मंगळवार, २० जुलै, २०२१

पदक राहिले दूर दूर

 ऑलिंपिक, भारत आणि हॉकी - 



लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये चमकलेला तारा - विनितकुमार.
(छायाचित्र सौजन्य sportskeeda.com)

'खेळात राजकारण नको,' हे उद्गार व्यासपीठावरून काढून टाळ्या मिळतात. पण व्यवहार तसा नसतो. राजकारणातून ऑलिंपिंकवर बहिष्कार टाकण्याच्या खेळामुळे असेल, पण मॉस्को ऑलिंपिकमध्ये भारताला हॉकीचे सुवर्णपदक पुन्हा मिळविता आले. त्यामुळे काही काळ खंडित झालेलं सुवर्णयुग पुन्हा चालू झालं, असं चाहत्यांना वाटलं. ते समाधान अल्प काळचंच होतं, हे पुढं दिसून आलं. त्यानंतरच्या तिन्ही स्पर्धांमध्ये आपली कामगिरी खालावतच गेली. क्रमाक्रमाने आपण एक एक पायरी उतरत गेलो. 


लॉस एंजेलिस (१९८४) 

अर्धशतकानंतर अमेरिकेने पुन्हा एकदा ऑलिंपिकचे यजमानपद स्वीकारले. मॉस्को ऑलिंपिकवरील बहिष्काराचा बदला म्हणून सोव्हिएत रशियानेही तेच अस्त्र उगारल्याने काही खेळांवर परिणाम झाला. असे असूनही सहभागी देशांच्या संख्येचा नवा विक्रम झाला - एकूण १४० देश. भारतीय हॉकी संघ पदकाच्या शर्यतीत असेल, असे मानले जात होते. पण ते होणार नव्हते. आपली उपान्त्य फेरीची संधी थोडक्यात हुकली. संघाचे प्रशिक्षक बालकिशन सिंग ह्यांनी 'टोटल हॉकी'ची अंमलबजावणी केली. पारंपरिक आशियाई पद्धतीचा खेळ हेच आपलं बलस्थान मानणाऱ्या जुन्या-जाणत्यांकडून त्यावर टीकाही झाली.

युरोपीय देशांचं वर्चस्व हॉकीमध्ये वाढत होतं आणि ते देश 'टोटल हॉकी' पद्धतीनं खेळत होते. पदक जिंकायचं तर अशाच पद्धतीनं खेळणं कालसुसंगत आहे, असं बालकिशन ह्यांचं म्हणणं होतं. त्यात तीन 'हाफ बॅक'ऐवजी मधल्या फळीत आणि आघाडीला प्रत्येकी चार खेळाडू असा बदल होता. म्हणजे 'फॉरवर्ड'चाही एक खेळाडू कमी झाला होता.

पुरुष हॉकीचा समावेश असलेलं हे पंधरावं ऑलिंपिक. सहभागी १२ संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली. ‘अ’ गटात ऑस्ट्रेलिया, पश्चिम जर्मनी, भारत, स्पेन, मलेशिया व अमेरिका होते. ऑस्ट्रेलियाने सर्व सामने सहज जिंकून गटात अव्वल स्थान मिळविले. पश्चिम जर्मनी व भारत यांचे समान सात गुण होते (तीन विजय, एक बरोबरी व एक पराभव). सरस गोलफरकाच्या आधारावर पश्चिम जर्मनीला गटातील दुसरे स्थान मिळाले. (भारताने १४ गोल केले व ९ स्वीकारले. पश्चिम जर्मनीने १२ केले व त्यांच्याविरुद्ध फक्त ४ गोल झाले.) ऑस्ट्रेलियाने मलेशियाला ५-०, स्पेनला ३-१, पश्चिम जर्मनीला ३-०, भारताला ४-२ व अमेरिकेला २-१ असे हरवले. त्यांच्याकडून टेरी वॉल्श चमकला.

