रविवार, १८ जुलै, २०२१

वर्चस्वाला सुरुंग

ऑलिंपिक, भारत आणि हॉकी - 


उपान्त्य सामन्यात पराभव. पाकिस्तानी आक्रमकाचा फटका अडविण्यात भारतीय बचावफळीला
अपयश. समाधान कांस्यपदकावर. (छायाचित्र सौजन्य scroll.in)

म्यूनिच, माँट्रिअल आणि मॉस्को... हे प्रत्येक ऑलिंपिक भारतीय हॉकीला, तिच्या चाहत्यांना वेगळाच अनुभव देऊन गेले. अंतिम फेरी हुकण्याचा अनुभव मेक्सिको सिटीप्रमाणं म्यूनिचनंही दिला. पण तिथंही किमान कांस्यपदक तरी मिळालं, ह्याचं समाधान होतं. पण तेही माँट्रिअलमध्ये हिरावलं गेलं. एकच वर्ष आधी विश्वचषक जिंकणारा हा संघ साखळीतच गारद झाला. मॉस्कोमध्ये भारतानं आठवं सुवर्ण जिंकलं खरं; पण ते यश म्हणावं तेवढं चोख नव्हतं. जगातले बहुतेक बलाढ्य देश स्पर्धेत सहभागी नसतानाही भारताला सर्व सामने जिंकता आले नाहीत. तथापि भळभळत्या जखमेवर त्या सुवर्णपदकाची तात्पुरती मलमपट्टी झाली, एवढं मात्र खरं.

म्यूनिच (१९७२)

पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी ‘ऑलिंपिक व्हिलेज’वर केलेल्या भीषण हल्ल्याने या ऑलिंपिकची इतिहासात वेगळीच नोंद झाली. अगदी तशीच नकोशी नोंद हॉकीतील अंतिम सामन्यानंतर झाली. अंतिम सामन्यात यजमान पश्चिम जर्मनीकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू, संघाचे पदाधिकारी व पाठीराखे यांनी अभूतपूर्व गोंधळ घातला. सामना संपल्याची शिटी वाजताच हे सारे मैदानात धावले. खेळाडूंनी रौप्यपदक गळ्यात घालण्यासही नकार देत ती फेकून दिली. पश्चिम जर्मनीच्या ह्या विजयाने तब्बल ५२ वर्षांनंतर सुवर्णपदक युरोप खंडात आले. पूर्व जर्मनीचा संघ स्पर्धेत नव्हता. आशियाई वर्चस्वाला धक्का मिळण्यास याच स्पर्धेने सुरुवात झाली. भारताच्या दृष्टीने पाहायचे झाले, तर सलग दुसऱ्या स्पर्धेत आपण अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरलो. त्याच बरोबर ऑलिंपिकमधील दुसरे कांस्यपदक आपल्या वाट्याला आले.

एकूण १६ संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली. गटवार साखळी आणि नंतर बाद सामने असे स्वरूप कायम राहिले. भारताचा समावेश असलेल्या ‘ब’ गटात हॉलंड (द नेदरलँड्स), इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पोलंड, केनिया व मेक्सिको संघ होते. भारत व नेदरलँड्स यांनी सारखेच म्हणजे पाच सामने जिंकले. तथापि एका पराभवामुळे नेदरलँड्सचा एक गुण कमी झाला आणि गटात दुसरा क्रमांक राहिला.

गटामध्ये अव्वल स्थान मिळविलेल्या भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. नेदरलँड्सविरुद्धची सलामीची लढत बरोबरीत (१-१) सुटली. हा एकमेव गोल होता अशोककुमारचा. मेजर ध्यानचंद ह्यांचा हा सुपुत्र. त्यानंतरच्या दोन सामन्यांत मात्र भारताला चांगला सूर सापडला. मुखबैनसिंगचे तीन गोल, मायकेल किंडो व कर्णधार हरमिकसिंग (प्रत्येकी एक गोल) ह्यांच्या जोरदार खेळामुळे इंग्लंडविरुद्ध ५-० असा दणदणीत विजय मिळाला. त्यानंतर गाठ पडली ऑस्ट्रेलियाशी. तिथे पुन्हा चमकला मुखबैनसिंग. त्याच्या हॅटट्रिकमुळे आपण ३-१ गोलफरकाने जिंकलो. मेक्सिको सिटी स्पर्धेतील पराभवाचा जणू बदलाच होता हा.

सलग दोन विजयांनंतर संघ काहीसा ढेपाळला आणि पुन्हा एक बरोबरी झाली. पोलंडने पिछाडीवरून भारताला २-२ असे अडविले. हरमिकसिंग व पी. बी. गोविंदा ह्यांनी प्रत्येकी एक गोल केला. पुढचा सामनाही अटीतटीचाच झाला. चांगली झुंज देणाऱ्या केनियाला ३-२ हरविण्यात आपल्याला यश आले. मुखबैनने पुन्हा दोन गोल केले. हरमिकने एक गोल करून त्याला साथ दिली. त्यानंतरच्या सामन्यात भारताने प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली. कुलवंतसिंग (३), अशोककुमार (२), हरमिक, किंडो व गोविंदा (प्रत्येकी १) ह्यांना सूर सापडल्याने मेक्सिकोविरुद्ध दणदणीत विजय (८-०) मिळाला. गटातील अखेरचा सामना होता न्यूझीलंडशी. त्यातही विजयासाठी झगडावे लागले. कुलवंतसिंग, एम. पी. गणेश व किंडो ह्यांनी प्रत्येकी एक गोल केला. ह्या सामन्यात ३-२ विजय मिळवून भारताने गटात पहिला क्रमांक मिळविला.

मेक्सिको सिटी ऑलिंपिकच्या तुलनेत चांगली कामगिरी करूनही इंग्लंडला पदकांच्या शर्यतीत स्थान मिळाले नाही. गत रौप्यपदकविजेत्या ऑस्ट्रेलियाला सूर गवसला नाही. तीन विजय, प्रत्येकी दोन पराभव व बरोबरी यामुळे त्यांचे गटात चौथे स्थान राहिले. मेक्सिकोची पाटी कोरीच राहिली. संघाला पूर्ण स्पर्धेत अवघा एक गोल करता आला.

‘अ’ गटात यजमानांसह पाकिस्तान, मलेशिया, स्पेन, बेल्जियम, फ्रान्स, अर्जेंटिना आणि युगांडा संघ होते. पश्चिम जर्मनीची वाटचाल यजमानांना साजेशी दिमाखदार झाली. संघाने सातपैकी सहा सामने जिंकले व एक बरोबरीत सुटला. त्यांनी बेल्जियम (५-१), मलेशिया (१-०), अर्जेंटिना (२-१), पाकिस्तान (२-१), स्पेन (२-१) आणि फ्रान्स (४-०) असे विजय मिळवले. युगांडाने आश्चर्याचा धक्का देत त्यांच्याबरोबरचा सामना १-१ बरोबरीत सोडवला. गटात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या पाकिस्तानला एका पराभवाची चव चाखावी लागली आणि एक सामना बरोबरीत सुटला. मलेशिया व फ्रान्स संघांवर पाकिस्तानने प्रत्येकी ३-०, तर युगांडा, अर्जेंटिना व बेल्जियम यांच्याविरुद्ध प्रत्येकी ३-१ गोलने विजय मिळवला. स्पेनबरोबरची लढत बरोबरीत सुटली. ह्या गटातील सात सामने बरोबरीत सुटले. त्यात सर्वाधिक चार सामने स्पेनचे होते. फक्त फ्रान्सच्या सर्व लढती निकाली झाल्या.

दोन्ही उपान्त्य सामने ८ सप्टेंबर रोजी झाले. पश्चिम जर्मनीने नेदरलँड्सचा ३-० असा सहज पराभव केला. पारंपरिक प्रतिस्पर्ध्याशी पहिल्यांदा उपान्त्य लढत खेळताना भारताला सूर सापडलाच नाही. पाकिस्तानने ही लढत २-० फरकाने जिंकली. कांस्यपदकासाठी १० सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यात भारताने द नेदरलँड्सचा २-१ पराभव केला. गोविंदा व मुखबैन ह्यांनी प्रत्येकी एक गोल केला.

अंतिम सामना गाजला तो वेगळ्याच अर्थाने. मिकेल क्राऊज याने साठाव्या मिनिटाला केलेला गोल सामन्यातला एकमेव होता. त्याच जोरावर पश्चिम जर्मनीने हॉकीतले पहिले सुवर्ण जिंकले. पण पाकिस्तानी संघाला हा पराभव पचविता आला नाही. त्यांचे खेळाडू, अधिकारी ह्यांनी गोंधळ घातला.

भारताने इथे तुलनेने तरुण, नवोदितांचा संघ उतरविला. मेक्सिको सिटी ऑलिंपकमध्ये खेळलेले फक्त चौघेच संघात होते. हॉकीचे सुपर स्टार बनलेल्या अशोककुमार, गोविंदा, मायकेल किंडो ह्यांचे पदार्पण ह्याच ऑलिंपिकमध्ये झाले. किंडो हा देशाकडून खेळणारा पहिला आदिवासी हॉकीपटू. पुढे ऑलिंपिकमध्ये टेनिसचे पहिले कांस्यपदक जिंकून देणाऱ्या लिएंडर पेसचे वडील व्हेस पेस ह्यांचा संघात समावेश होता. भारताने पूर्ण स्पर्धेत केलेल्या गोलांमधील एक तृतीयांश, म्हणजे नऊ गोलांचा वाटा एकट्या मुखबैनचा होता.

माँट्रिअल (१९७६)

बहिष्काराच्या अस्त्राला याच ऑलिंपिकपासून सुरुवात झाली आणि त्यात पुढची तीन ऑलिंपिक झाकोळून गेली. वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून टांझानियासह २२ आफ्रिकी देशांनी बहिष्कार टाकला. नादिया कोमनेची नावाचा जिम्नॅस्टिक्समधील तारा इथेच उदयास आला. हॉकी स्पर्धेतील सहभागी संघाची संख्या पाचने कमी झाली. इंग्लंडचा संघही नव्हता. कृत्रिम हिरवळीवर खेळवली गेलेली ही पहिलीच स्पर्धा. आदल्या वर्षी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत विजेता ठरलेल्या भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. तथापि पदरी निराशाच पडली. ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदाच भारत गटसाखळीत गारद झाला. एकही आशियाई संघ नसलेली अंतिम लढत तब्बल ४८ वर्षांनी झाली.

अकरा संघांचे दोन गट, गटात साखळी सामने व त्यातील पहिले दोन संघ उपान्त्य फेरीत हा आराखडा कायम राहिला. ‘अ’ गटात द नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, भारत, मलेशिया, कॅनडा व अर्जेंटिना संघ होते. नेदरलँड्सने पाचही सामने जिंकून उपान्त्य फेरीत प्रवेश निश्चित केला.

एक वर्षच आधी कुआलालम्पूर येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या अजितपाल सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. संघाने अर्जेंटिनाला ४-० असे लीलया हरवून मोहिमेची सुरुवात चांगली केली. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला कर्णधार अजितपालने गोल केला. चांदसिंग व सुरजितसिंग ह्यांनी भारताची आघाडी वाढविली. कर्णधाराने सहासष्टाव्या मिनिटाला आणखी एक गोल करून विजयावर शिक्कामोर्तब केलं. पण पुढच्याच सामन्यात धक्का बसायचा होता. द नेदरलँड्सने भारताला ३-१ असं चकित केलं. आपल्याकडून एकमेव गोल व्हिक्टर जॉन फिलिप्सनं केला.

हा पराभव कमी वाटावा असा निकाल त्यानंतरच्या लढतीचा लागला. ऑस्ट्रेलियाने ६-१ असा दणदणीत पराभव केला. ऑलिंपिकमधला हा भारताचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा पराभव होय! कांगारूंकडून रोनाल्ड विल्यम रीलेने धडाका लावत तीन गोल केले. सुरजितसिंगने एकविसाव्या मिनिटाला केलेला गोल एवढाच काय तो दिलासा. त्यानंतर कॅनडा व मलेशिया ह्यांच्याविरुद्धचे सामने भारताने ३-० याच गोलफरकाने जिंकले. कॅनडाविरुद्ध फिलिप्सनं दोन व अजितपालनं एक गोल केला. अशोककुमार (दोन) व सुरजितसिंग (एक) मलेशियाविरुद्धच्या विजयाचे मानकरी.

