 |
लेखक चुलत्याचा सत्कार लेखक पुतण्याकडून... निमित्त पद्मश्री जाहीर झाल्याचे! डॉ. प्रभाकर मांडे आणि डॉ. अरुण मांडे. |
त्यांच्या सख्ख्या पुतण्यानं ठरवलं होतं, त्या प्रमाणे सकाळीच त्यांच्या घरी गेलो. अकरा वाजत आले होते. घरात वर्दळ नव्हती. मुलगा, सून आणि स्वतः ते. छान प्रशस्त घर. बाजूला एक-दोन पुष्पगुच्छ. टी-पॉयवर काही पुस्तकं. वाटलं त्यांचीच असावीत. नव्हती. लेखकाचं नाव वेगळं दिसलं. भेटीदाखल आलेली असावीत. ताजी ताजी.
निवांत होते ते. पुतण्याच सोबत असल्यानं मी ओळख करून देण्याचा प्रश्न आला नाही. त्यांनीच ओळख करून दिली.
चेहऱ्यावरून, तब्येतीवरून वय जाणवत होतंच. चालण्यासाठी वॉकर दिसत होता ठेवलेला. नव्वदीच्या घरात असावेत असं वाटलं. अंदाज बरोबर ठरला. महिनाभरापूर्वी त्यांनी ८९ वर्षं पूर्ण केलेली. सुनेच्या आणि मुलाच्या मोबाईलवर त्यांच्यासाठी फोन येत होते.
वयोमानानुसार त्यांची ऐकण्याची शक्ती कमी झालेली. म्हणून मग फोन स्पीकरवर ठेवलेला - हँड्स फ्री. तरीही त्यांना पुरेसं स्पष्ट ऐकू येत नसावं. पण फोन कशासाठी येत आहेत, ह्याची पूर्ण कल्पना त्यांना होतीच. आपलं अभिनंदन करण्यासाठीच हा संवाद आहे, हे जाणून ते पहिल्याच वाक्यात तिकडून बोलणाऱ्याचे आभार मानत होते, ‘धन्यवाद’ म्हणत होते.
... पद्मपुरस्कारांची यादी प्रथेप्रमाणं प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या रात्री जाहीर झाली. त्यातलं एक नाव होतं - प्रभाकर भानुदास मांडे. त्यांच्याच घरातलं गुरुवार सकाळचं हे चित्र.
पुरस्काराच्या मानकऱ्यांची केंद्र सरकारकडून जी यादी प्रसिद्ध झाली, त्यात डॉ. मांडे ह्यांच्या नावापुढं ‘शिक्षण आणि साहित्य’ असा उल्लेख आहे. ह्या दोन क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांची निवड झाली. खरं तर ‘साहित्य’ हा उल्लेख तसा फार ढोबळ म्हणावा लागेल. डॉ. मांडे ह्यांचा प्रांत आहे, लोकसाहित्य-लोकसंस्कृती. गावगाड्याबाहेरचं जगणं. त्यात ते अर्धशतकाहून अधिक काळ काम करीत आहेत.
पुण्यातून काल रात्री उशिरा पत्रकारितेतल्या जुन्या सहकाऱ्यानं संपर्क साधला आणि विचारलं ‘प्रभाकर मांडे म्हणजे तुमच्या नगरचेच ना?’ ते औरंगाबादला असतात, असं सांगितलं खरं आणि मग एकदम आठवलं - प्रसिद्ध लेखक-अनुवादक डॉ. अरुण मांडे त्यांचे पुतणे. पुतण्याच्या अमृतमहोत्सवासाठी काका आले होते. डॉक्टरांना ही बातमी द्यावी आणि आपण दिलेल्या माहितीला दुजोरा घ्यावा असं वाटलं. डॉ. अरुण ह्यांना फोन केला, तेव्हा ते म्हणाले, ‘‘काका आता इथंच (नगरला) स्थायिक झाले आहेत.’’
नगर की औरंगाबाद? हा संभ्रम माझा एकट्याचाच नव्हता. तसा तो प्रशासकीय यंत्रणेलाही पडलेला होता. तो वेळीच दूर झाला असता, तर डॉ. प्रभाकर मांडे हे नाव पद्म-पुरस्काराच्या यादीत कदाचित दोन किंवा तीन वर्षांपूर्वीच आलं असतं. तीन-चार वर्षांपूर्वी त्यांची माहिती घेण्यासाठी यंत्रणेनं औरंगाबादेत चौकशी केली, तेव्हा ते नगरमध्ये होते. नंतर उलटा प्रकार घडला. तर ते असो!
