गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२५

अफगाणी सनसनाटी

 चॅम्पियन्स करंडक - ४


चितपट! मिरवा रे पठ्ठ्याला...
इंग्लंडला हरवल्याचा आनंद साजरा करताना अफगाणिस्तानच्या नवीद ज़दरान ह्यानं
अजमतुल्ला ह्याला खांद्यावरच उचलून घेतलं!
(छायाचित्र सौजन्य : ‘द गार्डियन’)
..................................

धावांचा पाठलाग करताना इंग्लंड संघ पहिल्यापासून अठ्ठेचाळिसाव्या षट्कापर्यंत पुढेच होता. एकोणपन्नासाव्या षट्कात ते १० धावांनी मागे पडले आणि अखेर आठ धावांनी पराभूत. अफगाणिस्तानचा सनसनाटी विजय. श्रेय शतकवीर ज़दरान आणि अष्टपैलू अजमतुल्ला ह्यांना!
-------------------------------------------
सामना संपला. निकाल लागला. सामन्याचा मानकरी कोण?
शतकवीर इब्राहीम ज़दरान? पाच बळी घेणारा आणि ४१ धावा करणारा अजमतुल्ला ओमरजाई?
निर्णय घेणं मोठं कठीण होतं. पण ज़दरानचं पारडं जड ठरलं. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सर्वाधिक व्यक्तिगत धावा करणारा, अफगाणिस्तानला तीनशेच्या पार नेणारा ज़दरान ह्या ऐतिहासिक विजयातला सर्वांत मोलाचा खेळाडू ठरला!

अफगाणिस्तानच्या सनसनाटी म्हणाव्या, अशा विजयावर शिक्कामोर्तब करणारा बळी ह्या दोघांची संयुक्त कामगिरी होती. आदिल रशीदने सर्व ताकदीनिशी लगावलेला फटका ज़दरान ह्यानं लाँग ऑफला झेलला. गोलंदाज होत अजमतुल्ला!

फारसा गाजावाजा होत नाही, टीव्ही.च्या पडद्यावर आक्रमण करणाऱ्या जाहिरातींचा ओघ नाही, प्रेक्षकांनी तुडुंब भरलेली स्टेडियम नाहीत... अशा वातावरणात ‘नको नकोशी’ झालेली चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पुढे पुढे जात आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर आज झालेल्या चुरशीच्या सामन्याने तिला थोडी धुगधुगी मिळेल.

दुसऱ्यांदा लोळवलं
जागतिक स्पर्धेत इंग्लंडला सलग दुसऱ्यांदा लोळवण्याची कामगिरी अफगाणिस्ताननं केली. ही लढत धावांच्या पावसाची, तरीही मोठ्या अटीतटीची झाली. तिचा निकाल सामन्याच्या अखेरच्या षट्कात लागला. तोवर विजयाचा लंबक कधी इकडे, तर कधी तिकडे झुकत होता.

तीन-तेरा वाजणं म्हणजे काय, ह्याचा (कडवट!) अनुभव जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाला बुधवारी आला. विजयासाठी शेवटच्या १४ चेंडूंमध्ये १६ धावांची गरज आणि तीन गडी बाकी, अशी स्थिती होती त्यांची. पण मोक्याच्या १३ चेंडूंमध्ये अखेरचे तिन्ही गडी त्यांनी गमावले. धावा केल्या फक्त आठ एकेरी. त्यातले दोन बळी होते अजमतुल्ला ह्याचे. आणि उंच उडालेल्या फटक्यांचं झेलात व्यवस्थित रूपांतर करण्याची जबाबदारी महंमद नबी ह्यानं पेलली.

भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान संघ ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव करण्याच्या उंबरठ्यावर होता. त्या वेळी ग्लेन मॅक्सवेल आडवा आला. त्याला साथ दिली अफगाणी खेळाडूंच्या गचाळ क्षेत्ररक्षणाने. त्याचीच पुनरावृत्ती होण्याची चिन्हं लाहोरमध्ये दिसत होती. चेंडू अडवताना क्षेत्ररक्षक गोंधळत होते. फेकी व्यवस्थित होत नव्हत्या. ही सगळी दडपण आल्याचीच चिन्हं होती. मैदानावर सतत सळसळत्या उत्साहात असणाऱ्या रशीद खानकडून अठ्ठेचाळिसाव्या षट्कातील पहिल्या चेंडूवर एक अवघड झेल सुटला.

त्या जीवदानाचा फायदा आर्चरला घेता आला नाही. त्यानंतर फक्त तीन धावांची भर घालून तो बाद झाला. पण त्या षट्कात अफगाणिस्तानच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या त्या जेमी ओव्हरटनच्या बळीने. ह्या सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज होता जेमी. ते अपयश त्याला फलंदाजीतून धुवायचं होतं. शतकवीर जो रूटच्या साथीनं त्यानं अर्धशतकी भागीदारी करून यशाला खुणावलं होतं. पण अजमतुल्लाच्या हळुवार चेंडूनं घात केला. लाँग ऑनला महंमद नबीनं त्या झेलाचा सहर्ष स्वीकार केला. सामन्याचा निकाल तिथंच ठरला.

रूटचं सहा वर्षांनी शतक
सलामीवीर फिल सॉल्ट आणि जेमी स्मिथ लवकर बाद झाल्यावर दुसरा सलामीवीर बेन डकेट (३८) व जो रूट ह्यांनी तिसऱ्या जोडीसाठी ६८ धावांची भागीदारी केली. डकेट बाद झाल्यावर सगळी सूत्रं जो रूटनं स्वीकारली. एक दिवशीय सामन्यातलं त्याचं शतक तब्बल सहा वर्षांनी झालं! त्याचं ह्या आधीचं शतक मायदेशी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत होतं.


हताश, निराश...
संघाला विजयाजवळ आणलं, पण ध्येय पूर्ण होण्याआधीच बाद
झाल्यानं जो रूटला आपली निराशा लपवणं कठीण गेलं.
(छायाचित्र सौजन्य : आय. सी. सी. ) 
...........................

जो रूट ह्यानं किल्ला जवळपास लढवलाच होता. कर्णधार जोस बटलरला (३८) साथीला घेऊन त्यानं पाचव्या जोडीसाठी ८३ धावा जोडल्या. पुल मारायला गेलेल्या बटलरच्या बॅटच्या वरच्या भागाला लागून उडालेला चेंडू रहमत शहानं झेलला. तरीही सामना पूर्णपणे अफगाणिस्तानच्या बाजूने गेलेला नव्हता. दमलेला, स्नायू आखडलेला रूट जोमानं खेळत होता. चेंडूमागे धाव ह्या गतीनं शतक पूर्ण करणारा रूट यष्टिरक्षकाकडं झेल देऊन बाद झाला. त्याचा संघ तेव्हा विजयापासून ३८ धावा दूर होता.

धावांच्या पाठलागाचं समीकरण पाहिलं, तर अठ्ठेचाळिसावं षट्क संपेपर्यंत इंग्लंड अफगाणिस्तानच्या पुढेच होतं. एकोणपन्नासाव्या षट्कात ते १० धावांनी मागे पडले आणि अखेरच्या षट्कात आठ धावांनी पराभूत झाले.

यष्टिरक्षक सलामीवर रहमनुल्ला गुरबाज, सादिकुल्ला अटल, रहमतुल्ला शहा हे तिघे तंबूत परतले तेव्हा अफगाणिस्तानच्या धावा होत्या ३७. ही सगळी करामत जोफ्रा आर्चरच्या धारदार माऱ्याची. पण पहिल्या सहा षट्कांत २२ धावा देऊन ३ बळी घेणाऱ्या आर्चरच्या कामगिरीवर शेवटच्या चार षट्कांत पाणी पडलं. त्यात ४२ धावा निघाल्या.