ह्या गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ निवडण्यासाठी टाय ब्रेकरचा अवलंब करावा लागला. भारत व ऑस्ट्रेलिया ह्यांचे समान गुण होते. गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ निवडण्यासाठी त्यांच्यात जादा सामना खेळविण्यात आला. त्यात चार्ल्सवर्थने तेहतिसाव्या मिनिटाला गोल करून ऑस्ट्रेलियाला आघाडी दिली. पण त्यानंतर मिनिटभरातच सुरजितसिंगने बरोबरी साधला. अखेर त्याच गोलफलकावर सामना १-१ असा बरोबरीत सुटला. निर्णय तर होणे आवश्यक होते. त्यामुळे पेनल्टी स्ट्रोकचा आधार घेण्यात आला. त्यात ऑस्ट्रेलियाने ५-४ अशी बाजी मारली. चौथा पेनल्टी स्ट्रोक घेणारा अजितसिंग अपयशी ठरला आणि पहिल्यांदाच भारताला पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागलं. भारताच्या गोलफरकामध्येही लक्षणीय फरक झाला. केलेले गोल व स्वीकारलेले गोल यातील अंतर तीनवर (१२-९) आले. मलेशियाने दोन, तर कॅनडा व अर्जेंटिना यांनी प्रत्येकी एक सामना जिंकला. गटात तळाला राहिलेल्या अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते.

‘ब’ गटामध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, स्पेन, पश्चिम जर्मनी व बेल्जियम संघ होते. गटात पहिल्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानलाही स्पेनविरुद्ध बरोबरी (२-२) स्वीकारावी लागली. त्यांनी बेल्जियम (५-०), पश्चिम जर्मनी (४-२) आणि न्यूझीलंड (५-२) ह्यांना सहज हरविलं. या गटातही दुसऱ्या क्रमांकासाठी टाय निर्माण झाला. त्यामुळे खेळविल्या गेलेल्या जादा सामन्यात न्यूझीलंडने स्पेनला १-० हरविलं आणि उपान्त्य लढतीत जागा मिळविली. ह्या दोन्ही संघांमधील गटसाखळीचा सामना बरोबरीत सुटला होता. गटातील तीन सामने बरोबरीत सुटले. म्यूनिचमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या पश्चिम जर्मनीची कामगिरी सुमार झाली व संघाला गटात चौथे स्थान मिळाले.

पहिल्या उपान्त्य सामन्यात जादा वेळेत न्यूझीलंडने द नेदरलँड्सला २-१ असे हरवून पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियानेही पाकिस्तानला ह्याच गोलफरकाने हरविले आणि ऑलिंपिक हॉकीचा अंतिम सामना पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया खंडातील दोन देशांमध्ये झाला. दि. ३० जुलैला झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला १-० हरवून पहिलं सुवर्णपदक जिंकलम. कांस्यपदकाच्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सला ३-२ हरविलं. पश्चिम जर्मनीविरुद्धचा सामना २-३ असा गमावल्यावर भारताला सातव्या-आठव्या क्रमांकाच्या लढतीत खेळणं भाग पडलं. मलेशियाला २-० हरवून भारताने कसंबसं सातवं स्थान मिळविलं.

माँट्रिअलमधील भारताची कामगिरी धक्कादायक होती. त्याचे पडसाद पुढं दीर्घ काळ उमटत राहिले. कृत्रिम हिरवळीच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव सोडाच; भारतीय संघातल्या बऱ्याच खेळाडूंनी ते पाहिलंही नव्हतं. त्यातच संघात वाद होऊन दोन गट पडले. ह्या साऱ्याच्या परिणामी विश्वविजेत्यांची सातव्या क्रमांकावर घसरण झाली.

मॉस्को (१९८०)

सोव्हिएत रशिया-अमेरिका शीतयुद्धाचा फटका बसलेलं ऑलिंपिक, हीच त्याची खरी ओळख. रशियाने अफगाणिस्तानात घुसखोरी केल्याच्या निषेधार्थ अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अनेक देशांनी बहिष्कार टाकला. त्याचा परिणाम हॉकीवरही झाला. महिला हॉकीचं पदार्पण ह्याच स्पर्धेतून झालं. त्यालाही बहिष्काराचा फटका बसला. भारतासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीन स्पर्धांच्या अंतरानंतर हॉकीचं सुवर्णपदक जिंकता आलं.


प्रदीर्घ काळानंतर मिळालेलं सुवर्णपदक. मॉस्को ऑलिंपिकमधील हे यश
फारसं महत्त्वाचं मानलं गेलं नाही. (छायाचित्र सौजन्य - भारतीय हॉकी)

पुरुष विभागात १२ सहभागी संघांचं विभाजन दोन गटांमध्ये करण्यात आलं. तथापि माँट्रिअले ऑलिपिंकमधील पदकविजेत्यांसह - न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान - अर्जेंटिना, केनिया, मलेशिया, पश्चिम जर्मनी,, इंग्लंड, द नेदरलँड्स असे नऊ संघ सहभागी झालेच नाहीत. त्यामुळे भारत, स्पेन, यजमान सोव्हिएत रशिया, पोलंड, क्यूबा व शेवटच्या क्षणी प्रवेश दिलेला टांझानिया ह्या सहा देशांची स्पर्धा साखळी पद्धतीने झाली. त्यातील पहिल्या दोन संघांमध्ये सुवर्ण-रौप्यपदकासाठी आणि तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या संघांमध्ये कांस्यपदकासाठी लढती झाल्या. ह्या स्पर्धेत गोलांचा नुसता पाऊस पडला. साखळी सामन्यांमध्ये एकूण १३१ गोल झाले.

स्पर्धा एवढी सोपी असूनही भारताला काहीशी अवघडच गेली. साखळीतील पाचपैकी तीन सामने जिंकले व दोन बरोबरीत सुटले. पहिल्या सामन्यात भारताने टांझानियाचा १८-० असा धुव्वा उडविला. सेंटर फॉरवर्ड सुरिंदरसिंग सोढी याने पाच, देविंदरसिंग व कर्णधार वासुदेवन भास्करन ह्यांनी प्रत्येकी चार गोल केले. पण पोलंडविरुद्ध भारताला बरोबरीत (२-२) समाधान मानावं लागलं. देविंदरसिंग व मर्विन फर्नांडिस ह्यांनी एक-एक गोल केला. त्यानंतरची स्पेनविरुद्धची लढतही २-२ अशी बरोबरीत सुटली. भारताकडून दोन्ही गोल सोढीने केले.

नवोदित क्यूबावर भारताने १३ गोल चढविले. सुरिंदरसिंगने चार, महंमद शाहीद, देविंदरसिंग, राजिंदरसिंग व अमरजितसिंग राणा ह्यांनी प्रत्येकी दोन गोल केले. भास्करन ह्यानं एक गोल केला. क्यूबाची पाटी कोरीच राहिली. यजमान रशियाला ४-२ असे हरवून भारताने अंतिम फेरीत प्रवेश नक्की केला. ह्या लढतीत सोढीने दोन गोल करून चमक दाखवली. देविंदर व महाराज किशन कौशिक ह्यांनी प्रत्येकी एक गोल चढवला. दीर्घ अनुभव आणि सात सुवर्णपदकं जिंकलेल्या भारताला साखळीमध्ये अव्वल स्थान काही पटकावता आलं नाही. 

स्पेनने पाचपैकी चार सामने जिंकले. रशियानेही तीन लढती जिंकल्या, तरी त्यांनी दोन सामने गमावले व संघ साखळीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. टांझानियाविरुद्ध पाच सामन्यांत ५४ आणि क्यूबाविरुद्ध तेवढ्याच सामन्यांत ४२ गोल झाले.

अंतिम सामना चुरशीने खेळला गेला. भारताने स्पेनवर ४-३ असा विजय मिळवून ऑलिंपिकमधील आठवे सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर भारताला कोणतेच पदक जिंकता आले नाही. सुरिंदरसिंगने दोन आणि महाराज क्रिशन कौशिक व महंमद शाहीद यांनी प्रत्येकी एक गोल केला. स्पेनचे तिन्ही गोल जुआन अमातने केले. भारताच्या सुरिंदरसिंगने सर्वाधिक सोळा गोल करून व्यक्तिगत गोलांचा विक्रम प्रस्थापित केला. कांस्यपदकाच्या सामन्यात रशियाने पोलंडवर २-१ असा विजय मिळविला. विजेत्याकडून दोन्ही गोल वियाचेस्लाव्ह लॅम्पीव्हने केले. क्यूबाने टांझानियाचा ४-१ गोलनी पराभव करून पाचवा क्रमांक मिळविला.

भारत चौथ्या क्रमांकावर 

महिला हॉकीचा समावेश ह्या ऑलिंपिकपासून झाला. अगदी शेवटच्या क्षणी प्रवेश मिळालेल्या झिम्बाब्वेने सुवर्णपदक पटकावून सर्वांनाच आश्चर्याचा जोरदार धक्का दिला. झिम्बाब्वे, चेकोस्लोव्हाकिया, सोव्हिएत रशिया, भारत, ऑस्ट्रिया व पोलंड संघांमध्ये साखळी पद्धतीने सामने झाले. पदके जिंकणाऱ्या तिन्ही संघांनी प्रत्येकी तीन सामने जिंकले. तथापि सुवर्ण जिंकणाऱ्या झिम्बाब्वेने एकही सामना गमावला नाही. चेकोस्लोव्हाकियाने रौप्य व यजमानांनी कांस्यपदक जिंकले.

स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिलेल्या भारताची कामगिरी साधारणच राहिली. दोन विजय, तेवढेच पराभव व एक बरोबरी ह्यामुळे पदकापासून भारत दूर राहिला. पोलंड व ऑस्ट्रिया ह्यांना हरवणाऱ्या भारताचा रशिया व चेकोस्लोव्हाकिया ह्यांनी पराभव झाला. स्पर्धेत सर्वाधिक सहा गोल नतेला कराश्निकोव्हा (रशिया) व पॅट्रिशिया मॅककिलप यांनी केले. रशियाच्याच नतालिया बुझुनोव्हा हिने पाच आणि भारताच्या रूपकुमारी सैनी हिने चार गोल केले.

....

(संदर्भ - olympics.com, scroll.in, olympedia.org आणि विकिपीडिया, 'द हिंदू', भारतीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, भारतीय हॉकी ह्यांची संकेतस्थळे.)

......

आधीचे भाग इथे वाचा

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey1.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey2.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey3.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey4.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey5.html

#भारतआणिऑलिंपिक #हॉकीचे_सुवर्णयुग #Olympics #India #hockey #IndiainOlympics #TokyoOlympics #GoldMedal #Tokyo #MensHockey #MajorDhyanChand #munich72 #montreal76  #moscow80  #Olympics_boycott

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

घसरगुंडीला सुरुवात


ऑलिंपिक, भारत आणि हॉकी - 

हक्क भारताचाच. ऑलिंपिकमध्ये भाग घेण्यास सुरुवात केल्यापासून भारतीय संघाने सुवर्णपदक कधी गमावले नव्हते. पण ते चित्र कायम राहणारे नव्हते, ह्याची चुणूक रोममधील खेळाने दाखविली. पाकिस्तानने सुवर्णपदक पटकावून आपली परंपरा खंडित केली. ते आपले हॉकीतील एकमेव रौप्यपदक होय. ह्या पराभवाचा बदला आपण टोकियोत घेतला खरा; पण उतरण चालू झाली होती. त्याचे लख्ख दर्शन मेक्सिको सिटीच्या स्पर्धेत झाले. तिथे भारताला पहिल्यांदाच गटात पराभव स्वीकारावी लागला. त्या आधी टोकियोमध्ये भारताचा ऑलिंपिकमधील सामना पहिल्यांदाच बरोबरीत सुटला होता. मेक्सिकोमध्ये तर भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. पश्चिम जर्मनीला हरवून भारताने कांस्यपदक जिंकले.

