Wednesday 30 December 2015

‘मी बोललंच पाहिजे असं नाही’

 (सौजन्य : https://en.wikipedia.org)
घरात रेडिओ सुरूच असायचा. करमणुकीचं तेव्हाचं ते एकमेव साधन होतं. पुणे, मुंबई ब आणि सिलोन ही केंद्रं त्यावर आलटून-पालटून चालू असत. पुणे-मुंबई केंद्रांवरची गाणी कानावर पडत राहिली. खूप खूप वेळा ऐकून ऐकून त्यातली काही आवडायला लागली. आधी संगीत, मग स्वर आणि शेवटी शब्द, असा तो कळण्याचा जमाना होता. लिहायला-वाचायला शिकल्यावर ही गाणी मंगेश पाडगावकरांची आहेत, हे समजलं. त्यातल्या काहींनी आनंदाच्या क्षणी साथ दिली, काहींनी रिकाम्या वेळेत गुणगुणायला मदत केली आणि काहींनी एकटेपणी अधिक हळवं केलं!

कविता फारशी कळत नाही; पण तरीही छोटा-मोठा, लोकप्रिय, एकांतप्रिय, शब्दप्रिय, शब्दबंबाळ... असे कवी आणि कविता अनुभवानंतर जाणवायला लागल्या. मंगेश पाडगावकर गीतकार म्हणून अधिक आवडीचे.

या महान कवीशी थेट बोलण्याची संधी एकदाच मिळाली. अगदी समोरासमोर. एक-दीड मिनिटाचाच तो संवाद होता. माझा थेट प्रश्न आणि त्यांचे नेमकं, मोजक्या शब्दांतलं उत्तर.

एकवीस वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे हा. 14 फेब्रुवारी 1995. महाराष्ट्रप्रांती तेव्हा व्हॅलेंटाईन डे अजून बोकाळला नव्हता. प्रेमदिन असं त्याचं वृत्तपत्रीय अभिजात मराठीकरणही तेव्हा झालं नव्हतं. त्या दिवशी नगरच्या नगर महाविद्यालयात स्वर-संवाद असा कार्यक्रम होता. मंगेश पाडगावकर यांची मुलाखत आणि दोन प्रश्नांच्या दरम्यान स्थानिक महाविद्यालयीन कलाकारांनी सादर केलेली त्यांची गाणी, असं त्याचं स्वरूप होतं.

परभणीचं गाजलेलं साहित्य संमेलन नुकतंच झालं होतं. (साहित्य संमेलनाचं यश जमलेल्या गर्दीवरून मापण्याची सवय परभणीनं लावली आणि दोन वर्षांनी नगरच्या संमेलनात त्याचा अतिरेक झाला!) तर त्या परभणीच्या संमेलनात निसर्गकवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना. धों. महानोर यांच्या मुलाखतीनं खळबळ उडवून दिली होती. करंदीकर, बापट, पाडगावकर यांनी काव्यवाचनाची गोडी घालवली असा बॉम्बगोळाच त्यांनी टाकला होता. त्याच सुमारास त्यांनी एका लेखात ‘‘बिजली, धारानृत्य हे खऱ्या अर्थाने पाडगावकरांचे प्रातिनिधिक संग्रह नाहीत, अभिव्यक्तीच्या अप्रामाणिकपणाचा त्यांनी अतिरेक केला, अशी स्फोटक विधानं केली होती. पाडगावकर आणि महानोर यांच्यात नेमकं काय बिनसलंय ते ठाऊक नव्हतं. मंचीय कवींबद्दल महानोरांनी एकदम शस्त्र का परजलं, हेही माहीत नव्हतं. (याच महानोरांनी पुण्यातल्या साहित्य संमेलनात विंदा करंदीकर यांचं आपल्यावर किती प्रेम होतं, हे सांगणारं पाल्हाळिक आख्यान लावलं होतं. तर ते असो!)

