शनिवार, १ जून, २०१९

फलंदाजी धडाकेबाज अन् नेतृत्व अफलातून

विश्वचषकातील सर्वोत्तम-१
(ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड १९९२)


क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यास आता अवघे तीन आठवडे 
बाकी आहेत. एक तपानंतर पुन्हा भारतात होणाऱ्या 
ह्या स्पर्धेबाबत स्वाभाविकपणे कमालीचं औत्सुक्य आहे. कोण 
ठरणार विश्वविजेता? कोण असेल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू?
आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेल्या 
खेळाडूंच्या कामगिरीचा हा आलेख.
त्याची सुरुवात न्यूझीलंडच्या मार्टिन क्रो ह्याच्यापासून.


उपान्त्य सामन्यात क्रोच्या बॅटचा पाकिस्तानला तडाखा.
निकाल मात्र इम्रानच्या संघाच्या बाजूनेच लागला.
..................................................................

बरीच भवती न भवती होऊन अखेर खेळल्या गेलेल्या आशियाई चषक स्पर्धेकडं विश्वचषकाची रंगीत तालीम म्हणून भारतीय क्रिकेटप्रेमींनी पाहिलं. पण रंगीत तालमीपेक्षा महत्त्वाचा असतो तो प्रत्यक्ष प्रयोग. सर्वांचे संघ जाहीर होऊन त्याची पहिली घंटा तर झाली आहे. प्रत्यक्ष पडदा उघडेल तो ५ ऑक्टोबर रोजी. हे नाट्य मग पुढचे ४६ दिवस चालेल. दीर्घ काळानंतर एकच देश यजमान असलेल्या ह्या स्पर्धेत १० शहरांमध्ये ४८ सामने होतील.

मोजकेच देश सहभागी असलेल्या ह्या खेळाची पहिली विश्वचषक स्पर्धा ४८ वर्षांपूर्वी (१९७५मध्ये) झाली. क्रिकेटच्या माहेरघरी - इंग्लंडमध्ये. वि. वि. करमकर ह्यांच्यासारखे दिग्गज क्रीडासमीक्षक अगदी अलीकडेपर्यंत विचारत - ही कसली विश्वचषक स्पर्धा? फार तर हिला राष्ट्रकुल स्पर्धा म्हणा! ते काही असो; क्रिकेटमधल्या पैशामुळं ह्या खेळानं आता हात-पाय पसरले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सदस्य असलेल्या देशांची संख्या शतकापार (१०८) गेली आहे. त्यामुळे चाहते वाढले आहेत आणि त्यांचं कुतूहलही.

कोण जिंकणार?
कोण जिंकणार यंदा विश्वचषक? यजमान विजेते ठरले त्या २०११ आणि २०१९ स्पर्धांची पुनरावृत्ती होईल? स्पर्धेचा मानकरी कोण असेल - फलंदाज, गोलंदाज की कोणी हरहुन्नरी अष्टपैलू? तो विजेत्या संघाचा असेल की पराभवाची चुटपूट लागलेल्या उपविजेत्या संघाचा? औत्सुक्य वाढविणारे प्रश्न....

विश्वचषकाच्या पहिल्या चार स्पर्धांमध्ये प्रत्येक सामन्यातला सर्वोत्तम खेळाडू (‘मॅन ऑफ द मॅच’) निवडला गेला; पण पूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूची निवड मात्र केली गेली नाही. ही उणीव दूर झाली पाचव्या स्पर्धेपासून. तेव्हापासून पुढच्या प्रत्येक स्पर्धेत अशा गुणी खेळाडूची निवड केली जाऊ लागली.

नवनवे पायंडे
स्पर्धेची पाचवी आवृत्ती अनेक अर्थांनी वेगळी ठरली. दक्षिण गोलार्धात झालेली ही पहिलीच स्पर्धा. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ह्यांनी संयुक्तपणे २२ फेब्रुवारी ते २५ मार्च १९९२ या काळात तिचं आयोजन केलं. सत्तरच्या दशकात ‘पॅकर सर्कस’नं खळबळ उडवून दिली होती; तसंच नावीन्य ह्या स्पर्धेत पाहायला मिळालं. खेळाडूंचे रंगीत पोषाख, प्रकाशझोतातील सामने, पांढऱ्या चेंडूचा वापर... ह्या सगळ्याला सुरुवात झाली ती ह्याच स्पर्धेपासून. वादग्रस्त डकवर्थ-लुईस नियमाचा फटका विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला बसला तो ह्याच स्पर्धेत.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संभाव्य विजेत्या संघांच्या यादीत न्यूझीलंडला कुणी फारसं गांभीर्यानं गृहीत धरलं नव्हतं. त्याचं कारणही तसंच होतं. विश्वचषकाच्या अगदी आधी पाहुण्या इंग्लंडनं ह्या सहयजमानांना त्यांच्याच भूमीवर कसोटी आणि एक दिवशीय, अशा दोन्ही मालिकांमध्ये सपाटून मार दिला होता. त्यामुळेच न्यूझीलंड कुणाच्या खिसगणतीत नव्हतं.

विश्वचषक स्पर्धेचं स्वरूप ह्या वेळी पुन्हा एकदा बदललं होतं. ऐन वेळी दक्षिण आफ्रिकेच्या रूपाने नवव्या संघास मान्यता देण्यात आली. त्यातूनच साखळी पद्धत आली. सहभागी सर्व संघांना एकमेकांशी खेळायचं होतं. साखळीतले सगळे सामने आपल्याच देशात, आपल्या नेहमीच्या वातावरणात खेळायला मिळणार, हे न्यूझीलंडसाठी फायद्याचं होतं.

