शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

दृष्ट लागू नये म्हणून...

एका नेत्याचे भाषण, दुसऱ्याने दिलेले दूषण
कामाचे आश्वासन आणि विकासाचे प्रलोभन
रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे गेलेला कोणी एक
गढूळ पाणी, तुंबलेले गटार, प्रश्न तसेच अनेक
आळसावलेली, ओझं कामाचं लादलेली
नेहमीसारखीच होती ती दुपार खंतावलेली
बातम्या ऐकता-पाहताना, संपादित करताना
तुच्छतेच्या पिचकाऱ्या, तिरस्काराच्या ओकाऱ्या
याला कुठं कळतं, त्याला काय समजतं?
कण्हत आणि कुथत, नेलं तसंच काम रेटत

अचानक हाती आली बातमी एक,
अडचणीत धावलेला व्यापारी नेक
आयुष्यभराचा ठेवा त्यांनी गोणीत ठेवला
तसाच उचलून गहू अडतीवरती विकला

आठवल्यावर धाय मोकलून रडू लागली आजी
काय आणली आफत देवा, गफलत झाली माझी!
फोन करून अडत्याला, झाला प्रकार सांगितला
तो तर म्हणे, गहू घेतल्या घेतल्या बाहेरगावी नेला
ऐकला आजीचा टाहो, धीर देत देत म्हणाला,
थांबा थोडं, बोलवतो गाडीसह ड्रायव्हरला
"कहाँ हो भाई? अजून गहू नाशकात पोचला का नाही?
नाही! आहेस तिथून ये परत, कारण नको सांगू काही'
ड्रायव्हर धास्तावला, रिव्हर्स टाकला नि तसाच फिरला
गव्हाच्या भरलेल्या पोत्यांसकट गाडी थेट गोदामाला
आजी होती, आजोबा होते, तिथंच होता की अडती
पहिल्याच पोत्यात होतं गठुळं, दागिन्यांनी भरलेलं
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर आनंदाचं झाड डवरलं!
सगळ्यांदेखत फोडलं ठिकं, सोनेरी गहू जमिनीवरती
.
.
. 
खूप दिवसांनी एवढी मस्त, बातमी लागली हाती
प्रामाणिकपणाच्या दुर्मिळ गुणाची नक्षी तिला होती
अँकर करू, फ्लायर करू, कशी कशी तिला सजवू?
मथळा किती बोलका करू नि कोण्या रंगात नटवू?

पॉलिटिक्‍स, सेक्स, क्राईम आणि अध्यात्म
यामध्येच असते ताज्या बातम्यांचे माहात्म्य
त्याच पानावरच्या कोपऱ्यात प्रामाणिकपणाची चौकट
रक्तरंगात एक हिरवा कोंब; दृष्ट लागू नये म्हणूनच तीट!
.....
(पूर्वप्रसिद्धी  : सकाळ साप्ताहिक दिवाळी अंक २०१५)
.....
#कविता #बातमी #अडत_बाजार #सोनेरी_गहू #हतबल_आजी
.....



बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

‘मी बोललंच पाहिजे असं नाही’

 (सौजन्य : https://en.wikipedia.org)
घरात रेडिओ सुरूच असायचा. करमणुकीचं तेव्हाचं ते एकमेव साधन होतं. पुणे, मुंबई ब आणि सिलोन ही केंद्रं त्यावर आलटून-पालटून चालू असत. पुणे-मुंबई केंद्रांवरची गाणी कानावर पडत राहिली. खूप खूप वेळा ऐकून ऐकून त्यातली काही आवडायला लागली. आधी संगीत, मग स्वर आणि शेवटी शब्द, असा तो कळण्याचा जमाना होता. लिहायला-वाचायला शिकल्यावर ही गाणी मंगेश पाडगावकरांची आहेत, हे समजलं. त्यातल्या काहींनी आनंदाच्या क्षणी साथ दिली, काहींनी रिकाम्या वेळेत गुणगुणायला मदत केली आणि काहींनी एकटेपणी अधिक हळवं केलं!

कविता फारशी कळत नाही; पण तरीही छोटा-मोठा, लोकप्रिय, एकांतप्रिय, शब्दप्रिय, शब्दबंबाळ... असे कवी आणि कविता अनुभवानंतर जाणवायला लागल्या. मंगेश पाडगावकर गीतकार म्हणून अधिक आवडीचे.