रोम (१९६०)

कृष्णवर्णीय आफ्रिकी धावपटू अबेबे बिकिला ह्याच्या कामगिरीमुळे गाजलेल्या ह्या ऑलिंपिकमध्ये हॉकीतही नवा इतिहास लिहिला गेला. सुवर्णपदकांचा षट्कार मारणाऱ्या भारताची शानदार वाटचाल रोममध्ये खंडित झाली. ती करणारा देश होता पाकिस्तान. जपानचा पुन्हा प्रवेश झाला, तर अफगाणिस्तानचा संघ दीर्घ काळानंतर नव्हता. सहभागी १६ संघांचे चार गट करण्यात आले. प्रत्येकी गटातून दोन संघ उपान्त्यपूर्व फेरीत गेले. 

भारताने ‘अ’ गटात एकही सामना न गमावता पहिले स्थान मिळविले. रघुबीरसिंग भोला व प्रिथपालसिंग ह्यांच्या प्रत्येकी तीन गोलांच्या जोरावर पहिल्या सामन्यात भारताने डेन्मार्कचा १०-० असा फडशा पाडला. पीटर व जसवंतसिंग ह्यांनी प्रत्येकी दोन गोल केले. त्यानंतर नेदरलँड्सवर ४-१ (प्रिथपालसिंग २, जसवंतसिंग व भोला प्रत्येकी १ गोल) आणि न्यूझीलंडवर ३-० असा सहज विजय मिळविला. न्यूझीलंडविरुद्धच्या विजयात भोला, पीटर व जसवंतसिंग ह्यांचा एक गोलचा समान वाटता होता. गटातील उपविजेता ठरविण्यासाठी झालेल्या जादा सामन्यात न्यूझीलंडने नेदरलँड्सवर मात केली.

पाकिस्तानने ‘ब’ गटांतील तिन्ही सामने सहज जिंकले. जपानवर त्यांनी १०-० आणि पोलंडवर ८-० अशी मात केली. या गटाचाही उपविजेता ठरविण्यासाठी ऑस्ट्रेलिया व पोलंड ह्यांच्यात जादा सामना खेळवावा लागला. ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून उपान्त्यपूर्व फेरी गाठली. ‘क’ गटात केनियाने अव्वल स्थान पटकावून धमाल उडवून दिली. त्यांनी दोन सामने जिंकले, तर फ्रान्सविरुद्धची लढत अनिर्णीत राहिली. केनियाकडून पराभव पत्करावा लागल्याने संयुक्त जर्मनीला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ‘ड’ गटातून स्पेन व इंग्लंड बाद फेरीत गेले. स्पेनने दोन सामने जिंकले व एक अनिर्णीत राहिला. इंग्लंडने एक सामना जिंकला व दोन अनिर्णीत राखले. त्यामुळे बेल्जियम इंग्लंडपेक्षा एका गुणाने मागे व गटात तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

उपान्त्यपूर्व फेरीचे चारही सामने कमी गोलसंख्येचे व चुरशीचे झाले. भारताने ऑस्ट्रेलियाचा १-० फरकाने पराभव केला. हा विजयी गोल भोलाचा होता. इंग्लंडने केनियाचा २-१, पाकिस्तानने संयुक्त जर्मनीचा २-१ आणि स्पेनने न्यूझीलंडचा १-० असा पराभव केला. उपान्त्य फेरीत दोन-दोन  आशियाई व युरोपीय संघ आले. भारताने ब्रिटनचा १-० असा आणि पाकिस्ताननेही स्पेनचा त्याच गोलफरकाने पराभव केला. भारताला अंतिम सामन्यात नेणारा गोल उधमसिंग कुल्लरचा होता. सलग दुसऱ्या ऑलिंपिकमध्ये भारत-पाकिस्तान अशी अंतिम लढत रंगणार होती. कांस्यपदकासाठीच्या लढतीत स्पेनने इंग्लंडचा २-१ असा पराभव केला.


लेस्ली क्लॉडियस - सलग चार स्पर्धा खेळणारा
पहिला भारतीय हॉकीपटू
भारत सातव्यांदा सुवर्णपदक जिंकणार का, हाच अंतिम सामन्यातला लक्षवेधक प्रश्न होता. पण मेलबर्नमधील पराभवाचा बदला पाकिस्तानने घेतला. भारताची घोडदौड थांबवत पाकिस्तानने हा सामना १-० असा जिंकला आणि पहिले सुवर्णपदक मिळविले. इनसायडर लेफ्ट नसीर बंदाने अकराव्या मिनिटाला केलेला गोलच भारताचे वर्चस्व मोडून काढणारा ठरला. त्यानंतर भारताने जोरदार आक्रमण केले. पण पाकिस्तानी बचाव भेदण्यात अपयश येऊन सुवर्ण सिंहासन सोडावे लागले.

रोम ऑलिंपिक दोन गोष्टींमुळे भारतीयांच्या कायमच लक्षात राहणार, ते दोन गमावलेल्या पदकांमुळे - हॉकीतील सुवर्ण आणि 'फ्लाइंग सीख' नाव मिळालेल्या मिल्खासिंग ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत चौथा राहिल्याने. पदकात आणि मिल्खा ह्यांच्यामध्ये अंतर होते ते ०.०१ सेकंदाचे.

टोकियो (१९६४) 

आशिया खंडात झालेले हे पहिलेच ऑलिंपिक. त्यामध्ये हॉकीतील सुवर्ण व रौप्य आशियाई देशांनीच मिळविली. भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये सलग तिसऱ्या स्पर्धेत अंतिम लढत झाली आणि गमतीचा भाग म्हणजे या तिन्ही लढतींचा गोलफलक तोच होता : १-०!

स्पर्धेच्या स्वरूपात पुन्हा थोडा बदल झाला. सहभागी १५ संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली. साखळी सामन्यानंतर गटातील पहिल्या दोन क्रमांकांवरील संघ उपान्त्य फेरीसाठी पात्र ठरले. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकांवरील संघ ‘कन्सोलेशन सेमीफायनल’साठी (म्हणजे पाचवा व सहावा क्रमांक ठरवण्यासाठी) निवडले गेले. ‘अ’ गटामध्ये पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, केनिया, जपान, इंग्लंड, ऱ्होडेशिया व न्यूझीलंड संघ होते. ‘ब’ गटामध्ये आठ संघ होते. भारत, स्पेन, संयुक्त जर्मनी, द नेदरलँड्स, मलेशिया, बेल्जियम, कॅनडा व हाँगकाँग हे ते संघ होत. स्पर्धेत आशियातील पाच देश होते.

भारताचा समावेश असलेल्या ‘ब’ गटातील साखळी सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस दिसली. तब्बल आठ सामने बरोबरीत सुटले. रोम ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदा पराभव पत्कराव्या लागलेल्या भारतीय संघाला इथेही कडवा प्रतिकार झाला. साखळीतील पहिल्या सामन्यात बेल्जियमला २-० हरवून भारताने चांगली सुरुवात केली. प्रिथपालसिंग व हरिपाल कौशिक ह्यांनी प्रत्येकी एक गोल केला. पुढची लढत होती जर्मनीबरोबर आणि ती बरोबरीत सुटली. बरोबरीचा निकाल लागलेला हा भारताचा ऑलिंपिकमधील पहिलाच सामना. त्यात जर्मनीने आघाडीच घेतली होती. प्रिथपालच्या गोलने बरोबरी साधली. स्पेनविरुद्धच्या लढतीत तेच झाले. पुन्हा एकदा १-१ अशी बरोबरी. ह्या वेळी मदतीला धावला होता मोहिंदर लाल.


टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताने केलेल्या गोलांपैकी निम्मे होते
प्रिथपालसिंगचे. (छायाचित्र सौजन्य photonews,org,nz)
दोन सामने बरोबरीत सुटल्याने भारतीय गोटात काळजीचे वातावरण होतेच. पण त्यानंतरच्या पाचही सामन्यांमध्ये जय मिळवत आपण गटात पहिले स्थान राखले. हाँगकाँगला ६-० पराभूत करताना आपल्या संघाला सूर गवसला. प्रिथपाल, दर्शनसिंग व हरबिंदरसिंग ह्यांनी प्रत्येकी दोन गोल केले. पुढचा सामना होता मलेशियाशी. प्रिथपालचे दोन व हरबिंदरचा एक गोल ह्यामुळे आपल्याला ३-१ विजय मिळविता आला. ह्याच जोडीमुळे कॅनडावर ३-० विजय मिळाला. इथे हरबिंदरने दोन व प्रिथपालने एक गोल केला. गटातील शेवटच्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध २-१ असा विजय मिळाला. हे गोल प्रिथपाल व जॉन पीटर ह्यांनी केले. गटातील सामन्यांमध्ये भारतीय संघाचे वैशिष्ट्य असलेला गोलांचा पाऊस दिसला नाही. सातपैकी सहा सामन्यांमध्ये प्रिथपालसिंगचे गोल होतेच.

ह्या गटात स्पेनने चार विजय व तीन बरोबरी यांसह दुसरे स्थान मिळविले. जर्मनीने तर बरोबरीच्या सामन्यांचा जणू विक्रम केला. त्यांच्या पाच लढती बरोबरीत सुटल्या. तो संघ तिसऱ्या व नेदरलँड्स चौथ्या क्रमांकावर राहिला. तळाच्या हाँगकाँगनेही एक सामना बरोबरीत सोडवला. फक्त कॅनडाच्याच सर्व लढती निकाली झाल्या. या गटात सर्वाधिक म्हणजे २० गोल नेदरलँड्सने केले. भारताने १८ व स्पेनने १६ गोल नोंदविले.

पाकिस्तानने सहाही सामन्यांत विजय मिळवून ‘अ’ गटात सहज पहिला क्रमांक मिळविला. चार सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दुसरे स्थान मिळविले. केनिया व ऱ्होडेशिया ह्या आफ्रिकी देशांचा सामना बरोबरीत सुटला आणि त्यामुळे केनिया तिसऱ्या स्थानावर राहिला. यजमान जपानची कामगिरी तीन विजय व तेवढेच पराभव अशी राहिली. इंग्लंडला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांना ऑस्ट्रेलियाने ७-० असे हरवले. हा या गटातील सर्वांत मोठा विजय. पाकिस्तानने १७ आणि  ऑस्ट्रेलियाने १६ गोल केले.

पहिल्या उपान्त्य सामन्यात पाकिस्तानने स्पेनला ३-० असे सहज हरविले. भारताने ऑस्ट्रेलियावर ३-१ अशी मात केली. प्रिथपालने पुन्हा दोन गोल नोंदवित चमक दाखविली. मोहिंदरने एक गोल केला.

हे दोन संघ सलग तिसऱ्या ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकासाठी झुंजणार होते. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्पेनला ३-२ असे हरविले. दुसऱ्याच ऑलिंपिकमध्ये ऑस्ट्रेलियाने पदक मिळविले. इंग्लंड मात्र पदकापासून वंचित राहिले.

टोकियो ऑलिंपिकमधील पदक वितरण समारंभ. भारतीय संघाचा कर्णधार चरणजितसिंग.
(छायाचित्र भारतीय हॉकी संकेतस्थळाच्या सौजन्याने.)

अंतिम सामना दि. २३ ऑक्टोबरला झाला. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील ही लढत अटीतटीची झाली. पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला. उत्तरार्धाचा खेळ सुरू झाल्यानंतर पाचव्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर प्रिथपालसिंग ह्याने घेतला. त्याचा सणसणीत फटका गोलरक्षकाच्या पायाला धडकून परतला आणि पाकिस्तानी फुल बॅक मुनीर दरने तो पायाने अडवला. त्यामुळे मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर सेंटर हाफ मोहिंदर लालने सुवर्ण गोल केला! हवामान थंड असले, तरी ह्या सामन्यात बरीच गरमागरमी झाली. काही पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंवर हल्ला केल्याने सामना काही वेळापुरता थांबवावा लागला. पिछाडीवर पडलेल्या पाकिस्तानने नंतर जोरदार आक्रमण केले. गोलरक्षक शंकर लक्ष्मण याने दोन गोल वाचविले आणि तोच सामन्याचा मानकरी ठरला.

भारताने एकूण २२ गोल केले; त्यातील निम्मे प्रिथपालसिंगचे होते! व्ही. जे. पीटर ह्याचे हे दुसरे ऑलिंपिक. मेक्सिको सिटीतील ऑलिंपिकनंतर तो निवृत्त झाल्यानंतर पुढच्या दोन ऑलिंपिकमध्ये त्याचा भाऊ व्ही. जे. फिलिप्स भारतीय संघात होता. अशा तऱ्हेने दोन भावांनी सोळा वर्षे देशाचे प्रतिनिधित्व केले.

