रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

‘अदालती’चा किलकिला झालेला पडदा

चित्रीकरण खुशवंतसिंग ह्यांचं. पण आले लालूप्रसाद. काय करणार? अटलजी ह्यांनी ‘माझे मित्र व्हा’ असं सुचवलं. दिवसभरात सात सभा घेऊन आलेल्या नरेंद्र मोदींचा आवाज बसलेला. कसं होणार चित्रीकरण? सलमान खाननं जोर काढण्याचं आव्हान दिलं. ‘सुनावणी’ होण्याच्या आधीपासूनच दिलीपकुमार निकालपत्र डिक्टेट करीत होते...
...‘आप की अदालत’चा पडदा किलकिला करीत
रजत शर्मा ह्यांनी ऐकवलेले अनुभव.


‘शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये’, असं थोरामोठ्यांनी सांगून ठेवलं आहे. मोठ्यांचं ऐकणं प्रत्येक वेळी जमतंच असं नाही. काहींना नाइलाजानं त्या पायऱ्या झिजवाव्या लागतात.

हौस म्हणूनही कोर्टाची पायरी चढणारे असतात. अनावर कुतुहलापोटी - साक्षी ऐकण्यासाठी, उलटतपासणीत होणारी फजिती पाहण्यासाठी आणि युक्तिवाद अभ्यासण्यासाठीही!

न्यायालये आणि तिथल्या एकूण प्रक्रियेबद्दल सर्वसामान्यांमध्ये असलेलं कुतूहल ओळखूनच नाटक-सिनेमांमध्ये आजवर हजारो ‘कोर्ट ड्रामे’ रंगविण्यात आले आहेत. चित्रपटांतील ‘कोर्ट सीन’ वास्तवापासून फाssर दूर असल्याची ओरड नेहमी होते. त्यानं काही फरक पडलेला नाही.

तीन दशकांपासूनचं न्यायालयीन नाट्य
असंच एक न्यायालयीन नाट्य तीन दशकांपासून भारतीय प्रेक्षकांना खेचत आलेलं आहे. प्रदीर्घ काळ लोकप्रिय असलेल्या ह्या कार्यक्रमाचे आजवर अकराशेहून अधिक भाग प्रसारित झाले आहेत. न्यायालयाचा निकाल काय असेल, हे बहुदा माहीत असूनही ‘वकील-आरोपी’ ह्यांची ‘चकमक’ पाहण्याची भारतीय प्रेक्षकांची उत्कंठा कायम आहे. हा कार्यक्रम म्हणजे ‘आप की अदालत’ आणि त्याचे कायमचे नायक रजत शर्मा.

पत्रकार, संपादक आणि एका वृत्तवाहिनीचा - मीडिया हाऊसचा मालक, असा रजत शर्मा ह्यांचा प्रवास आहे. आणीबाणीमुळे अठराव्या वर्षीच ११ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागलेल्या ह्या तरुणाने मग लगेच दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या (DUSU) निवडणुकीत सरचिटणीस म्हणून बाजी मारली.

पहिल्याच निवडणुकीतील यशामुळे राजकारण खुणावत असताना रजत शर्मा ह्यांनी क्षेत्र निवडलं पत्रकारितेचं. ‘ऑनलुकर’ पाक्षिकातील प्रशिक्षणार्थी वार्ताहर म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि वयाच्या तिशीतच ते ‘संडे ऑब्झर्व्हर’चे संपादक बनले. विनोद मेहता ह्यांची खुर्ची त्यांना मिळाली.

‘द डेली’चे संपादक असतानाच रजत शर्मा ह्यांची सुभाषचंद्र (‘झी नेटवर्क’) ह्यांच्याशी ‘अदालत’बद्दल प्राथमिक चर्चा झाली. चर्चा झाली आणि पहिला कार्यक्रम टीव्ही.च्या पडद्यावर आला तो १९९३च्या मार्चमध्ये. ‘आप की अदालत’चा प्रवास तेव्हापासून चालूच आहे.

रजत शर्मा ह्यांच्या प्रवासाची माहिती मिळते त्यांच्या संकेतस्थळावर. तिथं तो प्रवास थांबतो ते २०१४ वर्षावर. आजवरचे सर्वाधिक प्रेक्षक लाभलेला कार्यक्रम त्या वर्षी झाला. ‘अदालत’मध्ये हजर होते नरेंद्र मोदी!

संकेतस्थळावर प्रवासाने विश्रांती घेतली असली, तरी रजत शर्मा ह्यांची वाटचाल चालूच आहे. ती कशी झाली, त्यातून काय मिळालं हे सगळं त्यांच्या तोंडूनच ऐकण्याची संधी नगरमध्ये मिळाली ती पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेच्या निमित्तानं. पावसाळी हवेमुळं त्यांना प्रत्यक्ष येता आलं नाही. मग उपयोगी पडलं ते तंत्रज्ञान. व्हिडिओ मीटिंगच्या माध्यमातून दीड तास त्यांनी ‘अदालत’च्या वाटचालीतील निवडक टप्प्यांचा प्रवास अगदी सहजपणे घडवून आणला.

किती कष्ट, किती अडचणी!
(छोट्या) पडद्यावर जे सुंदर दिसतं, अप्रतिम भासतं (रजत शर्मा ह्यांचेच शब्द वापरून सांगायचं तर ‘सेक्सी लगता, दिखता है।’), त्यामागे किती कष्ट असतात, हे त्यांनी सांगितलं. किती नि कशा अडचणी येतात आणि त्यावर कशी मात केली जाते, हे त्यांनी सांगितलं. सतत प्रयत्न केले जातात, म्हणून दिसतं ते सुंदर वाटतं, असं ते म्हणाले.

‘आप की अदालत’च्या पहिल्या भागात होते खुशवंतसिंग. नामवंत लेखक-पत्रकार. त्याचं चित्रीकरण दुपारी बाराच्या सुमारास होणार होतं. त्याच संध्याकाळी चित्रीकरण होतं बिहारचे तेव्हाचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव ह्यांचं. त्यांचा सकाळीच फोन. ‘भई, शाम को हम पटना निकल रहे है। अभी आएंगे...’

स्टुडिओत तर काहीच तयारी नाही. कसं करणार चित्रीकरण? ही अडचण सांगायला रजत शर्मा ह्यांनी दहाच्या सुमारास संपर्क साधला, तर लालूप्रसाद निघाले होते. ‘लालूप्रसादss हाजीर होss’ असा पुकारा होण्यापूर्वीच ते ‘अदालत’मध्ये येऊन धडकले होते.

बिहारी बंधूंना लालूंचं आवतण
तयारीला वेळ लागणारच होता. म्हणून मग वेळ काढण्यासाठी लालूप्रसाद ह्यांना घेऊन रजत शर्मा इमारतीच्या गच्चीवर गेले. समोरच एका मोठ्या इमारतीचं बांधकाम चालू होतं. काम करणारे मजूर बिहारी. लालूप्रसाद खूश. त्यांनी खुलं आमंत्रण दिलं - या रे कार्यक्रमाला, बंधूंनो!

रजत शर्मा हैराण. प्रेक्षक म्हणून त्यांनी शाळा-कॉलेजातले नेटके विद्यार्थी बोलावले होते. ते टापटीप, टाय वगैरे लावून. आणि हे प्रेक्षक त्यांच्या अगदी विरुद्ध. पण ‘पाहुण्या’ ‘आरोपी’ला विरोध तरी कसा करणार?

पुढची अडचण होती न्यायाधीशाची. खुशवंतसिंग ह्यांच्यावरील ‘सुनावणी’साठी नमिता गोखले ह्यांची नियुक्ती केली होती. लालूप्रसादांसाठी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर. ते आलेलेच नव्हते. कसे येणार? त्यांना संध्याकाळची वेळ दिली होती. फोन केला तरी ते वेळेवर येणं शक्य नव्हतं.

लालूंची घाई चालू. त्यामुळे नमिता गोखले ह्यांना विनंती केली, तर त्या म्हणाल्या, ‘अभ्यास खुशवंतसिंगांचा आणि पेपर लालूप्रसादांचा. हे कसं काय चालणार?’ थोडं समजावलं नि ‘सुनावणी’ घेण्यासाठी त्या कशाबशा राजी झाल्या.

न्यायाधीश म्हणाल्या - ‘ओव्हररुल्ड!’
पुढची अडचण तयारच होती. पहिला प्रश्न लालूप्रसाद ह्यांना विचारला आणि कुलदीप नय्यर हजर! तोपर्यंत नमिता गोखले ‘न्यायाधीशा’च्या भूमिकेत शिरलेल्या. खुर्ची नय्यर ह्यांना देण्याची रजत शर्मा ह्यांच्या मागणीवर त्यांनी ठामपणे सांगितलं - ‘ओव्हररुल्ड!’ हे खरं न्यायालय नाही आणि तुम्ही न्यायमूर्ती वा न्यायाधीश नाहीत, हे त्यांना सांगता सांगता रजत शर्मा ह्यांची पुरेवाट झाली.

पहिल्याच चित्रीकरणात एवढं नाट्य झालं. पहिला कार्यक्रम प्रसारित झाला तो मात्र खुशवंतसिंग ह्यांचाच. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. रजत शर्मा म्हणाले, ‘‘पहिल्याच शोमुळे माझी ओळख बदलली - एक अनोळखी इसम ते सर्वपरिचित चेहरा!’’

