सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१९

थोडं चाखू, थोडं राखू... बाकीचं पुढे ढकलून टाकू!

कोजागरी पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी व्हॉट्सॲपवर संदेश आला. बहुतेक फॉरवर्ड केलेलाच असावा. पण वाचण्यासारखा. वाचून गालातल्या गालात हसण्यासारखा. त्या संदेशात म्हटलं होतं - दसऱ्यानिमित्त आलेली झेंडूची फुलं आणि आपट्याची पानं आता कुठं मोबाईलमधून काढून टाकली. थोडं साफसुफ वाटतंय तेवढ्यात मसाला दुधाचे ग्लास आणि चंद्राची गर्दी झाली.’ 

हा संदेश पूर्ण वाचणं काही जड गेलं नाही. दोन-तीन ओळींचाच होता तो म्हणून. वाचल्यानंतर पुढे पाठवण्याचा मोह झाला क्षणभर. पण आवरला. कारण तो फार फिरणार असं वाटलं होतं. ते खरं ठरलं. दिवसभरात अजून दोन-तीन ठिकाणांहून आला तो.

दिवस सणांचे आहेत. उत्सवाच्या उत्साहाचे आहेत. ह्या उत्साहावर यंदा पावसानं चांगलं धो धो पाणी टाकलं, हे खरं. त्यामुळं की काय, दिवाळीच्या अगदी दोन-तीन दिवस आधीपर्यंत बाजारपेठेत उत्साह कमी दिसत असेल कदाचितपण मोबाईलमध्ये तो कधीचा ओसंडून वाहायला लागला होता. अशा उत्साही संदेशांनी व्हॉट्सॲप फसफसून वाहतंय. बऱ्याचदा हे फसफसणं विटण्यापर्यंत जाऊन पोहोचतंही बाब वेगळी.

दिवाळी चालू झालीच आहे. अगदी मुहुर्तावर शुभेच्छा देण्यात काय मजात्या तर सगळेच देतात. आपण त्यात आघाडीवर असलंच पाहिजेम्हणून मग काही व्हॉट्सॅपवीर आठवडाभर आधीच सुरुवात करतात. त्यांच्याकडे स्टॉक असतोच. गेल्या वर्षीचात्याच्या आदल्या वर्षीचा. ह्या शुभेच्छांमध्येच म्हटलेलं असतं – सगळ्यांच्या आधी आणि एक (किंवा दोन) दिवस) आधी शुभेच्छा मीच दिल्या(त्याच धर्तीवर आम्ही यंदा वर्षाअखेरीस २०२१ ह्या वर्षाच्या आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशी २०२२साठी शुभेच्छा देणार आहोत!)

वसुबारसेपासून शुभेच्छांचा 'ताप' (फीव्हर हो) वाढत जातो आणि पाडव्यादिवशी तो १०४ वगैरे होतो. तो उतरणीला लागल्याची लक्षणं भाऊबीजेपासून जाणवू लागतात. त्या दिवशी ‘वेड्या बहिणीची वेडी ही माया’ फॉर्मात असते. त्यानंतरही अधूनमधून कुणाला तरी हुक्की येतेच. आलेल्यातला एखादा मेसेज तो फॉरवर्ड करून टाकतो बसल्या बसल्या. फॉरवर्ड तर फॉरवर्डत्यातून शुभेच्छा दिल्याचं आणि दुसऱ्याच्या आनंदात सहभागी झाल्याचं समाधान. त्यानं दिवाळीच्या आनंदावर तृप्तीची कशी जाड साय येते.

एव्हाना लाडू, चकल्या, चिवडा, फटाके, रांगोळ्या, आकाशकंदील, पणत्या... हे सारं पचवताना मोबाईलला अजीर्ण होऊन जातं. क्वचित कधी तरी त्याला ह्याचा हँगओव्हरही येतो आणि तो लडखडायला लागतो. अशा वेळी एकच उपाय असतो – लंघन करणं. सरसकट सगळे संदेश उडवून टाकत व्हॉट्सॲप एकदम स्वच्छ करून बंद ठेवायचं. ह्यानं तुमच्या अँड्रॉईडची किंवा अन्य कुठल्याही स्मार्ट फोनची प्रकृती पूर्वपदावर येण्यास मदत होते.

दिवाळीच्या शुभेच्छा म्हटलं कीकाही गोष्टी अनिवार्य असतात. घरावर लखलखीत लायटिंग केलं असलं तरी इथं इवलीशी (आणि शक्यतो मिणमिणती!) पणती आवश्यक असते. प्रकाशाची अंधारावर मातउडणारे बाण आणि भुईनळेकानठळ्या बसविणारे हिरवे ॲटमबाँबअंगालाच मुंग्या लागतात की कायअशी शंका येणारे पाकात मुरवून ठेवलेले गोग्गोड शब्द इत्यादीही असतंच. एरवी असंस्कृत भासणाऱ्या ह्या जगात दिवाळीनिमित्त शुभेच्छा देणारी संस्कृत वचनं आणि श्लोक पाहिले की, ह्या देववाणीला आपण उगीच अभ्यासातून हद्दपार केलं असं वाटतं. ज्ञानेश्वरनामदेवतुकारामएकनाथ ह्या संतश्रेष्ठांचे अभंग-ओव्याही शुभेच्छांमधून आढळतात. अलीकडच्या काही वर्षांत शुभेच्छांसाठी ज्ञानदेवांच्या ‘मी अविवेकाची काजळी। फेडुनी विवेकदीप उजळी।’ ओवीला फार मागणी आहे. ही काजळी दिवाळीपुरती काढली म्हणजे भागलंअसंच आपली विवेकबुद्धी सांगत असावीबहुतेक!

आणखी काही शुभेच्छांमध्ये दिवाळीचा फराळही आवर्जून असतो. दगडासारखा कडक लाडूवातड चकलीचिवट कडबोळीखवट करंजी याचे जुनाट ('स्वराज्य'छाप) विनोद त्यात असतात. ‘छायाचित्र हजार शब्दांहून बोलकं असतं’ या उद्धृताला जागून बरेच जण फराळाच्या ताटांचे फोटोच पाठवतात. साधारण सहा-सात वर्षांपासून फॉरवर्ड होत असलेल्या ह्या पदार्थांना वास कसा येत नाही किंवा ते तेवढे जुने आहेत, ह्याचा वासही फॉरवर्ड करणाऱ्यांना येत नाहीही तशी आश्चर्याचीच गोष्ट. पण आपल्याला कुठे वाचायचंय/पाहायचंयफॉरवर्ड तर करायचंय नाअशी संबंधितांची स्थितप्रज्ञ भूमिका असते. त्यातून ते फिरत राहतात.

तसाही फराळ आणि फॉरवर्ड यांचा संबंध जुनाच आहे. ‘गेले ते दिन गेले...’ आळवणाऱ्यांना आणि ‘आमच्या काळी असं होतं...’ असे कढ काढणाऱ्या वयोगटातल्या ('सोशल') मंडळींना हे लगेच पटेल. पूर्वी दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून फराळाची ताटं शेजारच्या घरोघर पोहोचवण्याची पद्धत होती. घरातला बंड्या बेसनाचा लाडू खाण्यासाठी हट्ट धरून बसला असलातरी तो आधी शेजारच्या खंड्याच्या घरी कसा पोहोचता होईलयावर त्याच्या प्रेमस्वरूप आईचा कटाक्ष असे. ‘त्या खंड्याच्या आईचा फराळ येण्याआधी आपला त्यांच्या घरी जाऊ दे रे,’ असं बंड्याच्या भावाला किंवा बहिणीला सांगतानाच सोबत ‘उगीच नको त्या मेलीचा तोरा...’ असा थेट शब्दांत न दिला जाणारा संदेशही असायचा. बोलण्याची पट्टी कमी करत असल्याचा आभास करीत आपल्या ह्यांना नेमकं ऐकू जाईलअशा पद्धतीनं ‘खंडूच्या बाबांना माझ्या चकल्या भारी आवडतात. म्हणून लवकर नेऊन दे जा...’ अशी पुष्टीही जोडली जायची. व्हॉट्सॲपच्या मेसेजचंही असंच असतं नात्याचा मेसेज यायच्या आधी माझा मेसेज गेलेला बरा!

(घरच्या) फराळाची ताटं भरून शेजारीपाजारी देण्याचं काम पहिले दोन दिवस उत्साहाने चालायचं. तोपर्यंत शेजारूनही फराळाची ताटं आलेली असत. मग सुरू होई फॉरवर्डचं काम. घरची चकली खमंग झाली असलीतर ती न पाठवता पाटलांची किंवा जोश्यांची वातड चकली द्यायच्या ताटात जाई. ‘बेसन कसं नि किती भाजायचं कळतच नाहीकुलकर्णीबाईंना’ असा उद्धार करीत त्यांचे लाडू जाधवांच्या किंवा गायकवाडांकडे पाठवायच्या ताटात जात. दिवाळीतला चिवडा भाजक्या पोह्यांचाच. पण एखाद्या घरातून चुरमुऱ्याचा चिवडा आलेला असेलतर नाकं मुरडत त्याची चवही न पाहता तो तसाच्या तसा कुणाकडे तरी लगोलग फॉरवर्ड केला जाई. आपण कसं थोडे चांगले मेसेज सरसकट फॉरवर्ड न करता जवळच्या मित्रांना (आणि शक्यतो मैत्रिणींनाच!) पाठवतोतसं फराळाचंही असे. आत्या-मामा-काका यांच्यासाठी डब्यात घरचेच फराळाचेच पदार्थ भरण्याची दक्षता घेतली जाईल. क्वचित कोणा जळकुट्या जाऊबाईंच्या डब्यात एखाद-दुसरा पदार्थ फॉरवर्डेड असायचा.

