शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

पुस्तकवाटेवरचा प्रवास

 


आपल्याकडं स्वतःची पुस्तकं असावीत,
त्याच्या पहिल्या पानावर मालकी सांगणारी आपली सही असावी,
अमूक एक पुस्तक संग्रहात आहे, हे अभिमानानं सांगता यावं,
असं नेमकं कधीपासून वाटायला लागलं?
...पुस्तकवाटेवरचा उलगडलेला प्रवास.
------------------------------------

एखादी कविता आपल्या वाचण्यात खूप उशिरा येते. कवीला त्यातनं जे सांगायचं आहे, ते मात्र आधीच कधी तरी माहीत होऊन गेलेलं असतं; नकळतपणे जाणवतं. ती कविता अशीच कधी तरी 'भेटते', तेव्हा आनंद होतो खरा; पण तो नवं काही गवसल्याचा नसतो. समानधर्मा सापडल्याची खुशी असते ती. किंवा ह्यानं अगदी आपल्या मनातलंच कसं मांडलंय, असं वाटतं. अरेच्चा, आपल्याही खूप आधी कुणाला तरी हे सुचलेलं होतं, असं मनाशी म्हणतो.

सफदर हाशमी ह्यांच्या 'किताबें' कवितेची गोष्ट अशीच. लेखक-कवी दासू वैद्य ह्यांनी केलेला 'किताबें'चा अनुवाद पंचवीस-एक वर्षांपूर्वी दैनिक लोकमतने मोठ्या देखण्या पद्धतीनं छापला. डाव्या बाजूला चार-पाच-सहा शब्दांच्या ओळींमागून ओळी, पुस्तकाची महती सांगणाऱ्या. आणि उजवीकडे पुस्तकांचा ढीग रेखाटलेला. त्यावर ज्ञानेश्वरी, तुकारामबुवांची गाथा, विश्वकोश असं लिहिलेलं. पुस्तकांचं मोठेपण सांगणाऱ्या ह्या कवितेचा अनुवाद वाचताना खूप आनंद झाला. त्याचं कात्रण आहे अजून कपाटावर चिटकवलेलं.

'पुस्तकं काही सांगू इच्छितात
तुमच्या सावलीत रांगू इच्छितात'

- हाशमीसाहेबांच्या ह्या ओळी वाचण्याच्या आधीच पटलेल्या होत्या. पुस्तकांचं 'ऐकायला' कधीची सुरुवात झाली होती!

'पुस्तकांमध्ये रमणारा', 'चांगलं वाचन असणारा' अशी माझी (प्रत्यक्षाहून उत्कट अशी!) प्रतिमा बनलेली आहे. स्वतःबद्दल असं ऐकायला मिळतं तेव्हा सुखावतो. पण ते तेवढं खरं नाही, ही जाणीव असतेच की आपली आपल्याला. स्वतःशी फार खोटं नाही बोलता येत. '...मनसे भाग ना जाए' असं साहिर लुधियानवी ह्यांनी लिहून ठेवलेलं आहे. ते नेमकं आठवतं.

आपल्याकडं स्वतःची पुस्तकं असावीत, त्याच्या पहिल्या पानावर मालकी सांगणारी आपली सही असावी, अमूक एक पुस्तक संग्रहात आहे, हे अभिमानानं सांगता यावं, असं नेमकं कधीपासून वाटायला लागलं? आठवणं अवघडच. पण लहानपणी घरीच पुस्तकांची ओळख झाली, एवढं खरं. गोष्टींची छोटी-छोटी, मोठ्या टंकातली पुस्तकं अधूनमधून आणली जात. सोलापूरला एस. टी. महामंडळात काम करणारे प्रभूमामा भाऊबीजेला हमखास येत. त्यांची फिरायला जायची जागा म्हणजे स्टँड. बरोबर गेलं की, तिथल्या वृत्तपत्राच्या स्टॉलमध्ये मिळणारी पन्नास पैसे, रुपया किमतीची छोटी गोष्टींची पुस्तकं ते घ्यायचेच. अशा पन्नास-साठ पुस्तकांची आम्ही भावंडांनी तेव्हा 'लायब्ररी' चालू केली. म्हणजे त्यांना कव्हर घालून, कॅलेंडरच्या पानांवरचे मोठे आकडे कापून चिकटवून त्यांना क्रमांक देऊन वगैरे. पुस्तकांची यादी केलेली. पण ती वाचण्यासाठी कोणी सभासदच नव्हते. साधारण चार दशकांपूर्वीच्या त्या घरगुती 'लायब्ररी'तलं एक छोटं ४८ पानांचं पुस्तक माझ्या देवघरात आहे - लहान मुलांसाठी असलेला नित्यपाठ. त्यात काही श्लोक, मारुतीस्तोत्र, गणपतिस्तोत्र, आरत्या असं बरंच आहे.

पुस्तकांचं असं 'घर' असतं, त्याला वाचनालय म्हणतात, हे आठव्या वर्षी कळलं. वाशिंबे ह्या खेड्यातून आम्ही तालुक्याच्या गावी - करमाळ्याला राहायला आलो तेव्हा. तालुक्याचं गाव, भुसार मालाची मोठी बाजारपेठ असलेल्या करमाळ्यातलं हे नगरपालिकेचं सार्वजनिक वाचनालय. शहराची लोकसंख्या असेल तेव्हा पंधरा ते वीस हजारांच्या घरात. गावातील नळांना २४ तास पाणी. 'करमाळा...पाण्यावाचून तरमाळा' ही जुनी ओळख विसरली होती. (पुढं ऐंशीच्या दशकात ती नव्याने निर्माण झाली, हा भाग वेगळा.) सोलापूर-नगर हा दक्षिणोत्तर रस्ता (तोच 'मेन रोड') शहरातून जायचा. त्याला काटकोनात ओलांडणारे गावाच्या वेगवेगळ्या पेठांना जोडणारे चार-पाच रस्ते. अगदी व्यवस्थित आखलेले. नियोजनबद्ध रचना. शहरात चांगली बांधलेली भाजी मंडई होती. तिला भिंत, विक्रेत्यांसाठी प्रशस्त ओटे. ह्याच मंडईत षट्कोनी दुमजली इमारत होती. दगडात बांधलेली. त्या भक्कम इमारतीत हे वाचनालय. खालच्या मजल्यावर पुस्तकांची देवघेव आणि टेबलांवर वृत्तपत्रं ठेवलेली. वरच्या मजल्यावर साप्ताहिकं. मुक्तद्वार वाचनालय. वाचण्यासाठी सर्वांना खुलं.

करमाळ्यात गेल्यावर लगेच आम्ही वाचनालयाचे सभासद झालो. इंग्रजी शब्द वापरण्याच्या सोसापायी 'लायब्री' म्हणत असू तेव्हा. एका वेळी प्रत्येकी एक पुस्तक नि मासिक घ्यायचं. अनामत दोन रुपये; पुस्तकाची वर्गणी महिन्याला एक रुपया आणि मासिकाची आठ आणे. आमचा सभासद क्रमांक होता ३२. तो सांगण्याची वेळ कधीच आली नाही. ग्रंथपाल चेहरे पाहूनच सभासदाचं कार्ड काढायचा.

भाजीबाजारातल्या टुमदार दगडी इमारतीत ते वाचनालय फार काळ राहिलं नाही. नगरपालिकेनं किल्ल्याच्या आत तटाला लागून कार्यालयासमोरच एक भव्य दुमजली इमारत बांधली वाचनालयासाठी. 'श्री संत ज्ञानेश्वर वाचनमंदिर' असं त्याचं नामकरण झालं. बी. जे. खताळ-पाटील, शंकरराव मोहिते-पाटील, शरद पवार, तेव्हा करमाळ्यातूनच विधानसभेवर पोटनिवडणुकीत निवडून गेलेले सुशीलकुमार शिंदे अशा मंत्रिमहोदयांच्या उपस्थितीत मोठ्ठा कार्यक्रम झाला. त्याच वेळी नगरपालिकेनं बांधलेल्या टाऊन हॉलचं आणि ह्या भव्य वाचनालयाचं उद्घाटन झालं. ही गोष्ट साधारण १९७४-७५ची असावी. वाचनालयाच्या भव्य, सुंदर इमारतीच्या मागेच कोंडवाडा होता. वाचनालयाचं मागचं दार कोंडवाड्यातच उघडायचं. तिथं नगरपालिकेचे तगडे बैल बांधलेले असायचे. वाचनालय मात्र कोंडवाड्यासारखं नव्हतं. अगदी प्रशस्त, हवेशीर.

प्रचंड मोठ्या दालनात वृत्तपत्रं वाचण्यासाठी सात लाकडी स्टँड. अलीकडच्या स्टँडवर मुंबईची डाक आवृत्तीची वृत्तपत्रं. पलीकडच्या चार स्टँडवर पुण्याची ताजी वृत्तपत्रं. सोलापूरची वृत्तपत्रं सकाळी अकराच्या सुमारास येत. ती संध्याकाळी मुंबईच्या वृत्तपत्रांची जागा घेत. मग 'टाइम्स ऑफ इंडिया', 'फ्री प्रेस जर्नल', 'नवभारत टाइम्स', अधूनमधून येणारा 'लोकसत्ता' मधल्या टेबलावर जाऊन पडे. टेबलाच्या चारही बाजूंना वाचकांना बसण्यासाठी बाक होते.