‘त्या काळातील सर्वाधिक सन्माननीय नेते’, ‘त्या शतकातला सर्वश्रेष्ठ वक्ता’ अशा विशेषणांची पखरण करीत श्री. रजत शर्मा ह्यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या कार्यक्रमाची फार सविस्तर माहिती दिली. त्यांचे आशीर्वाद मिळाले, हे सांगताना त्यांचा कृतकृत्य भाव सहज जाणवत होता.

श्री. वाजपेयी ‘आप की अदालत’मध्ये येऊन गेले आणि काहीच काळाने १३ दिवसांसाठी पंतप्रधान बनले. पुढे एका कार्यक्रमात रजत शर्मा दिसताच त्यांनी बोलावून घेतलं. सांगितलं, ‘मला तुमच्याशी निवांत बोलायचं आहे. वेळ ठरवून घरीच या.’

विशाल मनाचा नेता
घरी निवांत भेट. श्री. वाजपेयी ह्यांना तीन गोष्टी सांगायच्या होत्या. ‘दिल का बोझ कुछ हल्का करेंगे’ अशी सुरुवात करीत ते म्हणाले, ‘तुम्ही मला मित्र म्हणून हवे आहात.’ पंतप्रधानपदाच्या (अल्प) काळात भेटलो नाही, त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. हे सांगून श्री. रजत शर्मा म्हणाले, ‘केवढ्या विशाल मनाचा नेता! त्यांची महता, औदार्य ह्याचं वर्णनच करता येणार नाही.’


सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कार्यक्रमात बोलावल्याबद्दल श्री. वाजपेयी ह्यांनी रजत शर्मा ह्यांचे आभार मानले. ते म्हणाले, ‘मी पंतप्रधान बनण्याची प्रक्रिया त्या कार्यक्रमापासून सुरू झाली. लोकांच्या डोळ्यांत तेव्हा मला परिवर्तन पाहायला मिळालं!’ 

ह्याच्याहून वेगळी पावती काय पाहिजे, असं श्री. रजत शर्मा विचारतात. अटलजींनी आशीर्वाद दिला. आशीर्वादाने हिमंत वाढते, कामाबद्दल अधिक उत्साह वाटू लागतो आणि शक्ती लाभते.

कार्यक्रम लोकप्रिय होऊ लागला म्हणून सगळं काही सुरळीत चालतं असं नाही. अडचणी येतच राहतात. त्यावर उपाय शोधावे लागतात. कारण ‘शो मस्ट गो ऑन’ हे तत्त्व पाळायचं असतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या कार्यक्रमाबद्दल श्री. रजत शर्मा ह्यांनी सांगितलेला किस्सा अफाट सदरात मोडणाराच आहे. त्यासाठी खूप प्रयत्न केले. अखेर एकदा अहमदाबादमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. प्रचाराची रणधुमाळीतील एक दिवस त्यांनी दिला.

भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलेल्या श्री. मोदी ह्यांचं वेळापत्रक अतिशय व्यग्र होतं. दिवसभरात सात जाहीर सभा घेऊन ते मुक्कामी अहमदाबाद येथे जात.

आवाज बसला; बोलणार कसं?

ठरलेल्या दिवशी संध्याकाळी श्री. मोदी कार्यक्रमासाठी श्री. रजत शर्मा ह्यांच्याकडे पोहोचले. सात सभा संपवून. ख्यालीखुशालीच्या गप्पा चाललेल्या असतानाच लक्षात आलं की, श्री. मोदी ह्यांचा घसा बसलेला आहे. त्यांना बोलताच येत नाही! कार्यक्रम कसा होणार?

कार्यक्रमाच्या दिग्दर्शक आणि रजत शर्मा ह्यांची पत्नी रितू ह्यांनी मग घसा मोकळा करायचे काही उपाय सुचविले. आजीबाईच्या बटव्यातले. श्री. मोदी म्हणाले, ‘‘भाभीजी, हे सगळं रोज करतो. काही उपयोग होत नाही. सकाळी कुठे घसा मोकळा होतो.’’

चित्रीकरणाची सगळी तयारी झालेली. प्रेक्षक आलेले. श्री. रजत शर्मा ह्यांनी उपाय सुचविला - तुम्ही रात्री इथेच मुक्काम करा. सकाळी लवकर चित्रीकरण करू. तुम्ही म्हणाल तेव्हा; अगदी सकाळी सहा वाजता.

त्यातही अडचण होती. श्री. मोदी म्हणाले की, माझ्या विमानासाठी इथे दिल्लीत जागाच नाही. उद्या मला दक्षिण भारतात सभांसाठी जायचं आहे.

कधी नव्हे ती वेळ मिळालेली आणि ही अडचण! हताश, निराश झालेले श्री. रजत शर्मा भावी पंतप्रधानांना म्हणाले, ‘‘प्रेक्षक खूप वेळेपासून ताटकळत बसले आहेत. तुम्ही इथे आला आहात, एवढं तरी त्यांना दिसू द्या. तुमचा आवाज ऐकल्यावर अडचण काय आहे, ते लक्षात येईल त्यांच्या.’’

स्टुडिओमध्ये श्री. मोदी ह्यांनी पाऊल टाकताच ‘मोदी, मोदी’ गजर सुरू झाला. वैतागलेल्या रजत शर्मा ह्यांनी सहायकाला झापलं - ‘भा. ज. प.च्या कार्यकर्त्यांना अजिबात बोलवायचं नाही, म्हणून बजावलं होतं ना तुला!’ त्याचं उत्तर होतं, ‘हे सगळं आम पब्लिक आहे. त्यात कॅनडाहून आलेला माझा काकाही आहे.’

ते वातावरण पुन्हा एकदा अनुभवत श्री. रजत शर्मा म्हणाले, ‘‘एवढा उशीर होऊनही प्रेक्षक उत्साही दिसत होते. वातावरण भावूक होतं. मी तरी ते कधी पाहिलं नव्हतं. मोदींची लोकप्रियता मला तेव्हा जाणवली.’’

लव्ह यू आणि उमर लग जाए...
मोदींना पाहून उत्साहित झालेली एक तरुणी म्हणाली, ‘मोदीजी, आय लव्ह यू.’ ऐंशीपार गेलेल्या आजीबाई म्हणाल्या, ‘बेटा, मेरी उमर तुम्हें लग जाए...’

हा प्रतिसाद पाहून श्री. मोदीही भारावले. काय झालं कुणास ठाऊक! श्री. रजत शर्मा सांगतात, देवाची साथ आम्हाला होती. नशीब हसलं होतं. श्री. मोदी ह्यांचा घसा मोकळा झाला. मध्यरात्री बारा ते दीड कार्यक्रमाचं चित्रीकरण झालं.

ह्याच कार्यक्रमात श्री. रजत शर्मा ह्यांनी श्री. नरेंद्र मोदी ह्यांना नवी घोषणा ऐकविली -
राहुल खाए चॉकलेटबार
अब की बार मोदी सरकार!

हाच कार्यक्रम लोकप्रियतेत, सर्वाधिक विक्रमी प्रेक्षकसंख्या लाभल्याच्या यादीत आजही अव्वल क्रमांकावर असलेला.

सलमान खान आणि रजत शर्मा. ह्यांची केमिस्ट्री काही जुळत नव्हती. ती जुळणारच नाही, असं त्यांना आतून वाटत होतं. कार्यक्रम कसा मैत्रीपूर्ण वातावरणात व्हावा. आम्ही दोघंही एकमेकांवर गुरगुरत राहिलो तर...ही भीती मनात.
ज्येष्ठ अभिनेता शत्रुघ्न सिन्हा ह्यांनी जबाबदारी घेतली. त्यांच्या कन्येचं सोनाक्षी सिन्हाचं पदार्पण होतं. सलमानला आणण्याची, तो व्यवस्थित बोलेल ह्याची काळजी घेण्याची जबाबदारी शत्रूनं स्वीकारली. ‘जज’ची भूमिकाही त्यानं स्वीकारली.

जोर काढण्याचं आव्हान
त्या चित्रीकरणाची आठवण सांगताना श्री. रजत शर्मा म्हणाले, ‘‘सलमाननं सगळ्या प्रश्नांना - काळविटाची हत्या, गाडीनं पादचाऱ्याला चिरडणं, ऐश्वर्या राय नि करीना कपूर - व्यवस्थित उत्तरं दिली. डोळ्यांत डोळे घालून तो बोलला. मध्येच त्यानं मला थांबवलं. जोर काढू म्हणाला. पंधरा-अठरा जोरनंतरही मी दमलो नाही पाहिल्यावर त्यानं पुन्हा कार्यक्रम चालू केला!’’

हा कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतरही सलमानला भेटणं रजत शर्मा टाळत होते. हा उगीच सरकला तर काय, ही भीती! शेवटी एका रिसेप्शनमध्ये ते आमने-सामने आलेच. पाच-दहा मिनिटं हुलकावणी देऊनही सलमाननं त्यांना गाठलंच. कानात म्हणाला, ‘सर... थँक यू! पब्लिकच्या मनात माझ्याबद्दल असलेले गैरसमज दूर व्हायला तुमच्या कार्यक्रमामुळे मदत झाली.’ आता ते चांगले मित्र आहेत!

न झालेल्या मुलाखती आणि हजर न झालेले ‘आरोपी’? खूप आहेत. त्यातलेच एक दिलीपकुमार. त्यांनी चार तासांत खूप मोठा जीवनप्रवास ऐकवला. मग गाडी आली ‘जज कोण?’ ह्या विषयावर. ‘फालतू’, ‘बकवास’ अशी विशेषणं वापरत दिलीपकुमार ह्यांनी चार-पाच नावांवर थेट फुली मारली. जावेद अख्तर हे नाव अखेर त्यांना पसंत पडलं.

