शुक्रवार, २६ मे, २०१७

चौकट छापणाऱ्याची न छापली जाणारी चौकट

प्रामाणिकपणा’ म्हणजे सद्गुण किंवा संस्कार मानतो आपण.
तो हल्ली सहसा वृत्तपत्रांमधल्या चौकटीत पाहायला मिळतो, असं म्हणतात.
त्या सजविलेल्या चौकटीत छापल्या जाणाऱ्या बातमीमध्ये
`प्रामाणिकपणा` या शब्दामागे `दुर्मिळ` असं विशेषणही बहुदा लावलं जातं.
पण या गुणाचं मोल पत्रकारांनाही आता तेवढं वाटत नसावं,
असं `प्रामाणिकपणे`च वाटतं. कारण अशा काही `दुर्मिळ` बातम्या
चौकटीविनाही थोडक्यात छापल्या जातात. लक्षात येतील, न येतील अशा.
`न जाणो, यापासून कोणी प्रेरणा वगैरे घेतली, तर काय!
मग उद्या कदाचीत अशाच बातम्या आपल्या अंकातील जागा भरून टाकतील,`
अशी भीती छापेवाल्यांना वाटतही असेल बुवा.

क्वचित कधी तरी दिसणाऱ्या चौकटींमध्ये आढळणारी माणसं
साधी, सरळ, दुबळी, दबलेलीच असतात.
त्यांना कोणी तरी वृत्तपत्रांच्या कार्यालयात घेऊन जातं
किंवा ज्यांना त्यांच्या प्रामाणिकपणाचं फळ मिळालेलं असतं,
ती मंडळी ही बातमी पोहोचवितात.
एखादा फोटो, सिंगल कॉलमी चौकट
आणि दुसऱ्या दिवशी दहा-वीस कौतुकाच्या नजरा!

या चौकटीपर्यंत न पोहोचणारी, पोहोचता न येणारी,
त्या चौकटीत शिरकाव न करता येणारी असंख्य माणसंही
या जगात असतीलच की. तीही `दुर्मिळ` असं विशेषण लावता येण्यासारखीच.
त्यातील काहींना चौकटीपर्यंत पोहोचण्याचा राजमार्ग माहीतही असतो;
पण त्यांना स्वतःची जाहिरात करणं टाळायचं असतं.
`आपण केलं ते फार जगावेगळं केलं नाही;
माणसानं वागलं पाहिजे तसंच तर आपण वागलो,`
असंही त्यांना वाटत असेल बुवा.

असाच हा एक किस्सा.
चौकटीत छापता येणाऱ्या, पण छापल्या न गेलेल्या माणसाचा.
गोष्ट गेल्या सोमवारची आहे. दोन-तीन मित्रांसह जेवण करून,
त्यांना आपल्या गाडीतून इच्छितस्थळी सोडवून (पोचवून नव्हे हो!)
हा घरी परतत होता. वेळ रात्री बारा-सव्वाबाराची असेल.
गाडीतून जाताना रस्त्यावर पडलेलं एक पाकीट त्याच्या नजरेस आलं.
गाडी व्यवस्थित बाजूला घेऊन बंद करून तो खाली उतरला.
पाकीट बऱ्यापैकी लठ्ठ दिसत होतं.
स्वाभाविक कुतुहलानं ते त्यानं उचललं.
गाडीत बसून आतला दिवा लावून त्यानं ते उघडून पाहिलं.
हेही स्वाभाविक मनुष्यसुलभ कुतुहल.

पाकिटात पाचशे-पाचशेच्या तीन नोटा होत्या;
पन्नासच्या एक-दोन आणि काही दहा रुपयाच्या.
दीड ते पावणेदोन हजार रुपये असतील. बाकी बरीचशी कागदपत्रं.

त्याच्या लक्षात आलं की, पाकीट काही फार धड अवस्थेत नाही.
बऱ्यापैकी वापरलेलं, आतले कप्पे फाटलेले.
म्हणजे या पाकिटाचा मालक कोणी सर्वसामान्य, गरीब दिसतो.
पाकीट मालकापर्यंत पोहोचलंच पाहिजे,
असं त्याला तेव्हाच अगदी आतून वाटलं.
पण पोहोचवायचं कसं?

पाकिटातले सगळे कागद त्यानं काढले. त्यातला एक होता वेतनचिठ्ठीचा.
वर्ष-दीड वर्षापूर्वीची वेतनचिठ्ठी. पुण्यातल्या एका उपाहारगृहाची.
मूळ पगार सहा हजार, भत्ते-बित्ते मिळून एकूण 12 हजार
आणि त्यातून कपात चार-साडेचार हजार रुपयांची!
म्हणजे पाकिटाचा मालक सर्वसाधारण परिस्थितीतला आहे, हे स्पष्टच झालं.
वेतनचिठ्ठीवर काही कुणाचा फोन नंबर असत नाही.

