शुक्रवार, १५ मार्च, २०१९

संन्याशाकडून व्यवहाराचा ‘धडा’



प्रयागराजच्या त्रिवेणी संगमाचं दर्शन चिरंजिवाच्या कॅमेऱ्यातून.

चिरंजीव अलाहाबादला गेले होते गेल्या आठवड्यात. हल्लीचं प्रयागराज. तिथं पोहोचल्यापासून तीन-चार दिवस आणि आता घरवापसी झाल्यानंतरही त्याच्या बोलण्यात शहराचं नाव इलाहाबाद असंच येतं. लोकांनी बिनचूक मराठी बोलावं, ह्याची जबाबदारी आपल्या (एकट्याच्याच) खांद्यावर असल्यागत मी नेहमी टोकत असतो. त्या बाण्याला जागून त्यालाही म्हटलं, अरे बाबा, इलाहाबाद नाही, ‘अलाहाबाद!’ हे ऐकून त्यानं शांतपणे उत्तर दिलं, ‘‘अहो बाबा, तिथं सगळे इलाहाबादच म्हणतात. मग आपण कशाला वेगळं काही नाव घ्यायचं?’’

ज्या कामासाठी चिरंजीव गेले होते, ते काम पाचऐवजी दोन दिवसांतच आटोपलं. थोडक्यात अपेक्षित काम झालं नाही. तिथून पुढं लखनौला जायचं होत. त्याला अवकाश होता. आता तीन दिवस मिळालेले. काय करणार? त्याला सांगितलं की, गेलाच आहेस, तर प्रयागराज पाहून घे. कुंभमेळा झाला आहे. नवीन काय काय झालं आहे ते बघ. तिथं खाण्यासाठी कुठं नि काय प्रसिद्ध आहे, याचा शोध इंटरनेटवर घेतला. ठिकाणांची ती यादी पत्त्यासकट त्याला इ-मेलने पाठवून दिली. अपेक्षा होती की, त्यातलं काही चांगलंचुंगलं तो आठवणीनं घेऊन येईल. त्यानं त्या चांगल्याचुंगल्याच्या फक्त चविष्ट आठवणी आणल्या सोबत.

मुलगा आणि त्याचा मित्र, असे दोघे होते. ते दोन-तीन दिवस इलाहाबादमध्ये भटकत राहिले, चवीनं इथे तिथे चरत राहिले. आनंदभवन पाहिलं. त्याचा पंडित नेहरूंबद्दलचा आदर थोडा वाढला. एका संग्रहालयाला भेट देऊन आले दोघेही. त्रिवेणी संगम पाहून, नद्यांच्या पात्रांचं भव्य स्वरूप डोळ्यांत साठवून दोघं परतत होते. अर्थातच कुठे तरी, काही तरी नवीन खायचं, याची चर्चा करीत.

खाऊगल्लीचा शोध सुरू असताना रस्त्यात एक नागा साधू या दोघांच्या मागे लागला. कुंभमेळा अगदी परवाच संपल्यानं साधू-संन्यासी बरेच होते अजून तिथं. तसंही तीर्थक्षेत्र असल्यानं तिथं ते कायमच असणार.

'कुछ दे दो, खाने के लिए कुछ तो दो...' या नागा साधूनं दोघांच्या मागे लकडा लावला. जाऊ द्या कटकट असं स्वतःलाच सांगत मुलाच्या मित्रानं त्याला दहा रुपयाचं नाणं दिलं. काही दिलं, तर काही मिळायलाही हवं ना! ते तत्त्व लक्षात ठेवून साधूला मागं सोडून जाता जाता तो हळूच म्हणाला, 'बाबाजी, आपने दान लिया, फिर आशीर्वाद तो दिया नही...'


