Friday 16 July 2021

घसरगुंडीला सुरुवात


ऑलिंपिक, भारत आणि हॉकी - 

हक्क भारताचाच. ऑलिंपिकमध्ये भाग घेण्यास सुरुवात केल्यापासून भारतीय संघाने सुवर्णपदक कधी गमावले नव्हते. पण ते चित्र कायम राहणारे नव्हते, ह्याची चुणूक रोममधील खेळाने दाखविली. पाकिस्तानने सुवर्णपदक पटकावून आपली परंपरा खंडित केली. ते आपले हॉकीतील एकमेव रौप्यपदक होय. ह्या पराभवाचा बदला आपण टोकियोत घेतला खरा; पण उतरण चालू झाली होती. त्याचे लख्ख दर्शन मेक्सिको सिटीच्या स्पर्धेत झाले. तिथे भारताला पहिल्यांदाच गटात पराभव स्वीकारावी लागला. त्या आधी टोकियोमध्ये भारताचा ऑलिंपिकमधील सामना पहिल्यांदाच बरोबरीत सुटला होता. मेक्सिकोमध्ये तर भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. पश्चिम जर्मनीला हरवून भारताने कांस्यपदक जिंकले.

रोम (१९६०)

कृष्णवर्णीय आफ्रिकी धावपटू अबेबे बिकिला ह्याच्या कामगिरीमुळे गाजलेल्या ह्या ऑलिंपिकमध्ये हॉकीतही नवा इतिहास लिहिला गेला. सुवर्णपदकांचा षट्कार मारणाऱ्या भारताची शानदार वाटचाल रोममध्ये खंडित झाली. ती करणारा देश होता पाकिस्तान. जपानचा पुन्हा प्रवेश झाला, तर अफगाणिस्तानचा संघ दीर्घ काळानंतर नव्हता. सहभागी १६ संघांचे चार गट करण्यात आले. प्रत्येकी गटातून दोन संघ उपान्त्यपूर्व फेरीत गेले. 

भारताने ‘अ’ गटात एकही सामना न गमावता पहिले स्थान मिळविले. रघुबीरसिंग भोला व प्रिथपालसिंग ह्यांच्या प्रत्येकी तीन गोलांच्या जोरावर पहिल्या सामन्यात भारताने डेन्मार्कचा १०-० असा फडशा पाडला. पीटर व जसवंतसिंग ह्यांनी प्रत्येकी दोन गोल केले. त्यानंतर नेदरलँड्सवर ४-१ (प्रिथपालसिंग २, जसवंतसिंग व भोला प्रत्येकी १ गोल) आणि न्यूझीलंडवर ३-० असा सहज विजय मिळविला. न्यूझीलंडविरुद्धच्या विजयात भोला, पीटर व जसवंतसिंग ह्यांचा एक गोलचा समान वाटता होता. गटातील उपविजेता ठरविण्यासाठी झालेल्या जादा सामन्यात न्यूझीलंडने नेदरलँड्सवर मात केली.

पाकिस्तानने ‘ब’ गटांतील तिन्ही सामने सहज जिंकले. जपानवर त्यांनी १०-० आणि पोलंडवर ८-० अशी मात केली. या गटाचाही उपविजेता ठरविण्यासाठी ऑस्ट्रेलिया व पोलंड ह्यांच्यात जादा सामना खेळवावा लागला. ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून उपान्त्यपूर्व फेरी गाठली. ‘क’ गटात केनियाने अव्वल स्थान पटकावून धमाल उडवून दिली. त्यांनी दोन सामने जिंकले, तर फ्रान्सविरुद्धची लढत अनिर्णीत राहिली. केनियाकडून पराभव पत्करावा लागल्याने संयुक्त जर्मनीला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ‘ड’ गटातून स्पेन व इंग्लंड बाद फेरीत गेले. स्पेनने दोन सामने जिंकले व एक अनिर्णीत राहिला. इंग्लंडने एक सामना जिंकला व दोन अनिर्णीत राखले. त्यामुळे बेल्जियम इंग्लंडपेक्षा एका गुणाने मागे व गटात तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