अमेरिकेला ५-१ हरवून भारताने चांगली सुरुवात केली. मर्व्हिन फर्नांडिसने दोन गोल केले. जोकिम कार्व्हालो, चरणजितकुमार व महंमद शाहीद ह्यांनी प्रत्येकी एका गोलाची भर घातली. अमेरिकेसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना भारताविरुद्ध गोल नोंदविता आला! विनितकुमार शर्माच्या हॅटट्रिकमुळे मलेशियावर ३-१ विजय मिळविला. स्पेनविरुद्ध सामना जिंकला, तरी त्या संघाला तीन गोल करू देण्याची चूक अंतिमतः भोवलीच. फर्नांडिसने पुन्हा दोन आणि हरदीप सिंग व महंमद शाहीद ह्यांनी प्रत्येकी एक गोल केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत विनितकुमार व कार्व्हालो ह्यांनी एक-एक गोल केला. उपान्त्य फेरी गाठण्यासाठी भारताला गटातील शेवटची लढत जिंकणं आवश्यक होतं. पण पश्चिम जर्मनीबरोबरचा सामना एकही गोल न होता बरोबरीत संपला. अमेरिकेला पुन्हा एकदा एकही सामना जिंकता आला नाही.

इंग्लंड, पाकिस्तान, द नेदरलँड्स, न्यूझीलंड, केनिया व केनिया संघ असलेल्या ‘ब’ गटातील चार सामने बरोबरीत सुटले. इंग्लंडने चार सामने जिंकून व एक बरोबरीत सोडवून अव्वल स्थान मिळविले. याही गटातला दुसरा क्रमांक गोलफरकाच्या आधारेच ठरविण्यात आला. पाकिस्तान (२ विजय, ३ बरोबरी, गोल १६-७) व द नेदरलँड्स (३ विजय, १ बरोबरी, १ पराभव, गोल १६-९) अशी परिस्थिती होती. त्यामुळे एक सामना कमी जिंकूनही पाकिस्तान सुदैवी ठरले. इंग्लंडने केनिया (२-१), कॅनडा (३-१) न्यूझीलंड (१-०) व नेदरलँड्स (४-०) या लढती सहज जिंकल्या. पाकिस्तानबरोबरचा सामना गोलविना बरोबरीत राहिला. पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडशी (३-३) बरोबरी झाली. केनिया (३-०), कॅनडा (७-१) यांच्यावर मोठे विजय मिळविताना नेदरलँड्सविरुद्ध मात्र बरोबरीत (३-३) समाधान मानावे लागले. हीच बरोबरी नेदरलँड्सला महागात पडली. माँट्रिअल ऑलिंपिकमध्ये सुवर्ण जिंकलेल्या न्यूझीलंडला एकच विजय मिळविता आला.

दीर्घ काळानंतर सुवर्णपदक जिंकण्याचे इंग्लंडचे स्वप्न उपान्त्य सामन्यातच भंगले. पश्चिम जर्मनीने एकहार्ड श्मिटच्या एकमेव गोलाच्या जोरावर इंग्लंडला पराभूत केले. तेवढ्या चुरशीच्या दुसऱ्या उपान्त्य सामन्यात पाकिस्तानने हसन सरदारच्या गोलामुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. दि. ११ ऑगस्टची पाकिस्तान-पश्चिम जर्मनी अंतिम लढत अटीतटीची झाली. खेळाच्या नियमित वेळेत दोन्ही संघ १-१ (पीटर मायकेल व हसन सरदार) असे बरोबरीत होते. जादा वेळेत ब्याऐंशीव्या मिनिटाला पाकिस्तानच्या कलीमुल्ला खानने गोल करून म्यूनिच ऑलिंपिकमधल्या पराभवाचा बदला घेतला. इंग्लडने ऑस्ट्रेलियाला ३-२ हरवून कांस्यपदक जिंकले. भारताने न्यूझीलंड व द नेदरलँड्स यांना हरवून पाचवे स्थान मिळविले. विनितकुमारच्या गोलमुळे न्यूझीलंडविरुद्ध १-० विजय मिळाला. द नेदरलँड्सला मात्र ५-२ असे हरवले. त्यात मर्व्हिनचे दोन, विनितकुमार, शाहीद व झफर इक्बाल ह्यांचा प्रत्येकी एक गोल होता. स्पर्धेत हसन सरदारने सर्वाधिक १०, टेरी वॉल्शने (ऑस्ट्रेलिया) ८, कर्ली सीन (इंग्लंड) ७, मर्व्हिन फर्नांडिस व विनितकुमार शर्मा (प्रत्येकी) ६ गोल केले.

