ऑलिंपिक, भारत आणि हॉकी - १
(कोविड महामारीमुळे वर्षभर लांबणीवर पडलेल्या टोकियो ऑलिंपिकला येत्या २३ जुलैला सुरुवात होत आहे. ऑलिंपिक म्हटलं की, भारतीय हॉकी संघानं जिंकलेल्या सुवर्णपदकांची आठवण होणं स्वाभाविकच. हेच निमित्त साधून हॉकी आणि ऑलिंपिकशी भारताच्या असलेल्या अतूट नात्याचा व त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा हा संकलित आढावा, साधारण बारा भागांमध्ये. आजपासून दर दोन दिवसांनी...)
टोक्यो, तोक्यो किंवा आपण नेहमी म्हणतो त्या टोकियोमध्ये क्रीडा जगताचा महोत्सव अजून बरोबर तीन आठवड्यांनी सुरू होईल - उन्हाळी ऑलिंपिक. चार वर्षांनी एकदा अनुभवायला मिळणारा हा आंतरखंडीय थरार वर्षभर वाट पाहायला लावल्यानंतर, येत्या २३ तारखेपासून चालू होईल. मग साधारण ९ ऑगस्टपर्यंत जगभरातील क्रीडा चाहत्यांचं लक्ष जपान आणि अर्थातच टोकियो वेधून घेईल. जुने विक्रम पडद्याआड जातील, नवे विक्रम घडतील. काही नवी नावे क्षितिजावर दिसतील आणि काही जुनी ओळखीची नावे अस्तंगत होताना पाहाण्याची वेळ आल्याची चुटपूटही लागेल.
आधुनिक ऑलिंपिकची चळवळ सुरू झाल्यानंतर त्यात काही अडथळे आले नाहीत, असं नाही. दोन महायुद्धांमुळे आतापर्यंत तीन ऑलिंपिक रद्द करावी लागली. त्यातलं अखेरचं ऑलिंपिक होतं १९४४. त्यानंतर तब्बल ७६ वर्षांनी कोविड महामारीमुळं ऑलिंपिक रद्द होणार की काय, अशी भीती वाटत होती. पण ते वर्षभर पुढं ढकललं गेलं एवढंच. कोविडचं जागतिक संकट पुरतं टळलेलं नसताना मोठ्या जिद्दीनं ऑलिंपिक होत आहे.
ऑलिंपिक किंवा आशियाई क्रीडा स्पर्धा म्हटलं की, तमाम भारतीय तेवढ्यापुरतं आपला मूळ क्रीडाधर्म सोडून देतात. म्हणजे क्रिकेटऐवजी ते हॉकीकडं मोठ्या आशेनं पाहू लागतात. (आपल्याकडे क्रिकेट धर्म आहे आणि त्या त्या वेळचे गाजणारे खेळाडू म्हणजे अवतार!) अगदी अलीकडच्या काळात बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक्स, वजन उचलणे, तिरंदाजी, नेमबाजी आणि कुस्ती ह्या खेळांकडंही आपलं लक्ष असतं. पदकाची आशा हॉकीऐवजी हे खेळही आता पूर्ण करू लागले आहेत.
महिला भारोत्तोलक, पुरुष कुस्तीगीर, नेमबाज, बॅडमिंटनपटू ह्यांनी अलीकडच्या काळात देशाला ऑलिंपिकमध्ये पदकं मिळवून दिली असली, तरी आपलं स्वप्न असतं ते हॉकीतील पदकाचं. हॉकी आणि भारत यांचं नातं अतूट! तो भारताचा ‘राष्ट्रीय खेळ’ मानला जातो. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात, विशेषतः विसाव्या शतकाच्या मध्यात भारताला जी काही प्रसिद्धी मिळाली ती हॉकीमुळे आणि ऑलिंपिकमुळे. वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू कमी पडत असताना, ऑलिंपिकच्या पदकतालिकेत देशाचं नाव झळकत असे ते केवळ हॉकीमुळे. ऑलिंपिकमध्ये सलग सहा वेळा व एकूण आठ वेळा सुवर्णपदक मिळविण्याचा विक्रम भारताच्या नावावर कायम आहे. उन्हाळी ऑलिंपिकमध्ये समाविष्ट असलेला या खेळाचा ऑलिंपिक परिषदेत अधिकृतरीत्या ‘फिल्ड हॉकी’ असाच स्पष्ट उल्लेख केला जातो. याचं कारण ऑलिंपिकमध्ये बर्फावर खेळली जाणारी ‘आईस हॉकी’ही असते.
आधुनिक ऑलिंपिकला प्रारंभ झाल्यानंतर १९०८मध्ये हॉकीचा समावेश करण्यात आला. त्यानंतरच्या ऑलिंपिकमध्ये हा खेळ नव्हता. तथापि ॲमस्टरडॅम ऑलिंपिकपासून हॉकीचा कायमस्वरूपी समावेश झाला. याच ऑलिंपिकमध्ये भारताने पदार्पण केलं आणि सुवर्णपदक पटकावलं. मॉस्को ऑलिंपिकमध्ये जिंकलेलं सुवर्णपदक भारताचं हॉकीमधलं शेवटचं ऑलिंपिक पदक. त्यानंतरच्या नऊ स्पर्धांमध्ये भारताला उपान्त्य फेरीही गाठता आली नाही. लंडनमधील ऑलिंपिकसाठी तर संघच पात्र ठरला नव्हता.
