शुक्रवार, १२ जुलै, २०१९

बर्फाने गिळिले आगीच्या लोळाशी!



विजयाची चाहूल लागल्यानं खूश असलेले न्यूझीलंडचे डी ग्रँडहोम, यष्टिरक्षक लॅथम, मार्टीन गप्टील व लॉकी फर्ग्युसन. (सौजन्य : www.cricket.com.au)
कागदावरचं समीकरण भक्कम होतं. मैदानात ते शांतपणे सोडविलं की, उत्तर बरोबर येणारच. पण या साध्या-सोप्या समीकरणाच्या मधल्या कुठल्या तरी दोन-तीन पायऱ्यांमध्ये गफलत झाली. आणि हमखास बरोबर येईल असं वाटणारं उत्तर सरतेशेवटी चुकलंच! भोपळा मिळाला!!

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या साखळीतील शेवटचा सामना या आधी क्वचितच एवढा लक्षपूर्वक पाहिला गेला असेल. एक संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर असलेला आणि दुसरा स्पर्धेतून बाहेर फेकला गेलेला. पण त्याच लढतीचा निकाल उपान्त्य फेरीत कोण कोणाशी खेळणार, हे ठरवणार होता.

दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि भारतीय संघाचे चाहते खूश झाले. कारण कांगारूंच्या पराभवानं गुणतक्त्यात भारत पहिल्या क्रमांकावर आला. उपान्त्य फेरीतील सामना यजमान इंग्लंडविरुद्ध, त्यांच्या लाडक्या नि लकी मैदानावर खेळण्याचं टळलं होतं. अवघड पेपरऐवजी सोपा पेपर. इंग्लंडऐवजी तुलनेनं दुबळ्या न्यूझीलंड संघाशी मँचेस्टरच्या मैदानावर सामना. सोपं वाटत होतं. पेपर अवघड गेला! भोपळा मिळाला!!

सलग तिसऱ्या स्पर्धेत भारतानं उपान्त्य फेरी गाठली. सचिन तेंडुलकरला जसा विश्वविजेतेपदानं निरोप देण्यात आला, तशीच कर्तबगारी विराट कोहलीचा संघ दाखविल आणि महेंद्रसिंह धोनी चषक उंचावत निरोप घेईल, अशी स्वप्नं रंगवली होती चाहत्यांनी. पण ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर इतिहासाची पुनरावृत्ती झाली नाही. तिथं केन विल्यमसन आणि त्याच्या भिडूंनी नवी आवृत्ती लिहिली! अंडर डॉग्ज म्हणविल्या जाणाऱ्या, इतरांच्या निकालावर ज्यांचा उपान्त्य फेरीतील प्रवेश अवलंबून होता, त्या न्यूझीलंडनं संभाव्य विश्वविजेत्यांना मात दिली.

पावसानं पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा भारताच्या विजयाचीच खात्री तमाम भारतीयांना होती. अगदी दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या डावातील राहिलेले २३ चेंडू संपल्यानंतर भारताचा डाव सुरू होण्यापूर्वीही फार कमी जणांना किवीज डाव उलटवतील, असं वाटत असावं. भारताचे फलंदाज मैदान उतरत होते, तेव्हा क्रिकविझचं प्रेडिक्टर टूल न्यूझीलंडच्या विजयाची शक्यता फक्त दोन टक्के सांगत होतं.

क्रिकेटप्रेमींच्या अंदाजाचे ते दोन टक्के त्यानंतरच्या तीन तासांमध्ये १०० टक्क्यांमध्ये परावर्तित झाले. न्यूझीलंडनं ठेवलेल्या लक्ष्याची छोटी वाटणारी टेकडी भारतीय फलंदाजांसाठी हिमालयासारखी झाली. परिणामी लॉर्ड्सवर अंतिम सामन्यात खेळण्याची तीन तपांनंतर आलेली संधी हातची निसटली.

साखळीमध्ये चांगला खेळ करीत नऊपैकी सात सामने जिंकणारा भारताचा संघ नेमका बाद फेरीच्या लढतीत असा कसा गळपटला? काय आहेत पराभवाची कारणं?