इतर कागद पाहिले. त्यात वाहन चालविण्याचा परवाना होता.
त्यावरून त्याला जन्मसाल कळलं - 1976. म्हणजे गृहस्थ चाळिशीच्या घरातला.
त्यानं विचार केला, या दीड हजार रुपयांत
त्याच्या घरचं दोन आठवड्यांचं रेशन, भाजीपाला येत असेल.
पाकीट पोहोचलं पाहिजेच पाहिजे.

अजून कागद चाळता चाळता
त्याला एक `व्हिजिटिंग कार्ड` दिसलं. वेतनचिठ्ठी ज्या हॉटेलाची होती,
त्या हॉटेलातल्या कुणाचं तरी.
त्यावर फोन नंबरही होता.
चला, एक मार्ग तर सापडला!

रात्र बऱ्यापैकी झालेली होती; तरीही त्यानं धाडस करून तो नंबर फिरविला.
तो त्या पुण्यातल्या हॉटेलातला शेफ होता.
या माणसानं त्याला विचारलं, `की बुवा, अशा अशा नावाच्या माणसाला
तुम्ही ओळखता का? त्याचं पाकीट मला सापडलंय.`

`ओळखतो की. बरोबर काम करत होतो आम्ही.
पण त्यानं दीडएक वर्षापूर्वीच नोकरी सोडली इथली
आणि आता तो नगरला असतो,` त्या शेफनं उत्तर दिलं.

आली का अडचण!
तुमच्याकडं त्याचा काही नंबर वगैरे आहे का?`,
यानं शेवटची आशा म्हणून विचारलं. उत्तर होकारार्थी आलं.
पण तो माणूस म्हणाला, `तुम्ही नका फोन करू.
मीच त्याला कळवतो. तो तुमच्याशी संपर्क साधील.`

चला; पाकिटाच्या मालकापर्यंत पोहोचण्याचा रस्ता सापडला
म्हणून हा गडी घरी गेला.
रात्री तासभर वाट पाहूनही कुणाचा फोन आला नाही.

हा गृहस्थ सकाळी झोपेत असतानाच
साडेसात-आठ वाजता पाकिटाच्या मालकाचा फोन आला.
कोण, कुठं, काय करतो, कुठं काम करतो वगैरे चौकशी झाली.
पाकिटातल्या ऐवजाची पडताळणी झाली.
हे दोघं राहतात त्या ठिकाणांमधलं अंतर सहा-सात किलोमीटरचं.
पाकिटाच्या मालकाला सकाळी 11 वाजता कामावर जायचं होतं.
मग हा आपला म्हणाला, `मीच येतो तिकडे.`

गाडी काढून दुपारी बाराच्या सुमारास आपला माणूस
त्या माणसाच्या हॉटेलात पोहोचला.
सात-आठ किलोमीटरचं अंतर कापून आणि आपल्या मोटारीचं पेट्रोल जाळून.
काउंटरवरच त्याचं जोरदार स्वागत झालं.
तिथल्या माणसानं त्याला थेट नाव घेऊन `ते तुम्हीच ना?` असं विचारलं.
हा एकद चकित!
मग तो काउंटरवाला म्हणाला, `त्यानं सांगून ठेवलंय,
माझ्याकडं या या नावाचा माणूस येणार आहे म्हणून.
तुमचा चेहराच सांगतो की,
तुम्ही इथं कुणाला तरी काही तरी द्यायला आलात. म्हणून मी ओळखलं.`

पाकिटाच्या मालकाला भटारखान्यातून बोलावण्यात आलं.
प्रथेप्रमाणं यानं सांगितलं, पाकीट पाहून घे, पैसे मोजून घे.
प्रथेप्रमाणंच तसं काही करण्यास नकार देत तो म्हणाला,
`रस्त्यात सापडलेल्या पाकिटाच्या मालकाचा शोध घेत
जो इथपर्यंत स्वतः येतो, त्याच्यावर हे अविश्वास दाखवण्यासारखंच आहे.`

पाकीट कसं पडलं?
याच्या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला,
`रात्रपाळी संपवून सायकलवरून घरी चाललो होतो.
त्या तिथं कुत्री फार मागं लागतात. म्हणून उभा राहून जोरात पॅडल मारत
सायकल हाणली. त्या गडबडीत पाकीट पडलं.`

... एरवी अशी काही बातमी आली की,
त्यात 50 शंका काढणाऱ्या आणि त्याचं समाधान झालं की,
ती सजवून लावणारा हा माणूस.
माध्यमातला माणूस.
त्याच्या या माणुसकीची गोष्ट कोण छापणार?