महिला 

सहभागी सहा संघांमध्ये साखळी पद्धतीने सामने झाले व पहिल्या तीन क्रमांकांचे संघ पदकांचे मानकरी ठरले. या स्पर्धेत भारताचा संघ सहभागी झाला नव्हता. द नेदरलँडसने चार सामने जिंकून अव्वल स्थानासह सुवर्णपदक जिंकले. पश्चिम जर्मनीने दोन विजयांसह दोन सामने बरोबरीत सोडवून आणि एकच पराजय स्वीकारून सहा गुणांसह रौप्यपदक पटकाविले. अमेरिका, ऑस्ट्रेलिया व कॅनडा यांनी प्रत्येकी दोन सामने जिंकल्याने कांस्यपदकासाठी मोठी चुरस होती. पण गोलफरक उणे आल्याने कॅनडा स्पर्धेतून बाद झाला. अमेरिका व ऑस्ट्रेलिया यांची गोलसरासरी समान असल्याने कांस्यपदकासाठी या दोन देशांमध्ये पेनल्टी शूटआऊट झाले. त्यात अमेरिकेने बाजी मारली.

सोल (१९८८)

लोकशाहीचा स्वीकार केल्याबद्दल दक्षिण कोरियाला ऑलिंपिकच्या आयोजनाची भेट मिळाली. तथापि बहिष्काराचे सत्र या वेळीही चालूच राहिले. उत्तर कोरिया, क्यूबा, इथिओपिया, निकाराग्वा आदी देशांनी बहिष्कार टाकूनही १५३ देश सहभागी झाले. हा नवा विक्रम! पुरुष हॉकीमध्ये तब्बल सहा दशकांनंतर पदकाच्या यादीत भारत किंवा पाकिस्तान नाही आणि इंग्लंडला अडुसष्ट वर्षांनंतर सुवर्णपदक, ही या ऑलिंपिकची वैशिष्ट्ये.

पुरुष विभागात ऑस्ट्रेलिया, द नेदरलँड्स, पाकिस्तान, अर्जेंटिना, स्पेन व केनिया ह्यांचा समावेश असलेल्या ‘अ’ गटातून ऑस्ट्रेलिया व नेदरलँड्स ह्यांनी उपान्त्य फेरी गाठली. पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

भारताचा समावेश असलेल्या ‘ब’ गटातून पश्चिम जर्मनी व इंग्लंड उपान्त्य फेरीसाठी पात्र ठरले. भारत तिसऱ्या, त्यानंतर सोव्हिएत रशिया, दक्षिण कोरिया व कॅनडा अशी क्रमवारी राहिली. गटातील चार सामने बरोबरीत सुटले. सोव्हिएत रशियासारख्या तुलनेने नवख्या संघाकडून आपल्या संघाने ०-१ असा धक्कादायक पराभव पत्करला. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला हा गोल देव्यादोव इगोर ह्याने केला. लॉस एंजेलिसमध्ये रौप्यपदकविजेत्या पश्चिम जर्मनीशी मात्र आपण १-१ अशी बरोबरी साधली. खरं तर ज्यूड फेलिक्सने पहिला गोल करून संघाला आघाडीवर नेले. पण नंतर काही वेळाने जर्मनीने बरोबरी साधली.

