डॉक्टर खास कौतुक करतात - ‘ह्या सगळ्या रुग्णांमध्ये तुमचा एक नंबर आहे बघा.’ मग आजोबा उपचाराबद्दल सांगू लागतात. सकाळी सहा वाजताच उपचार सुरू होतात. स्पेशल रूम आहे. दुपारपर्यंत चार-पाच सलाईन देतात. मग हे दोघं परत नगरला आणि तिथून मिळेल ती गाडी पकडून गावाकडे परततात. रविवारची दुपार सुरू होताच सुरू झालेली त्यांची ही दगदग सोमवारी रात्री कधी तरी संपते.
-------------
साधारण दहा-अकरा वर्षांचा नातू आणि (कागदोपत्री तरी!) पंचाहत्तरी पार केलेले आजोबा. त्यांचा दर आठवड्याचा प्रवास ठरलेला आहे. दोन टप्प्यांचा प्रवास. आजोबांच्या हातात काठी नाही. उलट त्यांचंच बोट धरून नातू असतो. अनुभवी आणि आश्वासक हातात कवळेपण.
हे असं खूप दिवसांपासून चाललेलं आहे. अंदाजे किती दिवस, आठवडे व महिने असं विचारायला नको. आजोबांकडे हिशेब आहे - आतापर्यंत सलग ११४ आठवडे त्यांनी हा प्रवास केला आहे. आताशी कुठे तो मध्यावर आलेलाय.
‘पॉझिटिव्ह थिंकिंग’चा डोस पाजणाऱ्या कोणत्याही खपावू पुस्तकापेक्षा अगदी थेट व्यावहारिक अनुभव आज मिळाला. कृपा ‘लाल परी’ची! तिच्यामुळे होत असलेल्या आरामदायी प्रवासाची.
नगरहून काल जाताना एस. टी. बस जेवण्यासाठी थांबली नाही. सगळे थांबे व्यवस्थित घेऊनही वेगाने धावली. तो सुखद धक्का जेमतेम पचनी पडत होता. परतताना मात्र बस थांबलीच. नगर २५ किलोमीटर राहिलेलं असताना. घरचं जेवण वाट पाहत असताना. रुई छत्तिशीजवळच्या थोडंस पुढे (चिंचोली कोयाळ फाटा?) असलेला हा ढाबा आता बहुतेक सर्व एस. टी. बससाठी हक्काचा थांबा बनला आहे.
‘जेवणासाठी गाडी १५-२० मिनिटं थांबेल,’ अशी घोषणा करून विसावा घेणारी ही बस तिसाव्या मिनिटाला पुन्हा फुरफुरू लागली. त्याच वेगाने इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी.
बस सुरू होता होता आजोबा आणि नातू प्रवेश करते झाले. बरेच प्रवासी आधीपासून उभे होते. ढाब्यापासून प्रवासी कसे काय घेतले, हा प्रश्न पडला. आजोबा नातवाला सांभाळून, जपून आणत होते. तो आजारी असावा, चालताना त्रास होत असल्याचं दिसलं.
पांडुरंगाचं दर्शनानं खूश होऊन कोल्हारला परत चाललेल्या मावशी शेजारी होत्या. त्यांची परवानगी गृहीत धरून ह्या मुलाला आमच्या मधली जागा देऊ केली. (कारण त्याच्या पाच मिनिटंच आधी त्यांनी आपल्या गाववाल्या शेजारणीला तिच्या आसनावर एका तरुण मुलीची सोय करून द्यायला बजावलं होतं.) ‘ओ पैलवान, ये बस इथं’, असं म्हणाल्यावर आजोबांच्या चेहऱ्यावर खुशी दिसली.
