Wednesday, 7 July 2021

हॅटट्रिक साधून 'जादूगार' निवृत्त

ऑलिंपिक, भारत आणि हॉकी - ३ 


ऑलिंपिक महोत्सवात पहिल्यांदाच सहभागी होऊन भारतीय संघानं सोनेरी यश मिळवलं. मग ती जणू वहिवाटच बनली. हे सोनेरी यश पुढची खूप वर्षं भारताची साथ करीत राहिलं. दुसऱ्या महायुद्धामुळं दोन स्पर्धा रद्द कराव्या लागल्या. त्या झाल्या असत्या, तर कदाचित आणखी दोन सुवर्णपदकांची नोंद भारतीय संघाच्या नावापुढं झाली असती.

लॉस एंजेलिस आणि बर्लिन स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी लौकिकाला साजेशीच झाली. काही अडचणी, संघातली गटबाजी, काही खेळाडूंची नाराजी... अशा कोणत्याही बाबीचा परिणाम होऊ न देता संघानं विजयपताका फडकावत ठेवली. बर्लिन ऑलिंपिकमध्ये दिमाखदार कामगिरी करीत ध्यानचंदनं मैदानाचा निरोप घेतला. शेवटच्या ऑलिंपिकमध्ये कर्णधारपद भूषवित एकतिसाव्या वर्षी ह्या जादूगारानं निवृत्ती जाहीर केली.

लॉस एंजेलिस (१९३२)

दीर्घ काळ आणि किमान दोन टप्प्यांमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकचा कालावधी ह्या स्पर्धेतून निश्चित झाला. ही स्पर्धा दि. ३० जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान पार पडली. आधुनिक ऑलिंपिकमधील २८ वर्षांतील सर्वांत कमी स्पर्धक त्यात सहभागी झाले असले, तरी गुणवत्तेत मात्र लक्षणीय फरक दिसून आला.

या ऑलिंपिकमध्ये हॉकीत तीनच संघ सहभागी झाले. भारत, यजमान अमेरिका आणि जपान, हे ते संघ होत. अमेरिका व जपान यांची ही पदार्पणाची स्पर्धा. आधीच्या ऑलिंपिकमध्ये भारत वगळता सर्व संघ युरोप खंडातील होते. त्यातील एकही संघ सहभागी झाला नाही. ॲमस्टरडॅममधील रौप्य व कांस्यपदकविजेते संघही लॉस एंजेलिसपासून दूर राहिले. त्यामुळे तिन्ही संघांमध्ये साखळी सामने झाले.

पहिली लढत ४ ऑगस्टला झाली. पदार्पणातच जपानला भारतीय हॉकीपटूंच्या त्सुनामीला सामोरे जावे लागले. ध्यानचंद (४), रूपसिंह व गुरुमितसिंग (प्रत्येकी ३ गोल) आणि रिचर्ड कार (१) ह्यांच्या हल्ल्यापुढे जपानला काही करता आले नाही. त्यांच्या इनोहाराने एकमेव गोल केला व तोच ऑलिंपिकमधील भारताविरुद्धचा पहिला गोल. दुसरा सामना जपान व अमेरिका यांच्यात ८ ऑगस्ट रोजी झाला. त्यात यजमानांचा संघ २-९ अशा फरकाने पराभूत झाला. इनोहाराने चार गोल करीत आपल्या खेळाची चुणूक दाखविली.

अंतिम साखळी सामन्यात गोलांचा पाऊस पडला. रूपसिंहचे (शेजारचे छायाचित्र) गोलांचे दशक, ध्यानचंदचे अष्टक आणि गुरुमितसिंगचा पंचकार याच्या जोरावर भारतीय आक्रमण फळीने अमेरिकेवर तब्बल दोन डझन (२४) गोल चढविले आणि सलग दुसरे ऑलिंपिक सुवर्णपदक पटकाविले. एका सामन्यातील सर्वाधिक गोलांचा हा विक्रम अबाधित आहे. अमेरिकेकडून एकट्या विल्यम बॉडिंग्टन ह्याने एक गोल केला. स्पर्धेतील एकूण तीन सामन्यांमध्ये ४८ गोल झाले; त्यातील ३५ भारताचे होते. त्या पस्तीसपैकी २५ गोलांचा वाटा ध्यानचंद व त्याचा धाकटा भाऊ रूपसिंह ह्यांचा. दोन भावांनी एकाच स्पर्धेत केलेल्या गोलांचा हा विक्रम असावा आणि ह्यापुढे तो कोणाला मोडता येण्याची शक्यता दिसत नाही. जपानला रौप्य आणि अमेरिकेला कांस्यपदक मिळाले.