नाना पाटेकर आणि विश्वास नांगरे ह्यांचे ब्लॉग वाचण्यासारखे असतातअसं सोशल मीडियाच्या दुनियेत बहुतेकांना (न वाचताच) मान्य आहे. त्यामुळे व्हॉट्सॲपवर (त्यांच्या नावाचं लेबल लेऊन) आलेला आणि सात-आठ वेळा स्क्रोल करत पाहावा लागणारा मेसेज सरसकट पुढे ढकलला जातो. काही खानदानी कुटुंबांचं तसंच असतं. त्यांच्याकडून येणारी फराळाची ताटं किंवा चार पुड्यांचे दोन-दोन डबे नाना पदार्थांनी गच्च भरलेले असतात. ते सारेच चविष्ट असतातअसं सगळ्यांना (ऐकून ऐकूनच) मान्य असतं. हे डबे पाहूनच दडपून जायला होईल. त्यामुळे चव घेण्याऐवजी त्यातील पदार्थ तुकड्या-तुकड्यांमध्ये फॉरवर्ड केले जात. त्यातूनही थोडं काही राहिलंच तर कामवाल्या मावशी मदतीला येतातच.

व्हॉट्सॲपवर आलेले सगळेच्या सगळे मेसेज वाचणं ह्या जन्मात तरी कुणाला शक्य नाही. हीच शक्यता पूर्वीच्या जमान्यात वेगळ्या बाबतीत होती. घरात आलेले सगळेच्या सगळे पदार्थ चाखणं एकदम अशक्य गोष्ट. पण काही जणांचे मेसेज वाचण्यासारखेच असतातहे जसं अनुभवानं ध्यानात येतंतसंच फराळाचंही होतं. काहींचे काही पदार्थ चाखण्यासारखेच असतातअसं घरच्या मंडळींचं मत असे आणि कुटुंबकर्तीला ते नाइलाजानं मान्य करावं लागे. विशेषतः मोतिचूर लाडूखमंग अनारसेखुसखुशीत चकल्या असा ऐवज फॉरवर्ड न करता राखून ठेवला जाई आणि चाखून पाहिला जाई.

कितीही काळजी घेतलीतरी हे गणित बिघडे. कोणता लाडू देशपांडे काकूंचा आणि कुठला चिवडा शिंदे मावशींचाचकली चाकोत्यांकडची आहे की अनारसे आढावांकडचे आहेत, ह्याचा सगळा गोंधळ होऊन जाई. त्यामुळे एक-दोन दिवसांतच ते लक्षात ठेवण्याचा नाद सोडून द्यावा लागे. त्यातही फॉरवर्डची कल्पना यथावकाश सगळ्यांनीच अमलात आणलेली असे. त्यामुळे एखाद्या राजूने पवार आजींकडचा रव्याचा लाडू चांगला असतो म्हणून मागितलातर आई रागानं वाटी त्याच्यापुढे आदळे. एक तुकडा खाऊन राजू तोंड वाकडं करत म्हणे, ‘‘आईहा पवार आजींकडचा लाडू नाही गं. तू घरचाच दिलास चुकून. वास येतोय...’’ तेव्हा मग आईच्याही लक्षात येई कीहा लाडू चार घरी फिरून पुन्हा ‘बनविल्या घरीच तू सुखी राहा...’ म्हणत आपल्याकडे आलेला आहे. राजूच्या आईचा अनुभव अस्मादिकांनाही एसएमएसच्या जमान्यात आला आहे. पत्रकारदिनाच्या शुभेच्छा देणारा हा संदेश एवढा फिरला कीसोलापूरच्या एका पत्रकाराकडून तो आम्हाला आला. ‘हा माझाच मेसेज तुम्ही मलाच कसा काय पाठवलात?’ असं विचारल्यावर त्या पॉवरबाज पत्रकारानं माझं नावच फोनबुकमधून उडवून टाकलं.

पूर्वीसारखं आता कुणी घरी फराळाचं सगळंच्या सगळं बनवत नाही. काही इकडून मागवतातकाही तिकडून बनवून घेतात. शुभेच्छांची पत्रही आता कुणी हातानं लिहीत नाही. काही इ-मेलवरून उचलतात आणि व्हॉट्सॲप बऱ्याच जणांच्या मदतीला आलेलं असतं. एकूणच फराळ काय नि व्हॉट्सॲप मेसेज कायत्यांचा ‘संदेश’ पूर्वीपासून तोच आहे - थोडं चाखूथोडं राखू... बाकीचं आपलंच म्हणून पुढे ढकलून टाकू!

…………
(छायाचित्रं इंटरनेटवरून साभार.)
#दिवाळी_फराळ #व्हॉट्सॲप_फॉरवर्ड #शुभेच्छांचा_ता #राखू_चाखू_पुढे_ढकलून_टाकू

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९

‘पढ़े-लिखे गँवार..!’

कधी तरी मध्य प्रदेशात जायचं आहे. त्याची कारणं अनेक आहेत. एक म्हणजे नवा प्रदेश पाहायचा. मराठी माणसांनी जिथं आपला ठसा उमटविला, जिथं ते चिकटून राहिले, अशा भागाला भेट द्यायला पाहिजे, असं (उगीचच) वाटत राहतं. वडोदऱ्याच्या साहित्य संमेलनाला गेलो होतो, ते हेच मनात ठेवून. तिथं बरंच काही नव्यानं समजलं, ऐकायला मिळालं. सुधीर परब सरांसारखी माणसं आपली झाली. मध्य प्रदेशाची मोहिनी पडली, ती गो. नी. दांडेकर यांचं परिक्रमेवरचं पुस्तक वाचून. त्यात भर पडली कुंटे यांचं 'नर्मदेss हर हर!' वाचण्यात आल्यानं. इंदूरमधून सुमित्रा महाजन खूप वेळा लोकसभेवर निवडून गेल्या. त्यांचं थेट भाषण ऐकण्याची संधी एकदाच मिळाली. नगरमध्ये झालेल्या पत्रकारांच्या अधिवेशनाला खास पाहुण्या म्हणून त्या आल्या होत्या. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस. टी.च्या आरामबसची सोय मिळावी, प्रवासाचे किलोमीटर वाढवून मिळावेत...आदी मागण्या काही पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. सुमित्राताई भाषणाला उठल्या आणि त्यांनी या मागण्यांबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. पत्रकारांनी अशा मागण्या कराव्यात? तर ते असो... अहल्याबाईंचं आणि सुमित्राताईंचं इंदूर पाहायचं आहे हे खरंच.

पुण्यात खूप वर्षांपूर्वी एका ठिकाणी इंदौरी फरसाण मिळायचं – खट्टा-मीठा. मग नगरच्याच एका मिसळच्या दुकानातील पाटीवर इंदुरी पोहेअसं वाचून त्याची चव घेतली. इंदूरच्या सराफाविषयी बऱ्याच वर्षांपासून वाचतो आहे आणि तोंडाला सुटलेलं पाणी आवरतो आहे. अभय बर्वे फेसबुकवर ज्या इंदुरी भाषेत लिहितात आणि तिथल्या पदार्थांचं ज्या प्रकारे वर्णन करतात, त्याचा मोह पडला आहे. थोडक्यात पाहण्यासाठी कमी आणि खाण्यासाठी जास्त, असं इंदूरला, मध्य प्रदेशात जायचं आहे.

तो योग येईल तेव्हा येईल. मागच्या रविवारी मध्य प्रदेश परिवहनच्या बसनं प्रवास करण्याचा योग आला. जे आतापर्यंत जमलं नव्हतं, ते साधलं. खरं तर मध्य प्रदेशाच्या एस. टी.नं प्रवास करण्याचं तसं काही कारण नाही. राहुरीच्या स्थानकावर होतो. रात्र झाली होती. मिळेल ती गाडी पकडायची नि नगर गाठायचं, असं ठरलं होतं. आपल्या महामंडळाची एक गाडी उभी होतीच गेलो तेव्हा. ती खचाखच भरलेली. उभं राहूनच जावं लागलं असतं. प्रवास पस्तीस-चाळीस किलोमीटरचाच. पण जिवावर आलं होतं. तेवढ्यात फाटकात मध्य प्रदेशची निळी बस दिसली. म्हणून आपल्या गाडीला टाटा केला.

