Friday 18 December 2015

एका लढ्याचं चलच्चित्रण

(शरद जोशी यांच्या निधनाच्या बातमीनं गेल्या आठवड्यात अस्वस्थ व्हायला झालं. त्यांच्याबद्दल लिहावं, असं वाटत होतं. पण हवं तसं नाही जमलं ते. म्हणून तूर्त, ज्यांच्या लिखाणातून तरुणपणी शरद जोशी समजत गेले, त्या विजय परुळकर यांच्या योद्धा शेतकरी पुस्तकाबद्दल पाच वर्षांपूर्वी लिहिलेलंच इथं पुन्हा प्रसिद्ध करतो आहे.)

मागच्या गळीत हंगामात उसाची टंचाई भासेल, असा साखर कारखानदारांचा अंदाज होता. हंगामाच्या सुरुवातीलाच कारखानदारांनी घोषणांचा दणका उडवून दिला. शेतकऱ्यांना आपल्याकडे वळवलं पाहिजे; त्यांचा ऊस आपल्याच कारखान्याला आला पाहिजे. म्हणून मग त्यांनी पहिलाच हप्ता एकवीसशे-बावीसशे रुपये टनाप्रमाणं जाहीर केला.

मागच्याच वर्षी साखरेचे दर वाढले होतो. कारखानदार खुशीत होते. नंतर दर घसरले. कारखानदार नाराज झाले. त्यांनी बैठक घेतली. किमान अमूक-तमूक भावापेक्षा कमी दरानं साखर विकायचीच नाही, असा निर्णय घेतला. संघशक्ती.

उद्याच्या हंगामात उसाचा पहिला हप्ता किमान अडीच हजारांचा मिळावा, असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला तर? बहुतेकांचा ऊस शेतातच वाळेल. तो पेटवून द्यायची वेळ येईल.

तीस वर्षांपूर्वी उसाला 300 रुपये टन भाव मिळावा, म्हणून आंदोलन  झालं. तो भाव कसा परवडणारा नाही, हे सरकार, कारखानदार सांगत होते. त्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठ्या चालवल्या गेल्या. डोकी फोडण्यात आली त्यांची.

उद्याही आंदोलन झालं, तर व्यवस्था आणि यंत्रणा लाठ्या-काठ्या-बंदुकीनिशीच शेतकऱ्यांशी लढाई करील. तीस वर्षांपूर्वी लढणारा त्यांचा नेता आता पंचाहत्तरीत आला आहे. त्याचे सहकारीही पांगले आहेत.

या वेळचं पुस्तक त्या नेत्याचं, त्याच्या 30 वर्षांपूर्वीच्या अनोख्या लढ्याचं. शरद जोशी नाव त्या नेत्याचं. पुस्तक योद्धा शेतकरी. विजय परुळकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक पुण्याच्या राजहंसनं प्रकाशित केलं आहे. पहिली आवृत्ती कधीची याचा उल्लेख नाही त्यावर. अडीचशे पानांचा हा ऐवज अवघ्या 36 रुपयांना मिळत होता. हे पुस्तक मी जुना सहकारी मनोज पलसे याच्या माध्यमातून लेखकाची पत्नी सरोज परुळकर यांच्याकडून मिळवलं.

ऐंशीच्या सुरुवातीला नाशिक भागात उसाचं हे आंदोलन झालं. त्याचा हा आँखो देखा हाल... शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा होते शरद जोशी. संयुक्त राष्ट्रातली, स्वित्झर्लंडमधली नोकरी सोडून ते मायदेशी परतले. दारिद्र्याच्या प्रश्नावर खराखुरा उपाय शोधण्याचा प्रयत्न कुणी करीत नाही म्हणून अस्वस्थ होऊन.

ज्या काळात आपल्या बहुसंख्यांना टीव्ही. माहीत नव्हता, त्या काळात पाच वर्षं जर्मन टेलीव्हिजनचा वार्ताहर-कॅमेरामन म्हणून परुळकर यांनी काम केलं. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम संस्थेत त्यांनी दहा वर्षं काम केलं. सुखाची नोकरी सोडून, स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून भटकंती करणाऱ्या या दोघांचा हा प्रवास.

शरद जोशी भेटल्यापासून माझे डोळे स्वच्छ उघडले आहेत.... हे असंच चाललं तर आपण मरणार आहोत, ह्याची खात्री पटली आहे... माधवराव खंडेराव मोरे सांगत असतात. शेतकरी जमातीच्या झालेल्या तीन तपांच्या फसवणुकीचा स्फोट त्यांच्या शब्दाशब्दांच्या बॉम्बमधून होत असतो.

भरघोस पीक येऊन शेतकऱ्याचा चेहरा काळवंडलेला का? मग शरद जोशी भारत आणि इंडिया यातला फरक समजावून सांगतात. तुटीत लेव्हीची सक्ती आणि मुबलकतेमध्ये वाऱ्यावर सोडणं, हे सरकारचं शेतकऱ्याबद्दलचं धोरण समजावतात.

उसाला 300 रुपये टन भाव मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा निश्चय करून सुरू झालेलं हे आंदोलन. काय काय होतं त्यात? श्रीगोंद्यात गोळीबार होऊन त्यात नाना चौधरी हुतात्मा होतात. आताचे सत्ताधारी मंत्री तेव्हा त्या लढ्यात होते. पिंपळगाव बसवंतमध्ये आधी दोन हुतात्मा झालेले असतात. नंतर खेरवाडीमध्ये गोळीबारात दोघांना जीव गमवावा लागतो.

शेतकऱ्यांच्या या मागणीबद्दल तेव्हाच्या नेतेमंडळींच काय मत होतं? शेतकऱ्यांना भडकावलं तर गय करणार नाही!’ - मुख्यमंत्री जनाब अब्दुल रहमान अंतुले. ऊसआंदोलन करणाऱ्यांना शेतकऱ्यांचे हित कळत नाही. - महसूलमंत्री शालिनीताई. ऊसकरी शेतकऱ्याच्या हाती पैसा आला तर तो चैनी आणि व्यसनी बनेल. - प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष विखे. ऊस न देऊन साखर कारखान्यांची कोंडी करणं उचित नाही. - विरोधी पक्षनेते शरद पवार. अहो, तुमच्या या आंदोलनामुळं सगळे शेतकरी शहाणे होतील!’ - मंत्री तिडके.

निफाड, खेरवाडी, लासलगाव इथं रेल रोको-रास्ता रोको आंदोलन सुरू झालं. मुंबई-आग्रा महामार्ग चार दिवस अडवण्यात आला. राखीव पोलिसांनी लाठ्या चालवल्या, गोळ्या झाडल्या. माध्यमांनी विरोधकाची भूमिका बजावली. अडलेल्या वाहनांच्या चालकांना गावकऱ्यांनी चटणी-भाकर खाऊ घातली, चहा पाजला.

हे पुस्तक नव्हे; एक दस्तऐवज आहे. परवा परवा घडलेल्या इतिहासाचं हे सारं जिवंत चित्रण आहे. इंडियात राहूनही भारताच्या प्रश्नांची जाण करून देणारं. डोळ्यांत अंजन घालणारं. शरद जोशी, मोरे, माधवराव बोरस्ते, शंकर वाघ आणि या साऱ्यांचं नेमकं चित्र उभं करणारं. एका आगळ्या लढ्याची ही धारदार कहाणी. डोळ्यांत पाणी आणणारी. त्यांच्या आजन्म व्यथेची जाणीव देणारी. दुःख एवढंच की, लढाईचा मूळ मुद्दा तीन दशकांनंतरही कायम आहे!

(पूर्वप्रसिद्धी : 22 ऑगस्ट 2010)

3 comments:

 1. आदरणीय सतीश कुलकर्णी सर...
  तुमचे लेखणी थेट काळजाशी बोलते. वाचत राहावं वाटतं. जुनं पण सोनं वाचायला मिळाले.
  शरद जोशी हे योद्धाच.फक्त फरक इतकाच की रणांगणातील योद्ध्याला समोरील शत्रूवर विजय मिळवला की यश असते. मात्र या लढाईत शत्रू नेमका नव्हता. पण म्हणून हे वादळ अखेरपर्यंत थांबलं नाही.
  कैक वर्षांनी बळिराजाला वाली लाभला होता. आपलीच माणसं शोषण करतात तेव्हा क्रांतीची ठिणगी पडते. अशा शोषितांना त्यांनी आवाज दिला.
  एक गंमतशीर आठवण झाली. आताचे विद्या परिषदेचे शिक्षण संचालक गोविंद नांदेडे नांदेडला 96 साली शिक्षणाधिकारी होते. पाडव्याला नेमाने ते लेखक विचारवंत समाजधुरिण अशा महनीय व्यक्तींना शुभेच्छा पत्र पाठवायचे. टपाली जबाबदारी माझ्यावर असे. शरद जोशींच्या पत्राचं उत्तर आलं. बाकी कोणाचंही नाही. "आपल्या शुभेच्छा मिळाल्या. परंतु त्या वैयक्तिक की शासकीय हे समजले नाही." आम्ही पत्र खाजगी लेटरहेडवर लिहून पाकिटावर सरकारी तिकिट लावलं होतं!
  किती सुक्ष्म नाही निरीक्षण!
  नांदेडात गुणवंत पाटील यांच्या कार्यक्रमात या वादळाला स्पर्श करण्याचं भाग्य मला लाभलं होतं.

  ReplyDelete
 2. अण्णासाहेब वाकचौरे, वीरगाव, तालुका:अकोले (अहमदनगर )19 December 2015 at 21:11

  वाचनीय सर्वांगीण विविध विषयांवर लेखन आपल्या 'खिडकी'मध्ये डोकावताना आढळून आले.
  वरील मजकूर वाचून 'योध्दा शेतकरी' पुस्तकाची ऊत्सूकता
  वाढली आहे.शरद जोशींबद्दल आपल्या आगळ्यावेगळ्या लेखाचीही 'खिडकी'मध्ये प्रतीक्षा आहे.
  (जनहितार्थ पत्रकार,अण्णासाहेब वाकचौरे)

  ReplyDelete

... भेटीत तृप्तता मोठी

शेंगा, माउली आणि पेढे... ह्या समान धागा काय बरं! --------------------------------------------- खरपूस भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा. ‘प्रसिद्ध’...