Saturday 16 September 2023

खणखणीत अष्टपैलू कामगिरी

विश्वचषकातील सर्वोत्तम - ३
(इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, वेल्स आणि द नेदरलँड्स - १९९९)

‘चोकर्स’  विशेषण द. आफ्रिकेच्या संघासाठी लावायला सुरुवात झाली ह्याच स्पर्धेपासून. कांगारूंविरुद्ध  बरोबरीत सुटलेल्या उपान्त्य सामन्यात त्यांचा हीरोच त्यांच्यासाठी व्हिलन ठरला! पण स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याचीच निवड झाली  - लान्स क्लूसनर. ‘झुलू’नं संपूर्ण स्पर्धेत अफाट अष्टपैलू खेळ केला. तडाखेबंद फलंदाजी आणि अचूक गोलंदाजी. प्रतिस्पर्ध्यांना त्यानं चारी मुंड्या चित केलं होतं. 


निर्णायक क्षणी तडाखेबंद फलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेचा
तारणहार बनलेला लान्स क्लुसनर. (छायाचित्र सौजन्य -icc-cricket.com)
---------------------------------------------------

‘चोकर्स’! दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी वारंवार वापरलं जाणारं हे विशेषण. त्याचा अर्थ काय? CHOKER ह्या एकवचनी शब्दाची Britannica Dictionaryमध्ये दिलेली व्याख्या अशी - 1. a necklace that fits closely around the neck. 2. informal : a person who fails to do something because of nervousness : a person who chokes.

थोडक्यात, निर्णायक क्षणी गळपटणारा, मोक्याच्या क्षणी दम कोंडणारा म्हणजे ‘चोकर’. अशा दम टाकणाऱ्यांचा समूह, संघ म्हणजे ‘चोकर्स.’ दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हे विशेषण लागलं १९९९च्या विश्वचषक स्पर्धेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा उपान्त्य सामना जिंकता जिंकता बरोबरीत सुटला आणि अंतिम सामना खेळण्याचं स्वप्न उद्ध्वस्त झालं. ते हताशपणे पाहण्याची वेळ आली, त्या वेळी मैदानात असलेल्या लान्स क्लुसनर ह्याच्यावर.

नायक आणि खलनायकही?
योग बघा, प्रामुख्याने क्लुसनरच्याच अष्टपैलू खेळामुळे त्याच्या संघाने इथवर झेप घेतली होती. नेमक्या वेळी, निर्णायक क्षणी संघानं कच खाल्ली, तेव्हा तोच होता त्याचा साक्षीदार. त्या अपयशाचं माप त्याच्या पदरात पुरेपूर घालण्यात आलं. नायक तो आणि काही प्रमाणात खलनायकही तोच!

इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, वेल्स आणि द नेदरलँड्स अशा पाच देशांनी आयोजित केलेली ही स्पर्धा १४ मे २० जून एवढा काळ खेळली गेली. दीर्घ काळानंतर इंग्लंडला यजमान बनण्याची संधी मिळाली. एकूण डझनभर देशांचा सहभाग असलेल्या ह्या स्पर्धेतूनच बांगला देश व स्कॉटलंड ह्या संघांचं पदार्पण झालं.

स्पर्धेचं स्वरूपही काहीसं बदललं. दोन गटांमध्ये साखळी सामने आणि प्रत्येक गटातील पहिले तीन संघ ‘सुपर सिक्स’मध्ये. अव्वल साखळीनंतर पहिल्या चार स्थानांवर आलेले संघ उपान्त्य फेरीत असं स्वरूप असलेल्या स्पर्धेत एकूण ४२ सामने झाले.

ह्या स्पर्धेची वैशिष्ट्यं काय? बरीच सांगता येतील. त्यातली महत्त्वाची अशी - पांढऱ्या ‘ड्यूक’ चेंडूचा वापर, बरोबरीत सुटलेला स्पर्धेतील पहिलाच सामना, नवा विश्वविजेता देण्याची चार स्पर्धांची खंडित झालेली पंरपरा, गट साखळीतील गुण ‘सुपर सिक्स’मध्ये पुढे नेण्याची पद्धत (पॉइंट्स कॅरी फॉरवर्ड), ‘अ’ गटामध्ये झिम्बाब्वेचे बलाढ्य भारत व दक्षिण आफ्रिका संघांविरुद्ध विजय.

