रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

‘अदालती’चा किलकिला झालेला पडदा

चित्रीकरण खुशवंतसिंग ह्यांचं. पण आले लालूप्रसाद. काय करणार? अटलजी ह्यांनी ‘माझे मित्र व्हा’ असं सुचवलं. दिवसभरात सात सभा घेऊन आलेल्या नरेंद्र मोदींचा आवाज बसलेला. कसं होणार चित्रीकरण? सलमान खाननं जोर काढण्याचं आव्हान दिलं. ‘सुनावणी’ होण्याच्या आधीपासूनच दिलीपकुमार निकालपत्र डिक्टेट करीत होते...
...‘आप की अदालत’चा पडदा किलकिला करीत
रजत शर्मा ह्यांनी ऐकवलेले अनुभव.


‘शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये’, असं थोरामोठ्यांनी सांगून ठेवलं आहे. मोठ्यांचं ऐकणं प्रत्येक वेळी जमतंच असं नाही. काहींना नाइलाजानं त्या पायऱ्या झिजवाव्या लागतात.

हौस म्हणूनही कोर्टाची पायरी चढणारे असतात. अनावर कुतुहलापोटी - साक्षी ऐकण्यासाठी, उलटतपासणीत होणारी फजिती पाहण्यासाठी आणि युक्तिवाद अभ्यासण्यासाठीही!

न्यायालये आणि तिथल्या एकूण प्रक्रियेबद्दल सर्वसामान्यांमध्ये असलेलं कुतूहल ओळखूनच नाटक-सिनेमांमध्ये आजवर हजारो ‘कोर्ट ड्रामे’ रंगविण्यात आले आहेत. चित्रपटांतील ‘कोर्ट सीन’ वास्तवापासून फाssर दूर असल्याची ओरड नेहमी होते. त्यानं काही फरक पडलेला नाही.

तीन दशकांपासूनचं न्यायालयीन नाट्य
असंच एक न्यायालयीन नाट्य तीन दशकांपासून भारतीय प्रेक्षकांना खेचत आलेलं आहे. प्रदीर्घ काळ लोकप्रिय असलेल्या ह्या कार्यक्रमाचे आजवर अकराशेहून अधिक भाग प्रसारित झाले आहेत. न्यायालयाचा निकाल काय असेल, हे बहुदा माहीत असूनही ‘वकील-आरोपी’ ह्यांची ‘चकमक’ पाहण्याची भारतीय प्रेक्षकांची उत्कंठा कायम आहे. हा कार्यक्रम म्हणजे ‘आप की अदालत’ आणि त्याचे कायमचे नायक रजत शर्मा.

पत्रकार, संपादक आणि एका वृत्तवाहिनीचा - मीडिया हाऊसचा मालक, असा रजत शर्मा ह्यांचा प्रवास आहे. आणीबाणीमुळे अठराव्या वर्षीच ११ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागलेल्या ह्या तरुणाने मग लगेच दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या (DUSU) निवडणुकीत सरचिटणीस म्हणून बाजी मारली.

पहिल्याच निवडणुकीतील यशामुळे राजकारण खुणावत असताना रजत शर्मा ह्यांनी क्षेत्र निवडलं पत्रकारितेचं. ‘ऑनलुकर’ पाक्षिकातील प्रशिक्षणार्थी वार्ताहर म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि वयाच्या तिशीतच ते ‘संडे ऑब्झर्व्हर’चे संपादक बनले. विनोद मेहता ह्यांची खुर्ची त्यांना मिळाली.

‘द डेली’चे संपादक असतानाच रजत शर्मा ह्यांची सुभाषचंद्र (‘झी नेटवर्क’) ह्यांच्याशी ‘अदालत’बद्दल प्राथमिक चर्चा झाली. चर्चा झाली आणि पहिला कार्यक्रम टीव्ही.च्या पडद्यावर आला तो १९९३च्या मार्चमध्ये. ‘आप की अदालत’चा प्रवास तेव्हापासून चालूच आहे.

