Saturday 5 December 2015

नगरचा झालाय 'खाया'पालट!



(नगरच्या खाद्यजीवनावर लिहिलेला हा लेख दैनिक सकाळच्या सप्तरंग पुरवणीत खाद्ययात्रा सदरामध्ये साधारण सव्वातीन वर्षांपूर्वी, म्हणजे १२ ऑगस्ट १२ रोजी प्रसिद्ध झाला. तो गेल्या महिन्यात व्हॉट्सवर कसा कोण जाणे व्हायरल झाला.­ नगरमधल्या अनेक ग्रूपवर तो आला. मला स्वतःला सहा जणांनी पाठवला. म्हणूनच मग ठरवलं त्याला आपल्या खिडकीतही जागा देऊ. ते इंग्रजीत म्हणतात ना ओल्ड वाईन इन न्यू बॉटल.. अगदी तसंच!)


उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध नगरचा कापडबाजार दिवसा गजबजलेला असतो. इथंच रात्रीही गर्दी दिसते. दिवसाची गर्दी खिसा हलका करवून घेऊन खरेदीच्या भारानं तृप्त झालेली असती. रात्रीची गर्दीही तृप्त; पोटावरून हात फिरवत ढेकर देत असते. खिसा फारसा हलका न होताच तिला हे समाधान लाभतं. 'स्नॅक', पाव-भाजी, सँडविच, 'कच्ची दाभेली', 'फ्रूटस्लार्ड', लस्सी, 'डबल मलई मार के' गरमागरम दूध, सोबत डिंकाचा लाडू असं बरंच काही काही त्यांनी कापडबाजारातल्या 'चौपाटी'वर 'उदरस्थ' केलेलं असतं.

नगर. सात जिल्ह्यांचा शेजार लाभलेला जिल्हा. या जिल्ह्याचं मुख्यालय म्हणजे अल्पसंख्याक बहुसंख्य असलेलं शहर! जिल्ह्याच्या या टोकात आणि त्या टोकात फार फरक. 'महाराष्ट्राची चेरापुंजी' अशी ख्याती असलेलं घाटघर या जिल्ह्यात आणि नेहमी पाणी विकत घ्यावं लागणारं दुष्काळी कर्जतही याच जिल्ह्यातलं! तिकडं अकोल्यात नाचणी-तांदळाची भाकरी, संगमनेर-पारनेरमध्ये बाजरीची आणि कर्जत-जामखेडमध्ये ज्वारीची भाकरी. अशी 'एकतेतील विविधता' इथं अगदी आवर्जून पाहायला मिळते. विस्तारलेल्या या जिल्ह्यातील बोलीत, कपड्यांत आणि खाण्यातही स्वाभाविकच वेगळेपण दिसतं. असं असल्यामुळेच की काय, इथली अशी खास "खाद्यसंस्कृती' प्रसिद्ध वगैरे नाही; पण म्हणून इथं आलेला पाहुणा उपाशी जातो, असं मुळीच नाही. तो इथली मिसळ, भेळ, वडे खाऊन, लस्सी पिऊन तृप्त होतो. ओळखीचा कुणी नगरला जाणार असेल, तर तिथनं खवा आणायला आवर्जून सांगतो. 

पुण्याचा शेजार लाभलेलं नगर आता बदलतंय, असं गेल्या पाव शकापासून सांगितलं जातं. इथले रस्ते तसेच असले, तरी बाकी बदल नक्कीच होतोय. खाण्या-पिण्यात तर तो नक्कीच दिसतो. ऐंशी-नव्वदीच्या दशकात 'मिठ्ठा वडा' आणि फरसाण किंवा गरम 'भजे' आणि 'जिलेबी'चा नाष्टा करणाऱ्या नगरकरांपुढं आता अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. चौकाचौकात सकाळी पोहे-उप्पीट-इडली विकणारे उभे असतात. कुणी दाक्षिणात्य किडमिडीत छोकरा 'पोंगा' वाजवत सकाळी-सकाळी सायकलवरून इडल्या आणि मेदूवडे विकत गल्ल्या पालथ्या घालतो. काही चौकांत सकाळपासूनच वडे-भजी-पापडीचे घाणे खमंग वासानं खुणावत असतात. रात्रीच्या जेवणासाठीही नवनवी हॉटेलं सुरू होत आहेत. पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावरच्या हॉटेलांतील मेन्यूकार्डाच्या तोडीस तोड मेन्यू आणि तेवढाच दर असलेली हॉटेलंही आहेत. सावेडीसारख्या उच्चभ्रूंच्या उपनगरात 'डॉमिनोज्‌'सारखी 'फूड जॉइंट' उभी राहिली आहेत.

