बुधवार, २४ जुलै, २०२४

तृप्त, कृतज्ञ आणि चिंब!



सूर्यकुमार यादव, रिंकूसिंह ह्यांच्या 360 degree फलंदाजीची आठवण करून देतो आहे वडोदऱ्यातला पाऊस.  🌧️☔️

जोर धरून आहे बुधवारी सकाळपासून. मन्ना डे ह्यांच्या आवाजातलं ‘घन घन माला…’ ऐकायला भाग पाडणाऱ्या कोसळत्या धारा.

कवाड-अंगणानं कोणत्या गवळणीला अडवलंय का माहीत नाही. पण मी राहतो आहे, तिथल्या अतिथिगृहाच्या उपाहारगृहातला बल्लवाचार्य काही उगवलाच नाही.

इथं ‘कालिंदी’ नसली तरी विश्वामित्री नदी आहे. तिच्यात म्हणे भरपूर मगरी 🐊🐊 आहेत. त्यातल्या एका मगरीने मागच्या शनिवारी एका भटक्या कुत्र्याला मोक्ष दिला! त्याला बिचाऱ्याला वाचवायला कोणी धावलं नाही. हे चित्र असल्यामुळे तिच्या काठी कोणी बासरी घुमवायला आज तरी बाहेर पडणार नाही, एवढं खरं. 

ताजा कलम - पावसाचं एक दिवसाचं भयकारी रूप संपलं आणि ह्या मगरी खरंच रस्त्यावर आल्या. त्याचे व्हिडिओ बडोद्यामध्ये फिरत आहेत.

बंद खोलीच्या बाल्कनीतून पाऊस पाहायला मजा वाटते; पण मग पोटोबाचं काय? यजमानांना तीच काळजी. ते निघाले होते हालहवाल पुसायला. मना केलं त्यांना. म्हटलं, माझ्या खाण्याची काळजी मीच घेतो. फूड डिलिव्हरीचं असता ॲप, कशाला निष्कारण डोक्याला ताप!

पटकन् ॲप उतरवलं. संकष्टी एकादशी. खिचडी शोधली. चार-पाच ठिकाणी मिळाली. मागणी नोंदवेपर्यंत किमती वाढल्या - १०० रुपयांवरून १६०-१७०. त्यातली एक खिचडी निवडली, मागणी नोंदवली. पैसे द्यावेत म्हटलं तर पुढच्या मिनिटाला ती मागणीच गायब!

पावसाचा जोर बघून बहुतेकांनी डिलिव्हरी देणं बंद केलेलं. तशा सूचना झळकू लागल्या. 😩 खाऊची दुकानं ऑनलाईनची शटर धडाधड बंद करीत होती. जी उघडी होती, त्यांनी ‘भाव खाणं’  ⬆️  चालू केलेलं. स्वाभाविक गोष्ट आहे ही.

‘उपवासाला सुट्टी!’ असं ठरवलं आणि अन्य पदार्थांचा शोध चालू केला. हुश्श मिळालं एकदाचं. किंमत झाली होती अर्थातच उम्मीदसे दुगनी! 🤭

ॲप पहिल्यांदाच वापरत असल्यानं चाचपडत होतो. एका मागणीवर अर्धवटच पत्ता गेला. येईल की नाही, काळजी वाटत होती. आपण काही चुका तर केल्या नाहीत, अशीही शंका.

एवढा पाऊस कोसळत असतानाही दोन्ही ठिकाणचे  पदार्थ वेळेत आले! 😇 शंकासुर शांत बसला!


हे घरपोहोच आलेलं जेवण...
...........................
दोघंही तरुण. पावसात त्यांना फार त्रास नको म्हणून बाहेर दरवाजात जाऊन उभा राहिलो. पहिला आला तो रजतसिंह ठाकोर!

मनापासून आभार मानल्यावर रजतसिंह म्हणाला, “सर… उसमें क्या। हमारा काम ही तो है यह..!” 

विचारलं त्याला, रेटिंग किती देऊ? “आपकी मर्जी सर। चाहे वह दे दो।” पाचपैकी सहा देऊ का, असं विचारल्यावर मनापासून हसला! 😍 गडी खूश होऊन परतला.