`अत्त दीप भव: ...`
तोच त्याचा दिवा बनला आहे.
तोच त्याचा `दीपक` आहे.

`त्या पाकिटात पाचशेच्या नोटांचं बंडल असतं,
तर मी मालकाचा शोध घेतला असता का,`
अशी भीती बोलून दाखविणाऱ्या या माणसाला
त्या छापील अक्षरांच्या, अर्ध्या पॉइंटाच्या रुळाच्या
बंदिस्त चौकटीत कशी जागा मिळणार?

माध्यमातल्या माणसाची ही चौकटीतल्या गुणाची
गोष्ट सांगण्यासाठी म्हणून तर मुद्दाम माध्यम निवडलं आहे,
ते सगळ्या चौकटी ध्वस्त करणारं,
चौकटीबाहेरचंच!

सोमवार, ११ जुलै, २०१६

... पाऊस कोसळू लागतो जेव्हा

घाई पोस्ट करण्या पटापट
फेसबुकावरी सुरू झटापट
ट्विटरवरीही चिवचिवाट
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

झारा घेऊनि कळ्या पाडिती
लाडू गोड शब्दांचे वळिती
कविता कविता तयां म्हणिती
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

चिंब चिंब साऱ्या ‘भिंती’
अवघे एकमेकां ‘लाईकती’
आणिक ‘कमेंटा’ही बरसती
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

खमंग बटाटवडा नि चिवडा पाहा
कुर्रुमकुर्रुम कांदाभजी! अहाहा!!
कपात वाफाळता आल्याचा चहा
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

गाऊही लागते ‘आकाशवाणी’
मनात दडलेली पाऊसगाणी
फिरुनी जाग्या साऱ्या आठवणी
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

वर्षासहलींचे आखले जातात बेत
आंबोली, भुशी डॅम, भंडारदरा थेट
जिवाच्या जिवलगांची तिथेच भेट
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

डबकी रस्त्यात साचतात
लेकरे खट्याळ नाचतात
कागदी नावा तिथेच बुडतात
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

कोठे कोठे कोसळती झाडे
खचून जाई भिंत, पत्राही उडे
गरिबांचे पडती संसार उघडे
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

घोटभर पाण्यासाठी किती श्रम
थकले पाय, कोंडून गेला दम
मिळेल त्यांना थोडासा आराम
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

ओढे खळाळती, नद्याही वाहती
नवे नवे पाणी धरणाचिया पोटी
हसू हळू फुटे कुणब्याच्या ओठी
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

नका थांबू, करू आता जुपणी
जल्दी करा, सुरू भाताची आवणी
चाड्यावरी मूठ, खरिपाची पेरणी
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

आधी उगवे, उदंड पिके
शेत-शिवाराचे पांग फिटे
डोळ्यांमध्ये स्वप्न मोठे
...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।

अवकाळ हटला, चेहरे हसरे
हिर्वीहिर्वीगार गावची शिवारे
जगण्याच्या आशेला नवे धुमारे

...पाऊस कोसळू लागतो जेव्हा।
...पाऊस कोसळू लागतो तेव्हा।।


(पूर्वप्रसिद्धी : दैनिक सकाळ, ५ जुलै २०१६)

शुक्रवार, १ जुलै, २०१६

पेपरवाला पोरगा? …वृत्तपत्र विक्रेता!

मी गेल्या 20 वर्षांमध्ये राहण्याच्या तीन जागा बदलल्या. या काळात दोन महत्त्वाच्या गोष्टी मात्र कायम राहिल्या. एक म्हणजे घरी पेपर (दैनिक वृत्तपत्र) टाकणारा विक्रेता. आणि दुसरा केशकर्तनकार. हा पेपरवाला स्वतः बऱ्याच वर्षांपासून माझ्याकडे अंक टाकत नाही. त्याचा मदतनीस हे काम करतो. तो स्वतः उपनगरामधला (अधिक मोठा) व्याप सांभाळतो.

