Sunday, 18 July 2021

वर्चस्वाला सुरुंग

ऑलिंपिक, भारत आणि हॉकी - 


उपान्त्य सामन्यात पराभव. पाकिस्तानी आक्रमकाचा फटका अडविण्यात भारतीय बचावफळीला
अपयश. समाधान कांस्यपदकावर. (छायाचित्र सौजन्य scroll.in)

म्यूनिच, माँट्रिअल आणि मॉस्को... हे प्रत्येक ऑलिंपिक भारतीय हॉकीला, तिच्या चाहत्यांना वेगळाच अनुभव देऊन गेले. अंतिम फेरी हुकण्याचा अनुभव मेक्सिको सिटीप्रमाणं म्यूनिचनंही दिला. पण तिथंही किमान कांस्यपदक तरी मिळालं, ह्याचं समाधान होतं. पण तेही माँट्रिअलमध्ये हिरावलं गेलं. एकच वर्ष आधी विश्वचषक जिंकणारा हा संघ साखळीतच गारद झाला. मॉस्कोमध्ये भारतानं आठवं सुवर्ण जिंकलं खरं; पण ते यश म्हणावं तेवढं चोख नव्हतं. जगातले बहुतेक बलाढ्य देश स्पर्धेत सहभागी नसतानाही भारताला सर्व सामने जिंकता आले नाहीत. तथापि भळभळत्या जखमेवर त्या सुवर्णपदकाची तात्पुरती मलमपट्टी झाली, एवढं मात्र खरं.

म्यूनिच (१९७२)

पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी ‘ऑलिंपिक व्हिलेज’वर केलेल्या भीषण हल्ल्याने या ऑलिंपिकची इतिहासात वेगळीच नोंद झाली. अगदी तशीच नकोशी नोंद हॉकीतील अंतिम सामन्यानंतर झाली. अंतिम सामन्यात यजमान पश्चिम जर्मनीकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू, संघाचे पदाधिकारी व पाठीराखे यांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. सामना संपल्याची शिटी वाजताच हे सारे मैदानात धावले. खेळाडूंनी रौप्यपदक गळ्यात घालण्यासही नकार देत ती फेकून दिली. पश्चिम जर्मनीच्या ह्या विजयाने तब्बल ५२ वर्षांनंतर सुवर्णपदक युरोप खंडात आले. पूर्व जर्मनीचा संघ स्पर्धेत नव्हता. आशियाई वर्चस्वाला धक्का मिळण्यास याच स्पर्धेने सुरुवात झाली. भारताच्या दृष्टीने पाहायचे झाले, तर सलग दुसऱ्या स्पर्धेत आपण अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरलो. त्याच बरोबर ऑलिंपिकमधील दुसरे कांस्यपदक आपल्या वाट्याला आले.

एकूण १६ संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली. गटवार साखळी आणि नंतर बाद सामने असे स्वरूप कायम राहिले. भारताचा समावेश असलेल्या ‘ब’ गटात हॉलंड (द नेदरलँड्स), इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पोलंड, केनिया व मेक्सिको संघ होते. भारत व नेदरलँड्स यांनी सारखेच म्हणजे पाच सामने जिंकले. तथापि एका पराभवामुळे नेदरलँड्सचा एक गुण कमी झाला आणि गटात दुसरा क्रमांक राहिला.

गटामध्ये अव्वल स्थान मिळविलेल्या भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. नेदरलँड्सविरुद्धची सलामीची लढत बरोबरीत (१-१) सुटली. हा एकमेव गोल होता अशोककुमारचा. मेजर ध्यानचंद ह्यांचा हा सुपुत्र. त्यानंतरच्या दोन सामन्यांत मात्र भारताला चांगला सूर सापडला. मुखबैनसिंगचे तीन गोल, मायकेल किंडो व कर्णधार हरमिकसिंग (प्रत्येकी एक गोल) ह्यांच्या जोरदार खेळामुळे इंग्लंडविरुद्ध ५-० असा दणदणीत विजय मिळाला. त्यानंतर गाठ पडली ऑस्ट्रेलियाशी. तिथे पुन्हा चमकला मुखबैनसिंग. त्याच्या हॅटट्रिकमुळे आपण ३-१ गोलफरकाने जिंकलो. मेक्सिको सिटी स्पर्धेतील पराभवाचा जणू बदलाच होता हा.

