Wednesday 20 September 2023

सचिऽऽन, सचिऽऽन!

विश्वचषकातील सर्वोत्तम - ४

(दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया - २००३)


‘शांतपणे खेळा’  हा  गांगुलीचा आदेश सचिन-सेहवाग जोडीनं धुडकावला. पण त्यामुळं कर्णधार रागावला नव्हता. पाकिस्तानी गोलंदाजाची पिटाई होताना पाहून तो हसत होता. ‘मी पेटलो आहे...भारतीय फलंदाजांचं काही खरं नाही,’  ही शोएब अख्तरची दर्पोक्ती सीमापार गेली. दक्षिण आफ्रिकेतील ह्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा सचिन तेंडुलकर सर्वोत्तम ठरला. दुखापतींवर विजय मिळवित आणि नेटमध्ये एकही चेंडू न खेळताही! 


स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचं पारितोषिक सचिनने सर गॅरी सोबर्स ह्यांच्याकडून स्वीकारलं.
(छायाचित्र सौजन्य : cricket.yahoo.net)
................................................

‘गणपती बाप्पा मोरया...’ किंवा ‘सचिssन सचिssन’ असा गगनभेदी गजर होत असतो, तेव्हा भारताचा क्रिकेट सामना चालू असतो, हे सांगण्याची गरज नाहीच. गजर स्टेडियममध्ये चालू असतो आणि टीव्ही.च्या माध्यमातून तो कोट्यवधी क्रिकेट रसिकांना रोमांचित करतो.

बरोबर २० वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील वेगवेगळ्या स्टेडियममध्ये ‘सचिssन सचिssन’ असे उत्साहाने ओरडणारे भारतीय प्रेक्षक हजर होते. भारतीय संघ स्पर्धेसाठी दाखल झाला, तेव्हा एका हिंदी वाहिनीची बातमी होती, ‘साऊथ आफ्रिका में सचिन का जादू चल गया...’ ही भविष्यवाणी होती आणि १०० टक्के खरी ठरणारी.

‘जपून खेळा, अशी सूचना मी सलामीच्या जोडीला दिली होती; विशेषतः सेहवागला. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला भक्कम सलामी आवश्यक होती. खेळपट्टी चांगली आहे; उगीच धोका पत्करण्याची गरज नाही, असं वीरूला सांगून मी म्हणालो होतो की, दहा षटकांनंतर आपण वेग वाढवू.’

‘...गंमत बघा. कर्णधाराच्या सूचनेची पार वाट लागली होती. आणि तरीही तो अभागी कर्णधार तक्रार करण्याऐवजी खिदळत होता. सचिन आणि सेहवाग ह्यांनी पाकिस्तानी गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या होत्या. पाचच षटकांत त्यांनी संघाचं अर्धशतक झळकावलं होतं!’

‘अ सेंच्युरी इज नॉट इनफ’मध्ये कर्णधार सौरभ गांगुलीनं ही मजेशीर गोष्ट सांगितली आहे. हा सामना अर्थातच २००३च्या विश्वचषक स्पर्धेतला. भारतानं सहा गडी व २६ चेंडू राखून सहज विजय मिळविला. सामन्याचा मानकरी होता ७५ चेंडूंमध्ये ९८ धावा करणारा सचिन तेंडुलकर.

सामना एकतर्फीच
शोएब अख्तर आणि तेंडुलकर सामना रंगण्याचं भाकित होतं. ते खोटं ठरवत सामना एकतर्फी झाला. शोएबचे चेंडू ज्या गतीनं येत, त्याच्या दुप्पट गतीनं सीमापार जात!

आफ्रिका खंडातील ही पहिली स्पर्धा ९ फेब्रुवारी ते २३ मार्च २००३ या दरम्यान रंगली. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे व नामिबिया ह्यांनी ती आयोजित केली. त्यात सर्वाधिक १४ संघ सहभागी झाले. त्यामुळे सामन्यांची संख्या ५४ झाली. संघांची विभागणी दोन गटांत. गटवार साखळीनंतर प्रत्येक गटातून तीन संघ ‘सुपर सिक्स’साठी पात्र. त्यातील पहिले चार संघ उपान्त्य फेरीत, हे मागच्या स्पर्धेचं स्वरूप कायम होतं.

