Sunday 21 October 2018

शब्दज्ञाने पारंगतु। ब्रह्मानंदे सदा डुल्लतु।

(श्री. मुकुंदकाका जाटदेवळेकर यांची ही मुलाखत झी मराठी दिशा आठवडापत्राच्या २० ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. तीच मुलाखत थोडी अधिक सविस्तर स्वरूपात. दिशामधील मुलाखत पाहण्यासाठीचा दुवा
http://www.zeemarathidisha.news/Details?NewsId=4852013791303967983&title=kartavya%20karna%20hach%20dharma!&SectionId=0&SectionName=)
--------
पाथर्डीच्या जुन्या बसस्थानकापासून साधारण पाऊण-एक किलोमीटरवर मंत्रिगल्लीत श्री. मुकुंदकाका यांचं घर आणि गुरुकुलही आहे. जोत्याच्या चार पायऱ्या चढून वर गेलं की, फरसबंदी छोटं अंगण आणि समोरच बैठकीची खोली आहे. या घरात गेल्या शुक्रवारी (दि. १३) गेलो तेव्हा, आत कुठल्या तरी खोलीत गुरुकुलातल्या विद्यार्थ्यांचं पाठांतर चालू होतं. त्यांचा खणखणीत आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत होता. बैठकीच्या खोलीत श्री. मुकुंदकाका बसले होते. त्यांचा जप चालू असावा. दर्शनासाठी आलेले दोन-तीन भाविक होते. ते दर्शन घेऊन जय श्रीकृष्ण म्हणून निघाले.

घरी जाण्यासाठी निमित्त होतं श्री. मुकुंदकाकांची मुलाखत घेण्याचं. वयाच्या पंचाहत्तरीत आहेत ते सध्या. ही पर्वणी साधण्यासाठी स्वामी गोविंददेव गिरी यांच्या अध्यक्षतेखाली पू. मुकुंदकाका जाटदेवळेकर अमृतमहोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. याच समितीतर्फे त्यांचा सोमवारी (२२ ऑक्टोबर रोजी) नगर येथे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते सत्कार होत आहे. अध्यात्म आणि धर्म यांच्या अभ्यासाबाबत नर्मदेतला गोटा असलेल्या माझ्यासारख्याला ही मुलाखत घेणं जमेल का, अशी शंका मनात होतीच. थोडी तयारी करून प्रश्न लिहून सोबत ठेवले होते. काकांचे चिरंजीव गोविंदमहाराज यांनी ते वाचून दाखविले आणि काकांनी होकारार्थी मान डोलावली. या प्रश्नांना उत्तरं द्यायला ते तयार झाले होते. फक्त त्यांचा आधी एक प्रश्न होता – (उत्तरं) विस्तारानं की संक्षेपानं? मी दुसरा पर्याय सांगितल्यावरही त्यांनी मान डोलावली.

श्री. मुकुंदकाकांनी लहानपणीच दृष्टी गमावली. पण अंतरीचा ज्ञानप्रकाश सतत तेवत राहिला. दृष्टी नाही, ही परमेश्वरी कृपा मानली आणि त्यामुळेच आपल्याला अध्यात्माच्या क्षेत्रात इथपर्यंत पोहोचता आले, असे ते आवर्जून सांगतात.

जो शब्दज्ञानें पारंगतु। ब्रह्मानंदे सदा डुल्लतु।
शिष्यप्रबोधिनीं समर्थु। यथोचितु निजभावें।।
(एकनाथी भागवत - अध्याय तिसरा, श्लोक ९८)
उत्तम गुरूची लक्षणे संत एकनाथांनी सांगितली आहे. त्यातलाच हा एक श्लोक. विद्याभूषण मुकुंदकाका जाटदेवळेकर यांना ही लक्षणं पुरेपूर लागू होतात. ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी त्यांच्या हृदयी वसली आहे. महिपतीमहाराजांचे ते पणतू. पाथर्डी तालुक्यातील जाटदेवळे येथे जन्म झाला. नंतर पाथर्डीत स्थिरावले. बालपणी गमावलेली दृष्टी अडथळा न मानता मुकुंदकाकांनी संसार आणि परमार्थ एकाच ताकदीनं पुढे नेला. ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली. श्रीरामकथा, श्रीकृष्णकथा, भागवतकथा आणि समस्त संत हेच त्यांनी जीवन मानलं. त्यांच्या रसाळ वाणीतील कीर्तन-प्रवचनांनी अनेक भाविकांना तृप्त केलं आणि अध्यात्माबाबत विचार करणारी नवीन दिशाही दिली. वारकरी संप्रदायाची ध्वजा खांद्यावर घेऊन दर वर्षी आळंदी व पंढरीची वारी करणाऱ्या श्री. मुकुंदकाकांनी चार तपांमध्ये दहा हजारांच्या आसपास कीर्तने-प्रवचनांतून नामभक्तीचा महिमा सर्वदूर पोहोचविला. ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून त्यांनी चालविलेल्या चैतन्य गो-शाळेत तीनशे गायी आहेत.

