मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

विजयी सलामी

पेनल्टी कॉर्नर आणि गोल. पहिला गोल केल्याचा आनंद उपकर्णधार अमित रोहिदासच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतो आहे. (छायाचित्र सौजन्य - https://www.fih.hockey) खरोखर आहे की नाही, माहीत नाही; पण बहुसंख्य भारतीयांसाठी ‘आपला राष्ट्रीय खेळ’ अशीच हॉकीची ओळख आहे. त्याच खेळाच्या विश्वचषक स्पर्धेस ओडिशामध्ये सुरुवात झाली आहे. पाच वर्षांच्या खंडानंतर (धन्यवाद कोविड!) होणाऱ्या ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे ओडिशामध्ये होणारी ही सलग दुसरी स्पर्धा. स्पर्धेचं गुरुवारी उद्घाटन झालं आणि आजपासून लढतींना सुरुवात झाली. ‘अ’ आणि ‘ड’ गटातील प्रत्येकी दोन सामने आज झाले. दोन सामने मोठ्या गोलफरकाचे आणि दोन गोलफलकावरून चुरशीचे झाल्याचे वाटावेत, असे. गंमतीची गोष्ट म्हणजे चारही सामन्यांतील विजयी संघांनी प्रतिस्पर्ध्यांना आपल्याविरुद्ध गोल करण्याची संधी दिली नाही.  ‘ड’ गटात यजमानांनी विजयी सलामी दिली. दिवसातला हा शेवटचा सामना. ऑलिंपिकमधलं पदक आपण दीर्घ काळानंतर टोक्योमध्ये जिंकलं आणि हॉकी पुन्हा एकदा आकर्षणाचा विषय झाली. राऊरकेला इथल्या बिरसा मुंडा क्रीडागारात भारतीय संघानं अपेक्षांना तडा दिला नाही. एरवी सातत्यान...

स्पर्धा रंगतेय...

  राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा नगरच्या वाडिया पार्क मैदानावर रंगली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात फुललेली प्रेक्षक गॅलरी. ही गोष्ट साधारण तीन दशकांपूर्वीची. नगरमध्ये बहुदा पहिल्यांदाच निमंत्रितांची राज्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा कबड्डी संघटनेचं मुख्यालय श्रीरामपुरातून नगरला येण्याची चाहूल लागली होती. पुण्यात ‘केसरी’ कार्यालयात भेटलेल्या कबड्डीमहर्षी बुवा साळवे ह्यांच्याकडून तसा दुजोरा मिळाला होता. त्याच स्पर्धेत मुंबई उपनगराचा बलदंड सुनील जाधव आणि महाकाय सागर बांदेकर ह्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळाली होती. नगरच्या न्यू आर्ट्स मैदानाच्या प्रशस्त मैदानावर निमंत्रित संघांची स्पर्धा रंगली होती. त्यासाठी प्रसिद्ध खेळाडू, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर आल्या होत्या. त्यांची मी ‘केसरी’साठी मुलाखत मिळवली. मनमोकळेपणाने बोलल्या त्या. ‘मुलाखत प्रसिद्ध झालेला अंक पाठव बरं का,’ असं त्यांनी आवर्जून सांगितलं होतं. आशियाई स्पर्धेत कबड्डीचा नुकताच समावेश झाला होता. त्याचा संदर्भ देत शकुंतला खटावरकर ह्यांनी भविष्याचं चित्र रंगवलं होतं - ‘आंत...