रजत शर्मा ह्यांच्या प्रवासाची माहिती मिळते त्यांच्या संकेतस्थळावर. तिथं तो प्रवास थांबतो ते २०१४ वर्षावर. आजवरचे सर्वाधिक प्रेक्षक लाभलेला कार्यक्रम त्या वर्षी झाला. ‘अदालत’मध्ये हजर होते नरेंद्र मोदी!

संकेतस्थळावर प्रवासाने विश्रांती घेतली असली, तरी रजत शर्मा ह्यांची वाटचाल चालूच आहे. ती कशी झाली, त्यातून काय मिळालं हे सगळं त्यांच्या तोंडूनच ऐकण्याची संधी नगरमध्ये मिळाली ती पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेच्या निमित्तानं. पावसाळी हवेमुळं त्यांना प्रत्यक्ष येता आलं नाही. मग उपयोगी पडलं ते तंत्रज्ञान. व्हिडिओ मीटिंगच्या माध्यमातून दीड तास त्यांनी ‘अदालत’च्या वाटचालीतील निवडक टप्प्यांचा प्रवास अगदी सहजपणे घडवून आणला.

किती कष्ट, किती अडचणी!
(छोट्या) पडद्यावर जे सुंदर दिसतं, अप्रतिम भासतं (रजत शर्मा ह्यांचेच शब्द वापरून सांगायचं तर ‘सेक्सी लगता, दिखता है।’), त्यामागे किती कष्ट असतात, हे त्यांनी सांगितलं. किती नि कशा अडचणी येतात आणि त्यावर कशी मात केली जाते, हे त्यांनी सांगितलं. सतत प्रयत्न केले जातात, म्हणून दिसतं ते सुंदर वाटतं, असं ते म्हणाले.

‘आप की अदालत’च्या पहिल्या भागात होते खुशवंतसिंग. नामवंत लेखक-पत्रकार. त्याचं चित्रीकरण दुपारी बाराच्या सुमारास होणार होतं. त्याच संध्याकाळी चित्रीकरण होतं बिहारचे तेव्हाचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव ह्यांचं. त्यांचा सकाळीच फोन. ‘भई, शाम को हम पटना निकल रहे है। अभी आएंगे...’

स्टुडिओत तर काहीच तयारी नाही. कसं करणार चित्रीकरण? ही अडचण सांगायला रजत शर्मा ह्यांनी दहाच्या सुमारास संपर्क साधला, तर लालूप्रसाद निघाले होते. ‘लालूप्रसादss हाजीर होss’ असा पुकारा होण्यापूर्वीच ते ‘अदालत’मध्ये येऊन धडकले होते.

बिहारी बंधूंना लालूंचं आवतण
तयारीला वेळ लागणारच होता. म्हणून मग वेळ काढण्यासाठी लालूप्रसाद ह्यांना घेऊन रजत शर्मा इमारतीच्या गच्चीवर गेले. समोरच एका मोठ्या इमारतीचं बांधकाम चालू होतं. काम करणारे मजूर बिहारी. लालूप्रसाद खूश. त्यांनी खुलं आमंत्रण दिलं - या रे कार्यक्रमाला, बंधूंनो!

रजत शर्मा हैराण. प्रेक्षक म्हणून त्यांनी शाळा-कॉलेजातले नेटके विद्यार्थी बोलावले होते. ते टापटीप, टाय वगैरे लावून. आणि हे प्रेक्षक त्यांच्या अगदी विरुद्ध. पण ‘पाहुण्या’ ‘आरोपी’ला विरोध तरी कसा करणार?

पुढची अडचण होती न्यायाधीशाची. खुशवंतसिंग ह्यांच्यावरील ‘सुनावणी’साठी नमिता गोखले ह्यांची नियुक्ती केली होती. लालूप्रसादांसाठी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर. ते आलेलेच नव्हते. कसे येणार? त्यांना संध्याकाळची वेळ दिली होती. फोन केला तरी ते वेळेवर येणं शक्य नव्हतं.