बलाढ्य दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, इंग्लंड ‘सुपर सिक्स’साठी अपात्र ठरले. त्या ऐवजी झिम्बाब्वे संघ मात्र तिथपर्यंत गेला. कसोटी क्रिकेटसाठी पात्र नसतानाही उपान्त्य फेरीपर्यंत धडक मारणारा एकमेव संघ म्हणजे केनिया. त्याची कारणंही तशीच होती. झिम्बाब्वेतील मुगाबे सरकारचा निषेध म्हणून इंग्लंडने सामना न खेळता पुढे चाल दिली. न्यूझीलंडने सुरक्षिततेच्या कारणावरून केनियात खेळणं टाळलं.

सचिन पुढे, गांगुली मागे
स्पर्धेचा अंतिम सामना चालू असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सर्वोत्तम खेळाडूचं नाव जाहीर केलं – सचिन तेंडुलकर! गांगुलीला चार गुणांनी मागं टाकून तो सर्वोत्तम ठरला.

सचिनची कामगिरी होतीच तशी! एकूण ११ सामन्यांतील तेवढ्याच डावांत ७५४ चेंडू खेळून ६७३ धावा. स्पर्धेतील विक्रम. त्यात एक शतक व सहा अर्धशतकं. स्ट्राइक रेट ८९.२५, सरासरी ६१.१८. शिवाय दोन बळी व चार झेल.

धावांमध्ये सचिननंतर येतात, गांगुली (४६५), रिकी पाँटिंग (४१५) व अॅडम गिलख्रिस्ट (दोघेही ऑस्ट्रेलिया – ४०८). गिलख्रिस्ट स्ट्राइक रेटमध्ये मात्र सचिनहून सरस – १०५.४२.

‘बीस साल बाद’ अशी भारतीयांना वाटणारी आशा अंतिम सामन्यात फोल ठरली, तरी स्पर्धेवर छाप राहिली सचिनचीच. त्यानं एका शतकासह सलग चार अर्धशतकं झळकावली. अगदी शतकाच्या उंबरठ्यावर तो दोनदा बाद झाला.

पहिल्याच सामन्यात द नेदरलँड्सविरुद्ध भारताची फलंदाजी काही बहरली नाही. संघाच्या २०४ धावांमध्ये सचिनचा वाटा होता ५२. नंतरच्या सामना ऑस्ट्रेलियाशी. ब्रेट ली व जेसन गिलेस्पी यांच्यासमोर नांगी टाकणाऱ्या भारतानं जेमतेम सव्वाशे धावा केल्या. त्यात सर्वोच्च ३६ सचिनच्या आणि खालोखाल २८ हरभजनच्या. हा सामना कांगारूंनी सहज जिंकला.

हरारेतील झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापासून सेहवाग-सचिन जोडी जमली. त्यांनी १७.४ षट्कांमध्ये ९९ धावांची सलामी दिली. सचिनच्या ८१ धावा झाल्या ९१ चेंडूंमध्ये. त्यात १० खणखणीत चौकार होते.

संघहित जपणारा सौरभ
इथे गांगुलीचा आवर्जून उल्लेख करायला हवा. कर्णधार म्हणून त्यानं संघहिताचा जो विचार केला, त्याचं कौतुक करायला हवं. स्पर्धेसाठी संघ निवडताना सचिनची मधल्या फळीतला फलंदाज म्हणून निवड झाली. पण त्याची इच्छा होती सलामीला खेळण्याची.

गांगुली-सेहवाग ही डावखुऱ्या-उजव्या फलंदाजांची जोडी चांगली जमलेली होती. चौथ्या क्रमांकावर येणारा सचिन मधल्या फळीचा आधारस्तंभ असेल आणि डावाला आकार देईल, असं संघाच्या व्यवस्थापनाचं धोरण होतं.