वृत्तपत्रांच्या स्टँडच्या थोडं पलीकडं एका मोठ्या टेबलावर सगळी साप्ताहिकं असत. त्याच्याच अगदी वर एक अर्धमजला होता. तिथं महिलांसाठी स्वतंत्र विभाग. महिला वाचकांसाठी एका नगरपालिकेनं चार-साडेचार दशकांपूर्वी केलेली स्वतंत्र सोय. दुर्दैवानं त्याचा लाभ घेण्याएवढं वाचनाचं वेड तेव्हा करमाळ्यातील महिलावर्गाला नव्हतं किंवा तसं स्वातंत्र्य त्यांना नसावं. मुलांसाठीही तिथंच विभाग होता. त्याचंही कुणाला फारसं अप्रूप नव्हतं.

आपल्या गावात एवढं मोठ्ठं वाचना-लय असल्याचा त्या वेळी अभिमान वाटायचा. पण त्या छोट्या शहरात, त्या काळात झालेल्या ह्या वास्तूचं आणि तिथं सहज उपलब्ध असलेल्या वाचन-साहित्याचं महत्त्व किती होतं, हे आता लक्षात येतं. नगराध्यक्ष होते गिरिधरदास देवी आणि उपनगराध्यक्ष बहुतेक डॉ. पानाचंद गांधी. त्यांनी आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी करमाळकरांसाठी ज्ञानेश्वर वाचनमंदिराच्या रूपानं फार मोठा ठेवा ठेवला, असं मनापासून वाटतं. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी.

करमाळ्यात येणारी सर्व वृत्तपत्रं, साप्ताहिकं वाचनालयात येत. नव्या पुस्तकांची दर वर्षी खरेदी होई. मासिकं, अनेक दिवाळी अंक येत. दिवाळी अंकासाठी वेगळं शुल्क नसे. फक्त पुस्तकाचे सभासद असलेल्यांना तेवढे दोन-तीन महिने मासिकासाठी असलेलं शुल्क भरून दिवाळी अंक वाचायला मिळत.

ज्ञानेश्वर वाचनमंदिरामुळेच भेटले भणगेकाका. माझ्यासारख्या अनेक वाचकांच्या ते आजही नक्की लक्षात असतील. तिथं येणाऱ्या सगळ्यांचे ते 'काका' होते. त्यांचं पहिलं नाव लक्षातच राहिलं नाही कधी. करमाळ्याचा पत्रकार सुनील सूर्यपुजारीला विचारल्यावर त्यानं नाव सांगितलं - हरिभाऊ. हो, हरिभाऊ भणगे! ह्या वाचनमंदिराचे ते सर्वेसर्वा. मुख्य ग्रंथपालासह सगळं काही तेच होते. मध्यम उंचीच्या काकांचा वेष साधा असे. तीन गुंड्यांचा सदरा (तोही बहुतेक रेघांचा), पांढरा घोळदार पायजमा, पायात गावठी वाटाव्यात अशा वहाणा. नवरात्राच्या काळात त्या बहुतेक नसत. डोळ्यांवर जाड चष्मा, कपाळावर जाणवण्याएवढ्या तीन-चार अठ्या, त्यावर उठून दिसणारं कुंकू-गंध. दत्तपेठेत राहणारे भणगेकाका सकाळी कमलादेवीचं दर्शन घेऊनच वाचनालयात येत. देवीच्या पायाचं कुंकू त्यांच्या माथी असे. त्यांच्या घरापासून देवीचा माळ साधारण सव्वा किलोमीटर आणि वाचनालय पाऊण ते एक किलोमीटर.

सकाळी आठच्या ठोक्याला वाचनालयाचं जाळीचं सरकतं दार उघडलं जाई. पालिकेतून सगळी वृत्तपत्रं घेऊन काका येत. ते किंवा त्यांचा मदतनीस आधी सगळ्या खिडक्या उघडत. मग सगळ्या वृत्तपत्रांवर काका 'श्री ज्ञानेश्वर वाचनमंदिर' असा शिक्का मारत. पहिल्या पानावर मास्टहेडच्या डाव्या-उजव्या कोपऱ्यात तिरपे दोन शिक्के; मग आतल्या पानात जमतील तसे. दोन-चार ठसे पेपरच्या पानांवर उमटवले की, शिक्का पुन्हा शाईच्या पॅडमधून येई. ठप्प, ठप्प असा लयबद्ध आवाज पाच-दहा मिनिटं त्या मोकळ्या जागेत घुमत राही.

पुस्तकांची देवघेव सकाळी साडेआठ ते साडेदहा आणि संध्याकाळी पाच ते आठ ह्या वेळेत होई. नंतरचा अर्धा तास काकांना आवराआवरीसाठी असे. त्यात सगळी वृत्तपत्रं गोळा करून व्यवस्थित लावणं, साप्ताहिकं त्याच टेबलावर नीट ठेवणं, खिडक्या बंद करणं अशी बरीच कामं असत. वाचनालय बंद होण्याच्या दहा मिनिटं आधीपासून त्यांना वाचकांना सांगावं लागे - चला आता, बंद करायची वेळ झाली.

भरपूर पुस्तकं असलेलं हे वाचनालय म्हणजे सहजगत्या उघडलेला खजिनाच. तिथं जायला नेहमीच आवडायचं. एका संध्याकाळी बहिणीसह पुस्तक-मासिक बदलायला गेलो. पावणेआठ वाजले असावेत. देवघेवीची वेळ संपत आली होती. बहिणीला तिच्यासाठी व आईसाठी 'वसुधा', 'ललना', 'गृहिणी', 'स्त्री' असं मासिक घ्यायचं होतं. मला खुणावत होती तिथं दिसणारी 'कुमार', 'टारझन' आणि 'बिरबल'. आमचा हळू आवाजातच वाद झाला. काकांना तो ऐकायला आलाच. त्यांनी घड्याळाकडं पाहिलं आणि म्हणाले, ''ए पिंट्या, तिला घेऊ दे काय पाहिजे ते. तुला हे 'बिरबल' ने आणि उद्या आणून दे बरं.''

अरे वा! एकाऐवजी दोन मासिकं. वाचणाऱ्या शाळकरी मुलाला नाराज करायचं नाही म्हणून काकांनी नियम थोडा वाकवला होता. वाचणाऱ्यांबद्दल काकांना आपुलकी आहे, हे त्या निमित्तानं लक्षात आल्यावर हीच युक्ती आम्ही पुढे तीन-चार वेळा केली. प्रत्येक वेळी जादा मासिक मिळालं.

वाचायला आवडतं, वेगवेगळी पुस्तकं नेली जातात, हे लक्षात आल्यावर भणगेकाकांनी एका उन्हाळ्याच्या सुटीत माझ्यावर कृपावर्षाव केला! पूर्ण सुटीचा महिना-दीड महिना त्यांनी एक जादा पुस्तक नेण्याची सवलत मला दिली. त्यांच्या ह्या कृपेमुळे कुमारांसाठी असलेली फास्टर फेणेसह अनेक पुस्तके वाचता आली. एके दिवशी सकाळी नेलेलं पुस्तक दुपारीच वाचून झालं आणि संध्याकाळी ते बदलायला गेलो. काका म्हणाले, ''अरे बाबा, दिवसात एकदाच पुस्तक न्यायचं.'' दिवसातून एकदाच पुस्तक-मासिक बदलता येईल, असा नियम होता. अधिकचे एक पुस्तक देत मोठा नियम वाकविणाऱ्या काकांनी तो छोटा नियम काही माझ्यासाठी शिथिल केला नाही!

ह्या सुटीत बरीच पुस्तकं वाचायला मिळाली. नवे लेखक भेटले. वाचनालयात कथा, कादंबरी, नाटक, कवितासंग्रह, हिंदी अशा विषयानुसार याद्या होत्या. विज्ञान, इतिहास, निबंध, कला अशा काही विषयांची पुस्तकांची सरसकट 'इतर' अशी यादी होती. त्यातली बरीच पुस्तकं सवलतीच्या निमित्तानं वाचायला मिळाली. इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरविणाऱ्या अजित वाडेकरांच्या नेतृत्वाखालील संघाचा 'पराक्रमी दौरा' इथंच सापडलं. क्रिकेटची आणखी काही पुस्तकंही वाचता आली. त्यातूनच खेळाची आवड वाढली.