स्पर्धेतला पहिला धक्का 

दोन यजमानांमधील लढतीनं स्पर्धेला सुरुवात झाली. ऑकलंडच्या ईडन पार्कवर हा सामना झाला. निकालाचा अंदाज व्यक्त करताना बहुतेकांनी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला झुकतं माप दिलं होतं. त्या मागचं कारण शोधणं अवघड नाही. कागदावर कांगारूंचांच संघ सरस दिसत होता. न्यूझीलंडचा कर्णधार मार्टिन क्रो आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या मनात मात्र काही वेगळं होतं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ३७ धावांनी हरवून त्यांनी स्पर्धेतला पहिला धक्का दिला. नंतरच्या महिनाभरात असे बरेच धक्के बसलेले पाहायला मिळाले. ह्या विजयी सलामीनंतर न्यूझीलंडचा दबदबा वाढला. त्याला जागत संघाने सलग सात सामने जिंकले. संभाव्य विजेत्याच्या यादीत क्रोच्या संघाचं नाव अग्रक्रमानं घेतलं जाऊ लागलं.

शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडचा पाकिस्तानकडून पराभव झाला. पण त्यामुळं फार काही बिघडलं, असं वाटत नव्हतं. घात झाला तो उपान्त्य सामन्यात! न्यूझीलंडची गाठ पुन्हा एकदा पाकिस्तानशी पडली. जखमी झालेला क्रो क्षेत्ररक्षणाच्या वेळी मैदानाबाहेर थांबला; अंतिम सामन्यात तंदुरुस्त असावं म्हणून. पण त्याला तंबूत बसून पाहावं लागलं ते सामना हातातून पुरता निसटल्याचं आणि विश्वचषकाचा अंतिम सामना खेळण्याचं स्वप्न भंगल्याचं! फारशी कोणाची अपेक्षा नसताना एवढं यश आणि यशाची अपेक्षा केली जात असताना अपयशाच्या दरीत कोसळणं...

ह्या स्पर्धेमध्ये मार्टिन क्रो ह्याची कामगिरी अफलातूनच होती. फलंदाज म्हणून आणि धोरणी कर्णधार म्हणूनही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला, तेव्हा संघाची अवस्था नाजूक होती – दोन बाद १३. समोर क्रेग मॅकडरमॉट आणि ब्रूस रीड यांचा तोफखाना सुरू होता. सलामीचा रॉड लॅथम बाद झाला तेव्हा संघाच्या धावा होत्या ५३. तिथून पुढं क्रोनं सूत्रं हाती घेतली. केन रुदरफोर्ड याला साथीला घेऊन त्यानं चौथ्या जोडीसाठी ११८ धावांची भागीदारी केली. डाव संपायला एक चेंडू बाकी असताना त्यानं शतक पूर्ण केलं. एकूण ११ चौकारांसह १३४ चेंडूंमध्ये नाबाद १००. कर्णधाराला साजेशी खेळी.

नवा चेंडू फिरकी गोलंदाजाकडे
ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड बून व जिऑफ मार्श यांना दुसऱ्याच षट्कात आश्चर्याचा मोठा धक्का बसला. ख्रिस केर्न्स ह्याचं सलामीचं षट्क संपल्यावर मार्टिन क्रोनं चेंडू दिला फिरकी गोलंदाज दीपक पटेल ह्याच्याकडे. नवा चेंडू आणि फिरकी गोलंदाजाच्या हाती? दीपक पटेलची भरपूर पिटाई होणार असं समालोचन कक्षात बसलेल्या दिग्गजांना वाटत होतं. तसं काही घडलं नाही. पटेलनं पहिल्या सात षट्कांत फक्त १९ धावा दिल्या. नंतर त्यानं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅलन बॉर्डर याचा बळी मिळविला. ‘जुगार’ म्हणविला जाणारा डाव क्रोनं हुकमी ठरविला होता.

पहिल्या सामन्यात शतक झलकावल्यानंतर फलंदाज म्हणून क्रोची स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. श्रीलंकेविरुद्ध पाच आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद तीन अशा खेळीनंतर त्याचा तडाखा बसला तो झिम्बाब्वे संघाला. त्या सामन्यात त्यानं ८ चौकार व २ षट्कारांसह ४३ चेंडूंमध्ये ७४ धावा तडकावल्या. टी-20 क्रिकेट तेव्हा कुणाच्या स्वप्नातही नव्हतं आणि त्याला साजेशी खेळी. आजच्या भाषेत बोलायचं तर त्याचा स्ट्राईक रेट होता १७२! त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध त्यानं चेंडूमागे धाव ह्या गतीने नाबाद ८१ धावा चोपताना डझनभर चौकार मारले. भारताविरुद्ध नाबाद २६, इंग्लंडविरुद्ध ८१ चेंडूंमध्ये नाबाद ७३ (चार चौकार) असा रतीब घालत तो संघाला विजयाकडे नेत राहिला.

साखळीतील शेवटचा सामना खेळताना मात्र कर्णधार क्रो अपयशी ठरला. त्याच्या संघाचा पहिला पराभव झाला. पाकिस्तानविरुद्ध त्याला जेमतेम तीन धावा काढता आल्या. उपान्त्य फेरीत पुन्हा पाकिस्तानविरुद्ध ८३ चेंडूंतच त्याने ९१ धावा फटकावल्या. त्यात त्याचे सात चौकार व तीन षट्कार होते. त्याची ही स्फोटक खेळी व्यर्थ ठरली. एकूण तीन वेळा तो सामन्याचा मानकरी ठरला.