१) मधली फळी आश्वासक आणि निर्णायक खेळ करण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरली.
२) चांगली सुरुवात करून, न्यूझीलंडच्या फलंदाजांवर दडपण आणून आणि धावांना खीळ घालूनही नंतर गोलंदाजांनी हातातला लगाम सैल सोडला.
३) ऑफ स्टंपबाहेरच्या चेंडूची पाय न हलवता जागेवरूनच छेड काढण्याची जुनी खोड पुन्हा दिसून आली.
४) अपवाद वगळता क्षेत्ररक्षण खराब झाले. घेण्यासारखे पण न झालेले किमान तीन झेल; एकाच चेंडूवर दोन ओव्हर-थ्रो या चुका ठळकपणे जाणवल्या. फलंदाजी मजबूत(?) करण्याच्या नादात घेतलेल्या यष्टिरक्षकांच्या मर्यादा वर्तुळाबाहेर क्षेत्ररक्षण करताना दिसून आल्या.
५) आधीच्या सामन्यांचा अनुभव असूनही फिनिशर धोनीकडून अपेक्षा करण्याची चूक नडली.

या सामन्याआधी भारताचा पराभव करणं फक्त इंग्लंडला साखळीत साधलं होतं. धावांचा पाठलाग करताना संघ हरला. त्या वेळी असलेलं ३१ धावांचं अंतर या वेळी १८ धावांचं झालं. पण इंग्लंडचं आव्हान तीनशेहून अधिक आणि उपान्त्य सामन्यात ते जवळपास नव्वद धावांनी कमी होतं. संघानं खेळलेल्या एकूण चेंडूंच्या दोन तृतीयांशपेक्षा थोडे अधिक चेंडू खेळणारे आणि एकूण धावसंख्येच्या दोन तृतीयांशहून थोड्या कमी धावा केलेले पहिले तीन फलंदाज एकाच वेळी अपयशी ठरले तर काय? भारताची विजयी दौड सुरू असताना हा प्रश्न वारंवार विचारला गेला. पण ती समस्या उद्भवली नाही, म्हणून तिचं उत्तर शोधण्याची तसदी कोणाला घ्यावी वाटली नाही. त्याच दाबून ठेवलेल्या दुखण्यानं नेमकी महत्त्वाच्या सामन्यात उचल खाल्ली. पराभवाचं हे एक कारण. मधल्या फळीत एका दमदार फलंदाजाची गरज होती, असा साक्षात्कार प्रशिक्षक रवी शास्त्री यांना संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यावर झाला!


रोहित शर्माला बाद केल्यानंतर 
आनंद गगनात न मावणारा मॅट हेन्री.
(सौजन्य : www.dailymail.co.uk)
लोकेश राहुल, रोहित शर्मा व विराट कोहली, पहिल्या १९ चेंडूंमध्येच एका मागोमाग एक बाद, असं स्पर्धेत पहिल्यांदाच घडलं. या तिघांना अपयशाबद्दल तेवढा दोष देता येणार नाही. एवढं नक्की की, न्यूझीलंडच्या गोलंदाजांना त्यांनी थोडं जास्तच डोक्यावर चढवून ठेवलं. दोन्ही सलामीवीर बाहेरचा चेंडू खेळण्याच्या मोहात झेल देऊन बसले, तर कर्णधार कोहलीला क्रॉस खेळणं नडलं. अशा परिस्थितीत अनुभवी दिनेश कार्तिक, तरुण-तडफदार ऋषभ पंत व हार्दिक पंड्या यांची जबाबदारी होती.

एकेरी-दुहेरी धावा घेत धावफलक बऱ्यापैकी हालता ठेवणाऱ्या पंत-पंड्या जोडीनं नंतर डावखुऱ्या मिचेल सँटनेरचा बाऊ केला. त्याला चौकार मारता येत नसतीलही; पण चेंडू ढकलून स्ट्राईक बदलणं शक्य नव्हतं का? हे दोघेही नंतर हेच दडपण झुगारण्याच्या प्रयत्नात आणि त्यासाठी काही तरी चमकदार करून दाखविण्याच्या आमिषाला बळी पडले. त्यांना बाद करणाऱ्या सँटनेरचं पहिल्या टप्प्यातील गोलंदाजीचं पृथक्करण होतं - ६-२-७-२. सीमारेषेवर झेल देऊन पंत बाद झाला, तेव्हा हे सारं न पाहवून विराट लगेच प्रशिक्षकाकडं गेला. ये क्या हो रहा है?’, असंच जणू त्याला विचारायचं होतं.