भणगेकाकांचं ग्रंथपालनाचं काही औपचारिक शिक्षण झालं होतं का, ह्याची कल्पना नाही. नसावंच. तसंही त्यांचं एकूण शिक्षण फार झालं नसावं. त्या काळाला पुरे वाटावं एवढं. ते काय वाचत? तसं कधी दिसलं नाही. वाचनालय बंद करून घरी जाताना त्यांच्या हातात किंवा काखोटीला एखादं पुस्तक आहे, असं पाहिल्याचं लक्षात नाही. कधी तरी ते त्यांच्या पिंजऱ्यात वाचताना दिसत. एवढी वर्षं इतक्या छान पद्धतीने वाचनालय चालविल्याबद्दल त्यांना एखादा पुरस्कार मिळाला किंवा कसे, हेही माहीत नाही.

पुरस्काराची मुद्रा उमटलेली असो किंवा नसो, गुणवत्तेचं एखादं प्रमाणपत्र पदरी पडलेलं असेल-नसेल; एक गोष्ट नक्की की, भणगेकाका नावाचा माणूस अगदी अस्सल ग्रंथमित्र, ग्रंथसखा होता. हजारो पुस्तकांचं ते घर त्यानं कोणत्याही आदर्श कुटुंबप्रमुखासारखं संभाळलं. बहुसंख्य वाचकांची आवड जपली. वाचणाऱ्याची आवड वाढेल, असंच त्यांचं ग्रंथपाल ह्या नात्यानं वर्तन होतं.

पुस्तक-मासिकांच्या देवघेवीसाठी वाचनालयाच्या एका बाजूला काउंटर होतं. त्याला जाळी ठोकलेली. एका बाजूला पुस्तकांच्या याद्या. दुसऱ्या कोपऱ्यात नाव दिसेल, अशा पद्धतीनं मासिकं मांडलेली. काका सारखे उभे. सभासदांच्या मागणीला प्रतिसाद देत, पुस्तक-मासिकांची देवघेव करीत. खालच्या बाजूला सभासदांच्या कार्डांचा गठ्ठा. मागे पुस्तकांची एक मोठ्ठी खोली. त्यात बरीच कपाटं. त्यात गठ्ठ्यानं लावलेली पुस्तक. अलिबाबाच्या त्या गुहेत एकदा का दोनदाच प्रवेश करता आला.

मागणी असलेल्या, सभासदांना आवडणाऱ्या, लोकप्रिय लेखकांच्या पुस्तकांची नावं आणि त्यांचे क्रमांक भणगेकाकांना जवळपास तोंडपाठ होते. यादीत पाहून विचारायचं, 'काका, १८२९ आहे का?' पुढच्या क्षणी उत्तर मिळायचं, 'बाहेर गेलंय.' मग पुढच्या अशाच कुठल्या तरी क्रमांकाला ते सांगत, 'फाटलेलं आहे थोडं. बायंडिंगला गेलंय.' एखाद्या पुस्तकाचा क्रमांक आणि नाव ह्याची सांगड घालताना क्वचित त्यांचा गोंधळ उडत असे.

शेकडो पुस्तकं, त्यांचे क्रमांक आणि ते कुणी वाचायला नेलंय किंवा नाही, हे एवढं काकांना कसं काय आठवतं लगेच? नेहमी प्रश्न पडायचा. त्याचं उत्तर आपल्या परीनं शोधलं - त्यांना काय तेवढंच काम असतं. रोज रोज ती पुस्तकं बघून पाठ होणारच की. त्यात विशेष काय एवढं?

हे उत्तर चुकीचं आहे, हे थोड्या दिवसांनी समजून आलं. मार्चअखेरीस वाचनालयात नव्यात काही शे पुस्तकं आली. ह्यातल्या पुस्तकाचा क्रमांक सांगितल्यावर काकांना लगेच नाव आणि पुस्तक आहे-नाही हे काय सांगता येणार लगेच, असं वाटलं. पण मेच्या मध्यापासूनच बहुतेक सगळ्या (नव्या) पुस्तकांचे क्रमांक त्यांच्या 'मेमरी कार्ड'मध्ये 'फीड' झालेले होते! आता कळतं की, त्यांना स्वतःच्या कामाबद्दल विलक्षण आस्था होती. त्यामुळेच लेखक-पुस्तकं-क्रमांक हा सगळा तपशील त्यांच्या लक्षात राहत असणार.

छोटं शहर, शंभरच्या आत-बाहेर सभासदसंख्या. त्यामुळे पुस्तक-मासिक बदलायला आलेल्या कुणाचा सभासद क्रमांक विचारण्याची वेळ कधी काकांवर आली नाही. कितीही गर्दी असली, तरी ह्याचं कार्ड त्याला नि त्याचं ह्याला असं कधी झालं नाही. दिवाळी अंकांचं वाटप सुरू होई, तेव्हा पहिल्या एक-दोन दिवशी महत्त्वाचे अंक मिळविण्यासाठी गर्दी होई. तिथंही काका फार कधी चिडल्याचं दिसलं नाही. वाचकाची आवड लक्षात ठेवून प्रत्येकाला हवं ते मिळेल, ह्याची काळजी ते घेत.

ज्ञानेश्वर वाचनमंदिरात आणखी एक सोय असायची. मासिकं जुनी झाली की, त्यांचे गठ्ठे एकत्र करून पुठ्ठ्याच्या वेष्टणात बांधले जात. मासिकाऐवजी किंवा पुस्तकाऐवजी असा एक गठ्ठा नेला की, बऱ्याच दिवसांची बेगमी होई.

लेखकाला-संपादकाला आपल्या वाचकाला काय हवं, हे माहीत असतं. अगदी त्याच प्रमाणं भणगेकाकांनाही वाचक माहीत होते. वर्गमित्र अनिल कोकीळ ह्याला महाविद्यालयीन शिक्षण घेताना वाचण्याची गोडी लागली. तोही ज्ञानेश्वर वाचनमंदिराचा 'भक्त' झाला. व. पु. काळे ह्यांच्या प्रेमातच पडला होता. सलग सातव्या-आठव्या वेळी त्यांचंच पुस्तक मागितल्यावर काका म्हणाले, ''अनिल, अरे एखाद्या लेखकाची पाच-सहा पुस्तकं वाचली की, कळतो तो. सारखं काय व. पु. - व. पु. नेतोस! आता दुसरे लेखक वाचून बघ जरा.''

एक अनुभव मलाही आला. शिक्षणासाठी पुण्यात होतो. विश्रामबागेजवळच्या सरकारी ग्रंथालयात पुस्तकं वाचायला मिळत. तिथं कधी तरी जात होतो. 'सोबत' वाचत असल्यामुळे भाऊ पाध्ये ह्यांचं नाव माहीत झालं. त्यांचं गाजलेलं 'वासूनाका' तिथं मिळालं. पण ते पूर्ण वाचून झालं नव्हतं. सुटीत करमाळ्याला आल्यावर एक दिवस पुस्तक बदलायला गेल्यावर काकांना विचारलं, ''आपल्याकडं 'वासूनाका' आहे का हो?''

काहीच बोलायला सुचत नसल्यासारखे काका क्षणभर पाहत राहिले. मी काही तेव्हा शाळकरी वयाचा नव्हतो. त्यांच्या चेहऱ्यावर थोडे उग्र भाव आले. त्यांनी विचारलं, ''तुला कुणी सांगितलं हे पुस्तक (वाचायला)?''

नाही. मोठा लेखक आहे. म्हणून विचारलं, मी गुळमुळीत उत्तर दिलं.
''मिळणार नाही. वाचू नको असलं काही,'' काकांनी तिथल्या तिथे निर्णय दिला.
माझ्यासारख्या 'लाडक्या' वाचकाला ते असं काही सांगतील, असं कधीच वाटलं नव्हतं.

नंतर कधीच काकांकडे भाऊ पाध्येंची पुस्तकं मागण्याचं धाडस झालं नाही. 'राडा', 'बॅरिस्ट अनिरुद्ध धोपेश्वरकर', 'डोंबाऱ्याचा खेळ' ही त्यांची काही पुस्तकं विकत घेऊनच वाचली. तसं पाहिलं तर सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात बाबा कदम फार लोकप्रिय लेखक होते. त्यांची नवी कादंबरी आली की, तिच्यावर उड्या पडायच्या. त्या खानदानी बाजाच्या, शिकार, तमाशा असलेल्या कादंबऱ्या आम्हीही आवडीने वाचल्या. त्यांच्या कादंबरीवर आधारित 'ज्योतिबाचा नवस' सिनेमाही आवर्जून पाहिला. त्यांची पुस्तकं नेण्याबद्दल काकांनी कधी हटकलं नव्हतं. पण 'वासूनाका' म्हटल्यावर त्यांनी जी काही प्रतिक्रिया व्यक्त केली, ती विसरता येणार नाही.

काकांना त्रास द्यायला म्हणून काही जण खोड्या काढायचे. संसार कसा करावा, ह्याबद्दल भागवत ह्यांचं एक पुस्तक होतं. ते अर्थात संसारी माणसांसाठी, प्रौढांसाठी होतं. काकांनी चिडावं म्हणून काही तरुण ते पुस्तक मागायचे. परिणाम स्वाभाविकपणे अपेक्षित तोच व्हायचा.