दुसऱ्या सुवर्णपदकाच्या मोहिमेवर निघालेल्या भारतीय संघात सारं काही आलबेल मुळीच नव्हतं. भारतीय आणि अँग्लो-इंडियन खेळाडू अशी गटबाजी होती. लालबहादूर बुखारी कर्णधार झाला. ब्रूम एरिक पिन्निगर त्यामुळे नाराज होता. न खेळणारा कर्णधार पंकज गुप्त ह्याने त्याची कशीबशी समजूत काढली.

उद्घाटनाच्या सोहळ्यानंतर होणाऱ्या संचलनाच्या वेळी आणखी एक पेच निर्माण झाला. दुसरा गोलरक्षक आर्थर हिंड ह्याने गणवेषाचा भाग असलेल्या फेटा घालण्यास नकार दिला. मग त्याला परत मायदेशी परत पाठविण्याचे ठरले. आर्थरने माफी मागितल्यावर वादावर पडदा पडला. संघाचे व्यवस्थापक सोंढी आणि खेळाडू ह्यांचे संबंधही काही फार मधुर नव्हते. ह्या साऱ्या अडथळ्यांवर मात करून भारताने सलग दुसरे सुवर्ण जिंकले.

बर्लिन (१९३६) 

जेसी ओवेन्सचा अमीट ठसा उमटलेले आणि भारताने हॉकीतील सुवर्णपदकाची हॅटट्रिक साधलेली ऑलिंपिक ते हेच. ह्याच स्पर्धेनंतर जादूगार ध्यानचंदने निवृत्तीचा निर्णय घेतला. दि. १ ते १६ ऑगस्ट एवढा काळ चाललेल्या या स्पर्धेत हॉकीने पुढचा टप्पा गाठला. एकूण ११ संघ, त्यांची तीन गटांमध्ये विभागणी, कांस्यपदकासाठी स्वतंत्र लढत ही त्याची वैशिष्ट्ये. गट साखळीसह बाद फेरीचे मिळून १९ सामने झाले आणि त्यात १०७ गोल झाले. आशिया खंडातून अफगाणिस्तान हा तिसरा देश सहभागी झाला. युरोपातील बहुतेक संघ सहभागी झाले, तरी इंग्लंड पुन्हा एकवार ऑलिंपिकपासून दूरच राहिले.

‘अ’ गटामध्ये तिन्ही सामने जिंकून भारताने अव्वल स्थान मिळविले. जपानविरुद्धचा ९-० असा मोठा विजय साकारला तो प्रामुख्याने ध्यानचंदच्या गोल-चौकाराने. पीटर फर्नांडिस व कार्लाईल टॅपसेल (प्रत्येकी दोन) आणि रूपसिंहने एक गोल केला. हंगेरीविरुद्धच्या ४-० विजयात रूपसिंहचा दोन, टॅपसेल व शबबुद्दीन शबब ह्यांचा प्रत्येकी एका गोलचा वाटा होता. अमेरिकेचाही ७-० असा सहज पराभव भारताने केला. त्यात सय्यद महंमद जफर, ध्यानचंद व रूपसिंह ह्यांनी प्रत्येकी दोन आणि ॲलन गुडसिर-कलेन ह्याने एक गोल केला. जपानने दोन सामने जिंकून गटात दुसरे स्थान मिळविले. हंगेरीने एक विजय मिळवित अमेरिकेला तळाच्या स्थानावर ढकलले.

तीन संघांचा समावेश असलेल्या ‘ब’ गटात यजमान जर्मनीने दोन्ही सामने जिंकून पहिले स्थान मिळविले. अफगाणिस्तान व डेन्मार्क सामना बरोबरीत सुटला. तथापि कमी गोल खाणाऱ्या अफगाणिस्तानला गटातले दुसरे स्थान मिळाले. द नेदरलँड्सने तीनपैकी दोन सामने जिंकून ‘क’ गटात पहिला क्रमांक मिळविला. फ्रान्सने एक सामना जिंकून दुसरे स्थान मिळविले. बेल्जियमला एकही सामना जिंकता आला नसला, तरी एक सामना जिंकणाऱ्या स्वित्झर्लंडला तळाला ठेवून तो संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. ह्या गटातील दोन सामने बरोबरीत सुटले.