बस इंदूरहून आली होती नि पुणेमुक्कामी चालली होती. तरीही चालकाला विचारलं आणि शिरलो गाडीत. हीही भरलेलीच. जागा मिळणार नाही, असं वाटत असतानाच चालकानं पुकारलं. त्याच्या मागं तीन प्रवासी बसतील असं सीट. बहुतेक ती राखीव चालकाची झोपण्याची हक्काची जागा असावी. तिथल्या प्रवाशाला त्यानं मला जागा द्यायला सांगितलं.

गाडी दणक्यात सुरू झाली. पिपाणीसारखा हॉर्न. त्या नॅशनल परमिट मिरवत रोरावत जाणार्‍या ट्रकांसारखा. एक फेरीवाला बसमध्ये अडकलेला. चालक काही थांबत नव्हता. स्थानकाच्या बाहेर पडता पडता बसचा वेग थोडा कमी झाल्याचा फायदा घेत तो उतरला; हातातल्या वडा-पावचा ट्रे संभाळत. तेवढ्या वेळात चालकानं एकदाही मागं वळून काही पाहिलं नाही. फेरीवाला बरोबर उतरेल, याचा अंदाज असणार त्याला.

तेवढ्यात एक उमदा माणूस आला. हल्ली शोभणारा शर्ट. चिनॉस. टक्कल पडू लागल्यानं विस्तारलेलं कपाळ. एखाद्या दिवसाची दाढी वाढलेला. कपाळावर छोटासा काळा पट्टा – छापबहुतेक. प्रवासी वाटला, म्हणून मी थोडं सरकून त्याला जागा देऊ केली. जागा मिळविण्यासाठी तो काही इच्छुक दिसला नाही. त्यानं मलाच विचारलं - कुठं जायचं, नगर ना?

प्रश्नामुळं लक्षात आलं की, तो वाहक होता!

कसं ओळखणार त्याला? तिकिटाचं यंत्र हातात नाही नि गळ्यात पैशाची चामडी पिशवी नाही. कुठं जायचं ते सांगितल्यावर त्यानं डायरीवजा पुस्तिकेतून चिटोरं फाडून दिलं. गावाचं नाव व भाडं लिहिलेलं. सहज पाहिलं - कार्बन होता वहीत.

गाडी चांगली होती. चालक वयस्क. निवृत्तीला आलेला. रात्रीमुळं काहीसा कावलेला. त्याला अजून किमान चार तास गाडी चालवायची होती. मध्येच मोबाईल वाजला आणि त्यानं तो घेतला. मोबाईलवर बोलत, सावधपणे गाडी चालवत होता.

हे चालक-वाहक फारच सौजन्यशील दिसत होते. हात दाखवा नि बस थांबवा आणि थाप मारा नि उतरून जापद्धतीने सगळा कारभार चाललेला. नगर जवळ आलं तसं थांबे वाढले. आपल्याला तर काय घराजवळ गाडी आलेली चांगलं! आधी नागापूर, मग सावेडी...

थांबा येण्याच्या आधी वाहक ओरडे. बसची दोन्ही दारं सताड उघडी होती. 'क्लीनर'सारखा मदतनीस उघड्या दारातच उभा. उतारूंना मदत करण्यासाठी आणि संभाव्य प्रवासी हेरण्यासाठी. मध्येच कुणी तरी हात केला आणि चालकानं थांबता थांबता पुन्हा गती दिली. अरे ठैरो, ठैरो... उसे आना हे...’ असं वाहक ओरडला. त्या प्रवाशाला घेऊनच बस मार्गस्थ झाली.

एका तरुण प्रवाशाला तारकपूर स्थानकाच्या थोडं पुढं चौकात उतरायचं होतं. चौकातला सिग्नल लाल; पण हिरवा होण्यासाठी तीनच सेकंद बाकी. त्यामुळं बस थांबली नाही. वेग थोडा कमी झाला. बस उजवीकडे वळता वळताच त्या तरुणानं खाली उडी मारली.

वाहक चिडला. ओरडू लागला. म्हणाला, ‘पढ़े-लिखे गँवार साले!

सुशिक्षित अडाणीअसं का म्हणाला तो? वाटलं की, चालत्या बसमधनं हा प्रवासी उतरल्यामुळं तो चिडला असणार. परराज्यात, तिथल्या प्रवाशाला चुकून काही झालं, तर नसती आफत! म्हणून तो चिडला असेल, तर ते स्वाभाविकच होतं की.

पण ते तसं नव्हतं. काही क्षणांत त्याच्याच तोंडून ते कळालं.

प्रवासी अवैधरीत्या, धावत्या बसमधून उतरल्याचा त्याला राग नव्हता. तो अवैज्ञानिकरीत्या उतरल्यानं त्याचा संताप झाला होता.

सीटवरची मांडी बदलत वाहक म्हणाला, ‘‘गाडी पुढे जात असताना हा मागच्या दिशेनं उतरतोय. पडला बिडला तर? बस धावते आहे, त्याच दिशेनं उतरून दोन-चार पावलं पुढं गेलं पाहिजे ना. बसचा स्पीड थोडा मुरवला पाहिजे अंगात. एवढंही कळत नाही, ह्या शिकलेल्यांना!’’


गतीचा नियम न पाळल्यामुळेच चिडलेला वाहक शिवी देता झाला -

पढ़े-लिखे गँवार साले...
….
(ती बस ही नव्हे. छायाचित्र प्रातिनिधिक)


शुक्रवार, २६ जुलै, २०१९

शरण तुला, दलाला!


राज्याच्या राजकारणाचा शकट जिथून हाकला जातो, त्या इमारतीला पूर्वी सचिवालय म्हणत. लाल दिव्याला ते नापसंत होतं. नामांतर केलं. राजधानीतील ती इमारत मंत्रालय म्हणून ओळखली जाऊ लागली.

नामांतर झालं. पण तिथले सत्ताधीश बदलले का? उत्तर नाहीच असं आहे. दाम मोजून घेऊन काम करवून देणाऱ्या एजंटांचा, दलालांचा सत्तेच्या वर्तुळातील बुजबुजाट कायम आहे. एक नाही, अनेक. ही जमात राहते आमदार निवासात, खाते-पिते पंचतारांकित हॉटेलांत. आणि काम? बढती, बदली, निलंबन, लिकर परमिट, आश्रमशाळांची परवानगी. सगळी कामं करतात ही मंडळी. मंत्रालयाशी संधान साधून असल्यामुळे आलेली पावर. कोणत्याही अडचणींवरचा उड्डाणपूल म्हणजे ही जमात.

हे मत एका एजंटाचंच. त्याचं नाव-गाव-जात-धर्म विचारू नका. तो ते सांगणार नाही. तसं स्पष्ट केलंय त्यानं. आमदार निवासात पोपटराव म्हणून विचारा; कोणीही घालून देईल त्याची गाठ. कोणी त्याला मिठ्ठूमिया म्हणून साद घालतं, तर कोणी राघोबादादा पेशवे म्हणतं. पत्रकारमित्र रघुनाथ जोशी त्याला पप्पूशेठ म्हणतो. पोपटरावांचा मुक्काम आमदार निवासात.

आमदार निवास रूम नं. १७५६ ही कादंबरी पुरुषोत्तम बोरकर यांची. पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशनानं या कादंबरीची पहिली आवृत्ती १३ डिसेंबर १९९९ रोजी प्रकाशित केली. या ८६ पानांच्या कादंबरीची किंमत ७५ रुपये आहे. अवचित कधी तरी घेतलेलं हे पुस्तक परवा परवा वाचण्यात आलं.

आई-वडील परलोकी आणि बहीण नवऱ्याघरी गेल्यामुळे पोपटराव एकटा पडलेला. ग्रेज्युएट्स ऑफ नागपूर युनिव्हर्सिटी आर नॉट अॅप्लीकेबलच्या शेऱ्यांनी घायाळ! राजधानीत येतो स्वप्नं डोळ्यांत घेऊन. ती तुकड्या-तुकड्यांनी विरत जातात. ठरतो एक नि:संग एजंट. पैसा फेको, काम देखो.

खोली आमदाराची आणि राज्य पोपटरावचे. त्याचा संचार कुठं नाही? त्याच्या ओळखी कुणाशी नाहीत? अफाट भ्रष्टाचारानं पद गमावलेला माजी राज्यमंत्री कागदराव गगनबावडेकर त्याच्याकडे येतो – सत्तेचं वलय पुन्हा लाभावं यासाठी त्याला त्याच्या बाबावर सिनेमा काढायचाय. पोपटराव दिग्दर्शक गाठून देतो.

खान्देशातील बाबासाहेब तुपटाकळीकर पन्नाशीत पोहोचलेले. त्यांचं राजकीय स्वप्न भव्य होतं...सेंट्रेल हॉलमध्ये तैलचित्र किंवा मंत्रालयाच्या आवारात पुतळा! जेमतेम एकदा ग्रामपंचायतीत निवडून आले. वारुणीचा चषक पुढे असला की, त्यांच्या स्वप्नांचे तुकडे अधिक झळाळते होतात. बाथ, वॉश, डिनर, लंच, ड्रिंक्स अशा शब्दांचे त्यांना वेड. तूर्त ते पोपटरावांच्या संगतीनं दलाली करतात.