क्रिकेटचं वेड करमाळ्यात तेव्हा पसरू लागलं होतं. क्रिकेटपटूंची छायाचित्रं जमवून संग्रह बनवणं, हा छंद झाला होता. पण ती मिळणार कुठून? अनेकांच्या घरी तर वृत्तपत्रही येत नसे. 'धर्मयुग'चे क्रिकेट विशेषांक प्रसिद्ध होत. छान कागदावर रंगीत छायाचित्रं छापलेली असायची. वृत्तपत्रांत क्रिकेटपटूंच्या चेहऱ्याचे फोटो येत. काही शाळकरी मुलं हे फोटो फाडून नेत. संध्याकाळच्या वेळी सभासदांची गर्दी असली की, ही मुलं टाचणीने किंवा करकटने वृत्तपत्राचं पान कुरतडून फोटो फाडून नेत. (त्यातली काही नावं आजही लक्षात आहेत.) अशा मुलांवर लक्ष ठेवणं, हे एक वाढीव काम काकांच्या मागे लागलं. नंतर वाचनालयात पालिकेचा टीव्ही. बसला. त्यानं वाचण्याचं वेळापत्रक बिघडवून टाकलं.

वाचनालयात येणाऱ्या वृत्तपत्रांच्या वेळेचं गणित काही वेळा बिघडे. मुंबईहून येणाऱ्या रेल्वेगाडीला उशीर झाला की, जेऊरला उतरविले जाणारे गठ्ठे साडेआठ-नऊनंतर यायचे. एका आठवड्यात सलग दोन-तीन वेळा अशी अडचण आली. एका तरुण, नवथर वार्ताहराने लगेच टीकात्मक बातमी केली. नगरच्या सायंदैनिकात ती प्रसिद्ध झाली.

बातमी वाचून भणगेकाका अस्वस्थ झाले. आपल्या कष्टाची किंमत नाही, असं त्यांना वाटलं. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी एक घटना घडली. सभासदाने परत केलेल्या पुस्तकात १० रुपयांची नोट आढळली. आलेलं पुस्तक व्यवस्थित पाहून घेण्याची सवय काकांना होती. तसं करताना त्यांना नोट दिसली. लगेच सभासदाला हाक मारून त्यांनी पैसे परत केले. चाळीस वर्षांपूर्वी ही मोठी रक्कम होती.

हे कळल्यावर त्यांना भेटून म्हणालो, ''वा काका. फार चांगलं काम केलं तुम्ही.''

''बातम्या देणाऱ्यांना कुठं दिसतं आमचं हे काम?'', असं ते म्हणाले, तेव्हा त्यांच्या बोलण्यातला विशाद लपत नव्हता.

प्रामाणिकपणाच्या गुणाला वर्तमानपत्रात चौकट ठरलेलीच असते. भणगेकाकांच्या ह्या गुणाचं रास्त कौतुक व्हायलाच पाहिजे आणि वर्तमानपत्रांबद्दल त्यांना आलेला राग जावा, अशा हेतूने मी 'वाचकांची पत्रे' सदरासाठी म्हणून हा सगळा तपशील पत्रानं सोलापूरच्या एका दैनिकाला पाठवला. त्यांच्या अग्रलेखावर मी एका पत्रातून जोरदार टीका केल्यामुळे संपादकमहोदयांनी मला 'ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकलं होतं. त्यांनी पत्राला सरळ कचऱ्याची पेटी दाखवली. वर त्या सदरात एक चौकट प्रसिद्ध केली - काही लोक उगीच कुणाचं तरी अभिनंदन करण्याच्या नावाखाली स्वतःची टिमकी वाजवत राहतात!

त्या वेळी माझी पत्रं बऱ्यापैकी संख्येनं वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत असत. काकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो मला एक सहज सोपा मार्ग वाटला होता. पण तेवढीही प्रसिद्धी त्यांच्या नशिबात नव्हती.

दरम्यानच्या काळात नोकरी लागली. करमाळ्याला येणं-जाणं कमी झालं. नव्वदीच्या दशकात कधी तरी वडिलांनी ज्ञानेश्वर वाचनमंदिराचं सभासदत्व रद्द करून टाकलं. त्यांनी ते सांगितल्यावर वाईट वाटलं. पुस्तकवाटेवरचा मोठा टप्पा मागं पडला होता.

करमाळ्याला कधी तरी जाणं होई. बसस्थानकावर सूर्यपुजारींचा वृत्तपत्रांचा स्टॉल आहे. सकाळी दहाच्या सुमारास किंवा संध्याकाळी भणगेकाका तिथे बसलेले दिसायचे. मांडी ठोकून कुठलं तरी वृत्तपत्र ते चाळत असल्याचं पाहायला मिळे. मला पाहिल्यावर त्यांचा चेहरा थोडा चमके. ख्यालीखुशाली विचारत. आपण ज्याला वाचायला दिलं, तो पेपरमध्ये लिहू लागला, ह्याचा थोडासा आनंद त्यांना होत असावा. हा आपला माझा समज.

पुस्तकांच्या दुनियेत थोडं अधिक रमायला लागल्यावर भणगेकाकांच्या कामाचं महत्त्व कळलं. त्यांच्याबद्दल लिहावं असं खूपदा वाटलं. ग्रंथपाल दिन, पुस्तक दिन असे वेगवेगळे मुहूर्त काढत गेलो. त्यांच्याबद्दल खूपदा लिहिलं, पण ते मनातच. माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. असंच कधी तरी वाटलं की, ह्याची एक प्रत भणगेकाकांना भेट दिली तर? पण तो विचार काही कृतीत आला नाही. जे काम सहज करता येण्याजोगं होतं, ज्यातून कृतज्ञता खऱ्या अर्थानं व्यक्त झाली असती, मनापासून आभार मानता आले असते, ते काही जमलं नाही.

श्री ज्ञानेश्वर वाचनमंदिरानं लावलेली पुस्तकांची गोडी पुढंही कायम राहिली. नोकरीला लागल्यावर 'मॅजेस्टिक'च्या योजनेत पैसे भरू लागलो. दरमहा १० रुपये भरायचे आणि वर्षानंतर १४० रुपयांची पुस्तकं न्यायची. महिन्याला २० रुपये योजनेत 'गुंतवायचे' ठरवलं. वर्ष उलटल्यानंतर असंच कधी तरी पुण्यात गेलो. शनिवार पेठेत 'मॅजेस्टिक'चं दुकान होतं तेव्हा. आत शिरल्यावर काय पाहू, किती घेऊ, असं झालं. दोन-तीन तास घालवून मी त्यांच्या कप्प्यातून अगदी जुनी, चांगली आणि स्वस्त पुस्तकं निवडली. तीस-पस्तीस पुस्तकं सहज असतील. त्याची पावती बनवताना दुकानातला जुना कर्मचारी हसून म्हणाला, ''फार निवडून निवडून पुस्तकं मिळवली हं तुम्ही.'' त्याला पाहून, त्याचं वाचकाला दाद देणारं बोलणं ऐकून भणगेकाकांचीच आठवण झाली.

नगरमध्ये राहात असल्यानं रस्त्यावरची जुनी पुस्तकं चाळायची, विकत घ्यायची संधी साधताच आली नाही कधी. मग पुस्तकांचं प्रदर्शन भरलं की, चक्कर ठरलेली. आधीच्या काळात नॅशनल बुक ट्रस्टची बरीच पुस्तकं घेतली. एकदा 'ग्रंथाली'चं प्रदर्शन होतं. नुकतीच ओळख झालेल्या सुदेश हिंगलासपूरकर ह्यांनी आवर्जून काही पुस्तकं घ्यायला लावली. नवीन लेखक कळत होते, आवडत होते.

'अक्षरधारा'चं प्रदर्शन पहिल्यांदा आलं आणि चांगले दोन आठवडे होतं नगरमध्ये. भरपूर पुस्तकं होती त्यात. रोज किंवा दिवसाआड चक्कर मारून वेगवेगळी पुस्तकं घेत होतो. हे प्रदर्शन कसं झालं, नगरकर काय वाचतात, किती विक्री झाली, अशा मुद्द्यांवर बातमी लिहायची ठरवलं. त्यासाठी शेवटच्या दिवशी संयोजकांना भेटलो. राठिवडेकर बंधूंपैकी एक कुणी तरी होतं. त्या दिवशी खरेदी केलेल्या पुस्तकांचे पैसे देताना डिस्काउंटबाबत विचारलं. ते म्हणाले, ''तुमचं चुकलंच. सगळ्या पुस्तकांचं एकत्र बिल केलं असतं, तर पंचवीस टक्के सूट दिली असती.''

पुस्तकांच्या खरेदीत हाही एक महत्त्वाचा भाग असतो, हे तेव्हा कळलं. पुढे पुण्यात काही दिवस कामासाठी असताना अत्रे सभागृहात 'अक्षरधारा'चंच प्रदर्शन चालू असल्याचं कळलं. तिथे हावऱ्यासारखी पुस्तकं घेतली. दोन-तीन पिशव्या हातात वागवणं शक्य नसल्यामुळं रिक्षानं जावं लागलं. त्या पैशात अजून दोन पुस्तकं आली असती, असं वाटत राहिलं.