मधल्या फळीचं अपयश पहिले तीन फलंदाज आणि गोलंदाज यांनी साखळीत झाकून ठेवलं. त्याचा अंदाज येऊन संघाच्या व्यवस्थापनानं काही बदल करायला हवे होते. धोनीला अशा परिस्थितीत चौथ्या क्रमांकावर संधी देण्याचा विचार का केला गेला नाही? त्यामुळं या बुजुर्ग खेळाडूला त्याच्या डावाची घडी बसविण्यासाठी पुरेसे चेंडू मिळाले असते. तो खात असलेल्या चेंडूंचं दडपण समोरच्या फलंदाजांवर आलं नसतं. धावफलक हलता नाही, एकेरी-दुहेरी धावा निघत नाहीत यामुळे अस्वस्थ होऊन कोहली बाद झाल्याचं दोन सामन्यांमध्ये पाहायला मिळालं होतंच की.

शेवटच्या षट्कांमध्ये धावांचा वेग वाढविण्यात फलंदाज जसे अपयशी ठरले, तसेच गोलंदाजही शेवटच्या षट्कांमध्ये काबू ठेवण्यात फिके पडले. न्यूझीलंडनं शेवटच्या १० षट्कांमध्ये ८४ धावांची भर घातली. दुसऱ्या दिवशी त्यांनी २३ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या. अंतिमतः त्याच आपल्याला महाग गेल्या, असं म्हणता येईल. ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री व लॉकी फर्ग्युसन यांनी पहिल्या काही षट्कांमध्ये जेवढा तिखट मारा केला, त्याची झलकही अर्धा तास आधी जसप्रीत बुमराह व भुवनेश्वरकुमार यांच्या चार षट्कांमध्ये दिसली नाही.

विजय दृष्टिपथात आल्यावर प्रतिस्पर्धी संघाच्या शेपटानं चांगली वळवळ करावी, असा अनुभव किमान तीन सामन्यांमध्ये आला. विजय नक्की आहे, डाव गुंडाळलाच आहे, अशा समजुतीत गोलंदाज ढिले पडत होते की काय? पाकिस्तानविरुद्ध पावसानंतर झालेल्या पाच-सहा षट्कांमध्ये आपल्याला त्यांचा एकही फलंदाज बाद करता आला नाही. बांगला देशालाही ६ बाद १७९ अशा स्थितीतून आपण २८६ धावांची मजल मारू दिली. अफगाणिस्तानच्या शेपटाला ५० धावा करू दिल्या. इंग्लंडनं २८ ते ३७ या १० षट्कांत फक्त २५ धावा केल्या होत्या. मग बेन स्टोक्सनं केलेल्या आक्रमणापुढ हतबल होत आपण शेवटच्या १३ षट्कांमध्ये १२१ धावा दिल्या. थोडक्यात वळवळ थांबविण्याऐवजी शेपटाला फणा उगारण्याची संधी आपण दिली.

रवींद्र जाडेजाच्या झुंजार खेळीतील एक षट्कार.
(छायाचित्र सौजन्य : standard.co.uk)
अफगाणिस्तानचे फिरकी गोलंदाज, न्यूझीलंडचा सँटनेर यांच्यापुढे आपले फलंदाज मान तुकवत असताना आपल्या प्रसिद्ध मनगटी फिरकी गोलंदाजांची मात्रा फारशी चालली नाही. कुलदीप यादवला सात सामन्यांमध्ये सहा आणि युजवेंद्र चहलला आठ सामन्यांमध्ये १२ बळी मिळाले. गोलंदाजीचा भार खऱ्या अर्थाने वाहिला तो बुमराह, महंमद शमी व भुवनेश्वरकुमार यांनी. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जाडेजा याच्याऐवजी कुलदीपला खेळवायला हवं होतं, असा सूर बऱ्याच माजी क्रिकेटपटूंनी, समीक्षकांनी लावला होता. जाडेजा नसताच तर? या सामन्यात गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि नंतर फलंदाजी या सर्वच बाबींत त्याने ठसा उमटवला. त्याने घेतलेले दोन सुरेख झेल, निकोल्सला मामा बनविणारा चेंडू आणि रॉस टेलरला धावबाद करणारी थेट फेक...हे सगळंच अव्वल दर्जाचं होतं. त्याच्या झुंजार व धुवाधार फलंदाजीमुळेच विजयश्री काही काळ खुणावत राहिली.