स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा होत्या मार्टिन क्रो ह्याच्याच नावावर. त्यानं ११४ सरासरीनं तब्बल ४५६ धावा कुटल्या. त्याचा ‘स्ट्राईक रेट’ ९०.४३ होता. म्हणूनच सर्वानुमते तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. विश्वचषक स्पर्धेत असा बहुमान मिळविणारा पहिला खेळाडू!

कर्णधार क्रो!
केवळ दणकेबाज फलंदाजी केली, स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या ह्यामुळे क्रोची निवड झाली, असं म्हणणं अयोग्यच ठरेल. त्याच्यातील कर्णधारावर ते अन्याय केल्यासारखं होईल. कर्णधार ह्या नात्यानं त्यानं सामन्यागणिक आपली गुणवत्ता सिद्ध केली. विविध कारणांनी आगळ्यावेगळ्या ठरलेल्या ह्या स्पर्धेची काही वैशिष्ट्यं वाढविण्यास त्यानंही हातभार लावला. नवा चेंडू फिरकी गोलंदाजाच्या हाती ठेवण्याची कल्पना त्यातलीच एक. (खरं तर १९७९च्या स्पर्धेत त्याच्याच संघाविरुद्ध भारतानं हा प्रयोग केला होता. तेव्हा भारताचा कर्णधार व्यंकटराघवन ह्याने डावातील दुसऱ्या षट्कासाठी चेंडू बिशनसिंग बेदीकडे सोपविला होता!)

‘पिंच हिटर’ संकल्पनेचा जनकही क्रो हाच होता. पहिल्या १५ षट्कांमध्ये असणारे क्षेत्ररक्षणाचे निर्बंध लक्षात घेऊन, त्याचा फायदा उठविण्यासाठी स्फोटक खेळ करणाऱ्या मार्क ग्रेटबॅच ह्याला स्पर्धेपुरता सलामीवीर बनविण्याचा निर्णय त्यानं घेतला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. त्यानं तीन अर्धशतकांसह ३१३ धावा तडकावल्या. हा ‘पिंच हिटर’ सलामीवर दोन वेळा सामन्याचा मानकरी ठरला. जलदगती गोलंदाजांपेक्षा मध्यमगती गोलंदाजावर विश्वास टाकण्याची क्रोची खेळीही यश देऊन गेली. कल्पक धोरणे आखणारा नि त्याची अंमलबजावणी करणारा कर्णधार होता तो. त्यामुळेच अंतिम सामना खेळलेल्या दोन्ही संघांमधील कोणत्याही खेळाडूऐवजी मार्टिन क्रो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला.

अंतिम सामन्यात अक्रम सर्वोत्तम
मेलबर्न इथे २५ मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा २२ धावांनी पराभव केला. इंग्लंडला तिसऱ्या वेळी अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानकडून अष्टपैलू खेळ करणारा वसीम अक्रम सामन्याचा मानकरी ठरला. त्याने आधी मोक्याच्या वेळी १८ चेंडूंमध्ये ३३ धावा तडकावल्या. नंतर १० षट्कांत ४९ धावा देऊन तीन गडी बाद केले; त्यात इयान बॉथम आणि लन लॅम्ब यांचा समावेश होता.
.................
(‘झी मराठी दिशा’ साप्ताहिकात २० एप्रिल २०१९ रोजी प्रकाशित झालेला लेख विस्तारित स्वरूपात.)
.................
(छायाचित्रं stuff.co.nz संकेतस्थळाच्या सौजन्याने)
.................

#क्रिकेट #विश्वचषक #विश्वचषक2023 #विश्वचषक1992 #न्यूझीलंड #मार्टिन_क्रो #कर्णधार_क्रो #ऑस्ट्रेलिया #पाकिस्तान #स्पर्धेतील_सर्वोत्तम #पिंच_हिटर

#CWC #CWC2023 #CWC1992 #Captain_Crowe #Martn_Crowe #New_Zealand #Aurstralia #Pakistan #pinchhitter #icc #Player_of_the_Tournament

मंगळवार, १४ मे, २०१९

अचाट आणि अफाट!


'ट्टॉक' करायला शिकवलं, फुरसुंगीच्या बनेश ऊर्फ फास्टर फेणेनं. तो भा. रा. भागवतांचा मानसपुत्र. ताम्हनकरांचा 'गोट्या' आणि 'चिंगी' तेव्हा जुने झाले होते. आणि दिलीप प्रभावळकर यांच्या 'बोक्या सातबंडे'चा जन्मच व्हायचा होता. फास्टर फेणेच्या लीला जेव्हा पुस्तकं वाचायला भाग पाडत होत्या, त्याच काळात आणखी एक पुस्तक हाती आलं. एकदम भन्नाट!

'तिरसिंगराव' असं त्या पुस्तकाचं नाव. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी ते नव्या अवतारात भेटले. 'पुन्हा तिरसिंगराव.' इथेही त्यांचे पराक्रम होतेच. या मराठमोळ्या पेहेलवानाच्या कथा 'कुमार'मध्ये प्रसिद्ध होत होत्या. अचाट आणि अफाट अशाच. त्या काही तेव्हा वाचण्यात आल्या नाहीत. पुस्तक बनल्यावरच त्या कथा वाचल्या.

