मुख्य सामग्रीवर वगळा

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...

पुस्तकांची गोष्ट – जागतिक पुस्तक दिन मराठी कविता


हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झाल्यामुळे तेव्हा ती ब्लॉगवर घेतली नाही किंवा फेसबुकवरही टाकली नाही. व्हॉट्सॲपच्या एका गटावर मध्यंतरी प्रा. डॉ. निधी पटवर्धन ह्यांनी विचारलं होतं - गटातील सदस्यांपैकी कोणी पुस्तकांवर लिहिलेली कविता आहे का? किंवा अशी (इतर कोणाची) कविता माहीत आहे का?

एकदम आठवलं - आपण लिहिलेलं आहे खरं. पाठवून देऊ. डॉ. पटवर्धन ह्यांना ती कविता पाठवून दिली. मग त्यांनी कळवलं की, रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या कला शाखेच्या मराठी विभागाच्या अभ्यासक्रमासाठी दहा कविता निवडल्या आहेत. त्यात ही एक! कम्प्युटरमध्ये बंदिस्त असलेल्या ह्या रचनेचं भाग्य असं अचानक उजळलं. जागतिक पुस्तकदिनाचा मुहूर्त साधून ती आता इथे देत आहे.

--------

पुस्तकांचाही दिवस
साजरा केला जातो
वर्षातून एकदा कसाबसा
बेंदुराला नि श्रावणी पोळ्याला
‘सण एक दिन...’
कविता आठवावी अगदी तसा


जागतिक ग्रंथ दिनानिमित्त
उजाडतं भाग्य पुस्तकांचं
उघडली जातात कपाटाची दारे
त्यातून निघतात पुस्तकांचे भारे
मिळते मोकळी हवा खायला
दाटीवाटीच्या इमारतींना चुकवून
आलेल्या प्रकाशाचा कवडसाही पाहायला
महिनोन् महिने त्यांनी वागवलेली
धूळ फडक्याने झटकली जाते
फोटोसाठी छान सजवले जाते

लिहिणारे, वाचणारे,
न वाचता लिहिणारे,
न लिहिता वाचणारे,
उत्साहाने सोशल मीडियावर
पुस्तकांवर लिहितात-बोलतात
मुहूर्त साधून केलेल्या खरेदीची
यादी आणि फोटो टाकतात
थोडं पुस्तकांचं, वाचनप्रेमाचं जादा
प्रदर्शन आयोजित करतात
अंगठे उठतात, बदाम मिळतात
सोशल मीडियाच्या चावडीवरचे
वाहवा वाचनवेड्यांची करतात

‘वाचन कमी झालंय हल्ली’
तबकडी जुनीपुराणी झिजते
दिवसभर तीच वाजत राहते
‘वाचायला वेळच कुठंय आता?’
कुणी तरी सहज विचारतो
मोबाईलमधून क्षणभरासाठी
का होईना तोंड वर काढतो
















पुस्तकं काय करतात?
पुस्तकं कुठं दिसतात?
पुस्तकं कुठं वसतात?
प्रशस्त दिवाणखान्याची
शोभा वाढवतात
कुटुंब ‘वेल रेड’ असल्याची
ठळक जाहिरात करतात

खरं तर ती तशी कुठंही राहतात
खास बनवलेल्या कपाटात
शिळ्या वर्तमानपत्रांच्या रद्दीत
टेबल, खुर्ची, टिपॉय, माळ्यावर
आणि धान्याच्या कोठीतही क्वचित,
नांदत असतात न कुरकुरता
राहण्यापुरती जागा आहे ना
असं परस्परांना समजावतात

थोड्याशा जागेत दाटीवाटीने
चुरगाळलेल्या पानांच्या
दुखावलेल्या अवयवांसह
नशिबाचे भोग भोगत
आणि लेखकाला बोल लावत
जगतात बिचारी पुस्तकं

पुस्तकं कुठं मिळतात?
आडबाजूच्या दुकानांत
गाईड-वह्यांच्या पेठांत
रद्दीच्या दुकानांत
रस्त्याकडेच्या पथाऱ्यांवर
झगमगत्या मॉलमध्ये
प्रदर्शनांच्या हॉलमध्ये

सुतळीने करकचून बांधलेल्या
रद्दीच्या गठ्ठ्यांमध्ये
बिचारी पुस्तकं
स्वस्तात दिसतात
कारण ती सहसा कुणी
वाचलेली नसतात

...हल्ली म्हणे पुस्तकं
किलोवरही विकली जातात
भेंडी, बटाटे, कांदे, वांगी
भाज्यांसारखं तागडीत तोलतात
पाणी शिंपडून ती ताजी टवटवीत
केलेली दिसत नाहीत, एवढंच!
चार-पाच किलोंचे ठोकळे
विकत घेतल्यावर
चाळीस-पन्नास पानांचं
पुस्तक तसंच देत नाही
विक्रेता, हेही खरं तेवढंच!