ह्या पडझडीतून सावरलं सलामीवीर ज़दरान व कर्णधार हशमतुल्ला शाहिदी ह्यांनी. त्यांनी सावध खेळत १०३ धावाची भागीदारी केली. शाहिदी बाद झाला तिसाव्या षट्कात आणि संघाच्या धावा होत्या १४०. त्यानंतर ज़दरान ह्यानं टॉप गीअर टाकला. तो व अजमतुल्ला ओमरजाई (तीन षट्कारांसह ३१ चेंडूंमध्ये ४१) ह्यांनी ६३ चेंडूंमध्ये ७२ धावांची भागीदारी केली.

ज़दरानचा झंझावात

कृतज्ञ...
शतकानंतर इब्राहीम ज़दरान ह्याचे प्रेक्षकांना,
संघातील सवंगड्यांना अभिवादन.
(छायाचित्र सौजन्य : आय. सी. सी. )
......................... 
पुढच्या शतकी भागीदारीनं चित्र बदललं म्हटलं तरी चालेल. अनुभवी महंमद नबी (२४ चेंडूंमध्ये २ चौकार व ३ षट्कारांसह ४०) आणि ज़दरान ह्यांनी १११ धावांची भागीदारी केली. ज़दरानचं शतक १०६ चेंडूंमध्ये आणि त्याला पुढच्या ७७ धावांसाठी लागले फक्त ४० चेंडू. ह्या महत्त्वाच्या खेळीत त्यानं डझनभर चौकार आणि अर्धा डझन षट्कारांची आतषबाजी केली. अफगाण संघाला शेवटच्या षट्कात दोन गडी गमावून फक्त दोन धावा करता आल्या.

ह्या पराभवानंतर इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध साडेतीनशेहून अधिक धावा केल्यावरही संघाला पराभवच पाहावा लागला. ‘नशीब आपल्या बरोबर नव्हतं,’ अशी खेळाडूंनी त्या वेळी स्वतःचीच समजूत घालून घेतली असेल. पण आजच्या पराभवानंतर चित्र विपरीत झालं. ‘जंटलमन क्रिकेटर’ असणाऱ्या बटलरचं कर्णधारपदही स्वाभाविकच धोक्यात आलं आहे.

सामना तो आणि हा
विश्वचषक स्पर्धेमध्ये दिल्लीतील सामन्यात अफगाणिस्ताननं इंग्लंडवर ६९ धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात रूट, बटलर, ज़रदान, अजमतुल्ला ह्यांची कामगिरी डावीच होती. त्या सामन्यात सर्वाधिक ८० धावा करणारा रहमनुल्ला गुरबाज सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. तीन बळी घेऊन इंग्लंडचं शेपूट गुंडाळणाऱ्या आणि झटपट २३ धावा करणाऱ्या रशीद खानच्या कामगिरीकडं दुर्लक्षच झालं. त्याची पुनरावृत्ती इथंही झाली. सॉल्ट, रूट, बटलर हे महत्त्वाचे फलंदाज बाद करणाऱ्या अजमतुल्ला ओमरजाई ह्याच्या अष्टपैलू कामगिरी निश्चितच सामन्यातील सर्वोत्तम ठरण्याएवढी महत्त्वाची होती. पण आपल्याला सगळ्यांना गोलंदाजांपेक्षा फलंदाजच जास्त आवडतात!
.....
#चॅम्पियन्स_करंडक #क्रिकेट #अफगाणिस्तान_इंग्लंड #इब्राहीम_ज़दरान #अजमतुल्ला_ओमरजाई #जो_रूट #रशीद_खान #महंमद_नबी #जोस_बटलर #ICC_Champions_Trophy #Afghanistan_England #Ibrahim_Zadran #Azmatullah_Omarzai #Joe_Root #Mohammad_Nabi #Rashid_Khan #Jos_Buttler

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५

विराटने पुन्हा साधलेला ‘मौका’

चॅम्पियन्स करंडक - ३


शतक पूर्ण आणि विजयावर शिक्कामोर्तब!
(छायाचित्र सौजन्य : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद)

-------------------------------------
यजमान पाकिस्तानची सगळी भिस्त आता ‘जर आणि तर’च्या
समीकरणावर आहे. स्पर्धेतील त्यांच्या गच्छंतीवर भारतीय
संघानं दुबईत रविवारी जवळपास शिक्कामोर्तब केलं!
विराट कोहलीनं दमदार शतक झळकावत
‘टायगर अभी...’ अशी जणू डरकाळीच फोडली.
----------------------
आधी कुलदीपच्या फिरकीचं जाळं आणि नंतर कोहलीची झळाळती खेळी. ह्या दोन करामती पाकिस्तानला चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून गाशा गुंडाळण्यासाठी पुरेशा ठरणार आहेत, असं दिसतं.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत गटामध्येच सलग दुसरा पराभव यजमानांच्या वाट्याला आला. आता त्यांच्या स्वप्नाचा डोलारा ‘असं झालं तर...’ आणि ‘तसं झालं तर...’ ह्या दोन पोकळ वाशांवर उभा आहे. स्वप्न स्पर्धेची उपान्त्य फेरी गाठण्याचं. आपण यजमान असलेल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत आपल्याच देशातील प्रेक्षकांसमोर खेळायचं आणि करंडक उंचवायचा, हे स्वप्न. पण लाहोर गाठणं फार दूर दिसतंय तूर्त तरी.

पाकिस्तानचा संघ आता ह्या समीकरणांवर अवलंबून आहे -
गटातील लढतीत सोमवारी बांग्लादेशानं न्यू झीलँडला हरवलं पाहिजे.
भारताकडूनही न्यू झीलँडचा पराभव व्हायला हवं.
गटातील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा बांग्लादेशावर दणदणीत विजय.

असंच सगळं झालं, ‘जर आणि तर’ प्रत्यक्षात आल्यावरच पाकिस्तान उपान्त्य फेरीत जाण्याची आशा आहे. ही सगळी समीकरणं जुळून आली, तर पाकिस्तानचं नशीब जोरावर, असंच म्हणणं भाग पडेल.

यजमानपद लाभाचं नाहीच!
पण एकूणच कटकटी करीत मिळविलेलं यजमानपद पाकिस्तानला फारसं लाभकारक ठरत नाही, असं दिसतंय. दोन वर्षांपूर्वी आशिया चषक स्पर्धेच्या वेळी असंच झालं. पाकिस्तानचा संघ काही अंतिम सामन्यात पोहोचला नाही. भारत आणि श्रीलंका ह्यांच्यातील लढत श्रीलंकेतच झाली. आता ती दुबईत होणार का, हे पाहण्याची उत्सुकता आहे.

विराट कोहली कोठे चुकतोय, ह्याबद्दल सुनील गावसकर, अनिल कुंबळे ह्यांच्यासारख्या मातबरांनी हा सामना सुरू होण्यापूर्वी भाष्य केलं होतं. त्यानं आत्मविश्वास गमावलाय की काय, अशीही शंका बऱ्याच जणांनी बोलून दाखवली होती.

पाकिस्तानविरुद्ध खेळताना विराटच्या बॅटला अधिकच धार येते, हा अनुभव आहेच. मेलबर्नमधली त्याची ती खेळी आठवतेय ना..! त्याचा तो डाव अधिक आक्रमक आणि निर्णायक. दुबईत आज तो तुलनेनं शांत खेळला. अधिक ठामपणे आणि तेवढ्याच निर्धारानं. त्यानं टीकाकारांची तोंडं बंद केली आणि आपल्या कोट्यवधी पाठीराख्यांना (पुन्हा एकदा) खूश करून टाकलं! पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्याच्या वेळी सहकारी खेळाडूंनी त्याची फिरकी घेताना सांगितलं होतं, ‘नव्या खेळाडूनं सचिनपा जींच्या पाया पडावं लागतं!’ त्याच सचिनच्या पंक्तीत तो आज बसला. त्याच्या शतकसंख्येचा मैलाचा दगड ओलांडून.