यजमान दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यातही पहिल्याच मिनिटाला भारतावर गोल चढला. त्या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी मदत झाली ज्यूड फेलिक्सच्या बरोबरी साधणाऱ्या गोलाची. नंतर थोयबा सिंगने दोन गोल चढवत ३-१ विजय मिळवून दिला. नेमकी तीच स्थिती कॅनडाविरुद्ध झाली. कॅनडाच्या मायकेलने फिल्ड गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मात्र भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. पेनल्टी कॉर्नरची संधी दोनदा साधत मोहिंदरपाल सिंगने संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर मर्व्हिन फर्नांडिस, ज्यूड फेलिक्स व बी. सुब्रमणी ह्यांनी फिल्ड गोल करीत स्पर्धेतला आपला सर्वांत मोठा ५-१ विजय साकार केला. पण हे दोन्ही विजय अंतिमतः पदकाच्या दृष्टीने निरुपयोगी ठरले. इंग्लंडने कुठल्याही प्रतिकाराची संधी न देता ३-० असा मोठा विजय मिळविला आणि आपल्याला गटात तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. साखळी सामन्यांत आपण जेमतेम नऊ गोल केले आणि सात स्वीकारले.


रशियाविरुद्धच्या लढतीत कर्णधार परगटसिंग. सलामीच्या ह्या सामन्यातच
भारताला पराभव पत्करावा लागला.

पाच ते आठ क्रमांक ठरविण्यासाठी झालेल्या सामन्यांतही भारताला अजून एक धक्का बसायचा होताच. अर्जेंटिनाविरुद्धच्या लढतीत गोलांचा पाऊस पडूनही सामना जादा वेळेनंतर ६-६ असा बरोबरीत सुटला. मग पेनल्टी शूट आऊटमध्ये ४-३ असा कसाबसा विजय मिळाला. नंतर गाठ पडली पाकिस्तानशी. त्या लढतीत पाकिस्तानने २-१ असा विजय व पाचवे स्थान मिळविले. ह्या ऑलिंपिकमध्ये भारतीय संघाकडून पदकाची अपेक्षा ठेवणंच अवघड होतं. ऑलिंपिकच्या दोन वर्षं आधी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत आपण तळाला - बाराव्या क्रमांकावर - राहिलो. ऑलिंपिकसाठी संघ निवडताना मोठीच कसरत करावी लागली. महंमद शाहीद, एम. एम. सोमय्या, मर्व्हिन फर्नांडिस ह्यांची निवड कशी झाली, असा प्रश्न अनेकांना पडला. संघातल्या वरिष्ठ खेळाडूंना टाळून पदार्पण करणाऱ्या परगट सिंगची कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली. तेही वादाचं एक निमित्त ठरलं.

पहिल्या उपान्त्य सामन्याच्या पूर्वार्धात एका गोलने पिछाडीवर पडल्यानंतर पश्चिम जर्मनीने बाजी पलटवत नेदरलँड्सला २-१ हरवून अंतिम फेरी गाठली. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया लढतही रंगतदार झाली. इंग्लंड पहिल्याच मिनिटाला गोल नोंदवित आघाडी घेतली. नंतर ऑस्ट्रेलियाने संधी साधत दोन गोल केले. पण अखेर इंग्लंडने ३-२ अशी बाजी मारून ४० वर्षांनंतर अंतिम फेरी गाठली. तिन्ही गोल कर्ली सीन याने केले.