आपण पेपरवाला असं सरसकट म्हणतो खरं; पण त्याचा तसा उल्लेख करायला गेल्या काही वर्षांपासून माझी तरी जीभ रेटत नाही. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. एवढ्या वर्षांच्या संबंधांनंतर आमच्यामध्ये स्वाभाविकच आपुलकी निर्माण झाली आहे. पुन्हा मी वृत्तपत्र व्यवसायातच काम करतो. अस्मादिक एक चांगला पत्रकार असल्याचा त्याचा (गैर)समज आहे. ते प्रत्येक भेटीत बोलून दाखविल्याशिवाय त्याचं समाधान होत नाही. (आपुलकी, समान व्यवसाय आणि माझ्याबद्दलचा समज, अशा त्रिसूत्रीमुळेच तो माझ्याकडून टाकणावळ घेत नाही.) कोणत्या नव्या दैनिकांच्या काही योजना (स्कीम) आल्या, तर परवानगी वगैरे न विचारता, परस्पर पैसे भरून माझं नाव नोंदवून टाकतो. म्हटलं तर आम्ही गल्लीवालेच आहोत. तो अचानक कधी तरी येतो, तेव्हा तासभर गप्पा मारत बसतो.

हे सारं जे सांगतो आहे, ते गिरीश दिगंबर काळे याच्याबद्दल. खरं तर अरे-तुरे करण्याच्या वयाचा राहिला नाही तो आता. चाळिशीच्या पुढे गेला आहे. पण इतक्या वर्षांची सवय जात नाही. आता महत्त्वाचा मुद्दा. पेपरवाला असं म्हणण्याता एका स्वाभाविक तुच्छता, क्षुद्रत्वाचा उल्लेख जाणवतो. गिरीशला आणि त्याच्या वागण्या-बोलण्याला पाहून तसं मुळीच म्हणावं वाटत नाही. तसं बोलल्यानं त्याचा अवमान होतो, याची जाणीव मला आहे.

...तर गेल्या शनिवारी ( 25 जूनला) संध्याकाळी कार्यालयात असतानाच गिरीशचा फोन आला. त्याचं एक महत्त्वाचं काम होतं. ते माझ्याकडूनच होईल, असा त्याला विश्वास होता. काम काय आहे, हे त्यानं लगेच सांगितलं. मला बायोडाटा लिहून पाहिजे. तुम्हाला कधी वेळ आहे?’, असं त्यानं फोनवरूनच विचारलं. (मलाही तो कधी अरे-तुरे, तर कधी अहो-जाहो असं बोलतो.) ते उशिरात उशिरा कधीपर्यंत मिळालं तर चालेल, हेही त्यानं सांगितलं. त्यानुसार रविवारी सकाळी भेटण्याचं ठरलं आमचं.  गिरीशला या वयात बायोडाटा कशासाठी हवा, हे न कळून मी बुचकळ्यातच पडलो. पण त्यानंच त्याचं उत्तर दिलं. रोटरी क्लब ऑफ अहमदनगरनं त्याची रोटरी व्होकेशनल अॅवॉर्डसाठी निवड केली होती. संयोजकांना त्याचा परिचय हवा होता. तो लिहायचा कसा आणि कोणत्या भाषेत याचा ताण त्याच्या मनावर होता. याचं नेमकं उत्तर माझ्याकडे सापडेल, अशी त्याची खात्री होती आणि ती त्यानं बायकोला बोलूनही दाखविली होती.

ठरल्याप्रमाणं दुसऱ्या दिवशी सकाळी गिरीश आला. माझ्याकडे कोणी आलेलं आहे, हे पाहून त्यानं नंतर यायचा वायदा केला. पुन्हा फोन करून संध्याकाळी येण्याचं कबूल केलं. तो आलाच नाही संध्याकाळी. वाट पाहून फोन केला आणि पाचच मिनिटांत तो घरी पोहोचला. काहीसा उत्तेजित होता तो. स्वाभाविकच होतं ते. सचोटीनं केलेल्या सामाजिक/व्यावसायिक कामाबद्दल त्याची या पुरस्कारासाठी रोटरी क्लबनं निवड केली होती. त्या कार्यक्रमात परिचय करून देण्यासाठी क्लबनं माहिती मागितली होती. तीच त्याला लिहून हवी होती. या पुरस्कारासाठी आपली निवड कशी झाली, कुणी नाव सुचविलं याची काही म्हणता काही माहिती त्याला नव्हती. पुरस्कारासाठी फिल्डिंग लावणाऱ्या अव्वल क्षेत्ररक्षकांच्या जगाबाबत तो पूर्ण अज्ञानी होता!