अलाहाबादेत कुंभमेळ्यासाठी आलेला नागा साधू.
(प्रातिनिधिक छायाचित्र संकेतस्थळावरून साभार)
ही 'पासिंग कमेंट' नागा साधूनं ऐकली नि लगेच या दोघांना परत बोलावलं. एकानं दिलं नि दुसऱ्यानं खिशात हातही घातला नाही, हे त्याच्या लक्षात आलं होतंच. त्यामुळे त्यानं चिरंजीवांवर लक्ष केंद्रित केलं. त्याच्या अंगावरच्या छान दिसणाऱ्या जर्कीनला हात लावत साधूनं विचारलं, ‘ये फाड दूँ क्या?’’

मुलगा म्हणाला, ‘‘नही बाबाजी...’’

'हाँ, कह दो' साधूनं फर्मावलं. मुलानं 'होय' असं उत्तर दिल्यावर तो म्हणाला, ‘‘नही, ऐसा कभी नही करूँगा। भगवान शिवजी ने कहां तो भी नही।’’

पुढं लगेच त्यानं थप्पड मारण्यासाठी हात उगारला आणि विचारलं, ‘‘मारू का?’’

मुलाचं उत्तर स्वाभाविकपणे नकारार्थी होतं. नागा साधू म्हणाला, ‘‘पुन्हा नाही? होय म्हण.’’

त्यानंतर मुलाच्या तोंडून निघालेला होकार ऐकल्यावर साधूबाबा म्हणाले, ‘‘नाही रे बाबा, तुला मारणार नाही. कशाला मारू? भगवान शिवशंकरांनी सांगितलं, तरी नाही मारणार तुला.’’

आता साधूमहाराजांचे डोळे मुलाच्या बुटांकडे वळले. ते बऱ्यापैकी किमतीचे आहे, हे लक्षात घेऊन विचारता झाला, ‘‘याच्यावर पाय देऊ का?’’

पुन्हा तोच संवाद - नाही आणि होय. होय म्हटल्यावर साधूकडून पुन्हा भोळ्या सांबाची साक्ष. तसं काही करणार नाही. कदापि!

‘‘तुम्हारा पर्स कहाँ है?’’, नागा साधूनं विचारलं आणि फर्मावलं, ‘‘दिखाओ तो जरा...’’

पँटच्या खिशातलं पाकीट काढून मुलानं उघडून दाखवलं.

साधूनं त्यातली एकमेव नोट उचलत विचारलं, ‘‘ही मी घेऊ का?’’

तोच खेळ पुनःपुन्हा. हे माहीत झाल्यानं आणि आधी झालेल्या संवादांवर (आणि साधूबाबांवर) (नको तेवढा) विश्वास ठेवून चिरंजीव उत्तरले, ‘‘हो, घ्या की!’’

तीच संधी साध बेटा, ठीक है। पैसे कोन छोडता..?’’ असं म्हणत नागा साधूमहाराजांनी ती नोट जवळच्या झोळीत टाकली!

ती नोट पाकिटातून झोळीत स्थलांतरित होत असताना, आपण कुठं नि कसं फसलो, याची जाणीव चिरंजीवांना झाली. कुछ लिया, मगर कुछ दिया तो नही, हे विचारलं जाईल, एवढं लक्षात घेऊन साधूबाबा या वेळी वागले. त्यांनी त्या नोटेच्या बदल्यात चिरंजीवांना रुद्राक्ष दिलं एक. आपण कसे फसलो, याचा विचार करतच हे दोघं वाटेला लागले. दुःखात सुख एवढंच होतं की, पाकिटातली एकमेव नोट पन्नासची होती.

घरी परतल्यावर एक दिवसानं हा सगळा किस्सा सांगून चिरंजीव म्हणाले, ‘‘पन्नास रुपये गेले. बरं झालं तेवढीच नोट होती पाकिटात. पण मार्केटिंग कसं करायचं असतं, हे शिकलो त्याच्याकडून.’’

त्याचा किस्सा आणि शिक्षणाबद्दल वाटणारी ओढ ह्याबद्दल सगळं शांतपणे ऐकून म्हणालो, ‘असो! मी नाही फसलो, तर पन्नास रुपयांत खूप काही शिकलो,’ हे सांगण्याचं मार्केटिंग तू आता करतो आहेस, एवढंच!’’

मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

शांत झालेला ज्वालामुखी

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीविरुद्धच्या लढाईतला सेनापती.

खऱ्या अर्थाने पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान असलेले अटलबिहारी वाजपेयी ह्यांचं निधन १६ ऑगस्ट रोजी झालं. देशानं आदल्याच दिवशी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला होता.

वाजपेयींचे मंत्रिमंडळातले खंदे (आणि विश्वासू) सहकारी जॉर्ज फर्नांडिस ह्यांचं निधन नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात, २९ तारखेला झालं. प्रजासत्ताक दिन साजरा होऊन तीनच दिवस झालेले. पण सोहळा अजून पूर्ण संपलेला नाही. ह्या सोहळ्याचा समारोप आजच्या बीटिंग रीट्रीट कवायतीनं होत असतो. बीटिंग रीट्रीट लष्करी परंपरा आहे. युद्ध संपवून, शस्त्र म्यान करून सैनिक सूर्यास्ताला आपल्या छावणीत परततात, त्या वेळचं संचलन. ह्याच दिवशी आयुष्यभर लढणाऱ्या एका सैनिकानं आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला. कायमचा.

जॉर्ज फर्नांडिस नावाच्या लढवय्यानं शस्त्र कधीच म्यान केलं होतं. त्याच्या लढायाही संपल्या होत्या. त्याची जाणीव त्यालाही नसावी. नियतीनंच हे केलं होतं. हजारो लोकांना संमोहित करणाऱ्या ह्या नेत्याला स्मृतिभ्रंशाच्या विकारानं कधीचं ताब्यात घेतलं होतं. जॉर्ज फर्नांडिस बरीच वर्षं सार्वजनिक जीवनापासून लांब गेले होते. त्यांचा अठ्ठ्याऐंशीवा वाढदिवस ३ जून रोजी झाला. त्यानिमित्त आठवण निघाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या, त्या दिवशी.

शायनिंग इंडियाची घोषणा फसली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं केंद्रातलं सरकार गेलं. त्यानंतर वाजपेयी सार्वजनिक कार्यक्रमांतून दिसेनासे झाले. जॉर्ज ह्यांचं तसंच काहीसं झालं. त्यांचा लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीत (२००९) मुझफ्फरपूरमधून पराभव झाला. पण पुढं नितीशकुमार यांनी त्यांना २००९-१०मध्ये राज्यसभेवर निवडून आणलं. त्या वेळी जॉर्ज थकले होते. एका मराठी दैनिकानं तेव्हा अभिरुचिशून्य वाटणाऱ्या भाषेत त्यांच्या विकलांग अवस्थेचं वर्णन करणारी मोठी बातमी प्रसिद्ध केली होती. जॉर्ज ह्यांनी बाजू बदलल्याबद्दलचा जुना सूड त्या बातमीतून घेतला, असं मानायला भरपूर वाव होता.

दोन शब्दांचं नातं जॉर्ज ह्यांच्याशी कायम जोडलं गेलं. पहिला शब्द म्हणजे जायंट किलर. स. का. पाटील (ज्यांचा उल्लेख आचार्य अत्रे यांनी कायम सदोबा असाच केला.) म्हणजे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणविले जाणारे काँग्रेसचे नेते. त्यांचा मुंबईतून पराभव होणं स्वप्नवत. जॉर्ज यांनी अर्धशतकापूर्वी तो चमत्कार घडवला. येस! वी कॅन... असं म्हणत बराक ओबामा यांनी इतिहास घडविला होता. त्याच्या खूप वर्षं आधी, म्हणजे त्याच १९६७च्या निवडणुकीत जॉर्ज ह्यांनी तेच सांगितलं होतं – तुम्ही स. का. पाटलांना पाडू शकता!’ तशी पोस्टर साऱ्या मुंबईत लागली होती. ह्याच पोस्टरनी दक्षिण मुंबई मतदारसंघात इतिहास घडला. संयुक्त समाजवादी पक्षाचे उमेदवार असलेल्या जॉर्ज ह्यांना लाख ४७ हजार ८४१ (म्हणजे ४८. टक्के) आणि स. का. पाटील यांना लाख १८ हजार ४०७ (म्हणजे ३८.८५ टक्के) मतं मिळाली.