नंतर आला चेतनकुमार चावडा. पूर्ण पत्ता नसल्यामुळे थोडासा गोंधळात पडलेला. पण वेळेत आला.
चेतनशीही असाच संवाद. रेटिंग आणि टिप डह्यामुळे दोघंही खूश 🥰🥰 दिसले. त्यांच्या खुशीनं अर्थातच आनंद झाला.

वडोदऱ्याचे रस्ते प्रशस्त. पण पाण्याशी मैत्री करणारे. आधीचे दोन दिवस पाहिलं की, थोड्या पावसानंतरही रस्त्यांच्या कडेला पाणी साचतं. आजच्या धो धो धुमाकुळानंतर त्यांना कालिंदी किंवा विश्वामित्री नदीचंच 🏞️ रूप आलं असणार नक्की. पाहायला कोण जातंय!


टक टक. कोण आहे?
वेळेच्या मागणीनुसार चहा हजर!
.......................
अशा हवेत खास गुज्जू मसाला चहा मिळाला तर? दोन-चार कप तर सहज पोटात जाईल. अतिथिगृहाचं व्यवस्थापन बघणाऱ्या काकांना विनंती केली. ‘तुम्हा मंडळींसाठी चहा मागवाल, तेव्हा माझ्यासाठीही आणाल कपभर? आल्यावर सांगा. खाली येईन मी…’

खोलीच्या दारावर पाचच मिनिटांत टकटक. गरमागरम चाय की प्याली ☕️☕️ घेऊन काका हजर!

तिथल्या एका प्रमुख अधिकाऱ्यानं तिथल्याच दीदींच्या घरचा चहा प्यायची इच्छा व्यक्त केली. वाफाळता चहा आला. त्यावर माझं नाव कोणी, कधी, कसं लिहिलं होतं? 🤗🙏

थोडा वेळ असाच गेला.
पुन्हा दरवाजावर टकटक.
पुन्हा एकदा तेच काका.
ह्या वेळी त्यांच्या हातात पेढ्यांचा द्रोण.

कोण्या अधिकारी बाईंच्या घरी बनविलेले गायीच्या दुधाच्या खव्याचे पेढे! चांगले सात-आठ.

आधी चहा, मग पेढे खोलीवर पोहोचते झाले. भरून आलं. काकांना आग्रह करून एक पेढा खायला लावला.

हे सगळं लिहीत असताना पाऊस थांबलेला नाही. त्याचा जोर वाढलेलाच आहे.

पण मी अतिशय सुरक्षित स्थळी आहे.

आता जेवणाचे डबे उघडीन.

पण त्या आधीच तृप्त झालो आहे. भर पावसात काम चोख बजावणारी मुलं, चहाची इच्छा बोलून दाखविताच ती पूर्ण करणारे काका ह्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणं माझी आताची गरज आहे.

ह्या तिघांनी पोटाची भूक भागवलीच; पण मनाचीही भागवली!!
…….

#पाऊस #मुसळधार #वडोदरा #जेवण #चहा #delivery_boys #तृप्त_आणि_कृतज्ञ #विश्वामित्री

सोमवार, १५ जुलै, २०२४

... भेटीत तृप्तता मोठी


शेंगा, माउली आणि पेढे... ह्या समान धागा काय बरं!
---------------------------------------------
खरपूस भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा.
‘प्रसिद्ध’ विशेषण लावलेले स्वादिष्ट पेढे.
आणि
संत ज्ञानेश्वरांची सुबक मूर्ती.

... एकाच दिवशी मिळालेल्या ह्या तीन गोष्टींमध्ये समान धागा तो काय असावा? एकदम बरोबर. त्या भेट मिळालेल्या आहेत. आणखी एक गंमत म्हणजे अतिशय प्रेमपूर्वक भेट देणारा आणि ती स्वीकारणाऱ्या दोघांचं नावही एकच - सतीश. पहिला कळंबचा नि दुसरा नगरचा. त्यांच्यातले समान दुवे पुन्हा तीन - पत्रकारिता, मराठवाडा आणि 
‘लोकसत्ता’.

कळंब येथील पत्रकार सतीश टोणगे ह्याच्याशी माझी ‘ओळख’ फार वर्षांपूर्वीची. ‘लोकसत्ता-मराठवाडा वृत्तान्त’च्या छोट्या संघात कळंबचा वार्ताहर म्हणून तो साधारण २००६/
७च्या सुमारास सहभागी झाला. त्यानंतरच्या सोळा-सतरा वर्षांच्या काळात आम्ही शेकडो वेळा फोनवरून बोललो असू.