सलग दोन विजयांनंतर संघ काहीसा ढेपाळला आणि पुन्हा एक बरोबरी झाली. पोलंडने पिछाडीवरून भारताला २-२ असे अडविले. हरमिकसिंग व पी. बी. गोविंदा ह्यांनी प्रत्येकी एक गोल केला. पुढचा सामनाही अटीतटीचाच झाला. चांगली झुंज देणाऱ्या केनियाला ३-२ हरविण्यात आपल्याला यश आले. मुखबैनने पुन्हा दोन गोल केले. हरमिकने एक गोल करून त्याला साथ दिली. त्यानंतरच्या सामन्यात भारताने प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली. कुलवंतसिंग (३), अशोककुमार (२), हरमिक, किंडो व गोविंदा (प्रत्येकी १) ह्यांना सूर सापडल्याने मेक्सिकोविरुद्ध दणदणीत विजय (८-०) मिळाला. गटातील अखेरचा सामना होता न्यूझीलंडशी. त्यातही विजयासाठी झगडावे लागले. कुलवंतसिंग, एम. पी. गणेश व किंडो ह्यांनी प्रत्येकी एक गोल केला. ह्या सामन्यात ३-२ विजय मिळवून भारताने गटात पहिला क्रमांक मिळविला.

मेक्सिको सिटी ऑलिंपिकच्या तुलनेत चांगली कामगिरी करूनही इंग्लंडला पदकांच्या शर्यतीत स्थान मिळाले नाही. गत रौप्यपदकविजेत्या ऑस्ट्रेलियाला सूर गवसला नाही. तीन विजय, प्रत्येकी दोन पराभव व बरोबरी यामुळे त्यांचे गटात चौथे स्थान राहिले. मेक्सिकोची पाटी कोरीच राहिली. संघाला पूर्ण स्पर्धेत अवघा एक गोल करता आला.

‘अ’ गटात यजमानांसह पाकिस्तान, मलेशिया, स्पेन, बेल्जियम, फ्रान्स, अर्जेंटिना आणि युगांडा संघ होते. पश्चिम जर्मनीची वाटचाल यजमानांना साजेशी दिमाखदार झाली. संघाने सातपैकी सहा सामने जिंकले व एक बरोबरीत सुटला. त्यांनी बेल्जियम (५-१), मलेशिया (१-०), अर्जेंटिना (२-१), पाकिस्तान (२-१), स्पेन (२-१) आणि फ्रान्स (४-०) असे विजय मिळवले. युगांडाने आश्चर्याचा धक्का देत त्यांच्याबरोबरचा सामना १-१ बरोबरीत सोडवला. गटात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पाकिस्तानला एका पराभवाची चव चाखावी लागली आणि एक सामना बरोबरीत सुटला. मलेशिया व फ्रान्स संघांवर पाकिस्तानने प्रत्येकी ३-०, तर युगांडा, अर्जेंटिना व बेल्जियम यांच्याविरुद्ध प्रत्येकी ३-१ गोलने विजय मिळवला. स्पेनबरोबरची लढत बरोबरीत सुटली. ह्या गटातील सात सामने बरोबरीत सुटले. त्यात सर्वाधिक चार सामने स्पेनचे होते. फक्त फ्रान्सच्या सर्व लढती निकाली झाल्या.

दोन्ही उपान्त्य सामने ८ सप्टेंबर रोजी झाले. पश्चिम जर्मनीने नेदरलँड्सचा ३-० असा सहज पराभव केला. पारंपरिक प्रतिस्पर्ध्याशी पहिल्यांदा उपान्त्य लढत खेळताना भारताला सूर सापडलाच नाही. पाकिस्तानने ही लढत २-० फरकाने जिंकली. कांस्यपदकासाठी १० सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात भारताने द नेदरलँड्सचा २-१ पराभव केला. गोविंदा व मुखबैन ह्यांनी प्रत्येकी एक गोल केला.

