Saturday 31 July 2021

पदकांच्या दिशेने काही पावले


टोकियो ऑलिंपिकचे यजमान असलेल्या जपानचा शुक्रवारी भारतीय हॉकी संघानं
दणदणीत पराभव केला. गोल केल्यानंतर गुजरंतसिंग ह्याने (उजवीकडे)
सहकाऱ्यांसोबत जल्लोष केला. (छायाचित्र सौजन्य - 'द हिंदू'/ए.पी.)

टोकियो ऑलिंपिकमध्ये पहिल्या दिवसाच्या रुपेरी यशानंतर आपल्या पदरी काहीच पडलेलं नाही. असं असलं तरी शुक्रवारची (दि. ३० जुलै) वाटचाल मात्र काही पदकांच्या दिशेने झाली, एवढं नक्की. त्याचं श्रेय प्रामुख्यानं सिंधू, मुष्टियोद्धा लवलिन आणि पुरुषांचा हॉकी संघ ह्यांना जातं. बाकी ॲथलेटिक्समध्ये आपली कामगिरी सुमार झाली. मराठमोठ्या अविनाश साबळेनं टोकियोत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली, हेही लक्षणीय.

मनप्रीतसिंगच्या संघानं गटातील शेवटच्या सामन्यात यजमान जपानला ५-३ अशी मात दिली आणि दुसरं स्थान, उपान्त्यपूर्व फेरी पक्की केली. ह्या सामन्यात पूर्वार्धातील पहिल्या भागात सहाव्या मिनिटाला विवेकसागर प्रसादचा फटका गोलरक्षक योशी का वा तकाशी ह्यानं अडवला. बाराव्या मिनिटाला सामन्यातला पहिला पेनल्टी कॉर्नर भारताला मिळाला आणि ती संधी साधली हरमनप्रीत सिंगने. त्यानंतर लगेचच सिमरनजित सिंगने दोन वेळा आक्रमण केलं. त्याचा पहिला फटका गोलरक्षक तकाशी ह्यानं आणि दुसरा बचाव फळीतील खेळाडूनं अडवला. आपल्या एकमेव गोलच्या आघाडीवर पहिला चतकोर संपला.

पूर्वार्धातील उत्तरार्धाची सुरुवातच जोरदार झाली. सिमरनजित सिंग सतराव्या मिनिटाला मोठ्या तडफेने गोलजाळ्याकडे चेंडू घेऊन गेला. त्याचा फटका अडवल्याचं समाधान गोलरक्षकाला क्षणभरही लाभलं नाही. कारण गुजरंतसिंगने तीच संधी साधत आलेला चेंडू जाळ्यात ढकलून दुसरा गोल नोंदविला. मग जपानी खेळाडूही सरसावले. त्यांनी आक्रमक चाल रचत एकोणिसाव्या मिनिटाला आघाडी एकाने कमी केली. केंता तनाका ह्यानं हा फिल्ड गोल केला. त्यानंतर भारतीय आक्रमण थोडं ढिलं पडलं. मध्यंतरासाठी खेळ थांबायला मिनिटभर बाकी असताना हार्दिक सिंग ह्यानं दोन वेळा प्रयत्न केला खरा; त्याचे दोन्ही फटके बचाव फळीनं व्यवस्थित अडवले. सेरेन तनाका ह्यानं अखेरच्या मिनिटाला रचलेली चाल फोन ठरली. श्रीजेशचा बचाव भक्कम ठरला.

सामन्याच्या उत्तरार्धाची सुरुवातच मोठी जोरदार झाली. बत्तिसाव्या मिनिटाला सेरेन तनाका ह्याची धडपड व्यर्थ ठरली. पण पुढच्या मिनिटालाच वता नाबे कोता ह्याने गोलजाळ्यापर्यंत धडक मारत जपानला बरोबरी साधून दिली. पुढची चाल भारताची होती. चौतिसाव्या मिनिटाला शमशेरसिंगचा जोरदार फटका थेट जाळ्यात गेला आणि संघ पुन्हा आघाडीवर गेला. सुमितचा असाच एक प्रयत्न गोलरक्षक तकाशीनं वाचवला. त्यानंतर दोन्ही संघ जोरदार प्रयत्न करीत राहिले. त्रेचाळिसाव्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर हरमनप्रीत सिंगला गोलात रूपांतरित करता आला नाही. शेवटची पंधरा मिनिटं राहिली तेव्हा आपला संघ ३-२ अशा निसटत्या आघाडीवर होता.

सामन्याचा शेवटचा चतकोर मात्र भारताचा ठरला. नीलकांत शर्मा ह्यानं एकावन्नाव्या मिनिटाला गोल केला. पाच मिनिटांनंतर गजंतरसिंग पुढे आला. पेनल्टी कॉर्नरची संधी त्याने साधली. अखेरचा मिनिट बाकी असताना काझुमा मुराता ह्यानं गोल करून आघाडी एकानं कमी केली. तांत्रिक गोष्टींच्या आधारे पाहिलं, तरी सामन्यावर भारताचंच वर्चस्व दिसून येतं. गोलवर आपले एकूण हल्ले १७ आणि जपानचे ११. जपानचे तिन्ही फिल्ड गोल आहेत. त्यांना केवळ एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. आपण चारपैकी दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल केले आणि बाकी तीन फिल्ड गोल होते. सामन्यातील ६९ टक्के वेळ चेंडूचा ताबा आपल्याकडं होता. आणखी एक गोष्ट; भरपूर गोल होऊनही खेळ धसमुसळा झाला नाही, असं दिसतं. कारण पूर्ण सामन्यात पंचांना एकही कार्ड दाखवावं लागलं नाही.