लालूंची घाई चालू. त्यामुळे नमिता गोखले ह्यांना विनंती केली, तर त्या म्हणाल्या, ‘अभ्यास खुशवंतसिंगांचा आणि पेपर लालूप्रसादांचा. हे कसं काय चालणार?’ थोडं समजावलं नि ‘सुनावणी’ घेण्यासाठी त्या कशाबशा राजी झाल्या.

न्यायाधीश म्हणाल्या - ‘ओव्हररुल्ड!’
पुढची अडचण तयारच होती. पहिला प्रश्न लालूप्रसाद ह्यांना विचारला आणि कुलदीप नय्यर हजर! तोपर्यंत नमिता गोखले ‘न्यायाधीशा’च्या भूमिकेत शिरलेल्या. खुर्ची नय्यर ह्यांना देण्याची रजत शर्मा ह्यांच्या मागणीवर त्यांनी ठामपणे सांगितलं - ‘ओव्हररुल्ड!’ हे खरं न्यायालय नाही आणि तुम्ही न्यायमूर्ती वा न्यायाधीश नाहीत, हे त्यांना सांगता सांगता रजत शर्मा ह्यांची पुरेवाट झाली.

पहिल्याच चित्रीकरणात एवढं नाट्य झालं. पहिला कार्यक्रम प्रसारित झाला तो मात्र खुशवंतसिंग ह्यांचाच. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. रजत शर्मा म्हणाले, ‘‘पहिल्याच शोमुळे माझी ओळख बदलली - एक अनोळखी इसम ते सर्वपरिचित चेहरा!’’

‘त्या काळातील सर्वाधिक सन्माननीय नेते’, ‘त्या शतकातला सर्वश्रेष्ठ वक्ता’ अशा विशेषणांची पखरण करीत श्री. रजत शर्मा ह्यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या कार्यक्रमाची फार सविस्तर माहिती दिली. त्यांचे आशीर्वाद मिळाले, हे सांगताना त्यांचा कृतकृत्य भाव सहज जाणवत होता.

श्री. वाजपेयी ‘आप की अदालत’मध्ये येऊन गेले आणि काहीच काळाने १३ दिवसांसाठी पंतप्रधान बनले. पुढे एका कार्यक्रमात रजत शर्मा दिसताच त्यांनी बोलावून घेतलं. सांगितलं, ‘मला तुमच्याशी निवांत बोलायचं आहे. वेळ ठरवून घरीच या.’

विशाल मनाचा नेता
घरी निवांत भेट. श्री. वाजपेयी ह्यांना तीन गोष्टी सांगायच्या होत्या. ‘दिल का बोझ कुछ हल्का करेंगे’ अशी सुरुवात करीत ते म्हणाले, ‘तुम्ही मला मित्र म्हणून हवे आहात.’ पंतप्रधानपदाच्या (अल्प) काळात भेटलो नाही, त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. हे सांगून श्री. रजत शर्मा म्हणाले, ‘केवढ्या विशाल मनाचा नेता! त्यांची महता, औदार्य ह्याचं वर्णनच करता येणार नाही.’


सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कार्यक्रमात बोलावल्याबद्दल श्री. वाजपेयी ह्यांनी रजत शर्मा ह्यांचे आभार मानले. ते म्हणाले, ‘मी पंतप्रधान बनण्याची प्रक्रिया त्या कार्यक्रमापासून सुरू झाली. लोकांच्या डोळ्यांत तेव्हा मला परिवर्तन पाहायला मिळालं!’ 

ह्याच्याहून वेगळी पावती काय पाहिजे, असं श्री. रजत शर्मा विचारतात. अटलजींनी आशीर्वाद दिला. आशीर्वादाने हिमंत वाढते, कामाबद्दल अधिक उत्साह वाटू लागतो आणि शक्ती लाभते.

कार्यक्रम लोकप्रिय होऊ लागला म्हणून सगळं काही सुरळीत चालतं असं नाही. अडचणी येतच राहतात. त्यावर उपाय शोधावे लागतात. कारण ‘शो मस्ट गो ऑन’ हे तत्त्व पाळायचं असतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या कार्यक्रमाबद्दल श्री. रजत शर्मा ह्यांनी सांगितलेला किस्सा अफाट सदरात मोडणाराच आहे. त्यासाठी खूप प्रयत्न केले. अखेर एकदा अहमदाबादमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. प्रचाराची रणधुमाळीतील एक दिवस त्यांनी दिला.

भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलेल्या श्री. मोदी ह्यांचं वेळापत्रक अतिशय व्यग्र होतं. दिवसभरात सात जाहीर सभा घेऊन ते मुक्कामी अहमदाबाद येथे जात.

आवाज बसला; बोलणार कसं?

ठरलेल्या दिवशी संध्याकाळी श्री. मोदी कार्यक्रमासाठी श्री. रजत शर्मा ह्यांच्याकडे पोहोचले. सात सभा संपवून. ख्यालीखुशालीच्या गप्पा चाललेल्या असतानाच लक्षात आलं की, श्री. मोदी ह्यांचा घसा बसलेला आहे. त्यांना बोलताच येत नाही! कार्यक्रम कसा होणार?

कार्यक्रमाच्या दिग्दर्शक आणि रजत शर्मा ह्यांची पत्नी रितू ह्यांनी मग घसा मोकळा करायचे काही उपाय सुचविले. आजीबाईच्या बटव्यातले. श्री. मोदी म्हणाले, ‘‘भाभीजी, हे सगळं रोज करतो. काही उपयोग होत नाही. सकाळी कुठे घसा मोकळा होतो.’’

चित्रीकरणाची सगळी तयारी झालेली. प्रेक्षक आलेले. श्री. रजत शर्मा ह्यांनी उपाय सुचविला - तुम्ही रात्री इथेच मुक्काम करा. सकाळी लवकर चित्रीकरण करू. तुम्ही म्हणाल तेव्हा; अगदी सकाळी सहा वाजता.

त्यातही अडचण होती. श्री. मोदी म्हणाले की, माझ्या विमानासाठी इथे दिल्लीत जागाच नाही. उद्या मला दक्षिण भारतात सभांसाठी जायचं आहे.

कधी नव्हे ती वेळ मिळालेली आणि ही अडचण! हताश, निराश झालेले श्री. रजत शर्मा भावी पंतप्रधानांना म्हणाले, ‘‘प्रेक्षक खूप वेळेपासून ताटकळत बसले आहेत. तुम्ही इथे आला आहात, एवढं तरी त्यांना दिसू द्या. तुमचा आवाज ऐकल्यावर अडचण काय आहे, ते लक्षात येईल त्यांच्या.’’

स्टुडिओमध्ये श्री. मोदी ह्यांनी पाऊल टाकताच ‘मोदी, मोदी’ गजर सुरू झाला. वैतागलेल्या रजत शर्मा ह्यांनी सहायकाला झापलं - ‘भा. ज. प.च्या कार्यकर्त्यांना अजिबात बोलवायचं नाही, म्हणून बजावलं होतं ना तुला!’ त्याचं उत्तर होतं, ‘हे सगळं आम पब्लिक आहे. त्यात कॅनडाहून आलेला माझा काकाही आहे.’

ते वातावरण पुन्हा एकदा अनुभवत श्री. रजत शर्मा म्हणाले, ‘‘एवढा उशीर होऊनही प्रेक्षक उत्साही दिसत होते. वातावरण भावूक होतं. मी तरी ते कधी पाहिलं नव्हतं. मोदींची लोकप्रियता मला तेव्हा जाणवली.’’

लव्ह यू आणि उमर लग जाए...
मोदींना पाहून उत्साहित झालेली एक तरुणी म्हणाली, ‘मोदीजी, आय लव्ह यू.’ ऐंशीपार गेलेल्या आजीबाई म्हणाल्या, ‘बेटा, मेरी उमर तुम्हें लग जाए...’

हा प्रतिसाद पाहून श्री. मोदीही भारावले. काय झालं कुणास ठाऊक! श्री. रजत शर्मा सांगतात, देवाची साथ आम्हाला होती. नशीब हसलं होतं. श्री. मोदी ह्यांचा घसा मोकळा झाला. मध्यरात्री बारा ते दीड कार्यक्रमाचं चित्रीकरण झालं.