शिक्षणमहर्षी म्हणवून घेण्यासाठी नागपूरचा पुढारी आसुसलेला. आता त्याला फक्त आश्रमशाळा हवी. त्यासाठी १० लाख नगद मोजण्याच्या तयारीनिशी पोपटरावांकडे आलेला. अडचण नको म्हणून मुलींच्या वसतिगृहाच्या वॉर्डनलाही त्यानं सोबत आणलेलं आहे.

पुसदचा भावी आमदार बिक्कनसिंग राठोड. त्याला त्याच्या आमदाराला नडायचं आहे. पोपटरावशी खल करतो. मार्ग सापडतो. रघुवीरचा मित्र प्रेमानंद भुसावळकर. निर्लज्जम् सदा सुखी असं बोधवाक्य घेऊन पिवळी पत्रकारिता करणारा. तो लाख रुपयांच्या मोबदल्यात दोन दिवसांत डझनभर बातम्यांचा अंक बिक्कनसिंगला देतो. आमदार देशमुखांची पुरती बदनामी करणारा.

समाजसेवा करणारी किन्नरी तारापोरवाला, अय्याशी राजकारणी फैज अहमद बुखारी, कारकुनाचा मुलगा हृषीकेश ऊर्फ रॉकी, आमदार निवासातल्या खोल्यांमध्ये केवळ उजव्या हाताच्या अंगठ्यावरून भविष्य पाहणारे होराभूषण बाबा अमरनाथ, जनमहाकवी खग्रास सूर्यभेदी! अशी अनेक माणसं भेटतात इथं. किडनी विकणारा दुबेही इथंच राहायचा.

या कादंबरीला सलग असं एक कथानक नाही. तुकड्या-तुकड्याने ती पुढं सरकत राहते. पण या प्रत्येक तुकड्याला सांधणारा दुवा म्हणजे पोपटराव. हा प्रत्येक तुकडा अस्वस्थ करणारा. आपल्या लोकशाहीबद्दल आणि पिळवणूक करणाऱ्यांबद्दल संताप निर्माण करणारा. वांझ संताप.

खादीशुभ्र, अटारणे असे शब्द; मंत्रालय ते आमदार निवास हाच खरा दलाल स्ट्रीट अशी विधानं. भाषा वेगळी, भन्नाट. मंत्रालयाचा अख्खा परिसर उभा राहतो डोळ्यांपुढे. ग़म तो इसका है, ज़माना है कुछ ऐसा खरिदरा। एक मुज़रिम दुसरे मुज़रिम को कहता है बुरा..., शुक्रिया ऐ मेरे कात़िल, ऐ मसिहा मेरे। जहर जो तूने दिया, वो दवा हो बैठा... अशा पानापानावरच्या ओळी. नायकाची मन:स्थिती दाखवतात त्या. शि. द. फडणीस यांचं मुखपृष्ठ बेफाम. टोकाचा उपहास हसवतो आणि दगड झालेल्या मनावर एकेक ओरखडाही उठवत राहतो.
...
(पूर्वप्रसिद्धी : दि. २० जून २०१०)

एका लेखकाचा मृत्यू


मधल्या काळात बरेच दिवस माझ्या इ-मेलची सिग्नेचर दोन ओळींची होती. नंतर ती बदलली. त्या ओळी फार नकारात्मक वाटतात. शक्य असतील तर बदलाव्यात, असं एकानं सुचवलं म्हणून. त्या जागी नवीन काही आलं नाही.

सर से सीने तक कही, पेट से पाव तक कही
इक जगह हो तो कहें, दर्द इधर होता है...

ओळी कुठून घेतल्या होत्या, हे पक्कं माहीत आहे. पुरुषोत्तम बोरकर यांच्या लिखाणातलं आणि मनाला भिडलेलं होतं ते. हे त्यांच्या पुस्तकात आहे की, त्यांनी पाठविलेल्या कुठल्या इ-मेलमध्ये, ते शोधावं लागेल. सिग्नेचरमधल्या त्या ओळी उडवल्या. मनातून काही खोडल्या गेल्या नाहीत.

ही गोष्ट शुक्रवारची (दि. १९ जुलै). फेसबुक पाहत असताना पुस्तकांशी संबंधित गटात एका तरुणानं आपली इच्छा व्यक्त केली होती – मला पूर्ण वेळ लेखन करून जगायचं आहे. शक्य आहे का ते?

त्यावर प्रतिक्रिया देण्याची इच्छा झाली - मराठीत तूर्तास तरी असं काही संभवनीय नाही. लिहिण्याची हौस वगैरे ठीक. पण मराठीत लिहून पोट भरण्याची खात्री नाही... असंच लिहायचं होतं. तेवढ्यात खालच्या काही प्रतिक्रिया पाहिल्या. एक-दोघांनी त्याचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला होता. चेतन भगत वगैरे नावे देऊन. पण बऱ्याच प्रतिक्रिया माझ्या मताशी जुळणाऱ्याच होत्या.

पुस्तकप्रेमींच्या गटातून बाहेर पडलो. डोळ्यांसमोर पुढची पोस्ट आली ती पुस्तकाशी संबंधितच. पुरुषोत्तम बोरकर यांच्या निधनाची (वाईट) बातमी देणारी. खरं तर त्या दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये आलेली ही बातमी वाचली नव्हती. आणि दुपारचं जेवण करून थोडं निवांत म्हणून बसलो असताना, ही बातमी. हादरलोच.

सुन्न व्हायला झालं. ते दुखणं पुन्हा फणा काढून वर आलं! वेदना होतीच. कुठे होती, किती होती, कशी होती... हे नाही सांगता येणार. बोरकर यांच्या बोलण्यातून ती अधूनमधून जाणवायची. त्यांच्या विनोदाच्या, उपहासाच्या, टवाळीच्या लिहिण्यातून हा आपादमस्तक व्यापून राहिलेला दर्द पाहिलेला आहे.

आठवायला लागलो, बोरकरांशी शेवटचं बोलणं कधी झालं होतं ते? फार दिवसांपूर्वी. किमान वर्षभरात तरी त्यांच्याशी संवाद झाला नव्हता. फोनवरून नाही किंवा इ-मेलवरूनही. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात का कुणास ठाऊक, त्यांची आठवण झाली होती. करू नंतर फोन म्हणून हातात घेतलेला फोन बाजूला ठेवून दिला होता तेव्हा.

शेवटचं बोलणं खरंच कधी झालं होतं? बोरकरांचं वऱ्हाडी गोडव्याचं बोलणं कधी ऐकलं होतं? मग आठवलं की, पत्नीची तब्येत कशी आहे, हे विचारण्यासाठी मध्यंतरी कधी तरी त्यांना फोन केला होता. कर्करोगाशी चालू असलेली झुंज अखेर संपल्याचं त्यांनी तेव्हा सांगितलं. त्यानंतर एक-दोनदा बोललो असू आम्ही कदाचित. इ-मेलवरून संवादही खूप महिन्यांपूर्वी झाला. एवढ्यात तर त्यांची इ-मेल नाही किंवा कुठल्या लेखनावर प्रतिक्रियाही नाही. या दीड वर्षामध्ये एवढं लिहिलं आणि त्यातल्या कुठल्याच लेखनावर त्यांना व्यक्त व्हावं वाटलं नाही? त्यांची एखाद्या ओळीचीही प्रतिक्रिया आली नाही, हे लक्षात कसं आलं नाही?

सध्या काय चालू आहे, नवीन संकल्पना काय आहे, हेही बोरकर यांनी एवढ्यात कळवलं नव्हतं. नवीन काही हाती लागलं किंवा कल्पना सुचली की, ते उत्साहानं फोन करून सांगत. बरोबर वर्षापूर्वी आलेली त्यांची इ-मेल. त्यात एवढंच विचारलं होतं – मोबाईल नंबर बदलला काय? कृपया नवीन नंबर कळवा. काही मायना नाही, एखाद-दोन काव्यपंक्ती नाहीत. काळजाला हात घालणारा शेर नाही. बोरकरांचीच इ-मेल होती का ती?

न राहवून मोबाईलमध्ये असलेला बोरकर यांचा क्रमांक काढला. कोण कुणाचं सांत्वन करणार? फोन कोण घेईल बरं - घेईल की नाही? काही बोलेल की बोलणार नाही? बोरकरांचे चिरंजीव केदार यांनी फोन घेतला. काय झालं, कसं झालं... सगळं काही सांगितलं. नाव सांगितल्यावर त्यांनी ओळखलंही. मुंबई-पुण्यातून, महाराष्ट्रातून कुठून कुठून फोन येत असल्याचं त्यांनी सांगितलं. खूप वेळ बोललो. बऱ्याच आठवणी. बोलताना कळलं की, गेल्या वर्षभरापासून ते इ-मेल वगैरेपासून थोडं लांबच होते. डोळ्यांचा त्रास होता काही तरी. बोरकरांना बुधवारी रात्री आठ-साडेआठच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आला. तीव्र झटका. सगळा दहा-पंधरा मिनिटांचा खेळ! रुग्णालयात न्यायलाही जमलं नाही. कुणाला काही न सांगता, निरोपही न घेता एक लेखक सहजपणे निघून गेला.