तेव्हा मी लोकसत्तामध्ये काम करीत होतो. नगर महाविद्यालयात शिकणारा अभय जोशी तिथंच मुद्रितशोधक होता. स्वर-संवादचा सूत्रधार तोच होता. माझं वाचन आणि गाण्यातला माझा कान, याबद्दल मनात असलेल्या गैरसमजातूनच त्यानं मला या कार्यक्रमाला येण्याचं खास आमंत्रण दिलं. (कार्यक्रमाची बातमी यावी, हा त्यामागचा खरा हेतू होता, हे मला नंतर खूप वर्षांनी उमगलं. म्हणजे अभयचा गैरसमज असल्याचा गैरसमज माझाच होता तर!)

एवढा मोठा कवी थेट पाहायला मिळणार, त्याचे शब्द ऐकायला मिळणार म्हणून कार्यक्रमाला मुद्दाम गेलो. महानोरांनी नुकत्याच तोफा डागल्या होत्या. त्याबद्दल थेट मंगेश पाडगावकर यांची प्रतिक्रिया मिळाली, तर मोठी बातमी आपल्याला मिळेल, असाही उद्देश होताच. प्रश्न होता, त्यांना भेटायला कसं मिळणार? मी काही कुणी नाव असलेला पत्रकार नव्हतो. (आणि नाहीही!) त्यांना गाठायचं कसं आणि विचारायचं कसं?

सुदैवाने कार्यक्रमस्थळी जातानाच पाडगावकर भेटले. आम्ही दोघेही समोरासमोर. पहिल्याच क्षणी लक्षात आले ते त्यांचे प्रसिद्ध डोळे आणि दाढी. जाड भिंगाच्या चष्म्यातून समोरच्याचा आरपार वेध घेताहेत, असं वाटणारी त्यांची नजर. ओळख दिली आणि महानोरांच्या मुलाखतीचा, लेखाचा संदर्भ देत पाडगावकर यांना प्रश्न विचारला.

चेहरा आहे तसाच निर्विकार ठेवून पाडगावकर म्हणाले, ‘‘अनेक माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करतात, बोलतात आणि लिहितात. त्याबद्दल मी बोललेच पाहिजे असे नाही. कविता करणे आणि तुम्ही म्हटलात, तर त्या ऐकविणे माझे काम आहे. या विषयावर मी काही बोलणार नाही.’’

स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका. प्रश्नाला आवश्यक तेवढं उत्तर पाडगावकर यांनी दिलं. पुढचा प्रश्न विचारायच्या आधीच त्यांच्या सोबत असलेले त्यांचे नातेवाईक आणि नगर महाविद्यालयातील प्राध्यापक सुधीर शर्मा यांनी घाई केली. चला लवकर, कार्यक्रमाला उशीर होतोय... असं म्हणत त्यांनी पाडगावकर यांना हाताला धरूनच नेलं.

नंतर मग मुख्य कार्यक्रम रंगला. अभय जोशी आणि प्रज्ञा चासकर यांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते मोकळेपणाने बोलले. कलावंत, त्यांची सामाजिक बांधिलकी, कवी म्हणून प्रेरणास्थान, काव्यप्रेरणा कोणती अशा वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांनी हसत-खेळत उत्तरं दिली.

कलावंताचं स्वातंत्र्य महत्त्वाचं की, सामाजिक बांधिलकी महत्त्वाची?’, असं त्यांना अभय-प्रज्ञा यांनी विचारलं. त्यावर पाडगावकर म्हणाले होते, ज्याचा झेंडा जास्त फडकत असतो, तो विचार मानणे म्हणजे त्या काळाची बांधिलकी. पण तुमचे झेंडे मी कोण उचलणार? माणसाच्या जाणिवेचे, त्याच्या सुख-दुःखाचे रंग मानणारा मी, म्हणजे माझ्यातील कलावंत त्या रंगाचा झेंडा उचलतो. व्यक्ती म्हणून मी मला भावणाऱ्या कोणाही आदरणीय व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवीन. पण कलावंत म्हणून कोणत्याही तत्त्वज्ञानाचा झेंडा खांद्यावर घेणार नाही. कलावंत म्हणून माझी जाणीव जीवनाला सामोरी जाणारी आहे. मी माणुसकीला बांधिल आहे...