एक ऑक्टोबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडने सुरुवातीपासूनच जोरदार खेळ करीत निर्णायक ३-० आघाडी घेतली. इम्रान शेरवानीने दोन व सीनने एक गोल केला. पश्चिम जर्मनीकडून उत्तरार्धात एकमेव गोल डॉप हाईनर याने केला. अशा रीतीने इंग्लंडने दीर्घ काळानंतर सुवर्णपदक जिंकले. कांस्यपदकासाठीच्या सामन्यात नेदरलँड्सने कांगारूंना २-१ असे पराभूत केले. नेदरलँड्सचे हे ३६ वर्षांनंतरचे पदक. स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याची कामगिरी द नेदरलँड्सच्या फ्लोरिस जान बोव्हेलँडर याने केली. त्याने नऊही गोल पेनल्टी कॉर्नरवर केले. भारताकडून मोहिंदरपाल सिंग (पाच गोल) अव्वल ठरला.

महिला

समावेशानंतरच्या तिसऱ्या स्पर्धेत संघांची संख्या वाढून आठ झाली. त्यामुळे त्यांची दोन गटांत विभागणी करून आधी साखळी व नंतर पदकांसाठीचे सामने असा बदल झाला. ह्या स्पर्धेतही भारताचा संघ नव्हता. यजमानांच्या संघाने धडाकेबाज खेळ करीत पदार्पणातच रौप्यपदक जिंकले.

‘अ’ गटामध्ये द नेदरलँड्सने तिन्ही सामने जिंकून अव्वल स्थान मिळविले. एक जय, एक बरोबरी व एक हार असणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला. अर्जेंटिना तिसऱ्या व अमेरिका शेवटच्या क्रमांकावर राहिली. ‘ब’ गटात दक्षिण कोरियाचा संघ अग्रस्थानी राहिला. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या, पश्चिम जर्मनी तिसऱ्या व कॅनडा अखेरच्या क्रमांकावर राहिला.

दक्षिण कोरियाने उपान्त्य फेरीतही सफाईदार खेळ करीत इंग्लंडला १-० असे हरविले. दुसऱ्या चुरशीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने द नेदरलँड्सवर ३-२ मात केली. दि. ३० सप्टेंबरला झालेला अंतिम सामना तुलनेने एकतर्फी झाला. कर्णधार डेबोरा बाऊमन व मिशेल केप्स ह्यांच्या गोलांमुळे ऑस्ट्रेलियाने यजमानांना २-० हरवून पहिले सुवर्णपदक जिंकले. कांस्यपदकाच्या लढतीत द नेदरलँड्सने इंग्लंडला ३-१ असे हरविले. या स्पर्धेत द नेदरलँड्सच्या लेज्युनी लिसान हिने सर्वाधिक आठ गोल केले.

बार्सिलोना (१९९२)

बहिष्काराच्या अस्त्रापासून ऑलिंपिकची साधारण दोन दशकांनंतर सुटका झाली ती बार्सिलोनामध्येच. जागतिक इतिहासाच्या महत्त्वाचे बदल घडले होते. दोन्ही जर्मनींचे एकत्रिकरण आणि सोव्हिएत रशिया अस्तंगत झाला होता. रशियापासून स्वतंत्र झालेले सर्व १५ देश एक संघ म्हणूनच ह्या ऑलिंपिकमध्ये सहभागी झाले.

पुरुष विभागात भारतासाठी हे ऑलिंपिक अजून एक पाऊल मागे नेणारे ठरले. संघ सातव्या क्रमांकावर राहिला आणि त्याच वेळी पाकिस्तानने पुन्हा एकदा उसळी मारून पाचव्या क्रमांकापासून कांस्यपदकापर्यंत मजल मारली. ‘अ’ गटात समाविष्ट असलेल्या भारताची कामगिरी सुमार झाली. तीन पराभव व फक्त दोन विजय अशा खेळामुळे संघाला गटात चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.