सुनावणीआधीच निकालपत्र!
त्यानंतर काही दिवसांनी जावेद अख्तर ह्यांनी रजत शर्मांना फोन केला. ‘बाबा रे, कशात आणि कशाला अडकवलं आहेस तू मला?’
रजत शर्मा उत्साहात म्हणाले, ‘म्हणजे काय! दिलीपसाबच्या कार्यक्रमात न्यायाधीश बनवतोय तुला.’
त्याच हताश सुरात जावेद अख्तर म्हणाले, ‘ते खरंय रे. पण दिलीपसाब पाच दिवसांपासून मला रोज पहाटेच बोलावून घेतात आणि ‘निकालपत्र’ डिक्टेट करतात!’

दिलीपकुमार हजर झालेच नाहीत. काही अडचणी आल्या. हा कार्यक्रम करता न आल्याची खंत श्री. रजत शर्मा ह्यांना आहे. (आणि कुणी सांगावं, इकडे जावेद अख्तर ह्यांनी सुटकेचा निःश्वास टाकलेला असावा.)

अनुभवकथनाच्या शेवटी श्री. रजत शर्मा ह्यांनी पत्रकार ह्या नात्यानं आपली निरीक्षणं काय आहेत, ते सांगितलं. श्रोत्यांच्या मोजक्या प्रश्नांना त्यांनी उत्तरंही दिली.

‘मोदी जैसा कोई नही’
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्याबद्दल भरभरून बोलताना श्री. रजत शर्मा म्हणाले, ‘‘मी ४० वर्षांच्या पत्रकारितेत अनेक नेते पाहिले. राजकारणात येण्यामागे बहुतेकांचा स्वार्थ असतो - पैसा कमावणं आणि पद मिळवणं. श्री. मोदी त्यातले नाहीत. कदापि नाहीत! राजकारणाची पारंपरिक पद्धत त्यांनी बदलून टाकली. राजकारण देशसेवेसाठी करायचं असतं, हे त्यांनी दाखवून दिलं.’’

श्री. मोदी काय करतात, ह्याचा अंदाजच विरोधकांना येत नाही. त्यांच्या साऱ्या अटकळी साफ खोट्या ठऱतात, हे श्री. शर्मा ह्यांनी संसदेच्या नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशनाचं उदाहरण देऊन सांगितलं.

विरोधी पक्षांची इं.डि.या. आघाडी तयार झाली हे चांगलंच. कारण सशक्त विरोधी पक्ष हवाच. पण त्यांचा कार्यक्रम ठरलेला नाही. प्रस्थापितविरोधी लाट दहा वर्षांनंतरही दिसत नाही, असं श्री. शर्मा ह्यांचं निरीक्षण आहे.

संघाचं काम क्रांतिकारक
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम एक नवी क्रांती घडवणारं आहे,’ असं मत श्री. रजत शर्मा ह्यांनी व्यक्त केलं. त्याच्या पुष्ट्यर्थ सरसंघचालक मोहन भागवत ह्यांच्या अलीकडच्या विविध वक्तव्यांचा दाखला  दिला. ‘सबको साथ लेकर चलना है’ हा विचार संघाला जगभरात नेईल. संघाला जागतिक परिप्रेक्ष्यात भूमिका घेण्याची, स्थान मिळविण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली.

श्री. शर्मा भरभरून बोलले. मनमोकळेपणाने बोलले. एका लोकप्रिय कार्यक्रमाच्या निर्मितीमागं काय काय कथा आणि व्यथा असतात, हे त्यांनी उलगडून दाखवलं.

....................................

#आप_की_अदालत #रजत_शर्मा #दीनदयाळ_व्याख्यानमाला #अटलबिहारी_वाजपेयी #नरेंद्र_मोदी #पंतप्रधान_मोदी #सलमान_खान #दिलीपकुमार #लालूप्रसाद_यादव #खुशवंतसिंग #रास्व_संघ

#Aap_ki_Adalat #Rajat_Sharma #tvshow #Vajpayee #Narendra_Modi #pmModi #Salman_Khan #DileepKumar #Lalu_Yadav #KhushwantSingh #RSS

.................

© सतीश स. कुलकर्णी
sats.coool@gmail.com
.................

(कृपया, परवानगीविना हा पूर्ण मजकूर किंवा त्यांचा संपादित भाग प्रसिद्ध करू नये.) 


शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

कॅरिबियन बेटांवर ऑस्ट्रेलियन वादळ

विश्वचषकातील सर्वोत्तम - 

(वेस्ट इंडिज - २००)

‘पूर्वीचा मॅकग्रा आता राहिला नाही; त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी होऊन गेलेली आहे. आता तरुण रक्ताला संधी द्या!’ ऑस्ट्रेलियातील क्रिकेटप्रेमींची ही मागणी होती. त्याचीही तीच इच्छा होती. तरीही त्याची निवड झाली. जलद गोलंदाजांची खाण असलेल्या वेस्ट इंडिजमध्ये ही स्पर्धा झाली. त्यात मॅकग्रा सर्वोत्तम ठरला! वादग्रस्त झालेली, भारत आणि पाकिस्तान ह्यांना विसरावी वाटणारी ही स्पर्धा मॅकग्रासाठी अविस्मरणीयच होती. 


तिसरं विश्वविजेतेपद आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू.
(छायाचित्र सौजन्य : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचं संकेतस्थळ)
................................................

भारत आणि पाकिस्तान. सख्ख्या शेजाऱ्यांना विसरावी वाटेल, अशी विश्वचषक स्पर्धा म्हणजे २००७ची; दक्षिण आफ्रिकेनंतर दक्षिण अमेरिका खंडात झालेली. क्रिकेटजगताचे सर्वाधिक आकर्षण असलेली ह्या दोन देशांमधील लढत झालीच नाही. कारण? दोन्ही संघ गटामध्येच गारद झाले!

पाकिस्तानला पराभवाबरोबर आणखी एक मोठा धक्का बसला. आयर्लंडविरुद्धच्या पराभवानंतर संघाचे प्रशिक्षक बॉब वूल्मर हॉटेलातील खोलीत मृतावस्थेत आढळले. ह्या मृत्यूचं गूढ खऱ्या अर्थानं अजूनही उलगडलेलं आहे, असं वाटत नाही.

विश्वचषक स्पर्धेची नववी आवृत्ती पार पडली कॅरिबियन बेटांवर – अर्थात वेस्ट इंडिजमध्ये. बार्बाडोस, जमैका, सेंट लुसिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो, गयाना, अँटिग्वा आणि बार्बुडा, ग्रेनेजा, सेंट किटस आणि नेव्हिस ह्या नऊ देशांमध्ये सामने झाले.

लांबलेली स्पर्धा, तिकिटाचे चढे दर, अतिव्यापारीकरण आदी मुद्द्यांवरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर बरीच टीका झाली. स्पर्धेचा अंतिम सामनाही काहीसा वादातच सापडला.

कांगारूंची जेतेपदाची हॅटट्रिक
सलग दुसऱ्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावला नाहीच आणि जेतेपदाची हॅटट्रिक साधली. सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विजेत्यांचा व सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही त्यांचा. ग्लेन मॅकग्रा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला. हा बहुमान लाभलेला तो पहिलाच गोलंदाज.

सर्वोत्तम खेळाडूच्या पारितोषिकाच्या स्पर्धेत मॅकग्रा आघाडीवर होता. त्यानं १५ गुण मिळवले. तीन सामन्यांचा तो मानकरी होता. जलदगती गोलंदाजांची खाण असलेल्या वेस्ट इंडिजमध्ये एक तेजतर्रार गोलंदाज स्पर्धेचा मानकरी ठरावा, हे न्याय्यच म्हटलं पाहिजे.

कॅरिबियन बेटांवरची ही स्पर्धा दि. १३ मार्च ते २८ एप्रिल २००७ अशी दीड महिना चालली. सहभागी संघांची संख्या वाढून १६ झाली, तरी सामन्यांची संख्या मागच्या स्पर्धेपेक्षा तीनने कमी झाली, एकूण ५१. स्वरूप काहीसं बदललं. चार गटांमध्ये साखळी सामने, प्रत्येक गटातील दोन संघ ‘सुपर एट’मध्ये, त्यांची साखळी स्पर्धा आणि त्यात एकाच गटातील दोन संघांमध्ये सामना नाही, त्यातून चार संघ उपान्त्य फेरीत असं एकंदरित स्वरूप होतं.

धक्कादायक निकाल
गटातील धक्कादायक निकालांमुळे भारत, पाकिस्तान ‘सुपर एट’मध्ये पोहोचलेच नाहीत. भारताचा पहिल्याच सामन्यात बांग्ला देशाने पाच गडी राखून पराभव केला. नंतर बर्म्युडाविरुद्ध भारताने षटकामागे ८.२६ या गतीने ४३१ धावा करून मिळविलेला मोठा विजय उपयोगाचा नव्हता. कारण शेवटच्या सामन्यात श्रीलंकेनंही भारतावर ६९ धावांनी मात केली.

आयर्लंड संघानं पदार्पणातच कमाल केली. साखळीतील पहिल्या सामन्यात त्यांनी झिम्बाब्वेशी बरोबरी साधली; दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला तीन गडी राखत हरवलं. स्वाभाविकच त्यांना ‘सुपर एट’मध्ये प्रवेश मिळाला. तिथे बांग्ला देशावर ७४ धावांनी दणदणीत विजय मिळविला.