मेक्सिको सिटी (१९६८) 

उत्तर अमेरिका खंडामध्ये झालेले हे दुसरे ऑलिंपिक. स्पर्धेत सहभागी १६ संघांची दोन गटांत विभागणी करून साखळी सामने झाले. ह्या ऑलिंपिकचे वैशिष्ट्य म्हणजे सलग तीन ऑलिंपिकनंतर अंतिम लढत आशियाई देशांमध्ये झाली नाही. पाकिस्तानने दुसरे सुवर्ण पटकाविले, तर भारताला पहिल्यांदाच कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. साखळी सामन्यात भारताला पहिल्यांदाच पराभवाची चव चाखावी लागली. भारतीय वर्चस्व कमी होऊ लागल्याचे संकेत याच ऑलिंपिकने दिले. इथे दोन बलबीरसिंग आपल्या संघाकडून खेळले. त्यातील एक सैन्यदलात व दुसरा रेल्वेच्या सेवेत होता. फाळणीनंतर पहिल्यांदाच जर्मनीच्या संयुक्त संघाऐवजी (युनायटेड टीम ऑफ जर्मनी) पूर्व व पश्चिम जर्मनी असे दोन संघ उतरले आणि ते दोन्ही एकाच गटात होते. सहभागी संघांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी सामने खेळविले गेले. 

‘अ’ गटामध्ये यजमान मेक्सिकोसह भारत, पश्चिम जर्मनी, न्यूझीलंड, बेल्जियम, स्पेन, पूर्व जर्मनी व जपान संघ होते. भारताने साखळीतील सातपैकी सहा सामने जिंकून पहिले स्थान मिळविले. सलामीच्या सामन्यातच न्यूझीलंडने भारताला २-१ असा धक्का दिला. हा ऑलिंपिकमधला भारताचा गटसाखळीतील पहिला पराभव. भारतीयांकडूनचा एकमेव गोल मागच्या ऑलिंपिकचीच चमक पुन्हा दाखवणाऱ्या प्रिथपालसिंगने केला. या पराभवातून सावरत भारताने नंतरचे सर्व सामने जिंकले.

दुसऱ्या सामन्यात पश्चिम जर्मनीने जोरदार प्रतिकार केला, तरी २-१ विजय मिळविण्यात भारताला यश आले. हरबिंदरसिंग व बलबीर (सैन्यदल) ह्यांनी प्रत्येकी एक गोल केला. त्यानंतरच्या सामन्यात ह्या ऑलिंपिकमधील आपला सर्वांत मोठा विजय (८-०) साकारला यजमानांविरुद्ध. हरबिंदरने तीन, प्रिथपालने दोन गोल केले. बलबीर (सैन्यदल), अजितपाल सिंग व इंदरसिंग ह्यांचा वाटा प्रत्येकी एका गोलाचा राहिला. एवढ्या मोठ्या विजयानंतरही संघाचा कस लागतच राहिला. प्रिथपालच्या एकमेव गोलामुळे स्पेनविरुद्ध कसाबसा विजय मिळविता आला. बेल्जियमनेही कडवा प्रतिकार करीत सहज विजय मिळवू दिला नाही. प्रिथपाल व हरबिंदरसिंग ह्यांच्या एक-एक गोलामुळे आपण २-१ असा विजय मिळविला.

दोन अटीतटीच्या लढतीनंतर मग समोर उभा होता जपानचा संघ. पेनल्टी स्ट्रोक दिल्याचा निर्णय न पटल्याने जपानने पंचावनाव्या मिनिटाला मैदान सोडले, तेव्हा भारताकडे ५-० अशी निर्णायक आघाडी होती. पूर्व जर्मनीनेही कडवी झुंज दिली. ह्या सामन्यातील एकमेव गोल केला प्रिथपालने. ह्या गटातील सहा सामने बरोबरीत सुटले. पश्चिम जर्मनीने पाच सामने जिंकून दुसरा क्रमांक मिळविला. सर्व सामन्यांमध्ये पराभूत झालेला यजमानांचा संघ तळाला राहिला.

‘ब’ गटामध्ये पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, केनिया, द नेदरलँड्स, इंग्लंड, फ्रान्स, अर्जेंटिना व मलेशिया संघ होते. पाकिस्तानने सातही सामने जिंकून गटामध्ये अव्वल स्थान अबाधित राखले. समान गुणांमुळे दुसऱ्या क्रमांकाचा संघ निवडण्यासाठी जादा सामना खेळवला गेला. त्यात ऑस्ट्रेलियाने केनियाला हरविले. पाकिस्तानचा सर्वांत मोठा विजय नेदरलँड्सविरुद्ध (६-०) होता. अर्जेंटिनाविरुद्ध पाच व मलेशियाविरुद्ध चार गोल करताना त्यांनी एकही गोल चढू दिला नाही. ऑस्ट्रेलिया (३-२), फ्रान्स (१-०), इंग्लंड (२-१) व केनिया (२-१) यांनी मात्र चांगला प्रतिकार केला. गटातील चार सामने बरोबरीत सुटले. एकही विजय न मिळवणारा एकमेव संघ मलेशियाचा होता.

उपान्त्य सामने २४ ऑक्टोबर रोजी खेळले गेले. पहिल्याच लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताला २-१ असे चकित केले. भारत पहिल्यांदाच अंतिम सामन्यात दिसणार नव्हता. कांगारूंविरुद्धचा गोल केला तो सैन्यदलातील बलबीरने. पूर्व जर्मनीचा कडवा प्रतिकार मोडत पाकिस्तानने १-० अशा गोलफरकाने पुन्हा अंतिम फेरी गाठली. दि. २६ ऑक्टोबरचा अंतिम सामनाही चुरशीचा झाला. त्यात ऑस्ट्रेलियाची झुंज १-२ अशी अपयशी ठरली आणि पाकिस्तानने दुसरे सुवर्णपदक जिंकले. कांस्यपदकाच्या लढतीत भारताने पश्चिम जर्मनीवर पुन्हा त्याच गोलफरकाने (२-१) विजय मिळविला. प्रिथपालसिंग व बलबीर (रेल्वे) ह्यांनी गोल केले. भारताचे हे पहिले कांस्यपदक. ह्याची बरीच कारणे आहेत. त्यातील एक महत्त्वाचे म्हणजे संघात एकवाक्यता नव्हती. भारतीय हॉकी महासंघाने ऑलिंपिकसाठी दोन संयुक्त कर्णधार नेमले. अनुभवी प्रिथपालचे संघातील बऱ्याच खेळाडूंशी पटत नसल्याने गुरुबक्षसिंग ह्यालाही संयुक्त कर्णधार नेमण्यात आले. स्वाभाविकच संघात फार काही एकजिनसीपणा नव्हता.

(संदर्भ - olympics.com आणि विकिपीडिया, स्पोर्ट्स.एनडीटीव्ही 'द हिंदू', भारतीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, भारतीय हॉकी ह्यांची संकेतस्थळे.)

.........

आधीचे भाग इथे वाचा

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey1.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey2.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey3.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey4.html


#भारतआणिऑलिंपिक #हॉकीचे_सुवर्णयुग #Olympics #India #hockey #IndiainOlympics #TokyoOlympics #GoldMedal #Tokyo #MensHockey #Rome1960 #Tokyo1964 #MexicoCity1968 #INDvsPAK #prithpalsingh #LeslieClaudius 

शनिवार, १० जुलै, २०२१

लंडन ते मेलबर्न...दुसरी हॅटट्रिक



ऑलिंपिक, भारत आणि हॉकी - ४

दुसऱ्या महायुद्धानं दोन ऑलिंपिक रद्द करावी लागली. ह्या महायुद्धानं बरंच काही बदललं. विशेषतः जगाचा नकाशा. युद्धानं महासत्ता मोडकळीस आल्या. साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नसलेल्या ब्रिटिश महासत्तेनं विविध देशांतून काढता पाय घेतला. ह्याच इंग्लंडला महायुद्धानंतरच्या ऑलिंपिकचं यजमानपद मिळालं. एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारत पहिल्यांदाच ह्या खेळात सहभागी झाला. स्वातंत्र्याला वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच आपण सुवर्णपदकावर नाव कोरलं - खेळ अर्थातच हॉकी. पुढच्या दोन्ही स्पर्धांमध्ये आपण पहिला नंबर सोडला नाही. पण सख्खा शेजारी पाकिस्तान तुल्यबळ म्हणून स्पर्धक पुढं आल्याचं मेलबर्न ऑलिंपिकमधून दिसून आलं.

लंडन (१९४८)

महायुद्धात पोळून निघालेल्या इंग्लंडकडे ह्या ऑलिंपिकचे यजमानपद होते. स्वातंत्र्य मिळविलेल्या भारताची ही पहिलीच स्पर्धा. हॉकीसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखी एका आशियाई देशानं, पाकिस्ताननं पदार्पण केले. अर्जेंटिनाच्या रूपाने दक्षिण अमेरिका खंडाचंही प्रतिनिधित्व सुरू झाले. हॉकीची पहिली दोन्ही सुवर्णपदके जिंकणाऱ्या इंग्लंडनं तब्बल २८ वर्षांनी ह्या खेळात भाग घेतला. एक तपानंतरचं हे ऑलिंपिक २९ जुलै ते १४ ऑगस्ट या काळात झालं. हॉकीमध्ये सहभागी देशांची संख्या वाढून १३ झाली. त्यांची तीन गटांमध्ये विभागणी करून गटात साखळी पद्धतीने लढती झाल्या. साखळी व बाद पद्धतीचे मिळून २५ सामने झाले.

सलग तीन सुवर्णपदकं पटकावून दबदबा निर्माण करणाऱ्या भारतासह ‘अ’ गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रिया व स्पेन यांचा समावेश होता. यजमान इंग्लंड (ग्रेट ब्रिटन), स्वित्झर्लंड, अफगाणिस्तान व अमेरिका ‘ब’ गटात होते. सर्वाधिक पाच संघ ‘क’ गटात होते – पाकिस्तान, द नेदरलँड्स, बेल्जियम, फ्रान्स व डेन्मार्क. पहिल्या दोन गटांतून प्रत्येकी अव्वल आणि शेवटच्या गटातून पहिल्या दोन क्रमांकाचे संघ उपान्त्य फेरीसाठी निवडले गेले. 

भारताने साखळीतील सर्व सामने सहज जिंकले. सलामीच्या लढतीत ऑस्ट्रियावर ८-० असा मोठा विजय मिळवला. पॅट्रिक जेन्सन (४), कंवर दिग्विजयिंह 'बाबू' (२), कर्णधार किशनललाल व रेजिनाल्ड रॉड्रिग्ज (प्रत्येकी १ गोल) ह्यांचा त्यात वाटा होता.

दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध बलबिरसिंगनं गोलांचा पाऊस पाडला. त्याच्या गोल षट्काराला जेन्सन (२) व किशनलाल (१) ह्यांनी हातभार लावला. त्यामुळं ९-१ असा दणदणीत विजय सहज झाला. स्पेनविरुद्धची लढत आपण २-० अशी जिंकली खरी; पण ती नेहमीसारखी अगदीच एकतर्फी झाली नाही. तरलोचनसिंग व बाबू ह्यांनी प्रत्येकी एक गोल केला. आधीच्या सामन्यांत सहा गोल करणाऱ्या बलबिरसिंगला का कुणास ठाऊक, पण विश्रांती देण्यात आली. सामन्यापूर्वी पाऊसही झाला होता. या गटात ऑस्ट्रियाच्या दोन लढती बरोबरीत सुटल्या. गटातील उर्वरित एका निकाली सामन्यात अर्जेंटिनाने स्पेनला हरविले.

इंग्लंडने दोन सामने जिंकून 'ब' गटात पहिले स्थान मिळविले. स्वित्झर्लंडने मात्र यजमानांशी गोलशून्य बरोबरी साधली. त्यांची व अफगाणिस्तानचीही बरोबरी झाली. तिन्ही सामने गमावलेला अमेरिकेचा संघ गटात तळाशी राहिला. पाकिस्तानने जोरदार पदार्पण करताना 'क' गटातील चारही सामने सहज जिंकले. नेदरलँड्सने तीन सामने जिंकून दुसरे स्थान मिळविले. बेल्जियमने दोन सामने जिंकले, तर फ्रान्स व डेन्मार्क यांना एकही विजय मिळविता आला नाही. 'अ' व 'ब' गटांतील अव्वल संघ आणि 'क' गटातील पहिले दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले. 