क्लुसनर सर्वोत्तम
अंतिम सामना खेळण्याची हाता-तोंडाशी आलेली संधी ज्या संघानं गमावली, त्याच दक्षिण आफ्रिकेचा लान्स क्लुसनर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याची अष्टपैलू कामगिरी तेवढी खणखणीत होतीच मुळी. ‘अ’ गटातील साखळी सामन्यांमध्ये क्लुसनरच्या खेळामुळेच संघाला पराभवाच्या उंबरठ्यावरून विजयाच्या महाद्वाराकडे जाता आलं.

मधल्या फळीत खालच्या क्रमांकावर फलंदाजीस येणाऱ्या डावखुऱ्या क्लुसनरने अफलातून खेळ केला. स्पर्धेत तो पहिल्यांदा बाद झाला ते ‘सुपर सिक्स’मधील न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत. गेविन लार्सनने त्रिफळा उडवून त्याला बाद करता येतं, हे दाखवून दिलं.

चौथा किंवा पाचवा गोलंदाज म्हणून क्लुसनरच्या हाती कर्णधार चेंडू द्यायचा. तिथंही त्यानं कमाल दाखवली. त्याच्या उजव्या हाती मध्यमगती गोलंदाजीने अवघड होऊ पाहणाऱ्या भागीदाऱ्या मोडून संघाला दिलासा दिला. सलग तीन वेळा आणि एकूण चारदा सामन्याचा मानकरी म्हणून त्याची निवड झाली.

हीरो होता ‘झुलू’
‘झुलू’ म्हणून ओळखला जाणारा क्लुसनर संघाचा हीरो होता. संकटकाळी धावून येणारा तरणाबांड, दमदार नायक. प्रतिस्पर्ध्यांना चारी मुंड्या चित करणारा हीरो. फलंदाजीच्या सरासरीत तो अव्वल ठरला. संघाचे प्रमुख गोलंदाज अॅलन डोनाल्ड व शॉन पोलॉक ह्यांच्यापेक्षा जास्त बळी त्याच्या खात्यावर होते. खऱ्या अर्थानं त्यानं संघासाठी ह्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी बजावली.

क्लुसनरच्या अष्टपैलू खेळाची झलक गटातील पहिल्याच सामन्यात भारताविरुद्ध दिसली. चौथा गोलंदाज म्हणून चेंडू हातात पडल्यावर त्यानं सचिन तेंडुलकर, अर्धशतकवीर राहुल द्रविड व कर्णधार महंमद अजहरुद्दीन हे तीन महत्त्वाचे बळी मिळविले. फलंदाजीसाठी आठव्या क्रमांकावर येऊन त्याने चार चेंडूंमध्ये नाबाद १२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेनं हा सामना चार गडी राखून जिंकला.

विश्वविजेत्या श्रीलंकेशी पुढचा मुकाबला होता. त्यांच्याविरुद्ध मिळविलेल्या ८९ धावांच्या विजयाचा मानकरी ठरला तो क्लुसनरच. नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यानं ४५ चेंडूंमध्ये नाबाद ५२ (पाच चौकार व दोन षट्कार) फटकावल्या. नवव्या व दहाव्या जोडीसाठी तब्बल ७७ धावांची भर घातली. मग उपुल चंदन, चमिंडा वास व प्रमोदया विक्रमसिंघे ह्यांना त्यानं बाद केलं, ते फक्त २१ धावांचं मोल देऊन. सामन्याचा मानकरी? स्वाभाविकपणे तोच!

इंग्लंडविरुद्धची धमाकेदार खेळी
गटातील पुढच्या दोन्ही सामन्यांवर छाप होती क्लुसनरचीच. यजमान इंग्लंडवर १२२ धावांनी मिळविलेल्या दणदणीत विजयात त्याच्या नाबाद खेळीचं महत्त्व मोठं होतं. सातव्या क्रमांकावर येऊन त्यानं इंग्लिश गोलंदाजी पिटून काढली. त्याची धमाकेदार खेळी होती ४० चेंडूंतील ४८ धावांची. त्यात तीन चौकार व एक षट्कार. हा हल्ला चढवत त्यानं संघाची धावसंख्या समाधानकारक स्थितीत नेली. गोलंदाजी करताना सहा षट्कांमध्ये फक्त १६ धावा देऊन एक गडी बाद केला.