कलेमध्ये निमित्ताला महत्त्व नाही. पुष्कळ वेळा सहज काही सुचून जातं. निर्मितीच्या प्रक्रियेला गूढरम्य आणि भावरम्य महत्त्व देण्याची गरज नाही, असं सांगताना पाडगावकर यांनी तिथं जमलेल्या अनेक भावी कवी-लेखकांच्या मनातील अद्भुतरम्य फेसाळ फुगे सहजपणे फोडून टाकले होते.

पाडगावकर तेव्हा न-गज़ल नावाचा प्रकार हाताळत होते. त्याच्या आगेमागेच चोली के पीछे क्या है...नं आजच्या शांताबाई किंवा पिंगासारखा धुमाकूळ घातला होता. त्याचं उदाहरण देताना त्यांनी चोलीचा संदर्भ दिला होता. ते म्हणाले होते, एका तरुणानं एका वेश्येला उद्देशून हे गाणं म्हटलं. त्यावर त्या वेश्येनं दिलेलं उत्तर म्हणजेच न-गज़ल.

चोली के पीछे कहूँ मी काय आहे?
ऐक रे भडव्या तुझी मी माय आहे!
हातभट्टी झोकल्या बारा जणांनी
रात्रभर तुडविलेली मी गाय आहे!

सुमा करंदीकर यांचं रास वाचलं. त्याच्या आगेमागेच कधी तरी यशोदा पाडगावकर यांचं कुणास्तव कुणी तरी... वाचलं. आपल्याला दिसणाऱ्या मनमोहक शब्दगुलाबाचे काटे कुणाला तरी बोचले आहेत, हे तेव्हा कळलं. मोठ्या वृत्तपत्रांमध्ये दर वर्षी जूनमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या पाडगावकरांच्या लिज्जतदार कवितांची आठवणीनं वाट पाहत होतो. कुणी तरी त्यांची त्यावरून पापडगावकर अशी उडवलेली खिल्लीही मनापासून आवडली होती.

त्या मिनिटभराच्या मुलाखतीत पाडगावकर जे म्हणाले होते, त्यातलं एक वाक्य फार महत्त्वाचं होतं - तुम्ही म्हटलात तर कविता ऐकविणे माझे काम आहे. म्हणजे महानोरांना त्यांनी थेट उत्तर दिलंच होतं त्यातून. बापट गेले, नंतर विंदा करंदीकरांनी अलविदा केलं. आज पाडगावकर. कवितांचा मंचीय आविष्कार साजरा करणाऱ्या त्रिमूर्तीतील शेवटचा तारा आज निखळला. खऱ्या अर्थानं आज पडदा पडला आहे!

6 comments:

  1. आतल्या पडझडीशी तहहयात प्रामाणिक राहणार्या त्याच्या निर्व्याज लेखणीस सलाम व सर्वांच्या आवडत्या पाडगावकर सरांना विनम्र श्रद्धांजली...

    ReplyDelete
  2. खूपच छान! मस्त!! Interesting Blog.
    - संजय आढाव, नगर

    ReplyDelete
  3. एकवीस वर्षांपूर्वी खास बातमीच्या उद्देशाने 'लोकसत्ता साठी
    मंगेश पाडगावकरांची आपण मुलाखत घेतली.त्या प्रसंगाची टिपणे,आठवण, तत्कालीन बातम्यांची कात्रणे आजपर्यंत जपून ठेवली. हे विषेश भावले. निष्ठावान,अभ्यासू पत्रकारांचा लेख आवडला.
    (पत्रकार, अण्णासाहेब वाकचौरे, वीरगाव, तालुका :अकोले, अहमदनगर )

    ReplyDelete
  4. फाssर सुरेख रे!
    - मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली

    ReplyDelete
  5. नेमक्या शब्दात या महाकवीला आपण श्रद्धांजली वाहिलीत.
    मंगेश नाबर

    ReplyDelete
  6. अप्रतिम शब्द सुमनांजली एका महान मंगेशांना.
    सुनील आढाव

    ReplyDelete

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...