पुरुषोत्तम बोरकर नावाच्या भन्नाट लेखकाची ओळख होण्याचा योग होता नशिबात! त्याला जून-जुलैमध्ये बरोबर नऊ वर्षं झाली. निमित्त ठरलं एक छोटा लेख. पुस्तकांविषयी आठवड्याला लिहीत होतो. संग्रहात असलेली पुस्तकं. त्यांचा साधा परिचय. तो वाचल्यावर पुस्तक पाहायची-चाळायची, वाचायची इच्छा व्हावी असा. गाजलेली पुस्तकं घ्यायची नाहीत. या आठवड्यात कोणत्या पुस्तकावर लिहायचं बुवा, असा प्रश्न डोक्यात घोळत असताना, कधी तरी घेऊन ठेवलेलं आमदार निवास रूम नं. १७५६ हाताला लागलं. शरण तुला, दलाला!’ या शीर्षकानं लेख २० जून २०१० रोजी प्रसिद्ध झाला.

तोपर्यंत साधारण २०-२२ पुस्तकांवर लिहून झालं होतं. सनसनाटीबद्दल लिहिल्यावर श्री. ल. ना. गोखले यांनी इ-मेलवरून चौकशी केली होती. बाकी कुणी नाही. आमदार निवासबद्दल लिहून झाल्यानंतर दोन दिवसांनी कार्यालयात कुणी तरी सांगितलं, तुझ्यासाठी बोरकरांचा फोन आला होता. नुसत्या आडनावावरून काही कळलं नाही. त्यांनी आपला क्रमांकही दिला नसावा. दिला असला, तरी तो लिहून घेण्याची तसदी संबधिताने घेतली नसेल बहुतेक.

दुसऱ्या दिवशी कार्यालयात आल्यावर तासाभरात फोन आला. कुलकर्णीसाहेब... नाही का मी पुरुषोत्तम बोरकर बोलतोय. तुम्हाला माझी इ-मेल मिळाली ना? भाऊ, काय सुंदर लिहिलं हो तुम्ही पुस्तकावर!’ साक्षात लेखकाचा फोन. पसंतीची दाद देणारा. पण त्यांची इ-मेल मिळाली नव्हती. नंतर ती मिळाली, तर ते पत्र जोडलं गेलेलं नव्हतं. दोन-तीन फोननंतर आणि साधारण आठवड्याच्या प्रयत्नांनंतर इ-मेल आली. अडचण येऊ नये म्हणून सोबत फाँटची सगळी माहिती असलेलं जोडपत्र.

पत्राचा मायनाच अक्षरस्नेही होता. कृत्रिम वाटणारं विशेषण. मुद्दाम जोडलेला शब्द वाटावा. थेट भेटीत लक्षात आलं की, हे विशेषण अकृत्रिम स्नेहातून आलं होतं. आपलं पुस्तक कुणा एकाला आवडलं आणि त्याला त्यावर लिहावं वाटलं, याचा आनंद बोरकरांना लपविता आला नव्हता. रसिकराज वाचक म्हणून त्यांनी गौरव केला. फोन नंबर आणि घरचा पत्ताही विचारलेला. नवी कादंबरी १५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी त्यांनी प्रकाशकाकडे दिली होती. ती दोन महिन्यांत प्रकाशित होणार होती. तिची प्रत पाठविण्यासाठी पत्ता हवाच. मेड इन इंडिया वाचली का? नसेल तर तीही कुरीअरने पाठवून देतो, असं त्यांनी लिहिलं होतं. त्यांच्या या इ-मेलला जुलैला उत्तर दिलं. एका पत्रकारानं नाही, तर भारावलेल्या, लेखक-भक्त वाचकानं जसं लिहावं तसं.

बोरकर तेव्हा पुण्यातच होते. पिंपळे सौदागरला मुलासह राहत होते. केदार तिथं नोकरी करीत होता. फोनवर विचारून एक दिवस लेखकमहोदय थेट कार्यालयात हजर झाले. सिटी बसने एवढा लांबचा प्रवास करून. आपल्या चाहत्याला भेटण्यासाठी म्हणून. साधा शर्ट-पँट, जॅकेट. डोळ्यांना चष्मा. चष्म्याआडून चमकणारे डोळे. त्यात खूप कुतुहल. गोल चेहऱ्यावर दिसणारी आपुलकी नि हसू. खांद्यावर अडकवलेली शबनम. खूप जुनी ओळख असल्यासारखं बोलले ते. संपादकांची ओळख करून देतो म्हणालो, तर ते काही उत्सुक दिसले नाहीत. तुम्हालाच भेटायला आलो, म्हणाले. एक लोकप्रिय लेखक संपादकाची ओळख करून घेण्यासाठी आसुसलेला नव्हता.

अधूनमधून फोन चालू राहिले आमचे. एके दिवशी बोरकरांनी धक्का दिला. नवी कादंबरी तुम्हाला अर्पण करतोय, असं त्यांनी सांगितलं. अरेच्चा! हा सगळाच अनुभव माझ्यासाठी नवीन. १५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारीच्या अर्पणपत्रिकेचं प्रूफ त्यांनी पाठवलं. त्या चौघांमध्ये मी एक. पहिल्यांदाच अर्पणपत्रिकेत नाव. तेही भन्नाट, वेगळं लिहिणाऱ्या लेखकाच्या पुस्तकात. काही दिवसांनी त्यांनी कादंबरीही पाठवली. ती अर्थातच एका बैठकीत वाचून झाली.

यथावकाश बोरकर कुटुंबानं पुणं सोडलं. मीही स्वगृही परतलो. इ-मेलवरून संपर्कात होतो. अधूनमधून बोरकरांचा फोन येई. कधी कुलकर्णीसाहेब, तर कधी आहात का राजे जागेवर!’ असं मिठ्ठास भाषेत विचारत. बोलताना बरं का भाऊ, तुम्हाला वाटेल की, हा बोरकर काईचा काई सांगून राह्यलाय बरं... असं सगळं खास वऱ्हाडी हेलात असे. खूप वेळ फोन चालत आमचे. पुस्तक लिहिण्याचा आग्रह करत ते.

अस्वस्थतेतून आम आदमीच्या कविता लिहिण्याचा नाद लागला. चालू घडामोडींवर टीका-टिप्पणी, कवितेच्या शैलीत. त्याचं पद्यासारखं वाटणारं गद्य असं नामकरण केलं. अशाच एकदा बारा-चौदा रचना बोरकरांना वाचण्यासाठी इ-मेलवरून पाठवून दिल्या. त्या सगळ्या एका बैठकीत वाचून त्यांनी रात्रीच कधी तरी फोन केला. त्यांनी केलेल्या कौतुकानं अक्षरश: भारावून जायला झालं.

सविस्तर प्रतिक्रिया कळविण्यासाठी बोरकरांनी जून २०१३ रोजी इ-मेल पाठविली.
अहले-जुबाँ भी आखिर गूंगे बने हुए है
जिंदा रहेंगे कब तक मुर्दा जमीर लेकर...
असं लिहीत त्यांनी भरभरून कौतुक केलं होतं. या रचनांमधून जनतेच्या दुःखनाडीवर बोट ठेवले आहे, असं लिहितानाच आणखीही काही अतिशयोक्त असणारी (वाटणारी नव्हे!) विशेषणं अस्मादिकांबद्दल वापरली होती. अहले-जुबाँ म्हणजे सरस्वतीपुत्र, असा अर्थ त्यांनीच त्यात दिला.

बोरकरांनी पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव केला होता. त्या खुशीतच त्यांचं हे कौतुकपत्र काही जणांशी शेअर केलं. ते वाचून कवी संजय बोरुडे यांनी लिहिलं – मेड इन इंडियाआमदार निवाससारख्या पुस्तकांनी बोरकरांनी मराठी साहित्याला अस्सल देशी लेणे बहाल केले आहे. त्यांची दाद म्हणजे आपल्या लेखणीचा अजोड सन्मानच!

एव्हाना बोरकरांना काही अडचणी जाणवू लागल्या होतं, असं जाणवलं. नव-नायकांच्या चरित्रलेखनाचं, पुस्तकांचं शब्दांकन करून देण्याचं काम ते करीत. तुमच्याकडे साखर-सम्राट, सहकार-सम्राट भरपूर आहेत हो. एखादं काम असेल त्यांचं तर सांगा हो भाऊ मला, असं म्हणत ते. पत्रकार म्हणून माझ्याबद्दल त्यांच्या कल्पना अवास्तव होत्या. एखाद्या स्वप्निल कवी-लेखकासारख्याच. अचानक त्यांनी १९ ऑगस्ट २०१३ला इ-मेलमधून चार वात्रटिका पाठविल्या. सध्याचं लेखन म्हणून.
कोनाड्यातील हे दीपस्तंभ
हे विजेरीतले दिवे
खुराड्यातच झेपा घेती
हे गरुडांचे थवे
ही वात्रटिका निवडणुकीच्या काळात लिहीत असलेल्या एका सदरात वापरली. त्यांना तसं कळवलंही.