मुलगा आजारी दिसत असला, तरी त्याचे कपडे एकदम व्यवस्थित होते. अंगात जीन्ससारखी पँट. पूर्ण बाह्यांचा सदरा. त्या बाह्या छान दुमडून किंचित वर घेतलेल्या. गोबरे गाल, वाटोळा चेहरा; पण त्यावर उदासवाणा भाव. वयाच्या मानाने चेहऱ्यावर असलेल्या पोक्तपणा जाणवणारा. कोवळेपणा कायम ठेवूनही.
आजोबांनी मला उठायला सांगितलं आणि आपल्या नातवाला हळूच तिथं बसवलं. ‘पलीकडं सरकून बस थोडं, बाबांना जागा दे बरं...’, असं मग ते नातवाला म्हणाले. तिकीट काढून झालं आणि आजोबांच्या गप्पा चालू झाल्या. अपंग म्हणून नातवाला ७५ टक्के सवलत आणि आजोबा पंचाहत्तरीपुढचे म्हणून मोफत. हे झालं नगरपर्यंतचं. मग तिथून पुढचा पुण्यापर्यंतचा प्रवास किती रुपयांना पडतो, हे त्यांनी सांगितलं. बस साधी नसेल, तर जास्त पैसे लागतात. पण आम्ही मिळेल त्या बसने जातो, अशी पुष्टी जोडली.
शेजारच्या मावशींनी मुलाद्दल विचारलं आणि जणू त्याचीच वाट पाहत असल्यासारखे आजोबा सांगू लागले, ‘‘पुण्याला चाललोय. दीनानाथ मंगेशकरमध्ये. दर सोमवारी जातोय. ११४ आठवडे झाले. सलाईन द्यावे लागतेत चार-पाच. आज जायचं आणि उद्या परत यायचं.’’
त्या छोट्या मुलाचे कमरेखालचे स्नायू दुबळे होते. काही तरी मोठा आजार होता. त्या साठी दर आठवड्याला ह्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागतात. दसरा नाही, दिवाळी नाही आणि शिमगा नाही... उपचार सुरू झाले तेव्हापासून आजोबांनी एकदाही खाडा केला नाही त्याला तिथं नेण्यात. ‘फक्त एकदाच त्याला त्याचा बाप घेऊन गेल्ता,’ आजोबांनी प्रांजळपणे सांगितलं.
आमचा प्रवास जेमतेम अर्धा तास बाकी होता. तेवढ्या वेळात हा मुलगा, आजोबा आणि त्यांचं कुटुंब ह्यांची संपूर्ण माहिती मिळाली. ह्या कोवळ्या मुलाच्या आजारावर अजून उपचार सापडलेले नाहीत. एक अमेरिकी संस्था त्याबाबत संशोधन वा अभ्यास (आजोबांच्या भाषेत ‘रीसर्च’!) करीत आहे. त्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मदत घेतली जात असावी. ह्या उपचारांसाठी अशा दहा-बारा रुग्णांची निवड केलेली आहे. ते उपचार मंगेशकर रुग्णालयात होतात.
‘पांडुरंगाची कृपा!’, आजोबा कृतज्ञपणे म्हणाले आणि पुढं सांगू लागले, ‘‘आपल्याला काय परवडतंय हे न्हाई तर. किती खर्च असंल ह्याचा?’’, असा प्रश्न विचारून त्यांनीच पुढच्या क्षणाला उत्तर दिलं - १२ कोटी रुपये!
‘उमेश सरांची कृपा!’ नातवाला मिळत असलेल्या उपचारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आजोबा अजिबात सोडत नव्हते. सर म्हणजे डॉक्टर हे लक्षात आलं. डॉ. उमेश कलाणे. बालकांच्या न्यूरोलॉजीचा विशेष अभ्यास असलेले डॉक्टर.
उपचारांबद्दल आजोबा म्हणाले, ‘‘उमेश सरांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं, एकदा यायला सुरुवात केली की, मधूनच सोडून चालणार नाही. नाही तर आमची सगळी मेहनत गेली बघा वाया. मी म्हणालो, ‘तुम्ही सांगान तवा येईल.’ तेव्हापासून दर आठवड्याला जातोय बघा. एकदा तर लक्ष्मीपूजन करून रात्री निघालो.’’