खुशदिल शहाचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने सीमापार धाडत विराटने शतक पूर्ण केलं. आणि भारतीय विजयावर शिक्कामोर्तबही. हा त्याचा फक्त सातवा चौकार होता. तेवढेच चौकार त्याच्या निम्मे चेंडू खेळून जवळपास निम्म्या धावा करणाऱ्या शुभमन गिल ह्याचेही आहेत. श्रेयस अय्यरचेही पाच चौकार आहेत. पण विराटचा स्ट्राईक रेट ह्या दोघांहून सरस. त्याचं शतक १११ चेंडूंमध्ये. म्हणजे स्पष्ट होतं की, त्यानं फलंदाजीचं आक्रमण कसं धावतं ठेवलं ते...


विराट... पाकिस्तानविरुद्ध आणखी एक अप्रतिम खेळी.
(छायाचित्र सौजन्य : दैनिक डॉन)

.......................................
निर्णायक भागीदाऱ्या
जोरदार फटकेबाजी करीत नसीम शहा आणि शाहीन शहा आफ्रिदी ह्यांच्या माऱ्याची धार बोथट करणारा कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यावर विराट मैदानात उतरला आणि विजयी पताका फडकावूनच मैदानाबाहेर आला. अर्धशतक हुकलेल्या शुभमन गिल ह्याच्या जोडीनं त्यानं ६९ धावांची, दोन धावांवर मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत ५६ धावा टोलविणाऱ्या श्रेयस अय्यर ह्याच्या बरोबर ११४ धावांची भागीदारी केली. ह्याच निर्णायक भागीदाऱ्यांनी पाकिस्तानी गोलंदाजी दुबळी ठरवली.

इथं एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी की, रोहित व गिल ज्या चेंडूंवर बाद झाले, ते अफाटच होते. अन्य कोणताही फलंदाज त्यावर बाद झाला असता.

‘जलदगती गोलंदाजीवर धावा काढायच्या आणि फिरकी जपून खेळायची’, अशा व्यूहरचनेनुसारच विराट व अन्य फलंदाज खेळले. लेगस्पिनर अबरार अहमद ह्यानं एक बळी घेत १० षट्कांमध्ये फक्त २८ धावा दिल्या. ही तूट अन्य गोलंदाजांकडून त्यांनी वसूल केली. दरम्यान, एकेरी-दुहेरी धावा पळत राहून त्यांनी धावफलक हलता ठेवला आणि धावांची गतीही मंदावू दिली नाही. पहिलं षट्क सोडलं तर पाकिस्तानची धावसंख्या भारताहून सरस कधीच नव्हती.

सलामीच्या सामन्यात बांग्लादेशाचा निम्मा संघ गारद करणाऱ्या महंमद शमीची सुरुवातच स्वैर होती. पहिल्याच षट्कात त्यानं पाच वाईड चेंडू टाकले! नंतर त्याला लय सापडली. असं होऊनही पहिल्या पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानला फार काही करता आलं नाही. संघानं अर्धशतक गाठलं होतं ते दोन गडी गमावून.

हार्दिक पंड्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल करणाऱ्या बाबर आज़म दुसऱ्या चेंडूवर राहुलकडे झेल देऊन परतला. सहाच चेंडू पडले आणि इमाम उल-हक अक्षरच्या अचूक फेकीने धावबाद झाला. इमाम हा इंझमामचा खरा वारस असल्याची खातरी त्यामुळं अनेकांना पटली!

निर्धाव चेंडूंचं शतक
सौद शकील आणि कर्णधार महंमद रिजवान ह्यांनी मग पुढची जवळपास २४ षट्कं पडझड होऊ दिली नाही. त्यांची १०४ धावांची भागीदारी १४४ चेंडूंमधली. ह्या भागीदारीनं धावसंख्येला आकार दिला आणि डावाला खीळही घातली. वरच्या फळीतल्या फलंदाजांना डावातील पहिल्या १६१पैकी १०० चेंडूंवर एकही धाव करता आली नाही. संपूर्ण डावाचा विचार केला, तर तीनशेपैकी १४७ चेंडू निर्धाव गेले.


अक्षरकडून कुलदीपचं कौतुक...
........................
पाकिस्तानच्या डावात १४ चौकार आणि तीन षट्कार होते; त्यातला पहिला षट्कार बेचाळिसाव्या षट्कात होता. शकील व रिजवान जोडी खेळत असताना मधल्या षट्कांमध्ये धावा दाबण्याची चांगली कामगिरी तिन्ही फिरकी गोलंदाजांनी केली. त्यांनी मिळून आज पाच बळी मिळवले. दोन फलंदाज धावबाद झाले त्या फेकी अक्षर पटेलच्या होत्या.

पराभव का झाला?
आजच्या ह्या लढतीत पाकिस्तानचा पराभव का झाला? ‘डॉन’ दैनिकानं त्याची कारणं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात म्हटलंय - 
ह्या वेळी आपण नेमकं कशामुळे हरलो हो?
भारतीय गोलंदाज चेंडू काय हातभर स्विंग करीत होते की काय?
हार्दिक पंड्या एकदम ताशी दीडशे किलोमीटरच्या वेगानं चेंडू फेकू लागला होता का?
भारतीय फलंदाजांना काही विशेष सवलत किंवा वातावरणाचा फायदा मिळाला का?
भारतीय संघाकडे असं कोणतं अपूर्व किंवा असामान्य कौशल्य होतं?

... ह्या सगळ्याच प्रश्नांचं उत्तर एका शब्दाचं - ‘नाही!’ ह्यापैकी काहीही नाही. ‘मध्यमगती’ अशी आपण हेटाळणी केलेल्या त्यांच्या गोलंदाजांनी दिशा आणि टप्पा पकडून मारा केला. त्याच्या उलट आपल्या कथित तेज गोलंदाजांचा मारा स्वैर होता. त्यांनी झेल घेतले, आपण सोडले. त्यांचे फलंदाज टिच्चून खेळले आणि आपल्या खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी विकेट फेकल्या.

थोडक्यात, अशा कुवतीच्या संघाला हरविण्यासाठी कोणालाही खास काही कर्तृत्व बजावण्याची गरजच नाही!

हा सामना चालू असताना पाकिस्तानी चाहत्यांच्या प्रतिक्रियाही मोठ्या मजेशीर होत्या. काही जण थोडे आशावादी आणि नंतर निकाल स्पष्ट झाल्यावर आपल्याच संघाची टर उडवणारेही भरपूर. शमीचं पहिलं षट्क आणि रोहितचं बाद होणं, ह्याच दोन्ही वेळा पाकिस्तानी संघाच्या पाठीराख्यांच्या अपेक्षा फार उंचावल्या होत्या. अर्थात आशेचा हा फुगा लगेचच फुटला.

चॅम्पियन्स करंडकाच्या २०१७मधील अंतिम सामन्यानंतर भारतानं सलग सहा वेळा पाकिस्तानला धूळ चारली आहे. हे सगळेच विजय मोठे खणखणीत आणि निर्विवाद.