सर रिचर्ड बर्टन ह्यांनी इंग्रजीत आणलेल्या 'अरेबियन नाईट्स'चं गौरी देशपांडे ह्यांनी भाषांतर केल्याचं वाचण्यात आलं. हे १६ खंड मिळविण्यासाठी पुण्यातल्या राजेंद्र ओंबासे ह्यांच्या मागं लागलो. सगळे खंड हवे होते आणि घसघशीत सवलतही. दहा-बारा वर्षांपूर्वी ओंबासे प्रसन्न झाले आणि तो ठेवा माझा झाला.

मोल्सवर्थचा शब्दकोश पुनःमुद्रित होणार अशी बातमी २५ वर्षांपूर्वी वाचली. तो आणि सोबतचे एन. बी. रानडे ह्यांच्या इंग्लिश-मराठी कोशाचे दोन खंड घ्यायचेच असं ठरवलं. त्याची किंमत तेव्हा एक महिन्याच्या पगाराएवढी होती. घेतलेले कोश कपाटात पडून होते. गेल्या वर्षी चार-पाच लेखांचा अनुवाद करताना तिन्ही कोशांचा पुरेपूर उपयोग झाला. ते पैसे वसूल झाले!

कितीही पुस्तकं विकत घेतली, तरी ताज्या, नव्या आणि अनपेक्षितपणे भेटणाऱ्या चांगल्या पुस्तकांसाठी वाचनालय हवंच असतं. वाचकाला फिरून, पुस्तकं चाळू देणारी वाचनालयं मला फार आवडतात. त्यातून वेगळे लेखक आणि वेगळी पुस्तकं हाती लागतात. सोलापूरचं हिराचंद नेमचंद वाचनालय त्यासाठीच लक्षात राहिलं. 

पुण्याचं ब्रिटिश ग्रंथालय असंच एखाद्या प्रसन्न मंदिरासारखं वाटत आलेलं. तिथं बसून पुस्तकं चाळण्याची, वाचण्याची सोय होती. त्या ग्रंथालयाचं सभासदत्व मिळावं, असं फार वाटायचं. आता ते शक्य नाही. महाराष्ट्र बँकेचं मुख्यालय असलेल्या 'लोकमङ्गल'च्या कार्यालयात बहुतेक तळमजल्यावर असंच एक प्रशस्त ग्रंथालय होतं. तिथंही तीन-चार वेळा जाण्याचा आणि आरामात बसून काही नियतकालिकं, संदर्भ पुस्तिका चाळण्याची संधी मिळाली.

पुस्तकांची आणि वाचकांची थेट भेट व्हायलाच हवी. ठरावीक लेखक, लोकप्रिय पुस्तकं ह्यांचा कालांतराने कंटाळा येऊ लागतो. त्याचा परिणाम वाचनापासून फारकत घेण्यापर्यंत होण्याची भीती असते. करमाळ्याच्या वाचनालयात ही सोय नव्हती. पण भणगेकाकांसारखा ग्रंथमित्र असल्यामुळे तिथं ती अडचण नव्हती. आमच्या नगरच्या वाचनालयात पुस्तकं चाळण्याची सोय नाही. पावणेदोनशे वर्षांची परंपरा आणि लाखांहून अधिक पुस्तकं असलेल्या ह्या वाचनालयाची ही मोठीच त्रुटी.

'कोट जुना वापरा आणि पुस्तक मात्र नवीनच घ्या,' असं ऑस्टिन फेल्प्स ह्यांनी सांगून ठेवलंय. कोट जुना काय नि नवा, वापरलाच नाही कधी. पुस्तकं मात्र शक्यतो नवीच विकत घेत आलो.

'पुस्तकप्रेमी' अशा बन(व)लेल्या प्रतिमेबद्दल वर सांगितलंच आहे. पण हौसेनं घेतलेली सगळीच्या सगळी पुस्तकं वाचणं अजून तरी जमलेलं नाही.

स्वस्तात आहे, पुन्हा मिळणार नाही, दुर्मिळ होईल, चांगला लेखक आहे, संदर्भासाठी उपयोगी पडेल... अशा अनेक कारणांमुळं हावरेपणानं, असोशीनं, लोभानं घेतलेली खूप पुस्तकं आहेत घरात. आवरायला घेतल्यावर वाटतं, कधी वाचणार ही एवढी सगळी आपण?

पण हा 'आपला संग्रह' आहे, ह्याचं एक वेगळं समाधान असतंच. कधीही वाचायला आवडेल, असं वाटणारं पुस्तक हाताशी असणं ह्यासारखं सुख नाही. अशी पुस्तकं हाताशी असल्यामुळेच 'पुस्तकवाटा'सारखं सदर वर्षभर लिहिता आलं आणि त्यात फारशा लोकप्रिय नसलेल्या, कमी माहीत झालेल्या ५१ पुस्तकांची ओळख करून देता आली. पुस्तकवाटेवरचा तोही एक सुखद टप्पा होता.

ह्या न संपलेल्या प्रवासाबद्दल तूर्त एवढंच!

….….….….

#पुस्तके #आंतरराष्ट्रीय_पुस्तक_दिन #सफदर_हाश्मी #करमाळा #ज्ञानेश्वर_वाचन_मंदिर #भणगे_काका 
#पुस्तकवाटा #अरेबियन_नाईट्स
….….….….
(जागतिक पुस्तक दिनानिमित्त हा लेख. तो पहिल्यांदा प्रकाशित झाला 'शब्ददीप'च्या यंदाच्या दिवाळी अंकात. श्री. प्रदीप कुलकर्णी व श्री. विनायक लिमये ह्यांच्यामुळे लिहिलेला हा लेख इथे 'शब्ददीप'च्या सौजन्याने.)
(वाचनालयाची छायाचित्रे आंतरजालावरून साभार)
….….….….


सोमवार, ८ मार्च, २०२१

कामावर न जाणाऱ्या बाया

 

(चित्र https://www.istockphoto.com संकेतस्थळाच्या सौजन्यानं)

खूप जुनी गोष्ट आहे. अकरा वर्षांपूर्वीची. गावाहून रात्री उशिरा घरी आलो. 'समकालीन भारतीय साहित्य'चा ताजा अंक आला होता. चाळताना एक कविता दिसली. वाचली. आवडली. कवितेचं नाव होतं 'उम्मीद' आणि कवी सुरेश नारायण कुसूंबीवाल. पत्ता भुसावळचा दिला होता.

कवितेचा नायक आशा करतोय की, यंदा पाऊस चांगला पडेल नि शेती पिकेल, पिकलेल्या मालाला भाव मिळेल आणि त्यातून कर्जाचा हप्ता जाऊनही हाती काही उरेल बुवा. मुलाला यंदा नोकरी लागेल आणि त्याच्या डोळ्यांतली निराशा मावळेल, यंदाच्या वर्षी कुठे दंगली होणार नाहीत, निवडणुकीत कुणाचे मुडदे पडणार नाहीत, अशीही आशा व्यक्त करतो तो. आशावाद व्यक्त करणारी कविता.

तिचा शेवट फारच सुंदर आहे. कवी लिहितो,

'उम्मीद है कि

कुछ भी हो जाए

न छूटे उम्मीद का दामन

हमारे हाथ से क्योंकि

उम्मीद पर ही टिकी है दुनिया'

... ह्या शेवटच्या ओळी इतक्या आवडल्या की, मध्यरात्र उलटून गेलेली असतानाही लगेच श्री. कुसूंबीवाल ह्यांनी 'एस. एम. एस.' पाठवला. दुसऱ्याच दिवशी त्यांचा फोन आला. आम्ही गप्पा मारल्या. ह्याच कवितेच्या रूपात त्या वर्षी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर काही महिन्यांनी श्री. कुसूंबीवाल ह्यांनी फोन करून घरचा पत्ता विचारला. काही दिवसांतच त्यांचा नवाकोरा कवितासंग्रह घरी पोहोचला. दिल्लीच्या 'शिल्पायन'नं प्रकाशित केलेला हा संग्रह म्हणजे 'बीच बाजार सच'. खरं तर हिंदी फारसं कळत नाही. त्यात पुन्हा ह्या कविता. पण कवीनं एवढ्या प्रेमानं पुस्तक पाठवलं आहे म्हटल्यावर वाचू लागलो. सोप्या भाषेतल्या कविता. त्यातल्या बऱ्याचशा बाईवर - काम करणारी, कामावर न जाणारी, संसाराचा गाडा चालवणारी, पोळ्या लाटणारी बाई. आवडलेल्या एका कवितेचा अनुवाद तेव्हा काम करीत असलेल्या दैनिकाच्या महिला दिनाच्या अंकासाठी केला. तोच इथं देतोय...