क्लुसनरची मध्यमगती गोलंदाजी भेदक ठरली.
(छायाचित्र ट्विटरवरून साभार)
केनियाविरुद्ध सात गडी व नऊ षट्कं राखून विजय मिळविताना लान्सच्या गोलंदाजीला धार चढली. सलामीवीरांनी ६६ धावांची भागीदारी करूनही केनियाला १५२ धावांपर्यंतच मजल मारता आली. टिकोलो, ओडुम्बे यांच्यासह पाच फलंदाजांचे बळी लान्सने मिळविले, ते साडेआठ षट्कांत फक्त २१ धावा मोजून. फलंदाजीला उतरण्याची वेळच त्याच्यावर आली नाही.

शेवटच्या साखळी सामन्यात मात्र दक्षिण आफ्रिकेला झिम्बाब्वेकडून पराभव पत्करावा लागला. झिम्बाब्वेनं ठेवलेल्या २३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांची अवस्था सात बाद १०६ होती. क्लुसनरनं (५८ चेंडू, नाबाद ५२, ३ चौकार व २ षट्कार) दोन महत्त्वाच्या भागीदाऱ्या केल्या. संघाला विजय मिळवून देणं त्याला शक्य झालं नाही. पण त्यानं पराभवाचं अंतर खूप कमी केलं.

तारणहार
‘सुपर सिक्स’मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला हरवताना दक्षिण आफ्रिकेचा तारणहार बनला तो लान्स क्लुसनरच. विजयासाठी २२१ धावांचा पाठलाग करताना संघाची अवस्था दयनीय म्हणावी अशी झाली होती - सहा बाद १३५. समोर अक्रम, शोएब अख्तर, अजहर महमूद, सकलेन मुश्ताक असे बिनीचे गोलंदाज होते. त्या सामन्यात क्लुसनर आठव्या क्रमांकावर फलंदाजी आला. त्यानं कॅलिसबरोबर सातव्या जोडीसाठी ४१ आणि नंतर बाऊचरबरोबर नाबाद ४५ धावा जोडल्या.

क्लुसनरची खेळी होती ४१ चेंडू, नाबाद ४६, प्रत्येकी तीन चौकार व षट्कार. डावातील सेहेचाळिसाव्या षट्कात त्यानं शोएब अख्तरला मिडविकेटवरून षट्कार खेचला आणि लगेच फाईन लेगला चौकार मारला. त्या आधी गोलंदाजी करताना त्यानं एक बळी मिळविला आणि एका धावचितला हातभार लावला. तोच सामन्याचा मानकरी ठरला. पुन्हा एकदा!

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघनायकानं वेगळा निर्णय घेतला. त्यानं क्लुसनरला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. पण तिथं त्याला काही करता आलं नाही. स्पर्धेत तो पहिल्यांदाच बाद झाला, ते अवघ्या चार धावांवर. ती कसर त्याने दोन बळी घेऊन भरून काढली. हार पत्कराव्या लागलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही क्लुसनर चमकला. त्याच्या २१ चेंडूंतील ३६ धावांमुळेच संघाला २७१ धावांची मजल मारता आली. रिकी पाँटिंगला बाद करून त्यानं शतकी भागीदारी केलेली चौथी जोडी फोडली.

कांगारूंशी बरोबरी
उपान्त्य फेरीत दक्षिण आफ्रिकेची गाठ पुन्हा कांगारूंशी पडली. बर्मिंगहॅम इथं १७ जून रोजी झालेला हा सामना विलक्षण रंगला आणि बरोबरीत सुटला. सरस गुणांच्या आधारे कांगारूंनी अंतिम फेरी गाठली.

विजयासाठी २१४ धावांचं लक्ष्य कॅलिस (५३) व जाँटी ऱ्होडस (४३) यांनी जवळ आणलं होतं. त्याच वेळी शेन वॉर्नने चार बळी घेऊन सामना चुरशीचा केला. आठव्या क्रमांकावर आलेल्या क्लुसनरने (१६ चेंडूंत नाबाद ३१) संघाला विजयाजवळ नेलं.