महानायक

  कर्णधाराकडून महानायकाचे कौतुक दुबईत बरोबर ३६४ दिवसांपूर्वी इतिहास घडला होता. विश्वचषकाच्या कोणत्याही लढतीत भारतापुढं नांगी टाकण्याचा पराक्रम पाकिस्तानाच्या खात्यावर सलग बारा वेळा जमा होता. कोविडमुळं वर्षभर पुढं गेलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अव्वल साखळीमध्ये पाकिस्ताननं भारताला दहा गडी राखून हरवत उपान्त्य फेरी गाठली होती. स्पर्धा अखेरच्या टप्प्यात होती. कर्णधार बाबर आजम आणि यष्टिरक्षक महंमद रिजवान ह्यांनी दीडशे धावांचं आव्हान लीलया पेललं होतं. हा विजय पाकिस्तानसाठी कसा आवश्यक आहे, हे सांगणारा छोटासा व छानसा लेख त्या वेळी ‘द डॉन’ दैनिकात प्रसिद्ध झाला होता. रोहित शर्मा आणि के. एल. राहुल ही सलामीची जोडी तेव्हाही स्वस्तात बाद झाली होती. एक षट्कार आणि एक चौकार ठोकून मोठ्या धावसंख्येचं स्वप्न दाखवणारा सूर्यकुमार यादव दुहेरी धावसंख्येत गेल्यावर बाद झाला होता. तेव्हा लढला तो विराट कोहली. त्याचं अर्धशतक झालं होतं. वर्षभरापूर्वी विराटचं अर्धशतक बाबर-महंमद जोडीच्या नाबाद अर्धशतकांपुढे व्यर्थ ठरलं होतं. मेलबर्नच्या भव्य स्टेडियमवर ९० हजार प्रेक्षकांच्या साक्षीनं आणि त्यांच्या कल्लोळात विराट...

अफाट, अचाट...अर्थात विराट!

  एकच नंबर... टी-20 विश्वचषकातील आपला पहिला सामना साडेपाच वाजता संपला. त्यानंतरच्या साडेतीन तासांत, आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमांतून ‘विराट कोहली’ अशी अक्षरं लक्षावधी वेळा उमटली असतील. उमटत राहतील. विशेषणांचा वर्षाव झाला असेल. होत राहील. त्याची छायाचित्रं असंख्य क्रिकेटप्रेमींनी एकमेकांना पुढे पाठवली असतील. त्याच्या त्या दोन षट्कारांची क्लिप कोट्यवधी डोळ्यांनी पुनःपुन्हा पाहून, कितव्यांदा तरी दाद दिली असेल. विराटचं कौतुक होत आहे नि होत राहील. कोणत्या तरी वृत्तपत्रात उद्या ‘‘विराट’ खेळी’, ‘कोहलीमुळे भारताचा ‘विराट’ विजय’ अशा शीर्षकांनी बातम्या प्रसिद्ध होतील. ती अनेक वेळा वापरली गेली असली, तरी उद्या मात्र शिळी वाटणार नाहीत. विराटची आजची कामगिरीच तशी होती. अफाट, अचाट, विस्मयकारक, लाजवाब, अफलातून, खिळवून ठेवणारी... विशेषणं कमी पडावीत अशी. विशेषणांना विशेषणं लावावीत अशी. सामन्याच्या आधी राष्ट्रगीत झालं. ते संपता क्षणी कर्णधार रोहित  भाववश झाला. त्याची ती छबी पाकिस्तानचा डाव संपेपर्यंत साथीसारखी सर्व दूर गेली. डावऱ्या, शिडशिडीत, तरण्याबांड अर्षदीप सिंग ह्यानं कर्णधार बाबर आजमला अग...

दुःखाचा विसर, आशेचा बहर

  विजयाचा जल्लोष, देशबांधवांना दिलासा! देशबांधवांना खात्रीनं अन्नधान्याचा पुरवठा करता येईल, दैनंदिन गरजा पूर्ण होतील, आणीबाणीच्या परिस्थितीत मदत करता येईल...अशा विविध तातडीच्या कारणांसाठी श्रीलंकेला आशियाई विकास बँकेकडून ७३ अब्ज रुपयांचं कर्ज मदतीच्या स्वरूपात हवं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील ३७ राज्यमंत्री सचिवांविनाच काम करीत आहेत. जनतेच्या पैशाचा विनियोग अत्यावश्यक नि योग्य कामांसाठी व्हावा, ह्यासाठी त्यांनी आपल्या भत्त्यांवर पाणी सोडण्याची तयारी दाखविली आहे. सार्वजनिक क्षेत्रांतील कर्मचारी भरती बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. पाकिस्तानचा जवळपास एक तृतीयांश भाग पुराच्या तडाख्याने हतबल झालेला दिसतो. चौदाशे नागरिकांचा मृत्यू, चल-अचल संपत्तीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ह्या नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी पाकिस्तानला अब्जावधी रुपयांच्या मदतीची गरज भासेल. आमच्यापर्यंत मदत पोहोचलीच नाही, असा आक्रोश असंख्य पूरग्रस्त करताना पाहायला मिळतात. . , , ‘If you play good cricket, a lot of bad things get hidden.’ ...भारताला पहिल्यांदा विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघा...