अंतिम सामना गाजला तो वेगळ्याच अर्थाने. मिकेल क्राऊज याने साठाव्या मिनिटाला केलेला गोल सामन्यातला एकमेव होता. त्याच जोरावर पश्चिम जर्मनीने हॉकीतले पहिले सुवर्ण जिंकले. पण पाकिस्तानी संघाला हा पराभव पचविता आला नाही. त्यांचे खेळाडू, अधिकारी ह्यांनी गोंधळ घातला.

भारताने इथे तुलनेने तरुण, नवोदितांचा संघ उतरविला. मेक्सिको सिटी ऑलिंपकमध्ये खेळलेले फक्त चौघेच संघात होते. हॉकीचे सुपर स्टार बनलेल्या अशोककुमार, गोविंदा, मायकेल किंडो ह्यांचे पदार्पण ह्याच ऑलिंपिकमध्ये झाले. किंडो हा देशाकडून खेळणारा पहिला आदिवासी हॉकीपटू. पुढे ऑलिंपिकमध्ये टेनिसचे पहिले कांस्यपदक जिंकून देणाऱ्या लिएंडर पेसचे वडील व्हेस पेस ह्यांचा संघात समावेश होता. भारताने पूर्ण स्पर्धेत केलेल्या गोलांमधील एक तृतीयांश, म्हणजे नऊ गोलांचा वाटा एकट्या मुखबैनचा होता.

माँट्रिअल (१९७६)

बहिष्काराच्या अस्त्राला याच ऑलिंपिकपासून सुरुवात झाली आणि त्यात पुढची तीन ऑलिंपिक झाकोळून गेली. वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून टांझानियासह २२ आफ्रिकी देशांनी बहिष्कार टाकला. नादिया कोमनेची नावाचा जिम्नॅस्टिक्समधील तारा इथेच उदयास आला. हॉकी स्पर्धेतील सहभागी संघाची संख्या पाचने कमी झाली. इंग्लंडचा संघही नव्हता. कृत्रिम हिरवळीवर खेळवली गेलेली ही पहिलीच स्पर्धा. आदल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत विजेता ठरलेल्या भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. तथापि पदरी निराशाच पडली. ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदाच भारत गटसाखळीत गारद झाला. एकही आशियाई संघ नसलेली अंतिम लढत तब्बल ४८ वर्षांनी झाली.

अकरा संघांचे दोन गट, गटात साखळी सामने व त्यातील पहिले दोन संघ उपान्त्य फेरीत हा आराखडा कायम राहिला. ‘अ’ गटात द नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, भारत, मलेशिया, कॅनडा व अर्जेंटिना संघ होते. नेदरलँड्सने पाचही सामने जिंकून उपान्त्य फेरीत प्रवेश निश्चित केला.

एक वर्षच आधी कुआलालम्पूर येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या अजितपाल सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. संघाने अर्जेंटिनाला ४-० असे लीलया हरवून मोहिमेची सुरुवात चांगली केली. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला कर्णधार अजितपालने गोल केला. चांदसिंग व सुरजितसिंग ह्यांनी भारताची आघाडी वाढविली. कर्णधाराने सहासष्टाव्या मिनिटाला आणखी एक गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केलं. पण पुढच्याच सामन्यात धक्का बसायचा होता. द नेदरलँड्सने भारताला ३-१ असं चकित केलं. आपल्याकडून एकमेव गोल व्हिक्टर जॉन फिलिप्सनं केला.