औरतें जो काम पर नहीं जातीं

औरतें जो काम पर नहीं जातीं

असल मे वही काम करती हैं

पूरे समय

जंगली फूल की तरह

करती हैं सुगंधित पवन

अज्ञात रहकर


औरतें जो काम पर नहीं जातीं

धरे रहती हैं

गृहस्थी-रथ का चक्र

कैकेयी की तरह, और

जीतता है दशरथ


वे खुश होती हैं

पिंजरे की चिड़िया की तरह


उनकी चहक से

चमचमाती है दीवारें, फर्श

नाचते हैं परदे खिड़कियों के, और

मुस्कराता है घर

पूरे दिन और सारी रात


औरतें जो काम पर नहीं जातीं

उन पर कभी हावी नहीं होती थकान

एक के बाद एक खेल को बदल लेती हैं वे

और, आखइर थक जाते हैं काम उनके आगे

---------------------------------------------

कामावर न जाणाऱ्या बाया

कामावर न जाणाऱ्या बाया

खरं तर अगदी अविरत

त्याच काम करत राहतात

एखाद्या रानफुलासारखं

वाऱ्याला परमाळून टाकण्याचं

अनाम राहून


कामावर न जाणाऱ्या बाया

कसून धरून ठेवतात

संसाराच्या गाड्याचं चाक

अगदी कैकेयीसारखं, आणि

जिंकत असतो दशरथ


खुशीत असतात त्या

पिंजऱ्यातल्या मैनेप्रमाणं


त्यांच्याच किलबिलीनं

चकाकतात भिंती, फरशा

पडदे खिडक्यांवरले नाचतात, आणि

हसतं-खेळतं राहतं घर

दिवसभर आणि सारी रात

 

कामावर न जाणाऱ्या बाया

दमत नाहीत, कधी थकत नाहीत

बदलत राहतात त्या एकामागून एक खेळ

आणि, मग कामंच बापुडी थकतात त्यांच्यापुढं

(पूर्वप्रसिद्धी - ८ मार्च २०१२)

...


शनिवार, ६ मार्च, २०२१

‘सूर्योदया’चा सुवर्णमहोत्सव

 

ते वर्ष महत्त्वाचंच होतं. आता इतिहासात स्थान मिळवलेल्या अनेक घडामोडी त्या वर्षात घडल्या. उदाहरणार्थ, इदी अमिन ह्यांनी लष्करी उठाव करून युगांडाची सत्ता ताब्यात घेतली. चीननं अमेरिकेच्या टेबल टेनिस संघाला आमंत्रण देऊन ‘पिंगपाँग डिप्लोमसी’ सुरू केली. अमेरिकेनं सव्विसावी घटनादुरुस्ती करून मतदाराचं वय १८ वर्षावर आणलं. भारत आणि सोव्हिएत रशिया ह्यांनी २० वर्षांच्या मैत्री करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ‘द न्यू यॉर्क टाइम्स’नं ‘पेंटॅगॉन पेपर्स’ प्रसिद्ध करून युद्धखोर अमेरिकी सरकारचा खोटारडेपणा उघडकीस आणला. ‘वॉल्ट डिस्ने वर्ल्ड थीम पार्क’चं उद्घाटन झालं. वगैरे वगैरे...

ते वर्ष होतं १९७१. हिमाचल प्रदेशाच्या रूपानं भारतात अठरावं राज्य निर्माण झालं. पश्चिम बंगालला महापुराचा आणि ओडिशाला (तेव्हा ओरिसा) वादळाचा महाभयंकर तडाखा बसला.

वरच्या सगळ्या घटना-घडामोडी महत्त्वाच्या आहेत. पण सर्वसामान्य भारतीयांसाठी त्याहून खूप खूप महत्त्वाचं असं ह्याच वर्षानं दिलं.

पूर्व पाकिस्तानातील मुक्ती वाहिनीच्या हाकेला प्रतिसाद देत आपल्या सैन्यदलानं पाकिस्तानची नांगी ठेचली ती हेच वर्ष संपता संपता. बांगला देशाला स्वातंत्र्य मिळालं!

ह्याच वर्षात भारतीय क्रिकेट संघानं परदेशांतील दोन मालिकांमध्ये विजय मिळविला. आधी वेस्ट इंडिजमध्ये, मग इंग्लंडमध्ये.

...आणि ह्याच वर्षात भारतीय क्रिकेटला नवं स्वप्न पडलं. दीड दशक खेळून नवनवे विक्रम नोंदविणाऱ्या ह्या स्वप्नाचं नाव सुनील मनोहर गावसकर. भारतीय संघासाठी, क्रिकेटप्रेमींसाठी लख्ख ‘सनी डेज’ घेऊन आलेल्या गावसकर ह्यांच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात झाली, त्याचा आज (६ मार्च) सुवर्णमहोत्सव!

पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सलामीचा फलंदाज म्हणून गावसकरांनी पदार्पण केलं. पहिल्याच कसोटीपासून त्यांचं नातं विक्रमांशी जडलं. वेस्ट इंडिजमध्ये भारतानं मिळविलेला हा पहिला विजय. सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये (दुसऱ्या डावात नाबाद) त्यांनी अर्धशतक झळकावत ह्या संस्मरणीय विजयात सिंहाचा वाटा उचलला. चारही सामन्यांतील त्यांच्या अप्रतिम फलंदाजीमुळे भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्यांदाच मालिका जिंकता आली.

पन्नास, साठ आणि सत्तरीच्या दशकांमध्ये ज्यांचा जन्म झाला, त्या पिढ्यांमधले बहुतेक सारे सुनीलचे चाहते. त्या असंख्यांमधला मी एक. क्रिकेटच्या बातम्या वाचायला लागलो, सामन्यांचं धावतं वर्णन ऐकायला लागलो त्या शाळकरी वयापासून सुनील गावसकर हाच नायक. तो मुंबईकडून खेळतो म्हणून मी मुंबई संघाचा चाहता. त्या शाळकरी वयात एकदा त्याला पत्रही लिहिलं होतं. आंतर्देशीय. कुठून तरी त्याचा पत्ता मिळवून. ‘प्रिय सुनीलदादा’ असा मायना लिहून. ते त्याच्यापर्यंत पोहोचलं नसावं. पोहोचलं असेल, तर त्यानं वाचलं नसावं. वाचलं असेल त्यानं कदाचित, तर त्याला उत्तर द्यावं वाटलं नसावं. त्याच्या ‘फॅन मेल’मध्ये कधी तरी आपला उल्लेख होईल, अशी (भाबडी) आशा होती तेव्हा.

‘पॅकर सर्कस’ चालू असताना वेस्ट इंडिजचा दुबळा संघ भारतात आला होता. पहिल्याच कसोटीत घरच्या मैदानावर सुनीलनं द्विशतक झळकावलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी दैनिकात पहिल्या पानावर आठ कॉलमांत त्याच्या त्या खेळीतील फटक्यांची प्रसिद्ध झालेली छायाचित्रं अजून लक्षात आहेत. इंग्लंडविरुद्धची त्याची २२१ धावांची खेळी रेडिओवर ऐकली. त्यानंतरही सामना जिंकता न आल्याची हळहळ वाटत राहिली. वेस्ट इंडिजविरुद्ध १९८२-८३च्या दौऱ्यात त्याला मुळीच सूर सापडला नव्हता. त्याचा त्रास होई. मग तिसऱ्या कसोटीत त्यानं १४७ धावांची खेळी केली, तेव्हा रेडिओवर उत्तररात्रीपर्यंत ती ऐकत होतो. माल्कम मार्शलला हूक मारण्याचं धाडस करत त्यानं केलेली आक्रमक खेळी आणि उपाहारापूर्वीच होता होता राहिलेलं शतकही लक्षात आहे. तेंडुलकर बाद झाल्यावर (वैतागून) टीव्ही. बंद करणारे अनेक जण होते. सुनील बाद झाला की, आम्ही रेडिओचा कान पिळत असू!

तेव्हा लेख नाही, पण वाचकांच्या पत्रात लिहीत होतो. त्यानं एकोणतिसावं शतक करीत डॉन ब्रॅडमन ह्यांच्या विक्रमाची बरोबरी केली, नंतरचं शतक काढून नव्या विक्रमाची नोंद केली, त्या दोन्ही वेळा पत्रं लिहिली. तिसऱ्या विश्वचषक स्पर्धेत मुंबईकर खेळाडूंवर अन्याय झाल्याची भावना वि. वि. करमकरकर ह्यांनी 'महाराष्ट् टाइम्स'मधून व्यक्त केली होती. ती फारच पटली. मग पत्र लिहिलं - ‘ह्या स्पर्धेत भारत ज्या दोन सामन्यांमध्ये पराभूत झाला, त्या दोन्हींमध्ये सुनीलचा संघात समावेश नव्हता. हा निव्वळ योगायोग नाही!’ आता हसू येतं त्या समर्थनाचं. ह्या साऱ्या पत्रांची कात्रणं तीन-साडेतीन वर्षांपूर्वी निकालात काढली. सुनील तेव्हा ‘वीक पॉइंट’ होता. त्याला खेळताना प्रत्यक्ष पाहण्याची संधी एकदाच मिळाली. पुण्यातल्या नेहरू स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध. पत्रकार पक्षात बसून पाहिलेला भारताचा तो पहिलाच सामना. एकदम रद्दड झालेला. आपण हरलो. अवघ्या सात धावा काढून सुनील धावबाद झाला होता.

