऑलिंपिक हॉकीमध्ये उतरलेला युरोपीय संघांव्यतिरिक्तचा अन्य खंडांतील पहिला देश म्हणजे भारत होय. गंमतीची एक भाग म्हणजे ऑलिंपिकची पहिली दोन सुवर्णपदकं जिंकणारा इंग्लंडचा संघ सहभागी झाला नव्हता. पहिल्यांदाच स्पर्धेत नऊ संघ सहभागी झाले. त्यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली. गटातील सामने साखळी पद्धतीचे व नंतर उपान्त्य, अंतिम फेरी अशी स्पर्धेची रचना करण्यात आली. कांस्यपदकासाठीही लढत झाली. हे सामने १७ ते २६ मे या काळात पार पडले.

भारतानं निवडलेल्या १६ खेळाडूंच्या संघात नऊ अँग्लो-इंडियन खेळाडू होते. जयपाल सिंग, इफ्तिखार अली खान पटौदी व एस. एम. युसूफ हे खेळाडू इंग्लंडमध्ये संघात सामील होणार, असं ठऱलं होतं. काय झालं कुणास ठाऊक, पण पटौदी संघाबाहेर पडला. तोच पुढे भारतीय क्रिकेट संघाकडून सहा कसोटी सामने खेळला आणि त्यातल्या तीन सामन्यांत त्यानं नेतृत्वही केलं. त्या ऑलिंपिकमध्ये तो खेळता, तर त्याच्या नावापुढे एक वेगळा विक्रम लिहिला गेला असता.

भारतीय संघाचं नेतृत्व जयपाल सिंग ह्याच्याकडं होतं, तर ब्रूम एरिक पिन्निगर उपकर्णधार होता. संघ असा - सय्यद एम. युसूफ, रिचर्ड जे. ॲलन, मायकेल ई. रोईक, लेस्ली सी. हॅमंड, रेक्स ए. नॉरिस, शौकत अली, जॉर्ज ई. मार्थिन्स, ध्यानचंद, फिरोद खान आणि फ्रेडरिक एस. सीमन.

‘अ’ गटात भारत, बेल्जियम, डेन्मार्क, स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया आणि ‘ब’ गटात द नेदरलँड्स, जर्मनी, फ्रान्स व स्पेन संघांचा समावेश होता. साखळीतील चारही सामने सहज जिंकत भारताने गटात अग्रस्थान मिळविलं. ह्या सामन्यांमध्ये तब्बल २६ गोल करताना भारतीय खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना तशी एकही संधी दिली नाही. बेल्जियमने तीन सामने जिंकून गटात दुसरा क्रमांक मिळविला. डेन्मार्कने दोन व स्वित्झर्लंडने एक सामना जिंकला. सर्व सामन्यांमध्ये पराभूत झालेला ऑस्ट्रियाचा संघ गटात आणि पूर्ण स्पर्धेतच तळाला राहिला.

गटसाखळीत भारताचा पहिला सामना १७ मे रोजी ऑस्ट्रियाशी झाला. त्यात भारताने ६-० असा विजय मिळविला. भारताकडून मेजर ध्यानचंदने ३ गोल केले. जॉर्ज मार्थिन्सने दोन व अली शौकतने एक गोल केला. दुसऱ्या लढतीत आपण बेल्जियमचा ९-० असा धुव्वा उडविला. फिरोज खानने पाच गोल चढविले. डेन्मार्कविरुद्धच्या ५-० अशा विजयात पुन्हा ध्यानचंदचा खेळ (तीन गोल) उठून दिसला. स्वित्झर्लंडला भारताने ६-० फरकाने खडे चारले, ते ध्यानचंदच्या गोल-चौकारामुळेच!

‘ब’ गटात द नेदरलँड्स संघाने पाच गुणांसह पहिलं स्थान मिळविलं. यजमानांनी जर्मनी व फ्रान्स संघांना सहज पराभूत केले. स्पेनविरुद्धची त्यांची लढत मात्र अनिर्णीत राहिली. ऑलिंपिक हॉकीतील हा पहिला अनिर्णीत सामना. ह्या गटात जर्मनीनं दुसरं स्थान मिळविलं. फ्रान्स तिसऱ्या व स्पेन चौथ्या क्रमांकावर राहिला.

दोन्ही गटांतील दुसऱ्या क्रमांकावरच्या संघांमध्ये कांस्यपदकासाठी २६ मे रोजी लढत झाली. त्यात जर्मनीने बेल्जियमचा ३-० पराभव केला. गटांमध्ये अव्वल स्थान मिळविणाऱ्या संघांमध्ये अंतिम लढत झाली. त्यात भारताने द नेदरलँड्सवर ३-० फरकाने सहज विजय मिळवित पहिल्या सुवर्णपदकाची नोंद केली.


जादूगार...


‘जादूगार’ असे नामाभिधान मिळालेल्या ध्यानचंदने स्पर्धेत सर्वाधिक म्हणजे १४ गोल केले. देशाची इभ्रत राखायची म्हणून हा महान खेळाडू अंगात ताप असतानाही अंतिम सामन्यात पूर्ण तडफेनं खेळला. फिरोज खान व जॉर्ज मार्थिन्स यांनी प्रत्येकी पाच गोल नोंदविले. जर्मनीच्या थिओडोर हाग याच्याही खात्यावर पाच गोल होते. भारताचा ठसा उमटलेले हे पहिले ऑलिंपिक होय. स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जागतिक हॉकी महासंघाने एक देश – एक संघ आणि प्रत्येक संघ २२ खेळाडूंचा असा नियम घालून दिला. हौशी व व्यावसायिक खेळाडूची व्याख्याही महासंघाने या ऑलिंपिकच्या निमित्त स्पष्ट केली.

--------------

(संदर्भ व स्रोत - britannica.com, olympics.com आणि विकिपीडिया, भारतीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, भारतीय हॉकी ह्यांची संकेतस्थळे.)

............

पहिला भाग वाचण्यासाठी

https://khidaki.blogspot.com/2021/07/.html


#Olympics #India #hockey #IndiainOlympics #TokyoOlympics #GoldMedal #Tokyo #MensHockey #MajorDhyanChand #sports #NipponFestival #covid19 #worldwar

#ध्यानचंद_स्पर्धेत_सर्वाधिक_गोल


५ टिप्पण्या:

  1. ऑलिंपिक, भारत आणि हॉकी.
    अतिशय माहितीपूर्ण लेखन, Hocky cha इतिहास डोळ्यासमोर आला.

    उत्तर द्याहटवा
  2. फोटोमध्ये ध्यानचंदच्या पायात बूट आहेत. आता आतापर्यंत बरेचसे भारतीय खेळाडू अनवाणी पायांनीच खेळत असत.

    उत्तर द्याहटवा
  3. अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन. धन्यवाद.
    मंगेश नाबर

    उत्तर द्याहटवा
  4. अत्यंत उपयुक्त माहितीपूर्ण लेखमाला.आपले शब्दाचं सामर्थ्य, मांडणी यामुळे खिडकी नेहमीच वाचनीय असते.
    लेखमाला वाचतानां नकळतं आपणचं खेळाडू आहोत असे वाटतें.

    श्रीराम वांढरे.
    भिंगार, अहमदनगर.

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...