श्री. मुकुंदकाकांशी तासभर संवाद झाला. विविध प्रश्नांना त्यांनी मोकळी, नेमकी आणि ठाम उत्तरे दिली.

आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा तुम्ही गाठला आहे. वयाचा अमृतमहोत्सव. या टप्प्यावर तुमच्या नेमक्या भावना काय आहेत?
- कृतार्थतेचीच भावना आहे. व्यावहारिक किंवा सांसारिक म्हणा, आयुष्याचे आतापर्यत विविध टप्पे होऊन गेले. त्यातील एखादा टप्पा विपन्नावस्थेचा, एखादा मनःस्तापाचा आणि काही टप्पे सुखा-समाधानाचे होते. पण हे झाल्यावर त्या त्या वेळी विसरून गेलो. आता आयुष्यातली सकारात्मक बाजू सांगतो. माझी साधना, एवढ्या दिवसात भेटलेले (चांगले) लोक, त्यांचं मोठेपण, त्यांनी केलेले उपकार, त्यांच्या संगतीमुळे लाभलेला आनंद या सगळ्या चांगल्या बाबी.

आता याहून मोठा आहे तो आध्यात्मिक आनंद. माणसाचं जीवनच त्यासाठी आहे. तो असेल तर दुःख सहन करण्याची, त्यातून बाहेर पडण्याची ताकद, त्यातून सुटकेचा मार्ग मिळतो. परमार्थाचा अभ्यास असल्यावर दुःखातून शिकता येतं, सावध होता आणि करताही येतं. सहन करण्याची शक्ती मिळते आणि फार कष्ट न करता अडचणीतून सहीसलामत सुटता येतं. हे सगळं अनुभवल्याने मी कृतार्थ आहे, असं म्हणतो.

एवढ्या दीर्घ व्यावहारिक आणि आध्यात्मिक प्रवासाबद्दल काही सांगा ना, काका...
- खूप अनुभव आले या प्रवासात. नकारात्मक सांगायचं झालं, तर मला दृष्टी नाही. लहानपणापासून त्रास होता आणि दहाव्या-पंधराव्या वर्षी दृष्टी पूर्ण गेली. मला असं पाहून लोक तळमळायचे. एखादा अवयव नसला, कमकुवत झाला तर माणसाला खंत वाटते. स्वाभाविक आहेच ना ते! मला मात्र डोळे नसल्याचा फायदाच झाला. आध्यात्मिक वाटचाल चांगली झाली. डोळे आणि कान, हे अवयव दोषाचरण करतात. त्यातून माझी सुटका झाली. व्यवहारात अडचणी आल्या खरं; पण गोड बोलण्यानं, विनम्र असण्यानं लोक मदत करतात. त्यांच्याच साहायानं संसार आणि परमार्थ दोन्हीकडे वाटचाल झाली. समाजानं, सज्जनांनी मला या एवढ्या वर्षांत खूप मदत केली, हे इथं सांगितलंच पाहिजे.

देव काही वेळा कुणाला काही देऊन उपकार करतो. म्हणजे संपत्ती, जमीन, सुख असं बरंच काही. आणि कधी कधी काही न देऊनही उपकार करतो. मला डोळे दिले नाहीत, हे मी ईश्वराचे उपकारच मानतो.

काका, आध्यात्मिक क्षेत्रात तुमचं काम आणि नावही मोठं. पण व्यावहारिक जीवनात बराच त्रास झाला, शारीरिक कष्ट करावे लागले. पत्नीसह रोजगार हमी योजनेवरही काम केलं. या सगळ्याकडे मागं वळून बघताना काय वाटतं?
- मी मघाशी म्हणालो ना, ते ते झालं की, त्या त्या वेळी सोडून दिलं. आमचं कुटुंब गरीबच होतं. खाण्याचीच अडचण होती. असं असल्यावर कष्ट तर करावेच लागतात. म्हणून मी १८ वर्षं पिठाची गिरणी चालवली. रोजगार हमी योजनेवर काम केलं असं म्हणायचं. पण खरं तर तिथं लोकांनी मला काम करूच दिलं नाही. त्यांना माझ्याविषयी वाटणारी आपुलकी ती. त्यांनी खूप सौजन्याची वागणूक दिली तेव्हा. माझ्या पत्नीनं मात्र खरोखर काम केलं.