‘शारजा हार जा...’ असं म्हणण्याचा जमाना कधीच मागं पडला. आता ‘दुबई है, दिल जीत जा...’ म्हणण्याचा काळ आहे. पाकिस्ताननं ते रविवारी पुन्हा एकदा अनुभवलं. भारतानं पुन्हा एकदा ‘मौका’ साधला!
.....
#चॅम्पियन्स_करंडक #क्रिकेट #भारत_पाकिस्तान #विराट_कोहली #कुलदीप_यादव #दुबई #महंमद_शमी #अक्षर_पटेल #मौका_मौका #ICC_Champions_Trophy #India_Pakistan #Virat_Kohli #Shami #Kuldeep #Axar_Patel

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५

प्रश्न विचारणारा विजय

चॅम्पियन्स करंडक - २


शतकवीर शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा ह्यांनी जोरदार सलामी दिल्यानंतरही
भारताल विजयासाठी थोडं झगडावं लागलंच.
(छायाचित्र सौजन्य : आयसीसी)
-------------------------

सहा गडी नि एकवीस चेंडू राखून भारताचा विजय, हा दिसणारा निकाल तेवढा काही एकतर्फी नाही. पहिल्या पॉवर प्लेमध्ये निम्मा संघ गारद करूनही बांग्लादेशाला सव्वादोनशेची मजल मारू दिली.
षट्कामागं सहा धावांच्या गतीनं खेळूनही नंतर
भारतीय फलंदाजांनी फिरकीपुढं तलवार म्यान केली.
------------------------------

पहिला पॉवर प्ले संपायच्या आधी निम्मा डाव गुंडाळला असताना प्रतिस्पर्ध्याला किती मजल मारू द्यायची? तो डाव किती षट्के चालू द्यायचा?
पहिला पॉवर प्ले संपता संपता षट्कामागे सहा धावांहून किंचित अधिक गती राखल्यावर डावाला खीळ कशी लावून घ्यायची? आपल्या कोट्यवधी चाहत्यांच्या मनातली धाकधूक किती वाढवायची?

...वरच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रोहित शर्मा आणि त्याच्या भिडूंना चांगल्या रीतीनं देता येतील. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतला पहिला सामना जिंकल्यामुळं आज त्यांना ती द्यावी लागत नाहीत, हे खरंय. पण ‘नेट रन रेट’ मोठा ठेवण्याची संधी भारतीय संघानं दवडली आहे. त्याबद्दल खंतावण्याची वेळ संघावर येणार नाही, अशी अपेक्षा आहे!

बांग्लादेशाविरुद्धच्या सामन्यात सोडलेले सोपे झेल, काहीसं सुस्त क्षेत्ररक्षण, प्रतिस्पर्धी गोलंदाजांना डोक्यावर बसवून घेणं... याबद्दलही खेद करावा लागणार नाही, हीही एक भाबडी आशा!

पहिल्याच षट्कात यश
दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा मैदानात उतरलेला महंमद शमी, उत्साहाने फसफसलेला हर्षित राणा, गोलंदाजीतील पहिला बदल म्हणून आलेला अक्षर पटेल ह्या सगळ्यांनी आपापल्या पहिल्याच षट्कात संघाला यश मिळवून दिलं. सलामीवीर तनज़िद हसन चेंडूमागे धाव काढत होता. आपला साथीदार सौम्य सरकार आणि कर्णधार नजमुल शांतो भोपळा न फोडताच बाद झाल्याचं दडपण त्यानं घेतलं नव्हतं. शमीच्या दोन षट्कांमध्ये त्यानं तीन कडक चौकार लगावलेले होते.

आत्मविश्वासानं खेळणाऱ्या तनज़िदचा अडथळा अक्षर पटेलनं दुसऱ्याच चेंडूवर दूर केला. तो नाबाद असल्याचा मैदानावरील पंचाचा निर्णय टीव्ही. पंचाने बदलायला लावला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर मुशफिकर रहमानही बाद! हे दोन्ही झेल यष्टिरक्षक राहुलचे.

त्यानंतरचा चेंडू ऑफ यष्टीच्या किंचित बाहेर पडलेला. जाकीर अली तो दाबायला गेला आणि बॅटची कड घेऊन सरळ पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात. झेल सुटला, अक्षरची हॅटट्रिक रोहितमुळे खोडली गेली. आणि मग पुढचा बळी मिळवण्यासाठी भारताला २०६ चेंडू वाट पाहावी लागली.

झेल सुटल्यावर रोहित स्वतःवरच संतापला. त्यानं तीन-चार वेळा जमिनीवर हात आपटून रागाला वाट करून दिली. दोन्ही हात जोडून अक्षरची माफीही मागितली.

गमावलेल्या दोन संधी
त्यानंतर अशाच दोन संधी भारतानं गमावल्या. कुलदीप यादवच्या पहिल्या आणि डावातील विसाव्या षट्कात तौहिद हृदयचा फटका मिडऑफवर उभ्या असलेल्या हार्दिक पंड्याच्या हातातून उडाला. तेविसाव्या षट्कातील पहिल्याच चेंडूवर रवींद्र जाडेजानं जाकीर अली ह्याला बाहेर खेचलं होतं. पण चेंडू सफाईनं घेणं राहुलला जमलं नाही आणि यष्टिचितची संधी हुकली. बांग्लादेशाचं शतकही तोवर पूर्ण झालेलं नव्हतं.


हृदय आणि जाकीर ह्यांनी दोनशेहून अधिक चेंडू खेळत दीडशे धावांची भागीदारी केली.
ह्याच जोडीमुळं बांग्लादेशाच्या धावसंख्येला आकार आला.
(छायाचित्र सौजन्य : दैनिक प्रथम आलो, ढाका)
----------------------------------

भारतीय क्षेत्ररक्षकांनी केलेल्या ह्या कृपावर्षावाचा पुरेपूर फायदा हृदय आणि जाकीर ह्यांनी घेतला. आधी सावध आणि मग संधी मिळेल तशी फटकेबाजी करीत त्यांनी १५४ धावांची भागीदारी केली. रोहित गोलंदाजीत बदल करीत राहिला. त्याला ह्या जोडीनं दाद दिली नाही. त्यांच्यामुळे चाळिसाव्या षट्काअखेरीस बांग्लादेशाची धावगती पहिल्यांदा षट्कामागे चारपेक्षा थोडी जास्त झाली.

शमीचे पाच बळी
महंमद शमीनं जाकीर अलीला कोहलीकडं झेल द्यायला लावून ही जोडी फोडली. तोवर जाकीरनं (६८) संघाच्या धावसंख्येला आकार दिला होता. हृदयनं शानदार शतक झळकावलं. शमीनं शेपटाला फार वळवळ करू दिली नाही. त्यानं पाच गडी बाद करून एक दिवशीय सामन्यातील दोनशे बळीचा टप्पा गाठला. राणानं तीन आणि पटेलनं दोन बळी मिळवले. पंड्या, जाडेजा आणि कुलदीप ह्यांना एकही गडी बाद करता आला नाही. त्यांची गोलंदाजी तेवढी भेदक पडली नाही.

अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर बढती देण्याचं सुखस्वातंत्र्य अनुभवणाऱ्या भारतीय संघासाठी २२९ धावांचं आव्हान फारसं कठीण नव्हतंच. सहा गडी आणि २१ चेंडू राखून त्यांनी ते गाठलंही. पण नवव्या षट्कापासून थेट एकतिसाव्या षट्कापर्यंतचा प्रवास आणि धावांची गती उगीचच काळजी करायला लावणारी होती, हेही खोटं नाही.

मुस्तफिजूर रहमानच्या पहिल्या षट्कानं रोहितला सतावलं. पहिल्याच चेंडूवर पायचितचं जोरदार अपिल झालं. तिथे बहुतेक रोहितला काही जाणवलं असावं. चौथ्या षट्कापासून पूर्वपरिचित रोहित दिसू लागला. मुस्तफिजूरचा त्यानं खरपूस समाचार घेतला. भारतीय संघाचं अर्धशतक आठव्या षट्कात पूर्ण झालं.