गावसकरांशी अगदी जवळून 'ओळख' होण्याचा योग नियती घेऊन आली. ‘क्रीडांगण’ पाक्षिकात नोकरीसाठी अर्ज केला होता. नोव्हेंबर १९८६. अर्ज वाचून श्री. सर्जेराव घोरपडे ह्यांनी विचारलं, ‘कधीपासून येताय?’ मी तयारच होतो. त्या आधी त्यांनी अनुभवाबद्दल विचारलं. ‘शतायुषी’ दिवाळी अंकात काम केल्याचं सांगितल्यावर ते म्हणाले होते, ‘दिवाळी अंकाचं काम काय वर्षभरात कधीही करता येतं हो! इथं तसं नसतं...’ (पुढे एका दैनिकातील मुलाखतीत ‘क्रीडांगण’चा अनुभव सांगितल्यावर ते संपादक म्हणाले होते, ‘ते काम काय पंधरवड्यात कधीही करता येतं हो...’)

‘क्रीडांगण’मध्ये जाऊ लागलो तेव्हा तिथं तयारी सुरू होती ‘सुनील गौरव अंक’ प्रसिद्ध करण्याची. म्हणजे बहुतेक लेखांचं काम झालं होतं. मांडणीचं काम चाललं होतं. किरकोळ मजकूर येणं बाकी होतं. छायाचित्रांच्या ओळी द्यायच्या होत्या. ते काम पाहताना छाती दडपून गेली. आपल्या (अत्यंत) आवडत्या खेळाडूबद्दल एकाच वेळी एवढं वाचायला मिळणार, त्याचे इतके फोटो पाहायला मिळणार, ह्यानं हरखून गेलो. थेट सुनीलची मुलाखत छापण्यापूर्वीच वाचायला मिळाली होती. त्याची पानं हाताळत होतो. मजकुराच्या ब्रोमाईड पट्ट्या चिकटवलेली जाड पानं. तेव्हा श्री. सर्जेरावांनी मंत्र सांगितला होता - ‘Artwork should be handled like glass!’

‘सुनील गौरव अंक’ म्हणजे श्री. सर्जेराव घोरपडे ह्यांचं मोठ्ठं स्वप्न होतं. हा अंक बाजारात आला की, ‘क्रीडांगण’ पुन्हा उभारी घेईल, असं त्यांना मनोमन वाटत असावं. मासिकाच्या आकारातील २५६ पानं असलेल्या ह्या अंकात भरगच्च मजकूर होता. जवळपास ७० जणांनी त्यात लिहिलं होतं. त्यात सुनीलचे कुटुंबीय, मित्र, समकालीन खेळाडू, ज्येष्ठ क्रिकेटपटू, राजकारण-कला क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार असे सगळेच होते. इंग्लंडमधील विजयाची आठवण रंगवणारा खुद्द सुनीलचा लेख! शिवाय भरपूर छायाचित्रं. वाचकांसाठी मोठं आकर्षण म्हणजे सुनीलचे सहा रंगीत ‘ब्लो-अप’. त्यावर त्या वर्षाचं कॅलेंडर.

ह्या महत्त्वाकांक्षी विशेषांकाचे संयोजक-संपादक होते श्री. एस. डी. जोशी. अतिशय खुसखुशीत, चटकदार लिहिणारे. बहुतेक तेव्हा ते ‘बजाज ऑटो’च्या गृहपत्रिकेचे संपादक म्हणून काम करीत होते. औद्योगिक क्षेत्राएवढीच रुची त्यांना क्रिकेटबद्दलही होती. पुढे त्यांनी ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे ह्यांच्याविषयीच्या एका पुस्तकाचं संपादन केल्याचंही पाहण्यात आलं. त्यांनीच सुनीलची मुलाखत घेतलेली. अगदी सविस्तर. जवळपास दीडशे छोटे-मोठे, किरकोळ-महत्त्वाचे प्रश्न विचारलेले. मूळ गाव कोणतं ते ब्रिटिश पत्रकारिता... असे नानाविध प्रश्न. काही प्रश्नांना सुनीलनं सविस्तर उत्तर दिलेली; तर काही दोन-चार शब्दांत बोलून ‘वेल लेफ्ट’ केलेले.

ही दीर्घ मुलाखत पुण्यातच घेतलेली. दुलीप करंडक स्पर्धेत खेळण्यासाठी सुनील आला होता तेव्हा ती झाली असावी बहुतेक. ह्या मुलाखतीने अंकातील २५ पानं व्यापली आहेत. शिवाय अधूनमधून छायाचित्रं असलेली पानं, ती सात-आठ. सुनीलची एवढी सविस्तर, त्याचा सगळा प्रवास सांगणारी मुलाखत त्या पूर्वी कोणत्याच दैनिकात प्रसिद्ध झाली नसावी. नंतरही ते भाग्य कुणाला लाभलं का, ह्याची शंकाच आहे.


ह्या मुलाखतीची मांडणी दस्तुरखुद्द श्री. सर्जेराव ह्यांनी केली होती. तेव्हाच्या आधुनिक इंग्रजी नियतकालिकांसारखी. वेगळी नि आकर्षक. पानात एकूण तीन रकाने. मधल्या रकान्यात सुनीलचं एक छायाचित्र आणि त्याच्या खाली त्या पानावर असलेल्या मजकुरातील वैशिष्ट्यपूर्ण तीन-चार वाक्यं. त्या छायाचित्राला जाड स्क्रीनची चौकट. मधल्या स्तंभात घेतलेल्या मजकुराचा टंक स्वतः श्री. घोरपडे ह्यांनी निवडलेला. तो त्यांच्या छापखान्यातील. ही वाक्यं/मजकूर निवडण्याचं काम त्यांनी माझ्यावर सोपवलं होतं. आता ३४ वर्षांनंतर तो अंक पाहताना त्यातल्या (मी केलेल्या) काही चुका लक्षात येतात. त्या मधल्या रकान्यातील ठळक मजकुरात सुनीलचं म्हणणं येण्याऐवजी बऱ्याच ठिकाणी त्याला विचारलेले प्रश्नच आले आहेत. सर्जेरावांनाही ते का खटकलं नाही, ह्याचं आता आश्चर्य वाटतं. 'माझा कसोटीतला उत्तम भिडू म्हणजे चेतन चौहान. पण आदर्श भिडू म्हणाल तर... रामनाथ पारकर!', ‘ब्रिटिश मासिकं फार पक्षपाती आहेत. त्यांना फक्त इंग्लिश क्रिकेट आणि क्रिकेटरबद्दलच रस आहे.’, ‘सुदैवाने क्रिकेटर म्हणून खेळामधून थोडे-फार पैसे मिळवू शकतो. पण माझा खेळाकडे पाहायचा दृष्टीकोन प्रोफेशनलच आहे’ अशी काही चटकदार आणि त्या जागेला न्याय देणारी वाक्यंही आहेत. त्यातल्या शुद्धलेखनातील त्रुटींचंही आता आश्चर्य वाटतं. (नवोदित असल्यामुळं त्यात माझा वाटा चांगल्यापैकी असणार.)

आणखी एक गमतीची गोष्ट आता जाणवते, ती म्हणजे ह्या मुलाखतीचं शीर्षक. एवढ्या सविस्तर मुलाखतीचं शीर्षक आहे - ‘इति सुनील उवाच!’ त्यातून नेमकं काहीच ध्वनित होत नाही. सुनीलच्या एवढ्या बोलण्यातून शीर्षकासारखं काहीच सापडलं कसं नाही? कुणी दिलं असावं ते? अगदी तीच गल्लत मीनल गावसकर ह्यांच्या मुलाखतीलाही झाली आहे. त्याचं शीर्षक आहे - ‘सुनीलची आई’. आता ती मुलाखत सुनीलच्या आईबद्दल काही सांगत नाही, तर ती आपल्या लाडक्या लेकाबद्दल सांगत आहे. ह्या दोन्ही चुका तेव्हा खटकल्या नाहीत किंवा लक्षातही आल्या नाहीत.

ह्या अंकाचं काम करताना अनेक गोष्टी कळल्या. लेखक म्हणून भाऊ पाध्ये हे नाव ठाऊक होतं. पण ते क्रिकेटवरही एवढ्या आवडीनं आणि ताकदीनं लिहितात, हे समजल्यावर धक्काच बसला. ‘पब्लिकचा सुनील आणि सुनीलचं पब्लिक’ शीर्षकाचा त्यांचा लेख बऱ्यापैकी मोठा आहे. तो संपादन(?) करून मीच फोटोकंपोजला दिला होता. त्याची मूळ प्रत तेव्हा जपून ठेवली असती तर..? ‘तंत्रशुद्ध खेळाडू नावापेक्षा बदनाम अधिक होतात...’, ‘आपला चाहता Creature of Extremes आहे, हे मात्र सुनीलच्या त्या वेळेस लक्षात आलं असेल’, ‘मला प्रथमच समजले की, या क्रिकेट खेळाडूंची एक युनियन आहे आणि या युनियनचा लीडर गावसकर आहे’... ही  उदाहरणं भाऊ पाध्येंच्या लेखात काय दम आहे, हे दाखवून देण्यासाठी पुरेशी आहेत.