ह्याच कार्यक्रमात श्री. रजत शर्मा ह्यांनी श्री. नरेंद्र मोदी ह्यांना नवी घोषणा ऐकविली -
राहुल खाए चॉकलेटबार
अब की बार मोदी सरकार!

हाच कार्यक्रम लोकप्रियतेत, सर्वाधिक विक्रमी प्रेक्षकसंख्या लाभल्याच्या यादीत आजही अव्वल क्रमांकावर असलेला.

सलमान खान आणि रजत शर्मा. ह्यांची केमिस्ट्री काही जुळत नव्हती. ती जुळणारच नाही, असं त्यांना आतून वाटत होतं. कार्यक्रम कसा मैत्रीपूर्ण वातावरणात व्हावा. आम्ही दोघंही एकमेकांवर गुरगुरत राहिलो तर...ही भीती मनात.
ज्येष्ठ अभिनेता शत्रुघ्न सिन्हा ह्यांनी जबाबदारी घेतली. त्यांच्या कन्येचं सोनाक्षी सिन्हाचं पदार्पण होतं. सलमानला आणण्याची, तो व्यवस्थित बोलेल ह्याची काळजी घेण्याची जबाबदारी शत्रूनं स्वीकारली. ‘जज’ची भूमिकाही त्यानं स्वीकारली.

जोर काढण्याचं आव्हान
त्या चित्रीकरणाची आठवण सांगताना श्री. रजत शर्मा म्हणाले, ‘‘सलमाननं सगळ्या प्रश्नांना - काळविटाची हत्या, गाडीनं पादचाऱ्याला चिरडणं, ऐश्वर्या राय नि करीना कपूर - व्यवस्थित उत्तरं दिली. डोळ्यांत डोळे घालून तो बोलला. मध्येच त्यानं मला थांबवलं. जोर काढू म्हणाला. पंधरा-अठरा जोरनंतरही मी दमलो नाही पाहिल्यावर त्यानं पुन्हा कार्यक्रम चालू केला!’’

हा कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतरही सलमानला भेटणं रजत शर्मा टाळत होते. हा उगीच सरकला तर काय, ही भीती! शेवटी एका रिसेप्शनमध्ये ते आमने-सामने आलेच. पाच-दहा मिनिटं हुलकावणी देऊनही सलमाननं त्यांना गाठलंच. कानात म्हणाला, ‘सर... थँक यू! पब्लिकच्या मनात माझ्याबद्दल असलेले गैरसमज दूर व्हायला तुमच्या कार्यक्रमामुळे मदत झाली.’ आता ते चांगले मित्र आहेत!

न झालेल्या मुलाखती आणि हजर न झालेले ‘आरोपी’? खूप आहेत. त्यातलेच एक दिलीपकुमार. त्यांनी चार तासांत खूप मोठा जीवनप्रवास ऐकवला. मग गाडी आली ‘जज कोण?’ ह्या विषयावर. ‘फालतू’, ‘बकवास’ अशी विशेषणं वापरत दिलीपकुमार ह्यांनी चार-पाच नावांवर थेट फुली मारली. जावेद अख्तर हे नाव अखेर त्यांना पसंत पडलं.

सुनावणीआधीच निकालपत्र!
त्यानंतर काही दिवसांनी जावेद अख्तर ह्यांनी रजत शर्मांना फोन केला. ‘बाबा रे, कशात आणि कशाला अडकवलं आहेस तू मला?’
रजत शर्मा उत्साहात म्हणाले, ‘म्हणजे काय! दिलीपसाबच्या कार्यक्रमात न्यायाधीश बनवतोय तुला.’
त्याच हताश सुरात जावेद अख्तर म्हणाले, ‘ते खरंय रे. पण दिलीपसाब पाच दिवसांपासून मला रोज पहाटेच बोलावून घेतात आणि ‘निकालपत्र’ डिक्टेट करतात!’

दिलीपकुमार हजर झालेच नाहीत. काही अडचणी आल्या. हा कार्यक्रम करता न आल्याची खंत श्री. रजत शर्मा ह्यांना आहे. (आणि कुणी सांगावं, इकडे जावेद अख्तर ह्यांनी सुटकेचा निःश्वास टाकलेला असावा.)

अनुभवकथनाच्या शेवटी श्री. रजत शर्मा ह्यांनी पत्रकार ह्या नात्यानं आपली निरीक्षणं काय आहेत, ते सांगितलं. श्रोत्यांच्या मोजक्या प्रश्नांना त्यांनी उत्तरंही दिली.

‘मोदी जैसा कोई नही’
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्याबद्दल भरभरून बोलताना श्री. रजत शर्मा म्हणाले, ‘‘मी ४० वर्षांच्या पत्रकारितेत अनेक नेते पाहिले. राजकारणात येण्यामागे बहुतेकांचा स्वार्थ असतो - पैसा कमावणं आणि पद मिळवणं. श्री. मोदी त्यातले नाहीत. कदापि नाहीत! राजकारणाची पारंपरिक पद्धत त्यांनी बदलून टाकली. राजकारण देशसेवेसाठी करायचं असतं, हे त्यांनी दाखवून दिलं.’’

श्री. मोदी काय करतात, ह्याचा अंदाजच विरोधकांना येत नाही. त्यांच्या साऱ्या अटकळी साफ खोट्या ठऱतात, हे श्री. शर्मा ह्यांनी संसदेच्या नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशनाचं उदाहरण देऊन सांगितलं.

विरोधी पक्षांची इं.डि.या. आघाडी तयार झाली हे चांगलंच. कारण सशक्त विरोधी पक्ष हवाच. पण त्यांचा कार्यक्रम ठरलेला नाही. प्रस्थापितविरोधी लाट दहा वर्षांनंतरही दिसत नाही, असं श्री. शर्मा ह्यांचं निरीक्षण आहे.

संघाचं काम क्रांतिकारक
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम एक नवी क्रांती घडवणारं आहे,’ असं मत श्री. रजत शर्मा ह्यांनी व्यक्त केलं. त्याच्या पुष्ट्यर्थ सरसंघचालक मोहन भागवत ह्यांच्या अलीकडच्या विविध वक्तव्यांचा दाखला  दिला. ‘सबको साथ लेकर चलना है’ हा विचार संघाला जगभरात नेईल. संघाला जागतिक परिप्रेक्ष्यात भूमिका घेण्याची, स्थान मिळविण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली.

श्री. शर्मा भरभरून बोलले. मनमोकळेपणाने बोलले. एका लोकप्रिय कार्यक्रमाच्या निर्मितीमागं काय काय कथा आणि व्यथा असतात, हे त्यांनी उलगडून दाखवलं.

....................................

#आप_की_अदालत #रजत_शर्मा #दीनदयाळ_व्याख्यानमाला #अटलबिहारी_वाजपेयी #नरेंद्र_मोदी #पंतप्रधान_मोदी #सलमान_खान #दिलीपकुमार #लालूप्रसाद_यादव #खुशवंतसिंग #रास्व_संघ

#Aap_ki_Adalat #Rajat_Sharma #tvshow #Vajpayee #Narendra_Modi #pmModi #Salman_Khan #DileepKumar #Lalu_Yadav #KhushwantSingh #RSS

.................

© सतीश स. कुलकर्णी
sats.coool@gmail.com
.................

(कृपया, परवानगीविना हा पूर्ण मजकूर किंवा त्यांचा संपादित भाग प्रसिद्ध करू नये.) 


४ टिप्पण्या:

  1. अप्रतिम आणि प्रभावी लिखाण झालं आहे... रजत शर्मा अलगद उलगडत गेले... त्यांचं महात्म्य कळालं... खूप छान...
    दुसरं विचारायचं राहिलं... रजत शर्मा यांची live मुलाखत कुणी घेतली?

    Rajendra Fargade, Sangamner.

    उत्तर द्याहटवा
  2. मुलाखत नव्हती ती; त्यांनी अनुभवकथन केलं.

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...