पण सचिनच्या इच्छेला गांगुलीनं मान दिला. स्वतः मधल्या फळीत खेळणं त्यानं स्वीकारलं. सचिन-सेहवाग जोडी जमली. त्याचा त्यानं आत्मचरित्रात कौतुकानं उल्लेख केला आहे.

भरात असलेल्या सचिनचा दुबळ्या नामिबियाला फटका न बसता तरच आश्चर्य. त्याच्या (१५१ चेंडूंत १५२) व गांगुलीच्या शतकामुळं भारतानं मोठी धावसंख्या उभी केली. सचिनएवढ्याही धावा नामिबियाला करता आल्या नाहीत. सामन्याचा निर्विवाद मानकरी तोच ठरला.

त्यानंतर कॅडीक, अँडरसन, फ्लिंटॉफ ह्यांच्या माऱ्यापुढंही सचिननं अर्धशतक (५० धावा ५२ चेंडू) झळकावलं. डावखुऱ्या आशिष नेहराच्या सहा बळींमुळे इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला.

शोएबची दर्पोक्ती
महत्त्वाचा सामना होता एक मार्चचा. गाठ पाकिस्तानशी होती. ताशी १०० मैल वेगाचा पल्ला गाठलेला शोएब अख्तर फुरफुरत होता. आधीच्या दोन स्पर्धांमधील पराभवाचा वचपा काढण्याची खुमखुमी त्याला होती. सामन्याच्या आदल्या दिवशी तो म्हणाला होता, ‘मी पेटलो आहे. मला एकदा लय सापडली की, भारतीय फलंदाजांचं काही खरं नाही.’

सामन्यातलं चित्र उलटंच होतं. सईद अन्वरच्या शतकामुळे पाकिस्तानने सात गडी गमावून २७३ धावांची मजल मारली. वसीम अक्रम-अख्तर-वकार युनूस असा तोफखाना असल्यामुळंच कर्णधार गांगुलीनं ‘थोडं जपून’ खेळायला सांगितलं होतं.

पाचमध्येच पन्नास!
सेहवाग-सचिन वेगळ्या इराद्यानं मैदानात उतरले. अक्रमच्या पहिल्याच षट्कात दोन चौकार गेले. मिजाशीत असणाऱ्या शोएबच्या पहिल्या षट्कातील चौथा चेंडू थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर आणि सचिनचा थर्ड मॅनवरून षट्कार. त्याच्या पुढचे दोन चेंडू सीमापार! षट्कात १८ धावा. त्याच्या जागी आलेल्या युनूसच्या षट्कातही ११ धावा फटकावल्या गेल्या. या जोडीनं पाचवं षट्क संपतानाचा संघाचं अर्धशतक पूर्ण केलं.

सचिनच्या बॅटचा हा तडाखा पाकिस्तानला आणि तोंडाळ शोएबला.
(छायाचित्र सौजन्य : thequint.com)
......................................................
सचिनची ही खेळी जबरदस्त होती. त्यानं अवघ्या ७५ चेंडूंमध्ये ९८ धावा केल्या. त्यात १० चौकार व एक षट्कार होता. उद्दामपणाची किंमत शोएबनं १० षटकांत ७२ धावा मोजून चुकविली! स्फोटक व निर्णायक खेळी करणारा सचिन सामन्याचा मानकरी होता. गटात दुसरा क्रमांक मिळवून भारत ‘सुपर सिक्स’साठी पात्र ठरला.

‘सुपर सिक्स’च्या तिन्ही सामन्यांमध्ये भारतानं सहज विजय मिळविले. केनियाविरुद्ध सचिन व सेहवाग स्वस्तात बाद झाल्यानंतर गांगुलीच्या नाबाद शतकानं व युवराजच्या नाबाद अर्धशतकामुळं भारतानं सहा गडी राखून विजय मिळविला.