डाव बहरू लागतोय असं दिसताच रोहितच्या बहुतेक अंगात येतं. त्या जुन्या प्रयोगाचं आजही दर्शन घडलं. दहाव्या षट्कात तस्कीन अहमदचा चेंडू भिरकावण्याच्या नादात रोहित चुकला आणि बाद झाला.

धावांच्या गतीला ब्रेक
त्यानंतर धावांच्या गतीला का कुणास ठाऊक ब्रेक लागला. नेहमीच्या तुलनेत फार संथ, तरीही विश्वासानं खेळणाऱ्या विराट कोहलीनं शुभमनच्या साथीनं ४३ धावांची भागीदारी केली. लेगस्पिनर रिशाद होसेननं त्याचा बळी मिळवला. त्यानंतर श्रेयस अय्यर व अक्षर पटेल फार काळ टिकले नाहीत. तिसावं षट्क संपलं तेव्हा भारताच्या धावांचा वेग पाचपेक्षाही कमी होता आणि चार गडी बाद झालेले.

जाकीर अलीनं स्क्वेअर लेग सीमारेषेवर के. एल. राहुलचा झेल सोडला नसता तर भारताची परिस्थिती कठीण बनली असती. सुदैवानं साथ दिली. शुभमन गिल व राहुल ह्यांनी ९८ चेंडूंमध्ये ८७ धावांची भागीदारी करीत नाव पैलतिरी सुखरूप पोहोचविली.

ह्या विजयात मोलाचा वाटा उचलला गिलनं. समोर पडझड होत असतानाही तो ठामपणे उभा राहिला. त्याच्या शतकाचं मोल हृदयच्या शतकाएवढंच. दोन बळी घेणारा रिशाद आणि मेहेदी हसन मिराज ह्यांच्या फिरकी माऱ्यानं भारतीय फलंदाजांना जखडून टाकलं होतं, हे नक्की. त्या दोघांच्या २० षट्कांमध्ये ७५ धावा निघाल्या आणि दोघांनीही फक्त एक एक चौकार दिला.

निकाल दाखवतो तेवढा हा सामना एकतर्फी झालेला नाही. तो फार रंगतदार किंवा अटीतटीचा नव्हता, हे खरं. पण पराभूत बांग्लादेश संघानं दोन्ही डावांतल्या मधल्या षट्कांमध्ये छाप सोडली. ‘काल काय झालं’ हे विसरून आणि तरीही त्यातल्या चुकांपासून धडा घेऊन भारताला रविवारी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरावं लागेल.
......
#चॅम्पियन्स_करंडक #क्रिकेट #भारत_बांग्लादेश #शुभमन_गिल #रोहित_शर्मा #हृदय_जाकीर #महंमद_शमी #ICC_Champions_Trophy #India_BanglaDesh #Rohit_Sharma #Shami #Gill

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५

पहिल्या घासालाच (पुन्हा) खडा!

चॅम्पियन्स करंडक - १


विजयावर शिक्कामोर्तब झालं बुवा! यजमान पाकिस्तानविरुद्धच्या जयाचा
आनंद व्यक्त करणारे न्यू झीलँडचे खेळाडू.

-----------------------------------------

फार वाट पाहायला लावून चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेची नवी आवृत्ती अखेर सुरू झाली. सलामीच्या लढतीतच यजमान पाकिस्तानला पराभव पचवावा लागला. ब्लॅक कॅप्सनं शानदार सांघिक खेळ केला. पाकिस्तानच्या तळाच्या फलंदाजांनी केलेली आतषबाजी आकर्षक खरी; पण सामन्याच्या निकालावर परिणाम न करणारी!

------------------------------

विजेतेपदाच्या शिखरावरून पराभवाच्या गर्तेत! चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या पाकिस्तानची ही कहाणी. स्पर्धेतील सलामीचा सामना कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये बुधवारी खेळला गेला. त्यात न्यू झीलँडनं यजमानांना ६० धावांनी हरवलं. (किती टीव्ही. संच आज फुटले असतील बरं!)

पहिल्याच घासाला खडा लागला, हे खरं. मागच्या (२०१७) स्पर्धेतही असंच झालं होतं. पहिल्या सामन्यात भारताकडून सव्वाशे धावांनी पराभूत झालेल्या पाकिस्ताननं नंतर उचल खाल्ली. पुढच्या लढतींत उत्तम खेळ करीत करंडक जिंकला. तोही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यावरच दणदणीत विजय मिळवून! असं असलं तरी घरच्या मैदानावरचा आजचा पराभव अधिक लागणारा म्हटला पाहिजे.

पस्तिसावं षट्क
पाकिस्तानच्या डावातलं पस्तिसावं षट्क आणि त्यातला शेवटचा चेंडू. न्यू झीलँडचा कर्णधार मिचेल सँटनर ह्यानं बाबर आज़म ह्याला पुन्हा लालूच दाखविली. मोहाचं आमंत्रण स्वीकारत बाबरनं स्वीप मारायचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला लागून उंच उडाला. आणि स्क्वेअर लेगला असलेल्या केन विल्यमसन ह्याच्या हातात आरामात जाऊन बसला!

बाबर तंबूत परतत असताना वेळी टीव्ही.च्या पडद्यावर दोन दृश्यं लागोपाठ दिसली.

पहिलं होतं उत्साही प्रेक्षक हताश झाल्याचं. त्यांना अपेक्षित असलेला षट्कार किंवा दोन चेंडू आधी बसलेला चौकार पुन्हा दिसला नाही. पाकिस्तानच्याव (तोवर अवघड झालेल्या) विजयाची एकमेव आशा असलेला बाबर आज़म बाद झाल्याचा धक्का समर्थकांना बसलेला उघड दिसत होतं.

त्याच्या पाठोपाठ दुसरं दृश्य दिसलं - बरेच प्रेक्षक स्टेडियम सोडून परत निघाले होते. आपला संघ सामना जिंकेल ही अपेक्षा त्यांनी सोडली होती. म्हणूनच त्यांनी स्टेडियमचा निरोप घेतला.

बाबरच्या रूपानं यजमान पाकिस्तान संघानं सहावा गडी गमावला होता. राहिलेल्या ९६ चेंडूंमध्ये तब्बल १६८ धावा काढायच्या होत्या. हे आव्हान पेलण्याची क्षमता असलेलं कोणी राहिलेलं नाही, हे ओळखूनच पाठीराख्यांनी काढता पाय घेतला होता.

नंतरची आतषबाजी
स्टेडियम सोडणाऱ्यांना आणि चमत्काराची आशा बाळगून म्हणा किंवा ‘तिकीट काढून आलोच आहोत तर पूर्ण सामना पाहू तरी...’ असं म्हणत स्टेडियममध्ये बसलेल्यांना नंतर काही आतषबाजी होईल, ह्याची कितपत कल्पना होती? पुढच्या ८० चेंडूंमध्ये १०७ धावा फटकावल्या गेल्या.

त्याची सुरुवात खुशदिल शहा ह्यानं केली. आधी त्यानं सँटनरच्या आणि मग मायकेल ब्रेसवेलच्या षट्कात दोन-दोन चौकार लगावत आपला इरादा स्पष्ट केला. बाबर बाद झाला तेव्हा १२ धावांवर खेळत असलेल्या खुशदिलनं चौफेर आक्रमण करीत घरच्या प्रेक्षकांचं दिल खूश करणारी खेळी केली. त्यानं ३८ चेंडूंतच अर्धशतक फटकावलं. सातव्या क्रमांकावरच्या फलंदाजानं टिच्चून केलेली खेळी.