हा पराभव कमी वाटावा असा निकाल त्यानंतरच्या लढतीचा लागला. ऑस्ट्रेलियाने ६-१ असा दणदणीत पराभव केला. ऑलिंपिकमधला हा भारताचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा पराभव होय! कांगारूंकडून रोनाल्ड विल्यम रीलेने धडाका लावत तीन गोल केले. सुरजितसिंगने एकविसाव्या मिनिटाला केलेला गोल एवढाच काय तो दिलासा. त्यानंतर कॅनडा व मलेशिया ह्यांच्याविरुद्धचे सामने भारताने ३-० याच गोलफरकाने जिंकले. कॅनडाविरुद्ध फिलिप्सनं दोन व अजितपालनं एक गोल केला. अशोककुमार (दोन) व सुरजितसिंग (एक) मलेशियाविरुद्धच्या विजयाचे मानकरी.

ह्या गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ निवडण्यासाठी टाय ब्रेकरचा अवलंब करावा लागला. भारत व ऑस्ट्रेलिया ह्यांचे समान गुण होते. गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ निवडण्यासाठी त्यांच्यात जादा सामना खेळविण्यात आला. त्यात चार्ल्सवर्थने तेहतिसाव्या मिनिटाला गोल करून ऑस्ट्रेलियाला आघाडी दिली. पण त्यानंतर मिनिटभरातच सुरजितसिंगने बरोबरी साधला. अखेर त्याच गोलफलकावर सामना १-१ असा बरोबरीत सुटला. निर्णय तर होणे आवश्यक होते. त्यामुळे पेनल्टी स्ट्रोकचा आधार घेण्यात आला. त्यात ऑस्ट्रेलियाने ५-४ अशी बाजी मारली. चौथा पेनल्टी स्ट्रोक घेणारा अजितसिंग अपयशी ठरला आणि पहिल्यांदाच भारताला पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागलं. भारताच्या गोलफरकामध्येही लक्षणीय फरक झाला. केलेले गोल व स्वीकारलेले गोल यातील अंतर तीनवर (१२-९) आले. मलेशियाने दोन, तर कॅनडा व अर्जेंटिना यांनी प्रत्येकी एक सामना जिंकला. गटात तळाला राहिलेल्या अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते.

‘ब’ गटामध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, स्पेन, पश्चिम जर्मनी व बेल्जियम संघ होते. गटात पहिल्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानलाही स्पेनविरुद्ध बरोबरी (२-२) स्वीकारावी लागली. त्यांनी बेल्जियम (५-०), पश्चिम जर्मनी (४-२) आणि न्यूझीलंड (५-२) ह्यांना सहज हरविलं. या गटातही दुसऱ्या क्रमांकासाठी टाय निर्माण झाला. त्यामुळे खेळविल्या गेलेल्या जादा सामन्यात न्यूझीलंडने स्पेनला १-० हरविलं आणि उपान्त्य लढतीत जागा मिळविली. ह्या दोन्ही संघांमधील गटसाखळीचा सामना बरोबरीत सुटला होता. गटातील तीन सामने बरोबरीत सुटले. म्यूनिचमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या पश्चिम जर्मनीची कामगिरी सुमार झाली व संघाला गटात चौथे स्थान मिळाले.

पहिल्या उपान्त्य सामन्यात जादा वेळेत न्यूझीलंडने द नेदरलँड्सला २-१ असे हरवून पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियानेही पाकिस्तानला ह्याच गोलफरकाने हरविले आणि ऑलिंपिक हॉकीचा अंतिम सामना पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया खंडातील दोन देशांमध्ये झाला. दि. ३० जुलैला झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला १-० हरवून पहिलं सुवर्णपदक जिंकलम. कांस्यपदकाच्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सला ३-२ हरविलं. पश्चिम जर्मनीविरुद्धचा सामना २-३ असा गमावल्यावर भारताला सातव्या-आठव्या क्रमांकाच्या लढतीत खेळणं भाग पडलं. मलेशियाला २-० हरवून भारताने कसंबसं सातवं स्थान मिळविलं.