उपान्त्य लढतीत पाकिस्तानचे आव्हान इंग्लंडने संपविले. दुसऱ्या लढतीत नेदरलँड्सने भारताला झुंजवले. तथापि त्यांचा प्रतिकार २-१ असा मोडून काढत भारताने सलग चौथ्या वेळी अंतिम फेरी गाठली. जेराल्ड ग्लॅकीन व कंवर दिग्विजयसिंह ह्यांनी एक-एक गोल केला. कांस्यपदकासाठीची नेदरलँड्स व पाकिस्तान यांच्यातील पहिली लढत १-१ अशी बरोबरीत सुटल्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा खेळविण्यात आली. त्यात नेदरलँड्सने ४-१ असा विजय मिळविला.


इंग्लंडविरुद्धच्या अंतिम लढतीत भारताचा तिसरा गोल. (छायाचित्र सौजन्य विकिपीडिया)

यजमान इंग्लंड व भारत यांच्यातील अंतिम लढत दि. १२ ऑगस्टला झाली. ती भारताने ४-० अशी सहज जिंकली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या तीनशे बासष्टाव्या दिवशी भारताने सुवर्ण पटकाविले. अंतिम सामन्यात भारताकडून बलबीरसिंगने दोन, पॅट्रिक जेन्सन व तरलोचनसिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला.

तीन सुवर्णपदकांचा अनुभव असलेल्या देशाच्या ह्या संघासाठी हे चौथं पदकही फार मोलाचं होतं. कारण संघातील एकाही खेळाडूला ऑलिंपिकचा अनुभव नव्हता. पहिल्यांदाच भारतीय संघ बूट, स्पाईक्स आदी साधनांसह खेळला. ह्या संघात मुंबईचे तब्बल आठ खेळाडू होते. लेस्ली क्लॉडियस, बलबिरसिंग (मोठा) ही दिग्गज नावं ह्याच ऑलिंपिकने दिली.

हेलसिंकी (१९५२)

सोव्हिएत रशिया आणि इस्राईल यांचा सहभाग हे या ऑलिंपिकचं वैशिष्ट्य. हॉकीमध्ये १२ देशांचे संघ सहभागी झाले. यजमान फिनलंड, इटली व पोलंड देश पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये उतरले. हे तिन्ही संघ पहिल्याच सामन्यात हरल्याने स्पर्धेतून बाहेर पडले. बाद पद्धतीने खेळल्या गेलेल्या स्पर्धेत १३ सामने झाले. लंडन ऑलिंपिकमधील पहिल्या चार संघांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. यजमान संघाला पहिल्याच सामन्यात बेल्जियमकडून ०-६ असा पराभव पत्करावा लागला व त्यांची वाटचाल तेथेच थांबली. दुसऱ्या फेरीत भारताने ऑस्ट्रियाला (४-०) असं हरवलं. रघुबीरलाला शर्मा, रणधीरसिंग जेंटल, कंवर दिग्विजयसिंह 'बाबू' आणि बलबिरसिंग ह्यांनी प्रत्येकी एक गोल केला. अन्य लढतींमध्ये इंग्लंडने बेल्जियमला (१-०), नेदरलँड्सने जर्मनीला (१-०) आणि पाकिस्तानने फ्रान्सला (६-०) असे हरवून उपान्त्य फेरी गाठली.

उपान्त्य फेरीचे दोन्ही सामने २० जुलै रोजी झाले. पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ३-१ अशा फरकाने पराभव केला. हे तिन्ही गोल एकट्या बलबीरसिंगने केले. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला नेदरलँड्सने एकमेव गोलाच्या जोरावर पराभूत केले. कांस्यपदकाच्या लढतीतही पाकिस्तानला इंग्लंडकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. फ्रान्सने पोलंडला नमवून पाचवे स्थान मिळविले.


हेलसिंकी ऑलिंपिकमधील अंतिम सामना. नेदरलँड्सविरुद्ध भारताचे आक्रमण. 
(छायाचित्र सौजन्य - आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती)

भारतीय संघ सलग पाचव्या वेळी अंतिम फेरीत होता. हा अंतिम सामना एकतर्फी झाला. भारताने ६-१ असा सहज विजय मिळविला. पाचव्या सुवर्णपदकावर नाव कोरणारा हा मोठा विजय साकारला तो बलबिरच्या पंचकाराने. उरलेला एक गोल कंवर दिग्विजयसिंहने केला. भारताने तीन सामन्यांमध्ये तेरा गोल केले. या ऑलिंपिकमध्ये बलबीरसिंग (मोठा) भारताकडून चमकला. देशाच्या तेरापैकी नऊ गोल त्याचे एकट्याचे होते.

सलग पाचवं सुवर्णपदक जिंकून हॉकी संघानं देशाचं नाव उंचावलंच; पण त्याहून हे ऑलिंपिक आपल्यासाठी लक्षात राहतं ते आणखी एका खेळाडूमुळे. देशासाठी पहिलं व्यक्तिगत पदक इथंच मिळालं. हा मराठमोळा खेळाडू म्हणजे कुस्तीगीर खाशाबा जाधव. 'फ्री-स्टाईल' कुस्तीमध्ये ५२ किलो वजनगटात त्यांनी कांस्यपदक जिंकले.

मेलबर्न (१९५६)

जगाच्या दक्षिणेकडच्या भागात ऑलिंपिकचे पहिले पाऊल. ही स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झाली. हॉकीमध्ये सहभागी बारा संघांची तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली. त्यापैकी पाच देश आशियाई होते. मलेशिया, सिंगापूर, केनिया, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांचे संघ पहिल्यांदाच ऑलिंपिक स्पर्धेत उतरले. चार युरोपीय संघ व एक संघ अमेरिकेचा होता. गटवार साखळी व बाद फेरी असे मिळून २३ सामने खेळविले गेले. त्यात एकूण १०३ गोल झाले.

‘अ’ गटात भारताने सिंगापूर, अफगाणिस्तान व अमेरिका यांच्यावर सहज विजय मिळवून उपान्त्य फेरी गाठली. भारताने अमेरिकेविरुद्ध १६ व अफगाणिस्ताविरुद्ध १४ असा गोलांचा पाऊसच पाडला. अफगाणिस्ताविरुद्ध बलबीरसिंगने पाच, उधमसिंग कुल्लरने चार, रणधीरसिंगने तीन आणि गुरुदेवसिंग कुल्लरने दोन गोल केले. अमेरिका जणू भारतासाठी खास 'गिऱ्हाईक' होते. त्यांच्याविरुद्ध उधमसिंगने सात गोल केले. हरदयाळसिंगने पाच, गुरुदेवसिंगने तीन आणि लेस्ली क्लॉडियसने एक गोल केला. सिंगापूरला ६-० हरवताना उधमसिंग व चार्ल्स स्टिफन ह्यांनी प्रत्येकी दोन आणि रणधीरसिंग जेंटल व हरदयाळसिंग ह्यांनी एक-एक गोल केला. ह्या गटात सिंगापूरने दोन सामने जिंकले, तर अमेरिकेची पाटी पुन्हा एकदा विजयाविना कोरीच राहिली.

‘ब’ गटातून उपान्त्य फेरी गाठण्यासाठी इंग्लंडला सायास करावे लागले. साखळीतील दोन सामने अनिर्णीत राहिलेल्या इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला मात्र २-० असे हरविले होते. खरे तर या गटात सर्वाधिक दोन सामने यजमानांनीच जिंकले होते. तथापि त्यांची व इंग्लंडची गुणसंख्या समान असल्याने गटविजेता ठरविण्यासाठी या दोन देशांत पुन्हा सामना खेळविण्यात आला. त्यात इंग्लंडने १-० अशी बाजी मारली. मलेशिया व केनिया यांचे प्रत्येकी दोन सामने अनिर्णीत राहिले, तर एका-एका सामन्यात त्यांचा पराभव झाला.

‘क’ गटातून पाकिस्तान व संयुक्त जर्मनी (युनायटेड टीम ऑफ जर्मनी) उपान्त्य फेरीसाठी पात्र ठरले. पाकिस्तानने बेल्जियम व न्यूझीलंड यांना हरवले आणि जर्मनीबरोबरची त्यांची लढत गोलफलक कोरा राहूनच अनिर्णीत राहिली. जर्मनीने एक सामना जिंकला व दोन सामने बरोबरीत सुटले. त्यामुळे त्यांचे पाच गुण झाले आणि त्याच आधारे दोन सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मागे टाकत जर्मनीने उपान्त्य फेरीत प्रवेश केला.

उपान्त्य फेरीच्या दोन्ही लढती अटीतटीच्या झाल्या. उधमसिंग पुन्हा मदतीला धावल्याने भारताने संयुक्त जर्मनीवर १-० असा विजय मिळविला. पाकिस्तानने इंग्लंडला ३-२ हरवत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. ऑलिंपिक हॉकीच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामना दोन आशियाई देशांमध्ये झाला. जर्मनीने इंग्लंडला ३-१ असे हरवून कांस्यपदक मिळविले.

सहावे सुवर्णपदक आणि तेही पाकिस्तानला हरवून! स्थळ आहे मेलबर्न.
(छायाचित्र सौजन्य - भारतीय हॉकी संकेतस्थळ)

अंतिम सामना ६ डिसेंबर रोजी अतिशय चुरशीने खेळला गेला. त्यात भारताने पाकिस्तानला १-० असे पराभूत केले आणि सहाव्या वेळी सुवर्णपदक पटकावले. सामन्यातील एकमेव गोल रणधीरसिंग जेंटलने पेनल्टी स्ट्रोकवर केला. पाकिस्तानचे पदकाचे स्वप्न तिसऱ्या ऑलिंपिकमध्ये साकार झाले. भारतीय संघाचा खेळ पूर्वलौकिकाला साजेसा झाला. स्पर्धेतील पाच सामन्यांमध्ये भारताने ३८ गोल केले. त्यामध्ये उधमसिंगचा वाटा होता १५! एकाही प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्याविरुद्ध गोल करता आला नाही. कर्णधार बलबीरसिंग (मोठा), रणधीरसिंग आणि रंगनाथन फ्रान्सिस यांनी सुवर्णपदकाची हॅटट्रिक साधली. लंडन, हेलसिंकी व मेलबर्न या तिन्ही स्पर्धांमध्ये ते भारताकडून खेळले.

(संदर्भ - olympics.com आणि विकिपीडिया, 'द हिंदू', भारतीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, भारतीय हॉकी ह्यांची संकेतस्थळे.)

....

आधीचे भाग इथे वाचा

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey1.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey2.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey3.html

................

#Olympics #India #hockey #IndiaInOlympics #MensHockey #London1948 #Helsinki1952 #Melbourne1956 #TokyoOlympics #GoldMedal #Tokyo #MajorDhyanChand #sports #NipponFestival #worldwar #BalbirSingh(senior) #Pakistan #SixthGoldMedal

बुधवार, ७ जुलै, २०२१

हॅटट्रिक साधून 'जादूगार' निवृत्त

ऑलिंपिक, भारत आणि हॉकी - ३ 


ऑलिंपिक महोत्सवात पहिल्यांदाच सहभागी होऊन भारतीय संघानं सोनेरी यश मिळवलं. मग ती जणू वहिवाटच बनली. हे सोनेरी यश पुढची खूप वर्षं भारताची साथ करीत राहिलं. दुसऱ्या महायुद्धामुळं दोन स्पर्धा रद्द कराव्या लागल्या. त्या झाल्या असत्या, तर कदाचित आणखी दोन सुवर्णपदकांची नोंद भारतीय संघाच्या नावापुढं झाली असती.

लॉस एंजेलिस आणि बर्लिन स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी लौकिकाला साजेशीच झाली. काही अडचणी, संघातली गटबाजी, काही खेळाडूंची नाराजी... अशा कोणत्याही बाबीचा परिणाम होऊ न देता संघानं विजयपताका फडकावत ठेवली. बर्लिन ऑलिंपिकमध्ये दिमाखदार कामगिरी करीत ध्यानचंदनं मैदानाचा निरोप घेतला. शेवटच्या ऑलिंपिकमध्ये कर्णधारपद भूषवित एकतिसाव्या वर्षी ह्या जादूगारानं निवृत्ती जाहीर केली.