उपान्त्य फेरीत भारत, जर्मनी, द नेदरलँड्स व फ्रान्स संघांनी प्रवेश केला. पहिल्या उपान्त्य सामन्यात भारताने फ्रान्सचा १०-० असा धुव्वा उडविला. त्यात पुन्हा चमकली ती ध्यानचंद व रूपसिंह ही भावांची जोडी. ध्यानचंदने चार, रूपसिंहने तीन गोल केले. इक्तिदार अली दारा ह्याने दोन व टॅपसेलने एक गोल केला. दुसऱ्या उपान्त्य लढतीत जर्मनीने द नेदरलँड्सवर ३-० असा विजय मिळविला. कांस्यपदकासाठी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात द नेदरलँड्सने फ्रान्सला ४-३ अशी हुलकावणी दिली.

अंतिम लढतीत जर्मनीविरुद्ध चौथा गोल (ऑलिंपिक समितीच्या संकेतस्थळावरून साभार)

अंतिम लढत पावसामुळे एक दिवस उशिरा, म्हणजे १५ ऑगस्ट रोजी झाली. त्यावर पुन्हा एकदा वर्चस्व दिसले ते भारताचेच. त्यांनी यजमान जर्मनीला ८-१ असे सहज नमवले. ध्यानचंदने कर्णधारपदाला साजेसा खेळ करीत तीन गोल लगावले. अनवाणी खेळणाऱ्या ध्यानचंदची जर्मन गोलरक्षकाशी टक्कर झाली आणि त्यात त्याला एक दात गमवावा लागला. पण त्याची जिगर कायम होती. त्याल दारा (दोन गोल), रूपसिंह, टॅपसेल, सय्यद जफर (प्रत्येकी एक गोल) ह्याची चांगली साथ लाभली.

या ऑलिंपिकमध्ये भारताविरुद्ध एकमेव गोल झाला, तो अंतिम लढतीत. स्पर्धेतील पाचही सामन्यांमध्ये खेळलेल्या ध्यानचंद (१३ गोल) व रूपसिंह (१० गोल) यांचा ह्या सुवर्णपदकात मोठा वाटा होता. ध्यानचंद व गोलरक्षक रिचर्ड जेम्स ॲलन यांचे हे सलग तिसरे ऑलिंपिक व सलग तिसरे सुवर्णपदक. आशिया खंडातल्या अफगाणिस्तानला सहाव्या व जपानला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अमेरिकेचा संघ पुन्हा तळाला राहिला.

ऑलिपिंकला रवाना होण्यापूर्वीच भारतीय संघाला एक धक्का बसला. दिल्ली एलेव्हनकडून ४-१ असा पराभव पत्करावा लागलेला हा संघ काय कामगिरी करणार, असं विचारलं जाऊ लागलं. जर्मनीतील सरावाच्या सामन्यातही जर्मनी एलेव्हनकडून भारताचा पराभव झाला. मग संघ व्यवस्थापनानं आपत्कालीन निर्णय म्हणून इक्तिदार अली दारा ह्याचा संघात समावेश केला. एक तपानंतर तो पाकिस्तानकडून खेळला.

भारतीय संघाच्या तयारीबाबत, कामगिरीबद्दल सार्वत्रिक शंका व्यक्त केली जात होती. प्रत्यक्ष स्पर्धेत कर्णधार ध्यानचंद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लौकिकाला साजेलसा खेळ केला. तिसरं ऑलिंपिक खेळून आणि देशाला तिसरं सुवर्णपदक मिळवून देऊन हॉकीच्या जादूगारानं निवृत्ती घेतली.

दुसऱ्या महायुद्धामुळे टोकियो (१९४०) व लंडन (१९४४) ऑलिंपिक झाली नाहीत. ती होती तर भारताच्या नावापुढे हॉकीतील अजून दोन सुवर्णपदकांची कदाचित नोंद झाली असती.

...

(संदर्भ - britannica.com, olympics.com आणि विकिपीडिया, 'द हिंदू', भारतीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, भारतीय हॉकी ह्यांची संकेतस्थळे.)

-------

आधीचे भाग

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey1.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey2.html

#Olympics #India #hockey #IndiaInOlympics #TokyoOlympics #GoldMedal #Tokyo #MensHockey #MajorDhyanChand #sports #LosAngelesOlympics #BerlinOlympics  #worldwar

1 comment:

  1. माहितीपूर्ण लेख. १९३२ च्या ऑलिम्पिकमधे फक्त तीनच संघ होते हे पहिल्यांदाच समजले.

    ReplyDelete

बीजिंगपासून टोकियोपर्यंत

  ऑलिंपिक, भारत आणि हॉकी -  ९ तळाला आणि उसळी मारून शिखराला. भारतीय हॉकीचं - पुरुष आणि महिला ह्या दोन्ही संघांचं वर्णन आज घडीला तरी असंच करा...