भाऊ पाध्ये नुसते चांगले लेखकच नव्हते, तर उत्तम पत्रकार होते, हेही  लेखातून ठळकपणे दिसतं. त्यांनी दिलेले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संदर्भ, सुनीलच्या खेळाचं-वागण्याचं काळाच्या संदर्भात केलेलं विश्लेषण फारच वेगळं आहे. हे भाऊ हा लेख वाचेपर्यंत मला माहीतच नव्हते. पुढे त्यांनी असाच एक धक्का दिला. ‘सजती है यूँ ही महफील’ हे त्यांचं पुस्तक अचानक हाती आलं आणि त्यांना चित्रपटांचीही ही एवढी गोडी आहे, ह्याचा साक्षात्कार झाला. क्रिकेट (आणि सुनीलही!) आवडत नसलेल्यांनी भाऊंसाठी म्हणून हा लेख वाचलाच पाहिजे.

‘इलस्ट्रेटेड वीकली’मध्ये असलेले राजू भारतन आणि ‘संडे ऑब्झर्व्हर’चे अरविंद लवाकरे हे दोन्ही नामांकित पत्रकार त्या काळात सुनील-विरोधक म्हणूनच ओळखले जात. त्यांचेही लेख गौरव अंकात आहेत. भारतन ह्यांनी सुनीलची तुलना टेनिसपटू बियॉन बोर्गशी केलेली आहे. ‘सनी जसा आहे तसाच मला आवडतो’, असं लवाकरे ह्यांनी म्हटलंय. त्या काळातील इंग्रजीतले स्टार पत्रकार अनिल धारकर ह्यांचीही मुलाखत अंकात आहे आणि तिचंही शीर्षक फसलेलं दिसतं. खास शिरीष कणेकरी शैलीतला 'सुनील माझ्या चष्म्यातून' लेख आजही ताजा टवटवीत वाटतो. तो कणेकर ह्यांच्या कुठल्या पुस्तकात कसा नाही?

विजय मर्चंट, विजय हजारे, राजसिंग डुंगरपूर, वासू परांजपे आदी खेळाडू, पिलू रिपोर्टर, स्वरूप किशन, माधव गोठोस्कर हे पंच, गंगाधर महांबरे व अनंत मनोहर असे प्रसिद्ध लेखक ह्या गौरव अंकाचे मानकरी आहेत. त्यात मला एक शब्दही लिहायला मिळाला नाही. पण तरीही तो अंक मला आजही 'आपला' वाटतो. त्यातील बहुसंख्य छायाचित्रांच्या ओळी देण्याचं काम मी केलं. त्या बऱ्यापैकी जमल्या आहेत. बऱ्याच लेखांचे 'लीड/इंट्रो' देण्याचं काम श्री. घोरपडे ह्यांनी मला सांगितलं होतं. ते काम फसल्याचं आता वाचताना जाणवतं. 'सनी कॅलिडिओस्कोप'मध्ये विविध क्षेत्रांतील नामवंतांना सुनीलबद्दल बोलतं करण्यात आलं. अंकाचं काम शेवटच्या टप्प्यात असताना त्यासाठी शरद पवार आणि विट्ठलराव गाडगीळ ह्यांचा मजकूर लिहून देण्याचं फर्मान श्री. घोरपडे ह्यांनी काढलं. ते ऐकून बावचळून गेलो. 'त्यांची भाषणं ऐकली नाहीत का कधी संपादक?', असं विचारत श्री. सर्जेराव ह्यांनीच अर्ध्या तासात त्या दोघांचा मजकूर तयार केला. अगदी त्यांच्या शैलीबरहुकूम!

ज्येष्ठ पत्रकार र. गो. सरदेसाई ह्यांनीही विक्रमादित्याबद्दल लिहिलं आहे. न्यूज प्रिंटच्या चतकोर आकाराच्या कागदांवर त्यांनी शाई पेनानं लिहिल्याचं आठवतंय. प्रत्येक पानात सारख्याच ओळी आणि शब्दसंख्याही साधारण तेवढीच. पण त्याहूनही त्यांची हृद्य आठवण आहे. अंक प्रकाशित झाल्यावर त्याची प्रत व मानधनाचा धनादेश त्यांना पाठविण्यात आला. योग असा की, सुनीलनं १० हजार धावांचा टप्पा गाठला, त्याचं धावतं वर्णन रेडिओवर ऐकत असतानाच सरदेसाई ह्यांना हे टपाल मिळालं. पोहोच देताना त्यांनी लिहिलेल्या पत्रात ह्याचा आवर्जून उल्लेख केला. हा मोठा, अनुभवी पत्रकार किती साधा-सरळ माणूस होता, हेच त्या आभाराच्या पत्रातून अनुभवायला मिळालं.

आता लक्षात येतं की, ह्या अंकात सुनीलच्या पत्नीनं काही लिहिलेलं नाही किंवा तिची मुलाखतही नाही. त्याच्या बहिणींचंही लेखन नाही. त्या वेळच्या महत्त्वाच्या मराठी वृत्तपत्रांतल्या एकाही क्रीडा-पत्रकाराला श्री. घोरपडे ह्यांनी लिहायला का सांगितलं नसावं, ह्या प्रश्नाचं उत्तरही मिळत नाही.

'सुनील गौरव अंक हॉट केकसारखा संपला' अशी मस्त जाहिरात श्री. सर्जेराव घोरपडे ह्यांनी स्वतःच तयार केली होती. प्रत्यक्षात तसं घडलं नाही. अडीचशे पानांच्या, भरपूर छायाचित्रं आणि देखणं मुखपृष्ठ असलेल्या ह्या अंकाची किंमत २० रुपये होती. ती त्या काळाच्या मानाने कमी नव्हती; पण अगदी खिशाला न परवडणारीही नव्हती. हा अंक नियोजनापेक्षा थोडा उशिराच प्रसिद्ध झाला. जानेवारी १९८७. त्यानंतर काही काळानं सुनीलनं १० हजार धावांचा टप्पा गाठला. अंकाला अजून थोडा उशीर होऊन, तो त्या मुहूर्तावर प्रकाशित झाला असता तर? मग कदाचित श्री. घोरपडे ह्यांच्या जाहिरातीप्रमाणे त्याचा उठाव 'हॉट केक'सारखा झाला असता! अन्य काही गोष्टीही त्यांच्या मनाप्रमाणे घडल्या नाहीत. तसं त्यांनी बोलूनही दाखवलं.

सुनील गावसकर आवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांचं लेखन. 'प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रूप'च्या माध्यमातून आपलं लेखन 'सिंडिकेट' पद्धतीनं देणारा तो पहिला क्रिकेटपटू. मराठीत त्याचं लेखन दोनच ठिकाणी प्रसिद्ध व्हायचं. 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'क्रीडांगण'. त्यांचा लेख पहिल्यांदा अनुवादासाठी देताना श्री. घोरपडे ह्यांनी तंबी दिली होती, 'म. टा.मधलं उचलून जसंच्या तसं वापरायचं नाही.' सरळ बॅटनं खेळणारा हा माणूस लिहिताना मात्र व्यंग्योक्ती, उपहास, मिश्किल विनोद ह्याचा सढळपणे उपयोग करी. ते मराठीत आणताना खूप झगडावं लागे. तो अनुभवही वेगळा होता.

गावसकरांची ती शैली आजही दिसते. त्यांच्या स्तंभलेखनातून आणि कॉमेंटरीमधूनही. ह्या थोर खेळाडूच्या पदार्पणाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त हे सारं आठवलं आणि लिहावं वाटलं.

ताजा कलम : एक वैशिष्ट्य सांगायचं राहूनच गेलं. 'सुनील तू असाच खेळत रहा!' असं आर्जव करणारी ना. के. ताले ह्यांची कविता अंकात अगदी सुरुवातीलाच आहे. दैनंदिन घडामोडींवर ताले कविता करीत व त्या एका दैनिकात की साप्ताहिकात त्या वेळी नियमित प्रसिद्ध होत, एवढं आठवतं. त्या कवितेच्या शेजारीच अंकनायकानं क्रीडांगणच्या वाचकांना स्वहस्ताक्षरात दिलेल्या शुभेच्छा आणि सही आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वाक्षरी मराठीत आहे! माझ्यासाठी अजून एक अप्रूप असं की, अजित वाडेकरांची सही त्या अंकावर घेतलेली आहे.

----


#SunilGavaskar
 #India 
#cricket #England #WestIndies #Kreedangan #IndianCricket #PackerCircus #PMG #BhauPadhye #GoldenJubilee #Ghorpade #Sunil_Gaurav_Ank #1971 #SeriesWin 

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाच...