सोमवार, ९ मार्च, २०२६

आगीत वितळला बर्फ

 
.......................................
इंग्लंडमधल्या उपान्त्य सामन्यासारखं अहमदाबादेत झालं नाही.
इथे आगीची आच लागताच बर्फाचं पाणी पाणी झालं.
सँटनर सामन्याआधी जे काही म्हणाला, ते फुकाचे बोल ठरले. पहिल्या सहा षट्कांमध्ये भारतीय सलामीवीरांनी पॉवर दाखवून दिली.
मग गोलंदाजांनी किवी फलंदाजांना लगाम घातला.
पाहुण्यांच्या गोलंदाजांची शरणागती आणि फलंदाजांचे साफ लोटांगण!
-------------------------------------

एक दिवशीय विश्वचषक स्पर्धेत २०१९मध्ये उपान्त्य फेरीत भारताची गाठ न्यू झीलँडशी पडली होती. कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाचं वर्णन तेव्हा आगीचा लोळ केलं गेलं. आणि केन विल्यम्सन ह्याचा संघ बर्फासारखा. त्या लढतीत भलतंच झालं. थंडगार बर्फानं आगीचा लोळ गिळून टाकला.

अहमदाबादेत मात्र फार वेगळं झालं. आगीची नुसती आच लागताच बर्फ वितळणं सुरू झालं. यजमानांनी टी20 विश्वचषक पहिल्यांदाच जिंकला. सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावणारा हा पहिलाच संघ. विश्वचषक यजमानांन धार्जिणा नाही, हा एकदिवशीय क्रिकेटमधला समज भारतानंच २०११मध्ये मोडून काढला.

पॅट कमिन्स आणि मिचेल सँटनर. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोघेही विश्वचषक पटकावण्यासाठी आले होते. प्रतिस्पर्धी अर्थातच तगडा, यजमान भारतीय संघ.

एक दिवशीय विश्वचषकाचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर २३ रोजी झाला. आधीचे सर्व सामने दिमाखात जिंकून भारतीय संघ अंतिम फेरीत आलेला. सामन्याच्या आधी झालेल्या पत्रकार बैठकीत कमिन्स म्हणाला होता, स्टेडियममधील प्रेक्षकांची बोलती आम्ही बंद करू!’

टी20 विश्वचषकाच्या अंतिम लढतीपूर्वी रविवारी पत्रकारांशी बोलताना सँटनर हेच म्हणाला. तीच भाषा. किवी कर्णधाराच्या नव्हे, तर ऑस्ट्रेलियाई कप्तानाच्या तोंडी शोभणारी.

नाणेफेक जिंकल्यावर कमिन्सने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सँटनरने आज तेच केलं. पण तो निर्णय त्याच्या सपशेल अंगलट आला.

खरे झाले होते कमिन्सचे बोल. सँटनरचं वक्तव्य फोल. नरेंद्र मोदी स्टेडियममधील अदमासे लाखभर प्रेक्षक पहिल्या षट्कापासून कल्ला करीत होते. आणि सामन्याचा शेवटचा चेंडू पडला, तेव्हा तो आवाज टिपेला गेला होता. किवीजचा आवाज बंद!

बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाचा उपान्त्य फेरीत लीलया पाडाव करणाऱ्या सँटनरच्या संघाला अंतिम लढतीत सूर सापडलाच नाही. आधी त्यांच्या गोलंदाजांनी शरणागती पत्करली. नंतर त्यांच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. अपवाद एखाद-दोन. सामन्याच्या एकतर्फी निकालात बदल घडविण्याची ताकद ह्या अपवादांमध्ये नव्हती.

उपान्त्य सामन्यात अडीचशेचा उंबरठा ओलांडल्यानंतरही भारताला विजयासाठी झुंजावं लागलं. सलग दुसऱ्या सामन्यात त्यांनी ही धावसंख्या ओलांडली. गोलंदाजीची वेळ आली तेव्हा प्रतिस्पर्ध्यांना वरचढ होऊ देण्याची चूक ह्या वेळी घडली नाही.

कोणत्याही षट्कात भारतीय संघाच्या धावसंख्येची बरोबरी साधणं पाहुण्यांना जमलं नाही. भारतीय डावात सात षट्कं अशी होती की, ज्यात दहापेक्षा कमी धावा निघाल्या. त्याच्या उलट भारतीय गोलंदाजांनी असा लगाम घातला की, ब्लॅक कॅप्स संघाला केवळ सहा षट्कांमध्ये दहापेक्षा अधिक धावा करता आल्या.

अंतिम सामन्यापूर्वी अनेक प्रश्नांची चर्चा माध्यमात, सामाजिक माध्यमावर चालू होती. सतत अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्माला वगळणार का? त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणार का?


वादळी सलामी... पॉवर-प्लेमध्ये विक्रमी धावसंख्या.
...........
ह्या सगळ्या चर्चा फोल ठरल्या. अभिषेक आणि संजू सॅमसन हीच जोडी सलामीला आल्या. मॅट हेन्री आणि ग्लेन फिलिप्स ह्यांच्या पहिल्या दोन षट्कांत डझनभरच धावा निघाल्या. त्यातही फिलिप्सनं फक्त पाच धावा दिल्या.

वादळापूर्वीची शांतता म्हणतात तशी ती होती, हे नंतरच्या चार षट्कांमध्ये दिसलं. ह्या जोडीनं समोर कोण आहे, तो काय टाकतो आहे, ह्याची पर्वा न करता ८० धावा कुटल्या. पॉवर प्लेमध्ये ९२. जलदगती गोलंदाजांना घेऊन खेळण्याची चूक किवीजना भोवली.