आता वास्तव सांगायचं, तर सांसारिक व्यवहाराचा सगळा बोजा काही माझ्यावर कधीच पडला नाही. आधी वडील, मग भाऊ यांनी सगळं पाहिलं. लग्नानंतर पत्नी मदतीला आली. आता चिरंजीव सगळं बघतात. या सगळ्यांच्या रूपानं देवानंच माझा संसार व्यवस्थित मार्गी लावला. माझे वडील म्हणत, माझा प्रपंच देवच करतो. तेच मी म्हणतो. जे काही कष्ट पडले, त्याबद्दल कुणाला दोष द्यावा असं वाटत नाही, कधीच वाटलं नाही.

सर्वसामान्य माणसाचा धर्म आणि अध्यात्म यामध्ये काही फरक आहे का? धार्मिक असंण आणि पारमार्थिक/आध्यात्मिक असणं या तत्त्वज्ञानाच्या पातळीवर दोन वेगळ्या निष्ठा मानतात का?
- धार्मिक आणि आध्यात्मिक या शब्दांमध्ये, त्यांच्यात दडलेल्या अर्थात फरक आहे आणि नाहीही. मनुष्यजन्म मिळाल्यावर कुटुंबाबद्दल, समाजाबद्दल काही बांधिलकी असते. त्यांनी केलेले उपकार असतात. मुलगा लहान असल्यावर आई-वडील त्याचं सगळं करतात आणि वृद्धपणी मुलानं त्यांचा संभाळ करायचा, त्यांची सेवा करायची. हा झाला धर्म. ज्याला सगळे कर्मकांड म्हणतात, ते वाईट नाहीच कधी. ते धर्माचंच अंग आहे. रोजची पूजा-अर्चा करतो, ती देवतांना अनुकूल करण्यासाठी आणि त्यांचं सहाय्य मिळविण्यासाठी. जीवन सुखी करण्यासाठी कर्मकांड म्हणजे उत्कृष्ट साधन आहे. त्यासाठी भावना शुद्ध हवी. मनात कामना ठेवून हे काही करू नये. निष्काम भावनेनं हे कर्मकांड केलं की, तो झाला धर्म! हे नित्य काम शास्त्राच्या पद्धतीनं केलं की, कर्मकांड कर्मयोग होतो! आध्यात्मिक जीवनाचा तोच पाया असतो.

धारण करणे अशी धर्माची सोपी व्याख्या आहे. उत्तम स्वभाव ठेवून, बांधिलकीनं योग्य असेल ते प्रत्येकानं केलंच पाहिजे. म्हणजे मग सगळा समाज सुखाने नांदता राहील. कर्तव्य करणे हा धर्म आहे. हे कर्तव्य कुटुंब, समाज, राष्ट्र यांच्यासाठीचं असतं. सरकारने केलेले कायदे पाळणे, पोलिसांनी सांगितलेल्या नियमांचं पालन करणं अशा लहान लहान गोष्टींमध्येही धर्म आहे. या गोष्टी पाळल्या तरच अध्यात्माकडे जाता येतं.

जन्माला आलेल्या प्रत्येकाला इथून प्रयाण करायचंच आहे. गंतव्य स्थान नक्की आहे. त्याचा विचार करणं, त्याचा मार्ग अवलंबिण्यासाठी काय करायचं, इथून अध्यात्माला आरंभ होतो. तिथं जाऊन स्वर्गसुख मिळवायचं अशा पारलौकिक स्थितीसाठी अध्यात्म मुळीच नाही. ऐहिक आणि पारलौकिक फळांबाबत उदास होणं, फक्त परमेश्वराची इच्छा करणं म्हणजे धर्म होय. ऐहिक जीवन जगताना आपण पाहुण्याच्या घरी काही दिवसांसाठी आलो आहोत, अशा अलिप्तपणे जगणे आणि ही साधना करणे म्हणजे अध्यात्म. पाप-पुण्यातीत असणं, कर्माचं फळ न भोगणं म्हणजे अध्यात्म आणि परमार्थ.
ज्ञानदीप लावण्यासाठी कीर्तन-प्रवचनात रंगून जाण्याचं व्रत.
अलीकडच्या काळात संतांची जातींमध्ये-समाजामध्ये वाटणी केली जाते. काका, या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं?
- थोडं स्पष्ट सांगतो, संतांची अशी जातिनिहाय वाटणी करणं हा निव्वळ मूर्खपणा आहे! काही मंडळी स्वार्थ, आकस ठेवून ही भेदभावना रुजवत आहेत. आपण सामान्य माणसांनी यापासून नेहमीच लांब राहिलं पाहिजे. संतांना जात नसते. जात देहाला असते. समाजासाठी देहावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या संतांना कसली आलीय जात? परोपकार करणाऱ्या संतांना जात नसते. संत तुकाराममहाराजांनी सांगितले आहे –
शाळिग्राम विष्णुमूर्ती। संत हो का भलते याती।।