इतके जवळ आणि तरीही खूप दूर...
विश्वचषकातील शेवटच्या सामन्यात धोनी धावबाद.
धोनीच्या खेळण्यावर या स्पर्धेत बरीच टीका झाली. इंग्लंड व न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या पराभवाला त्याला प्रामुख्यानं जबाबदार धरण्यात आलं. ते मान्य नसलेला सचिन तेंडुलकर उपान्त्य सामन्यानंतर म्हणाला, प्रत्येक वेळी धोनीने येऊन सामना जिंकून द्यावा, अशी अपेक्षा करणं योग्य नाही. त्यानं अनेकदा ही कामगिरी केलेली आहे.हा पूर्वेतिहास लक्षात घेऊनच त्याच्याकडून अशी अपेक्षा केली जात होती. पण ती त्याच्याकडून पूर्ण झाली नाही, हे स्पर्धेत स्पष्ट दिसून आलं. त्यानं ३११ चेंडू खेळून २७३ धावा केल्या आणि स्ट्राईक रेट ८७.७८ आहे. पण हे आकडे सर्व चित्र स्पष्ट करीत नाहीत. चेंडू तटवून काढणारा किंवा ढकलणारा, एकेरी धावेस नकार देणारा धोनी समोरच्या फलंदाजावरचं दडपण वाढवत होता. न्यूझीलंडविरुद्ध खेळताना त्यानं अठ्ठेचाळिसाव्या षट्कापर्यंत एकही आक्रमक फटका का मारला नाही, याबद्दल प्रसिद्ध समीक्षक सिल्ड बेरी आश्चर्य व्यक्त करतात. अशा परिस्थितीत त्याच्यावर टीका होणार आणि पराभवाबद्दल जबाबदार ठरवलंही जाणार.

विजय मिळत असताना अनेक त्रुटी झाकल्या जातात. त्या सामान्य क्रिकेटप्रेमीच्या लक्षात येत नाहीत. पण हीच छोटी-मोठी दुखणी एकाच वेळी उद्भवली आणि त्याची परिणती निसटत्या, हळहळ वाटायला लावणाऱ्या पराभवात झाली. बुमराह आणि भुवनेश्वर पहिल्या दिवशी अगदी भरात असताना केन विल्यमसन व रॉस टेलर यांनी परिस्थितीशी ज्या पद्धतीने जुळवून घेतलं, ते कुणालाच जमलं नाही. न्यूझीलंडची गोलंदाजी अप्रतिम होती आणि क्षेत्ररक्षण तेवढंच उत्कृष्ट. त्या उलट आठव्या षट्कात हेन्री निकोल्स, बत्तिसाव्या षट्कात रॉस टेलर व अडतिसाव्या षट्कात जिमी नीशम यांचे झेल घेण्यात कुचराई झाली.

पराभवानं निराश झालेला तेंडुलकर म्हणाला की, भारतीय फलंदाजांनी राईचा पर्वत केला. या धावसंख्येचा पाठलाग करणं सहज शक्य होतं. प्रत्येक वेळी रोहित व कोहली यांनी भक्कम पायाभरणी करून द्यावी, असं त्यांच्यावर अवलंबून राहणं योग्य नाही. न्यूझीलंडच्या जलदगती गोलंदाजांनी अचूक व नेमका मारा केला. विल्यमसनचं नेतृत्व अतुलनीय होतं.

पराभवामुळं कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमी नाराज झाले असणार, हे ओळखून विल्यमसननं त्यांच्यासाठी खास संदेश दिला – तुम्ही फार रागावला नसाल, अशी आशा आहे. तुम्ही लक्षावधी मंडळी अतिशय उत्कटपणे प्रेम करता, तो खेळ खेळण्याचं भाग्य आम्हाला लाभलंय. आणि मला आशा आहे की, अंतिम सामन्यात आम्हाला कोट्यवधींचा पाठिंबा मिळेल!’

उपान्त्य सामन्याच्या दिवशी द न्यूझीलंड हेरल्डच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध केलेल्या बातमीचं शीर्षक आशावादी होतं - ‘Yes, We Kane’.

केन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी करून दाखवलं’!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेटवर्ल्डकप संकेतस्थळावर ८ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तान्ताचं शीर्षक फार बोलकं होतं - Kohli's fire or Williamson's ice? स्वभावानं दोन टोकांवर असलेले हे दोन कर्णधार.

शेवटी बर्फानं आपल्या गारव्यानं आगीचा लोळ गिळून टाकला, हे खरंच!

१८ टिप्पण्या:

  1. क्रिकेट म्हटले की आपली सिक्सर असणार हे उघड आहे.
    तशी ती आहेच !
    फक्त ती आणखीन संस्मरणीय ठरली असती जर अंतिम लढाईतील ती असती !
    अर्थात मग सारेच बदलते.... शब्दही.