प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते गिरीशनं रोटरी क्लबचा पुरस्कार स्वीकारला. (छायाचित्र सौजन्य :  दत्ता इंगळे)


गिरीशला वाटत होतं की, मी ते कागदावर लिहून द्यावं. मी संगणक सुरू केला आणि त्याला म्हटलं, बोल आता. स्वतःविषयी सांगायचं म्हटल्यावर भल्याभल्यांना किती सांगू नि किती नको, असं होऊन जातं. गिरीशचं तसं मुळीच झालं नाही. त्यानं दोन-तीन मिनिटांतच काय ते सांगून टाकलं. कितव्या वर्षी व्यवसायाला सुरुवात केली, कुणाकुणाबरोबर काम केलं, कुणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची एवढंच त्यानं सांगितलं. फापटपसारा नाही, अवाच्या सवा वाढवून सांगणं नाही. आपल्या कामाचं अवडंबर नाही की, उगीचच उदात्तीकरण नाही. नेमकं आणि सुस्पष्ट.

संगणकावर काम सुरू केलं. सात-आठ मिनिटांमध्ये साडेतीनशे शब्दांचा मजकूर तयार झाला. साधा, सरळ, सोपा. त्याला हवा तसा. तो टंकित करण्याचं काम सुरू असताना गिरीशनं एकदाच अडवलं. मी त्याचा उल्लेख वृत्तपत्र वितरक केला होता. तो म्हणाला, वृत्तपत्र विक्रेता लिहा. आपण एजंट नाहीत. त्यानं केलेल्या या दुरुस्तीनं मला तो पुन्हा एकदा आवडून गेला. जे आहे ते लिहू आणि तेच सांगू, असा त्याचा बाणा.

गिरीशच्या आयुष्यातला हा पहिला पुरस्कार. तोही न मागता, इच्छा व्यक्त न करता मिळालेला. तो कशामुळं मिळाला, रोटरी क्लबसारख्या मोठ्या संस्थेला आपलं नाव कुणी सुचविलं, याचं त्याला खरोखर औत्सुक्य होतं. त्याला कदाचित माहीत असेल-नसेल; त्यानं अलीकडच्या काळात एक मोठं काम केलं. एका वयोवृद्ध, एकाकी आणि आजारानं त्रासलेल्या प्राध्यापकाची त्यानं गेल्या 10 वर्षांत स्वतःच्या वडिलांसारखी काळजी घेतली. निधनानंतर त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. या काळात त्यांच्या घरची एक काडी इकडची तिकडं झाली नाही. त्यांचे वारस परदेशातून आले तेव्हा गिरीशनं त्यांना काय झालं, कसं झालं याची सगळी माहिती आणि सगळ्या वस्तूंसह त्यांच्या बंगल्याचा ताबा दिला. हे सगळं पाहून, अनुभवून तेही चकित झाले. हे सगळं गिरीशनंच मला सांगितलं. आणखी बऱ्याच गोष्टी त्यानं सांगितल्या; त्या इथं देण्याचा मोह टाळलेला बरा. आपलं एवढं कौतुक झालेलं त्याला कदाचित आवडणार नाही.

वयाच्या तेराव्या वर्षी गिरीशनं एका विक्रेत्याकडं कामाला सुरुवात केली. महिना 40 रुपये पगारावर. तिथनं पुढं तो या व्यवसायातली एक-एक खुबी शिकत गेला आणि पंचविशीतच त्याला सूर गवसला. त्यानं कधीच मागं वळून पाहिलं नाही. तो अतिशय अभिमानानं सांगत होता, एवढ्या वर्षांत एकही खाडा नाही, सतीशराव. उन-वारा-पाऊस काही असलं, तरी रोजच्या रोज घरी पेपर पोहोच म्हणजे पोहोच!”

गिरीशनं गेल्या 20-22 वर्षांमध्ये स्वतःला फार बदलवलंय. त्यानं पुढच्या 10 वर्षांचं आर्थिक नियोजन केलं आहे. एसआयपी, पीपीएफ आणि म्युच्युअल फंड हे त्याचे गुंतवणुकीचे, बचतीचे आवडते पर्याय. गेल्या तीन वर्षांमध्ये प्रत्येक भेटीत मला तो विचारतो, एसआयपी चालू केली की नाही एखादी?’ त्याचं स्वतःचं असं आवडतं दैनिक आहे. (तिथे मी दीर्घ काळ काम केलंय.) वृत्तपत्राच्या व्यवसायाबद्दल एवढ्या वर्षांनंतर त्याची काही मतं बनली आहेत. ती तो मोकळेपणानं सांगतो. माणसं तो पटकन ओळखतो. त्याला वाचायला आवडतं. त्यामुळं भेटल्यावर प्रत्येक वेळी तो `सध्या काय वाचताय?` आणि `नवीन वाचण्यासारखं काय आहे?` हे दोन प्रश्न आवर्जून विचारतो. (आता मला कटाक्षानं जाणवलं. माझं आलेलं पहिलं पुस्तक त्याला द्यायलाच पाहिजे!)