थेट भेट शनिवारी झाली. आमची पहिलीच भेट. ती धाराशिवमध्ये. कळंबपासून ६० किलोमीटर आणि नगरपासून २०० किलोमीटर दूरवर. आता फेसबुकवर जोडलो गेलो आहोत म्हणून ठीक; नसता एकमेकांना ‘तोंडदेखलं’ ओळखणंही आम्हाला मुश्कील होतं. सतीशचे मोठे भाऊ, भावजय, पुतणे, पत्नी... ह्या सर्वांची एकाहून अधिक वेळा भेट झालेली. आम्हांलाच एकमेकांना पाहण्यासाठी दीर्घ वाट पाहावी लागली!

सतीशचे दोन पुतणे प्रवरानगरच्या पब्लिक स्कूलचे विद्यार्थी. लेकरांना भेटायच्या ओढीपायी त्यांचे वडील, अर्थात सतीशचे मोठे बंधू (त्यांना मी ‘वकीलसाहेब’ म्हणत होतो; प्रत्यक्षात ते एंजिनीअर असल्याचा उलगडा काल झाला! ), त्यांची पत्नी महिन्या-दीड महिन्याने कळंबहून प्रवरानगरला जात. मग सतीश त्यांच्याबरोबर माझ्यासाठी खास गावाकडची भाजी पाठवत असे. दोन पिशव्या भरून. पालेभाज्या, फळभाज्या आणि हिर्व्यागार तिखटजाळ मिरच्या.  मला काकवी आवडते, हे कळल्यावर दोन-तीन वेळा तीही पोहोच झाली. 

‘काकवी? म्हणजे काय?... हां, हां सर... आमच्याकडे त्याला ‘पाक’ म्हणतात,’ पहिल्यांदा विचारल्यावर सतीश हसत हसत म्हणाला होता. ‘पाक होय! इकडं काय फार कुणी आवडीनं खात नाही. पाठवतो की तुम्हाला...’
कदाचित ह्या ‘पाका’मुळेच आमचे संबंध अधिक घट्ट आणि तेवढेच गोड झाले असावेत!

धाराशिवमध्ये शनिवारी दुपारी भेटल्यावर पुतण्याला समोर बोलावून सतीशनं सुरुवात केली, ‘‘सरांचा फोन यायचा. झापायला सुरुवात करायचे...’’ नशिबाला बोल लावला! म्हटलं ह्या पठ्ठ्यानं एवढ्या वर्षांतलं नेमकं तेवढंच लक्षात ठेवलेलं दिसतंय. पण पुढे मग तो म्हणाला, ‘‘त्यामुळंच मला वेगळं पाहायची-लिहायची सवय लागली.’’

कळंबच्या बाजारातून टपोरी, पांढरीशुभ्र ज्वारी घेऊन माझ्या घरी पोहोचविण्याची जबाबदारी घेतलेला त्याचा सहायकही ह्या संवादाला साक्ष आहे. ह्या मित्राचे आजोळ नगरच्या माळीवाड्यात.

कळंबसारख्या तुलनेने छोट्या गावात राहून सतीशनं उच्चशिक्षण घेतलंय. तो व्यवसाय करतो आहे. ह्या सगळ्यात तो वाचन, पत्रकारिता ह्याची विलक्षण आवड टिकवून आहे. वेगळं काही लिहिलं पाहिजे, हा त्याचा नेहमीचा आग्रह आहे.

भाऊ-भावजय प्रवरानगरला निघत, त्याच्या आदल्या दिवशी सतीश विचारून आणि त्यानुसार पिशव्या भरभरून भाज्या पाठवत राहिला. त्या भाज्यांचे पैसे किती नि कसे द्यायचे? खूप आग्रह केल्यावर सतीश एकदा म्हणाला, ‘‘त्या भाजीचे कसले पैसे हो... तुम्हाला लईच वाटत असेल तर पुस्तकं द्या पाठवून. इथं चांगली चांगली मिळत नाहीत...’’