ह्या विजयामुळे दोन गोष्टी झाल्या - भारतानं आजच्या विजयानं गोलफरक 'धन' केला. कालपर्यंत तो शून्य होता. गटातील दुसरं स्थान निर्विवादपणे नक्की झालं.


पी. व्ही. सिंधू...पदकाकडे (छायाचित्र सौजन्य - NDTV/GETTY)

बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू हिनं दोन गेममध्ये सामना संपविण्याचा आपला तडाखा चालूच ठेवला. उपान्त्यपूर्व फेरीत आज तिनं जपानच्या अकाने यामागुची हिचा ५६ मिनिटे चाललेल्या लढतीत २१-१३, २२-२० असा पराभव केला. सिंधूनं दोन्ही गेममध्ये दोन दोन वेळा जोरदार पुनरागमन केलं. सर्व्हिसच्या बाबतीत ती प्रतिस्पर्ध्यांहून फार सरस ठरली. उपान्त्य सामन्यात तिच्यासमोर असेल तैवानची ताई सु यिंग.


लवलिना बोरगोहेन (छायाचित्र सौजन्य NDTV/AFP)

लवलिना बोरगोहेन हिनं वेल्टरवेट गटात चायनीज तैपेईच्या चेन निएन-चीन ४-१ पराभव करून उपान्त्य फेरी गाठली. लवलिनाची उपान्त्य लढत थेट ४ ऑगस्ट रोजी तुर्कस्तान (हल्लीचे तुर्की) बसेनाई सरमेनेली हिच्याशी होईल. लाईटवेट गटात सिमरनजित कौर मात्र कुठलाही प्रतिकार न करताच बाहेर पडली. मुष्टियुद्धात उद्या (शनिवारी) आपल्या तीन लढती होतील. फ्लायवेट गटात अमित कोलंबियाच्या स्पर्धकाशी लढेल. मिडलवेट गटात पूजा रानीच्या समोर चीनची ली कुयान असेल. सुपरहेवी गटामध्ये सतीशकुमारची गाठ उझबेकिस्तानच्या बखोदीर जलोलोव्ह ह्याच्याशी पडेल.

हॉकीमध्ये महिलांनी आज पहिला विजय मिळवला. नवनीत कौरने सतावन्नाव्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे आपण अर्जेंटिनाला हरवलं. ह्या विजयामुळे उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची किंचित आशा दिसत आहे. आता आपला एकच सामना बाकी आहे.

धनुर्विद्येमध्ये दीपिकाकुमारी उपान्त्यपूर्व सामन्यात दक्षिण कोरियाच्या ॲन सॅन हिच्याकडून सहज पराभूत झाली. महिलांच्या २५ मीटर पिस्तूलमध्ये मनू भाकर पंधराव्या आणि राही सरनोबत बत्तिसाव्या क्रमांकावर राहिली.

तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये ज्याच्याकडून अपेक्षा बाळगल्या जात होत्या, तो अविनाश साबळे दुसऱ्या गटात सातवा आला. त्यानं ८:१८.१२ मिनिटांची वेळ नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदवला. आधीचा विक्रम त्याचाच (८:२०.२०) होता. पण अंतिम फेरी हुकलीच त्याची. कारण प्रत्येक हीटमधून पहिल्या तीन खेळाडूंची अंतिम शर्यतीसाठी निवड झाली. महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीच्या प्राथमिक फेरीतच द्युती चंद बाद झाली. पाचव्या हीटमध्ये आठ धावपटूंमध्ये ती सातव्या क्रमांकावर राहिली.

मिश्र रीलेमध्ये (४x४०० मीटर) महंमद याह्या, रेवती वीरमणी, शुभा व्यंकटेशन व राजीव अरोकिया ह्यांचा भारतीय चमू आठव्या क्रमांकावर राहिला. त्यांनी दिलेली ३:१९.९३ मिनिटांची वेळ हंगामातील सर्वोत्तम होती. पुरुषांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतील जबीर मदारी ह्याने निराशाच केली. पाचव्या हीटमध्ये असलेला जबीर तळाला, म्हणजे सातवा राहिला. प्रत्येक हीटमधील पहिले चार खेळाडू उपान्त्य फेरीसाठी पात्र ठरले.

अशा रीतीने आजचा दिवस उद्याच्या आशा वाढवणारा ठरला!

.....

#Olympics #IndiainOlympics #IndvsJapan #Hockey #PVSindhu #Lovlina #Boxing #Hockey #Badminton #Medals #Tokyo2020

No comments:

Post a Comment

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...