मग बांग्ला देशानंही दक्षिण आफ्रिकेला ६७ धावांनी हरविण्याचा चमत्कार केला. झिम्बाब्वे, कॅनडा, बर्म्युडा व स्कॉटलंड यांना एकही सामना जिंकता आला नाही.

ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका (‘अ’ गट), श्रीलंका, बांग्ला देश (‘ब’), न्यूझीलंड, इंग्लंड (‘क’) आणि वेस्ट इंडिज, आयर्लंड (‘ड’ गट) ह्यांनी ‘सुपर एट’मध्ये प्रवेश केला. तिथे इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगला देश व आयर्लंड संघांचं आव्हान संपुष्टात आलं.

गटात तिन्ही सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा धडाका ‘सुपर एट’मध्येही चालू राहिला. त्यांच्या ह्या जोषपूर्ण वाटचालीत दोन महत्त्वाचे घटक होते, सलामीचा फलंदाज मॅथ्यू हेडन आणि पूर्ण स्पर्धेत धारदार मारा करणारा ग्लेन मॅकग्रा.


श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात मॅकग्रा.
त्याच्यापुढचं लक्ष्य स्पष्ट होतं.
(छायाचित्र सौजन्य : www.reuters.com)
.......................................
मॅकग्राला निवृत्त व्हायचं होतं
पण गंमत बघा, सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झालेल्या मॅकग्राचा स्पर्धेपूर्वीच निवृत्त होण्याचा विचार होता. बहुसंख्य ऑस्ट्रेलियाई क्रिकेटप्रेमींची भावना तीच होती – संघात मॅकग्रा नको, त्यानं आता निवृत्त व्हावं. त्यांना वाटत होतं, तो पूर्वीचा मॅकग्रा आता राहिला नाही; त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी होऊन गेलेली आहे. आता तरुण रक्ताला संधी द्या!

ह्याच स्पर्धेनंतर ‘पिजन’ मॅकग्रा (लांबसडक आणि दणकट पायांमुळे सहकारी खेळाडूंनी त्याला दिलेलं लाडकं नाव) निवृत्त झाला – सर्वोत्तम कामगिरी बजावून. त्यानं विश्वचषकाच्या ह्या स्पर्धेतील एकूण ११ सामन्यांमध्ये २६ बळी घेतले.

व्यवस्थित तेल-पाणी केलेलं एखादं यंत्र जसं ठरावीक लयीत सफाईदार काम करीत राहतं, तशी या स्पर्धेत मॅकग्राची कामगिरी होती. खेळलेल्या प्रत्येक सामन्यात त्याच्या नावावर किमान एक बळी आहे. स्पर्धेमध्ये त्यानं ३५७ धावा देऊन २६ बळी (सरासरी १३.७३, इकॉनॉमी ४.४१) मिळविले. त्यानं तीन-तीन बळी घेण्याची कामगिरी एकूण सहा सामन्यांत केली.

आपल्या पहिल्या स्पर्धेत (१९९६) मॅकग्रानं सहा सामन्यांमध्ये फक्त सात फलंदाजांना बाद केलं. नंतरच्या स्पर्धेत त्याच्या बळींची संख्या तिप्पट, १८ झाली. दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेत त्यानं २१ बळी घेतले. स्पर्धेगणिक त्याची कामगिरी उंचावत गेली.

फलंदाजाचा थरकाप उडवणारा भयाण वेग नाही किंवा नैसर्गिक स्विंग. पण कौशल्य आणि परिपूर्णतेचा ध्यास ह्यामुळंच मॅकग्रा इथपर्यंत पोहोचला. म्हणून इयान चॅपेलनं ऑस्ट्रेलियाच्या सर्वकालीन महान गोलंदाजांच्या पंक्तीत त्याला डेनिस लिली आणि रे लिंडवॉल ह्यांच्या नंतरची मानाची जागा दिली.

मॅकग्राचा दृष्टिकोण
स्वतःबद्दल मॅकग्रा म्हणतो, 'माझा दृष्टिकोण नेहमीच सरळ-साधा होता, असतो. तुम्ही शंभरपैकी ९९ वेळा यष्टीवर अचूक मारा करीत असाल, तर नक्कीच बळी मिळवणार. यात काही शंकाच नाही, असं मला वाटतं!'


दे टाळी! रसेल अर्नॉल्डला बाद केल्यानंतर
हसीकडून मिळालेली शाबासकी. (छायाचित्र सौजन्य : www.reuters.com)
.............................................................
स्कॉटलंडविरुद्ध फक्त १४ धावांमध्ये ३ गडी बाद करून मॅकग्रानं आपण अजून संपलो नसल्याची जाणीव करून दिली. द नेदरलँड्सविरुद्ध त्यानं दोन बळी मिळवले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या गटातील साखळी सामन्यात मात्र तो महागडा ठरला. नऊ षटकांत तब्बल ६२ धावा देऊन त्याला फक्त शवेल प्रिन्सचा बळी मिळाला.

‘सुपर एट’मधील सहाही सामन्यांत मात्र मॅकग्रानं धमाल उडवून दिली. वेस्ट इंडिजविरुद्ध ख्रिस गेल, सॅम्युएल्स व ब्राव्हो असे तीन बळी त्यानं मिळविले. बांग्ला देशाविरुद्ध त्यानं फक्त १६ धावांत तीन गडी बाद केले आणि सामन्याचा मानकरी बनला.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याला तीन बळींसाठी ६२ धावा द्याव्या लागल्या खऱ्या; पण इयान बेलला बाद करून त्याची पीटरसनबरोबरची शतकी भागीदारी त्यानंच संपुष्टात आणली. आयर्लंडविरुद्धच्या सामन्याचा मानकरी ठरलेल्या मॅकग्राचे आकडे बोलके होते – ७-१-१७-३. श्रीलंकेविरुद्ध त्यानं संगकारासह दोन आणि न्यूझीलंडविरुद्ध दोन बळी मिळविले.

भन्नाट आणि भेदक
उपान्त्य सामन्यात कांगारूंची गाठ पडली दक्षिण आफ्रिकेशी. मॅकग्राने प्रिन्स व मार्क बाऊचर यांना लागोपाठच्या चेंडूवर भोपळा फोडू न देताच तंबूत परत पाठवून दिलं. त्याला स्वतःला आवडलेला बळी होता जॅक कॅलिसचा.

सहाव्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर लेगला सरकत कॅलिसनं एक्स्ट्रा कव्हरकडे चौकार ठोकला. पुढच्या चेंडूवर त्यानं तसाच प्रयत्न केला; पण मॅकग्राच्या यॉर्करनं त्याची उजवी यष्टी मुळासकट उखडली होती. त्याच्या ५-१-१३-३ अशा भन्नाट माऱ्यामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था पाच बाद २७ अशी दयनीय झाली होती. ह्या एकतर्फी सामन्याचा मानकरी तोच होता.


जल्लोष आणखी एका बळीचा, विजयाकडे पुढचं पाऊल टाकल्याचा.
मुठी आवळून आनंद व्यक्त करणारा ग्लेन मॅकग्रा.
(छायाचित्र सौजन्य : www.cricket.com.au)
.....................................................

गोलंदाजीत मॅकग्रापाठोपाठ होते मुतय्या मुरलीधरन (श्रीलंका) व शॉन टेट (ऑस्ट्रेलिया), त्यांनी प्रत्येकी २३ बळी घेतले. फलंदाजीत अव्वल ठरला कांगारूंचाच मॅथ्यू हेडन. त्यानं ६५९ धावा (तीन शतकं, एक अर्धशतक, सरासरी ७३.२२, स्ट्राईक रेट १०१.०७) केल्या. विश्वचषकातील शंभरावं शतक त्यानंच झळकावलं.

ह्या स्पर्धेत चारशेहून अधिक धावा करणारे १० फलंदाज होते. एकूण १६ डावांत तीनशेहून अधिक धावा आणि २० शतकं झाली. दक्षिण आफ्रिकेच्या हर्शेल गिब्जने द नेदरलँड्सच्या डान व्हन बंज याला सलग सहा षट्कार ठोकले.

अंतिम लढतीचं विडंबन!
उपान्त्य सामन्यात न्यूझीलंडला ८१ धावांनी हरविणाऱ्या श्रीलंकेचं आव्हानं कांगारूंपुढे होते. ब्रिजटाऊनच्या (बार्बाडोस) केन्सिंग्टन ओव्हलवरचा अंतिम सामना पावसामुळे ३८ षटकांचा करण्यात आला. नंतर अपुऱ्या प्रकाशाचा व्यत्यय आल्याने श्रीलंकेला ३६ षटकांतलं सुधारित लक्ष्य देण्यात आलं. हा सामना म्हणजे विश्वचषकाच्या सर्वांत महत्त्वाच्या लढतीचं विडंबनच म्हणावं लागेल.

पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं षटकामागे ७.३९ धावांच्या गतीनं चार बाद २८१ अशी मजल मारली, ती ॲडम गिलख्रिस्टच्या शतकामुळे (१०४ चेंडूंमध्ये १४९ – १३ चौकार व आठ षट्कार). तोच सामन्याचा मानकरी ठरला. सनत जयसूर्य व कुमार संगकारा ह्यांनी दुसऱ्या जोडीसाठी ११६ धावांची भागीदारी केली. पण त्यानंतही श्रीलंकेचे प्रयत्न अपुरे पडले.