दिवस संपताच कपाटात
बंद केली जातात पुस्तकं
संपलेली असते पॅरोलची मुदत
बंदिस्त कप्प्यात, माळ्यावर
दिवसभर तिष्ठलेली वाळवी
वाटत पाहतच असते त्यांची
तिच्या भरण-पोषणाची
जबाबदारी पुन्हा वर्षभराची

पुस्तकं मनाची मशागत
करतात, हे निव्वळ ‘मिथ’
पिढ्यांनी पुढच्या पिढ्यांकडे
परंपरेनं सोपवलेलं सफेद झूठ

कोणे एके काळी
पुस्तकांतून गोष्ट
सांगितली जायची
मुला-नातवंडांना,
आजूबाजूच्या मुलांना
आणि विद्यार्थ्यांना











उद्या बहुतेक
पुस्तकांची गोष्ट
सांगितली जाईल
कोणी ऐकायला
असलंच तर...
त्यासाठी शोधावं लागेल
निमित्त जागतिक ग्रंथदिनाचं.
.........
© सतीश स. कुलकर्णी

sats.coool@gmail.com

...........

#पुस्तके #जागतिक_पुस्तकदिन #पुस्तकांची_गोष्ट #लेखक

...........

ताजा कलम - ह्यातील खालची तीन चित्रे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने काढलेली आहेत.

(सौजन्य - www.bing.com)

टिप्पण्या

  1. कविता फार सुंदर. मनाला भिडणारी. "चुरगाळलेल्या पानांच्या
    दुखावलेल्या अवयवांसह", "संपलेली असते पॅरोलची मुदत" ह्या ओळी आवडल्या. पण छापील पुस्तकं 'बिचारी' हेच खरं. त्यांची गत आता "लगदा असशी लगद्यास मिळशी" अशीच होणार आहे. कालाय तस्मै नमः.

    उत्तर द्याहटवा
  2. अंतर्मुख करणारा विचार मांडला आहे. खूप सुंदर.

    उत्तर द्याहटवा
  3. खूप सुंदर आणि वास्तव रेखाटणारी कविता

    उत्तर द्याहटवा
  4. कविता आवडली, तरीही टी शिकण्यासाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात नाव नोंदवीत आहे. आंब्याचा सीझन असल्याने आंबे खाता खाता कविताही शिकता येईल.
    अ.पां.देशपांडे / ९९६७८४१२९६

    उत्तर द्याहटवा
  5. हल्लीच्या पिढीचं पुस्तक वाचनाचं वेड कमी होत चाललंय... या पार्श्वभूमीवर ही कविता विचार करायला लावणारी आहे... स्वतःला अंतर्मुख करायला लावणारी तर निश्चितच आहे... सुंदर कविता...

    उत्तर द्याहटवा
  6. कविता खूपच प्रभावी आहे. कवितेतील भावना थेट हृदयात शिरते.
    जागतिक पुस्तक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...
    - पुंडलिक आंबटकर

    उत्तर द्याहटवा
  7. खूप छान कविता.
    आज-कालचे कटू सत्य.
    सौ. स्वाती वर्तक, खार (प.), मुंबई

    उत्तर द्याहटवा
  8. खरी खुरी कविता.. खूप छान मांडणी !!

    उत्तर द्याहटवा
  9. पुस्तकं उपेक्षित झाली त्यांचं सुंदर मनोगत आपण आवर्जून कविता पाठवलीत आभार.
    - वासुदेव कुलकर्णी

    उत्तर द्याहटवा
  10. कविता वाचली... अगदी वास्तव आहे!!
    - छाया बेळे

    उत्तर द्याहटवा
  11. वास्तवदर्शी काव्यरचना!

    पुस्तक म्हणजे चालते-बोलते विद्यापीठ म्हणतो आपण. पुस्तके वाचल्याने वैचारिक विकास होतो, ज्ञानात भर पडते, जीवन अधिक समृद्ध होत जाते. परंतु ही आदर्श जीवनमूल्ये हल्ली बदललेली पाहायला मिळतात. खंत वाटते ती त्याचीच.
    - सौ. रश्मी काळे, नगर

    उत्तर द्याहटवा
  12. छान आहे कविता. वास्तव दर्शन घडवणारी.