हिंदकेसरी तिरसिंगराव. जगप्रसिद्ध मल्ल. अस्सल कोल्हापुरी भाषेत बोलणारा, आकडी दुधाचा कॅनच तोंडाला लावणारा, अफाट व्यायाम आणि अचाट पराक्रम करणारा पेहेलवान. गरिबांना मदत करणारा आणि गुंडांना बुक्कीत लोळवणारा पेहेलवान. चिनी हेरांच्या कारवाया उधळून लावणारा, सिनेमात काम करणारा, विमान अपहरणकर्त्यांना पराभूत करणारा...

पुस्तक विकत घ्यायला सुरुवात केल्यावर एका प्रदर्शनात 'फास्टर फेणे' दिसला. त्याचा संच ताब्यात घेतला. नुकतीच जीभ फुटलेल्या मुलासाठी म्हणून. मग तिरसिंगरावांची आठवण झाली. पण ते दुर्मिळ. कुठे भेटायलाच तयार नाहीत. आनंद घाटुगडे यांची ही दोन पुस्तकं कुठेच मिळेनात.

आणि अचानक एका प्रदर्शनात नव्या अवतारात 'तिरसिंगराव' दिसले. त्यांच्या दोन पुस्तकांची आता सहा झाली होती. नाव एकच - 'तिरसिंगराव'. पुण्याच्या 'अमोल प्रकाशन'ने हे सहा भाग प्रकाशित केले आहेत. त्यात एकूण २९ कथा आहेत आणि पृष्ठसंख्या आहे ३९१. प्रत्येक भागाची किंमत ३० रुपये.

एकदा हिंदकेसरी दीनानाथसिंह यांची भेट झाली होती. ते कवीही. त्यांनी एक शेर ऐकवला. आणि मग म्हणाले होते, 'पैलवानलोकांचा (मेंदू) गुडघ्यात असतो, असा लोकांचा समज आहे.' खरंय; बहुतेकांचा समज तसाच. पण आपले तिरसिंगराव 'गुडघ्यात' असणारे पेहेलवान नक्कीच नाहीत. त्यांचा पराक्रम काही फक्त बाहुबळाच्या जोरावरचा नाही. त्याला भरपूर बुद्धिचातुर्याची आणि अफलातून कल्पकतेची जोड आहे.

कोल्हापूर म्हणजे आकडी दूध, तालमी, शिकारी आणि पेहेलवान. तिरसिंगराव तिथलेच. देहानं आडदांड, आडमाप. बोलणं, हसणं सगळं दिलखुलास. कोणतीही गोष्ट ते मनापासून करतात. व्यायाम असो की, मित्रानं गळ घातली म्हणून पत्करलेली एखादी जबाबदारी. ताकद तर एवढी अचाट की, पोलिस असताना त्यांनी एकदा चित्ताच जेबरबंद करून आणला चोर म्हणून. परममित्र खंडोजीराव गुडमुडशिंगीकरांची मान खाली जाऊ नये म्हणून बैलगाडी शर्यतीत बैलाच्या जोडीनं धावले ते.

या सगळ्या कथा मोठ्या रंगदार आणि ढंगदार. त्या खेड्यात घडतात आणि महानगरातही. देशात घडतात आणि परदेशातही. त्यात तिरसिंगरावांची ताकद दिसते आणि चातुर्यही. तिरसिंगरावांना एकदा कोल्हापुरातल्या पार्काजवळ चोर भेटतात. ते चालले असतात तिरसिंगरावांच्याच घरी डाका घालायला. त्यांची ते युक्ती-शक्तीनं अशी गठडी वळतात की बस्स! कागलचा उरूस उरकून सिद्धनेर्लीची वाट धरलेल्या तिरसिंगरावांची गाठ चोरांशी पडते. मग मारुतीचं रूप घेऊन ते त्यांची फ्या फ्या उडवतात. एका 'वेताळा'चाही बुरखा फाडतात.

तिरसिंगरावांना सिनेमात घेण्याची  'बुद्धी' एका निर्मात्याला होते. आपल्या या सरळसोट नायकामुळं त्याची पार फजिती होते. गावकऱ्यांच्या आग्रहामुळं यात्रेतील 'द्रौपदी वस्त्रहरण' नाटकात भीमाची भूमिका करतात. अगदी जिवंत करून सोडतात ते ती.

कोल्हापूर आणि पुणे यांचं नातं 'जवळचं'. तेव्हा तिरसिंगराव अधूनमधून पुण्याला जात असतात. पुण्यातच एकदा कुस्ती खेळताना त्यांचा कान दुखावतो. पराभूत गेंदासिंग त्यांच्या कानावर गुच्ची मारतो. हे पुणं. इथं नुसत्या कानाचे 'स्पेशालिस्ट डॉक्टर' नाहीत; तर उजव्या आणि डाव्या कानाचे  'स्पेशालिस्ट' आहेत. तिथंही तिरसिंगराव धमाल उडवून देतात.

तिरसिंगराव हाँगकाँगमध्ये असतात, काश्मीरमध्ये जाता, आफ्रिकेतील टोळ्यांना आपलंसं करतात आणि एखाद्या पावसाळ्यात बिरा धनगराच्या कोसळत्या खोपटाला भरभक्कम आधार देऊन त्याचा बाळनातू वाचवतात. कधी करवंदेसरांची अडचण ओळखून माणिकदौंडीला 'ड्रिल मास्तर' होतात, कधी समशेरसाठी ट्रक-ड्रायव्हर. पंचकल्याणी घोडा जसा त्यांचा आवडता, तसाच पुंड्याही पोटच्या पोरासारखा लाडका.