१५ ऑगस्ट : नोंदी नि आठवणी

  ‘सोल्जर्स डिफेन्स एकेडमी’मधील ध्वजवंदन. पंधरा ऑगस्ट! त्याचा उत्साह जाणवणारा असतोच एरवीही. चौक सजतात. कर्ण्यांवर ‘मेरे देश की धरती...’, ‘हम जियेंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए...’ ही आणि अशी गाणी ऐकू येत असतात. रेडिओ चालूच असतो. त्यावरही आठवडाभर देशभक्तिपर गाणी ऐकू येत असतात. यंदाचा उत्साह किती तरी अधिक. खूप आधीपासून दिसणारा, खुणावणारा, अंगात वेगळंच रसायन भिनवणारा. ध्वजवंदनाला गेलो नाही, त्याला किती वर्षं झाली? आठवत होतो मागच्या आठवड्यात. मोजली नाहीत. कामाच्या वेळापत्रकामुळं अवेळी झोपायची नि अवेळी उठायची सवय लागलेली. ठरवूनही आणि गजर लावूनही सकाळी ठरल्या वेळी उठणं आणि आवरणं व्हायचं नाही. मग स्वाभाविकच चिडचिड. असे बरेच स्वातंत्र्यदिन नि प्रजासत्ताकदिन हुकले. मग दिवसभरात कुठल्या ना कुठल्या शाळेवर, सरकारी इमारतीवर, चौकातल्या तरुण मंडळाच्या मंडपावर डौलात फडकणारा तिरंगा दिसायचा. तो ओशाळेपणा पुन्हा जागा व्हायचा. एरवी रस्त्यानं जाताना एखाद्या शाळेत प्रार्थना नि राष्ट्रगीत चालू असलेलं ऐकायला आलं की, आपोआप थांबतो. पाय जुळवून पावलांमध्ये पंचेचाळीस अंशांचा कोन, हात सरळ नि मुठी वळलेल्या. किती वे...

भाजीमंडई...ताजी टवटवीत, हिरवीगार शाळा

बिकानेरला जाताना मध्य प्रदेशातील नयागांव येथे चहासाठी थोडाच वेळ थांबलो. पण तेवढ्या वेळात लक्ष वेधून घेतलं भाज्यांनीच. .................... 'तुमचा आठवड्यातला सर्वांत आवडता वार कोणता?' ह्या प्रश्नाला बहुतेकांचं उत्तर 'रविवार' येईल. बहुदा हे माहीत असल्यामुळंच उमाकांत काणेकर ह्यांनी गाणं लिहिलंय पूर्वी - 'रविवार माझ्या आवडीचा...' बच्चेकंपनीप्रमाणं मोठ्यांचीही ही आवड आहे, ह्यात नवल नाही. त्याच्या मागचं कारण साधं-सोपं आहे. तो अनेकांच्या सुटीचा वार असतो. साप्ताहिक सुटी. आठवडाभर काम केल्यानंतर (किंवा तसं केल्याचं साहेबाला दाखवल्याची कसरत आठवडाभर केल्यानंतर) येणारा हमखास विश्रांतीचा दिवस. असं आवडत्या वाराबद्दल आजपर्यंत तरी कुणी विचारलेलं नाही. समजा, कुणी ते काढून घेण्याचा प्रयत्न केलाच, तर सांगीन, 'आधी शुक्रवार आणि आता मंगळवार.' हे दोन्ही देवीचे वार. तुळजाभवानीचे आणि जगदंबेचे. इतक्या वर्षांच्या आणि तीन-चार वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये ह्या दोन वारांना साप्ताहिक सुटी कधीच आली नाही. त्या दिवशी कधी लॉटरी वगैरे लागलेली नाही. आयुष्याला फार मोठी (सुखद) कलाटणी ह्याच दोन वा...