माझं पहिलं पुस्तक जून २०१४मध्ये प्रसिद्ध झालं. त्याची प्रत पुरुषोत्तम बोरकर यांना न पाठवणं शक्यच नव्हतं. पुस्तक मिळाल्याबरोबर ते वाचून त्यांनी ११ जूनला लगेच इ-मेलनं पत्र पाठवलं. अक्षरस्नेही सतीशभाऊ अशी सुरुवात करून त्यांनी लिहिलं होतं – पहिलं पुस्तक कुरवाळण्याचा आनंद काही औरच असतो. अवर्णनीय असतो. या तुमच्या आनंदात मीही मनापासून सहभागी आहे. एका नवोदित लेखकाला आपल्या बिरादरीत किती सन्मानानं सामावून घेण्याचा हा प्रयत्न. केवढी आपुलकी. पुढं त्यांनी लिहिलं की, तुम्ही दुसऱ्यांच्या व्यथावेदनांनी छिन्न-खिन्न होत असता. पोतराज होऊन चाबकाचे फटके आपल्या हाताने आपल्याच पाठीवर मारून घेत असता. पण इलाज नसतो. याबाबतीत एक शेर आठवतो :
ये कहना हमने ही, तूफाँ में डाल दी कश्ती
कसूर अपना है, दरिया को क्या बुरा कहना...

असं कौतुक करून झाल्यावर बोरकर मग आपल्या मूळ स्वभावाला साजेसं लिहितात – पहिले अपत्य दणदणीत झाले. मात्र याबाबतीत नियोजन वगैरे करू नये! म्हणून मैत्रीप्रीत्यर्थ अशा शुभेच्छा देतो की, किमान अष्टपुस्तकी लेखक भव:’. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. पुस्तकावर त्यांनी मोठा लेख लिहिला आणि तो २८ जून रोजी इ-मेलने पाठविला. का कुणास ठाऊक, त्या इ-मेलचा मायना रिस्पेक्टेड सर असा होता. त्याच्या दुसऱ्याच रात्री दीर्घ काळ आमचा फोन चालला. पत्राला उत्तर न दिल्यामुळं नाराजी जाणवली. पण बहुतेक सगळं बोलणं जगण्यातल्या अडचणींबद्दल चाललं होतं.

पुस्तकाच्या वेळी बोरकरांमधल्या बेरकी, अनुभवी, जाणत्या लेखकानं एक सल्ला दिला - आता एक प्रकाशन डायरी आणा. त्यातली पुरस्कारांची यादी पाहा. प्रत्येकाला द्या एक एक पुस्तक पाठवून... हां, अजिबात लाजायचं नाही. त्यांचा हा सल्ला पाळला नाही.


पु. ल. देशपांडे आणि बोरकर.
त्यांच्या स्मार्ट फोनच्या डीपीवरून घेतलेलं हे छायाचित्र.

मेड इन इंडियाबद्दल मी काय लिहावं! एवढं नक्की की, ती हातात घेतल्यावर पूर्ण वाचूनच खाली ठेवली. तिचा नायक पंजाबराव. त्याला जगण्यात विलक्षण रस आहे. क्रिकेट, राजकारण, सिनेमा, संगीत, साहित्य, वृत्तपत्रं, लेखन-वाचन…. सगळ्यांमध्ये त्याला रुची आहे, गती आहे. त्याच्या बोलण्यावरून ते समजतं. बोरकर यांची तीन-चार वेळा भेट झाल्यावर आणि खूप वेळा फोनवर बोलल्यामुळं आता वाटतं की, पंजाब म्हणजे खुद्द पुरुषोत्तम बोरकर असावेत! तेच हजरजबाबी बोलणं, त्या कोट्या, ते व्यथित होणं, ती जुनी गाणी, ते शेर...

बोरकराचं स्वतंत्र लेखन गेल्या काही वर्षांत जवळपास थांबल्यासारखं झालं होतं. वृत्तपत्रातली नोकरी त्यांनी केव्हाच सोडली होती. केवळ लेखनावर जगत होते ते. चरित्रात्मक पुस्तकांचं शब्दांकन करीत. त्यासाठी त्यांची अपेक्षाही कधीच मोठी नव्हती. बरं का सतीशभौ, आपल्याला काय, महिन्याला २०-२२ हजार रुपये मिळाले तरी बास. शबनम गळ्यात अडकवून, पेन-ड्राइव्ह खिशात ठेवून ते खामगावहून पुण्याला अधूनमधून चक्कर मारत. अशातच त्यांच्या पत्नीला कर्करोग झाला. नित्य उपचार मोठे खर्चिक होते. त्या चिंतेनं त्यांना दीर्घ काळ पिडलं. उपचारासाठी मदतीचं आवाहन करणारी बातमीही प्रसिद्धीसाठी पाठविली होती. पण त्यातून काहीच साधलं नाही. लेखकाच्या डोक्यावरचं चिंतेचं ओझं कमी झालं नाही. मन असं थाऱ्यावर नसताना, तेव्हाही त्यांच्या डोक्यात कॅन्सरचे दिवस असं पुस्तक लिहिण्याची कल्पना घोळत होती.

चरित्र लिहिता येईल, अशी दोन माणसं मला नगरमध्ये आढळली. नगरमधल्या महनीय व्यक्तींची ओळख करून देणारं एक पुस्तक पाच वर्षांपूर्वी प्रकाशित झालं. उपयोगी पडेल म्हणून त्याची प्रत बोरकरांना पाठवून दिली. त्यातल्या एकाला भेटायला म्हणून ते नगरमध्ये आले होते. थकलेले, दमले-भागलेले, काही तरी हरवलेले. घरी आले. तासभर बसले. गप्पा मारल्या. खरं तर त्यांच्या त्या नगरच्या मुक्कामात मैफल रंगवायची होती. त्यांचं लेखन मनापासून आवडणाऱ्या तिघा-चौघांना सांगितलं होतं. पण बोरकरांना असं काही नको होतं. नको. कुणाला बोलवू नका. मी तुमच्या घरी येईन, थोडा वेळ बसेन, थोडं काही खाईन आणि माझ्या कामाला जाईन, असं त्यांनी स्वच्छ शब्दांत सांगितलं.

नगरमधली दोन कामं त्यांना मिळाली नाहीत आणि दोन मिळाली. लेखनाचं पूर्ण झालेलं काम द्यायला ते येणार होते. आले असणारच. पण न भेटताच गेले. त्या पुस्तकाची त्यांनी सांगितलेली रक्कम पुरुषोत्तम बोरकर नावाला न्याय देणारी नव्हती. काही वेळा तर शब्दांकनाचं श्रेय देणंही टाळल्याचं त्यांनी एकदा व्यथित होऊन सांगितलं होतं.

स्वातंत्र्यानंतर खेड्यातली बदललेली मूल्ये आणि खेड्यांनी गमावलेली स्वतःची ओळख, याची कथा मेड इन इंडियामध्ये ओघवत्या शैलीत, बोचकारत, हसवत, उपहास करीत मांडली आहे. एका वेगळ्या धाटणीची कादंबरी. ती लिहिणाऱ्या बोरकरांना लेखक म्हणून स्वतंत्रपणे जगायचं होतं. त्यासाठी त्यांनी एका राजकीय पक्ष-संघटनेच्या मुखपत्राच्या संपादनाची स्वीकारलेली जबाबदारीही तीन-चार महिन्यांतच सोडून दिली. बोरकरांनी लेखक म्हणून तीन कादंबऱ्यांच्या माध्यमातून खूप काही दिलं. त्यांना काय मिळालं?

फक्त आणि फक्त लेखनाच्या बळावर जगण्याच्या लेखकाच्या त्या बाण्याचं, स्वप्नाचं काय झालं, याचं विदारक वास्तव समोर आहे. एका इ-मेलमध्ये बोरकरांनी लिहिलेला हा शेर त्यांनाच केवढा लागू पडतो -
झुकता नही तो काट दे सर मेरा जिंदगी
मुझसे मेरे गुरूर की कीमत वसूल कर...
...
(अवश्य वाचा - शरण तुला, दलाला!’ - https://khidaki.blogspot.com/2019/07/AamdarNiwas.html)

शनिवार, २० जुलै, २०१९

जर-तरच्या गोष्टी...