'पुन्हा तिरसिंगराव'ला र. बा. मंचरकर यांच्या प्रस्तावना आहे. ते लिहितात, 'मराठी कुमारकथेत घाटुगडे काही निराळे घडवून पाहत आहेत... मराठी कथेला अपरिचित असे काही त्यांनी घडविले आहे. तिरसिंगरावाच्या रूपाने कुमारांना हवासा असा स्वप्ननायक मिळाला आहे. 'तिरसिंगराव'चे हे वेगळेपण दुर्दैवाने मराठी समीक्षेने ओळखले नाही.'
(पूर्वप्रसिद्धी – दि. १८ एप्रिल २०१०)

रविवार, ७ एप्रिल, २०१९

(स्वलिखित) अटळ शोकांतिका


माजी उपपंतप्रधान, भारतीय जनता पक्षाच्या संस्थापकांपैकी एक, सात दशके सक्रिय राजकारणात असलेल्या लालकृष्ण अडवाणी ह्यांनी दीर्घ काळापासून पत्करलेले मौन सोडले.
लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला जेमतेम आठवडा राहिलेला.
पक्षाचा स्थापनादिन दोन दिवसांवर आलेला. निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची शेवटची यादी ठरविण्याची गडबड सुरू आहे.

...अशा वेळी अडवाणी बोलते नाही, पण लिहिते झाले. http://blog.lkadvani.in ह्या माध्यमातून त्यांनी भूमिका व्यक्त केली. रोखठोक वाटावी अशी!

पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याची शक्यता अडवाणींच्या बाबतीत कधीच मावळली आहे. त्यांचे निवडणुकीचे राजकारणही संपलेले दिसते. ते कित्येक दिवसांपासून जाहीरपणे बोलताना दिसलेले नाहीत. सध्याच्या लोकसभेत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने पहिल्या रांगेत बसून असणारे अडवाणी बोललेले पाहायला मिळाले नाहीत. आपल्या (माजी?) शिष्योत्तमाची बाजू त्यांनी सभागृहात उचलून धरली किंवा सावरली, असे दिसले नाही. त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटावी (आणि सध्याच्या सत्ताधाऱ्यांबद्दल राग यावा), अशा पद्धतीच्या बातम्या अधूनमधून वेगवेगळ्या दैनिकांमध्ये प्रसिद्ध होत असतात.

युद्ध जोरात सुरू असताना निष्काळजीपणे किंवा हेतुतः, प्रतिस्पर्ध्याच्या हाती सहजपणे कोणतेही शस्त्र पडणे, दारूगोळा हाती लागणे महाग पडणारे असते.

'NATION FIRST, PARTY NEXT, SELF LAST' शीर्षकाच्या लेखाच्या निमित्ताने अडवाणी ह्यांच्या हातून हे झाले आहे का? त्यांना ह्या लेखातून नेमके काय सांगायचे आहे? कुणाला उद्देशून त्यांनी हे सारे लिहिले आहे? हे ह्याच मुहूर्तावर लिहिण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे

खरं तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लेख ब्लॉगवर प्रसिद्ध झाल्यानंतरच्या काही तासांतच मिळाली आहेत. अडवाणी ह्यांनी या लेखातून मोदी-शहा ह्यांच्यावर तोफ डागली ह्या आणि अशा शीर्षकाच्या बातम्या विविध दैनिकांतून दुसऱ्या दिवशी प्रसिद्धही झाल्या. सामाजिक माध्यमांवरही त्याचे पडसाद उमटले.
बरं झालं... भाजपचे भीष्माचार्यच बोलले.
लालकृष्णजी अडवाणी ह्यांचा विरोधी पक्षाबाबतीत असलेला आजचा विचार नक्कीच अंधभक्तांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे...
लालकृष्ण अडवाणी - भाजपला विरोध म्हणजे देशद्रोह नाही...
अडवाणीजी हे अंधभक्तांना कोण सांगणार..???’

ह्या आणि अशा बऱ्याच प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार मंजूल यांनी त्याच दिवशी Manjul Editorial Cartoons Page ह्यावर व्यंग्यचित्र प्रसिद्ध केलं. 
व्यंग्यचित्रकार मंजूल यांच्या पानावरून साभार.

अडवाणी ह्यांनी काढलेल्या रथयात्रेमुळे
लोकशाही धोक्यात आली असे चित्राच्या पहिल्या भागातून जे ध्वनित होत आहे, त्याच्याशी व्यक्तिगत मी सहमत नाही. दुसऱ्या भागातील चित्राशीच अडवाणी ह्यांच्या ताज्या लेखाचा संदर्भ आणि तो लिहिण्यामागचा उद्देश काही प्रमाणात जोडता येईल.

हा ५१० शब्दांचा लेख म्हणजे वरकरणी पक्षकार्यकर्त्यांना एका ज्येष्ठ नेत्याने केलेला उपदेश वाटतो. कुटुंबातील वडिलधाऱ्याने पोरासोरांना सांगितलेल्या चार समजुतीच्या गोष्टी वाटतात. कसे वागावे ह्याचा दिलेला धडा वाटतो.