म्हणजे पद्म पुरस्कारांच्या नगरच्या यादीत आता भर पडली. डॉ. मांडे ह्यांचं अभिनंदन करावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत म्हणून सकाळीच डॉ. अरुण ह्यांच्यासोबत घर गाठलं. आधी म्हटलं तसं आम्ही गेलो तेव्हा कुटुंबातले हे तीन सदस्यच होते. पुतण्यानं ऊबदार शाल देऊन काकांचा सत्कार केला. मग खाऊचा पुडाही दिला, तेव्हा नव्वदीतले काका निर्व्याज हसले.
बातमी कधी कळाली?
पुरस्कार जाहीर झाल्यावर काय वाटलं? हा फार उगाळला जाणारा प्रश्न. तो आम्ही काही विचारला नाही. नंतर तो ऐकायला मिळालाच. आमचा प्रश्न होता - ‘बातमी कधी कळाली?’ बुधवारी सकाळनंतर कधी तरी एक फोन आला. अनोळखी नंबर असला, तर सहज फोन घ्यायचा नाही, हा सर्वसाधारण रिवाज. त्यानुसार त्यांनी तो फोन घेतला नाही. मग दीड-दोन तासांनंतर ‘कुणी फोन केला, हे बघू तर...’ म्हणून कुटुंबीयांनी संपर्क साधला. कळलं की, देशाच्या राजधानीतून संपर्क साधला गेलाय. ‘पुरस्कार जाहीर झाला, तर तुम्ही तो स्वीकारणार ना?’, ह्याची खातरजमा करून घेण्यासाठी तो फोन होता.
‘अधिकृतरीत्या जाहीर झाल्याशिवाय ही बातमी तुम्ही कुणाला सांगायची नाही,’ असं संबंधित यंत्रणेतील व्यक्तीनं पुनःपुन्हा बजावून सांगितलं. आता उत्सुकता वाढलेलीच. अधिकृत घोषणेसाठी किती वेळ वाट पाहायची? संध्याकाळी टीव्ही. सुरू केला. हे चॅनेल, ते चॅनेल. बातम्यांमध्ये आधी यादी आली, तीत जेमतेम पंचवीस-एक नावं होती. त्यात महाराष्ट्रातलं एकच. मग रात्री नऊ-सव्वानऊ वाजता आली एकदाची बातमी - प्रभाकर भानुदास मांडे ह्यांना शिक्षण व साहित्य क्षेत्रातील कामाबद्दल पद्मश्री जाहीर!
 |
अभिनंदनाचे फोन घेतलेच पाहिजेत ना! |
आता फोन सुरू झाले. रात्री दहानंतर. त्यातलाच एक माझा होता. ज्यांना माहिती देण्यासाठी इथं फोन केला होता, त्यांच्या वर्तमानपत्राच्या वेगवेगळ्या कार्यालयांतून रात्रीतून तीन-चार जणांनी संपर्क साधला. एका टीव्ही. वाहिनीच्या प्रतिनिधीनं तेवढ्या रात्री घरी येऊन त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.
वृत्तपत्रात बातमी आल्यावर सकाळपासून फोनच फोन सुरू झाले. मराठवाड्यातून, नगरमधून, बाकी महाराष्ट्रातून. फोन सतत वाजत होता. एकदा सूनबाईंचा, लगेच चिरंजिवांचा. डॉ. मांडे सर बोलत होते. अभिनंदनाचा स्वीकार करून त्यांची गाडी दुसऱ्या विषयाकडे जाई...
‘अरे हो! तुमचं अभिनंदन. तुम्ही आता प्रोफेसर झालात.’
‘तुमची किती पुस्तकं प्रसिद्ध झालीत? आता हे नवीन कधी येतंय?’
हा आणि अशा पद्धतीचा संवाद चालू होता. ते औरंगाबादमध्ये जिथं राहात, त्या कॉलनीतील शेजाऱ्यांनी संपर्क साधला. त्यांना वाटणारा आनंद फोनच्या स्पीकरमधून आमच्यापर्यंत पाझरत होता. ते म्हणाले, ‘आम्हालाच ‘पद्मश्री’ मिळालीय असं वाटतंय बघा सर.’ नंतर घरातल्या बाई बोलल्या. म्हणाल्या, ‘आमच्या शेजारी मांडे सर राहत होते, हे सांगताना किती अभिमान वाटतोय म्हणून सांगू...’