इट्स कमिंग होम... विश्चचषक अखेर घरी आल्याचा आनंद. (सौजन्य : www.theguardian.com)
..............
(विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात) सुपर ओव्हरचे नाटक रंगविण्याची गरज नव्हती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दोन्ही संघांना संयुक्त विजेते जाहीर करायला हवे होते.
– माईक हेसन (न्यूझीलंडच्या संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक)

या सामन्याचा खरा निकाल टाय असायला हवा होता! वास्तविक इंग्लंड व न्यूझीलंड दोन्ही संघ समान होते असे दिसले. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी हे मान्य करून हस्तांदोलन करायला हवे, हे खिलाडू उत्तर झाले असते. पण पैसा, अति देशभक्ती आणि प्रेक्षागारातील गर्जना अधिक ताकदवान ठरल्या.
- सायमन जेनकिन्स (स्तंभलेखक, द गार्डियन)

मुख्य सामना व महाषट्क झाल्यानंतरही दोन्ही संघांमधील फरक ओळखता येत नसेल (त्यांच्यातील विजेता ठरविता येत नसेल) तर चषक विभागून देणे योग्य होते.
- क्रेग मॅकमिलन (न्यूझीलंड संघाचे मुख्य फलंदाजी प्रशिक्षक)

...विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आजवरचा सर्वाधिक थरारक, श्वास कोंडून धरायला लावणारा अंतिम सामना झाला. इंग्लंडचा संघ विजेता ठरला. त्या निकालानंतर अनेक जण व्यक्त होत आहेत. प्रतिक्रिया बोलून दाखवित आहेत. एकूण १०० षट्कांच्या खेळानंतर आणि त्यानंतरच्या महाषट्कानंतर (सुपर ओव्हर) इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात (किंचित का होईना) सरस कोण याचा निकाल लागला नाही. त्यामुळेच आय. सी. सी.ने स्पर्धेसाठी बनविलेल्या नियमावलीच्या (Playing Conditions) आधारे निकाल लावण्यात आला, चषकाचा मानकरी ठरविण्यात आला. ज्याचे चौकार अधिक तो संघ विजेता, अशी तरतूद त्यात होती. त्यातूनही बरोबरीच साधली गेली असती, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले असते. बाद फेरीतील सामना बरोबरीत सुटला तर निर्णयासाठी काय तरतुदी आहेत, याची चर्चा भारत-न्यूझीलंड उपान्त्य सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यावर झाली होतीच.

सामन्यानंतर मात्र हा रडीचा डाव आहे असं म्हणत आयसीसीवर टीका सुरू झाली आहे. त्यात माजी क्रिकेटपटू, संघटक, पत्रकार, स्तंभलेखक, सर्वसामान्य चाहते असे सगळेच आहेत. खरंच हा आय. सी. सी.नं खेळलेला रडीचा डाव होता का? आणि तसा तो असेल तर ते आधी कोणाच्या लक्षात का आलं नाही? त्याला आधी कोणी विरोध का केला नाही? स्पर्धेसाठी बनविलेल्या नियमावलीची १४० पानांची (छोट्या मासिकाच्या आकाराची) पुस्तिका आहे. कोणत्याही क्रिकेट मंडळाने, खेळाडूने, तज्ज्ञाने त्यातील तरतुदींवर आधी आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही.

अधिक चौकार मारणारा संघ विजयी, या तरतुदीबद्दल गौतम गंभीर यानंही त्याच्या तडकफडक शैलीत ट्विट केलं आहे. तो लिहितो, कोणी किती चौकार मारले, यावर एवढ्या महत्त्वाच्या सामन्याचा निकाल कसा लावला जातो, हेच समजत नाही. आयसीसीचा हा नियमच हास्यास्पद आहे. गंभीर आणि अनेक जण आता तावातावाने बोलत आहेत, त्यांना या नियमावलीतील हास्यास्पद असं काही आधी आढळलं नाही का?

क्रिकइन्फोचे माजी व्यवस्थापकीय संपादक मार्टीन विल्यमसन यांनीही यावर टीका करताना वेगळं उदाहरण दिलं. त्यांनी म्हटलं आहे की, अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडच्या बाजूने बेटिंग केलेल्या सर्वांचे पैसे ऑस्ट्रेलियाच्या स्पोर्ट्सबेटने परत केले! विश्वचषकाचा विजेता अशा प्रकारे ठर(वि)णं अगदीच लाजिरवाणं आहे. आय. सी. सी.च्या हास्यास्पद आणि विसंगतीपूर्ण निर्णयाची किंमत बेटिंग करणाऱ्यांना चुकवावी लागू नये, असं (आम्हाला) वाटतं, असं त्यांच्या प्रवक्त्यानं सांगितलं.

बरोबरीच्या प्रसंगात अंतिम सामन्याचा निकाल लावण्यासाठी चौकारांचाच नियम का ठेवला? ज्याचे कमी गडी बाद झाले तो संघ विजयी ठरविण्याचा नियम का नाही? चौकार जास्त मारले याचाच अर्थ त्या संघाने अधिक चेंडू निर्धाव म्हणून (डॉट बॉल) खेळून काढले. मग कमी चेंडू निर्धाव खेळणाऱ्या संघाला विजयी का घोषित करायचे नाही? हे आणि असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. नियमावली हास्यास्पद ठरविण्यात आली.

प्रसिद्ध समालोचक हर्ष भोगले यांनी याबाबत केलेली ट्विट डोळ्यांत अंजन घालणारी आहेत. त्यांनी लिहिलं आहे की, चौकारांच्या संख्येवर विजेता संघ ठरवणं, हा काही नवा नियम नाही. खूप दिवसांपासून तो आहे. नियमांमध्ये काही बदल हवे आहेत का, असं संघांना विचारलं जातं, तेव्हा ते आहेत ते नियम जसेच्या तसे स्वीकारतात. प्रत्येक व्यवस्थेत काही उणे-अधिक असतंच. ते खेळाडूंना दाखवलं जातं आणि ते मान्य करूनच ते खेळतात. नियमांबद्दल आरडाओरड, त्रागा करणे सर्वांत सोपं आहे. नियमात तुम्हाला अपेक्षित असलेले बदल करण्यासाठी मेहनत घेणं मात्र फार कठीण, गैरसोयीचं असतं.

ही स्पर्धा होती आणि तिचा विजेता ठरवणं आवश्यक होतं. मग तो कोणत्याही मार्गाने का ठरेना! स्पर्धा सुरू होण्याआधी नियम ठरलेले होते. ते काही अंतिम सामन्याच्या वेळी इंग्लंडची सोय पाहून बनवलेले नव्हते, हे इयान विल्यम्स यांचं ट्विट हर्ष भोगले यांच्या म्हणण्याला दुजोराच देणारं आहे.

शेवटच्या चेंडूवर धावबाद आणि विजेतेपद हुकले.
हताश मार्टीन गप्टील आणि त्याची समजूत काढणारा जिमी नीशम.
(सौजन्य : www.theguardian.com)
विजयी झालेल्या संघाचं अभिनंदन करतानाच हरलेल्या संघाचं सांत्वन करण्याला, त्यांच्या खेळाबद्दल दोन कौतुकाचे शब्द बोलण्याचा प्रघात आहे. सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणविलं जाणारं क्रिकेट त्यापासून दूर कसं असेल? इथे तर नेमकं कोण विजयी याचा निर्णय १०२ षट्कांच्या खेळानंतर न लागूनही चषकापासून वंचित राहिलेल्या न्यूझीलंडचा संघ होता. त्यामुळेच न्यूझीलंडचं सांत्वन करण्याची लाटच उसळली.

उपान्त्य सामन्यातील विजयानंतर किवीजचा कर्णधार केन विल्यमसन यानं भारतीय क्रिकेटप्रेमींची समजूत काढताना अंतिम सामन्यात पाठिंब्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून की काय, असंख्य भारतीयांचा पाठिंबा न्यूझीलंडला होता. विश्वचषक ब्लॅक कॅप्सनं जिंकावा असंच त्यांना वाटत होतं. या इच्छाकल्पित चिंतनाचा भंग झाल्याच्या निराशेमुळंच या प्रतिक्रिया व्यक्त होत असाव्यात. त्यात राग आहे, टीका आहे, खिल्ली आहे, टवाळी आहे. सामना इंग्लंडनं जिंकला, पण मनं न्यूझीलंडनं!’, तुझ्या विजयाहून शहरात चर्चा तर माझ्या पराभवाचीच अधिक आहे, असे डायलॉगही समाज माध्यमातून दिसतात.

इंग्लंडच्या विजयापेक्षा न्यूझीलंडचा पराभव पचवणं भारतीय चाहत्यांना अधिक जड गेलेलं दिसतं. भारताची अंतिम फेरीची संधी हुकवणाऱ्या न्यूझीलंडच्या विरोधात आपले क्रिकेटप्रेमी असणं स्वाभाविक मानलं गेलं असतं. मागच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारतीयांच्या सदिच्छा न्यूझीलंडच्या बाजूने होत्या. त्याचं कारण म्हणजे अंतिम सामन्यातला दुसरा संघ होता उपान्त्य फेरीत भारताला हरवणारा ऑस्ट्रेलियाचा. त्या पार्श्वभूमीवर इथं चित्र उलटंच. साखळीत भारताची विजयी घोडदौड थांबविणारा इंग्लंड संघ समोर होता, हे त्याचं निमित्त असावं. दीडशे वर्षं राज्य करणाऱ्या इंग्रजांवर आपला राग आहेच. न्यूझीलंडला दिलेल्या पाठिंब्यातून इंग्लंडबद्दलचा राग, चीड व्यक्त होत असावी का?