माँट्रिअलमधील भारताची कामगिरी धक्कादायक होती. त्याचे पडसाद पुढं दीर्घ काळ उमटत राहिले. कृत्रिम हिरवळीच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव सोडाच; भारतीय संघातल्या बऱ्याच खेळाडूंनी ते पाहिलंही नव्हतं. त्यातच संघात वाद होऊन दोन गट पडले. ह्या साऱ्याच्या परिणामी विश्वविजेत्यांची सातव्या क्रमांकावर घसरण झाली.

मॉस्को (१९८०)

सोव्हिएत रशिया-अमेरिका शीतयुद्धाचा फटका बसलेलं ऑलिंपिक, हीच त्याची खरी ओळख. रशियाने अफगाणिस्तानात घुसखोरी केल्याच्या निषेधार्थ अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अनेक देशांनी बहिष्कार टाकला. त्याचा परिणाम हॉकीवरही झाला. महिला हॉकीचं पदार्पण ह्याच स्पर्धेतून झालं. त्यालाही बहिष्काराचा फटका बसला. भारतासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीन स्पर्धांच्या अंतरानंतर हॉकीचं सुवर्णपदक जिंकता आलं.


प्रदीर्घ काळानंतर मिळालेलं सुवर्णपदक. मॉस्को ऑलिंपिकमधील हे यश
फारसं महत्त्वाचं मानलं गेलं नाही. (छायाचित्र सौजन्य - भारतीय हॉकी)

पुरुष विभागात १२ सहभागी संघांचं विभाजन दोन गटांमध्ये करण्यात आलं. तथापि माँट्रिअले ऑलिपिंकमधील पदकविजेत्यांसह - न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान - अर्जेंटिना, केनिया, मलेशिया, पश्चिम जर्मनी,, इंग्लंड, द नेदरलँड्स असे नऊ संघ सहभागी झालेच नाहीत. त्यामुळे भारत, स्पेन, यजमान सोव्हिएत रशिया, पोलंड, क्यूबा व शेवटच्या क्षणी प्रवेश दिलेला टांझानिया ह्या सहा देशांची स्पर्धा साखळी पद्धतीने झाली. त्यातील पहिल्या दोन संघांमध्ये सुवर्ण-रौप्यपदकासाठी आणि तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या संघांमध्ये कांस्यपदकासाठी लढती झाल्या. ह्या स्पर्धेत गोलांचा नुसता पाऊस पडला. साखळी सामन्यांमध्ये एकूण १३१ गोल झाले.

स्पर्धा एवढी सोपी असूनही भारताला काहीशी अवघडच गेली. साखळीतील पाचपैकी तीन सामने जिंकले व दोन बरोबरीत सुटले. पहिल्या सामन्यात भारताने टांझानियाचा १८-० असा धुव्वा उडविला. सेंटर फॉरवर्ड सुरिंदरसिंग सोढी याने पाच, देविंदरसिंग व कर्णधार वासुदेवन भास्करन ह्यांनी प्रत्येकी चार गोल केले. पण पोलंडविरुद्ध भारताला बरोबरीत (२-२) समाधान मानावं लागलं. देविंदरसिंग व मर्विन फर्नांडिस ह्यांनी एक-एक गोल केला. त्यानंतरची स्पेनविरुद्धची लढतही २-२ अशी बरोबरीत सुटली. भारताकडून दोन्ही गोल सोढीने केले.

नवोदित क्यूबावर भारताने १३ गोल चढविले. सुरिंदरसिंगने चार, महंमद शाहीद, देविंदरसिंग, राजिंदरसिंग व अमरजितसिंग राणा ह्यांनी प्रत्येकी दोन गोल केले. भास्करन ह्यानं एक गोल केला. क्यूबाची पाटी कोरीच राहिली. यजमान रशियाला ४-२ असे हरवून भारताने अंतिम फेरीत प्रवेश नक्की केला. ह्या लढतीत सोढीने दोन गोल करून चमक दाखवली. देविंदर व महाराज किशन कौशिक ह्यांनी प्रत्येकी एक गोल चढवला. दीर्घ अनुभव आणि सात सुवर्णपदकं जिंकलेल्या भारताला साखळीमध्ये अव्वल स्थान काही पटकावता आलं नाही. 