भेळ, भजी आणि मिसळ या 'तामसी' त्रयीवर नगरकर मनापासून प्रेम करतो. एसटी स्टँ, तिथली गर्दी, बाजूलाच एक छोटं दुकान. तिथं 'बडा ख्याल'चे सूर रेंगाळत आहेत आणि घाईतले प्रवासी चटकदार भेळेचा छोटा ख्याल संपवताहेत. जुन्या बसस्थानकावरच्या 'बाबासाहेब भेळ'चं हे चित्र अनेक वर्षांपासूनचं. तिथंच रियाज सफाईदारपणे कांदा कापत, शास्त्रीय संगीताच्या तालावर पातेल्यात डाव फिरवत 'ओली का सुकी?' विचारत असतो. त्यांचंच आता सावेडीत चकचकीत दुकान उभं आहे. औरंगाबाद रस्त्यावरच्या पांढरी पुलाचीही भेळ प्रसिद्ध. येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या थांबून तिथं हमखास भेळ खातात. तीच 'आशा भेळ' गेल्या काही वर्षांपासून नगर शहरातही मिळते. 'सौ नगरी, एक संगमनेरी' असं बिरुद मिरवणाऱ्या संगमनेरमध्येही प्रसिद्ध आहे ती भेळच. नडे यांची भेळ! नगर-मनमाड रस्त्यावरील कोल्हारमध्येही चटकदार भेळ मिळते. वाढत्या महागाईमुळं ती आता खिसा थोडा अधिकच हलका करू पाहते आहे.


बाळासाहेब चंगेडेची मिसळ
म्हणजे परम 'संतोष'!

चटकदार मिसळ
नगरमध्ये मिसळ काही नव्यानं मिळते, अशातला भाग नाही; पण पूर्वीची 'हिंदू हॉटेलां'मधली शिळी भजी आणि त्यांचा चुरा, फरसाण आणि 'शँपल' ही असली मिसळ आता कालबाह्य झाली. आता इथं मिसळ प्रसिद्ध आहे ती खिस्तगल्लीतल्या बाळासाहेब चंगेडे यांच्या 'संतोष'मधील, नव्या पेठेतील 'गुंजन'ची आणि 'रसरंग'ची. पन्नास रुपयांत पोटभर गुजराती जेवण देणाऱ्या खानावळींच्या गल्लीतल्या कोपऱ्यात चंगेडे यांचं हॉटेल आहे. तिथं अगदी सोलापुरातल्या इडलीगृहांसारखा आग्रह होतो. मटकी, पोहे, वर चिवडा-फरसाण, कांदा-लिंबू आणि हवे असतील तर तळलेले शेंगदाणे. रस्सा हवा तो उपलब्ध. 'फिक्का', 'मेडियम' आणि 'तेज'! दुधाचे रतीब घालणारे तिथं मस्तपैकी तेज रश्‍शाच्या जोडीला मिरचीच्या ठेच्याचा गोळा घेऊन भाकरी मुरगाळताना दिसतात. जोडीला बाळासाहेबचा चिवडा, पाव आणि रश्‍शाचा आग्रह असतोच. इथंच शेव टाकलेले पोहे, उपवासाची आणि बिनउपवासाची (म्हणजे शेव भुरभुरलेली) साबूदाण्याची खिचडी, शेंगदाण्याचा लाडूही मिळतो. 'गुंजन'ची मिसळ अशाच थाटाची; पण थोडी सौम्य प्रकृतीची असते. तिथली खिचडी आणि त्यानंतर मिळणारा चहाही छान.