खंड पडू न देता दोन वर्षांहून अधिक काळ रुग्णाला नियमित आणणाऱ्या आजोबांचं उमेश सरांनी स्वाभाविकच कौतुक केलं. ‘ह्या सगळ्या रुग्णांमध्ये तुमचा एक नंबर आहे बघा.’ ही माहिती देऊन मग आजोबा उपचाराबद्दल सांगू लागतात. सकाळी सहा वाजताच उपचार सुरू होतात. स्पेशल रूम आहे. दुपारपर्यंत चार-पाच सलाईन देतात. म्हणजे आपण समजून घ्यायचं की, शिरेतून विशेष औषधे दिली जात असावीत. दुपारपर्यंत औषधयोजना संपते. मग हे दोघं परत नगरला आणि तिथून मिळेल ती गाडी पकडून गावाकडे परततात. हमरस्त्यापासून काही किलोमीटरवर हे गाव. रविवारची दुपार सुरू होताच सुरू झालेली त्यांची ही दगदग सोमवारी रात्री कधी तरी संपते.
आणि ही दगदग, हा प्रवास ११४ आठवड्यांपासून चालू आहे. असं अजून किमान ९४ आठवडे त्यांना करायचं आहे. कारण ह्या उपचाराचा कालावधी चार वर्षांचा आहे.
ह्या दगदगीबद्दल आजोबांच्या बोलण्यात खेद, खंत, त्रास असं काही डोकावत नसतं. अतिशय शांतपणे, हसतमुखाने ते सांगत असतात. ‘बाकी काही नाही हो. ह्यो आपला गडी धडधाकट झाला पाहिजे. बघू त्या पांडुरंगाच्या मनात काय आहे ते,’ असं म्हणत ते पांडुरंगावर भार सोडून देतात.
नातवाचं कौतुक करताना आजोबा रंगतात. ‘‘तिथं हॉस्पिटलात चार-पाच वेळा सुया टोचतात सलाईनसाठी. गडी कधी हं की चूं करत नाही. रडायचं तर सोडाच! नर्सबाई पण लई कौतुक करताते ह्याचं.’’
आजोबांचा नातू चौथीत आहे. इंग्रजी शाळेत घातलाय त्याला. ‘लय हुशार बघा. प्रत्येक विषयात तीसपैकी २८-२९ मार्क मिळवतोय. त्याच्या बाईपण खूशयेत त्याच्यावर.’ मग ते त्याच्या शाळेच्या बसचा खर्च, शाळेची फी सांगतात. चांगल्यापैकी रक्कम आहे ही. गावापासून आठ-नऊ किलोमीटर अंतरावर ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. आपला दुबळा नातू तिथंच शिकला पाहिजे आणि उभा राहिला पाहिजे, ही आजोबांची इच्छा. नातू शाळेत अजिबात त्रास देत नाही, असं कौतुकाने सांगतात आणि हळूच म्हणतात, ‘हां, आता घरी आमाला देतो अधनंमधनं तरास. पण चालायचंच...’
एवढी सगळी कहाणी मस्त सांगत असताना आजोबांचा एकदाही कणसूर लागत नाही. परिस्थितीचं रडगाणंही ते गात नाहीत. कारण परिस्थिती तशी नाहीचंय मुळी. ते म्हणाले, ‘‘तसं बरं आहे आपलं. देवानं बरं चालवलंय. शेती आहे. दुधाचा धंदा आहे. सात-आठ गाया आहेत. ह्येचा बाप बघतो दुधाचा धंदा. परवाच त्याला ट्रॅक्टर घेऊन दिला. पांडुरंगाची कृपा...’’
गळ्यात तुळशीमाळ, आणिक कसल्या तरी एक-दोन बारीक मण्यांच्या माळा असणाऱ्या आजोबांचा पांडुरंगावर फार विश्वास. त्याला ते बोलण्यात घेऊन येतातच. पोराची आजी आता चार धाम यात्रेला चाललीये, असं ते शेजारच्या मावशीला सांगतात. ‘‘आलो परवाच १५ हजार रुपये भरून यात्रेचे. चांगले धा-बारा दिवस आहे. तिला म्हणलं, पाय चालतेत तोवर ये फिरून, बघून.’’
मग मावशींच्या कपाळीचा टिळा पाहून ‘कसं झालं पांडुरंगाचं दर्शन?’ विचारून आपल्या पंढरीच्या वारीचं वर्णन सांगतात. पुढे पुस्ती जोडतात, ‘‘आता एवढ्यात न्हाई गेलो. आता बघा ना आमचे दोन दिवस पुण्याला येण्या-जाण्यातच जातात. मग आठवड्याचे राहिले पाच दिवस. त्यात किती तरी कामं करायची असतात बघा...’’
मावशी आणि माझ्यामध्ये बसलेला नातू सगळं ऐकत असतो. पण गप्पगप्प. आजोबा ज्याला त्याला काय हे पुराण सांगतात उगीच, असा काही भाव त्याच्या चेहऱ्यावर नसतो. दहा वाक्यं आपण बोलावीत, पाच प्रश्न विचारावेत तेव्हा तो एखाद्या शब्दाचं उत्तर देतो. आवडीचा विषय इंग्रजी आहे असं सांगतो. त्याच्या सुंदर शर्टचं कौतुक केल्यावरही तो लाजत नाही किंवा चेहऱ्यावर कसलेही भाव उमटू देत नाही. त्यानं शर्टाच्या बाह्या खरंच फार छान दुमडलेल्या असतात. ते ऐकून आजोबांच्या मनात कौतुकाची नवी लाट येते, ‘त्याला हाप शर्ट आजिबात आवडत नाहीत. सगळेच्या सगळे फुल्ल बाह्यांचे आहेत.’
पुण्याच्या एवढ्या आठवड्यांच्या प्रवासात आलेला एक अनुभव आजोबा आवर्जून सांगतात, ‘‘गाडीला कितीबी गर्दी असूं द्या; आमच्या गड्याला कुणी ना कुणी बसायला जागा देतोच. ह्या पठ्ठ्याला एकदाबी उभं राहावं लागलं नाही. पांडुरंगच त्या जागा देणाऱ्याला तशी बुद्धी देत असंल बघा. आज नाही का तुम्ही बोलावलं चटसरशी, तसंच.’’
प्रवास संपतो. उतरणाऱ्यांना घाई असते. आजोबा, त्यांचा नातू ह्यांच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही. त्यांना एखादा धक्का बसतोच घाईचा. आजोबाच सांगतात त्याला, ‘बाळा, बाजूला राह्य बरं थोडा. त्यांना उतरूंदे.’
माळीवाड्याच्या स्टँडवर उतरल्यावर आजोबांना लाडक्या नातवाला घेऊन पुण्याची गाडी पकडण्याकरिता पाचशे मीटरवरच्या दुसऱ्या स्टँडकडे जावं लागणार आहे. नातवाला चालता येईल ना? ते म्हणतात, ‘सपाट जागा असली ना, आमचा गडी दोन किलोमीटरबी चालतोय.’
दोघांमध्ये इवलीशी जागा दिल्याबद्दल आजोबा दिलखुलास हसून माझे आभार मानतात. म्हणतात, ‘आपले तर प्रयत्न चालूयेत. यश द्यायचं त्या पांडुरंगाच्या हाती.’
पांडुरंग तुमच्या पदरात यश टाकणारच, असं कितव्या तरी वेळा सांगून निरोप घेतो. हार न मानणाऱ्या आजोबांची एक अतिशय सकारात्मक गोष्ट मनात रुजवून!
.......
(छायाचित्रं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने.)