लॉस एंजेलिस (१९३२)

दीर्घ काळ आणि किमान दोन टप्प्यांमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकचा कालावधी ह्या स्पर्धेतून निश्चित झाला. ही स्पर्धा दि. ३० जुलै ते १६ ऑगस्ट दरम्यान पार पडली. आधुनिक ऑलिंपिकमधील २८ वर्षांतील सर्वांत कमी स्पर्धक त्यात सहभागी झाले असले, तरी गुणवत्तेत मात्र लक्षणीय फरक दिसून आला.

या ऑलिंपिकमध्ये हॉकीत तीनच संघ सहभागी झाले. भारत, यजमान अमेरिका आणि जपान, हे ते संघ होत. अमेरिका व जपान यांची ही पदार्पणाची स्पर्धा. आधीच्या ऑलिंपिकमध्ये भारत वगळता सर्व संघ युरोप खंडातील होते. त्यातील एकही संघ सहभागी झाला नाही. ॲमस्टरडॅममधील रौप्य व कांस्यपदकविजेते संघही लॉस एंजेलिसपासून दूर राहिले. त्यामुळे तिन्ही संघांमध्ये साखळी सामने झाले.

पहिली लढत ४ ऑगस्टला झाली. पदार्पणातच जपानला भारतीय हॉकीपटूंच्या त्सुनामीला सामोरे जावे लागले. ध्यानचंद (४), रूपसिंह व गुरुमितसिंग (प्रत्येकी ३ गोल) आणि रिचर्ड कार (१) ह्यांच्या हल्ल्यापुढे जपानला काही करता आले नाही. त्यांच्या इनोहाराने एकमेव गोल केला व तोच ऑलिंपिकमधील भारताविरुद्धचा पहिला गोल. दुसरा सामना जपान व अमेरिका यांच्यात ८ ऑगस्ट रोजी झाला. त्यात यजमानांचा संघ २-९ अशा फरकाने पराभूत झाला. इनोहाराने चार गोल करीत आपल्या खेळाची चुणूक दाखविली.

अंतिम साखळी सामन्यात गोलांचा पाऊस पडला. रूपसिंहचे (शेजारचे छायाचित्र) गोलांचे दशक, ध्यानचंदचे अष्टक आणि गुरुमितसिंगचा पंचकार याच्या जोरावर भारतीय आक्रमण फळीने अमेरिकेवर तब्बल दोन डझन (२४) गोल चढविले आणि सलग दुसरे ऑलिंपिक सुवर्णपदक पटकाविले. एका सामन्यातील सर्वाधिक गोलांचा हा विक्रम अबाधित आहे. अमेरिकेकडून एकट्या विल्यम बॉडिंग्टन ह्याने एक गोल केला. स्पर्धेतील एकूण तीन सामन्यांमध्ये ४८ गोल झाले; त्यातील ३५ भारताचे होते. त्या पस्तीसपैकी २५ गोलांचा वाटा ध्यानचंद व त्याचा धाकटा भाऊ रूपसिंह ह्यांचा. दोन भावांनी एकाच स्पर्धेत केलेल्या गोलांचा हा विक्रम असावा आणि ह्यापुढे तो कोणाला मोडता येण्याची शक्यता दिसत नाही. जपानला रौप्य आणि अमेरिकेला कांस्यपदक मिळाले.

दुसऱ्या सुवर्णपदकाच्या मोहिमेवर निघालेल्या भारतीय संघात सारं काही आलबेल मुळीच नव्हतं. भारतीय आणि अँग्लो-इंडियन खेळाडू अशी गटबाजी होती. लालबहादूर बुखारी कर्णधार झाला. ब्रूम एरिक पिन्निगर त्यामुळे नाराज होता. न खेळणारा कर्णधार पंकज गुप्त ह्याने त्याची कशीबशी समजूत काढली.

उद्घाटनाच्या सोहळ्यानंतर होणाऱ्या संचलनाच्या वेळी आणखी एक पेच निर्माण झाला. दुसरा गोलरक्षक आर्थर हिंड ह्याने गणवेषाचा भाग असलेल्या फेटा घालण्यास नकार दिला. मग त्याला परत मायदेशी परत पाठविण्याचे ठरले. आर्थरने माफी मागितल्यावर वादावर पडदा पडला. संघाचे व्यवस्थापक सोंढी आणि खेळाडू ह्यांचे संबंधही काही फार मधुर नव्हते. ह्या साऱ्या अडथळ्यांवर मात करून भारताने सलग दुसरे सुवर्ण जिंकले.

बर्लिन (१९३६) 

जेसी ओवेन्सचा अमीट ठसा उमटलेले आणि भारताने हॉकीतील सुवर्णपदकाची हॅटट्रिक साधलेली ऑलिंपिक ते हेच. ह्याच स्पर्धेनंतर जादूगार ध्यानचंदने निवृत्तीचा निर्णय घेतला. दि. १ ते १६ ऑगस्ट एवढा काळ चाललेल्या या स्पर्धेत हॉकीने पुढचा टप्पा गाठला. एकूण ११ संघ, त्यांची तीन गटांमध्ये विभागणी, कांस्यपदकासाठी स्वतंत्र लढत ही त्याची वैशिष्ट्ये. गट साखळीसह बाद फेरीचे मिळून १९ सामने झाले आणि त्यात १०७ गोल झाले. आशिया खंडातून अफगाणिस्तान हा तिसरा देश सहभागी झाला. युरोपातील बहुतेक संघ सहभागी झाले, तरी इंग्लंड पुन्हा एकवार ऑलिंपिकपासून दूरच राहिले.

‘अ’ गटामध्ये तिन्ही सामने जिंकून भारताने अव्वल स्थान मिळविले. जपानविरुद्धचा ९-० असा मोठा विजय साकारला तो प्रामुख्याने ध्यानचंदच्या गोल-चौकाराने. पीटर फर्नांडिस व कार्लाईल टॅपसेल (प्रत्येकी दोन) आणि रूपसिंहने एक गोल केला. हंगेरीविरुद्धच्या ४-० विजयात रूपसिंहचा दोन, टॅपसेल व शबबुद्दीन शबब ह्यांचा प्रत्येकी एका गोलचा वाटा होता. अमेरिकेचाही ७-० असा सहज पराभव भारताने केला. त्यात सय्यद महंमद जफर, ध्यानचंद व रूपसिंह ह्यांनी प्रत्येकी दोन आणि ॲलन गुडसिर-कलेन ह्याने एक गोल केला. जपानने दोन सामने जिंकून गटात दुसरे स्थान मिळविले. हंगेरीने एक विजय मिळवित अमेरिकेला तळाच्या स्थानावर ढकलले.

तीन संघांचा समावेश असलेल्या ‘ब’ गटात यजमान जर्मनीने दोन्ही सामने जिंकून पहिले स्थान मिळविले. अफगाणिस्तान व डेन्मार्क सामना बरोबरीत सुटला. तथापि कमी गोल खाणाऱ्या अफगाणिस्तानला गटातले दुसरे स्थान मिळाले. द नेदरलँड्सने तीनपैकी दोन सामने जिंकून ‘क’ गटात पहिला क्रमांक मिळविला. फ्रान्सने एक सामना जिंकून दुसरे स्थान मिळविले. बेल्जियमला एकही सामना जिंकता आला नसला, तरी एक सामना जिंकणाऱ्या स्वित्झर्लंडला तळाला ठेवून तो संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. ह्या गटातील दोन सामने बरोबरीत सुटले.

उपान्त्य फेरीत भारत, जर्मनी, द नेदरलँड्स व फ्रान्स संघांनी प्रवेश केला. पहिल्या उपान्त्य सामन्यात भारताने फ्रान्सचा १०-० असा धुव्वा उडविला. त्यात पुन्हा चमकली ती ध्यानचंद व रूपसिंह ही भावांची जोडी. ध्यानचंदने चार, रूपसिंहने तीन गोल केले. इक्तिदार अली दारा ह्याने दोन व टॅपसेलने एक गोल केला. दुसऱ्या उपान्त्य लढतीत जर्मनीने द नेदरलँड्सवर ३-० असा विजय मिळविला. कांस्यपदकासाठी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात द नेदरलँड्सने फ्रान्सला ४-३ अशी हुलकावणी दिली.

अंतिम लढतीत जर्मनीविरुद्ध चौथा गोल (ऑलिंपिक समितीच्या संकेतस्थळावरून साभार)

अंतिम लढत पावसामुळे एक दिवस उशिरा, म्हणजे १५ ऑगस्ट रोजी झाली. त्यावर पुन्हा एकदा वर्चस्व दिसले ते भारताचेच. त्यांनी यजमान जर्मनीला ८-१ असे सहज नमवले. ध्यानचंदने कर्णधारपदाला साजेसा खेळ करीत तीन गोल लगावले. अनवाणी खेळणाऱ्या ध्यानचंदची जर्मन गोलरक्षकाशी टक्कर झाली आणि त्यात त्याला एक दात गमवावा लागला. पण त्याची जिगर कायम होती. त्याल दारा (दोन गोल), रूपसिंह, टॅपसेल, सय्यद जफर (प्रत्येकी एक गोल) ह्याची चांगली साथ लाभली.

या ऑलिंपिकमध्ये भारताविरुद्ध एकमेव गोल झाला, तो अंतिम लढतीत. स्पर्धेतील पाचही सामन्यांमध्ये खेळलेल्या ध्यानचंद (१३ गोल) व रूपसिंह (१० गोल) यांचा ह्या सुवर्णपदकात मोठा वाटा होता. ध्यानचंद व गोलरक्षक रिचर्ड जेम्स ॲलन यांचे हे सलग तिसरे ऑलिंपिक व सलग तिसरे सुवर्णपदक. आशिया खंडातल्या अफगाणिस्तानला सहाव्या व जपानला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अमेरिकेचा संघ पुन्हा तळाला राहिला.

ऑलिपिंकला रवाना होण्यापूर्वीच भारतीय संघाला एक धक्का बसला. दिल्ली एलेव्हनकडून ४-१ असा पराभव पत्करावा लागलेला हा संघ काय कामगिरी करणार, असं विचारलं जाऊ लागलं. जर्मनीतील सरावाच्या सामन्यातही जर्मनी एलेव्हनकडून भारताचा पराभव झाला. मग संघ व्यवस्थापनानं आपत्कालीन निर्णय म्हणून इक्तिदार अली दारा ह्याचा संघात समावेश केला. एक तपानंतर तो पाकिस्तानकडून खेळला.

भारतीय संघाच्या तयारीबाबत, कामगिरीबद्दल सार्वत्रिक शंका व्यक्त केली जात होती. प्रत्यक्ष स्पर्धेत कर्णधार ध्यानचंद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लौकिकाला साजेलसा खेळ केला. तिसरं ऑलिंपिक खेळून आणि देशाला तिसरं सुवर्णपदक मिळवून देऊन हॉकीच्या जादूगारानं निवृत्ती घेतली.

दुसऱ्या महायुद्धामुळे टोकियो (१९४०) व लंडन (१९४४) ऑलिंपिक झाली नाहीत. ती होती तर भारताच्या नावापुढे हॉकीतील अजून दोन सुवर्णपदकांची कदाचित नोंद झाली असती.

...

(संदर्भ - britannica.com, olympics.com आणि विकिपीडिया, 'द हिंदू', भारतीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, भारतीय हॉकी ह्यांची संकेतस्थळे.)

-------

आधीचे भाग

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey1.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey2.html

#Olympics #India #hockey #IndiaInOlympics #TokyoOlympics #GoldMedal #Tokyo #MensHockey #MajorDhyanChand #sports #LosAngelesOlympics #BerlinOlympics  #worldwar

सोमवार, ५ जुलै, २०२१

सुवर्ण पदार्पण

ऑलिंपिक, भारत आणि हॉकी - 

आधुनिक ऑलिंपिकचा अध्याय (ज्याचा उल्लेख जागतिक पटलावर नेहमीच Modern Olympics असा होतो) सुरू झाला, त्याचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष. अथेन्समध्ये (ग्रीस) ६ ते १५ एप्रिल १८९६ असे दहा दिवस झालेल्या पहिल्या ऑलिंपिक खेळाची व्याप्ती किती मोठी होती? आता मजा वाटते वाचताना, जागतिक पातळीवर क्रीडा क्षेत्रात एका नव्या अध्यायाची सुरुवात करणाऱ्या ह्या स्पर्धेत डझनभर देशांतून २०८ खेळाडू सहभागी झाले होते. ह्याच आकड्यांनी सव्वाशे वर्षांत किती मोठा टप्पा गाठला आहे. टोकियो निप्पॉन महोत्सवात २०६ देशांच्या १२ हजार खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. अर्थात कोविड-१९ महामारीमुळे ही संख्या घटेलही कदाचित.