सात षटकांत ३१ धावा देऊन एक बळी घेतल्यानंतर मॅकग्राला विश्रांती देण्यात आली होती. सामन्यातलं शेवटचं षटक त्याला देण्याची कर्णधार रिकी पाँटिंग ह्याची इच्छा होती. पण अंधूक प्रकाश आणि सामन्याचा उपचार पूर्ण करण्याचा आग्रह ह्यामुळे त्याला हंगामी फिरकी गोलंदाजांचाच उपयोग करावा लागला. त्यानं निकालात काही फरक पडला नाही. मॅकग्रानं विश्वचषकासह मोठ्या आनंदानं आपल्या लाडक्या खेळाचा निरोप घेतला.
.................

#क्रिकेट #विश्वचषक #विश्वचषक2023 #विश्वचषक2007 #वेस्ट_इंडिज #ग्लेन_मॅकग्रा #ऑस्ट्रेलिया #कांगारू #भारत #पाकिस्तान #आयर्लंड #बांग्ला_देश #श्रीलंका #ॲडम_गिलख्रिस्ट #बॉब_वूल्मर #जलद_गोलंदाज #स्पर्धेतील_सर्वोत्तम #सुपर_एट #सामन्याचा_मानकरी 

#CWC #CWC2023 #CWC2007 #ODI #Glenn_McGrath #Adam_Gilchrist #Australia #Kangaroo  #West_Indies #India #Bharat #Pakistan #South_Africa #Bob_Woolmer #BanglaDesh #SriLanka #icc #Best_Player #super_eight #MoM #most_wickets
.................

(‘झी मराठी दिशा’ साप्ताहिकात १८ मे २०१९ रोजी प्रकाशित झालेला लेख अधिक माहितीसह आणि विस्तारित स्वरूपात.)
.................

आधीचा लेख इथे वाचता येतील - 

https://khidaki.blogspot.com/2019/06/WcupCrowe.html

https://khidaki.blogspot.com/2019/06/WC-Jaysurya.html

https://khidaki.blogspot.com/2023/09/cwc-LanceKlusener.html

https://khidaki.blogspot.com/2023/09/Sachin2003.html

.................

मालिकेतील पुढच्या लेखांसाठी कृपया फॉलो करा...

बुधवार, २० सप्टेंबर, २०२३

सचिऽऽन, सचिऽऽन!

विश्वचषकातील सर्वोत्तम - ४

(दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया - २००३)


‘शांतपणे खेळा’  हा  गांगुलीचा आदेश सचिन-सेहवाग जोडीनं धुडकावला. पण त्यामुळं कर्णधार रागावला नव्हता. पाकिस्तानी गोलंदाजाची पिटाई होताना पाहून तो हसत होता. ‘मी पेटलो आहे...भारतीय फलंदाजांचं काही खरं नाही,’  ही शोएब अख्तरची दर्पोक्ती सीमापार गेली. दक्षिण आफ्रिकेतील ह्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा सचिन तेंडुलकर सर्वोत्तम ठरला. दुखापतींवर विजय मिळवित आणि नेटमध्ये एकही चेंडू न खेळताही! 


स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचं पारितोषिक सचिनने सर गॅरी सोबर्स ह्यांच्याकडून स्वीकारलं.
(छायाचित्र सौजन्य : cricket.yahoo.net)
................................................

‘गणपती बाप्पा मोरया...’ किंवा ‘सचिssन सचिssन’ असा गगनभेदी गजर होत असतो, तेव्हा भारताचा क्रिकेट सामना चालू असतो, हे सांगण्याची गरज नाहीच. गजर स्टेडियममध्ये चालू असतो आणि टीव्ही.च्या माध्यमातून तो कोट्यवधी क्रिकेट रसिकांना रोमांचित करतो.

बरोबर २० वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील वेगवेगळ्या स्टेडियममध्ये ‘सचिssन सचिssन’ असे उत्साहाने ओरडणारे भारतीय प्रेक्षक हजर होते. भारतीय संघ स्पर्धेसाठी दाखल झाला, तेव्हा एका हिंदी वाहिनीची बातमी होती, ‘साऊथ आफ्रिका में सचिन का जादू चल गया...’ ही भविष्यवाणी होती आणि १०० टक्के खरी ठरणारी.

‘जपून खेळा, अशी सूचना मी सलामीच्या जोडीला दिली होती; विशेषतः सेहवागला. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला भक्कम सलामी आवश्यक होती. खेळपट्टी चांगली आहे; उगीच धोका पत्करण्याची गरज नाही, असं वीरूला सांगून मी म्हणालो होतो की, दहा षटकांनंतर आपण वेग वाढवू.’

‘...गंमत बघा. कर्णधाराच्या सूचनेची पार वाट लागली होती. आणि तरीही तो अभागी कर्णधार तक्रार करण्याऐवजी खिदळत होता. सचिन आणि सेहवाग ह्यांनी पाकिस्तानी गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या होत्या. पाचच षटकांत त्यांनी संघाचं अर्धशतक झळकावलं होतं!’

‘अ सेंच्युरी इज नॉट इनफ’मध्ये कर्णधार सौरभ गांगुलीनं ही मजेशीर गोष्ट सांगितली आहे. हा सामना अर्थातच २००३च्या विश्वचषक स्पर्धेतला. भारतानं सहा गडी व २६ चेंडू राखून सहज विजय मिळविला. सामन्याचा मानकरी होता ७५ चेंडूंमध्ये ९८ धावा करणारा सचिन तेंडुलकर.

सामना एकतर्फीच
शोएब अख्तर आणि तेंडुलकर सामना रंगण्याचं भाकित होतं. ते खोटं ठरवत सामना एकतर्फी झाला. शोएबचे चेंडू ज्या गतीनं येत, त्याच्या दुप्पट गतीनं सीमापार जात!

आफ्रिका खंडातील ही पहिली स्पर्धा ९ फेब्रुवारी ते २३ मार्च २००३ या दरम्यान रंगली. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे व नामिबिया ह्यांनी ती आयोजित केली. त्यात सर्वाधिक १४ संघ सहभागी झाले. त्यामुळे सामन्यांची संख्या ५४ झाली. संघांची विभागणी दोन गटांत. गटवार साखळीनंतर प्रत्येक गटातून तीन संघ ‘सुपर सिक्स’साठी पात्र. त्यातील पहिले चार संघ उपान्त्य फेरीत, हे मागच्या स्पर्धेचं स्वरूप कायम होतं.

बलाढ्य दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, इंग्लंड ‘सुपर सिक्स’साठी अपात्र ठरले. त्या ऐवजी झिम्बाब्वे संघ मात्र तिथपर्यंत गेला. कसोटी क्रिकेटसाठी पात्र नसतानाही उपान्त्य फेरीपर्यंत धडक मारणारा एकमेव संघ म्हणजे केनिया. त्याची कारणंही तशीच होती. झिम्बाब्वेतील मुगाबे सरकारचा निषेध म्हणून इंग्लंडने सामना न खेळता पुढे चाल दिली. न्यूझीलंडने सुरक्षिततेच्या कारणावरून केनियात खेळणं टाळलं.

सचिन पुढे, गांगुली मागे
स्पर्धेचा अंतिम सामना चालू असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सर्वोत्तम खेळाडूचं नाव जाहीर केलं – सचिन तेंडुलकर! गांगुलीला चार गुणांनी मागं टाकून तो सर्वोत्तम ठरला.

सचिनची कामगिरी होतीच तशी! एकूण ११ सामन्यांतील तेवढ्याच डावांत ७५४ चेंडू खेळून ६७३ धावा. स्पर्धेतील विक्रम. त्यात एक शतक व सहा अर्धशतकं. स्ट्राइक रेट ८९.२५, सरासरी ६१.१८. शिवाय दोन बळी व चार झेल.

धावांमध्ये सचिननंतर येतात, गांगुली (४६५), रिकी पाँटिंग (४१५) व अॅडम गिलख्रिस्ट (दोघेही ऑस्ट्रेलिया – ४०८). गिलख्रिस्ट स्ट्राइक रेटमध्ये मात्र सचिनहून सरस – १०५.४२.

‘बीस साल बाद’ अशी भारतीयांना वाटणारी आशा अंतिम सामन्यात फोल ठरली, तरी स्पर्धेवर छाप राहिली सचिनचीच. त्यानं एका शतकासह सलग चार अर्धशतकं झळकावली. अगदी शतकाच्या उंबरठ्यावर तो दोनदा बाद झाला.

पहिल्याच सामन्यात द नेदरलँड्सविरुद्ध भारताची फलंदाजी काही बहरली नाही. संघाच्या २०४ धावांमध्ये सचिनचा वाटा होता ५२. नंतरच्या सामना ऑस्ट्रेलियाशी. ब्रेट ली व जेसन गिलेस्पी यांच्यासमोर नांगी टाकणाऱ्या भारतानं जेमतेम सव्वाशे धावा केल्या. त्यात सर्वोच्च ३६ सचिनच्या आणि खालोखाल २८ हरभजनच्या. हा सामना कांगारूंनी सहज जिंकला.

हरारेतील झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापासून सेहवाग-सचिन जोडी जमली. त्यांनी १७.४ षट्कांमध्ये ९९ धावांची सलामी दिली. सचिनच्या ८१ धावा झाल्या ९१ चेंडूंमध्ये. त्यात १० खणखणीत चौकार होते.

संघहित जपणारा सौरभ
इथे गांगुलीचा आवर्जून उल्लेख करायला हवा. कर्णधार म्हणून त्यानं संघहिताचा जो विचार केला, त्याचं कौतुक करायला हवं. स्पर्धेसाठी संघ निवडताना सचिनची मधल्या फळीतला फलंदाज म्हणून निवड झाली. पण त्याची इच्छा होती सलामीला खेळण्याची.