लोकसभेच्या २००९च्या निवडणुकीत ‘लोकसत्ता-मराठवाडा वृत्तान्त’चं शेवटचं पान वेगवेगळ्या सदरांसाठी राखून ठेवलं होतं. त्यात प्रामुख्याने वाचकांचा सहभाग होता.

एके दिवशी पाहिलं तर सतीशच्या पत्नीच्या नावाने मजकूर आला होता. त्याला फोन लावला आणि विचारलं, ‘‘खरंच वहिनींनी लिहिलंय की, तूच हाणलं आहेस त्यांच्या नावानं?’’

नेहमीच आर्जवानं बोलणारा सतीश ते ऐकून अधिकच मवाळ झाला. म्हणाला, ‘‘मी कशाला लिहू हो सर तिच्या नावानं? ती चांगली शिकलेलीय... एम. एस्सी. झालेली आहे की.’’

एरवीही सतीशचं बोलणं विश्वास ठेवण्यासारखंच. त्या दिवशीच्या प्रश्नानं तो किंचित दुखावला असणार. शंका नाही.  त्या दिवशी तो मजकूर अर्थातच प्रसिद्ध झाला. वार्ताहराच्या घरचा माणूस ही जशी पात्रता ठरत नाही, तशीच ती अपात्रताही असत नाही!

जेवढा काळ वार्ताहर होता, तेवढ्या काळात सतीशनं वेगवेगळ्या विषयांवर बातम्या लिहिल्या. आपण निवडलेला विषय ‘लोकसत्ता-मराठवाडा वृत्तान्त’च्या दर्जाला साजेसा आहे का नाही, ह्याची त्याला फार काळजी असे. तशी थोडी जरी शंका त्याच्या मनात आली की, लगेच फोन करून विचारत असे. अमूक एखादी बातमी प्रसिद्ध झालीच पाहिजे, असा आग्रह त्यानं कधी धरलेला आठवत नाही. बातमी प्रसिद्ध झाली नाही, ह्याचा अर्थ आपणच कोठे तरी कमी पडलो, असं तो मानत असावा.

येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीची यात्रा म्हणजे भूम-कळंब-येरमाळा परिसरातील मोठा उत्सव. सतीशला ‘हद्दीची काळजी’ पोलिसांपेक्षा अधिक! येडेश्वरीच्या यात्रेची बातमी कळंबवरून कशी द्यावी? कारण ते आपल्या हद्दीत नाही. पण ती आपल्या वाचकांना वाचायलाही मिळालीच पाहिजे. त्यानं त्याच्या घाबरल्या स्वरातच बातमी देऊ की नको विचारलं. होकार मिळताच मग खुलून दणकेबाज बातमी दिली.

प्रसिद्ध लेखक प्राचार्य भास्कर चंदनशिव ह्यांनी एक वर्ष ‘संवाद’ सदरासाठी लेखन केलं. त्या वर्षभरातील दर आठवड्याला सदराचा लेख व्यवस्थित पोहोचतो की नाही, ह्याची काळजी सतीशनं घेतली. त्या सदराचं पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याची प्रत मला पोहोच होईल, हे आवर्जून पाहिलं.

‘लोकसत्ता’नं निर्णय घेतला आणि लहान व मध्यम तालुक्याच्या वार्ताहरांचं काम थांबविण्यात आलं. त्याचं प्रचंड दुःख झालेले वार्ताहर प्रामुख्याने दोन - सतीश टोणगे आणि लोह्याचा हरिहर धुतमल. ‘काही दोष नसतानाही आपली लिहिण्याची संधी जाते’, ह्याचं त्यांना फार वाईट वाटलेलं. ती खंत दोघांच्या बोलण्यांतून आजही जाणवते. अर्थात मी दोघांशीही नियमित संपर्कात आहेच.

... तर अशा सतीश टोणगे ह्या आर्जवी, उत्साही पत्रकारमित्राशी ओळख झाल्यापासून दीड दशकानंतंर पहिली भेट झाली. नात्यातल्या लग्नानंतर मला नगरला परत निघायचं होतं. माझी बस चुकू नये म्हणून तो बरोबर साडेबाराच्या ठोक्याला आला.