नेहमी लक्षात ठेवावं की, सगळेच संत तुलनेने मोठेच होते. संत म्हटलं की, आपण आपलं नतमस्तक व्हावं. त्यांचा सल्ला आचरणात आणावा. त्यानं माणसाचं कधीही अकल्याण होणार नाही. एवढं पुरेसं आहे. जातिभेद गुन्हा असेल, तर संतांना जातीचं बनवणं हाही गुन्हा नाही का? जातीय भेद निर्माण करून स्वार्थ साधण्यासाठी तथाकथित शिक्षित, धूर्त माणसांकडून संतांना जात चिकटविली जात आहे.

संतांना टाळकुटेपणा करायला लावल्यानं महाराष्ट्राचं नुकसान झालं, असं विधान पूर्वीच्या एका विद्वान अभ्यासकानं केलं होतं. त्यांच्या म्हणण्यात कितपत तथ्य आहे, असं तुम्हाला वाटतं?
- मी म्हणतो, महाराष्ट्राचा फायदा काय आणि नुकसान कशात, हे आधी सांगा. संतविचार कधीच कालबाह्य होणार नाही. भजनानं अंतःकरण शुद्ध होतं. सदा सर्वकाळ टाळ वाजवत बसा, असं कोणत्या संत-महात्म्यानं सांगितलं? लोकांना निष्क्रिय बनवलं, हे विधानच महापाप आहे. दिवसातून काही वेळ टाळ वाजवित भजन करणं म्हणजे सामान्य माणसाला व्यवहारातून अध्यात्माकडे नेणं आहे. असे टाळ कुटल्यामुळेच मी पंचाहत्तराव्या वर्षापर्यंत आलो आहे!

एक किस्सा सांगतो. एका महाराजांचं प्रवचन दोन तास चाललं. ते ऐकायला दहा हजार श्रोते-भाविक होते. महाराजांना एका विद्वानानं विचारलं, तुम्ही दहा हजार माणसांचे असे दोन तास वाया घालवले. एवढ्या वेळात किती तरी काम झालं असतं. हे समाजाचं नुकसानच नाही का?’ महाराज म्हणाले, तुम्ही राजकारणी आहात. तुमच्याकडे सगळं काही भरपूर आहे. या लोकांना थोडं थोडंच मिळालं आहे. आहे त्यात समाधान मानावं, हे नीतिशिक्षण द्यायला आम्ही प्रवचन करतो. वृत्ती बदलून समाजात सुख-शांती नांदावी, यासाठी हे चालू आहे. थोडक्यात सांगायचं, तर संतांच्या संगतीत राहणं जीवनात शांती देणारं, आरोग्य चांगलं राखणारं आहे!

देशी गायींचं पालन, संवर्धन यासाठी तुम्ही गोशाळा सुरू केली आहे. अलीकडच्या काही वर्षांत गो-रक्षण, गो-रक्षक हे वादाचे मुद्दे बनले आहेत. त्याबद्दल काही सांगाल...
- गो-रक्षकांच्या बाबतीत विकृत गोष्टींना अधिक प्रसिद्धी दिली जाते, असं मला वाटतं. गो-रक्षण करणाऱ्यांना तेवढं प्रकाशात का आणलं जात नाही? हा संघर्ष का होतो, याचं उत्तर आहे – कायद्याचं उल्लंघन होत असल्यानं. गाय देव आहे, हा भावनेचा प्रश्न आहे. गाय म्हणजे उपयुक्त पशू, असं काही जण म्हणतात. मग उपयुक्त प्राण्याचं संगोपन करणं, संवर्धन करणं माणसाचं कर्तव्य नाही का?

देशाच्या भवितव्याबद्दल काका तुम्ही आशावादी आहात का? कितपत?
- देशात सद्यस्थितीत अस्वस्थता जाणवते, असं ज्यांना वाटतं, त्यांनी ती दूर करण्याचे उपायही सुचवावेत. देशात काय नि जगात काय, सज्जन आणि दुर्जन असतातच. सज्जनांची संख्या जास्त होते, तेव्हा त्यांचे विषय हाताळले जातात. टीव्ही. काय दाखवतो आज? वाईट झालेलंच ना? दुसऱ्या बाजूचाही (चांगल्या कामांचा) अभ्यास करून चेतना द्या ना त्यांना. ते अधिक राष्ट्रकल्याणकारक होईल. समाजाला चांगलं काय ते सांगण्यासाठीच कीर्तन-प्रवचन असतं.

मी एवढंच सांगीन की, परिस्थिती कशीही असो, आपण आपलं कर्तव्य करीत राहावं. परमेश्वरावर भक्ती असणाऱ्या प्रत्येकानं राष्ट्राच्या भविष्याबद्दल आशावादीच राहिलं पाहिजे. शेवटी राष्ट्र म्हणजे काय, तर संस्कृती. संस्कारित माणसांवर, समाजाच्या कल्याणाचाच विचार करणाऱ्या माणसांवर संस्कृती ठरत असते.

हा देश उद्या जी घडविणार आहे, त्या तरुण पिढीला काय संदेश द्याल?
- तरुण पिढीवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी फक्त तीन गोष्टी कटाक्षाने कराव्यात-पाळाव्यात असं मी सांगीन.
) तरुणपणात इंद्रियांवर पूर्ण संयम ठेवा. चारित्र्य शुद्ध राखा. शुद्ध चारित्र्य हाच भारतीय संस्कृतीचा पाया आहे.
) म्हाताऱ्या माणसांचा अपमान कधीच करू नका नि त्यांचा अव्हेरही करू नका. अहंकार बाजूला ठेवून त्यांच्याशी नेहमीच नम्रतेनं वागा.
) दररोज एक तास संतवाङ्मयाचा अभ्यास करा. त्याचं वाचन, चिंतन करा; त्यावर चर्चा करा.

या तीन गोष्टी केल्या, तर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी कधीच निराशा येणार नाही. कारण तुमचा पाया भक्कम झालेला असेल, एवढंच मी तरुणांना सांगीन.
--------------------
पारमार्थिक गृहस्थाश्रमाचा आदर्श
ऋषी-मुनी व संतांच्या उज्ज्वल परंपरेस साजेशा प्रज्ञाचक्षु पू. काकांनी आपल्या विलक्षण वाणीने केवळ श्री ज्ञानेश्वरी, अभंग संकीर्तन, रामायण, भागवत, महाभारत इत्यादी कथा यांच्या माध्यमातून लोकप्रबोधन केले नाही, तर आपल्या शांत, प्रेमळ, शास्त्रोक्त आचारानेही असंख्य लोकांसमोर उत्तम पारमार्थिक गृहस्थाश्रमाचा आदर्श ठेवला. गेल्या तीन तपांहून अधिक काळ भक्ती, ज्ञान, वैराग्याची अमृतवृष्टी त्यांनी केली आहे.
- स्वामी गोविंददेव गिरी (आचार्य किशोर व्यास)
(श्री. मुकुंदकाकांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्यानिमित्त प्रकाशित अमृताचा घनु स्मरणिकेच्या प्रास्ताविकातून साभार.)

2 comments:

  1. खुप चांगले विचार,ज्ञान,अनुभव,आणि डोळे जावूनही परमेश्वराचे आभार मानणे..हे केवढं मोठेपण..पुढील कार्याला शुभेच्छा...!

    ReplyDelete
  2. श्री. मुकुंदकाका जाटदेवळेकर हे नाव माहीत नसलेली व्यक्ती निदान बीड आणि नगर जिल्ह्यांमध्ये तरी सापडेल, असे वाटत नाही. जाटदेवळे गावाबद्दल लहानपणापासून माहिती असण्याचे कारण म्हणजे तेथील गुजर (जाट) समाजातील लोकांचा आमच्या जाटनांदूर गावातील लोकांशी असलेला नातेसंबंध. शिवाय मुकुंदकाकांचा विवाह आमचे आजोळ असलेल्या रायमोह येथील मुलीशी झालेला मला आठवतो. काकांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचे ते दिवस खूप विपन्नावस्थेत गेले. परंतु प्रज्ञाचक्षु काकांनी आपल्या अंगभूत गुणांनी केवळ परिस्थितीवरच नव्हे, तर दैवावरही मात केली!
    काकांचा अमृतमहोत्सव साजरा झाला, तसा शतकमहोत्सवही साजरा होवो. त्यांच्या हातून समाजप्रबोधनाचे कार्य असेच होत राहो, ही प्रभुचरणी प्रार्थना!!
    - दिलीप वैद्य, पुणे

    ReplyDelete

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...