शुक्रवार, २६ मे, २०१७

चौकट छापणाऱ्याची न छापली जाणारी चौकट

प्रामाणिकपणा’ म्हणजे सद्गुण किंवा संस्कार मानतो आपण.
तो हल्ली सहसा वृत्तपत्रांमधल्या चौकटीत पाहायला मिळतो, असं म्हणतात.
त्या सजविलेल्या चौकटीत छापल्या जाणाऱ्या बातमीमध्ये
`प्रामाणिकपणा` या शब्दामागे `दुर्मिळ` असं विशेषणही बहुदा लावलं जातं.
पण या गुणाचं मोल पत्रकारांनाही आता तेवढं वाटत नसावं,
असं `प्रामाणिकपणे`च वाटतं. कारण अशा काही `दुर्मिळ` बातम्या
चौकटीविनाही थोडक्यात छापल्या जातात. लक्षात येतील, न येतील अशा.
`न जाणो, यापासून कोणी प्रेरणा वगैरे घेतली, तर काय!
मग उद्या कदाचीत अशाच बातम्या आपल्या अंकातील जागा भरून टाकतील,`
अशी भीती छापेवाल्यांना वाटतही असेल बुवा.

क्वचित कधी तरी दिसणाऱ्या चौकटींमध्ये आढळणारी माणसं
साधी, सरळ, दुबळी, दबलेलीच असतात.
त्यांना कोणी तरी वृत्तपत्रांच्या कार्यालयात घेऊन जातं
किंवा ज्यांना त्यांच्या प्रामाणिकपणाचं फळ मिळालेलं असतं,
ती मंडळी ही बातमी पोहोचवितात.
एखादा फोटो, सिंगल कॉलमी चौकट
आणि दुसऱ्या दिवशी दहा-वीस कौतुकाच्या नजरा!

या चौकटीपर्यंत न पोहोचणारी, पोहोचता न येणारी,
त्या चौकटीत शिरकाव न करता येणारी असंख्य माणसंही
या जगात असतीलच की. तीही `दुर्मिळ` असं विशेषण लावता येण्यासारखीच.
त्यातील काहींना चौकटीपर्यंत पोहोचण्याचा राजमार्ग माहीतही असतो;
पण त्यांना स्वतःची जाहिरात करणं टाळायचं असतं.
`आपण केलं ते फार जगावेगळं केलं नाही;
माणसानं वागलं पाहिजे तसंच तर आपण वागलो,`
असंही त्यांना वाटत असेल बुवा.

असाच हा एक किस्सा.
चौकटीत छापता येणाऱ्या, पण छापल्या न गेलेल्या माणसाचा.
गोष्ट गेल्या सोमवारची आहे. दोन-तीन मित्रांसह जेवण करून,
त्यांना आपल्या गाडीतून इच्छितस्थळी सोडवून (पोचवून नव्हे हो!)
हा घरी परतत होता. वेळ रात्री बारा-सव्वाबाराची असेल.
गाडीतून जाताना रस्त्यावर पडलेलं एक पाकीट त्याच्या नजरेस आलं.
गाडी व्यवस्थित बाजूला घेऊन बंद करून तो खाली उतरला.
पाकीट बऱ्यापैकी लठ्ठ दिसत होतं.
स्वाभाविक कुतुहलानं ते त्यानं उचललं.
गाडीत बसून आतला दिवा लावून त्यानं ते उघडून पाहिलं.
हेही स्वाभाविक मनुष्यसुलभ कुतुहल.

पाकिटात पाचशे-पाचशेच्या तीन नोटा होत्या;
पन्नासच्या एक-दोन आणि काही दहा रुपयाच्या.
दीड ते पावणेदोन हजार रुपये असतील. बाकी बरीचशी कागदपत्रं.

त्याच्या लक्षात आलं की, पाकीट काही फार धड अवस्थेत नाही.
बऱ्यापैकी वापरलेलं, आतले कप्पे फाटलेले.
म्हणजे या पाकिटाचा मालक कोणी सर्वसामान्य, गरीब दिसतो.
पाकीट मालकापर्यंत पोहोचलंच पाहिजे,
असं त्याला तेव्हाच अगदी आतून वाटलं.
पण पोहोचवायचं कसं?

पाकिटातले सगळे कागद त्यानं काढले. त्यातला एक होता वेतनचिठ्ठीचा.
वर्ष-दीड वर्षापूर्वीची वेतनचिठ्ठी. पुण्यातल्या एका उपाहारगृहाची.
मूळ पगार सहा हजार, भत्ते-बित्ते मिळून एकूण 12 हजार
आणि त्यातून कपात चार-साडेचार हजार रुपयांची!
म्हणजे पाकिटाचा मालक सर्वसाधारण परिस्थितीतला आहे, हे स्पष्टच झालं.
वेतनचिठ्ठीवर काही कुणाचा फोन नंबर असत नाही.

इतर कागद पाहिले. त्यात वाहन चालविण्याचा परवाना होता.
त्यावरून त्याला जन्मसाल कळलं - 1976. म्हणजे गृहस्थ चाळिशीच्या घरातला.
त्यानं विचार केला, या दीड हजार रुपयांत
त्याच्या घरचं दोन आठवड्यांचं रेशन, भाजीपाला येत असेल.
पाकीट पोहोचलं पाहिजेच पाहिजे.

अजून कागद चाळता चाळता
त्याला एक `व्हिजिटिंग कार्ड` दिसलं. वेतनचिठ्ठी ज्या हॉटेलाची होती,
त्या हॉटेलातल्या कुणाचं तरी.
त्यावर फोन नंबरही होता.
चला, एक मार्ग तर सापडला!