कार्यालयात सतीश मला नि मी त्याला शोधत होतो; नजरानजर झाली आणि आम्ही ओळखलं एकमेकांना! 
मग खास मऱ्हाटवाडी पद्धतीनं ‘दर्शन’ घेत त्यानं मला संकोचित आणि (शारीरिकदृष्ट्या संकुचितही!) केलं.


सतीशनं टोपी घातली, शाल पांघरली
आणि पुस्तकही भेट दिलं!

---------------------------------------------
पाच-दहा मिनिटं झाल्यावर सतीश म्हणाला, ‘‘चला सर, सत्कार करू.’’ हेही पुन्हा खास मराठवाडी अगत्य. त्यानिमित्तानं  त्याच्यासारख्या सरळ माणसानं मला टोपी घातली! मग खास शाल. कळंबचे प्रसिद्ध पेढे. आणि रंगबिरंगी चमकदार कागदात गुंडाळेली खास भेटवस्तू. मला ती आवडते की नाही, ह्याची त्याच्या मनात शंका. ती त्यानं थेट विचारलीही. सोबत दोन पुस्तकं. सतीशच्या नावावर दोन पुस्तकंही आहेत आता!

सतीशचा पुतण्या पुण्यात शिकायला आला, तेव्हा आमची भेट झाली. ती त्याच्या एका तपानंतरही लक्षात राहिली. समर्थला भेट म्हणून दिलेलं एक पुस्तक त्याला कालही आठवलं.

गप्पा संपत नव्हत्या. निघताना सतीशनं हातात आणखी एक प्लास्टिकची पिशवी दिली. ‘‘काही नाही सर... भाजलेल्या शेंगा आहेत. तुम्हाला गाडीत खायला होतील. वांगी आणावीत म्हटलं होतं...’’

भूमच्या घाटातलं पावसाळी वातावरण त्या शेंगांना न्याय देणारं होतं खरं तर. पण तुळजापूर-नगर बसमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे त्या खाता आल्या नाहीत. नगरमुक्कामी पोहोचल्यावर त्या खाल्ल्या.

टोपी, ती खास शाल, श्रीफळ, ते पेढे, ती पुस्तकं, त्या शेंगा आणि माउलींची ती मूर्ती... ह्या सगळ्यांमधलं आणखी एक आणि सर्वांत मोलाचा समान धागा सांगायचा राहिलाच की.

त्या सगळ्या गोष्टींमधून सतीशचं प्रेम एखाद्या नितळ, निखळ झऱ्यासारखं वाहत होतं. त्या साऱ्या वस्तूंमध्ये विलक्षण आपुलकीची, प्रेमाची असलेली ऊब मला आताही हे लिहिताना जाणवत आहे.
.........
#भेट #कळंब #नगर #सतीश_टोणगे #लोकसत्ता #मराठवाडा_वृत्तान्त #भुईमुगाच्या_शेंगा #प्रवरानगर #सतीश 

शुक्रवार, ५ जुलै, २०२४

नज़दीकियां फिर भी ये दूरियां...



अटल सेतू...
----------------------
महानगरी
मुंबईत होतो गुरुवारी. दीड-दोन तासांच्या कामासाठी. विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कार्यक्रम ज्या वानखेडे स्टेडियमवर होता, तिथून जेमतेम दीड-दोन किलोमीटरवर.

पुन्हा एकदा मुंबईचा धावता दौरा. काही पाहण्यासाठी वेळ न देणारा. ह्या तीन वर्षांमधला तिसरा किंवा चौथा.

ह्या वेळी अटल सेतूवरून जायचं ठऱवलं. झटक्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आलो. हा जो वेळ वाचला, तो आधी सेतू शोधण्यात गेला. ‘गूगलबाईं’चे नीट न ऐकल्याचा परिणाम!

मध्येच एकाला विचारलं. गळाभर सोन्याचे दागिने, हातात अंगठ्या, टॅटूचीही सजावट. चौकाच्या बाजूला मोटरसायकल उभी केलेली. ‘दादा’ असल्याची सारी लक्षणं व्यवस्थित दिसणारा.

त्यानं अतिशय व्यवस्थित पत्ता सांगितला. आभार मानून आम्ही निघालो आणि त्याचा फोन वाजला.  ‘बोले रे बिनडोका...’ त्याचा टपोरीपणा आवाजातून दिसला. त्यानंच फार सविस्तर आणि कळेल असा पत्ता नम्रपणे सांगितलेला अर्ध्या मिनिटांपूर्वी.