उपान्त्यपूर्व फेरीचे चारही सामने कमी गोलसंख्येचे व चुरशीचे झाले. भारताने ऑस्ट्रेलियाचा १-० फरकाने पराभव केला. हा विजयी गोल भोलाचा होता. इंग्लंडने केनियाचा २-१, पाकिस्तानने संयुक्त जर्मनीचा २-१ आणि स्पेनने न्यूझीलंडचा १-० असा पराभव केला. उपान्त्य फेरीत दोन-दोन  आशियाई व युरोपीय संघ आले. भारताने ब्रिटनचा १-० असा आणि पाकिस्ताननेही स्पेनचा त्याच गोलफरकाने पराभव केला. भारताला अंतिम सामन्यात नेणारा गोल उधमसिंग कुल्लरचा होता. सलग दुसऱ्या ऑलिंपिकमध्ये भारत-पाकिस्तान अशी अंतिम लढत रंगणार होती. कांस्यपदकासाठीच्या लढतीत स्पेनने इंग्लंडचा २-१ असा पराभव केला.


लेस्ली क्लॉडियस - सलग चार स्पर्धा खेळणारा
पहिला भारतीय हॉकीपटू
भारत सातव्यांदा सुवर्णपदक जिंकणार का, हाच अंतिम सामन्यातला लक्षवेधक प्रश्न होता. पण मेलबर्नमधील पराभवाचा बदला पाकिस्तानने घेतला. भारताची घोडदौड थांबवत पाकिस्तानने हा सामना १-० असा जिंकला आणि पहिले सुवर्णपदक मिळविले. इनसायडर लेफ्ट नसीर बंदाने अकराव्या मिनिटाला केलेला गोलच भारताचे वर्चस्व मोडून काढणारा ठरला. त्यानंतर भारताने जोरदार आक्रमण केले. पण पाकिस्तानी बचाव भेदण्यात अपयश येऊन सुवर्ण सिंहासन सोडावे लागले.

रोम ऑलिंपिक दोन गोष्टींमुळे भारतीयांच्या कायमच लक्षात राहणार, ते दोन गमावलेल्या पदकांमुळे - हॉकीतील सुवर्ण आणि 'फ्लाइंग सीख' नाव मिळालेल्या मिल्खासिंग ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत चौथा राहिल्याने. पदकात आणि मिल्खा ह्यांच्यामध्ये अंतर होते ते ०.०१ सेकंदाचे.

टोकियो (१९६४) 

आशिया खंडात झालेले हे पहिलेच ऑलिंपिक. त्यामध्ये हॉकीतील सुवर्ण व रौप्य आशियाई देशांनीच मिळविली. भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये सलग तिसऱ्या स्पर्धेत अंतिम लढत झाली आणि गमतीचा भाग म्हणजे या तिन्ही लढतींचा गोलफलक तोच होता : १-०!

स्पर्धेच्या स्वरूपात पुन्हा थोडा बदल झाला. सहभागी १५ संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली. साखळी सामन्यानंतर गटातील पहिल्या दोन क्रमांकांवरील संघ उपान्त्य फेरीसाठी पात्र ठरले. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकांवरील संघ ‘कन्सोलेशन सेमीफायनल’साठी (म्हणजे पाचवा व सहावा क्रमांक ठरवण्यासाठी) निवडले गेले. ‘अ’ गटामध्ये पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, केनिया, जपान, इंग्लंड, ऱ्होडेशिया व न्यूझीलंड संघ होते. ‘ब’ गटामध्ये आठ संघ होते. भारत, स्पेन, संयुक्त जर्मनी, द नेदरलँड्स, मलेशिया, बेल्जियम, कॅनडा व हाँगकाँग हे ते संघ होत. स्पर्धेत आशियातील पाच देश होते.

भारताचा समावेश असलेल्या ‘ब’ गटातील साखळी सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस दिसली. तब्बल आठ सामने बरोबरीत सुटले. रोम ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदा पराभव पत्कराव्या लागलेल्या भारतीय संघाला इथेही कडवा प्रतिकार झाला. साखळीतील पहिल्या सामन्यात बेल्जियमला २-० हरवून भारताने चांगली सुरुवात केली. प्रिथपालसिंग व हरिपाल कौशिक ह्यांनी प्रत्येकी एक गोल केला. पुढची लढत होती जर्मनीबरोबर आणि ती बरोबरीत सुटली. बरोबरीचा निकाल लागलेला हा भारताचा ऑलिंपिकमधील पहिलाच सामना. त्यात जर्मनीने आघाडीच घेतली होती. प्रिथपालच्या गोलने बरोबरी साधली. स्पेनविरुद्धच्या लढतीत तेच झाले. पुन्हा एकदा १-१ अशी बरोबरी. ह्या वेळी मदतीला धावला होता मोहिंदर लाल.


टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताने केलेल्या गोलांपैकी निम्मे होते
प्रिथपालसिंगचे. (छायाचित्र सौजन्य photonews,org,nz)
दोन सामने बरोबरीत सुटल्याने भारतीय गोटात काळजीचे वातावरण होतेच. पण त्यानंतरच्या पाचही सामन्यांमध्ये जय मिळवत आपण गटात पहिले स्थान राखले. हाँगकाँगला ६-० पराभूत करताना आपल्या संघाला सूर गवसला. प्रिथपाल, दर्शनसिंग व हरबिंदरसिंग ह्यांनी प्रत्येकी दोन गोल केले. पुढचा सामना होता मलेशियाशी. प्रिथपालचे दोन व हरबिंदरचा एक गोल ह्यामुळे आपल्याला ३-१ विजय मिळविता आला. ह्याच जोडीमुळे कॅनडावर ३-० विजय मिळाला. इथे हरबिंदरने दोन व प्रिथपालने एक गोल केला. गटातील शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध २-१ असा विजय मिळाला. हे गोल प्रिथपाल व जॉन पीटर ह्यांनी केले. गटातील सामन्यांमध्ये भारतीय संघाचे वैशिष्ट्य असलेला गोलांचा पाऊस दिसला नाही. सातपैकी सहा सामन्यांमध्ये प्रिथपालसिंगचे गोल होतेच.

ह्या गटात स्पेनने चार विजय व तीन बरोबरी यांसह दुसरे स्थान मिळविले. जर्मनीने तर बरोबरीच्या सामन्यांचा जणू विक्रम केला. त्यांच्या पाच लढती बरोबरीत सुटल्या. तो संघ तिसऱ्या व नेदरलँड्स चौथ्या क्रमांकावर राहिला. तळाच्या हाँगकाँगनेही एक सामना बरोबरीत सोडवला. फक्त कॅनडाच्याच सर्व लढती निकाली झाल्या. या गटात सर्वाधिक म्हणजे २० गोल नेदरलँड्सने केले. भारताने १८ व स्पेनने १६ गोल नोंदविले.

पाकिस्तानने सहाही सामन्यांत विजय मिळवून ‘अ’ गटात सहज पहिला क्रमांक मिळविला. चार सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दुसरे स्थान मिळविले. केनिया व ऱ्होडेशिया ह्या आफ्रिकी देशांचा सामना बरोबरीत सुटला आणि त्यामुळे केनिया तिसऱ्या स्थानावर राहिला. यजमान जपानची कामगिरी तीन विजय व तेवढेच पराभव अशी राहिली. इंग्लंडला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांना ऑस्ट्रेलियाने ७-० असे हरवले. हा या गटातील सर्वांत मोठा विजय. पाकिस्तानने १७ आणि  ऑस्ट्रेलियाने १६ गोल केले.

पहिल्या उपान्त्य सामन्यात पाकिस्तानने स्पेनला ३-० असे सहज हरविले. भारताने ऑस्ट्रेलियावर ३-१ अशी मात केली. प्रिथपालने पुन्हा दोन गोल नोंदवित चमक दाखविली. मोहिंदरने एक गोल केला.

हे दोन संघ सलग तिसऱ्या ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकासाठी झुंजणार होते. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्पेनला ३-२ असे हरविले. दुसऱ्याच ऑलिंपिकमध्ये ऑस्ट्रेलियाने पदक मिळविले. इंग्लंड मात्र पदकापासून वंचित राहिले.

टोकियो ऑलिंपिकमधील पदक वितरण समारंभ. भारतीय संघाचा कर्णधार चरणजितसिंग.
(छायाचित्र भारतीय हॉकी संकेतस्थळाच्या सौजन्याने.)

अंतिम सामना दि. २३ ऑक्टोबरला झाला. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील ही लढत अटीतटीची झाली. पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला. उत्तरार्धाचा खेळ सुरू झाल्यानंतर पाचव्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर प्रिथपालसिंग ह्याने घेतला. त्याचा सणसणीत फटका गोलरक्षकाच्या पायाला धडकून परतला आणि पाकिस्तानी फुल बॅक मुनीर दरने तो पायाने अडवला. त्यामुळे मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर सेंटर हाफ मोहिंदर लालने सुवर्ण गोल केला! हवामान थंड असले, तरी ह्या सामन्यात बरीच गरमागरमी झाली. काही पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंवर हल्ला केल्याने सामना काही वेळापुरता थांबवावा लागला. पिछाडीवर पडलेल्या पाकिस्तानने नंतर जोरदार आक्रमण केले. गोलरक्षक शंकर लक्ष्मण याने दोन गोल वाचविले आणि तोच सामन्याचा मानकरी ठरला.