'स्नॅक' नावाचा प्रकार ह्या नावानं फक्त नगरमध्येच मिळतो. पावांच्या दोन स्लाईसमध्ये बटाट्याची भाजी टाकून 'टोस्ट' केलेला हा पदार्थ नगरकर मनापासून खातात. गरमागरम 'स्नॅक'सोबत टोमॅटोचा सॉस किंवा हिरवी चटणी असली की बास. त्यानंतर ग्लासभर दूध घशात ओतलं की, तृप्ती कशी ओसंडून वाहते. जेवण करून शतपावलीसाठी बाहेर पडणारे कापडबाजारात जाऊन असं एखादं 'स्नॅक' किंवा 'सँडविच' सहज आपलंसं करतात. कापडबाजारातच पाव-भाजीच्या, सँडविचच्या, च्छी दाबेलीच्या गाड्याच गाड्या असतात. खाणं झालं, की 'पिणं' आलंच; मग खवय्ये लस्सी, 'फ्रूटस्लार्ड' आदींना न्याय देतात. 'फ्रूट स्लार्ड' हे फ्रूट सॅलॅडचं नगरी नामकरण! ते चमच्यानं खायचं आणि मधूनच प्यायचं अशा घन-द्रव रूपात असतं.

एरवीही नगरकरांना आपल्या गावच्या लस्सीचा फार अभिमान आहे. 'द्वारकासिंग' आणि तत्सम मंडळी मोठ्या ग्लासात आइस्क्रीमचा (बहुदा पिस्ता) गोळा टाकून ते पेश करतात. आधी चमच्यानं आइस्क्रीम आणि मग लस्सीचे घुटके. गारेगार होतात मंडळी! हाच वसा 'स्वीट होम'नं आइस्क्रीमच्या रूपानं जपला आहे. त्यांच्या सावेडी, कापडबाजारातील हॉटेलांमध्ये मिळणारी सीताफळ, शहाळ्यासह विविध फळांची आइस्क्रीम आत्माराम 'ठंडा ठंडा कूल कूल' करणारी असतात. 'स्वीट होम'च्या धनेश बोगावत ह्यांनी आता हॉटेलांची जणू 'चेन' सुरू करून खाणाऱ्यांची 'चैन' केली आहे!



नगरच्या कापडबाजारात रात्रीच्या वेळी गर्दी असते ती खवय्यांची.

कापड बाजारात 'पापड-भाजी' नावाचा एक अद्‌भुत प्रकार मिळतो. सामोशाच्या पारीची पुरी लाटून तिचा तळलेला 'पापड', चटणीएवढी बटाट्याची भाजी आणि जोडीला 'स्सss हाय!' करायला लावणारा ठेचा. एकदम हट के. वडा-पाव हे 'राष्ट्रीय खाद्य' इथंही मिळतं. माणिक चौकातल्या दत्ताच्या देवळाच्या दाराशीच 'सोपानराव वडेवाले' अनेक वर्षं खाणाऱ्यां तृप्त करीत आहेत. तिथं दुपारी गाडी लागली, की गर्दी जमू लागते. वेगवेगळ्या गल्ल्यांतले 'महाराज'ही वड्यांचे आणि पाठोपाठ भज्यांचे घाणे तळत असतात.

खारी आणि पॅटिस
'पॅटिस', अर्थात 'व्हेज पफ'ही इथला लोकप्रिय पदार्थ. बेकऱ्या-बेकऱ्यांमध्ये तो खाण्यासाठी गर्दी असते; पण त्याला खरी लोकप्रियता मिळवून दिली, दिलीप चंदे यांच्या 'जय जलाराम बेकरी'नं. 'शुद्ध शाकाहारी' बेकरी पदार्थ या शहरात खऱ्या अर्थानं पहिल्यांदा आणले 'जलाराम'नं. त्यांची खारी, टोस्ट आणि वेगवेगळी बिस्किटं खाण्याच्या मोहात पाडून वजन वाढवणारीच. केक आणि पॅटिससाठी 'दत्त'च्या दारातही गर्दी असते.