पण ज्या मुहूर्तावर हा सल्ला दिला किंवा उपदेश केला, त्यामुळे त्याच्या उद्देशाबद्दल शंका येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा ह्यांच्या नावाचा ह्यात चुकूनही उल्लेख नाही. सध्याच्या कोणत्याच नेत्याचा उल्लेख नाही. गोंदियात मंगळवारी झालेल्य प्रचारसभेत पंतप्रधानांनी काँग्रेसचा जाहीरनामा हा पाकिस्तानच्या कटाचाच एक भाग आहे, असा घणाघाती आरोप केला होता. ती बातमी ज्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली, त्याच दिवशी अडवाणी ब्लॉगवर लिहितात – ज्यांच्याशी राजकीय मतभेद आहेत, त्यांना आपल्या पक्षाने कधीही देशविरोधी किंवा शत्रू मानले नाही. अर्थ उघड आहे आणि लक्ष्य थेट आहे. पंतप्रधानांनी हा सल्लाच आमचा मार्गदर्शक मंत्र आहे, असे लगेच ट्वीट करीत क्षेपणास्त्राची दिशा बदलली!

अडवाणी ह्यांनी लेखात पक्षांतर्गत लोकशाहीचाही उल्लेख केला आहे. मी ह्या पक्षाच्या संस्थापकांपैकी एक आहे, ह्याचीही आठवण त्यांनी करून दिली. त्यांचे हे श्रेय कधी व कोणी नाकारले? मग त्यांना हे का सांगावे वाटले?

केंद्रातले नवे सरकार निवडण्यासाठी ११ एप्रिलपासून मतदान सुरू होईल. दीर्घ काळानंतर अडवाणी निवडणूक लढवित नाहीत. आपल्या संस्थापकाला भा. ज. प.ने थांबण्यास सांगितले आहे. त्याबद्दल अडवाणी लेखात काहीच लिहीत नाहीत. पण १९९१पासून निवडून देणाऱ्या गांधीनगरच्या जनतेचे पाठिंब्याबद्दल, तिने दाखविलेली आपुलकी आणि प्रेम ह्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच, असाच पाठिंबा पक्षाच्या नव्या उमेदवारास ह्या मतदारसंघाने द्यावा, अशी काही अपेक्षा ते व्यक्त करीत नाहीत. निवडणुकीच्या रिंगणातून आपण बाहेर का पडलो, ह्याबद्दलही ते काहीच ते लिहीत नाहीत किंवा मत व्यक्त करीत नाहीत.

अडचण ही आहे. अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना पक्षाने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या थांबण्यास सांगितले आहे; निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होण्यास भाग पाडले आहे. जोशी ह्यांनी आपली नाराजी पत्रकाद्वारे व्यक्त केली आणि नंतर इतर पक्षांच्या काही नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्याच्या बातम्या आल्या. महाजन पत्रकारांशीच बोलल्या. वयाचे पाऊण शतक पूर्ण केलेल्या नेत्यांनी निवडणुकीपासून लांब राहावे, असे पक्षाने वा पक्षाच्या नेतृत्वाने ठरविल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. अशा वेळी या दिग्गज नेत्यांनी स्वतःहून उमेदवारी नको, असे सांगणे अपेक्षित होते. त्यात त्यांची व पक्षाचीही प्रतिष्ठा कायम राहिली असती. पण संस्थापकांपैकी एक असलेल्या अडवाणी ह्यांनाच ते नको आहे, असे दिसते.

सुषमा स्वराज्य, उमा भारती ह्या तुलनेने तरुण नेत्यांनी ही निवडणूक न लढविण्याचे आधीच जाहीर केले. त्यासाठी त्यांनी दिलेली कारणे वेगळी असली, तरी त्यातून त्यांनी संघर्ष टाळण्याची भूमिका घेतली. असे अडवाणी वा जोशी ह्यांना करणे अगदीच अशक्य होते?

नियतीने किंवा काळाने अडवाणी ह्यांच्यावर अन्याय केला, हे खरेच. पण काही अन्याय कधीच दूर होणार नसतात; त्याला व्यक्ती नव्हे, तर परिस्थिती जबाबदार असते, हे त्यांना ओळखता आले नाही. कळतंय पण वळत नाही,’ अशी त्यांची परिस्थिती असावी. त्यांच्या सहा वर्षांतील वागण्या-बोलण्यावरून हेच सिद्ध होत आहे.

पंतप्रधान बनण्याची कुवत अडवाणी ह्यांच्यामध्ये निश्चित होती. तशी ती दिसून आली. अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आणून, त्यासाठी रथयात्रा काढून त्यांनी पक्षाचा मार्ग प्रशस्त केला. इतर मागासवर्गीय समाजघटकांना पक्षाबरोबर जोडण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्यामुळेच मागच्या शतकाच्या शेवटच्या दशकापासून भा. ज. प. नोंद घेण्यासारखा पक्ष बनला. मित्रपक्षांच्या मदतीने पक्षाला केंद्रातली सत्ताही मिळाली. ह्या मागे अटलबिहारी वाजपेयी ह्यांची प्रतिमा व अडवाणी ह्यांचे कष्ट होते.

भा. ज. प.चे विरोधी पक्ष, मुख्य प्रवाहातील माध्यमे - त्यांतील पत्रकार, विद्वान लेखक ह्यांनी तीन दशकांपूर्वी अडवाणी ह्यांच्यावर हिटलर असा शिक्का मारला होता. त्याचे कारण वाजपेयी ह्यांचा विरोध असतानाही अडवाणी ह्यांनी काढलेली रथयात्रा. आग्रा परिषद यशस्वी झाली असती, तर कुणी सांगावे, त्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराचे वाजपेयी-मुशर्रफ संयुक्त मानकरी ठरले असते! पण त्या बैठकीतला मसुदा अडवाणी ह्यांनी हाणून पाडला, असा गवगवा भारत-पाकिस्तान वाटाघाटीप्रेमी मंडळींनी तेव्हा केला होताच. त्याबद्दल अडवाणी ह्यांनाच त्यांनी त्या वेळी खलनायक बनविले होते!