पहिल्या ऑलिंपिकमध्ये एकूण ४३ क्रीडाप्रकार होते. त्यात हॉकीसह अन्य कोणताच सांघिक खेळ नव्हता. ह्या जागतिक क्रीडा महोत्सवात येण्यास हॉकीला साधारण एक तप वाट पाहावी लागली. नंतरच्या वाटचालीतही काही अडथळे आलेच.

लंडन (इंग्लंड), १९०८

ऑलिंपिकच्या चौथ्या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या फिल्ड हॉकीचा (आता इथून पुढे आपण त्याला फक्त ‘हॉकी’च म्हणू.) पहिल्यांदा समावेश झाला. लंडन (इंग्लंड) येथे २७ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर १९०८ असा दीर्घ काळ हे ऑलिंपिक झाले. हॉकीमध्ये यजमान इंग्लंड, आयर्लंड, वेल्स, स्कॉटलंड, जर्मनी आणि फ्रान्स हे सहा संघ सहभागी झाले होते. स्पर्धा बाद पद्धतीने खेळविली गेली व सहा सामने झाले. यजमानांनी सुवर्णपदक, आयर्लंडने रौप्य आणि वेल्स व स्कॉटलंड ह्या संघांनी कांस्यपदक जिंकले. (आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या संकेतस्थळावर ही सर्व पदके आता ग्रेट ब्रिटनच्या नावावर दिसतात.) जर्मनी पाचव्या आणि फ्रान्स सहाव्या क्रमांकावर राहिले. आयर्लंड व वेल्स संघांना थेट उपान्त्य फेरीत प्रवेश मिळाला.

सुवर्णपदक जिंकणाऱ्या इंग्लंडने सलामीच्या लढतील फ्रान्सचा १०-१ आणि अंतिम लढतीत आयर्लंडचा ८-१ असा पराभव केला. पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून रेगी प्रिडमोर व स्टॅन्ली शॉव्हेलर यांनी प्रत्येकी तीन गोल करीत ऑलिंपिकमधील पहिल्या दोन हॅटट्रिकची नोंद केली.

लढती अशा झाल्या –

२९ ऑक्टोबर : इंग्लंड विजयी विरुद्ध फ्रान्स १०-१.

स्कॉटलंड वि. वि. जर्मनी ४-०

उपान्त्य सामने - 

३० ऑक्टोबर : इंग्लंड वि. वि. स्कॉटलंड ६-१

आयर्लंड वि. वि. वेल्स ३-१

अंतिम सामना - ३१ ऑक्टोबर : इंग्लंड वि. वि. आयर्लंड ८-१

पाचवा आणि सहावा क्रमांक ठरविण्यासाठी झालेल्या लढतीत जर्मनीने फ्रान्सवर १-० फरकाने विजय मिळविला.

जेत्या इंग्लंडने तीन सामन्यांत २४ गोल केले. प्रिडमोरने दोन हॅटट्रिक नोंदवित एकूण १० गोलांची नोंद केली. त्याला शॉव्हेलर (७) व गेराल्ड लोगन (५) ह्यांची चांगली साथ मिळाली. फ्रान्स व जर्मनी ह्या संघांनी केलेले एकमेव गोल अनुक्रमे लुई पुपॉन आणि फ्रित्झ यांची कमाई होती. एकच सामना खेळून त्यात पराभव पत्करणारा वेल्स संघ विनासायास कांस्यपदकाचा मानकरी झाला.

पदार्पण झाल्यानंतरही हॉकीचा प्रवास सुकर नव्हता. पुढचं ऑलिंपिक स्वीडनच्या राजधानीत, स्टॉकहोम येथे ५ मे ते २७ जुलै १९१२ ह्या काळात पार पडलं. तिथली कवाडं हॉकीसाठी बंदच राहिली. त्यानंतरच्या म्हणजे सहाव्या आधुनिक ऑलिंपिकचं (१९१६) यजमानपद जर्मनीला मिळालं होतं. तथापि पहिल्या महायुद्धामुळं ह्या ऑलिंपिकची नोंद इतिहासात ‘रद्द’ अशीच  झाली.

अँटवर्प (बेल्जियम), १९

महायुद्ध लादलं गेल्यामुळं बेल्जियमच्या जनतेला जे काही सोसावं लागलं, त्यावर हळुवार फुंकर मारायची अशा उदात्त हेतूनं सातव्या ऑलिंपिकचं यजमानपद ह्या देशाला मोठ्या सन्मानपू्र्वक देण्यात आलं. अँटवर्प येथे २० एप्रिल ते १२ सप्टेंबर दरम्यान हे खेळ पार पडले. इथं हॉकीला पुन्हा एकदा संधी मिळाली.

ह्या स्पर्धेत हॉकीतील सहभागी संघांची संख्या घटून चारवर आली. त्यांच्यामध्ये १ ते ५ सप्टेंबर दरम्यान साखळी पद्धतीने एकूण सहा सामने खेळले गेले. जिंकणाऱ्या संघास तीन गुण व हरणाऱ्या संघास शून्य, अशी गुणरचना होती. इंग्लंड (ग्रेट ब्रिटन), डेन्मार्क, बेल्जियम व फ्रान्स हे संघ सहभागी झाले. ऑलिंपिक हॉकीमध्ये जिंकलेले पहिले सुवर्णपदक इंग्लंडने तिन्ही सामने जिंकून राखले. डेन्मार्कला रौप्य व यजमानांना कांस्यपदक मिळाले. फ्रान्सने इथेही शेवटचा क्रमांक सोडला नाही.

लढती अशा झाल्या –

१ सप्टेंबर : इंग्लंड विजयी विरुद्ध डेन्मार्क ५-१

बेल्जियम वि. वि. फ्रान्स ३-२

३ सप्टेंबर : इंग्लंड वि. वि. बेल्जियम १२-१

डेन्मार्क वि. वि. फ्रान्स ९-१

४ सप्टेंबर : फ्रान्सची इंग्लंडला पुढे चाल.

५ सप्टेंबर : डेन्मार्क वि. वि. बेल्जियम ५-२

इंग्लंडने दोन सामन्यांत १७ गोल केले व त्यांच्यावर फक्त दोन गोल झाले. रौप्यपदकविजेत्या डेन्मार्कने तीन लढतीत १५ गोलांची नोंद केली खरी; पण त्यांनी आठ गोल स्वीकारले. बेल्जियमने सहा व फ्रान्सने तीन गोलांची नोंद केली. पहिलं महायुद्ध नुकतंच संपलं होतं. त्यात युरोपातील सर्वच देश पोळून निघाले होते. त्यामुळे की काय, इथल्या स्पर्धा-शर्यतींची तपशीलवार माहिती मिळत नाही. ऑलिंपिक समितीच्या संकेतस्थळावर हॉकीसह बऱ्याच खेळांचे निकाल नाहीत. जागतिक हॉकी महासंघाच्या संकेतस्थळावरही सांख्यिकी माहिती उपलब्ध नाही.

रसिकांचं शहर आणि कलानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरिसची ओळख १९२४च्या ऑलिंपिकच्या निमित्ताने क्रीडानगरी अशीही झाली. पण याही ऑलिंपिकमध्ये हॉकी पुन्हा एकदा मैदानाबाहेरच राहिली.


पहिलं सुवर्णपदक जिंकणारा भारतीय संघ (छायाचित्र सौजन्य - olympics.com)

ॲमस्टरडॅम (द नेदरलँड्स), १९२८

समावेश, पुन्हा वगळणे, मग स्पर्धाच रद्द अशी अडथळ्यांची शर्यत हॉकीच्या नशिबी ऑलिंपिकमध्ये होती. ॲमस्टरडॅम ऑलिंपिकपासून (१७ मे ते १२ ऑगस्ट) ह्यात बदल झाला. आपल्या देशासाठीही ह्या ऑलिंपिकचं महत्त्व फार वेगळंच आहे. हॉकी आपला राष्ट्रीय खेळ आहे की नाही, ह्या मुद्द्यावर अलीकडे वाद होऊ लागला आहे. पण हॉकीनंच आपल्याला आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात नाव मिळवून दिलं, एवढं नक्की.

ॲमस्टरडॅमच्या स्पर्धेत भारतीय संघ पहिल्यांदा उतरला आणि पदार्पणातच सुवर्णपदक जिंकत वेगळ्या इतिहासाची पायाभरणी केली. ऑलिंपिक हॉकीमध्ये उतरलेला युरोपीय संघांव्यतिरिक्तचा अन्य खंडांतील पहिला देश म्हणजे भारत होय. गंमतीची एक भाग म्हणजे ऑलिंपिकची पहिली दोन सुवर्णपदकं जिंकणारा इंग्लंडचा संघ सहभागी झाला नव्हता. पहिल्यांदाच स्पर्धेत नऊ संघ सहभागी झाले. त्यांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली. गटातील सामने साखळी पद्धतीचे व नंतर उपान्त्य, अंतिम फेरी अशी स्पर्धेची रचना करण्यात आली. कांस्यपदकासाठीही लढत झाली. हे सामने १७ ते २६ मे या काळात पार पडले.

भारतानं निवडलेल्या १६ खेळाडूंच्या संघात नऊ अँग्लो-इंडियन खेळाडू होते. जयपाल सिंग, इफ्तिखार अली खान पटौदी व एस. एम. युसूफ हे खेळाडू इंग्लंडमध्ये संघात सामील होणार, असं ठऱलं होतं. काय झालं कुणास ठाऊक, पण पटौदी संघाबाहेर पडला. तोच पुढे भारतीय क्रिकेट संघाकडून सहा कसोटी सामने खेळला आणि त्यातल्या तीन सामन्यांत त्यानं नेतृत्वही केलं. त्या ऑलिंपिकमध्ये तो खेळता, तर त्याच्या नावापुढे एक वेगळा विक्रम लिहिला गेला असता.

भारतीय संघाचं नेतृत्व जयपाल सिंग ह्याच्याकडं होतं, तर ब्रूम एरिक पिन्निगर उपकर्णधार होता. संघ असा - सय्यद एम. युसूफ, रिचर्ड जे. ॲलन, मायकेल ई. रोईक, लेस्ली सी. हॅमंड, रेक्स ए. नॉरिस, शौकत अली, जॉर्ज ई. मार्थिन्स, ध्यानचंद, फिरोद खान आणि फ्रेडरिक एस. सीमन.

‘अ’ गटात भारत, बेल्जियम, डेन्मार्क, स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया आणि ‘ब’ गटात द नेदरलँड्स, जर्मनी, फ्रान्स व स्पेन संघांचा समावेश होता. साखळीतील चारही सामने सहज जिंकत भारताने गटात अग्रस्थान मिळविलं. ह्या सामन्यांमध्ये तब्बल २६ गोल करताना भारतीय खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना तशी एकही संधी दिली नाही. बेल्जियमने तीन सामने जिंकून गटात दुसरा क्रमांक मिळविला. डेन्मार्कने दोन व स्वित्झर्लंडने एक सामना जिंकला. सर्व सामन्यांमध्ये पराभूत झालेला ऑस्ट्रियाचा संघ गटात आणि पूर्ण स्पर्धेतच तळाला राहिला.

गटसाखळीत भारताचा पहिला सामना १७ मे रोजी ऑस्ट्रियाशी झाला. त्यात भारताने ६-० असा विजय मिळविला. भारताकडून मेजर ध्यानचंदने ३ गोल केले. जॉर्ज मार्थिन्सने दोन व अली शौकतने एक गोल केला. दुसऱ्या लढतीत आपण बेल्जियमचा ९-० असा धुव्वा उडविला. फिरोज खानने पाच गोल चढविले. डेन्मार्कविरुद्धच्या ५-० अशा विजयात पुन्हा ध्यानचंदचा खेळ (तीन गोल) उठून दिसला. स्वित्झर्लंडला भारताने ६-० फरकाने खडे चारले, ते ध्यानचंदच्या गोल-चौकारामुळेच!