जॉर्ज ह्यांच्याशी जोडून येणारा दुसरा शब्द म्हणजे फायरब्रँड लीडर. इंग्रजी शब्दकोशात त्याच्या दिलेल्या व्याख्या अशा :
firebrand (noun)
1 : a piece of burning wood
2 : one that creates unrest or strife (as in aggressively promoting a cause) : agitator
आणि
firebrand
When someone is known for being wildly devoted to a cause or idea, they're called a firebrand. A firebrand enjoys pushing buttons and stirring up passions.


जॉर्ज आणि मोदी.
मी जॉर्ज ह्यांना कधी पाहिलं नाही आणि त्यांचं भाषणही समक्ष ऐकलं नाही. पण त्यांच्याबद्दल वाचल्यावर हा नेता खरंच
फायरब्रँड होता, हे कळतं. त्यांना लावलेलं ते विशेषण अवाजवी, अतिरंजित नव्हतं. जॉर्ज फर्नांडिस म्हटलं की, अमिताभ बच्चन आठवतो. अँग्री यंग मॅन! व्यवस्थेविरुद्ध सतत लढणारा, तिला आव्हान देणारा नायक. ह्याच भूमिकेमुळं त्या दोघांनाही मोठ्या प्रमाणात चाहते मिळाले. सामान्य माणसाच्या मनात असलेली खदखद त्यांनी समर्थपणे व्यक्त केली – अमिताभनं पडद्यावर आणि जॉर्ज ह्यांनी थेट समाजकारणात, राजकारणात. सतत अस्वस्थ राहणं, संघर्ष करीत राहणं, हे अमिताभनं भूमिकांमधून साकारलं. जॉर्ज त्या भूमिका जगले!

अनुयायांना चिथावणी द्यायची, आंदोलनं पेटवायची आणि आपण लांब राहून मजा पाहत राहायची, असलं आधुनिक राजकारण-समाजकारण जॉर्ज ह्यांनी केलं नाही. देशभर गाजलेलं आणि ज्यामुळं त्यांचं नाव सर्वदूर पोहोचलं, ते १९७४चं रेल्वे आंदोलन ह्याची साक्ष देतं. त्याबद्दल जॉर्ज ह्यांच्या गेल्या वर्षीच्या वाढदिवशी अरुणा देशपांडे यांनी मुंबई तरुण भारतमध्ये लिहिलं आहे – साहेब, त्या आंदोलनादरम्यान तुम्ही रुळांवर झोपलात. पोलिसांनी तुम्हाला फरफटत ओढताना नकळत झालेल्या शारीरिक इजा आणि बसलेल्या मारामुळेच आज तुम्हाला अलझायमरसारख्या व्याधीशी सामना करायला लागत आहे याची जाणीव आम्हाला आहे.

आणीबाणीची चाहूल, आणीबाणीसदृश परिस्थिती किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा अशी ओरड सध्या सुरू आहे. काँग्रेसजनही त्यात मागे नाहीत. हे ऐकण्याच्या अवस्थेत जॉर्ज नव्हते, हे त्यांचं भाग्यचं. नाही तर त्यांनी आणीबाणी काय असते, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं दमन कसं असतं, हे खास जॉर्ज-शैलीत सुनावलं असतं. अरुणा देशपांडे ह्यांनी त्याच लेखात लिहिलं आहे - आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून, मुजोर आणि अविवेकी सरकारविरुद्ध लढणारा नेता तुम्ही एकटेच! इतर अनेक राजकीय पुढार्‍यांचे, देशातील विविध तुरुंग हेच जणू माहेरघर बनले होते... साहेब, तुम्ही किती रात्री तुरुंगात काढल्या असतील हे, ते अविवेकी सरकारच सांगू शकेल; मात्र तुमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून तुमच्या सहवासात राहताना, तुरुंगातील रात्र आणि कॅबिनेट मंत्र्याच्या घरातील रात्र, यात तुमच्यासाठी काहीच फरक नव्हता हे मला मनोमन पटलं.