साधारण नव्वदच्या दशकापासून हॉकीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलत गेले. ह्या खेळात दीर्घ काळ वर्चस्व राखून असलेल्या आशियाई देशांचा भर कौशल्यपूर्ण व कलात्मक खेळावर होता. कृत्रिम मैदानावर खेळ सुरू झाल्यापासून त्यात कौशल्यापेक्षा ताकद व वेग याला अधिक महत्त्व आलं. खेळाच्या नियमांतही काही बदल झाले. ह्याचाच फटका आशियाई देशांना बसला, असं तज्ज्ञांचं मत आहे. नव्वदच्या दशकानंतर युरोपीय व ऑस्ट्रेलियाच्या खंडातील देशांचे वर्चस्व वाढत गेलेलं पाहायला मिळतं.
ऑलिंपिकच्या इतिहासात पुरुष गटात सर्वाधिक अकरा पदकं (आठ सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य) भारताने जिंकली आहेत. पाकिस्तानचा क्रमांक त्या पाठोपाठ लागतो – प्रत्येकी तीन सुवर्ण व रौप्य आणि दोन कांस्य. इंग्लंड व जर्मनी यांनी प्रत्येकी तीन वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. द नेदरलँड्सने दोन वेळा, ऑस्ट्रेलिया, पश्चिम जर्मनी, अर्जेंटिना व न्यूझीलंड प्रत्येकी एकदा सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. तीन ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करूनही स्पेनला सुवर्णपदकाला गवसणी घालणं अजून तरी शक्य झालेलं नाही.
........
(विविध संकेतस्थळांवरील माहितीचा ह्या लेखासाठी उपयोग झाला.)
............
#olympics #India #hockey #IndiainOlympics #TokyoOlympics #Olympics2020 #GoldMedal #Tokyo #Men'sHockey #women'sHockey #MajorDhyanChand
👌🏼👌🏼छान,हॉकीबद्दल तू म्हणतोस तसं ३५ - ४० वर्षांपूर्वी इंटरेस्ट होता, सध्या अजिबातच नाही. ध्यानचंद ह्यांना तरी कोणी विसरू शकत नाही. पण मला महंमद शाहीद आणि जफर इकबाल हे आपले फॉरवर्ड आठवतात, तसेच गोलरक्षक एम. आर. नेगी, ज्यांच्यावर 'चक दे इंडिया' हा सिनेमा निघालाय. असे मोजके काही खेळाडू आठवतायत,👍🏻
उत्तर द्याहटवा- जगदीश निलाखे, सोलापूर
सतीश,
उत्तर द्याहटवामजा आली. खरे तर अजूनही ऑलिंपिक व आपली हॉकी हे समीकरण पक्के डोक्यात बसलेले. रेडिओवर ऐकलेले धावते समालोचन, वि. वि. करमरकर ह्यांचे लेख, त्यांनी मांडलेला लेखाजोखा जसे आजच वाचले आहे असे वाटते. सर्व जुन्या आठवणींना तू उजाळा दिलास.
वैयक्तिक खेळाडूंनी मिळविलेल्या पदकांचे कौतुक वाटते, आनंद मिळतो. पण हॉकीत पदक नाही मिळाले, तर सारे काही मिळूनसुद्धा काही तरी न मिळाल्याचे दुःख मात्र जास्त होते.
तुझे लेख या जुन्या सुवर्ण आठवणींना उजाळा देतील हे मात्र नक्कीच.
- मंदार देशमुख, नाशिक
सर खुपच छान तसेच आपण योग्य वेळी अतिशय सुंदरप्रकारे हा विषय तो पण क्रिडाजगातील महत्त्वाची स्पर्धा याचा घेतला आईस हाँकी आपल्या लेखातून समजले तसेच न्युझीलंड या देशाने देखील 1 सुवर्ण पदक जिंकले आहे. आपणाकडून समजले. तसेच भारतीय आपला भारतीय हाँकी संघाने आठ वेळा सुवर्ण जिंकले आहे याचा खुप अभिमान वाटतो .भारतीय हाँकी संघाला नवव्या विजेतेपदा साठी खुप खुप शुभेच्छा तसेच आपले हे सदर खुप आवडले
उत्तर द्याहटवासतीशसर छान, ऑलिम्पिकच्या निमीत्ताने हाॅकीबद्दलच्या आठवणींना
उत्तर द्याहटवाउजाळा मिळाला.
या आॅलिंपिक पदकांइतकाच किंबहुना काकणभर सरसच असा भारतीय हाॅकी संघाचा पराक्रम म्हणजे १९७५ चे जागतिक कप विजेतेपद ...!
उत्तर द्याहटवाकुठल्याही खेळातला रस हा आपल्या जिंकण्याच्या शक्यतेवर अवलंबून असतो. त्यामुळेच गेली काही दशकं आपली नजर क्रिकेटवर असते. ह्याच कारणास्तव महिला वेट लिफ्टिंग सारखा पूर्णपणे अनोळखी खेळही चर्चेत असतो.
उत्तर द्याहटवा