सेतू शोधताना वेळ गेला खरा; पण त्यावरून जाताना फार मस्त वाटलं. टप्प्याटप्यानं तो वर चढत जातो. आजूबाजूला पाणी, काही तरंगणाऱ्या बोटी.

मंत्रालयाजवळच काम होतं. ते संध्याकाळी चार-साडेचार वाजता संपलं. बाहेर आलो आणि पाहिलं तर सारेच रस्ते वानखेडेच्या दिशेने जात होते. पाऊसही मध्येच येत होता आणि विश्रांती घेत होता.

मंत्रालयावजळच्या रस्त्यावर खाऊगल्ली. शोधलं तर तिथे वृत्तपत्राचा एकही स्टॉल नव्हता. भरल्यापोटी वर्तमान कळू नये, ह्याची काळजी?

निळ्या दिव्याच्या गाड्या सायरन वाजवत बाहेर पडत होत्या आणि प्रवेश करीत होत्या. त्यांची गैरसोय होऊ नये हे पाहताना पोलिसांची तारांबळ उडत होती.

साडेसहा-सात वाजता मुंबई सोडू, असा कयास होता. एवढ्या गर्दीतून जायचं कसं? मोठाच प्रश्न होता. सुदैवाने तो उद्भवलाच नाही.

टीव्ही.वर त्याच बातम्या चालू होत्या. क्रिकेट, ‘टीम इंडिया’ आणि वानखेडे. मुलानंही फोनवर सांगितलं, ‘प्रचंड गर्दी आहे. कसं जाणार तुम्ही?’

इतके आहोत जवळ जरी
तितकेच राहिलो दूरवरी
... अशी खंत वाटत होती. तिथं जाण्याचं, तो सगळा उत्साह अनुभवण्याचं आणि विराट गर्दीचा एक भाग होण्याचं ‘धाडस’ नाही केलं.

काहीही म्हणा. निघायला उशीर झाला. बाकीच्यांचं काम संपत होतं म्हणून खाली रस्त्यावर येऊन उभा राहिलो. मंत्रालयासमोरच्या दुहेरी रस्त्यावरच्या एकाच बाजूला वाहनांची रांग लागलेली होती. मोजक्या दुचाकी, चारचाकी आणि ‘बेस्ट’च्या त्या नव्या-कोऱ्या दुमजली गाड्या.

पायी येणाऱ्या बहुतेकांच्या अंगावर ‘टीम इंडिया’ची ‘जर्सी’... कुणी विराटप्रेमी, कुणी रोहितचा चाहता, तर कोणी बुमराहचा. ती चाह, ते प्रेम टी-शर्टवरील क्रमांकावरून दिसणारं.

वानखेडे स्टेडियमवरून क्रिकेटप्रेमी परतत होते. मिळेल त्या मार्गाने. दोन तरुण मुलं आली आणि विचारलं, ‘काका, चर्चगेटकडे कसं जायचं?’ पाचच मिनिटांच्या अंतरावर होतं. त्यांना दिशा दाखविली.

एक मध्यमवयीन सायकलवरून राँग साईडने येत होता. वाहनांच्या गर्दीत त्याला जागा मिळाली नसावी. पुढच्या नळीवर पाच-सात वर्षांचा मुलगा आणि त्याच्या हातात गुंडाळी केलेला तिरंगी ध्वज.

अस्सल मुंबईकर वाटणारे (आणि असणारे!) दोन तरुण पदपथावर बसलेल्या शेंगदाणे विक्रेत्याजवळ थांबले. ‘चचा, सिंग दो’, असं त्यातला एक  म्हणाला. तेवढ्यात दुसरा त्याला म्हणाला, ‘थांब रे. फोन-पेनं देतो पैसे...’

हे मराठीच आहेत, हे समजून खारे दाणे घेणाऱ्याला विचारलं, ‘कसा झाला कार्यक्रम?’
‘एकदम कडक! सॉल्लिड गर्दी होती,’ तो त्याच उत्साहात म्हणाला.