    - मीना वैशंपायन

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘ळ’च्या अढळपदासाठी

  रचना - शब्दकुल ‘ ध ’ चा ‘ मा ’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं ! इतिहासाचा हा धडा आपण शिकलो, पण गिरवला नाही, असंच दिसत होतं. वर्तमानात ‘ ळ ’ चा ‘ ल ’ केला जात होता आणि ‘ च ल ता है... ’ अशी आपली त्याबाबतची वृत्ती होती. लोकमान्यांचं टिळक आडनाव हिंदीत बनायचं ‘ ति ल क ’ . बाळासाहेब ठाकरे ह्यांचं नाव हिंदी माध्यमांतून व्हायचं ‘ बाला साहब ’ . नाशिक जिल्ह्यात आहे मालेगाव आणि पुणे जिल्ह्यातलं ते माळेगाव. पण हिंदीत गेली की, दोन्ही गावं एक होतात. बातमी नेमकी कुठली ते कळायला मार्ग नाही. लोणावळे, जळगाव, भुसावळ, करमाळा आदी स्थाननामांतील आणि काळे, साळी, माळी, जगदाळे, बाळू आदी व्यक्तिनामांतील ‘ ळ ’ जाऊन तिथं ‘ ल ’ कसा येतो ? हिंदीमध्ये ‘ ळ ’ च्या जागी ‘ ल ’ का, हा प्रश्न पुण्यातील आयुर्विमा अधिकारी प्रकाश निर्मळ ह्यांना छळत होता. हा अक्षरबदल खटकत होता. त्यांनी दाद मागायचं ठरवलं. अक्षरांतर होऊ नये, ह्यासाठी २०१८ पासून प्रयत्न सुरू केले. ' ळ ' ऐवजी ' ल ' चा वापर चुकीचा आहे. हिंदीमध्ये ' ळ ' च वा...

द. मा. - पाहिलेले, ऐकलेले

'परमेश्वर प्रसन्न झाला, तर पुढचा जन्म मी लेखकाचाच मागीन! उत्तम लेखक होणे, हीच माझी महत्त्वाकांक्षा होती. माझ्या भाषेतील हजारो, लाखो लोकांच्या जीवनात माझ्या लेखनामुळे आनंद निर्माण करावा, हीच माझी इच्छा आहे...' ...आपल्या हजारो, लाखो चाहत्यांना हळहळ करायला लावीत, ह्या जगाचा काल निरोप घेतलेल्या प्रसिद्ध लेखक प्रा. द. मा. मिरासदार ह्यांचे हे म्हणणे आहे. नगरमध्ये २४ वर्षांपूर्वी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांची मुलाखत झाली. तिचा समारोप करताना त्यांनी ही इच्छा बोलून दाखविली. द. मा. मिरासदार आपल्या अनेकांचे आवडते लेखक. लहानपणी कधी तरी त्यांच्या कथांची ओळख झाली. बहुतेक जुन्या मॅट्रिकच्या (अकरावी) मराठी पाठ्यपुस्तकात त्यांची नागू गवळीची कथा होती. मी ऐकलेली-वाचलेली त्यांची ती पहिली कथा. आपल्या म्हशींवर लेकरांप्रमाणे प्रेम करणारा, कुंभकर्णी झोपेतच दोन-तीन चोरांना लोळवणारा नागू फार आवडला. मग संधी मिळेल, तेव्हा करमाळ्याच्या ज्ञानेश्वर वाचनमंदिरातून त्यांची पुस्तके आणून वाचू लागलो. भोकरवाडी आणि नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, आनशी, महादा, ज्ञानू वाघमोडे ह्य...

शहाणपणाची कवाडे उघडा

  अजून किती दिवस पाहायला मिळणार नाही हे दृश्य ? ( छायाचित्र सौजन्य : स्क्रोल / एचटी) ....................... ' T he only thing you absolutely have to know is the location of the library. ' अल्बर्ट आईनस्टाईन ह्यांचं हे प्रसिद्ध वाक्य आहे. ' सर्च एंजिन ' वर ' बुक कोट्स ' टाकलं की, पाच-पन्नास संकेतस्थळं सेकंदामध्ये त्यांचं हे उद्धृत ठळकपणे दाखवून देतात. माझ्या घरापासून वाचनालय जवळ आहे. तिथपर्यंत चालत जायला १०-१२ मिनिटं पुरेशी होतात. पण कित्येक दिवसांत ; नेमकं सांगायचं, तर २२ मार्चपासून तिथं जाताच आलं नाही. सहा महिने होऊन गेले त्याला. त्याच्या आधी १५ दिवस आणलेली अनुवादित कादंबरी पडून आहे. तिची पारायणंही शक्य होती. ' नगर वाचनालय ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा वाचनालयाचं स्थळ माझ्यासह सगळ्याच सभासदांना अगदी चांगलं माहीत आहे. पण आमच्यासारख्या सामान्यांच्या जगण्यात त्याचं नेमकं ' स्थान ' काय आहे (किंवा काय असावं!), हे प्रशासनाला किंवा राज्यकर्त्यांना उमगलेलं नाही. त्यामुळंच लाखभर पुस्तकं असलेल्या ह्या सार्वजनिक वाचनालयाचं दार अजून बंदच आ...