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर काही काळातच पुरोगामी पत्रकार, विचारवंत, लेखक यांना नवीन हिटलर आढळला. कालचा हिटलर आजचा भीष्माचार्य बनला आहे.

केंद्रातील सत्ता गेल्यानंतर अडवाणी ह्यांची पीछेहाट होत राहिली. जिनांबद्दलचे वक्तव्य पॉलिटिकली करेक्ट नसल्याचे ठरविण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली. त्यातून पक्षाध्यक्षपद गमवावे लागले. ह्या परिस्थितीवर मात करून पुढे येणे त्यांना जमले नाही, हे दिसते. लोकसभेची २००९ची निवडणूक पक्षाने त्यांच्या नेतृत्वाखाली लढविली. परदेशातील काळा पैसा, हा अडवाणी ह्यांनी प्रचाराचा मुख्य मुद्दा बनविला. (काळ्या पैशाचाच मुद्दा घेऊन मोदी यांनी पक्षाला स्वच्छ बहुमत मिळवून दिले! किती काव्यगत न्याय हा!!) पण पक्षाच्या जागांमध्ये आधीच्या लोकसभेच्या तुलनेत घट झाली. त्या १३८वरून ११६ एवढ्या घसरल्या. त्याच वेळी काँग्रेसने आपल्या जागा १४५वरून २०६वर नेल्या. या दोन्ही पक्षांच्या जागांमधील फरक ९० एवढा लक्षणीय वाढला. स्वाभाविकच २०१४च्या निवडणुकीसाठी नवा चेहरा देण्याचे पक्षाने, पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ठरविले.


गुरुसमोर झुकलेला शिष्य.
(छायाचित्र 'बिझनेस टुडे'च्या सौजन्याने)
---------------
नेतृत्वासाठी नवा चेहरा म्हणून मोदी ह्यांचे नाव पुढे येताच अडवाणी ह्यांनी विरोध सुरू केला. आपल्या एके काळच्या शिष्याच्या नावाला विरोध. आपली नाराजी दाखविण्यासाठी त्यांनी सर्व पदांचा राजीनामा देऊन टाकला. त्यांचे हे अस्त्र कुचकामी ठरले. नेमकी इथेच घसरण सुरू झाली आणि ती थांबविणे त्यांना जमले नाही. भा. ज. प.ने पहिल्यांदाच एक पक्ष म्हणून लोकसभेत बहुमत पटकाविले, ते मोदी ह्यांच्या नेतृत्वाखाली. पण त्याचे श्रेय त्यांना देणे, या अभूतपूर्व यशाबद्दल मनमोकळेपणे कौतुक करणे, अडवाणी ह्यांना जमले नाही. ‘ह्या विजयात नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भा. ज. प. ह्यांचा किती वाटा आहे, हे तपासले पाहिजे. भ्रष्टाचार, चलनवाढ आणि घराणेशाही ह्याविरुद्धचा कौल आहे, असे त्यांचे तेव्हाचे उद्गार होते.

केंद्रातील सरकारला एक वर्ष पूर्ण झाले, तेव्हाही अडवाणी ह्यांना अचानक आणीबाणीची आठवण झाली. स्वपक्षाला अडचणीत आणण्याचाच हा प्रकार होता. त्यानंतर विचारवंत, पुरोगामी आणि विरोधक यांनी अघोषित आणीबाणीचा जप सुरू केला, हे विसरून चालणार नाही. यशवंत सिन्हा, अरुण शौरी, शत्रुघ्न सिन्हा ह्यांच्यासारखे नेते पंतप्रधानांना लक्ष्य करीत होते. त्यांना शत्रूच मानून वक्तव्ये करीत राहिले. अडवाणी यांनी त्यांना आपल्याच पक्षाविरुद्ध असे करू नका, आपल्या नेत्याविरुद्ध असे बोलू नका असे कधी सांगितल्याचे दिसले नाही. शत्रुघ्न सिन्हा तर कायम अडवाणी यांचे नाव घेऊनच बोलत असतात. आपल्या वागण्या-बोलण्याला त्यांचा आशीर्वाद आहे, हेच ते यातून दाखवत नव्हते का?

पुंडलिकराव दानवे, वामनराव परब ह्यांच्यासारख्या नेत्यांना वीस-पंचवीस वर्षांपूर्वी पक्षात अपमानास्पद वागणूक मिळाली. सूर्यभान वहाडणे ह्यांनाही नाराजी बोलून दाखवावी लागली. त्या वेळी अडवाणी ह्यांना पक्षाची भूमिका, त्रिसूत्री ह्याची आठवण झाली होती आणि तशी ती त्यांनी महाजन-मुंडे यांना करून दिल्याचे दिसले नाही.

नितीन गडकरी ह्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची संधी दुसऱ्यांदा मिळणार, हे जवळजवळ निश्चित झाले होते. पण ऐन वेळी माशी कुठे तरी शिंकली आणि गडकरी यांना त्यापासून लांब राहावे लागले. हे करताना कोणती पक्षांतर्गत लोकशाही पाळली गेली होती? ही खेळी खेळणाऱ्यांना अडवाणी ह्यांचा आशीर्वाद होता, ही बातमी खरी होती की खोटी?