पूर्वी एका मुद्द्यावरून गिरीशबरोबर नेहमी वाद होई. महिन्याचं बिल! तो कधी तरी, आठवण करवून दिल्यावर, आठ-दहा महिन्यांनंतर उगवतो आणि पैसे घेऊन जातो. ठरावीक मासिक उत्पन्न असलेल्या माझ्यासारख्याला चार-पाच दैनिकांचे आठ-दहा-बारा महिन्यांचे पैसे एकदम द्यायला थोडं जडच वाटतं. त्यामुळे मी मागे त्याला म्हणालोही, ‘बाबा रे, तू आपला दोन-तीन महिन्यांनंतर पैसे नेत जा बरं. त्यावर त्याचं उत्तर होतं, ‘जाऊ द्या राव. तुमचे पैसे कुठं जातात, सतीशराव? मला एकखट्टी पैसे मिळाले, तर उपयोग होतो.एकदा तर त्यानं तब्बल सव्वा वर्षाचे पैसे नेले. मी आता त्याच्यापुढं या मुद्द्यावर शरणागती पत्करली आहे. चार-सहा महिन्यानंतर रस्त्यात भेटला की, त्याला आठवण करून देतो.

असेच पैसे नेण्यासाठी तो पाच-सात महिन्यांपूर्वी आला होता. या वेळी फार नाही, सात महिन्यांचेच पैसे होते. बोलता बोलता अनेक विषय निघाले. तो म्हणाला, “माझा एका गोष्टीवर फार विश्वास बसला. या धंद्यात भरपूर कष्ट आहेत. पण त्याला पर्याय नाही. प्रामाणिकपणा आणि हार्ड वर्कएवढं पाळलं की, फार फायदा होतो. रात्री पडलं की, मला पटकन झोप लागते.पहाटे चार ते दुपारी बारा, ही त्याची कामाची वेळ. संध्याकाळी पैसे वसूल करतो. तर ऐन तारुण्यात, 20-22 वर्षांपूर्वी तो तसा नव्हता. हातात पैसा खुळखुळत होता. वय अगदीच पंचविशीच्या अल्याड-पल्याड होतं. वय, भरपूर पैसे याचा परिणाम त्याच्यावर होऊ पाहात होता. कसं कुणास ठाऊक; त्यानं स्वतःला सावरलं. धंदा एके धंदाकरायचं ठरवलं. उपनगरातले उच्चभ्रू ग्राहक त्यानं मिळविले. (त्यात एक फायदा असा की, सहसा कुणी पैसे बुडवत नाही. मला एक पुढारी माहिती आहेत. त्यांच्याकडे अंक टाकणारा मुलगा दर सहा-सात महिन्यांनी बदलायचा. कारण ते रोज पाच-सहा अंक घ्यायचे आणि पैसे द्यायची वेळ आली की, टाळाटाळ करायचे.)

पैसे कमावण्याचा आणखी एक प्रामाणिक मार्ग गिरीशला गेल्या पाच-सहा वर्षांत सापडलाय. कोणत्याही दैनिकाचा रोजचा अंक उघडला की, त्यातून किमान एक, कधी कधी दोन-तीन `पॅम्फ्लेट` पडतात. तर ते अंकात टाकण्याची जबाबदारी गिरीश घेतो. याच विषयावर बोलताना त्यानं एका मित्राचं नाव घेतलं. हा आमचा मित्र थोडं-फार सामाजिक काम करतो. फार सरळ आणि सज्जन माणूस आहे तो,’ असं प्रमाणपत्र गिरीशनं त्याला देऊन टाकलं. तर त्या सज्जन माणसाला आपल्या व्यवसायाविषयी काही पॅम्फ्लेटया माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायची होती. त्यानं ते काम सांगितलं नि पैशाबाबत विचारलं. तुमच्यासारख्या माणसाकडून कसले पैसे घ्यायचे राव?’, असा प्रतिप्रश्न करीत गिरीनं त्याचं काम मोफत केलं. याचंही एक कारण आहे, आमच्या या मित्रानं 50 वर्षांपूर्वी दुकानासाठी भाड्यानं घेतलेली जागा मालकाला ठरल्या मुदतीला स्वतःहून परत केली. त्याबद्दल एका नया पैशाची अपेक्षा न ठेवता. भर बाजारपेठेतील ही जागा सोडण्याच्या मोबदल्यात त्याला काही लाख रुपये तर सहज कमावताआले असते. त्यानं तसं काहीच केलं नाही, याचं गिरीशला विलक्षण कौतुक वाटतं; त्यामुळं त्याच्याबद्दल आदरही वाटतो.