खुशदिल, शाहीन शहा आफ्रिदी, नसीम शहा आणि हारिस रौफ ह्या गोलंदाजांनी फलंदाजांच्या भूमिकेत सहा षट्कार लगावले. (चेंडू हातात होता, तेव्हा त्यांना न्यू झीलँडच्या फलंदाजांनी सात षट्कार लगावले होते!) ही फलंदाजी आकर्षक, मनोरंजक होती, हे नक्की. पण यजमानांची नौका विजयाच्या तिराला लावण्यासाठी तिचा उपयोग नव्हता. फार तर उद्या आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालीच, तर निव्वळ धावगतीमध्ये ही फटकेबाजी फायदेशीर ठरेल.

ब्लॅक कॅप्सचं वर्चस्व
दोन शतकं आणि तीन अर्धशतकांची नोंद झालेल्या ह्या सामन्यात न्यू झीलँडचं - ब्लॅक कॅप्सचं - वर्चस्व ठळकपणे दिसलं. प्रारंभीची १५-२० आणि शेवटची १२ षट्कं सोडली, तर सामन्यावर पाहुण्यांचं वर्चस्व पाहायला मिळालं.

पहिल्या पॉवर प्लेमध्ये न्य़ू झीलँडला फार काही करता आलं नाही. सलामीवर डेव्हन कॉनवे आणि भरवशाचा केन विल्यमसन ह्यांना गमावून जेमतेम ४८ धावा. डावातली निम्मी षट्कं पूर्ण झाली, तेव्हा पाहुण्यांची धावांची गती षट्कामागे जेमतेम साडेचार होती. त्याची भरपाई त्यांनी उत्तरार्धात २०७ धावा चोपून केली.

चाचपडत खेळणारा डॅरील मिचेल ह्याला बाद केल्याचा आनंद पाकिस्ताननं व्यक्त केला खरा; पण तोच क्षण सामना त्यांच्या हातून (हळूच) निसटण्याचा होता म्हटलं तरी चालेल. कारण नंतर सलामीवीर विल यंग आणि यष्टिरक्षक-फलंदाज टॉम लॅथम ह्यांची जोडी जमली. त्यांनी आधी जम बसवला आणि मग फटकेबाजी केली. त्यांच्या शतकी भागीनं संघ सुस्थितीत आला.


यंगकडून पायाभरणी
यंगपेक्षा लॅथमचं शतक अधिक आक्रमक, अधिक आकर्षक फटक्यांचं. पण यंग ज्या परिस्थितीत टिकून राहिला, ती महत्त्वाची. तो आधी खेळपट्टीवर स्थिरावला आणि मग त्यानं वर्चस्व मिळवलं. त्यानं भक्कम पायाभरणी केली आणि त्यावर लॅथम व ग्लेन फिलिप्स ह्यांनी त्रिशतकी इमारत रचली.

यंग-लॅथम ह्याची शतकी भागीदारी पूर्ण होण्याच्या थोडं आधी, चौतिसाव्या षट्कात हारिस रौफ ह्यानं लॅथमला चांगलंच सतावलं. आधी यष्ट्यांमागं झेल घेतल्याचं अपील तिसऱ्या पंचांनी फेटाळलं. त्याच्या पुढच्याच चेंडूवर सलमान आगा ह्यानं त्याचा झेल सोडला.

ह्या षट्कात तावून-सुलाखून परीक्षा देऊन पुढं आलेल्या लॅथमनं मग चूक केली नाही. यंग बाद झाल्यावर त्याला ग्लेन फिलिप्सची जोरदार साथ मिळाली. फिलिप्सचं अर्धशतक फक्त ३४ चेंडूंमध्ये आकाराला आलं.

नसीम शहा आणि फिरकी गोलंदाज अबरार अहमद ह्यांनी पहिल्या टप्प्यात पकडून मारा केला. अबरार ह्यानं पहिल्या सहा षट्कांत फक्त १९ धावा दिल्या. नंतरच्या चार षट्कांमध्ये मात्र २८ धावा त्यानं दिल्या. छोटी धाव घेऊन लक्ष्मणरेषेच्या खूप अलीकडून चेंडू टाकणाऱ्या रौफ ह्याचीही कथा अशीच. पहिल्या सहा षट्कांमध्ये ३७ आणि हाणामारीच्या चार षट्कांमध्ये तब्बल ४६ धावा त्यानं मोजल्या!

हुकमी एक्का निष्प्रभ
शाहीन शहा आफ्रिदी हा पाकिस्तानचा हुकमाचा एक्का. तो आज निष्प्रभ ठरला. त्याला बळी तर मिळाला नाहीच; पण फिलिप्स व लॅथम ह्यांनी त्याला सीमारेषेबाहेर बिनधास्त फटकावलं. ब्लॅक कॅप्सनी अखेरच्या १० षट्कांचा पुरेपूर उपयोग करीत ११३ धावांची भर घातली. पाकिस्तानच्या एकाही गोलंदाजाला निर्धाव षट्क टाकता आलं नाही.

पाकिस्तानच्या डावाची सुरुवात मुळीच आश्वासक नव्हती. ट्रेन्ट बोल्टच्या शैलीची आठवण करून देणारा मॅट हेन्री आणि उंचापुरा, तगडा विल ओ'रॉर्क ह्यांनी सुरुवातीपासूनच अचूक मारा केला. सौद शकील आणि कर्णधार महंमद रिजवान लवकर बाद झाले. धोकेदायक फलंदाज अशी ओळख असलेल्या रिजवानचा फिलिप्सनं घेतलेला झेल अफ्लातून होता. पहिल्या पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानला बावीसच धावा करता आल्या आणि तेही दोन गडी गमावून.

सामन्यातील दुसराच चेंडू अडवताना जखमी होऊन फकर जमान ह्याला मैदान सोडावं लागलं. फलंदाजीला मात्र तो चौथ्या क्रमांकावर आला. त्याची व बाबर आज़मची जोडी जमत होती. ही भागीदारी सामना रंगवणार असं वाटत असताना मायकेल ब्रेसवेल ह्यानं त्याची फिरकी घेतली. स्लॉग स्वीप मारण्याच्या प्रयत्नात त्याचा त्रिफळा उडाला. त्या आधीच्या षट्कातच फिलिप्सच्या गोलंदाजीवर त्याला कॉनवेकडून जीवदान मिळालं होतं.

एक बाजू लावून धरलेल्या बाबरच्या जोडीला सलमान आगा आला. त्यानं सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्यानं सत्तावीस ते एकोणतीस ह्या तीन षट्कांमध्ये जोरदार फटकेबाजी केली. पाहता पाहता तो बाबरच्या जवळ पोहोचला होता.

जमलेली जोडी फुटली!
चौथ्या जोडीसाठी झालेली ५९ चेंडूंतील ५८ धावांची भागीदारी मोडीत काढली नॅथन स्मिथ ह्यानं. पहिल्याच षट्कात त्यानं शॉर्ट मिडविकेटला उभ्या असलेल्या ब्रेसवेलकडे झेल देणं आगाला भाग पाडलं. ह्या भागीदारीच्या शेवटाबरोबर पाकिस्तानची पराभवाकडे वाटचाल सुरू झाली. नंतरच्या फलंदाजांनी जोरदार हल्लाबोल केला, तेव्हा न्यू झीलँडचे गोलंदाज हतबल झाल्यासारखे दिसले. पण ही आतषबाजी फार उशिरा होती. जत्रा संपून गेल्यानंतरची...

न्यू झीलँडकडून कर्णधार सँटनर व ओ'रॉर्क ह्यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. पण अधिक कौतुक करावं लागेल मॅट हेन्री ह्याचं. त्यानं अचूक मारा केला आणि ७.२ षट्कांमध्ये फक्त २५ धावा देऊन दोन गडी बाद केले.

चॅम्पियन्स करंडकाच्या मागच्या दोन्ही आवृत्त्यांमध्ये गटाबाहेरही पडता न आलेल्या न्य़ू झीलँडसाठी सलामीच्या लढतीतील विजय मोठाच आश्वासक आहे. अर्थात ही सुरुवात होती फक्त...
.....