श्रीलंकेविरुद्ध शतक फक्त तीन धावांनी हुकलं.
(छायाचित्र सौजन्य : sachinist.in)
...........................................
श्रीलंकेविरुद्ध सचिन (१२० चेंडूंमध्ये ९७) व सेहवाग (७६ चेंडू, ६६ धावा) यांनी दीडशतकी सलामी दिली. श्रीनाथ, नेहरा व झहीर खान यांनी लंकेला १०२ धावांमध्येच गुंडाळलं. सलामीवीरांसह गांगुलीही अपयशी झाल्यानंतर महंमद कैफ व राहुल द्रविड यांच्या शानदार फलंदाजीमुळं न्यूझीलंडवर सात गडी राखून विजय मिळाला.

केनियाविरुद्ध अष्टपैलू खेळ
उपान्त्य सामन्यात २० मार्च रोजी गाठ होती केनियाशी. सचिननं सेहवागला साथीला घेऊन पुन्हा एकदा ७४ धावांची भक्कम सलामी दिली. त्यानं ८३ धावा केल्या, तर गांगुलीनं पुन्हा एक नाबाद शतक झळकावलं. केनियाला १७९ धावांत गुंडाळण्यासाठी तेंडुलकरनं दोन बळी घेत हातभार लावला.

अंतिम सामन्याचा वेध घेताना ‘द गार्डियन’मध्ये माईक सेल्व्ही यानं लिहिलं होतं, ‘तेंडुलकरनं गेल्या काही आठवड्यांत अद्भुत कौशल्य दाखवून दिलं आहे. त्यात फक्त भक्कम बचाव नाही, तर मिड-ऑन व मिड-ऑफच्या क्षेत्ररक्षकांना उल्लू बनविणारे दिमाखदार ड्राइव्ह, शानदार फ्लिक आहेत.’

पाँटिंगचं नाबाद शतक
विजेतेपदाची लढत एकतर्फीच झाली. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने फक्त २ गडी गमावून ३५९ धावा केल्या. ही स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या. गिलख्रिस्ट-मॅथ्यू हेडन यांच्या शतकी सलामीनंतर तिसऱ्या जोडीसाठी कर्णधार रिकी पाँटिंग व डेमियन मार्टिन यांनी नाबाद २५४ धावांची भागी केली.

सचिन (एका चौकारासह चार) अपयशी ठरल्यानंतर भारताला जेमतेम २३४ धावांपर्यंत मजल मारता आली. सेहवागने ८१ चेंडूंमध्ये ८२ धावा केल्या. नाबाद शतकवीर पाँटिंग (१२१ चेंडूंमध्ये आठ षट्कार व तीन चौकारांसह १४०) याची सामन्याचा मानकरी म्हणून निवड झाली. सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविणारा ऑस्ट्रेलिया दुसरा संघ ठरला. पूर्ण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ अपराजित राहिला आणि भारताने गमावलेले दोन्ही सामने कांगारूंविरुद्धचे होते!

अबाधित विक्रम
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी चुरस होती सचिन आणि सौरभ ह्यांच्यातच. केनियाविरुद्धच्या दोन बळींनी सचिन पुढे सरकला. स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्यानं दुसऱ्यांदा नोंदविला. ह्या आधी भारतात १९९६मध्ये झालेल्या स्पर्धेत त्यानं सात सामन्यांमध्ये ५२३ धावा केल्या होत्या. ह्या वेळी ६७३. त्याचा हा विक्रम अजून कोणाला गाठता आला नाही. मागच्या स्पर्धेत रोहित शर्मा त्या टप्प्यापासून पाव शतक दूर राहिला!

हा विक्रम झाला तो सचिन पूर्ण तंदुरुस्त नसताना! ‘इंडिया टुडे’च्या संकेतस्थळावर त्याबद्दल स्पष्ट उल्लेख आहे. सचिनच्या घोट्याला आणि गुडघ्याला दुखापत होती. त्यामुळे फलंदाजीसाठी मैदानात उतरताना त्याला पायाला पट्टी बांधावी लागे.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा चालू असताना सचिननं नेटमध्ये एकदाही फलंदाजी केली नाही. त्याच्या वाढदिवसानिमित्त पी. टी. आय. वृत्तसंस्थेला हरभजनसिंग ह्यानं जी मुलाखत दिली, त्यात ह्याचा उल्लेख आहे.