इथं खवा बऱ्यापैकी उपलब्ध असल्यानं मिठायाही छान मिळतात. 'महेंद्र', 'बंबईवाला', 'मुंजोबा', 'बन्सीमहाराज' आदी मंडळींनी नगरकरांना गोड बोलायची नसली, तरी गोड खायची सवय मात्र नक्कीच लावली. राजकुमार धूत पहिल्यांदा राज्यसभेवर गेले, तेव्हा वाटण्यात आलेल्या पेढ्यांची चव विसरणं कठीणच. हा पेढा 'बंबईवाला'च्या खास मेहनतीनं आकाराला आला होता. 'कैलास उडपी'चा काला जामून, कापडबाजारातील गाड्यांवर मिळणारा डिंकपाक आवर्जून खाण्यासारखा.

ह्या शहरात एके काळी 'ढाबा संस्कृती' फार प्रसिद्ध होती. मित्रमंडळी रात्रीची जेवायला जायची म्हटलं, की गाड्या आपसूक सोलापूर, पुणे, औरंगाबाद रस्त्यांवरील ढाब्यांकडे वळत. तिथं हॉटेलांच्या तुलनेत थोडं स्वस्त मिळे. मेन्यू मात्र सगळीकडे तोच पंजाबी थाटाचा, आलू-मटर, चिकन चिली, तंदूर असा. अलीकडं ती संस्कृती मावळली; पण आता शहरात आणि बाहेरच्या रस्त्यांवरही शाकाहारी-मांसाहारी नानाविध पदार्थ देणारी उपाहारगृहं आहेत. त्यावर पंजाबी खाद्यसंस्कृतीचा वरचष्मा आहेच; जोडीला काळ्या मसाल्यातली मटन हंडी किंवा काळ्या मसाल्यातली भाजी, पिठलं-भाकरी-ठेचा असं आवर्जून देणारी उपाहारगृहंही आहेत. 'काँटिनेंटनल फूड'चा शिरकाव झाला आहे; पण स्वस्त आणि मस्त 'सीझलर' खावं ते जुन्या स्टँडसमोरच्या 'सारंग'मध्येच.

झणझणीत शिपी आमटी
नगरमध्ये 15 वर्षांपूर्वी झालेल्या साहित्य संमेलनानं एक साहित्यबाह्य प्रकार चर्चेत आणला. त्यामुळे साहित्याच्या आस्वादाऐवजी 'शिपी आमटी'च्याच स्वादाची अधिक चर्चा होऊ लागली. या आमटीनं दुष्काळी कर्जतला 'झणझणीत' प्रसिद्धी मिळवून दिली. मिश्र डाळी भाजून-वाटून केलेली ही आमटी वेगळीच. ताजा वाटलेला मसाला आणि फोडणी देणारे स्पेशालिस्ट, ही तिची वैशिष्ट्यं. भाकरी किंवा चपाती चुरून (कुस्करून नव्हे!) खाण्यानंच या आमटीची लज्जत वाढते. जोडीला भाजलेले शेंगदाणे आणि बुक्कीनं फोडलेला कांदा असला, की ब्रह्मानंदी टाळी लागण्यासाठी आणखी कशाची गरजच नाही. कर्जतची दोन-तीन हॉटेलं याच शिपी आमटीसाठी प्रसिद्ध आहेत. तिथं राजकीय सभा, बैठका, मेळावे यासाठी लोकांना आमंत्रण देताना 'तमूक तमूकची शिपी आमटी आहे' असं (तिखट) मधाचं बोट लावावं लागतं!