धनराज पिल्लेचं ऑलिंपिकमध्ये पदार्पण
(छायाचित्र सौजन्य - इकॉनॉमिक टाइम्स)
सलामीच्या लढतीतच जर्मनीकडून भारताला ०-३ पराभव पत्करावा लागला. आक्रमक जर्मनांनी भारताला कोणतीही संधी दिली नाही. अर्जेंटिनाविरुद्ध परगटसिंगने पहिल्या काही मिनिटांतच गोल करून आघाडी मिळवून दिली. तोच विजयी गोल ठरला. इंग्लंडविरुद्धचा सामनाही निराशाजनक ठरला. हिल रॉबर्टने इंग्लंडला आरंभी आघाडी मिळवून दिली. ज्यूड फेलिक्सने त्रेपनाव्या मिनिटाला बरोबरी साधली. पण त्यानंतर काही मिनिटांच्या अंतराने कर्ली सीन व रॉबर्ट थॉमसन ह्यांनी दोन गोल करून भारताला सावरण्याची संधीच दिली नाही. त्या पाठोपाठच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानेही निसटता पराभव केला. जे स्टेसी ह्याने तिसऱ्याच मिनिटाला केलेला गोल सामन्यातला एकमेव ठरला. भारतीय खेळाडूंचे आक्रमणाचे सारे प्रयत्न कांगारूंच्या बचाव फळीने व्यर्थ ठरविले. ह्या पराभवाने उपान्त्य फेरी गाठण्याचे स्वप्न सलग दुसऱ्या वेळी फोल झाले. इजिप्तविरुद्ध मिळविलेला विजय (२-१) पदकापर्यंत नेणारा नव्हता. जगबीरसिंग व मुकेशकुमार ह्यांनी प्रत्येकी एक गोल केला.

क्रमवारी ठरविण्याच्या सामन्यांतही पराभवाने भारताचा पिच्छा सोडला नाही. ‘क्रॉसओव्हर’मध्ये स्पेनकडून (२-०) पराभूत झाल्यानंतर भारताने सातव्या-आठव्या क्रमांकासाठीच्या लढतीत न्यूझीलंडला हरवले. मुकेशकुमारचे दोन व परगटचा एक गोल ह्यामुळे ही लढत ३-२ अशी जिंकत भारताने कसंबसं सातवं स्थान मिळविलं. ह्या अपयशाची अनेक कारणं नंतर सांगण्यात आली. त्यातलं (नेहमीचंच) महत्त्वाचं म्हणजे गटबाजी. संघटनेत काहीच ठीकठाक चाललं नव्हतं. बालकिशन सिंग ह्यांच्या खांद्यावर पुन्हा एकदा प्रशिक्षकपदाची जबाबदारी टाकण्यात आली. ऑलिंपिकसाठी संघ अगदी शेवटच्या क्षणी पात्र ठरला. तो कसा पात्र ठरला ह्याची सुरस कथा नंतर बरीच वर्षं चघळली गेली. अशा परिस्थितीत बालकिशन काही चमत्कार घडवतील, ही आशाच फुकी होती. अतिशय व्यथित मनानं ते ह्या खेळापासून मग दूरच राहिले. पुण्याच्या धनराज पिल्ले ह्याची ही पहिलीच स्पर्धा.

‘अ’ गटात ऑस्ट्रेलिया व जर्मनी यांनी प्रत्येकी चार सामने जिंकले. या दोन्ही संघांमधील लढत १-१ बरोबरीत सुटल्याने त्यांचे समान नऊ गुण झाले. पण सरस गोल सरासरीमुळे ऑस्ट्रेलियाने गटात पहिले स्थान मिळविले. पाकिस्तानने जुन्या खेळाची आठवण करून देत ‘ब’ गटातील पाचही सामने जिंकत पहिले स्थान पटकाविले. द नेदरलँड्सने चार सामने जिंकत उपान्त्य फेरीतील जागा निश्चित केली. 