रात्र बऱ्यापैकी झालेली होती; तरीही त्यानं धाडस करून तो नंबर फिरविला.
तो त्या पुण्यातल्या हॉटेलातला शेफ होता.
या माणसानं त्याला विचारलं, `की बुवा, अशा अशा नावाच्या माणसाला
तुम्ही ओळखता का? त्याचं पाकीट मला सापडलंय.`

`ओळखतो की. बरोबर काम करत होतो आम्ही.
पण त्यानं दीडएक वर्षापूर्वीच नोकरी सोडली इथली
आणि आता तो नगरला असतो,` त्या शेफनं उत्तर दिलं.

आली का अडचण!
तुमच्याकडं त्याचा काही नंबर वगैरे आहे का?`,
यानं शेवटची आशा म्हणून विचारलं. उत्तर होकारार्थी आलं.
पण तो माणूस म्हणाला, `तुम्ही नका फोन करू.
मीच त्याला कळवतो. तो तुमच्याशी संपर्क साधील.`

चला; पाकिटाच्या मालकापर्यंत पोहोचण्याचा रस्ता सापडला
म्हणून हा गडी घरी गेला.
रात्री तासभर वाट पाहूनही कुणाचा फोन आला नाही.

हा गृहस्थ सकाळी झोपेत असतानाच
साडेसात-आठ वाजता पाकिटाच्या मालकाचा फोन आला.
कोण, कुठं, काय करतो, कुठं काम करतो वगैरे चौकशी झाली.
पाकिटातल्या ऐवजाची पडताळणी झाली.
हे दोघं राहतात त्या ठिकाणांमधलं अंतर सहा-सात किलोमीटरचं.
पाकिटाच्या मालकाला सकाळी 11 वाजता कामावर जायचं होतं.
मग हा आपला म्हणाला, `मीच येतो तिकडे.`

गाडी काढून दुपारी बाराच्या सुमारास आपला माणूस
त्या माणसाच्या हॉटेलात पोहोचला.
सात-आठ किलोमीटरचं अंतर कापून आणि आपल्या मोटारीचं पेट्रोल जाळून.
काउंटरवरच त्याचं जोरदार स्वागत झालं.
तिथल्या माणसानं त्याला थेट नाव घेऊन `ते तुम्हीच ना?` असं विचारलं.
हा एकद चकित!
मग तो काउंटरवाला म्हणाला, `त्यानं सांगून ठेवलंय,
माझ्याकडं या या नावाचा माणूस येणार आहे म्हणून.
तुमचा चेहराच सांगतो की,
तुम्ही इथं कुणाला तरी काही तरी द्यायला आलात. म्हणून मी ओळखलं.`

पाकिटाच्या मालकाला भटारखान्यातून बोलावण्यात आलं.
प्रथेप्रमाणं यानं सांगितलं, पाकीट पाहून घे, पैसे मोजून घे.
प्रथेप्रमाणंच तसं काही करण्यास नकार देत तो म्हणाला,
`रस्त्यात सापडलेल्या पाकिटाच्या मालकाचा शोध घेत
जो इथपर्यंत स्वतः येतो, त्याच्यावर हे अविश्वास दाखवण्यासारखंच आहे.`

पाकीट कसं पडलं?
याच्या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला,
`रात्रपाळी संपवून सायकलवरून घरी चाललो होतो.
त्या तिथं कुत्री फार मागं लागतात. म्हणून उभा राहून जोरात पॅडल मारत
सायकल हाणली. त्या गडबडीत पाकीट पडलं.`

... एरवी अशी काही बातमी आली की,
त्यात 50 शंका काढणाऱ्या आणि त्याचं समाधान झालं की,
ती सजवून लावणारा हा माणूस.
माध्यमातला माणूस.
त्याच्या या माणुसकीची गोष्ट कोण छापणार?

`अत्त दीप भव: ...`
तोच त्याचा दिवा बनला आहे.
तोच त्याचा `दीपक` आहे.

`त्या पाकिटात पाचशेच्या नोटांचं बंडल असतं,
तर मी मालकाचा शोध घेतला असता का,`
अशी भीती बोलून दाखविणाऱ्या या माणसाला
त्या छापील अक्षरांच्या, अर्ध्या पॉइंटाच्या रुळाच्या
बंदिस्त चौकटीत कशी जागा मिळणार?

माध्यमातल्या माणसाची ही चौकटीतल्या गुणाची
गोष्ट सांगण्यासाठी म्हणून तर मुद्दाम माध्यम निवडलं आहे,
ते सगळ्या चौकटी ध्वस्त करणारं,
चौकटीबाहेरचंच!

४ टिप्पण्या:

  1. माणसातील चांगुलपणाची किती साधी पण मनाला भावणारी चौकटीतील गोष्ट !

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर.! दुसऱ्यांच्या प्रामाणिकपणाच्या गोष्टी छापणाऱ्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणाच्या गोष्टीही प्रसिद्ध व्हायलाच हव्यात.. पण बरेचदा त्या 'व्यावसायिक' चौकटीत बसत नाहीत, ही खरंचंच खेदाची बाब आहे. आपण या माध्यमातून का होईना तिला जगासमोर आणले, हेही नसे थोडके. दिपकरावांना सलाम !

    उत्तर द्याहटवा
  3. चौकटीतील प्रामाणिकपणा वाचून भरून पावलं

    उत्तर द्याहटवा
  4. चौकटीत असलेल्यानी दिलेला चौकटीबाहेरचा अनुभव !
    आनंद मिळाला हे वाचून. धन्यवाद 'दीपक'ना आणि तुम्हालाही सतीशजी.

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...