विश्वचषकापासून अगदी थोड्या अंतरानं लांब राहिलेल्या न्यूझीलंडचा खेळ चांगलाच झाला. त्याचं कौतुक व्हायला हवंच. पण ते कौतुक अशा पद्धतीने केलं जात आहे की, वाटावं इंग्लंडचा खेळ जणू अगदीच भिकार झाला. त्या दर्जाचा खेळ न करताच त्यांना विश्वविजेतपद मिळालं (किंवा मिळवून दिलं गेलं!) आहे. वस्तुस्थिती तशी नाही. खरं तर न्यूझीलंडच्या अगदी घशात गेलेला हा सामना इंग्लिश खेळाडूंनी दोन ते तीन वेळा अलगद बाहेर काढला.

ज्यावर विश्वचषक विजेता ठरला, त्या चौकारांचीच गोष्ट पाहू या. न्यूझीलंडच्या फलंदाजांना १९.२ ते ३४.३ षट्कांच्या दरम्यान एकही चौकार मारता आला नाही. विसावं षट्क टाकणाऱ्या अदिल रशीदच्या पहिल्या चेंडूवर केन विल्यमसनने चौकार मारला. त्यानंतर ९३ चेंडूंनंतर तो सीमापार झाला. एवढी कंजूष गोलंदाजी करणाऱ्यांना, प्रामुख्यानं रशीद व लियम प्लंकेट यांच्या कौशल्याला दाद द्यायला हवी की नको? तीच गत शेवटच्या ११ षट्कांची. त्यात न्यूझीलंडला फक्त एक चौकार व एक षट्कार मारायला जमलं. ज्या षट्कांमध्ये धावांची गती वाढविली जाते, संधी शोधून फटकेबाजी केली जाते, त्या षट्कांमध्ये इंग्लिश गोलंदाजांनी एवढा अचूक, किवी फलंदाजांना जखडून ठेवणारा मारा केला नसता, तर..?

शिस्तबद्ध, अचूक गोलंदाजी करणाऱ्या कॉलीन डी ग्रँडहोमनं आपल्या पहिल्याच षट्कात जॉनी बेअरस्टोचा झेल सोडला. किंवा त्याच्याकडून तो सुटला. त्या वेळी बेअरस्टो १८ धावांवर खेळत होता. त्यानंतर २९ धावांची भर पडल्यावर न्यूझीलंडला दुसरं यश मिळालं. बेअरस्टो आणखी १८ धावा काढल्यावर बाद झाला. तो झेल ग्रँडहोमनं तेव्हाच पकडला असता, तर..?

न्यूझीलंडच्या डावातली सर्वांत मोठी ७४ धावांची भागीदारी दुसऱ्या जोडीसाठी झाली. बेन स्टोक्स व जोस बटलर यांनी नाजूक अवस्थेतून संघाला सावरता पाचव्या जोडीसाठी ११० धावा जोडल्या. शेवटच्या काही षट्कांत अतिशय दमलेला, धापा टाकणारा स्टोक्स धाव पळताना कुचराई करीत नव्हता. त्याच्या या झुंजार खेळीचं महत्त्व नाही का अजिबात. त्यानं असा झुंजार खेळ केला नसता, तर..?

दोन्ही संघांची षट्कं आणि धावा याची तुलना केल्यावर दिसतं की, अगदी पंचेचाळिसाव्या षट्कापर्यंत इंग्लंड न्यूझीलंडहून मागंच होतं. शेवटून दुसऱ्या षट्कात नीशमच्या गोलंदाजीवर स्टोक्सने मारलेला फटका ट्रेंट बोल्टच्या हातात गेला. तेव्हा त्याला तोल सावरता आला नाही आणि त्याचा पाय सीमारेषेवर पडला. त्यानंतर स्टोक्सने २२ धावा कुटल्या. हा झेल झाला असता, तर..?

वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्राथवेटचा झंजावात पाहता न्यूझीलंडचा साखळी सामन्यातला पहिला पराभव तिथेच झाला असता. त्या वेळीही नीशमच्याच गोलंदाजीवर शेवटून दुसऱ्या षट्कातच बोल्टनेच त्याचा सीमारेषेवर अफलातून झेल घेतला होता. तेव्हाही असाच तोल गेला असता, तर..?

क्रीजमध्ये पोहोचल्यानंतर आपण हे हेतुत: केलं नाही
असं स्पष्ट करीत बेन स्टोक्सने
केलेली कृती माफी मागणारी होती.

(सौजन्य : www.cricket.com.au)
मार्टीन गप्टीलने केलेली फेक स्टोक्सच्या बॅटला लागून चेंडू सीमापार गेला. यात स्टोक्सचा तसा काहीच दोष नव्हता. तसं त्यानं लगेच हातवारे करून स्पष्टही केलं. एवढंच काय चेंडू सीमेकडं जात असताना दोन्ही फलंदाज धावले नाहीत. या चेंडूवर पाचऐवजी सहा धावा देण्याची चूक पंचाकडून झाली. त्यात ना स्टोक्स सहभागी होता ना त्याचा संघ. पंचांची ही चूक म्हणजे निर्णय घेण्यातली त्रुटी होती, असं ती दाखवून देणारे माजी पंच सायमन टॉफेल म्हणतात. ही एक धाव कमी गेली असती, तर न्यूझीलंड जिंकलंच असतं असं मानायला तेही तयार नाहीत. ओव्हर-थ्रोचा चौकार देऊ नका; पळून काढल्या तेवढ्याच दोन धावा असू द्या, अशी विनंती स्टोक्सनं पंचांना लगेचच केल्याचं बेनचा सहकारी जेम्स अँडरसन यानं नंतर सांगितलंच. (आपण असं काही केलं/सांगितलं नाही, असा खुलासा नंतर स्टोक्सनं केला.)

थोडक्यात ही सगळी असं झालं असतं तर... आणि तसं झालं नसतं तर... या पद्धतीची कहाणी आहे. स्पर्धेची न पटणारी नियमावली, काही घडलेल्या आणि काही बिघडलेल्या गोष्टी यावर चर्चा चालूच राहणार.

वास्तव एवढंच आहे की, इंग्लंडनं सामना जिंकला आहे. न्यूझीलंडपेक्षा आठ चौकार अधिक मारून. इंग्लंडनं पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला, हेच खरं. अगदी नेमकेपणानं आणि समालोचक व माजी क्रिकेटपटू ईशा गुहा हिच्या शब्दांचा आधार घेऊन सांगायचं, तर इंग्लंडच्या पुरुष संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला, हेच सत्य आहे!
...

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू केन विल्यमसन.
सचिनच्या हस्ते त्यानं हे उत्तेजनार्थ पारितोषिक स्वीकारलं.
(सौजन्य : www.dnaindia.com)
पुरस्कार देऊन सांत्वन?
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याची निवड झाली. एकूण परिस्थिती पाहिली, तर न्यूझीलंडचं सांत्वन करण्यासाठी म्हणून त्याची निवड झाली असावी, अशी शंका यावी. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विल्यमसन (एकूण धावा ५७८) चौथा आहे. स्पर्धेत पाच शतकं झळकाविण्याचा विक्रम करणारा रोहित शर्मा (६४८) पहिल्या क्रमांकावर आणि त्याच्या पाठोपाठ डेव्हिड वॉर्नर (६४७) आहे. बांगला देशाचा शकीब अल हसन याच्या धावा ६०६ आणि बळी ११. अगदी अफलातून अष्टपैलू खेळ. इंग्लंडच्या पहिल्या आणि शेवटच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या स्टोक्सनं ४६५ धावा केल्या आणि सात बळी घेतले. क्षेत्ररक्षण करतानाही तो उठून दिसला. पण स्पर्धेचा नायक ठरण्याऐवजी हा खेळाडू खलनायक म्हणविला गेला! रोहित, वॉर्नर व शकीब यांचा विचार का झाला नाही, हे कधीच कळणार नाही. खिलाडू वृत्ती व चतुरस्त्र नेतृत्व यामुळे विल्यमसनचं पारडं अधिक जड झालं, असं पारितोषिक वितरण करताना सांगण्यात आलं. मैदानावर खेळाडू वृत्ती दाखविणं अपेक्षितच आहे. ती दाखविली नाही, तर कारवाई होते. नेतृत्वगुणाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर विल्यमसन उजवा होता; पण तो इतरांहून फार प्रतिभावान होता, असं सिद्ध करणाऱ्या खूप काही गोष्टी नाहीत.

चंदनापुरीत भेटलेला अजिंक्य रहाणे

  देखणा फटका... ही बॅट आता निवृत्त झाली! (छायाचित्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सौजन्याने.) .......................................... ...