मग एका समव्यावसायिकाचा किस्सा गिरीशनं सांगितला. हा माणूस अडचणीत असलेला; घरच्या काळज्यांनी त्रस्त. पण महिनाभरापूर्वी त्याला सकाळच्या वेळी बसस्थानकावर एक तिशी-बत्तीशीचा तरुण अत्यंत अल्प कपड्यात दिसला. तेव्हा थंडी भयानक होती. तर थंडीत कुडकुडणाऱ्या त्या तरुणाला पाहून त्यानं अंगातलं नवं कोरं जर्कीन त्याला देऊन टाकलं. वर नाश्ता करायला, चहा प्यायला पैसेही दिले. त्याच्याबद्दल सांगताना गिरीशच्या बोलण्यातला अभिमान आणि कौतुक लपत नव्हतं.

चांगल्याला चांगलंच म्हणण्याचा गिरीशचा हा गुण त्या भेटीत माझ्या (पुन्हा एकदा) लक्षात आला. निघता निघता तो पुन्हा म्हणाला, “चांगलं चाललंय आपलं. पैसे मिळतात मनासारखे. पण कष्ट भरपूर घ्यावे लागतात. मी इथपर्यंत आलो ते असंच - प्रामाणिकपणा आणि `हार्ड वर्क`. त्याला तर काही पर्याय नाही ना!
....

(नगरचा वृत्तपत्र विक्रेता गिरीश काळे याला सचोटीनं केलेल्या व्यवसायाबद्दल रोटरी क्लबचा पुरस्कार मिळाला. नाव बदलून त्याच्याबद्दल दीड वर्षापूर्वी एक छोटं टिपण लिहिलं होतं. ते फेसबुकवर टाकलं आणि काही मित्रांना इ-मेलनं पाठविलं होतं. या पुरस्कारामुळं त्याच्याबद्दल लिहावं वाटलं. म्हणून त्या मजकुरात थोडी भर घालून गिरीशचं खरं नाव टाकून लिहिलेला हा लेख.)

जिssवलगाsss


दाटून येतात ढग काळे।
पांगून, आभाळ मोकळे।
बरसतील कधी या धारा।
अंदाज कुणी सांगील जरा?




आठवडा तरी उलटून गेला आता. पुन्हा पाऊस नाही. आधी तो आलापण हजेरी लावण्यापुरता. गेल्या आठवड्यात कार्यालयात असताना दुपारी पुन्हा गच्च भरलं आभाळ. छायाचित्रकाराला म्हटलं, ‘मार दोन-तीन कोनातून. संध्याकाळी पान लावेपर्यंत येईलच पाऊस. नाही आला तर हाच वापरू.’  त्याला घेऊन कार्यालयाच्या गच्चीवर गेलो. दोन-चार वेगवेगळ्या कोनातून टिपलं ढगांना. तेच हे…आशा लावून निराश करणारे!




गुरुवार, २ जून, २०१६

नको आता आढेवेढे, ताई तुम्ही याच गडे!

(सौजन्य - 'इंडिया टुडे' / creativegaga.artstation.com)
---------------------------------------------

आदरणीय, प्रातःस्मरणीय आणि नित्य आमंत्रणीय 
प्रियांका नेहरू-गांधी-वद्रा, अर्थात ताईंच्या सेवेशी, 

काँग्रेसचा चार आण्यांचाच सभासद असलेल्या तळागाळातल्या कार्यकर्त्याचा साष्टांग दंडवत! (आता देशाच्या राजकारणात काँग्रेसचा वाटा चार आण्यांचाच राहिलेला नाही, हे वेगळं!) बरं वाटतं म्हणून दंडवत लिहिलं. प्रसंग आलाय बाका, काय करील दिग्विजयकाका! लोटांगण घातलं तरी कमीच, अशी स्थिती सांप्रत काळी ओढवलीय. म्हणजे आपणच ओढवून घेतलीय.

खरं तर तुम्हाला दीदीच म्हणणार होतो. पण मग तुम्हाला आम्ही मां, माटी, मानुषवाले वाटायचो. वंगभंगऐवजी भ्रुकुटीभंग व्हायचा! अम्माम्हणावंही वाटलं मनात. लगेच लक्षात आलं की, तो (अखिल भारतीय अण्णा) द्राविडी प्राणायम होईल. आणि सलमान खुर्शीदसाहेबांना म्याडम म्हणजे राष्ट्रमाताअसं जाहीर करून टाकलंय ना! तो सोनियाचा दिनुजंता अजून विसरलेली नाही. (म्हणून तर हे दिवस आले नशिबी.)

पत्रास कारण... एक काय लय आहेत. (आपल्या पार्टीला लयच सापडत नाही, हे त्यातलं महत्त्वाचं.) कम्युनिस्ट रशियन अस्वलाच्या अंगावरच्या केसाएवढी! अगदी आजचीच कमीत कमी पाच. आसामपासून केरळपर्यंत. मधल्या पुद्दुचेरीला वळसा घालून.

फटाक्यांचा दणकाय, धुराचा खकाणाय. मूँह मीठा’ करण्यासाठी खोकी भरभरून लाडू आणताहेत मंडळी. (नंतर थेट खोकीच दिली जातात.) हार-गुच्छ दिले जाताहेत. गुलाल उधळला जातोय. टीव्ही.च्या पडद्यावर हे सगळं लाइव्हबघताना मेल्याहून मेल्यासारखं झालंय, ताई.

यातलं काहीच आमच्या नशिबात नाही. यून यून येनार कोन, कांग्रेसशिवाय हायेच कोन!असं ओरडत फटाक्याच्या धुरात नाचता येत नाही. तो अश्रुधूर वाटतोय. अख्खा लाडू सोडाच; बुंदीची कळी पण नाही वाट्याला. हाराचं जाऊ द्या, फूलही नको; त्याची पाकळी? ती पण सध्या येत नाही वाट्याला. गुलाल विसरलो, कपाळी बुक्का आलाय!

11, अशोक रोडवर लखलखाट. आणि ‘24, अकबर रोडवर शुकशुकाट. पूर्ण अंधार. तिकडं दिवाळी आणि इकडं होळी? ‘ऐ दुनिया बता हमने बिगाड़ा है क्या तेरा, घर-घर में दिवाली है, मेरे घर में अंधेरा...

...ही सगळी परिस्थिती बदललीच पाहिजे, ताई. आज-आत्ता-ताबडतोब!

डिग्गीराजा काल हैदराबादी बिर्याणी खाऊन काय बोलले वाचलं ना तुम्ही आज पेपरात? तुम्हाला सक्रिय राजकारणात यायचं आवतण दिलंय त्यांनी. आमच्यासारख्या लाखोंच्या पोटातलं आणलं त्यांनी ओठांवर.

पीकेनी तर तुम्हाला मागंच सल्ला दिलाय. पी. के. कोण? अहो, प्रशांतकुमार. दोन वर्षांपूर्वी 36 इंची छाती 56 इंचांपर्यंत फुगविण्यात त्यांचाच हवेचा वाटा होता. राहुलभय्यांनी दोन राज्यांची जबाबदारी त्यांच्यावरच टाकलीय. मैं तो आया हूँ यूपी, पंजाब लुटने...असं गाणंय त्यांचं. त्यांनी सांगितलंय, अमेठी-रायबरेली सोडा आणि देशभर फिरा. प्रचार करा.

ताई, तुम्ही अगदी अम्मांसारख्या दिसता. अम्माम्हणजे ओरिजनल. इंदिरा नेहरू-गांधी. त्यांच्यासारखंच तुमचं धारदार नाक. बॉबकट केलेल्या केसांच्या बटा तशाच. थोड्या त्या आँधीमधल्या सुचित्रा सेनसारख्या पांढऱ्या करून घ्या. जे नाही ते आहे, असं दाखवणं म्हणजे राजकारण हो. 

ताई, तुम्ही याच. ‘24, अकबर रोडवर रोषणाई करण्यासाठी. ‘7, रेसकोर्स रोडकडे आगेकूच करण्यासाठी. 

ताई, संकोच सोडा आता. रॉबर्टभौजींना सांगा आणि राजकारणाच्या जनपथावर या! 

पक्ष जिंकला तर तुमच्यामुळे आणि हरला तर आमच्यामुळे. वर्षानुवर्षाचं सूत्र ठरलेलंय हे. चिंता ती सोडी, राजकारणी घ्यावी उडी. 

उशीर तर खूप झालाय. पण तरीही हरकत नाही. काँग्रेसयुक्त राजकारण चालू ठेवायचं असेल, तर तुम्हीच पाहिजे. काँग्रेसधर्म राहिला काही तो तुम्हां कारणे।अशी नोंद नव्या इतिहासात होऊन जाऊ द्या! म्हणून तरी तुम्ही या.

गांधी-नेहरू घराण्याच्या
सज्ज सदा स्वागता
असाच एक कार्यकर्ता! 
.... 
(पूर्वप्रसिद्धी - दैनिक सकाळ, 20 मे 2016) 

चंदनापुरीत भेटलेला अजिंक्य रहाणे

  देखणा फटका... ही बॅट आता निवृत्त झाली! (छायाचित्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सौजन्याने.) .......................................... ...