वाजपेयी ह्यांना पहिल्या दिवसापासून डोकेदुखी ठरलेल्या राम जेठमलानी ह्यांचा मंत्रिमंडळात समावेश कुणामुळे झाला? हवाला प्रकरणात अडवाणी ह्यांची बाजू मांडण्याबद्दल जेठमलानी ह्यांनी वसूल केलेली ती फी नव्हती का? तसा स्पष्ट उल्लेख नलिनी गेरा यांनी लिहिलेल्या पुस्तकात आहे.

वाजपेयी ह्यांनी तीस-बत्तीस वर्षांपूर्वी `द संडे ऑब्झर्व्हर` या वृत्तपत्रीय साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत जाए तो जाए कहाँअसा विशाद व्यक्त केला होता. त्याच अटलजींना नंतर पंतप्रधानपद मिळाले होते. त्यांना तीन वेळा पंतप्रधानपदी बसविणारा तोच पक्ष होता, ज्यातून कुठे जावे असा प्रश्न त्यांना पडला होता. मोदी ह्यांना राजधर्माची आठवण करून देणारा नेता असे वाजपेयी ह्यांचे कौतुक करण्यात माध्यमे, बुद्धिवंत नेहमीच आघाडीवर राहिले. त्या वाजपेयी ह्यांना शेवटचा निरोप मोठ्या आदराने देण्यात आला. त्यात मोदी ह्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कोणतीही कसर बाकी ठेवली नाही, हे अडवाणी विसरले का?

लोकसभेच्या २०१४च्या निवडणुकीत अडवाणी यांच्या औरंगाबाद व शेवगाव येथील सभा दूरचित्रवाणीवर पाहिल्या. त्यांच्याकडे बोलण्यासारखा मुद्दाच नव्हता. वाजपेयी आणि मी’ ह्याच ५० वर्षांपूर्वीच्या आठवणीत ते रमल्याचे आढळले. त्यांना काही गोष्टी आठवतही नव्हत्या, असे दिसले. ते पाहून वाईट वाटलेच. असे असताना अडवाणी स्वतःहून निवृत्ती स्वीकारायला तयार नाहीत, हे दिसणारे चित्र अधिक वाईट. एका लढवय्या नेत्याची ही परिस्थिती पाहवत नाही, एवढे खरेच खरे.

कोणाला मान्य असो वा नसो; मोदी-शहा जोडगोळीने राजकारणाचे चित्र बदलून टाकले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने भा. ज. प.ची राज्य सरकारे कोणत्याही काळात नव्हती. ती किमया ह्या दोघांनी सहकाऱ्यांच्या मदतीने करून दाखविली. त्यांनी राजकारणाचा पोत व स्वरूप बदलून टाकले. तो किती स्वीकारार्ह व किती अस्वीकारार्ह, याबद्दल मतमतांतरे असणारच. एकाच वेळी सरकार आणि पक्षसंघटना बळकट करण्याच्या दृष्टीने चालू असलेले हे राजकारण आहे.

आपले कोणी (आता) ऐकत नाही,’ या विषण्णतेतून अडवाणी ह्यांची नाराजी व्यक्त होत आहे. ती स्वाभाविक म्हणायला हवी; पण त्याहून स्वाभाविक आहे ती, हे बोलून न दाखविण्याची प्रगल्भता त्यांच्याकडून दाखविली जाण्याची अपेक्षा.

अडवाणी ह्यांनी आपल्या ब्लॉगवर ह्या आधीचा लेख लिहिला होता २३ एप्रिल २०१४ रोजी. तब्बल पाच वर्षांनंतर त्यांना लिहिण्याचे सुचावे, हा योगायोग आहे.

ब्लॉगवर राजकीय विषयावरचे भाष्य अपवादानेच आहे. निवडणुकीचा प्रचार तापला असताना यंदा त्यांना असे भाष्य करावे वाटणे, बरेच सूचक आहेत.

मोदी ह्यांचे गुरू ह्यापेक्षा विरोधी पक्ष, पत्रकार, बुद्धिवादी, पुरोगामी ह्यांची भीष्माचार्य ही उपाधी अडवाणी यांनी अधिक आकर्षक वाटते आहे का? त्या प्रतिमेच्या प्रेमात ते सहा वर्षांपासून पडले आहेत की काय?

ह्या प्रश्नांची उत्तरे मिळतील किंवा मिळणारही नाहीत.

अडवाणी ह्यांनी ऐन निवडणुकीच्या-प्रचाराच्या काळात विरोधकांच्या हाती मोठा दारूगोळा दिला आहे, असे वाटण्याची शक्यता आहे.

पण हा दारूगोळा मुदतबाह्य झालेला आहे. पटो अथवा न पटो!

एवढे खरे की, ही अडवाणी नावाची एक शोकांतिका आहे... अटळ ठरलेली. त्यांनी स्वतःच लिहिलेली!

#BJP #LKAdwani #PMModi #AmitShaha #PM #Elections2019 #democracy #Vajpayee #Gandhinagar #loksabhaelections2019 #NitinGadkari #Bhishmacharya #adwaniblog
#मुदतबाह्य_दारूगोळा #अघोषित_आणीबाणी #पक्षांतर्गत_लोकशाही



चंदनापुरीत भेटलेला अजिंक्य रहाणे

  देखणा फटका... ही बॅट आता निवृत्त झाली! (छायाचित्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सौजन्याने.) .......................................... ...