भारताने एकूण २२ गोल केले; त्यातील निम्मे प्रिथपालसिंगचे होते! व्ही. जे. पीटर ह्याचे हे दुसरे ऑलिंपिक. मेक्सिको सिटीतील ऑलिंपिकनंतर तो निवृत्त झाल्यानंतर पुढच्या दोन ऑलिंपिकमध्ये त्याचा भाऊ व्ही. जे. फिलिप्स भारतीय संघात होता. अशा तऱ्हेने दोन भावांनी सोळा वर्षे देशाचे प्रतिनिधित्व केले.

मेक्सिको सिटी (१९६८) 

उत्तर अमेरिका खंडामध्ये झालेले हे दुसरे ऑलिंपिक. स्पर्धेत सहभागी १६ संघांची दोन गटांत विभागणी करून साखळी सामने झाले. ह्या ऑलिंपिकचे वैशिष्ट्य म्हणजे सलग तीन ऑलिंपिकनंतर अंतिम लढत आशियाई देशांमध्ये झाली नाही. पाकिस्तानने दुसरे सुवर्ण पटकाविले, तर भारताला पहिल्यांदाच कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. साखळी सामन्यात भारताला पहिल्यांदाच पराभवाची चव चाखावी लागली. भारतीय वर्चस्व कमी होऊ लागल्याचे संकेत याच ऑलिंपिकने दिले. इथे दोन बलबीरसिंग आपल्या संघाकडून खेळले. त्यातील एक सैन्यदलात व दुसरा रेल्वेच्या सेवेत होता. फाळणीनंतर पहिल्यांदाच जर्मनीच्या संयुक्त संघाऐवजी (युनायटेड टीम ऑफ जर्मनी) पूर्व व पश्चिम जर्मनी असे दोन संघ उतरले आणि ते दोन्ही एकाच गटात होते. सहभागी संघांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी सामने खेळविले गेले. 

‘अ’ गटामध्ये यजमान मेक्सिकोसह भारत, पश्चिम जर्मनी, न्यूझीलंड, बेल्जियम, स्पेन, पूर्व जर्मनी व जपान संघ होते. भारताने साखळीतील सातपैकी सहा सामने जिंकून पहिले स्थान मिळविले. सलामीच्या सामन्यातच न्यूझीलंडने भारताला २-१ असा धक्का दिला. हा ऑलिंपिकमधला भारताचा गटसाखळीतील पहिला पराभव. भारतीयांकडूनचा एकमेव गोल मागच्या ऑलिंपिकचीच चमक पुन्हा दाखवणाऱ्या प्रिथपालसिंगने केला. या पराभवातून सावरत भारताने नंतरचे सर्व सामने जिंकले.

दुसऱ्या सामन्यात पश्चिम जर्मनीने जोरदार प्रतिकार केला, तरी २-१ विजय मिळविण्यात भारताला यश आले. हरबिंदरसिंग व बलबीर (सैन्यदल) ह्यांनी प्रत्येकी एक गोल केला. त्यानंतरच्या सामन्यात ह्या ऑलिंपिकमधील आपला सर्वांत मोठा विजय (८-०) साकारला यजमानांविरुद्ध. हरबिंदरने तीन, प्रिथपालने दोन गोल केले. बलबीर (सैन्यदल), अजितपाल सिंग व इंदरसिंग ह्यांचा वाटा प्रत्येकी एका गोलाचा राहिला. एवढ्या मोठ्या विजयानंतरही संघाचा कस लागतच राहिला. प्रिथपालच्या एकमेव गोलामुळे स्पेनविरुद्ध कसाबसा विजय मिळविता आला. बेल्जियमनेही कडवा प्रतिकार करीत सहज विजय मिळवू दिला नाही. प्रिथपाल व हरबिंदरसिंग ह्यांच्या एक-एक गोलामुळे आपण २-१ असा विजय मिळविला.

दोन अटीतटीच्या लढतीनंतर मग समोर उभा होता जपानचा संघ. पेनल्टी स्ट्रोक दिल्याचा निर्णय न पटल्याने जपानने पंचावनाव्या मिनिटाला मैदान सोडले, तेव्हा भारताकडे ५-० अशी निर्णायक आघाडी होती. पूर्व जर्मनीनेही कडवी झुंज दिली. ह्या सामन्यातील एकमेव गोल केला प्रिथपालने. ह्या गटातील सहा सामने बरोबरीत सुटले. पश्चिम जर्मनीने पाच सामने जिंकून दुसरा क्रमांक मिळविला. सर्व सामन्यांमध्ये पराभूत झालेला यजमानांचा संघ तळाला राहिला.

‘ब’ गटामध्ये पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, केनिया, द नेदरलँड्स, इंग्लंड, फ्रान्स, अर्जेंटिना व मलेशिया संघ होते. पाकिस्तानने सातही सामने जिंकून गटामध्ये अव्वल स्थान अबाधित राखले. समान गुणांमुळे दुसऱ्या क्रमांकाचा संघ निवडण्यासाठी जादा सामना खेळवला गेला. त्यात ऑस्ट्रेलियाने केनियाला हरविले. पाकिस्तानचा सर्वांत मोठा विजय नेदरलँड्सविरुद्ध (६-०) होता. अर्जेंटिनाविरुद्ध पाच व मलेशियाविरुद्ध चार गोल करताना त्यांनी एकही गोल चढू दिला नाही. ऑस्ट्रेलिया (३-२), फ्रान्स (१-०), इंग्लंड (२-१) व केनिया (२-१) यांनी मात्र चांगला प्रतिकार केला. गटातील चार सामने बरोबरीत सुटले. एकही विजय न मिळवणारा एकमेव संघ मलेशियाचा होता.

उपान्त्य सामने २४ ऑक्टोबर रोजी खेळले गेले. पहिल्याच लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताला २-१ असे चकित केले. भारत पहिल्यांदाच अंतिम सामन्यात दिसणार नव्हता. कांगारूंविरुद्धचा गोल केला तो सैन्यदलातील बलबीरने. पूर्व जर्मनीचा कडवा प्रतिकार मोडत पाकिस्तानने १-० अशा गोलफरकाने पुन्हा अंतिम फेरी गाठली. दि. २६ ऑक्टोबरचा अंतिम सामनाही चुरशीचा झाला. त्यात ऑस्ट्रेलियाची झुंज १-२ अशी अपयशी ठरली आणि पाकिस्तानने दुसरे सुवर्णपदक जिंकले. कांस्यपदकाच्या लढतीत भारताने पश्चिम जर्मनीवर पुन्हा त्याच गोलफरकाने (२-१) विजय मिळविला. प्रिथपालसिंग व बलबीर (रेल्वे) ह्यांनी गोल केले. भारताचे हे पहिले कांस्यपदक. ह्याची बरीच कारणे आहेत. त्यातील एक महत्त्वाचे म्हणजे संघात एकवाक्यता नव्हती. भारतीय हॉकी महासंघाने ऑलिंपिकसाठी दोन संयुक्त कर्णधार नेमले. अनुभवी प्रिथपालचे संघातील बऱ्याच खेळाडूंशी पटत नसल्याने गुरुबक्षसिंग ह्यालाही संयुक्त कर्णधार नेमण्यात आले. स्वाभाविकच संघात फार काही एकजिनसीपणा नव्हता.

(संदर्भ - olympics.com आणि विकिपीडिया, स्पोर्ट्स.एनडीटीव्ही 'द हिंदू', भारतीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, भारतीय हॉकी ह्यांची संकेतस्थळे.)

.........

आधीचे भाग इथे वाचा

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey1.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey2.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey3.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey4.html


#भारतआणिऑलिंपिक #हॉकीचे_सुवर्णयुग #Olympics #India #hockey #IndiainOlympics #TokyoOlympics #GoldMedal #Tokyo #MensHockey #Rome1960 #Tokyo1964 #MexicoCity1968 #INDvsPAK #prithpalsingh #LeslieClaudius 

3 comments:

  1. छान आणि विस्तृत माहिती

    ReplyDelete
  2. Congratulations Satish ji 👍, informative write up. Love the historical pictures.

    Keep it up.

    ReplyDelete
  3. माहितीपूर्ण लेख!!
    💐💐

    ReplyDelete

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...