‘ब’ गटात द नेदरलँड्स संघाने पाच गुणांसह पहिलं स्थान मिळविलं. यजमानांनी जर्मनी व फ्रान्स संघांना सहज पराभूत केले. स्पेनविरुद्धची त्यांची लढत मात्र अनिर्णीत राहिली. ऑलिंपिक हॉकीतील हा पहिला अनिर्णीत सामना. ह्या गटात जर्मनीनं दुसरं स्थान मिळविलं. फ्रान्स तिसऱ्या व स्पेन चौथ्या क्रमांकावर राहिला.

दोन्ही गटांतील दुसऱ्या क्रमांकावरच्या संघांमध्ये कांस्यपदकासाठी २६ मे रोजी लढत झाली. त्यात जर्मनीने बेल्जियमचा ३-० पराभव केला. गटांमध्ये अव्वल स्थान मिळविणाऱ्या संघांमध्ये अंतिम लढत झाली. त्यात भारताने द नेदरलँड्सवर ३-० फरकाने सहज विजय मिळवित पहिल्या सुवर्णपदकाची नोंद केली.


जादूगार...


‘जादूगार’ असे नामाभिधान मिळालेल्या ध्यानचंदने स्पर्धेत सर्वाधिक म्हणजे १४ गोल केले. देशाची इभ्रत राखायची म्हणून हा महान खेळाडू अंगात ताप असतानाही अंतिम सामन्यात पूर्ण तडफेनं खेळला. फिरोज खान व जॉर्ज मार्थिन्स यांनी प्रत्येकी पाच गोल नोंदविले. जर्मनीच्या थिओडोर हाग याच्याही खात्यावर पाच गोल होते. भारताचा ठसा उमटलेले हे पहिले ऑलिंपिक होय. स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जागतिक हॉकी महासंघाने एक देश – एक संघ आणि प्रत्येक संघ २२ खेळाडूंचा असा नियम घालून दिला. हौशी व व्यावसायिक खेळाडूची व्याख्याही महासंघाने या ऑलिंपिकच्या निमित्त स्पष्ट केली.

--------------

(संदर्भ व स्रोत - britannica.com, olympics.com आणि विकिपीडिया, भारतीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, भारतीय हॉकी ह्यांची संकेतस्थळे.)

............

पहिला भाग वाचण्यासाठी

https://khidaki.blogspot.com/2021/07/.html


#Olympics #India #hockey #IndiainOlympics #TokyoOlympics #GoldMedal #Tokyo #MensHockey #MajorDhyanChand #sports #NipponFestival #covid19 #worldwar

#ध्यानचंद_स्पर्धेत_सर्वाधिक_गोल


रविवार, ४ जुलै, २०२१

अतूट नाते भारताचे...

 


ऑलिंपिक, भारत आणि हॉकी - १

(कोविड महामारीमुळे वर्षभर लांबणीवर पडलेल्या टोकियो ऑलिंपिकला येत्या २३ जुलैला सुरुवात होत आहे. ऑलिंपिक म्हटलं की, भारतीय हॉकी संघानं जिंकलेल्या सुवर्णपदकांची आठवण होणं स्वाभाविकच. हेच निमित्त साधून हॉकी आणि ऑलिंपिकशी भारताच्या असलेल्या अतूट नात्याचा व त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा हा संकलित आढावा, साधारण बारा भागांमध्ये. आजपासून दर दोन दिवसांनी...)

टोक्यो, तोक्यो किंवा आपण नेहमी म्हणतो त्या टोकियोमध्ये क्रीडा जगताचा महोत्सव अजून बरोबर तीन आठवड्यांनी सुरू होईल - उन्हाळी ऑलिंपिक. चार वर्षांनी एकदा अनुभवायला मिळणारा हा आंतरखंडीय थरार वर्षभर वाट पाहायला लावल्यानंतर, येत्या २३ तारखेपासून चालू होईल. मग साधारण ९ ऑगस्टपर्यंत जगभरातील क्रीडा चाहत्यांचं लक्ष जपान आणि अर्थातच टोकियो वेधून घेईल. जुने विक्रम पडद्याआड जातील, नवे विक्रम घडतील. काही नवी नावे क्षितिजावर दिसतील आणि काही जुनी ओळखीची नावे अस्तंगत होताना पाहाण्याची वेळ आल्याची चुटपूटही लागेल.

आधुनिक ऑलिंपिकची चळवळ सुरू झाल्यानंतर त्यात काही अडथळे आले नाहीत, असं नाही. दोन महायुद्धांमुळे आतापर्यंत तीन ऑलिंपिक रद्द करावी लागली. त्यातलं अखेरचं ऑलिंपिक होतं १९४४. त्यानंतर तब्बल ७६ वर्षांनी कोविड महामारीमुळं ऑलिंपिक रद्द होणार की काय, अशी भीती वाटत होती. पण ते वर्षभर पुढं ढकललं गेलं एवढंच. कोविडचं जागतिक संकट पुरतं टळलेलं नसताना मोठ्या जिद्दीनं ऑलिंपिक होत आहे.

ऑलिंपिक किंवा आशियाई क्रीडा स्पर्धा म्हटलं की, तमाम भारतीय तेवढ्यापुरतं आपला मूळ क्रीडाधर्म सोडून देतात. म्हणजे क्रिकेटऐवजी ते हॉकीकडं मोठ्या आशेनं पाहू लागतात. (आपल्याकडे क्रिकेट धर्म आहे आणि त्या त्या वेळचे गाजणारे खेळाडू म्हणजे अवतार!) अगदी अलीकडच्या काळात बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक्स, वजन उचलणे, तिरंदाजी, नेमबाजी आणि कुस्ती ह्या खेळांकडंही आपलं लक्ष असतं. पदकाची आशा हॉकीऐवजी हे खेळही आता पूर्ण करू लागले आहेत.

महिला भारोत्तोलक, पुरुष कुस्तीगीर, नेमबाज, बॅडमिंटनपटू ह्यांनी अलीकडच्या काळात देशाला ऑलिंपिकमध्ये पदकं मिळवून दिली असली, तरी आपलं स्वप्न असतं ते हॉकीतील पदकाचं. हॉकी आणि भारत यांचं नातं अतूट! तो भारताचा ‘राष्ट्रीय खेळ’ मानला जातो. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात, विशेषतः विसाव्या शतकाच्या मध्यात भारताला जी काही प्रसिद्धी मिळाली ती हॉकीमुळे आणि ऑलिंपिकमुळे. वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू कमी पडत असताना, ऑलिंपिकच्या पदकतालिकेत देशाचं नाव झळकत असे ते केवळ हॉकीमुळे. ऑलिंपिकमध्ये सलग सहा वेळा व एकूण आठ वेळा सुवर्णपदक मिळविण्याचा विक्रम भारताच्या नावावर कायम आहे. उन्हाळी ऑलिंपिकमध्ये समाविष्ट असलेला या खेळाचा ऑलिंपिक परिषदेत अधिकृतरीत्या ‘फिल्ड हॉकी’ असाच स्पष्ट उल्लेख केला जातो. याचं कारण ऑलिंपिकमध्ये बर्फावर खेळली जाणारी ‘आईस हॉकी’ही असते.

आधुनिक ऑलिंपिकला प्रारंभ झाल्यानंतर १९०८मध्ये हॉकीचा समावेश करण्यात आला. त्यानंतरच्या ऑलिंपिकमध्ये हा खेळ नव्हता. तथापि ॲमस्टरडॅम ऑलिंपिकपासून हॉकीचा कायमस्वरूपी समावेश झाला. याच ऑलिंपिकमध्ये भारताने पदार्पण केलं आणि सुवर्णपदक पटकावलं. मॉस्को ऑलिंपिकमध्ये जिंकलेलं सुवर्णपदक भारताचं हॉकीमधलं शेवटचं ऑलिंपिक पदक. त्यानंतरच्या नऊ स्पर्धांमध्ये भारताला उपान्त्य फेरीही गाठता आली नाही. लंडनमधील ऑलिंपिकसाठी तर संघच पात्र ठरला नव्हता.

म्हणजे गेल्या चार दशकांपासून भारतीय हॉकी संघाला ऑलिंपिकमध्ये काही विशेष अशी कामगिरी करता आलेली नाही. अपयशाची एवढी दीर्घ मालिका असूनही हॉकीमध्ये भारताचा दबदबा कायम आहे. ‘हॉकीचे जादूगार’ अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांनी आपल्या खेळानं फार मोठ्या प्रेक्षकवर्गाला संमोहित करून सोडलं होतं. रूपसिंग, बलबीरसिंग आदी अनेक खेळाडूंनी जागतिक हॉकीवर आपला अविस्मरणीय ठसा उमटविला आहे. त्यामुळेच ऑलिंपिक हॉकी आणि भारत ही जोडून येणारी नावं आहेत, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

साधारण नव्वदच्या दशकापासून हॉकीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलत गेले. ह्या खेळात दीर्घ काळ वर्चस्व राखून असलेल्या आशियाई देशांचा भर कौशल्यपूर्ण व कलात्मक खेळावर होता. कृत्रिम मैदानावर खेळ सुरू झाल्यापासून त्यात कौशल्यापेक्षा ताकद व वेग याला अधिक महत्त्व आलं. खेळाच्या नियमांतही काही बदल झाले. ह्याचाच फटका आशियाई देशांना बसला, असं तज्ज्ञांचं मत आहे. नव्वदच्या दशकानंतर युरोपीय व ऑस्ट्रेलियाच्या खंडातील देशांचे वर्चस्व वाढत गेलेलं पाहायला मिळतं.

ऑलिंपिकच्या इतिहासात पुरुष गटात सर्वाधिक अकरा पदकं (आठ सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य) भारताने जिंकली आहेत. पाकिस्तानचा क्रमांक त्या पाठोपाठ लागतो – प्रत्येकी तीन सुवर्ण व रौप्य आणि दोन कांस्य. इंग्लंड व जर्मनी यांनी प्रत्येकी तीन वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. द नेदरलँड्सने दोन वेळा, ऑस्ट्रेलिया, पश्चिम जर्मनी, अर्जेंटिना व न्यूझीलंड प्रत्येकी एकदा सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. तीन ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करूनही स्पेनला सुवर्णपदकाला गवसणी घालणं अजून तरी शक्य झालेलं नाही.

महिला हॉकीचा समावेश १९८०च्या मॉस्को ऑलिंपिकपासून झाला. भारताने त्या स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविला. त्यानंतर थेट रिओ ऑलिंपिकमध्येच भारतीय महिलांना संधी मिळाली. तथापि तिथं संघ शेवटच्या क्रमांकावर राहिला. महिला विभागात द नेदरलँड्सने सर्वाधिक आठ (तीन सुवर्ण, दोन रौप्य व तीन कांस्य) पदके जिंकली आहेत. ऑस्ट्रेलियाने तीन वेळा सुवर्ण, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, स्पेन व झिम्बाब्वे यांनी प्रत्येकी एकदा सुवर्ण जिंकले. अर्जेंटिना व दक्षिण कोरिया यांनी प्रत्येकी दोन वेळा अंतिम फेरी गाठली आणि दोन्ही वेळा त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चीन, पश्चिम जर्मनी व चेकोस्लोव्हाकिया यांनी प्रत्येकी एकदा रौप्यपदक पटकाविलं आहे. ह्या यादीत भारताचं नाव येण्याची संधी टोकियोत मिळेल का, हा कुतुहलाचा विषय आहे.

........

(विविध संकेतस्थळांवरील माहितीचा ह्या लेखासाठी उपयोग झाला.)

............

#olympics #India #hockey #IndiainOlympics #TokyoOlympics #Olympics2020 #GoldMedal #Tokyo #Men'sHockey #women'sHockey #MajorDhyanChand 

गुरुवार, २४ जून, २०२१

एक फोटो आणि एक कविता

 
























आकाश निरभ्र

फांद्या निष्पर्ण

सभोवताल

उदास, जीर्ण


उद्या कदाचित

भरून येईल आभाळ

कोसळत राहतील सरी

डहाळीला नवी उभारी


औदासीन्य जाईल

जीर्णोद्धार होईल

आजचे काहीच

उद्या ना राहील

--------------

दि. २४ जून २०२१

रो-को विजय

रोक सको तो रोक लो... तीन सामन्यांमध्ये दोन शतकं! ............ मायदेशात कसोटी मालिका गमावल्यानंतर पंधरवड्याच्या आतच भारताने दक्षिण आफ्रिकेवि...