जिल्हाविभाजन, पाणीवाटप अशा सगळ्याच प्रश्‍नांवर मतभिन्नता असली, तरी 'चुरून खाणंह्याबाबत मात्र जिल्ह्यात एकमत आहे! म्हणूनच 'कंदुरी'चा बेत कुणी सहसा चुकवत नाही. इथं मटन काळ्या मसाल्यातच पाहिजे. पुणे रस्त्यावर, केडगावजवळच्या 'संदीप'मधली मटनहंडी म्हणून तर गर्दी खेचत असते. 'पांढरा रस्सा', 'तांबडा रस्सा' असं काही रंगांचं फॅड इथं अजून आलेलं नाही. नळी फोडताना आवाज आला पाहिजे आणि कोंबडी गावरानच पाहिजे, रश्‍शात भाकरी-चपाती चुरूनच खाता आली पाहिजे, एवढाच नगरकरांचा आग्रह. भंडारदरा, राहुरी आणि प्रवरासंगम इथं मासे चांगले मिळतात. राजकीय पक्षांच्या गुप्त बैठका 'मुळा डॅम'वरच का होतातह्याचं रहस्य तिथल्या 'फिश'मध्ये आहे. त्यांचा फडशा पाडतच कोणता मासा गळाला लावायचा किंवा कोणता मासा गिळायचाह्याची खलबतं होतात.

वर्षासहल आणि भंडारदरा यांचं नाते अतूट आहे. धरणाजवळच 'कॅफे डॅम कॉर्नर' आहे. नाना प्रकारची भजी संजय महानोर तळत असतो. मिरची आणि चटणीबरोबर प्लेटांमागे प्लेटा भजी खाल्ली की 'डॅम गुड!' असंच म्हणावं वाटतं. याच भंडारदऱ्यात 'काका हॉटेल'मध्ये अगदी शुद्ध शाकाहारी, घरगुती (पण भोपळ्याची किंवा चाकवताची भाजी नसलेलं) गरमागरम चविष्ट जेवण मिळतं. अकोले तालुक्‍यातला राजूरचा पेढा खाणाऱ्याला वेडा बनवील असाच असतो. तिथल्या नवाळी बाबांचा पेढा सकाळी बनतो आणि संध्याकाळी खल्लास! संगमनेरच्या 'स्वल्पविराम'मधील मिसळ-पुरीही 'टेसदार' असते.

आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनलेल्या शिर्डीत बहुप्रांतीय खाद्यसंस्कृती गुण्यागोविंद्यानं नांदते. तिथं रस्त्यावरच्या कोपऱ्यावर घरगुती पोहे मिळतात आणि 'फास्ट फूड'चे भलेमोठे 'जॉइंट' पर्यटक भाविकांना खुणावत राहतात; पण प्रसादालयातील जेवणात मिळणाऱ्या खोबऱ्याच्या बर्फीची लज्जत याहून किती तरी न्यारीच! खाण्यासाठी जगणं की जगण्यासाठी खाणं असा काही तात्त्विक वगैरे वाद नगरकर मानत नाही. तो खाता खाता जगतो आणि जगता जगता खातो!

­(दैनिक सकाळमधून साभार)


#food #ahmednagar_food #foodtourism #misal #ShipiAmati #Shirdi #Bhandardara_dam #mula_dam #foodie #Hotels #foodjoints

3 comments:

  1. अण्णासाहेब वाकचौरे, वीरगाव, तालुका:अकोले (अहमदनगर )18 December 2015 at 23:40

    'लोकसत्ता'मध्येही एकेकाळी आपले लेख वाचकांना वैचारिक मेजवानीच असायची!असेच तत्कालीन वाचकप्रीय
    लेख शोधून पुन्हा आपल्या 'खिडकी'मध्ये उजाळा द्यावा.

    ReplyDelete
  2. आदरणीय कुलकर्णी सर , खमंग पदार्थांची यादी वाचत असताना पोटाची भूक तर वाढत होतीच परंतु तुम्ही केलेल्या खाद्य संस्कृतीचे अचूक वर्णन वाचत असताना वाचक म्हणून वाचनाची भूक मात्र तृप्त होत होती . खूप छान ....कठीण भलतेच लिहिणे, त्याहून कठीण बंद लेखणी करणे...

    ReplyDelete

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...