गांगुली-सेहवाग ही डावखुऱ्या-उजव्या फलंदाजांची जोडी चांगली जमलेली होती. चौथ्या क्रमांकावर येणारा सचिन मधल्या फळीचा आधारस्तंभ असेल आणि डावाला आकार देईल, असं संघाच्या व्यवस्थापनाचं धोरण होतं.

पण सचिनच्या इच्छेला गांगुलीनं मान दिला. स्वतः मधल्या फळीत खेळणं त्यानं स्वीकारलं. सचिन-सेहवाग जोडी जमली. त्याचा त्यानं आत्मचरित्रात कौतुकानं उल्लेख केला आहे.

भरात असलेल्या सचिनचा दुबळ्या नामिबियाला फटका न बसता तरच आश्चर्य. त्याच्या (१५१ चेंडूंत १५२) व गांगुलीच्या शतकामुळं भारतानं मोठी धावसंख्या उभी केली. सचिनएवढ्याही धावा नामिबियाला करता आल्या नाहीत. सामन्याचा निर्विवाद मानकरी तोच ठरला.

त्यानंतर कॅडीक, अँडरसन, फ्लिंटॉफ ह्यांच्या माऱ्यापुढंही सचिननं अर्धशतक (५० धावा ५२ चेंडू) झळकावलं. डावखुऱ्या आशिष नेहराच्या सहा बळींमुळे इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला.

शोएबची दर्पोक्ती
महत्त्वाचा सामना होता एक मार्चचा. गाठ पाकिस्तानशी होती. ताशी १०० मैल वेगाचा पल्ला गाठलेला शोएब अख्तर फुरफुरत होता. आधीच्या दोन स्पर्धांमधील पराभवाचा वचपा काढण्याची खुमखुमी त्याला होती. सामन्याच्या आदल्या दिवशी तो म्हणाला होता, ‘मी पेटलो आहे. मला एकदा लय सापडली की, भारतीय फलंदाजांचं काही खरं नाही.’

सामन्यातलं चित्र उलटंच होतं. सईद अन्वरच्या शतकामुळे पाकिस्तानने सात गडी गमावून २७३ धावांची मजल मारली. वसीम अक्रम-अख्तर-वकार युनूस असा तोफखाना असल्यामुळंच कर्णधार गांगुलीनं ‘थोडं जपून’ खेळायला सांगितलं होतं.

पाचमध्येच पन्नास!
सेहवाग-सचिन वेगळ्या इराद्यानं मैदानात उतरले. अक्रमच्या पहिल्याच षट्कात दोन चौकार गेले. मिजाशीत असणाऱ्या शोएबच्या पहिल्या षट्कातील चौथा चेंडू थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर आणि सचिनचा थर्ड मॅनवरून षट्कार. त्याच्या पुढचे दोन चेंडू सीमापार! षट्कात १८ धावा. त्याच्या जागी आलेल्या युनूसच्या षट्कातही ११ धावा फटकावल्या गेल्या. या जोडीनं पाचवं षट्क संपतानाचा संघाचं अर्धशतक पूर्ण केलं.

सचिनच्या बॅटचा हा तडाखा पाकिस्तानला आणि तोंडाळ शोएबला.
(छायाचित्र सौजन्य : thequint.com)
......................................................
सचिनची ही खेळी जबरदस्त होती. त्यानं अवघ्या ७५ चेंडूंमध्ये ९८ धावा केल्या. त्यात १० चौकार व एक षट्कार होता. उद्दामपणाची किंमत शोएबनं १० षटकांत ७२ धावा मोजून चुकविली! स्फोटक व निर्णायक खेळी करणारा सचिन सामन्याचा मानकरी होता. गटात दुसरा क्रमांक मिळवून भारत ‘सुपर सिक्स’साठी पात्र ठरला.

‘सुपर सिक्स’च्या तिन्ही सामन्यांमध्ये भारतानं सहज विजय मिळविले. केनियाविरुद्ध सचिन व सेहवाग स्वस्तात बाद झाल्यानंतर गांगुलीच्या नाबाद शतकानं व युवराजच्या नाबाद अर्धशतकामुळं भारतानं सहा गडी राखून विजय मिळविला.


श्रीलंकेविरुद्ध शतक फक्त तीन धावांनी हुकलं.
(छायाचित्र सौजन्य : sachinist.in)
...........................................
श्रीलंकेविरुद्ध सचिन (१२० चेंडूंमध्ये ९७) व सेहवाग (७६ चेंडू, ६६ धावा) यांनी दीडशतकी सलामी दिली. श्रीनाथ, नेहरा व झहीर खान यांनी लंकेला १०२ धावांमध्येच गुंडाळलं. सलामीवीरांसह गांगुलीही अपयशी झाल्यानंतर महंमद कैफ व राहुल द्रविड यांच्या शानदार फलंदाजीमुळं न्यूझीलंडवर सात गडी राखून विजय मिळाला.

केनियाविरुद्ध अष्टपैलू खेळ
उपान्त्य सामन्यात २० मार्च रोजी गाठ होती केनियाशी. सचिननं सेहवागला साथीला घेऊन पुन्हा एकदा ७४ धावांची भक्कम सलामी दिली. त्यानं ८३ धावा केल्या, तर गांगुलीनं पुन्हा एक नाबाद शतक झळकावलं. केनियाला १७९ धावांत गुंडाळण्यासाठी तेंडुलकरनं दोन बळी घेत हातभार लावला.

अंतिम सामन्याचा वेध घेताना ‘द गार्डियन’मध्ये माईक सेल्व्ही यानं लिहिलं होतं, ‘तेंडुलकरनं गेल्या काही आठवड्यांत अद्भुत कौशल्य दाखवून दिलं आहे. त्यात फक्त भक्कम बचाव नाही, तर मिड-ऑन व मिड-ऑफच्या क्षेत्ररक्षकांना उल्लू बनविणारे दिमाखदार ड्राइव्ह, शानदार फ्लिक आहेत.’

पाँटिंगचं नाबाद शतक
विजेतेपदाची लढत एकतर्फीच झाली. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने फक्त २ गडी गमावून ३५९ धावा केल्या. ही स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या. गिलख्रिस्ट-मॅथ्यू हेडन यांच्या शतकी सलामीनंतर तिसऱ्या जोडीसाठी कर्णधार रिकी पाँटिंग व डेमियन मार्टिन यांनी नाबाद २५४ धावांची भागी केली.

सचिन (एका चौकारासह चार) अपयशी ठरल्यानंतर भारताला जेमतेम २३४ धावांपर्यंत मजल मारता आली. सेहवागने ८१ चेंडूंमध्ये ८२ धावा केल्या. नाबाद शतकवीर पाँटिंग (१२१ चेंडूंमध्ये आठ षट्कार व तीन चौकारांसह १४०) याची सामन्याचा मानकरी म्हणून निवड झाली. सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविणारा ऑस्ट्रेलिया दुसरा संघ ठरला. पूर्ण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ अपराजित राहिला आणि भारताने गमावलेले दोन्ही सामने कांगारूंविरुद्धचे होते!

अबाधित विक्रम
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी चुरस होती सचिन आणि सौरभ ह्यांच्यातच. केनियाविरुद्धच्या दोन बळींनी सचिन पुढे सरकला. स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्यानं दुसऱ्यांदा नोंदविला. ह्या आधी भारतात १९९६मध्ये झालेल्या स्पर्धेत त्यानं सात सामन्यांमध्ये ५२३ धावा केल्या होत्या. ह्या वेळी ६७३. त्याचा हा विक्रम अजून कोणाला गाठता आला नाही. मागच्या स्पर्धेत रोहित शर्मा त्या टप्प्यापासून पाव शतक दूर राहिला!

हा विक्रम झाला तो सचिन पूर्ण तंदुरुस्त नसताना! ‘इंडिया टुडे’च्या संकेतस्थळावर त्याबद्दल स्पष्ट उल्लेख आहे. सचिनच्या घोट्याला आणि गुडघ्याला दुखापत होती. त्यामुळे फलंदाजीसाठी मैदानात उतरताना त्याला पायाला पट्टी बांधावी लागे.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा चालू असताना सचिननं नेटमध्ये एकदाही फलंदाजी केली नाही. त्याच्या वाढदिवसानिमित्त पी. टी. आय. वृत्तसंस्थेला हरभजनसिंग ह्यानं जी मुलाखत दिली, त्यात ह्याचा उल्लेख आहे.

आपल्या ‘पा जीं’चं कौतुक करताना हरभजन म्हणाला, ‘स्पर्धा चालू असताना जावगल श्रीनाथ, आशिष नेहरा, झहीर खान, अनिल कुंबळे किंवा मी त्याला एकदाही नेटमध्ये गोलंदाजी केल्याचं आठवत नाही.’

सध्याच्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही ह्या आठवणीला दुजोरा देतो. ‘स्पोर्ट्सकीडा’ संकेतस्थळाशी बोलताना राहुल म्हणाला, ‘त्या विश्वचषक स्पर्धेत सचिन नेटमध्ये एकही चेंडू खेळला नाही. आम्हा सगळ्यांनाच प्रश्न होता, ‘तो असं का करतोय?’ त्याबद्दल मी विचारल्यावर तो म्हणाला, ‘मला सूर सापडलाय. नेटमध्ये तो घालवायचा नाही. माझी भावना खरी असेल तर मैदानात उतरल्यावर धावा होतीलच.’

सचिननं कोट्यवधी रसिकांना जिंकलं
महान अष्टपैलू खेळाडू गॅरी सोबर्स ह्यांच्या हस्ते सचिनला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचं पारितोषिक देण्यात आलं. ह्या स्पर्धेचे कार्यकारी संचालक डॉ. अली बाकर ह्यांनी व्यक्त केलेली भावना बरंच काही सांगणारी आहे. ते म्हणाले, ‘हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट विश्वचषक व्हावा अशी आमची इच्छा होती. सचिनच्या शानदार फलंदाजीमुळे ह्या स्पर्धेने क्रिकेटजगतातील कोट्यवधी रसिकांना लोकांना मोहित केलं. ह्या सन्मानासाठी, कौतुकासाठी तो खरोखर पात्र आहे.’
.................

#क्रिकेट #विश्वचषक #विश्वचषक2023 #विश्वचषक2003 #दक्षिण_आफ्रिका #सचिन_तेंडुलकर #भारत #सौरभ_गांगुली #सेहवाग #शोएब_अख्तर #पाकिस्तान #राहुल_द्रविड #ऑस्ट्रेलिया #स्पर्धेतील_सर्वोत्तम #सुपर_सिक्स #सामन्याचा_मानकरी #धावांचा_विक्रम  

#CWC #CWC2023 #CWC2003 #ODI #South_Africa #Sachin_Tendulkar #India #Bharat #Sourav_Ganguly #Sehwag #Rahul_Dravid #Shoaib_Akhtar #Pakistan #Aurstralia #Allrounder #icc #Best_Player #super_six #MoM #run_record
.................

(‘झी मराठी दिशा’ साप्ताहिकात  मे २०१९ रोजी प्रकाशित झालेला लेख अधिक माहितीसह आणि विस्तारित स्वरूपात.)
.................

आधीचा लेख इथे वाचता येतील - 

https://khidaki.blogspot.com/2019/06/WcupCrowe.html

https://khidaki.blogspot.com/2019/06/WC-Jaysurya.html

https://khidaki.blogspot.com/2023/09/cwc-LanceKlusener.html
.................
मालिकेतील पुढच्या लेखांसाठी कृपया फॉलो करा...


शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

खणखणीत अष्टपैलू कामगिरी

विश्वचषकातील सर्वोत्तम - ३
(इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, वेल्स आणि द नेदरलँड्स - १९९९)

‘चोकर्स’  विशेषण द. आफ्रिकेच्या संघासाठी लावायला सुरुवात झाली ह्याच स्पर्धेपासून. कांगारूंविरुद्ध  बरोबरीत सुटलेल्या उपान्त्य सामन्यात त्यांचा हीरोच त्यांच्यासाठी व्हिलन ठरला! पण स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्याचीच निवड झाली  - लान्स क्लूसनर. ‘झुलू’नं संपूर्ण स्पर्धेत अफाट अष्टपैलू खेळ केला. तडाखेबंद फलंदाजी आणि अचूक गोलंदाजी. प्रतिस्पर्ध्यांना त्यानं चारी मुंड्या चित केलं होतं. 


निर्णायक क्षणी तडाखेबंद फलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेचा
तारणहार बनलेला लान्स क्लुसनर. (छायाचित्र सौजन्य -icc-cricket.com)
---------------------------------------------------

‘चोकर्स’! दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी वारंवार वापरलं जाणारं हे विशेषण. त्याचा अर्थ काय? CHOKER ह्या एकवचनी शब्दाची Britannica Dictionaryमध्ये दिलेली व्याख्या अशी - 1. a necklace that fits closely around the neck. 2. informal : a person who fails to do something because of nervousness : a person who chokes.

थोडक्यात, निर्णायक क्षणी गळपटणारा, मोक्याच्या क्षणी दम कोंडणारा म्हणजे ‘चोकर’. अशा दम टाकणाऱ्यांचा समूह, संघ म्हणजे ‘चोकर्स.’ दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हे विशेषण लागलं १९९९च्या विश्वचषक स्पर्धेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा उपान्त्य सामना जिंकता जिंकता बरोबरीत सुटला आणि अंतिम सामना खेळण्याचं स्वप्न उद्ध्वस्त झालं. ते हताशपणे पाहण्याची वेळ आली, त्या वेळी मैदानात असलेल्या लान्स क्लुसनर ह्याच्यावर.

नायक आणि खलनायकही?
योग बघा, प्रामुख्याने क्लुसनरच्याच अष्टपैलू खेळामुळे त्याच्या संघाने इथवर झेप घेतली होती. नेमक्या वेळी, निर्णायक क्षणी संघानं कच खाल्ली, तेव्हा तोच होता त्याचा साक्षीदार. त्या अपयशाचं माप त्याच्या पदरात पुरेपूर घालण्यात आलं. नायक तो आणि काही प्रमाणात खलनायकही तोच!

इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, वेल्स आणि द नेदरलँड्स अशा पाच देशांनी आयोजित केलेली ही स्पर्धा १४ मे २० जून एवढा काळ खेळली गेली. दीर्घ काळानंतर इंग्लंडला यजमान बनण्याची संधी मिळाली. एकूण डझनभर देशांचा सहभाग असलेल्या ह्या स्पर्धेतूनच बांगला देश व स्कॉटलंड ह्या संघांचं पदार्पण झालं.

स्पर्धेचं स्वरूपही काहीसं बदललं. दोन गटांमध्ये साखळी सामने आणि प्रत्येक गटातील पहिले तीन संघ ‘सुपर सिक्स’मध्ये. अव्वल साखळीनंतर पहिल्या चार स्थानांवर आलेले संघ उपान्त्य फेरीत असं स्वरूप असलेल्या स्पर्धेत एकूण ४२ सामने झाले.

ह्या स्पर्धेची वैशिष्ट्यं काय? बरीच सांगता येतील. त्यातली महत्त्वाची अशी - पांढऱ्या ‘ड्यूक’ चेंडूचा वापर, बरोबरीत सुटलेला स्पर्धेतील पहिलाच सामना, नवा विश्वविजेता देण्याची चार स्पर्धांची खंडित झालेली पंरपरा, गट साखळीतील गुण ‘सुपर सिक्स’मध्ये पुढे नेण्याची पद्धत (पॉइंट्स कॅरी फॉरवर्ड), ‘अ’ गटामध्ये झिम्बाब्वेचे बलाढ्य भारत व दक्षिण आफ्रिका संघांविरुद्ध विजय.

क्लुसनर सर्वोत्तम
अंतिम सामना खेळण्याची हाता-तोंडाशी आलेली संधी ज्या संघानं गमावली, त्याच दक्षिण आफ्रिकेचा लान्स क्लुसनर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याची अष्टपैलू कामगिरी तेवढी खणखणीत होतीच मुळी. ‘अ’ गटातील साखळी सामन्यांमध्ये क्लुसनरच्या खेळामुळेच संघाला पराभवाच्या उंबरठ्यावरून विजयाच्या महाद्वाराकडे जाता आलं.

मधल्या फळीत खालच्या क्रमांकावर फलंदाजीस येणाऱ्या डावखुऱ्या क्लुसनरने अफलातून खेळ केला. स्पर्धेत तो पहिल्यांदा बाद झाला ते ‘सुपर सिक्स’मधील न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत. गेविन लार्सनने त्रिफळा उडवून त्याला बाद करता येतं, हे दाखवून दिलं.

चौथा किंवा पाचवा गोलंदाज म्हणून क्लुसनरच्या हाती कर्णधार चेंडू द्यायचा. तिथंही त्यानं कमाल दाखवली. त्याच्या उजव्या हाती मध्यमगती गोलंदाजीने अवघड होऊ पाहणाऱ्या भागीदाऱ्या मोडून संघाला दिलासा दिला. सलग तीन वेळा आणि एकूण चारदा सामन्याचा मानकरी म्हणून त्याची निवड झाली.

हीरो होता ‘झुलू’
‘झुलू’ म्हणून ओळखला जाणारा क्लुसनर संघाचा हीरो होता. संकटकाळी धावून येणारा तरणाबांड, दमदार नायक. प्रतिस्पर्ध्यांना चारी मुंड्या चित करणारा हीरो. फलंदाजीच्या सरासरीत तो अव्वल ठरला. संघाचे प्रमुख गोलंदाज अॅलन डोनाल्ड व शॉन पोलॉक ह्यांच्यापेक्षा जास्त बळी त्याच्या खात्यावर होते. खऱ्या अर्थानं त्यानं संघासाठी ह्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी बजावली.

क्लुसनरच्या अष्टपैलू खेळाची झलक गटातील पहिल्याच सामन्यात भारताविरुद्ध दिसली. चौथा गोलंदाज म्हणून चेंडू हातात पडल्यावर त्यानं सचिन तेंडुलकर, अर्धशतकवीर राहुल द्रविड व कर्णधार महंमद अजहरुद्दीन हे तीन महत्त्वाचे बळी मिळविले. फलंदाजीसाठी आठव्या क्रमांकावर येऊन त्याने चार चेंडूंमध्ये नाबाद १२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेनं हा सामना चार गडी राखून जिंकला.

विश्वविजेत्या श्रीलंकेशी पुढचा मुकाबला होता. त्यांच्याविरुद्ध मिळविलेल्या ८९ धावांच्या विजयाचा मानकरी ठरला तो क्लुसनरच. नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यानं ४५ चेंडूंमध्ये नाबाद ५२ (पाच चौकार व दोन षट्कार) फटकावल्या. नवव्या व दहाव्या जोडीसाठी तब्बल ७७ धावांची भर घातली. मग उपुल चंदन, चमिंडा वास व प्रमोदया विक्रमसिंघे ह्यांना त्यानं बाद केलं, ते फक्त २१ धावांचं मोल देऊन. सामन्याचा मानकरी? स्वाभाविकपणे तोच!