उपान्त्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्वप्नभंग.
(छायाचित्र सौजन्य - www.mirror.co.uk)
--------------------------------------
सामन्याचं शेवटचं षट्क बाकी आणि द. आफ्रिकेला विजयासाठी हव्या होत्या नऊ धावा. डॅमियन फ्लेमिंगच्या पहिल्या दोन चेंडूंना क्लुसनरनं सीमापार केलं. पण विजयासाठीची एक धाव धावताना गडबड होऊन डोनाल्ड धावबाद झाला! अंतिम सामन्याचं उघडलेलं दार धाडकन् बंद झालं. दक्षिण आफ्रिकेचा स्वप्नभंग!!

पश्चातबुद्धी...असो! 
त्या सामन्याची (नकोशी) आठवण काढताना क्लुसनर म्हणतो, ‘मी अस्वस्थ होतो. उतावीळपणा दाखवायला नको होता. थोडं थांबायला हवं होतं. पण ही पश्चातबुद्धी झाली. कदाचित पुढचे दोन चेंडू अचूक यॉर्कर पडले असते तर... असो!’

‘झुलू’ची ह्या स्पर्धेतली कामगिरी सर्वोत्तम होती, ह्यामध्ये संशय मुळीच नाही. एकूण नऊ सामन्यांमध्ये सहा वेळा नाबाद राहत त्यानं १४०.५ एवढ्या सरासरीनं आणि १२२.१७ स्ट्राईक रेटने २८१ धावा केल्या. संघाकडून सर्वाधिक १७ बळी त्यानेच घेतले; तेही २०.५८ अशा सरासरीने. प्रत्येक वेळी संघाच्या हाकेला ओ देऊन निर्णायक खेळ क्लुसनरने केला. त्यामुळेच तो सर्वोत्तम ठरला.

त्या स्पर्धेत बी. बी. सी. टेलिव्हिजनचे समालोचक होते ज्येष्ठ क्रिकेटपटू रिची बेनॉ. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून क्लुसनरची निवड करण्याचा निर्णय त्यांना पुरेपूर पटला होता. त्यांचं म्हणणं होतं, ‘प्रत्येक वेळी तो मैदानावर अशा आविर्भात उतरे की, वाटायचं हा सामना फिरवणार बरं. (ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या प्रसिद्ध सामन्यातील शेवटच्या षटकात) त्यानं डॅमियन फ्लेमिंगच्या चेंडूवर मारलेले ते दोन चौकार माझ्या डोळ्यांचं पारणं फेडणारे होते.’

लान्सची कामगिरी ११० टक्के
दिमाखदार अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या ‘झुलू’बद्दल त्यांच्या संघाचे प्रशिक्षक बॉब वूल्मर म्हणाले, ‘‘संपूर्ण संघानं १०० टक्के कामगिरी बजावली; पण लान्सची कामगिरी ११० टक्के होती!’’ त्याच्या कामगिरीची दखल घेणाऱ्या ‘द गार्डियन’च्या लेखाचं शीर्षक मोठं बोलकं आहे - When Lance Klusener set the standard for cricketing all-rounders!
...............

#क्रिकेट #विश्वचषक #विश्वचषक2023 #विश्वचषक1999 #दक्षिण_आफ्रिका #लान्स_क्लुसनर #झुलू #नायक_खलनायक #ऑस्ट्रेलिया #अष्टपैलू #स्पर्धेतील_सर्वोत्तम #चोकर्स #सुपर_सिक्स #ड्यूक_चेंडू #सामन्याचा_मानकरी #इंग्लंड #न्यूझीलंड #भारत #टाय #बॉब_वूल्मर  

#CWC #CWC2023 #CWC1999 #ODI #South_Africa #Lance_Klusener #Zulu #hero&villain #Aurstralia #Allrounder #icc #Best_Player #chokers #super_six #duke_ball #England #NewZealand #India #Bharat #tie_match #Bob_Woolmer
.................

(‘झी मराठी दिशा’ साप्ताहिकात ३ मे २०१९ रोजी प्रकाशित झालेला लेख अधिक माहितीसह आणि विस्तारित स्वरूपात.)
.................
.................
आधीचा लेख इथे वाचता येतील - 

https://khidaki.blogspot.com/2019/06/WcupCrowe.html

https://khidaki.blogspot.com/2019/06/WC-Jaysurya.html
.................
मालिकेतील पुढच्या लेखांसाठी कृपया फॉलो करा...


No comments:

Post a Comment

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...