स्पेनने पाचपैकी चार सामने जिंकले. रशियानेही तीन लढती जिंकल्या, तरी त्यांनी दोन सामने गमावले व संघ साखळीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. टांझानियाविरुद्ध पाच सामन्यांत ५४ आणि क्यूबाविरुद्ध तेवढ्याच सामन्यांत ४२ गोल झाले.

अंतिम सामना चुरशीने खेळला गेला. भारताने स्पेनवर ४-३ असा विजय मिळवून ऑलिंपिकमधील आठवे सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर भारताला कोणतेच पदक जिंकता आले नाही. सुरिंदरसिंगने दोन आणि महाराज क्रिशन कौशिक व महंमद शाहीद यांनी प्रत्येकी एक गोल केला. स्पेनचे तिन्ही गोल जुआन अमातने केले. भारताच्या सुरिंदरसिंगने सर्वाधिक सोळा गोल करून व्यक्तिगत गोलांचा विक्रम प्रस्थापित केला. कांस्यपदकाच्या सामन्यात रशियाने पोलंडवर २-१ असा विजय मिळविला. विजेत्याकडून दोन्ही गोल वियाचेस्लाव्ह लॅम्पीव्हने केले. क्यूबाने टांझानियाचा ४-१ गोलनी पराभव करून पाचवा क्रमांक मिळविला.

भारत चौथ्या क्रमांकावर 

महिला हॉकीचा समावेश ह्या ऑलिंपिकपासून झाला. अगदी शेवटच्या क्षणी प्रवेश मिळालेल्या झिम्बाब्वेने सुवर्णपदक पटकावून सर्वांनाच आश्चर्याचा जोरदार धक्का दिला. झिम्बाब्वे, चेकोस्लोव्हाकिया, सोव्हिएत रशिया, भारत, ऑस्ट्रिया व पोलंड संघांमध्ये साखळी पद्धतीने सामने झाले. पदके जिंकणाऱ्या तिन्ही संघांनी प्रत्येकी तीन सामने जिंकले. तथापि सुवर्ण जिंकणाऱ्या झिम्बाब्वेने एकही सामना गमावला नाही. चेकोस्लोव्हाकियाने रौप्य व यजमानांनी कांस्यपदक जिंकले.

स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिलेल्या भारताची कामगिरी साधारणच राहिली. दोन विजय, तेवढेच पराभव व एक बरोबरी ह्यामुळे पदकापासून भारत दूर राहिला. पोलंड व ऑस्ट्रिया ह्यांना हरवणाऱ्या भारताचा रशिया व चेकोस्लोव्हाकिया ह्यांनी पराभव झाला. स्पर्धेत सर्वाधिक सहा गोल नतेला कराश्निकोव्हा (रशिया) व पॅट्रिशिया मॅककिलप यांनी केले. रशियाच्याच नतालिया बुझुनोव्हा हिने पाच आणि भारताच्या रूपकुमारी सैनी हिने चार गोल केले.

....

(संदर्भ - olympics.com, scroll.in, olympedia.org आणि विकिपीडिया, 'द हिंदू', भारतीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, भारतीय हॉकी ह्यांची संकेतस्थळे.)

......

आधीचे भाग इथे वाचा

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey1.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey2.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey3.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey4.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey5.html

#भारतआणिऑलिंपिक #हॉकीचे_सुवर्णयुग #Olympics #India #hockey #IndiainOlympics #TokyoOlympics #GoldMedal #Tokyo #MensHockey #MajorDhyanChand #munich72 #montreal76  #moscow80  #Olympics_boycott

5 comments:

निमित्त एका गाण्याचं...

'जल बिन मछली...'मधल्या एका गाण्यामुळं हे सगळं लिहिलं! हजारो नव्हे, लाखो गाण्यांचं भांडार असलेली संकेतस्थळे उपलब्ध आहेत. वेळ कसा घाल...