धावांची बरसात करणारा अभिषेक पुन्हा दिसला. त्याचं अर्धशतक १८ चेंडूंमध्येच. रचिन रवींद्रचा पहिलाच चेंडू वाईड होता. त्याची छेड काढली नसती तर... पण तसा विचार करण्याची वेळ ईशान किशननं येऊ दिली नाही. पहिल्या तिन्ही फलंदाजांनी एवढी अफाट फटकेबाजी केली की, तीनशे धावाही शक्य वाटू लागल्या होत्या.

पण १५ ते १९ ह्या पाच षट्कांमध्ये फक्त दोन चौकार आणि चार जण बाद झालेले. ही कसर शिवम दुबे ह्यानं अखेरच्या षट्कात भरून काढली. सूर्यकुमारच्या जागी त्याला बढती दिली असती तर? आधीच्या तीन षट्कांमध्ये फक्त २२ धावा देऊन तीन बळी मिळविणाऱ्या जिमी नीशम ह्याचं पृथक्करण दुबेने पार बिघडवून टाकलं.

डावातील आणि अर्षदीपसिंगच्या पहिल्या षट्कातील पाचव्यात चेंडूवर फिन ॲलन सुदैवी ठरला. शिवम दुबेच्या हातून सीमारेषेवर चेंडू सुटला. मग टिम सैफर्ट ह्यानं हार्दिक पंड्याला दोन दोन षट्कार आणि चौकार खेचले, तेव्हा जेकब बेथल ह्याचीच आठवण झाली.

किवी संघाचं हे अवसान उसनं ठरलं. त्याला सुरुवात अक्षर पटेलने केली. ॲलनचा फटका लाँग ऑनवरच्या तिलक वर्माच्या हाती जाऊन स्थिरावला. मग बुमराहला पहिल्याच चेंडूवर बळी मिळवून दिला किशनने. काय अफलातून झेल होता तो.


आणखी एक अडथळा दूर... विजयाकडे पुढचे पाऊल.
...................................
वरुण चक्रवर्ती ह्यानं अर्धशतकवीर सैफर्टचा अडथळा दूर केला, तेव्हा न्यू झीलँड संघ विजयापासून अधिक दूर गेला. सोळाव्या षट्कात बुमराहनं लागोपाठ दोन ठेवणीतले चेंडू टाकले – हळुवार यॉर्कर. परिणाम? जिमी निशम आणि मॅट हेन्री ह्यांचा त्रिफळा उडालेला! काय षट्क होतं ते...

त्याच्या आधी डॅरील मिचेल आणि सँटनर ह्यांची जोडी थोडी जमल्यासारखी वाटत होती. अकराव्या षट्कात अर्षदीपने केलेला प्रकार थोडा अतीच होता. आवेशात फेकलेला चेंडू हातावर लागल्यानं मिचेल संतापला होता. खरं तर अर्षदीपनं त्याच वेळी जाऊन मिचेलची माफी मागायला हवी होती.


चेंडू उंच उडाला;
ईशानच्या हाती स्थिरावला!
....................
अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह ह्यांनी ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली, त्याला तोडच नाही. त्यांना आज साथ लाभली ईशानच्या चपळ क्षेत्ररक्षणाची. त्यानं तीन झेल घेत मागच्या सामन्यातील अक्षरच्या कामगिरीची आठवण करून दिली. त्यामुळंच सामन्याचा मानकरी ठरण्याच्या शर्यतीत तोही आला होता.

सूर्यकुमार यादवच्या संघानं विजेत्याच्या थाटात खेळ केला – पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत. उपान्त्य सामना रडतखडत जिंकणारा हाच का तो संघ, असा प्रश्न पडावा, एवढी सफाईदार कामगिरी.

न्यू झीलँडबाबत नेमकं उलटं घडलं. एक गड्याच्या मोबदल्यात पावणेदोनशे धावा करणारा संघ १६० धावांतच ढेपाळला कसा? ह्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये न्यू झीलँडचे दोन्ही सलामीवीर आहेत. आणि गोलंदाजीत रचिन रवींद्र सातव्या क्रमांकावर. पहिल्या पाचात भारताच्या प्रत्येकी दोघांनी जागा पटकावली आहे.

ह्या विजयानं अहमदाबादेतील सव्वादोन वर्षांपूर्वीची जखम बुजवली आहे. गौतम गंभीरच्या कर्तृत्वाबद्दल उपस्थित केलेल्या सगळ्या शंका विरल्या नाहीत. पण त्यातला चेव नक्कीच कमी होईल. कर्णधार सूर्याची कामगिरी काही काळ तरी फलंदाज सूर्याचं अपयश नजरेआड करील. स्पर्धेत सर्वाधिक झेल सोडणारा संघ आपला होता. तेही आपण तूर्त विसरून जाऊ.

युद्ध हिंद महासागराच्या दाराशी आल्याच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या बातम्या ऐकायला-पाहायला मिळत आहेत. ते मळभ दूर करणारं, ती चिंता आज-उद्यापर्यंत तरी विसरायला लावणारं हे विश्वविजेतपद आहे.

.....
(छायाचित्र सौजन्य भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व दैनिक गार्डियन)
......
#टी20_विश्वचषक #भारत_विश्वविजेता #भारत_न्यूझीलँड #संजू_सॅमसन #बुमराह #अक्षर_पटेल_बापू #मिचेल_सँटनर #ईशान_किशन #सूर्यकुमार_यादव
......


1 टिप्पणी:

आगीत वितळला बर्फ

  ....................................... इंग्लंडमधल्या उपान्त्य सामन्यासारखं अहमदाबादेत झालं नाही. इथे आगीची आच लागताच बर्फाचं पाणी पाणी झा...