दि. ५ ऑगस्टला उपान्त्य सामने झाले. त्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा कडवा प्रतिकार ३-२ असा मोडून काढला. पाकिस्तान व जर्मनी यांच्यातील सामना जोरदार झाला. खालीद बशीरने पाकिस्तानला आघाडी मिळवून दिली. फिशर कार्स्टन याने बरोबरी साधणारा गोल केल्यावर नियमित वेळेत सामना १-१ असा अनिर्णीत राहिला. जादा वेळेत फिशर पुन्हा एकदा पावल्याने जर्मनीने अंतिम फेरी गाठली.

अंतिम लढत दि. ८ ऑगस्टला झाली. मिशेल हिल्गर्सने दुसऱ्या व एकोणसाठाव्या मिनिटाला गोल साधून जर्मनीला आघाडी मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग कॉर्बिटने सहासष्टाव्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे निकालावर काही फरक पडला नाही. अंतिम फेरीत पराभूत होण्याची आधीच्या दोन ऑलिंपिकची परंपरा खंडित करीत जर्मनीने दोन दशकांनंतर सुवर्णपदक पटकाविले. पाकिस्तानने द नेदरलँड्सचा ४-३ पराभव करून कांस्यपदक मिळविले आणि आशियाचे अस्तित्व काही प्रमाणात दाखवून दिले. या स्पर्धेत सर्वाधिक गोलांची नोंद पुन्हा एकदा द नेदरलँड्सच्या फ्लोरिस जान बोव्हेलँडर याने केली. त्याचे अकराही गोल पेनल्टी कॉर्नरवर केलेले होते. अर्जेंटिनाचा फर्नांडो फराराही त्याच्या जोडीला होता. सुवर्णपदकविजेत्या जर्मनीकडून फिशरने सर्वाधिक सात गोल केले. 

महिला

जर्मनी, स्पेन, ऑस्ट्रेलिया व कॅनडा यांचा समावेश असलेल्या ‘अ’ गटात जर्मनी व स्पेन प्रत्येकी दोन सामने जिंकून आघाडीवर राहिले. गोलफरकाच्या आधारे जर्मनीचा संघ अव्वल ठरला. ‘ब’ गटामध्ये दक्षिण कोरिया, इंग्लंड व द नेदरलँडस यांनी प्रत्येकी दोन सामने जिंकून चार गुण मिळविले. गोलफरकाच्या आधारे दक्षिण कोरियाला पहिले व इंग्लंडला दुसरे स्थान मिळाले. या तिन्ही देशांकडून न्यूझीलंडला मात्र पराभव स्वीकारावा लागला.

उपान्त्य सामने दि. ४ ऑगस्टला झाले. त्यात जर्मनीने इंग्लंडचा २-१ असा पराभव केला. दुसरी लढत चुरशीची होऊन जादा वेळेत गेली. त्यात स्पेनने दक्षिण कोरियाला २-१ हरवले. सात ऑगस्ट रोजीचा अंतिम सामनाही अटीतटीचा होऊन विजेता ठरविण्यासाठी जादा वेळेचा उपयोग करावा लागला. त्यात स्पेनने २-१ अशी बाजी मारली. कांस्यपदकाचा निकालही जादा वेळेतच लागला. त्यात इंग्लंडने दक्षिण कोरियावर ४-३ असा विजय मिळविला. फ्रान्झिस्का (जर्मनी) व जेन सिक्सस्मिथ (इंग्लंड) ह्यांनी सर्वाधिक पाच गोल केले. 

.....

(संदर्भ - olympics.com, sportskeeda.com आणि विकिपीडिया, 'द हिंदू', भारतीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, भारतीय हॉकी ह्यांची संकेतस्थळे.)

.....

आधीचे भाग इथे वाचा

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey1.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey2.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey3.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey4.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey5.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey6.html

............

#भारतआणिऑलिंपिक #हॉकीचे_सुवर्णयुग #OlympicsHockey #IndiaInOlympics

#Olympics #India #hockey #TokyoOlympics #GoldMedal #MensHockey #LosAngeles84 #Seoul88 #Barcelona92 #TotalHockey #BalkishanSingh

1 टिप्पणी:

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...