Sunday 23 October 2022

अफाट, अचाट...अर्थात विराट!

 


एकच नंबर...

टी-20 विश्वचषकातील आपला पहिला सामना साडेपाच वाजता संपला. त्यानंतरच्या साडेतीन तासांत, आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमांतून ‘विराट कोहली’ अशी अक्षरं लक्षावधी वेळा उमटली असतील. उमटत राहतील. विशेषणांचा वर्षाव झाला असेल. होत राहील. त्याची छायाचित्रं असंख्य क्रिकेटप्रेमींनी एकमेकांना पुढे पाठवली असतील. त्याच्या त्या दोन षट्कारांची क्लिप कोट्यवधी डोळ्यांनी पुनःपुन्हा पाहून, कितव्यांदा तरी दाद दिली असेल. विराटचं कौतुक होत आहे नि होत राहील.

कोणत्या तरी वृत्तपत्रात उद्या ‘‘विराट’ खेळी’, ‘कोहलीमुळे भारताचा ‘विराट’ विजय’ अशा शीर्षकांनी बातम्या प्रसिद्ध होतील. ती अनेक वेळा वापरली गेली असली, तरी उद्या मात्र शिळी वाटणार नाहीत.

विराटची आजची कामगिरीच तशी होती. अफाट, अचाट, विस्मयकारक, लाजवाब, अफलातून, खिळवून ठेवणारी... विशेषणं कमी पडावीत अशी. विशेषणांना विशेषणं लावावीत अशी.

सामन्याच्या आधी राष्ट्रगीत झालं. ते संपता क्षणी कर्णधार रोहित  भाववश झाला. त्याची ती छबी पाकिस्तानचा डाव संपेपर्यंत साथीसारखी सर्व दूर गेली. डावऱ्या, शिडशिडीत, तरण्याबांड अर्षदीप सिंग ह्यानं कर्णधार बाबर आजमला अगदी यष्ट्यांसमोर पकडलं. महंमद रिजवानला उसळत्या चेंडूच्या सापळ्यात बरोबर अडकवलं.

एखाद्या सज्जन, आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणं मैदानावर वावरणाऱ्या भुवनेश्वरकुमारनं पहिल्या दोन षट्कांत प्रतिस्पर्ध्यांना मोकळेपणाने श्वास घेऊ दिला नाही.

अशा अवघड परिस्थितीतून शान मसूद आणि इफ्तिकार अहमद ह्यांच्या जोडीने वाट काढली. विराटसारख्या कसलेल्या क्षेत्ररक्षकाचा नेम चुकला नि जोडी फुटता फुटता राहिली. विराटच्याच उत्कट प्रयत्नांनंतरही झेल त्याच्या समोर काही अंतरावर पडला. रविचंद्रन अश्विन फूटभर आधीच थांबता झाला आणि सहज होणारा झेल निसटला. नंतर आपल्याच गोलंदाजीवर साभार परत आलेला फटकाही त्याला पकडता आला नाही. तेव्हा वैतागलेल्या रोहितचा चेहरा कॅमेऱ्याने टिपलाच.

अक्षर-अश्विन ह्या फिरकी जोडीची झालेली पिटाई, मग हार्दिक पंड्याचे तीन बळी, सूर्यकुमार यादवचे दोन झेल, भारतीय गोलंदाजांनी अलीकडच्या ‘लौकिकाला’ जागत एकोणिसाव्या षट्कात दिलेल्या चौदा धावा...

राहुलनं यष्ट्यांवर ओढवून घेतलेला चेंडू, उजव्या यष्टीवरून हलकेच बाहेर जाणाऱ्या चेंडूची छेड काढण्याचा रोहितला न  आवरलेला मोह, पहिल्याच चेंडूवर खणखणीत स्ट्रेट ड्राईव्हचा चौकार वसूल करणारा नि नंतर अपेक्षाभंग करणारा सूर्यकुमार...

चाळीस षट्कांच्या आणि जेमतेम साडेतीन-चार तासांचा अवकाश असलेल्या ह्या सामन्यांतील बहुतेक साऱ्या गोष्टी विसरल्या जातील.


स्टेडियममधला तो फलक आणि विराटचा उंचावलेला हात
सांगतोय - 'जिंकलो रे...'
लक्षात राहील विराट आणि हार्दिक ह्यांची शतकी भागीदारी. विराटनं शेवटच्या दोन षट्कांत टाकलेला टॉप गीअर.

लक्षात राहील कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मिळवलेला अटीतटीचा विजय.

लक्षात राहील दिवाळीच्या एकच दिवस आधी फटाक्यांचा दणदणाट करण्याची विराटने दिलेली संधी.

एखाद्या कुशल स्थापत्यविशारदाने डौलदार, टुमदार, देखणी इमारत टप्प्याटप्प्याने उभी करावी आणि अंतिमतः तिचं दर्शन झाल्यावर तोंडात बोट घालण्याला पर्याय नसावा, तशीच ही विराटची खेळी. मैदान मोठं आहे, हे समजून फटक्यांची आतषबाजी करण्याचा मोह टाळून एकेरी-दुहेरी आणि आता फार कमी वेळा पाहायला मिळणाऱ्या तिहेरी धावा घेण्यासाठीची त्याची ती चित्ता-चपळाई. संधी मिळताच तणाव दूर करणारे उत्तुंग फटके. अश्विनने फटका मारल्यावर  विजयी धाव पूर्ण केल्यानंतर यष्ट्यांभोवती थिरकलेले विराटचे पाय आणि जमिनीवर बसून काही करणारा विराट...

पाकिस्तानविरुद्धची लढत जिंकली. तब्येत खूश झालेले आपण भारतीय पुन्हा म्हणू - बस्स! आज विश्वचषक जिंकला!! पुढे काय व्हायचंय ते होऊ द्या...

तिसऱ्या-चौथ्या स्टंपातला फरक न कळणारे अनेक सोशल मीडिया पंडित विराटला संघाबाहेर बसवा, असं गेला काही काळ बोलत आहेत. त्यांच्यासह साऱ्या क्रिकेटरसिकांना विराटनं आज अप्रतिम भेट दिली.


काय खेळलाय गडी!
आपण कोणत्या दर्जाचे फलंदाज आहोत, हे विराटनं आज (पुन्हा एकदा) सिद्ध केलं! त्याच्या कारकिर्दीतल्या सर्वोत्तम, सर्वाधिक आकर्षक आणि हुशारीने रचलेल्या डावांमध्ये आजचा डाव हुकुमाचा असेल, हे नक्की!

‘किंग कोहली’ कौतुकानं म्हणतात.

आजच्या खेळीनं ‘किमयागार’ दिसला. स्वच्छ. लखलखीत. खणखणीत.

......

#टी20 #टी20_विश्वचषक #भारतxपाकिस्तान #विराट_कोहली #विराट_खेळी #दिवाळी_भेट

...........

(छायाचित्रं सौजन्य : ईएसपीएनक्रिकइन्फो आणि आयसीसी ह्यांची संकेतस्थळं)

.........

सोबतच वाचा - परदेशी माध्यमांकडून कौतुकाचा वर्षाव 

https://khidaki.blogspot.com/2022/10/SuperHero.html

3 comments:

  1. एक अविस्मरणीय सामना आणि अविस्मरणीय खेळी.

    ReplyDelete
  2. समिक्षणाचा उत्तम नमुना

    ReplyDelete
  3. खूप छान समालोचन व वर्णन.

    ReplyDelete

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...