(छायाचित्र सौजन्य : ‘ब्लक कॅप्स’ एक्स अकाउंट)

.....

#चॅम्पियन्स_करंडक #क्रिकेट #न्यूझीलँड_पाकिस्तान #विल_यंग #टॉम_लॅथम #ग्लेन_फिलिप्स #बाबर_आज़म #शाहीन_आफ्रिदी #ब्लॅक_कॅप्स #ICC_Champions_Trophy #Pakistan_NewZealand #Black_Caps

रविवार, ९ फेब्रुवारी, २०२५

काँग्रेसचा हात; कोणाला साथ?


दिल्लीतील वनवास संपल्यानंतर
भारतीय जनता पक्षाचा जल्लोष.
(छायाचित्र सौजन्य - ‘ए. पी.’)
--------------------------------------

भारतीय जनता पक्षाचा राजधानी दिल्लीतला दोन वेळचा वनवास संपला! नायब राज्यपालांच्या हाती अनेक अधिकार असलेल्या ह्या राज्याची सत्ता २७-२८ वर्षांनी ह्या पक्षाकडे आली. केंद्रात आपले सरकार, अनेक राज्यांमध्ये सत्ता आणि दिल्ली मात्र दूर... ही कार्यकर्त्यांची, पक्षाच्या नेतृत्वाची खंत दूर झाली असेल ह्या विजयामुळे.

लोकसभेच्या सलग तीन निवडणुकांमध्ये राजधानीतल्या सर्वच्या सर्व जागा जिंकूनही विधानसभा मात्र भा. ज. प.ला हुलकावणीच देत राहिली. नाही म्हणायला २०१३च्या निवडणुकीत हर्षवर्धन ह्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ३२ जागांपर्यंत मजल मारली होती. पण बहुमत नाही. पहिल्याच निवडणुकीत २८ जागा जिंकणारे आपचे अरविंद केजरीवाल काँग्रेसच्या पाठिंब्यावर अल्प काळासाठी मुख्यमंत्री झाले.

आपला बाहेरून पाठिंबा घेऊन सत्तेवर आलेले कोणतेही सरकार काँग्रेस फार काळ टिकू देत नाही, सत्ताधाऱ्यांना स्वास्थ्य लाभू देत नाही. केजरीवाल ह्यांना त्या प्रयोगाचा अनुभव आला. 

काँग्रेसच्या ‘बाहेरून सासुरवासामुळे’ केजरीवाल ह्यांना राजीनामा द्यावा लागला आणि २०१५मध्ये विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक झाली. त्यात ‘आप’ने चमत्कारच घडविला. सत्तरपैकी ६७ जागा पक्षाने जिंकल्या. वर्षभरापूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजधानीतल्या सर्व जागा जिंकणाऱ्या भा. ज. प.च्या वाट्याला अवघ्या तीन जागा आल्या. त्या वेळी भा. ज. प.च्या परिस्थितीवर कोणी तरी एक छान विनोदही केला होता -
पहले चार कम थे,
अब चार से भी कम है।
😅😆😇

पुढे २०२०च्या निवडणुकीतही फार काही वेगळे झाले नाही. भाजपच्या जागा तीनवरून आठवर गेल्या, एवढेच. काँग्रेसला सलग दुसऱ्या निवडणुकीत भोपळा फोडता आला नाही.


‘मोदी है तो मुमकीन है...’
घोषणेवर दिल्लीकर भा. ज. प. कार्यकर्त्यांचा
ह्या वेळी खरंच विश्वास बसला असेल.
(छायाचित्र सौजन्य - ‘इंडिया टुडे इन्स्टाग्राम’)
-------------------------------------
ह्या सर्व आणि केंद्रात सलग तिसऱ्या वेळी सत्ता मिळविल्याच्या पार्श्वभूमीवर भा. ज. प.साठी ही निवडणूक फार महत्त्वाची होती. दिल्लीतील नामुष्की त्यांना धुवायची होती. सत्तरपैकी ४८ जागा जिंकून भा. ज. प.ने दिल्लीत दिमाखदार विजय मिळवला आहे.

ह्या निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघातील लढत वेगळीच होती. एक माजी मुख्यमंत्री आणि दोन माजी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव अशी ही निवडणूक लक्षवेधक होणार, ह्याची शंकाच नव्हती.

मदनलाल खुराना ह्या दिग्गज नेत्याच्या जागी साहिबसिंह वर्मा मुख्यमंत्री झाले. ही गोष्ट तीन दशकांपूर्वीची. खुराना काही गप्प बसले नाहीत. त्यांनी वर्मांना त्रास देणं सुरू केलं म्हणतात. 

पण वर्मांना खुराना कमी आणि कांद्या-टोमॅटोची भाववाढ जास्त भोवली. निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या जागी सुषमा स्वराज ह्यांना भा. ज. प.नं आणलं. सुषमांच्या चेहऱ्याचा, वलयाचा काही फायदा झाला नाही. भा. ज. प.च्या हातून राजधानी निसटली ती निसटलीच. तीन वेळा काँग्रेस आणि सव्वादोन(!) वेळा आम आदमी पक्षाची सत्ता आली.

आधी राजीव गांधी आणि नंतर सोनिया ह्यांच्या आतल्या वर्तुळात असलेल्या शीला दीक्षित दिल्लीच्या दीर्घ काळ मुख्यमंत्री राहिल्या. तीन वेळा. त्यांच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवतच अरविंद केजरीवाल दिल्ली विधानसभेच्या मैदानात उतरले. त्या वेळी परिस्थितीच अशी होती की, काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यावर आरोप करावा आणि तो त्याला चिकटावा. स्वाभाविकच ‘आप’ने पदार्पणातच मुसंडी मारली.

पुढच्या दोन निवडणुकांत ‘आप’ने देशाच्या राजधानीतून काँग्रेसला तर संपवलंच; पण भा. ज. प.लाही धोबीपछाड दिला. राजकारणाचं ‘केजरीवाल प्रारूप’ सुरुवातीला मध्यमवर्गाला भावलं. दिल्ली सोडली तर उर्वरित देशाचा लवकरच भ्रमनिरास झाला.

पुढे नेतेगिरी, साधेपणा ह्याच्या नशेत केजरीवाल वाहत गेले, असं दिसतंय. ‘नशा करी पक्षाची दुर्दशा’ हे त्यांच्या पक्षाबाबत खरं ठरलेलं आता पाहायला मिळतंय. त्यांना स्वतःला नवी दिल्ली मतदारसंघात पहिल्या पराभवाची चव चाखायला मिळाली.


परवेश साहिबसिंग
-------------
वर्मा ह्याचे चिरंजीव परवेश साहिबसिंह ह्यांनी माजी मुख्यमंत्र्याचा, केजरीवालांचा साधारण एकेचाळीसशे मतांनी पराभव केला. शीला दीक्षितांचे चिरंजीव संदीप ह्यांना तेवढीच (४,५६८) मतं मिळावीत, ही गंमतच. बाकीच्या एकोणीसपैकी फक्त एका उमेदवाराला (बहुजन समाज पक्ष) तीन आकडी मते मिळाली; अन्य अठरा जणांना मतांचे शतकही गाठता आले नाही.

हा निकाल म्हणजे संदीप दीक्षित ह्यांनी एक प्रकारे सूड उगवला, असंच म्हणावं लागेल. त्यांच्या आईवर केजरीवाल ह्यांनी बेछूट आरोप केले होते. निवडणुकीत त्यांचा दणदणीत पराभव केला होता. त्या पराभवामुळे राजधानीतलं शीला दीक्षित नावाचं प्रस्थ संपून गेलं. केजरीवालांना आता दीक्षित ह्यांच्यामुळंच पराभूत व्हावं लागलं, असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातंय. अर्थात दीक्षित उमेदवार नसते, तर ती सर्व मतं केजरीवाल ह्यांच्या पारड्यात पडली असती, असं मानणं अंकगणिती भाबडेपणा आहे.