जॉर्ज अनेकदा बदनाम झाले. खूप वेळा खलनायक ठर(व)ले. बडोदा डायनामाईट खटल्यानं तर त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसला पहिल्यांदा पराभूत करून जनता पक्ष सत्तेवर आलं आणि काही काळातच सरकार अडचणीत आलं. संसदेत मोरारजी सरकारच्या समर्थनाचं दणदणीत भाषण करणारे जॉर्ज दुसऱ्याच दिवशी चरणसिंग ह्यांच्या गोटात दाखल झाले. त्याही वेळी अनेकांना ते खलनायक भासले. जनता पक्षाच्या चाहत्यांनी त्यांना शिव्याशाप दिले.

केंद्रीय उद्योगमंत्री म्हणून जॉर्ज यांनी कोका-कोला, आयबीएम यांसारख्या विदेशी कंपन्यांना देशाबाहेर घालवलं. पण त्यामागचा त्यांचा उद्देश कोणी समजून घेतला नाही. विदेशी हटाव एवढीच त्यामागं जॉर्ज ह्यांची भूमिका नव्हती. सरकारी नियम धुडकावण्याची मुजोरी करणाऱ्या या उद्योगांना त्यांनी शिकवलेला हा धडा होता.


राष्ट्रीय लोकशााही आघाडीचे त्रिकूट.

कट्टर लोहियावादी असलेल्या जॉर्ज ह्यांच्या भूमिका जशाच्या तशा सगळ्यांनाच पटत नसल्या, तरी ते अनेकांचे लाडके जॉर्जच होते. सामान्य माणूस, कार्यकर्ता, पत्रकार, सहकारी नेते-मंत्री... सगळ्यांसाठी ते जॉर्जच होते. यात बदल झाला तो राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पहिले सरकार केंद्रात सत्तेत आल्यावर. जॉर्ज ह्यांनी प्रतिगामी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यावा, आघाडीचं निमंत्रक बनावं हा अनेक डावे, बुद्धिजीवी ह्यांच्या दृष्टीनं अक्षम्य गुन्हा होता. त्याबद्दल त्यांना काहींनी कधीच माफ केलं नाही. गुजरातमधील दंगलीनंतर त्यांनी नरेंद्र मोदी ह्यांना विनाचौकशी दोषी ठरवून शिक्षा देण्याचा आदेश दिला असता आणि त्यासाठी सरकारमधील आपलं पद पणाला लावलं असतं, तर कदाचित ते पुन्हा स्पृश्य झाले असते! पण ते घडलं नाही आणि मग विचारवंत, बुद्धिवादी यांच्यासाठी जॉर्ज म्हणजे कायमचा टिंगलीचा, तिरस्काराचा विषय ठरले. नौदलप्रमुख विष्णू भागवत यांच्या प्रकरणातही माध्यमे आणि विचारवंत ह्यांनी घेतलेल्या (एकतर्फी) सुनावणीत जॉर्ज ह्यांच्याविरुद्ध निकाल देण्यात आला.

संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार आलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधात होती. ती समर्थपणे चालविणारे वाजपेयी आणि जॉर्ज ह्यांचं जवळपास सर्वांनाच विस्मरण झालं होतं. पण मध्यंतरी एकदा जॉर्ज ह्यांची आठवण झाली ती चीनमुळे. या देशाबद्दल त्यांनी २२ वर्षांपूर्वीच इशारा दिला होता. त्याचा प्रत्यय जुलै २०१७मध्ये पुन्हा आला. भारतासाठी सर्वाधिक धोकादायक आहे तो चीन. पाकिस्तानच्या घौरी क्षेपणास्त्राची जन्मदात्री चीन आहे. चीनच्या हेतूंबद्दल काही प्रश्न विचारावे वाटण्याची (अंतःस्थ) गरज भासत नाही, ही चिंतेची बाब आहे, असं ते मे १९९८मध्ये म्हणाले होते. त्यानंतर बरोबर दहा वर्षांनी (मार्च २००८) त्यांनी हेच पुन्हा सांगितलं होतं, आजही चीन आपला संभाव्य धोका क्रमांक एक आहे आणि तो शत्रूही बनेल. भारत चीनला विकला गेला आहे.