या महान कवीशी थेट बोलण्याची संधी एकदाच मिळाली. अगदी समोरासमोर. एक-दीड मिनिटाचाच तो संवाद होता. माझा थेट प्रश्न आणि त्यांचे नेमकं, मोजक्या शब्दांतलं उत्तर.

एकवीस वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे हा. 14 फेब्रुवारी 1995. महाराष्ट्रप्रांती तेव्हा व्हॅलेंटाईन डे अजून बोकाळला नव्हता. प्रेमदिन असं त्याचं वृत्तपत्रीय अभिजात मराठीकरणही तेव्हा झालं नव्हतं. त्या दिवशी नगरच्या नगर महाविद्यालयात स्वर-संवाद असा कार्यक्रम होता. मंगेश पाडगावकर यांची मुलाखत आणि दोन प्रश्नांच्या दरम्यान स्थानिक महाविद्यालयीन कलाकारांनी सादर केलेली त्यांची गाणी, असं त्याचं स्वरूप होतं.

परभणीचं गाजलेलं साहित्य संमेलन नुकतंच झालं होतं. (साहित्य संमेलनाचं यश जमलेल्या गर्दीवरून मापण्याची सवय परभणीनं लावली आणि दोन वर्षांनी नगरच्या संमेलनात त्याचा अतिरेक झाला!) तर त्या परभणीच्या संमेलनात निसर्गकवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना. धों. महानोर यांच्या मुलाखतीनं खळबळ उडवून दिली होती. करंदीकर, बापट, पाडगावकर यांनी काव्यवाचनाची गोडी घालवली असा बॉम्बगोळाच त्यांनी टाकला होता. त्याच सुमारास त्यांनी एका लेखात ‘‘बिजली, धारानृत्य हे खऱ्या अर्थाने पाडगावकरांचे प्रातिनिधिक संग्रह नाहीत, अभिव्यक्तीच्या अप्रामाणिकपणाचा त्यांनी अतिरेक केला, अशी स्फोटक विधानं केली होती. पाडगावकर आणि महानोर यांच्यात नेमकं काय बिनसलंय ते ठाऊक नव्हतं. मंचीय कवींबद्दल महानोरांनी एकदम शस्त्र का परजलं, हेही माहीत नव्हतं. (याच महानोरांनी पुण्यातल्या साहित्य संमेलनात विंदा करंदीकर यांचं आपल्यावर किती प्रेम होतं, हे सांगणारं पाल्हाळिक आख्यान लावलं होतं. तर ते असो!)

तेव्हा मी लोकसत्तामध्ये काम करीत होतो. नगर महाविद्यालयात शिकणारा अभय जोशी तिथंच मुद्रितशोधक होता. स्वर-संवादचा सूत्रधार तोच होता. माझं वाचन आणि गाण्यातला माझा कान, याबद्दल मनात असलेल्या गैरसमजातूनच त्यानं मला या कार्यक्रमाला येण्याचं खास आमंत्रण दिलं. (कार्यक्रमाची बातमी यावी, हा त्यामागचा खरा हेतू होता, हे मला नंतर खूप वर्षांनी उमगलं. म्हणजे अभयचा गैरसमज असल्याचा गैरसमज माझाच होता तर!)

एवढा मोठा कवी थेट पाहायला मिळणार, त्याचे शब्द ऐकायला मिळणार म्हणून कार्यक्रमाला मुद्दाम गेलो. महानोरांनी नुकत्याच तोफा डागल्या होत्या. त्याबद्दल थेट मंगेश पाडगावकर यांची प्रतिक्रिया मिळाली, तर मोठी बातमी आपल्याला मिळेल, असाही उद्देश होताच. प्रश्न होता, त्यांना भेटायला कसं मिळणार? मी काही कुणी नाव असलेला पत्रकार नव्हतो. (आणि नाहीही!) त्यांना गाठायचं कसं आणि विचारायचं कसं?

सुदैवाने कार्यक्रमस्थळी जातानाच पाडगावकर भेटले. आम्ही दोघेही समोरासमोर. पहिल्याच क्षणी लक्षात आले ते त्यांचे प्रसिद्ध डोळे आणि दाढी. जाड भिंगाच्या चष्म्यातून समोरच्याचा आरपार वेध घेताहेत, असं वाटणारी त्यांची नजर. ओळख दिली आणि महानोरांच्या मुलाखतीचा, लेखाचा संदर्भ देत पाडगावकर यांना प्रश्न विचारला.

चेहरा आहे तसाच निर्विकार ठेवून पाडगावकर म्हणाले, ‘‘अनेक माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करतात, बोलतात आणि लिहितात. त्याबद्दल मी बोललेच पाहिजे असे नाही. कविता करणे आणि तुम्ही म्हटलात, तर त्या ऐकविणे माझे काम आहे. या विषयावर मी काही बोलणार नाही.’’

स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका. प्रश्नाला आवश्यक तेवढं उत्तर पाडगावकर यांनी दिलं. पुढचा प्रश्न विचारायच्या आधीच त्यांच्या सोबत असलेले त्यांचे नातेवाईक आणि नगर महाविद्यालयातील प्राध्यापक सुधीर शर्मा यांनी घाई केली. चला लवकर, कार्यक्रमाला उशीर होतोय... असं म्हणत त्यांनी पाडगावकर यांना हाताला धरूनच नेलं.

नंतर मग मुख्य कार्यक्रम रंगला. अभय जोशी आणि प्रज्ञा चासकर यांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते मोकळेपणाने बोलले. कलावंत, त्यांची सामाजिक बांधिलकी, कवी म्हणून प्रेरणास्थान, काव्यप्रेरणा कोणती अशा वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांनी हसत-खेळत उत्तरं दिली.

कलावंताचं स्वातंत्र्य महत्त्वाचं की, सामाजिक बांधिलकी महत्त्वाची?’, असं त्यांना अभय-प्रज्ञा यांनी विचारलं. त्यावर पाडगावकर म्हणाले होते, ज्याचा झेंडा जास्त फडकत असतो, तो विचार मानणे म्हणजे त्या काळाची बांधिलकी. पण तुमचे झेंडे मी कोण उचलणार? माणसाच्या जाणिवेचे, त्याच्या सुख-दुःखाचे रंग मानणारा मी, म्हणजे माझ्यातील कलावंत त्या रंगाचा झेंडा उचलतो. व्यक्ती म्हणून मी मला भावणाऱ्या कोणाही आदरणीय व्यक्तीच्या पायावर डोकं ठेवीन. पण कलावंत म्हणून कोणत्याही तत्त्वज्ञानाचा झेंडा खांद्यावर घेणार नाही. कलावंत म्हणून माझी जाणीव जीवनाला सामोरी जाणारी आहे. मी माणुसकीला बांधिल आहे...

कलेमध्ये निमित्ताला महत्त्व नाही. पुष्कळ वेळा सहज काही सुचून जातं. निर्मितीच्या प्रक्रियेला गूढरम्य आणि भावरम्य महत्त्व देण्याची गरज नाही, असं सांगताना पाडगावकर यांनी तिथं जमलेल्या अनेक भावी कवी-लेखकांच्या मनातील अद्भुतरम्य फेसाळ फुगे सहजपणे फोडून टाकले होते.

पाडगावकर तेव्हा न-गज़ल नावाचा प्रकार हाताळत होते. त्याच्या आगेमागेच चोली के पीछे क्या है...नं आजच्या शांताबाई किंवा पिंगासारखा धुमाकूळ घातला होता. त्याचं उदाहरण देताना त्यांनी चोलीचा संदर्भ दिला होता. ते म्हणाले होते, एका तरुणानं एका वेश्येला उद्देशून हे गाणं म्हटलं. त्यावर त्या वेश्येनं दिलेलं उत्तर म्हणजेच न-गज़ल.

चोली के पीछे कहूँ मी काय आहे?
ऐक रे भडव्या तुझी मी माय आहे!
हातभट्टी झोकल्या बारा जणांनी
रात्रभर तुडविलेली मी गाय आहे!

सुमा करंदीकर यांचं रास वाचलं. त्याच्या आगेमागेच कधी तरी यशोदा पाडगावकर यांचं कुणास्तव कुणी तरी... वाचलं. आपल्याला दिसणाऱ्या मनमोहक शब्दगुलाबाचे काटे कुणाला तरी बोचले आहेत, हे तेव्हा कळलं. मोठ्या वृत्तपत्रांमध्ये दर वर्षी जूनमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या पाडगावकरांच्या लिज्जतदार कवितांची आठवणीनं वाट पाहत होतो. कुणी तरी त्यांची त्यावरून पापडगावकर अशी उडवलेली खिल्लीही मनापासून आवडली होती.

त्या मिनिटभराच्या मुलाखतीत पाडगावकर जे म्हणाले होते, त्यातलं एक वाक्य फार महत्त्वाचं होतं - तुम्ही म्हटलात तर कविता ऐकविणे माझे काम आहे. म्हणजे महानोरांना त्यांनी थेट उत्तर दिलंच होतं त्यातून. बापट गेले, नंतर विंदा करंदीकरांनी अलविदा केलं. आज पाडगावकर. कवितांचा मंचीय आविष्कार साजरा करणाऱ्या त्रिमूर्तीतील शेवटचा तारा आज निखळला. खऱ्या अर्थानं आज पडदा पडला आहे!

शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

एका लढ्याचं चलच्चित्रण

(शरद जोशी यांच्या निधनाच्या बातमीनं गेल्या आठवड्यात अस्वस्थ व्हायला झालं. त्यांच्याबद्दल लिहावं, असं वाटत होतं. पण हवं तसं नाही जमलं ते. म्हणून तूर्त, ज्यांच्या लिखाणातून तरुणपणी शरद जोशी समजत गेले, त्या विजय परुळकर यांच्या योद्धा शेतकरी पुस्तकाबद्दल पाच वर्षांपूर्वी लिहिलेलंच इथं पुन्हा प्रसिद्ध करतो आहे.)

मागच्या गळीत हंगामात उसाची टंचाई भासेल, असा साखर कारखानदारांचा अंदाज होता. हंगामाच्या सुरुवातीलाच कारखानदारांनी घोषणांचा दणका उडवून दिला. शेतकऱ्यांना आपल्याकडे वळवलं पाहिजे; त्यांचा ऊस आपल्याच कारखान्याला आला पाहिजे. म्हणून मग त्यांनी पहिलाच हप्ता एकवीसशे-बावीसशे रुपये टनाप्रमाणं जाहीर केला.

मागच्याच वर्षी साखरेचे दर वाढले होतो. कारखानदार खुशीत होते. नंतर दर घसरले. कारखानदार नाराज झाले. त्यांनी बैठक घेतली. किमान अमूक-तमूक भावापेक्षा कमी दरानं साखर विकायचीच नाही, असा निर्णय घेतला. संघशक्ती.

उद्याच्या हंगामात उसाचा पहिला हप्ता किमान अडीच हजारांचा मिळावा, असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला तर? बहुतेकांचा ऊस शेतातच वाळेल. तो पेटवून द्यायची वेळ येईल.

तीस वर्षांपूर्वी उसाला 300 रुपये टन भाव मिळावा, म्हणून आंदोलन  झालं. तो भाव कसा परवडणारा नाही, हे सरकार, कारखानदार सांगत होते. त्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठ्या चालवल्या गेल्या. डोकी फोडण्यात आली त्यांची.

उद्याही आंदोलन झालं, तर व्यवस्था आणि यंत्रणा लाठ्या-काठ्या-बंदुकीनिशीच शेतकऱ्यांशी लढाई करील. तीस वर्षांपूर्वी लढणारा त्यांचा नेता आता पंचाहत्तरीत आला आहे. त्याचे सहकारीही पांगले आहेत.

या वेळचं पुस्तक त्या नेत्याचं, त्याच्या 30 वर्षांपूर्वीच्या अनोख्या लढ्याचं. शरद जोशी नाव त्या नेत्याचं. पुस्तक योद्धा शेतकरी. विजय परुळकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक पुण्याच्या राजहंसनं प्रकाशित केलं आहे. पहिली आवृत्ती कधीची याचा उल्लेख नाही त्यावर. अडीचशे पानांचा हा ऐवज अवघ्या 36 रुपयांना मिळत होता. हे पुस्तक मी जुना सहकारी मनोज पलसे याच्या माध्यमातून लेखकाची पत्नी सरोज परुळकर यांच्याकडून मिळवलं.

ऐंशीच्या सुरुवातीला नाशिक भागात उसाचं हे आंदोलन झालं. त्याचा हा आँखो देखा हाल... शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा होते शरद जोशी. संयुक्त राष्ट्रातली, स्वित्झर्लंडमधली नोकरी सोडून ते मायदेशी परतले. दारिद्र्याच्या प्रश्नावर खराखुरा उपाय शोधण्याचा प्रयत्न कुणी करीत नाही म्हणून अस्वस्थ होऊन.

ज्या काळात आपल्या बहुसंख्यांना टीव्ही. माहीत नव्हता, त्या काळात पाच वर्षं जर्मन टेलीव्हिजनचा वार्ताहर-कॅमेरामन म्हणून परुळकर यांनी काम केलं. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम संस्थेत त्यांनी दहा वर्षं काम केलं. सुखाची नोकरी सोडून, स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून भटकंती करणाऱ्या या दोघांचा हा प्रवास.

शरद जोशी भेटल्यापासून माझे डोळे स्वच्छ उघडले आहेत.... हे असंच चाललं तर आपण मरणार आहोत, ह्याची खात्री पटली आहे... माधवराव खंडेराव मोरे सांगत असतात. शेतकरी जमातीच्या झालेल्या तीन तपांच्या फसवणुकीचा स्फोट त्यांच्या शब्दाशब्दांच्या बॉम्बमधून होत असतो.

भरघोस पीक येऊन शेतकऱ्याचा चेहरा काळवंडलेला का? मग शरद जोशी भारत आणि इंडिया यातला फरक समजावून सांगतात. तुटीत लेव्हीची सक्ती आणि मुबलकतेमध्ये वाऱ्यावर सोडणं, हे सरकारचं शेतकऱ्याबद्दलचं धोरण समजावतात.

उसाला 300 रुपये टन भाव मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा निश्चय करून सुरू झालेलं हे आंदोलन. काय काय होतं त्यात? श्रीगोंद्यात गोळीबार होऊन त्यात नाना चौधरी हुतात्मा होतात. आताचे सत्ताधारी मंत्री तेव्हा त्या लढ्यात होते. पिंपळगाव बसवंतमध्ये आधी दोन हुतात्मा झालेले असतात. नंतर खेरवाडीमध्ये गोळीबारात दोघांना जीव गमवावा लागतो.

शेतकऱ्यांच्या या मागणीबद्दल तेव्हाच्या नेतेमंडळींच काय मत होतं? शेतकऱ्यांना भडकावलं तर गय करणार नाही!’ - मुख्यमंत्री जनाब अब्दुल रहमान अंतुले. ऊसआंदोलन करणाऱ्यांना शेतकऱ्यांचे हित कळत नाही. - महसूलमंत्री शालिनीताई. ऊसकरी शेतकऱ्याच्या हाती पैसा आला तर तो चैनी आणि व्यसनी बनेल. - प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष विखे. ऊस न देऊन साखर कारखान्यांची कोंडी करणं उचित नाही. - विरोधी पक्षनेते शरद पवार. अहो, तुमच्या या आंदोलनामुळं सगळे शेतकरी शहाणे होतील!’ - मंत्री तिडके.

निफाड, खेरवाडी, लासलगाव इथं रेल रोको-रास्ता रोको आंदोलन सुरू झालं. मुंबई-आग्रा महामार्ग चार दिवस अडवण्यात आला. राखीव पोलिसांनी लाठ्या चालवल्या, गोळ्या झाडल्या. माध्यमांनी विरोधकाची भूमिका बजावली. अडलेल्या वाहनांच्या चालकांना गावकऱ्यांनी चटणी-भाकर खाऊ घातली, चहा पाजला.

हे पुस्तक नव्हे; एक दस्तऐवज आहे. परवा परवा घडलेल्या इतिहासाचं हे सारं जिवंत चित्रण आहे. इंडियात राहूनही भारताच्या प्रश्नांची जाण करून देणारं. डोळ्यांत अंजन घालणारं. शरद जोशी, मोरे, माधवराव बोरस्ते, शंकर वाघ आणि या साऱ्यांचं नेमकं चित्र उभं करणारं. एका आगळ्या लढ्याची ही धारदार कहाणी. डोळ्यांत पाणी आणणारी. त्यांच्या आजन्म व्यथेची जाणीव देणारी. दुःख एवढंच की, लढाईचा मूळ मुद्दा तीन दशकांनंतरही कायम आहे!

(पूर्वप्रसिद्धी : 22 ऑगस्ट 2010)

अखेरचा राम राम, पावनं!

   डॉ. कुमार सप्तर्षी : सदर लेखन ते निवडणूक - पाहिलेला प्रवास  'लोकसत्ता'ची नगर आवृत्ती सुरू झाली आणि तिनं धमाका उडवून दिला. त्याचं ...