इंग्लंडविरुद्धची धमाकेदार खेळी
गटातील पुढच्या दोन्ही सामन्यांवर छाप होती क्लुसनरचीच. यजमान इंग्लंडवर १२२ धावांनी मिळविलेल्या दणदणीत विजयात त्याच्या नाबाद खेळीचं महत्त्व मोठं होतं. सातव्या क्रमांकावर येऊन त्यानं इंग्लिश गोलंदाजी पिटून काढली. त्याची धमाकेदार खेळी होती ४० चेंडूंतील ४८ धावांची. त्यात तीन चौकार व एक षट्कार. हा हल्ला चढवत त्यानं संघाची धावसंख्या समाधानकारक स्थितीत नेली. गोलंदाजी करताना सहा षट्कांमध्ये फक्त १६ धावा देऊन एक गडी बाद केला.


क्लुसनरची मध्यमगती गोलंदाजी भेदक ठरली.
(छायाचित्र ट्विटरवरून साभार)
केनियाविरुद्ध सात गडी व नऊ षट्कं राखून विजय मिळविताना लान्सच्या गोलंदाजीला धार चढली. सलामीवीरांनी ६६ धावांची भागीदारी करूनही केनियाला १५२ धावांपर्यंतच मजल मारता आली. टिकोलो, ओडुम्बे यांच्यासह पाच फलंदाजांचे बळी लान्सने मिळविले, ते साडेआठ षट्कांत फक्त २१ धावा मोजून. फलंदाजीला उतरण्याची वेळच त्याच्यावर आली नाही.

शेवटच्या साखळी सामन्यात मात्र दक्षिण आफ्रिकेला झिम्बाब्वेकडून पराभव पत्करावा लागला. झिम्बाब्वेनं ठेवलेल्या २३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांची अवस्था सात बाद १०६ होती. क्लुसनरनं (५८ चेंडू, नाबाद ५२, ३ चौकार व २ षट्कार) दोन महत्त्वाच्या भागीदाऱ्या केल्या. संघाला विजय मिळवून देणं त्याला शक्य झालं नाही. पण त्यानं पराभवाचं अंतर खूप कमी केलं.

तारणहार
‘सुपर सिक्स’मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला हरवताना दक्षिण आफ्रिकेचा तारणहार बनला तो लान्स क्लुसनरच. विजयासाठी २२१ धावांचा पाठलाग करताना संघाची अवस्था दयनीय म्हणावी अशी झाली होती - सहा बाद १३५. समोर अक्रम, शोएब अख्तर, अजहर महमूद, सकलेन मुश्ताक असे बिनीचे गोलंदाज होते. त्या सामन्यात क्लुसनर आठव्या क्रमांकावर फलंदाजी आला. त्यानं कॅलिसबरोबर सातव्या जोडीसाठी ४१ आणि नंतर बाऊचरबरोबर नाबाद ४५ धावा जोडल्या.

क्लुसनरची खेळी होती ४१ चेंडू, नाबाद ४६, प्रत्येकी तीन चौकार व षट्कार. डावातील सेहेचाळिसाव्या षट्कात त्यानं शोएब अख्तरला मिडविकेटवरून षट्कार खेचला आणि लगेच फाईन लेगला चौकार मारला. त्या आधी गोलंदाजी करताना त्यानं एक बळी मिळविला आणि एका धावचितला हातभार लावला. तोच सामन्याचा मानकरी ठरला. पुन्हा एकदा!

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघनायकानं वेगळा निर्णय घेतला. त्यानं क्लुसनरला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. पण तिथं त्याला काही करता आलं नाही. स्पर्धेत तो पहिल्यांदाच बाद झाला, ते अवघ्या चार धावांवर. ती कसर त्याने दोन बळी घेऊन भरून काढली. हार पत्कराव्या लागलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही क्लुसनर चमकला. त्याच्या २१ चेंडूंतील ३६ धावांमुळेच संघाला २७१ धावांची मजल मारता आली. रिकी पाँटिंगला बाद करून त्यानं शतकी भागीदारी केलेली चौथी जोडी फोडली.

कांगारूंशी बरोबरी
उपान्त्य फेरीत दक्षिण आफ्रिकेची गाठ पुन्हा कांगारूंशी पडली. बर्मिंगहॅम इथं १७ जून रोजी झालेला हा सामना विलक्षण रंगला आणि बरोबरीत सुटला. सरस गुणांच्या आधारे कांगारूंनी अंतिम फेरी गाठली.

विजयासाठी २१४ धावांचं लक्ष्य कॅलिस (५३) व जाँटी ऱ्होडस (४३) यांनी जवळ आणलं होतं. त्याच वेळी शेन वॉर्नने चार बळी घेऊन सामना चुरशीचा केला. आठव्या क्रमांकावर आलेल्या क्लुसनरने (१६ चेंडूंत नाबाद ३१) संघाला विजयाजवळ नेलं.


उपान्त्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्वप्नभंग.
(छायाचित्र सौजन्य - www.mirror.co.uk)
--------------------------------------
सामन्याचं शेवटचं षट्क बाकी आणि द. आफ्रिकेला विजयासाठी हव्या होत्या नऊ धावा. डॅमियन फ्लेमिंगच्या पहिल्या दोन चेंडूंना क्लुसनरनं सीमापार केलं. पण विजयासाठीची एक धाव धावताना गडबड होऊन डोनाल्ड धावबाद झाला! अंतिम सामन्याचं उघडलेलं दार धाडकन् बंद झालं. दक्षिण आफ्रिकेचा स्वप्नभंग!!

पश्चातबुद्धी...असो! 
त्या सामन्याची (नकोशी) आठवण काढताना क्लुसनर म्हणतो, ‘मी अस्वस्थ होतो. उतावीळपणा दाखवायला नको होता. थोडं थांबायला हवं होतं. पण ही पश्चातबुद्धी झाली. कदाचित पुढचे दोन चेंडू अचूक यॉर्कर पडले असते तर... असो!’

‘झुलू’ची ह्या स्पर्धेतली कामगिरी सर्वोत्तम होती, ह्यामध्ये संशय मुळीच नाही. एकूण नऊ सामन्यांमध्ये सहा वेळा नाबाद राहत त्यानं १४०.५ एवढ्या सरासरीनं आणि १२२.१७ स्ट्राईक रेटने २८१ धावा केल्या. संघाकडून सर्वाधिक १७ बळी त्यानेच घेतले; तेही २०.५८ अशा सरासरीने. प्रत्येक वेळी संघाच्या हाकेला ओ देऊन निर्णायक खेळ क्लुसनरने केला. त्यामुळेच तो सर्वोत्तम ठरला.

त्या स्पर्धेत बी. बी. सी. टेलिव्हिजनचे समालोचक होते ज्येष्ठ क्रिकेटपटू रिची बेनॉ. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून क्लुसनरची निवड करण्याचा निर्णय त्यांना पुरेपूर पटला होता. त्यांचं म्हणणं होतं, ‘प्रत्येक वेळी तो मैदानावर अशा आविर्भात उतरे की, वाटायचं हा सामना फिरवणार बरं. (ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या प्रसिद्ध सामन्यातील शेवटच्या षटकात) त्यानं डॅमियन फ्लेमिंगच्या चेंडूवर मारलेले ते दोन चौकार माझ्या डोळ्यांचं पारणं फेडणारे होते.’

लान्सची कामगिरी ११० टक्के
दिमाखदार अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या ‘झुलू’बद्दल त्यांच्या संघाचे प्रशिक्षक बॉब वूल्मर म्हणाले, ‘‘संपूर्ण संघानं १०० टक्के कामगिरी बजावली; पण लान्सची कामगिरी ११० टक्के होती!’’ त्याच्या कामगिरीची दखल घेणाऱ्या ‘द गार्डियन’च्या लेखाचं शीर्षक मोठं बोलकं आहे - When Lance Klusener set the standard for cricketing all-rounders!
...............

#क्रिकेट #विश्वचषक #विश्वचषक2023 #विश्वचषक1999 #दक्षिण_आफ्रिका #लान्स_क्लुसनर #झुलू #नायक_खलनायक #ऑस्ट्रेलिया #अष्टपैलू #स्पर्धेतील_सर्वोत्तम #चोकर्स #सुपर_सिक्स #ड्यूक_चेंडू #सामन्याचा_मानकरी #इंग्लंड #न्यूझीलंड #भारत #टाय #बॉब_वूल्मर  

#CWC #CWC2023 #CWC1999 #ODI #South_Africa #Lance_Klusener #Zulu #hero&villain #Aurstralia #Allrounder #icc #Best_Player #chokers #super_six #duke_ball #England #NewZealand #India #Bharat #tie_match #Bob_Woolmer
.................

(‘झी मराठी दिशा’ साप्ताहिकात ३ मे २०१९ रोजी प्रकाशित झालेला लेख अधिक माहितीसह आणि विस्तारित स्वरूपात.)
.................
.................
आधीचा लेख इथे वाचता येतील - 

https://khidaki.blogspot.com/2019/06/WcupCrowe.html

https://khidaki.blogspot.com/2019/06/WC-Jaysurya.html
.................
मालिकेतील पुढच्या लेखांसाठी कृपया फॉलो करा...


मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...