डबल डेकरमधील रात्रीच्या वेळची प्रवाशांची गर्दी
------------------------------------------------------------------
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरून येणाऱ्या देखण्या, चकचकीत दुमजली बसगाड्या भरभरून येत होत्या. वरच्या मजल्यावरही प्रवासी दाटीवाटीनं उभे असल्याचे रस्त्यावरून दिसत होतं. त्या बसगाड्यांचे दिसलेले क्रमांक ११५ आणि ११५ ए.

हा सारा वीस-पंचवीस मिनिटांचा खेळ. हळू हळू गर्दी कमी होऊ लागली. चारचाकींची संख्या विरळ झाली. शेवटची बस पाहिली तर निम्मीशिम्मी रिकामीच.

एव्हाना नऊ वाजले होते. सहकारी खाली आले. गाडीत बसलो. आता गर्दीची अडचण येणार नाही, भर्रकन निघून जाऊ, असं वाटत होतं.

तो गोड गैरसमज काही मिनिटांचाच. मरीन ड्राइव्हच्या रस्त्याला लागलो आणि समुद्र दिसू लागला. माणसांचा. तिथं इतकी माणसं बसली होती की, खरा समुद्र दिसतच नव्हता. मंत्रालयाच्या मतलबी वाऱ्याकडे पाठ करून ती समुद्रावरून येणारं वारं खात होती.

रस्त्यावर चपलांचा खच पडलेला. हाजी अलीकडून येणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद. कार्यक्रम संपून किमान तासभर झालेला. पण त्या बाजूची गर्दी काही कमी झालेली नव्हती.

रस्ता दुभाजकावर पोलिसांनी अडथळे लावलेले. ते ओलांडण्याची कसरत करीत मुंबईकर ‘पब्लिक’ इकडून तिकडे जात होतं. सेल्फी काढत होतं. पोलिसांचं काम संपलेलं नव्हतंच.


मरीन ड्राइव्हवरचं रात्री उशिराचं दृश्य.
------------------------------------------------------------------
डाव्या बाजूला लोक निवांत बसले होते. त्यात आई-बाबांचं बोट धरून आलेल्या मुलांसह, मुलांचं बोट धरून आलेले थकलेले आई-बाबाही दिसत होते. सगळ्या वयोगटांतली माणसं. पण तरीही गर्दीचं सरासरी वय पस्तिशीच्या आत-बाहेरच.

ही सारी गर्दी रोहित, विराट, बुमराह, पंड्या, स्काय ह्यांचं दर्शन ‘याची देही याची डोळा’ घेण्यासाठी. त्यांनी उंचावलेला विश्वचषक डोळ्यांत साठवून घेण्यासाठी. मोबाईलच्या कॅमेऱ्यात तो क्षण पकडण्यासाठी.

सण साजरा करीत होते मुंबईकर काल संध्याकाळी. पावसाची, गर्दीची, जाताना होणाऱ्या अडचणीची... कशाचीच तमा न करता. क्रिकेट हे त्यांचं प्रेम आहे. ते काल पुन्हा दिसून आलं.

ह्या साऱ्यांनी संध्याकाळ होण्याच्या आधीच कधी तरी घर सोडलेलं. वानखेडे स्टेडियमचे दरवाजे उघडण्याची वाट पाहताना त्यांना सूर्यनारायणानं चटका दिलेला. मग त्यावर दिलासा म्हणून भरल्या आभाळानं थोडं भिजवलेलं. कार्यक्रम संपल्यावर बऱ्याच उशिरा ते घरी परतणार होते. स्वतःचं वाहन असलेले थोडेच. बाकी सारा जनांचा प्रवाहो चर्चगेटकडे चाललेला.

जवळपास दोन-तीन किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना क्रिकेटवेडं पब्लिक दिसत होतं.
त्या गर्दीचा भाग होता आलं नाही, ह्याची सल मनात घेऊनच परतीचा प्रवास चालू झाला...
-------------

#मुंबई #अटल_सेतू #वानखेडे_स्टेडियम #टी_20 #क्रिकेट #विश्वविजेते #क्रिकेट_उत्सव #क्रिकेटप्रेमी #गर्दी

तृप्त, कृतज्ञ आणि चिंब!

सूर्यकुमार यादव, रिंकूसिंह ह्यांच्या 360 degree फलंदाजीची आठवण करून देतो आहे वडोदऱ्यातला पाऊस.  🌧️☔️ जोर धरून आहे बुधवारी सकाळपासून. मन्ना ...