ज्येष्ठ पत्रकार कस्तूर जी. वासुकी यांनी दीर्घ काळ जॉर्ज यांची कारकीर्द जवळून पाहिली, त्यावर लिहिलं. जॉर्ज ह्यांच्या निधनाची बातमी आल्यावर मनोरमा ऑनलाईनच्या इंग्रजी संकेतस्थळानं वासुकी यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणतात जॉर्ज म्हणजे साधा माणूस आणि जनसामान्यांचा मंत्री. कारवारच्या दौऱ्यात ते अचानक बेपत्ता झाले. शोधल्यावर दिसलं की, कुठलीही सुरक्षा वगैरे न घेता ते मच्छिमारांशी गप्पा मारत होते. ते नेहमीच सामान्य माणसांसाठी काम करीत राहिले. आपण राजकारणातला एक खरा, लढवय्या सैनिक गमावला आहे!

धगधगतं अग्निकुंड!


मंत्री असून स्वतःच मोटर चालविणारे जॉर्ज.

श्रीरामपूरच्या रंजना पाटील यांच्याकडे जॉर्ज ह्यांच्या अनेक आठवणी आहेत. आपल्या नेत्याचं वर्णन त्या धगधगतं अग्निकुंडअसं करतात. समता पक्षाच्या महिला आघाडीच्या अखिल भारतीय अध्यक्ष असताना त्यांनी १९९८मध्ये श्रीरामपुरात महिलांचे अधिवेशन आयोजित केले होते. संरक्षणमंत्री असलेले जॉर्ज त्याला आले होते. संरक्षणासारखं महत्त्वाचं खातं सांभाळणारा हा माणूस तेव्हाही तसाच राहत होता. मंत्री, खासदार, नेता असा काही आविर्भाव त्यांचा कधीच नव्हता. त्यांना कधी कुणी फर्नांडिससाहेब वगैरे म्हटलं नाही. सर्वांसाठी ते कायम 'जॉर्ज' राहिले. त्यांचे कपडेही साधेच असत. स्वतःच ते धूत. कडक सोडा, साधी इस्त्रीही नसे कपड्यांना. एकदा आम्ही म्हणालो, ‘कपड्यांना इस्त्री तरी...तेव्हा जॉर्ज यांनी हसून विचारलं होतं, ‘‘का बुवाह्या कपड्यात मी काय व्यंग्यचित्रासारखा दिसतो का काय?’’

‘‘हा माणूस म्हणजे कम्प्युटर होता. कोणताही माणूस एकदा पाहिला, त्याला भेटलं, त्याच्याशी बोललं कीह्यांच्या डोक्यात त्याची कुंडली तयार होई. ते त्याला कधीच विसरले नाहीत,’’ असं रंजना पाटील म्हणाल्या. मंत्री असताना त्यांच्या बंगल्याचं दार कधी बंद नसे; दारावर कधी सुरक्षारक्षक नसत. त्यांना ते मान्य नव्हतं. आपण समाजासाठी आहोत, समाज आपल्यासाठी नाही, असं ते नेहमी सांगत. कार्यकर्ता भेटल्यावर काय वाचतो, काय लिहितो, समाजासाठी काय करतोह्याचीच चौकशी ते करीत, असं रंजना पाटील यांनी सांगितलं.

---------

(छायाचित्रे विविध संकेतस्थळांच्या सौजन्याने.)

चंदनापुरीत भेटलेला अजिंक्य रहाणे

  देखणा फटका... ही बॅट आता निवृत्त झाली! (छायाचित्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सौजन्याने.) .......................................... ...