आपल्या ‘पा जीं’चं कौतुक करताना हरभजन म्हणाला, ‘स्पर्धा चालू असताना जावगल श्रीनाथ, आशिष नेहरा, झहीर खान, अनिल कुंबळे किंवा मी त्याला एकदाही नेटमध्ये गोलंदाजी केल्याचं आठवत नाही.’

सध्याच्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही ह्या आठवणीला दुजोरा देतो. ‘स्पोर्ट्सकीडा’ संकेतस्थळाशी बोलताना राहुल म्हणाला, ‘त्या विश्वचषक स्पर्धेत सचिन नेटमध्ये एकही चेंडू खेळला नाही. आम्हा सगळ्यांनाच प्रश्न होता, ‘तो असं का करतोय?’ त्याबद्दल मी विचारल्यावर तो म्हणाला, ‘मला सूर सापडलाय. नेटमध्ये तो घालवायचा नाही. माझी भावना खरी असेल तर मैदानात उतरल्यावर धावा होतीलच.’

सचिननं कोट्यवधी रसिकांना जिंकलं
महान अष्टपैलू खेळाडू गॅरी सोबर्स ह्यांच्या हस्ते सचिनला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचं पारितोषिक देण्यात आलं. ह्या स्पर्धेचे कार्यकारी संचालक डॉ. अली बाकर ह्यांनी व्यक्त केलेली भावना बरंच काही सांगणारी आहे. ते म्हणाले, ‘हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट विश्वचषक व्हावा अशी आमची इच्छा होती. सचिनच्या शानदार फलंदाजीमुळे ह्या स्पर्धेने क्रिकेटजगतातील कोट्यवधी रसिकांना लोकांना मोहित केलं. ह्या सन्मानासाठी, कौतुकासाठी तो खरोखर पात्र आहे.’
.................

#क्रिकेट #विश्वचषक #विश्वचषक2023 #विश्वचषक2003 #दक्षिण_आफ्रिका #सचिन_तेंडुलकर #भारत #सौरभ_गांगुली #सेहवाग #शोएब_अख्तर #पाकिस्तान #राहुल_द्रविड #ऑस्ट्रेलिया #स्पर्धेतील_सर्वोत्तम #सुपर_सिक्स #सामन्याचा_मानकरी #धावांचा_विक्रम  

#CWC #CWC2023 #CWC2003 #ODI #South_Africa #Sachin_Tendulkar #India #Bharat #Sourav_Ganguly #Sehwag #Rahul_Dravid #Shoaib_Akhtar #Pakistan #Aurstralia #Allrounder #icc #Best_Player #super_six #MoM #run_record
.................

(‘झी मराठी दिशा’ साप्ताहिकात  मे २०१९ रोजी प्रकाशित झालेला लेख अधिक माहितीसह आणि विस्तारित स्वरूपात.)
.................

आधीचा लेख इथे वाचता येतील - 

https://khidaki.blogspot.com/2019/06/WcupCrowe.html

https://khidaki.blogspot.com/2019/06/WC-Jaysurya.html

https://khidaki.blogspot.com/2023/09/cwc-LanceKlusener.html
.................
मालिकेतील पुढच्या लेखांसाठी कृपया फॉलो करा...


3 comments:

  1. सचिन सर्वोत्तमच होता अन् तुझा लेखही. अचूक शब्द आणि वर्णन ह्यांमुळे सचिनची खेळी डोळ्यांसमोर उभी केलीस...मस्तच!
    - प्रबोधचंद्र सावंत, पुणे

    ReplyDelete
  2. ह्या मॅचचा, विशेषतः आपल्या बॅटिंगचा बॉल न् बॉल मला आठवतोय.
    - मिलिंद कुलकर्णी, सांगली

    ReplyDelete
  3. छान आठवणी जाग्या झाल्या. आता अधिक निवांतपणे 'त्या' इनिंग्ज पाहीन.
    - उमेश आठलेकर, राजगुरुनगर

    ReplyDelete

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...