प्रत्येक निकालानंतर असा भाबडेपणा पराभूत झालेल्या पक्षाचे नेते वा समर्थक आणि त्यांच्याबद्दल हळवा कोपरा असलेले राजकीय पंडित करीतच असतात. मतांची टक्केवारी किंवा अल्प-स्वल्प मताधिक्याकडे बोट दाखवून ते स्वतःचंच समाधान करून घेत असतात. तसं आता दिल्लीतही होईल.   

मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागा, ह्यांचे समीकरण ह्यांमध्ये नेहमीच अंतर असते. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ह्या निवडणुकीत २२ जागा जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाला  ४३.५७ टक्के मते आहेत.

भा. ज. प.च्या वाट्याची मते आहेत ४५.५६ टक्के. जागा मात्र ४८. म्हणजे आपपेक्षा फक्त दोन टक्के मते अधिक मिळवून भा. ज. प.ने त्यांच्या दुप्पट जागा जिंकल्या आहेत. दिल्लीच्या निकालाचे विश्लेषण करताना आणि भा. ज. प.चा विजय कसा सफाईदार नाही, हे दाखविण्यासाठी मताच्या टक्केवारीचा असा आधार नक्कीच घेतला जाईल.

सत्तेच्या शर्यतीत उतरलेल्या वरील दोन पक्षांव्यतिरिक्त इतरांचीही मतं लक्षात घ्यावी लागतील. काँग्रेसला ६.३४ टक्के मते आहेत. त्या पक्षाची मते मागच्या निवडणुकीपेक्षा दोन टक्क्यांनी वाढली आहेत. आणि असं असूनही सलग तिसऱ्या निवडणुकीत त्यांना खातं उघडणं जमलेलं नाही. 

ह्या आधीच्या निवडणुकीत आपला ५३.५७ टक्के, भा. ज. प.ला ३८.५१ टक्के आणि काँग्रेसला सव्वाचार टक्के मते होती. भा. ज. प.च्या आठ पट जागा तेव्हा आपने जिंकल्या होत्या.

निवडणुकीच्या निकालाचा कौल दिसू लागताच विशिष्ट विश्लेषक, पत्रकार ह्यांची रडगाणी सुरू झाली आहे. त्यातलं एक फार भर देऊन सांगितलं जातंय. ते म्हणजे आप आणि काँग्रेस ह्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. तेच भोवलं आणि भा. ज. प.चं फावलं.

काँग्रेसच्या उमेदवारांनी ‘खाल्लेल्या’ मतांमुळे दिल्लीतील १३ मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले. म्हणजे मताधिक्याहून काँग्रेसच्या उमेदवाराला जास्त मतं आहेत, त्याचा हा परिणाम, असं सांगितलं जातंय. रडीचाच डाव खेळायचा म्हटला की, कसेही युक्तिवाद करता येतात आणि शोधही लावता येतात. त्याचंच हे एक उदाहरण होय.

जशी ही एक बाजू, तशी दुसरीही बाजू असेलच की ह्या निकालाला. काँग्रेसच्या उमेदवारांमुळे किती मतदारसंघांमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झाला? बावीसपैकी नऊ म्हणजे तब्बल ४० टक्के जागांवर आपचा काँग्रेसमुळे फायदा झालेला आहे. मुख्यमंत्रीही आतिशा ह्याही काँग्रेसच्या अलका लांबा ह्यांच्यामुळे कशाबशा विजयी झाल्या आहेत. ‘आप’साठी काँग्रेसचा उमेदवार फायदेशीर ठरलेल्या जागांचा निकाल असा - 

बुराड़ी - संजीव झा (आप) - १,२१,१८१, शैलेंद्रकुमार (संयुक्त जनता दल)- १,००,५८०
मताधिक्य - २०,६०१ आणि काँग्रेसचे महेश त्यागी ह्यांना मिळालेली मते - १९,९२०

दिल्ली कँटोन्मेंट - वीरेंदरसिंग कडियान (आप) - २२,१९१, भुवन तंवर  (भारतीय जनता पक्ष) - २०,१६२. 
मताधिक्य - २,०२९ आणि काँग्रेसचे उमेदवार प्रदीपकुमार उपमन्यू ह्यांना मिळालेली मते - ४,२५२

आंबेडकरनगर - डॉ. अजय दत्त (आप) - ४६,२८५, खुशीराम चुनार (भाजप) - ४२,०५५
मताधिक्य - ४,२३० आणि काँग्रेसचे उमेदवार जयप्रकाश ह्यांना मिळालेली मते - ७,१७२

ओखला - अमानतुल्ला खान (आप) - ८८, ९४३, मनीष चौधरी (भाजप) - ६५,३०४
मताधिक्य - २३,६३९ आणि त्यानंतरच्या दोन पराभूत उमेदवारांना मिळालेली मते  ५२,२९७  - शिफ़ा उर रहमान खान (एआयएमआयएम) - ३९,५५८ व अरिबा खान (काँग्रेस) - १२,७३९.

कोंडली - कुलदीपकुमार मोनू (आप) - ६१,७९२, प्रियांका गौतम (भाजप) - ५५,४९२
मताधिक्य - ६,२९३ आणि काँग्रेसचे उमेदवार अक्षयकुमार ह्यांना मिळालेली मते - ७,२३०

पटेलनगर - प्रवेशरत्न (आप) - ५७,५१२, राजकुमार आनंद (भाजप) - ५३,४६३
मताधिक्य - ४,०४९ आणि काँग्रेसच्या उमेदवार कृष्णा तीरथ ह्यांना मिळालेली मते - ४,६५४

सदर बजार - सोमदत्त (आप) - ५६,६७७, मनोजकुमार जिंदाल (भाजप) - ४९,८७०
मताधिक्य - ६,३०७ आणि काँग्रेसचे उमेदवार अनिल भारद्वाज ह्यांना मिळालेली मते - १०,०५७

सीमापुरी - वीरसिंह धिंगान (आप) - ६६,३५३, कु. रिंकू (भाजप) - ५५,९८५
मताधिक्य - १०,३६८ आणि काँग्रेसचे उमेदवार राजेश लिलोठिया ह्यांना मिळालेली मते - ११,८२३

आणि हा सर्वांत महत्त्वाचा मतदारसंघ. मावळत्या मुख्यमंत्री आतिशी तिथल्या उमेदवार होत्या.
काल्काजी - आतिशी मार्लेना (आप) - ५२,१५४, रमेश बिधुरी (भाजप) - ४८,६३३
मताधिक्य - ३,५२१ आणि काँग्रेसच्या उमेदवार अलका लांबा ह्यांना मिळालेली मते - ४,३९२

एकूणच ही निवडणूक वेगळी झाली. ‘आप’च्या अहंकाराला थापविणारी, भा. ज. प.ला सुखावणारी आणि काँग्रेसला पुन्हा नाकारणारी. पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की, निवडणुकीत मिळालेली मतं आणि जागा, ह्यांचं समीकरण वेगळंच असतं.
........

#दिल्ली_निवडणूक #भाजप #आप #काँग्रेस #अरविंद_केजरीवाल  #साहिबसिंग_वर्मा #शीला_दीक्षित #परवेश_साहिबसिंग #नवी_दिल्ली

अफगाणी सनसनाटी

  चॅम्पियन्स करंडक - ४ चितपट! मिरवा रे पठ्ठ्याला... इंग्लंडला हरवल्याचा आनंद साजरा करताना अफगाणिस्तानच्या नवीद ज़दरान ह्यानं अजमतुल्ला ह्याल...