श्रीमंती आणि ऐश्वर्य
कुठून कुठून फोन आले, ह्याचं अप्रुप मांडे सरांनाही स्वाभाविकपणे वाटत होतं. ‘अहो, पिशोरला मी शिक्षक होतो. ही गोष्ट १९५५-५६मधली. तेव्हाच्या पाचवी-सहावीतल्या विद्यार्थ्यांनी आठवणीनं फोन करून अभिनंदन केलं. परभणीहूनही फोन आले.’ अशी फोन करणाऱ्यांची माहिती सांगतानाच सर म्हणाले, ‘‘शिक्षकाच्या जीवनातली ही श्रीमंती, हे ऐश्वर्य आहे. इतर कुठल्या क्षेत्रात ते मिळत नाही हो!’’
तेवढ्यात टीव्ही. वाहिन्यांचे तीन-चार प्रतिनिधी येऊन धडकले. त्यांनी तो नेहमीचा प्रश्न विचारलाच की. ‘पुरस्कार जाहीर झाल्यावर तुम्हाला काय वाटलं?’ त्यांनाही आणि त्याच्या आधीही फोनवर बोलताना सर म्हणालेच होते, ‘आनंद वाटलाच, त्या पेक्षाही जास्त समाधान वाटतं. बरं वाटलं. आपल्या हातून घडलं ते कुठं तरी रुजू झालं. त्याचीच ही पावती. एकूण कामाचीच दखल घेतली गेली. समाजाने नेहमीच चांगली दखल घेतली.’
मग ह्या बोलण्यात चुकून आत्मप्रौढी वगैरे आली की काय, असं बहुतेक सरांना वाटतं. ते म्हणाले, ‘‘हे मी केलं नाही. माझ्या हातून घडलं! त्याच्यासाठी अनेकांचं सहकार्य लाभलं.’’
 |
वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना बाईट... प्रत्येकाला स्वतंत्र. |
वाहिन्यांच्या प्रतिनिधींना स्वतंत्र बाईट हवे होते. त्यातल्या लैलेश बारगजे ह्याला थोडा अधिक वेळ, छोट्याशा मुलाखतीएवढा वेळ हवा होता. वाहिन्यांच्या प्रतिनिधींना अडचण नको म्हणून आम्ही निरोप घ्यायचं म्हटलं. पण आम्ही तिथं असणं त्यांना आवश्यक वाटत होतं. कारण मग सर थोडे मोकळेपणाने बोलले असते.
त्या अर्ध्या तासात डॉ. मांडे सर चौघांशी स्वतंत्रपणे बोलले. त्या प्रत्येक बाईटमध्ये वेगळेपण होतं. उपचार म्हणून ते बोलले नाहीत. भरभरून आणि खुलून. शब्द वेगळे होते, प्रत्येक वेळी; त्या साऱ्याचा आशय मात्र एकच होता.
प्रेरणा डॉ. आंबेडकर ह्यांची
‘माझ्या कामाचं खरं श्रेय जातं डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना. त्यांनीच प्रेरणा दिली, हे आवर्जून सांगावं वाटतं,’ असं म्हणून डॉ. मांडे सर तो जवळपास सत्तर-बाहत्तर वर्षांपूर्वीचा प्रसंग काल-परवा घडल्यासारखा सांगतात. ते औरंगाबादच्या (मग कधी तरी त्यांच्या तोंडून ‘संभाजीनगर’ असाही उल्लेख येतो!) मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी. बी. ए.चे विद्यार्थी. प्राचार्य होते म. भि. चिटणीस. मांडे सरांनी लिहिलेला निबंध बऱ्यापैकी मोठा झालेला. डॉ. बाबासाहेब त्या वेळी औरंगाबाद मुक्कामीच होते. त्यांना प्राचार्य चिटणीस ह्यांनी तो निबंध दाखवला. कारण छापण्यासाठी त्यांची परवानगी आवश्यक होते. सर म्हणाले, ‘‘बाबासाहेबांनी मला शेजारी बसवलं. पाठीवर हात ठेवला. प्राचार्यांना निबंधासाठी संमती दिली. ‘असंच समाजाचं काम करीत राहा,’ असं मला सांगितलं. वंचितांच्या विषयाकडं त्यांनी माझं लक्ष वळवलं.’’
डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेल्या ह्या विषयाकडे वळावं, असं अधिक असोशीनं वाटलं ते शिक्षक म्हणून भूमिका स्वीकारल्यावर. विद्यार्थ्यांच्या कथा आणि अनुभव ऐकून सरांचं लक्ष लोकसंस्कृतीच्या अभ्यासाकडे गेलं. गावगाड्याबाहेरचा समाज हा त्यांच्या कुतुहलाचा, अभ्यासाचा विषय बनला. त्यांच्याबद्दल मनापासून बोलताना सर म्हणाले, ‘‘गावगाड्यात वतनं होती, बलुतेदारी होती. गावगाड्याबाहेरच्या ह्या भटक्यांना वतन नव्हतं की जमीन. पण त्यांनी स्वतःची संरचना तयार केली.’’
डॉ. मांडे सरांचं बव्हंशी लेखन लोकसाहित्य, लोकसंस्कृतीबद्दल आहे. औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात (आता डॉ. बाबासाहेब मराठवाडा आंबेडकर विद्यापीठ) १९७३मध्ये ‘लोकसाहित्य’ विषय सुरू करण्यात आला. थोड्याच काळात महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच विद्यापीठांमध्ये तो सुरू झाला. अभ्यासक्रम आहे म्हटल्यावर त्यासाठी संदर्भ ग्रंथ पाहिजेत ना. ‘लोकसाहित्याचे स्वरूप’ आणि ‘लोकसाहित्याचे अंतःप्रवाह’ हे ग्रंथ त्यासाठी सिद्ध करण्यात आले. सर म्हणतात, ‘त्यानंतर मी लिहीतच राहिलो. थांबलोच नाही.’ लोकसंस्कृती हा उपेक्षित विषय होता. त्याच्या अभ्यासामुळं सरांना भटक्या-विमुक्तांचं विलक्षण नवं जग त्यांना पाहायला मिळालं.
 |
पद्मश्री म्हणजे सजग समाजाने घेतलेली दखल! |
ग्रामीण समाज, तिथल्या लोकांचं जगणं ह्याबद्दल डॉ. मांडे सरांना मनापासून आपुलकी आहे. ते म्हणाले, ‘‘ग्रामीण जीवन समाजाचा मुख्य प्रवाह आहे. आपली बलस्थानं, गाभा तिथंच आहे. त्यांच्यामुळे आपण (भारतीय समाज म्हणून) टिकलो. शेतकरी आणि बलुतेदार ह्यांनी आपली परंपरा जपली. आपल्या परंपरेला नावं ठेवणारा एक अभिजन वर्ग तयार झाला आहे. समाजजीवनाशी नाळ तुटलेला! खरं तर समाजजीवन फार गुंतागुंतीचं आहे. जितकं खोल जाऊ, तितकं कळत जातं. एक आयुष्य पुरेसं नाही, हे समजून घ्यायला. ह्यात अनेकांनी काम करायला हवं. तसे लोक पुढे येत आहेत, ही आनंदाचीच गोष्ट होय.’’
जमीन सुपीक आहे...
पद्मपुरस्कार म्हणजे समाजाने घेतलेली दखल आहे, अशी सरांची भावना आहे. त्याबद्दलची कृतज्ञ भावना व्यक्त करताना ते म्हणाले, ‘‘समाज अजून जिवंत आहे, सजग आहे. म्हणून तर अशी दखल घेतली गेली. पेरलेलं उगवतं. ही जमीन सुपीक असल्याचंच हे लक्षण. पेरलेलं उगवून आल्यावर शेतकऱ्याला जसा आनंद होतो, अगदी तसाच मला झाला आहे!’’
टीव्ही. वाहिन्यांच्या प्रतिनिधींना वेगवेगळे चार बाईट देऊनही मांडे सर थकले नव्हते. त्यांची स्मरणशक्ती तल्लख असल्याचं तासाभरात वारंवार जाणवलं. पंढरपूरच्या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी विदूषी दुर्गाबाई भागवत होत्या. व्याख्यान ऐकल्यावर त्या कशा सद्गदित झाल्या. त्यानंतर ‘सोबत’मध्ये संपादक ग. वा. बेहेरे ह्यांनी ‘पाषाणाला पाझर फुटला’ शीर्षकाचा पानभर लेख कसा प्रसिद्ध केला, हे सारं त्यांना स्पष्ट आठवतं.
पद्मपुरस्कारांचे मानकरी ‘लोकांमधून’ निवडून काढले जातात, ह्याचं अजून एक उदाहरण मांडे सरांच्या रूपाने समोर दिसतं.
---------------
#पद्म_पुरस्कार #प्रभाकर_मांडे #पद्मश्री #लोकसंस्कृती #लोकसाहित्य #बाबासाहेब_आंबेडकर #औरंगाबाद #समाजजीवन #भटके_विमुक्त #गावगाडा #ग्रामीण_समाज