    पण गणीत चुकले ते कसे ते साद्यंत वाचण्यास मिळाले
    वर्तमानपत्रात येतात तसा हा लेख नाही.
    समजून सांगण्याचा त्याचा टोन आहे , असे क्वचित वाचण्यास मिळते.

    असो.
    'भोपळा' हा शब्द लेखात वारंवार आलाय पण लेखास कोणीही पैकीच्या पैकी गुण देईल!
    - प्रदीप रस्से (जळगाव)

    उत्तर द्याहटवा
  2. अचूक विश्लेषण.भारतीय टिमची think tank कमी पडली असेच म्हणावे लागेल.सात सामने जिकंणा-या भारतीय संघाला हा सामना फारसा अवघड नव्हता.आपण सामना हरलो यापेक्षा आपण क्रिकेट खेळलो नाही हे खरेच.

    उत्तर द्याहटवा
  3. लेख छानच आहे. या लेखातून एक लक्षात येते की, भारत जिंकणार या अवसानानेच आपण आपली लेखणी पाजळून ठेवलेली असावी. दुर्दैवाने अवसानाचा घात झाला!

    भारतीय हवामान खाते आणी भारतीय क्रिकेट यांच्यात मला तरी फरक वाटत नाही. साहजिकच दोघांकडे दुर्लक्ष होते.
    - श्रीराम वांढरे, भिंगार (नगर)

    उत्तर द्याहटवा
  4. लेख अतिशय मार्मिक, मुद्देसूद. बहोत खूब! लिखाणाला तोड नाही. पराभव हा पराभवच आहे. आपल्या सध्याच्या जीवनशैलीत क्रिकेट महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यातील उत्कंठा वेगळेच समाधान देऊन जाते. या परिस्थितीत हा सामना व त्यातील पराभव विसरता येणारा नाही.
    - वसंत कुलकर्णी (पुणे)

    उत्तर द्याहटवा
  5. ओघवती भाषा, अप्रतिम लिखाण... सगळा लेखच वाचनीय!
    - बालाजी ढोबळे, परतूर (जि. जालना)

    उत्तर द्याहटवा
  6. फार छान निरीक्षणं. चौथ्या क्रमांकासाठी 'द वॉल' चेतेश्वर पुजाराचा पर्याय योग्य ठरला असता.
    - प्रा. दिनेश भंडारे

    उत्तर द्याहटवा
  7. अगदी अचूक विश्लेषण.
    - रवींद्र चव्हाण, पुणे

    उत्तर द्याहटवा
  8. अतिशय सुरेख लेख. नेमके मुद्दे, वस्तुस्थिती मांडली आहे. विचार करायला लावणारं लेखन.
    - सुधीर चपळगावकर, परभणी

    उत्तर द्याहटवा
  9. वास्तव उत्तम प्रकारे समोर ठेवणारे लेखन. लेख अप्रतिम असाच आहे.
    - प्रमोद शाह, पुणे

    उत्तर द्याहटवा
  10. अप्रतिम! पण वाचताना आपण हरलो याची खंत वाटत होतीच.
    - हरिहर धुतमल, लोहा (जि. नांदेड)

    उत्तर द्याहटवा
  11. लेख छानच झाला आहे. पण अजून तिखट टीका हवी होती.
    - अमित कुलकर्णी, चिंचवड (पुणे)

    उत्तर द्याहटवा
  12. खूप खोलवर निरीक्षण करून चिकित्सक वृत्तीने लिहिलेले परीक्षण आवडले...
    असेच वेगवेगळे विषय अभ्यासून लिखाण सुjt ठेवा. वाचायला आवडेल.
    -सुधा तुंबे

    उत्तर द्याहटवा
  13. अतिशय सुंदर शब्दात लेखाची मांडणी.
    बोलका लेख.
    नेमके मुद्दे मांडले
    लेख वाचताना हा एका खऱ्या क्रिकेट प्रेमी ने लिहलेला आहे
    असे जाणवते
    खूप छान लेख काका

    उत्तर द्याहटवा

रो-को विजय

रोक सको तो रोक लो... तीन सामन्यांमध्ये दोन शतकं! ............ मायदेशात कसोटी मालिका गमावल्यानंतर पंधरवड्याच्या आतच भारताने दक्षिण आफ्रिकेवि...