Wednesday 6 April 2022

मुंबईच्या धावत्या दौऱ्यातील नोंदी


‘लोकसत्ता-तरुण तेजांकित’ ठरलेला ओंकार कलवडे.
त्याच्या ह्या कार्यक्रमानिमित्तच मुंबईचा धावता दौरा झाला.

गोष्ट
जुनी आहे; पण शिळी नाही. अगदी आठवडाभरापूर्वीची. मार्चअखेरीची. लिहू लिहू म्हणताना उशीर झाला. ‘मायानगरी’, ‘मोहनगरी’ म्हणविल्या जाणाऱ्या मुंबईला गेलो होतो. देशाची आर्थिक राजधानी आणि आर्थिक वर्षाची अखेर. पण हा केवळ योगायोग. निमित्त वेगळंच होतं.

मुंबई फिरायची, फिरत फिरत पाहायची बाकी आहेच. तिथला जगप्रसिद्ध वडा-पाव खायचा आहे. ‘माहीम हलवा’ घ्यायचा आहे. फॅशन स्ट्रीटला जाऊन घासाघीस करीत मस्त कपडे-खरेदीचा आनंद लुटायचा आहे. पुस्तकांचे ढीगच्या ढीग उचकून एखादं-दुसरं पुस्तकं बाळगायचं आहे. नॅशनल बुक ट्रस्टचं कार्यालय समुद्राच्या समोर आहे. तिथं जायचं आहे. असं खूप खूप करायचं आहे. त्याला मुहूर्त काही लागत नाही...

फार वर्षांपूर्वी, बरोबर पाच दशकांपूर्वी तब्बल महिनाभर ह्या महानगरीत राहिलो होतो. माझ्या आत्येभावानं - नानानं बऱ्याच ठिकाणी फिरवलं होतं. तो अकलूजहून तिथं रुजू पाहत होता. त्याचा मोठा भाऊ - आप्पानं मिसळ-पावची दीक्षा दिली होती. तेव्हा ‘उषाकिरण’ म्हणे तिथली सर्वांत उंच इमारत होती. आता सूर्याच्या किरणांना मज्जाव करणारे कैक टोलेजंग टॉवर ह्या शहरात उभे आहेत. मानेला रग लागेपर्यंत आकाशाकडे पाहत त्या मनोऱ्याबाबत अचंबा व्यक्त करायचा आहे.

अलीकडच्या १०-१२ वर्षांत चार-पाच वेळा तरी मुंबईसहल झाली. ‘लोकसत्ता’मध्ये असताना लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकींच्या निमित्ताने मुंबई मुख्यालयात आमच्या बैठका झाल्या. पुण्याहून गाडीत बसायचं नि मुंबईतल्या कार्यालयात उतरायचं. तिथली बैठक संपली की, परत गाडीत बसून पुण्याकडे कूच. मुंबई काय, समुद्र पाहायलाही वेळ नसायचा. त्यातल्या शेवटच्या बैठकीच्या वेळी वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून प्रवास केला, एवढं आठवतं. तो नुकताच खुला झाला होता. पुण्याला परतताना त्यावरून गेलो, तेव्हा टोल नव्हता. त्या नव्याकोऱ्या पुलावरून जाण्याचं थ्रिल वेगळंच होतं.

अलीकडं ‘एबीपी माझा’च्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेचं पारितोषिक घ्यायला गेलो होतो - ‘खिडकी’ नंबर एक ठरली होती, त्यांच्या स्पर्धेत. त्यालाही आता तीन वर्षं झालं. पुण्याहून निघाल्यावर आम्ही वाहतुकीच्या कोंडीत अडकलो आणि कार्यक्रम सुरू झाल्यावर तिथे पोहोचलो. अंधेरीचं ते हॉटेलही मस्त होतं. त्या वेळी फक्त मुंबादेवीचं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि घाईतच परत निघालो. त्या वेळी आधी कळवूनही मृदुलाताई (जोशी) ह्यांची भेट घेणं जमलंच नाही. ती रुखरुख आजही कायम आहे.

‘लोकसत्ता’च्या तरुण तेजांकित पुरस्कारांचं वितरण रविवारी (दि. २७ मार्च) परळच्या ‘आयटीसी ग्रँड सेंट्रल’मध्ये झालं. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये आमचा एके काळचा सख्खा शेजारी उद्योजक ओंकार कलवडे याचा समावेश होता. आमचं शनिवारी मध्यरात्रीनंतर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून बोलणं झालं. कार्यक्रमासाठी तो फ्रँकफर्टहून दिल्लीमार्गे आणि मी नगरहून पुण्यामार्गे साधारण एकाच वेळी मुंबईत पोहोचलो. तारांकित ‘आयटीसी ग्रँड सेंट्रल’कडे जाताना ओळखीच्या खुणा दिसत होत्या...माटुंगा, माहीम. मग लक्षात आलं की, लहानपणी खेळलेल्या ‘व्यापार’च्या आठवणी वर येताहेत.


कोलकता नाईट रायडर्सचा
मुक्काम असल्याच्या खाणाखुणा.

हॉटेलचा व्याप बाहेरून अर्थातच लक्षात येत नाही. आत गेल्यावर आय. पी. एल.च्या खाणाखुणा दिसल्या. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ तिथंच मुक्कामी होता. आम्ही गेलो तेव्हा खेळाडू सराव करून नुकतेच परतले असावेत. कारण आरामबस उभी होती. कुणी तरी चाहता फोटो काढत होता आणि सुरक्षारक्षक कुणावर तरी ओरडत होता. कार्यक्रम सुरू होण्याच्या थोडं आधी पाहिलं, तर के. के. आर.चा परिसर अगदी कडेकोट बंदोबस्तात होता. बाहेर त्यांचे फलक आणि त्यावर कर्णधार श्रेयस अय्यरचे फोटो झळकत होते.

कार्यक्रम सुरू होण्याच्या बरंच आधी आम्ही पोहोचलो. चहा-कॉफी-बिस्किटं अशी सोय होती. मला कॉफी हवी होती. तेवढ्यात अभिनेता पुष्कर श्रोत्रीही तिथे आले. त्यांनाही कॉफीच हवी होती. माझ्यासाठी तयार केलेली कॉफी देऊ केली. त्यांनीही ‘घेऊ ना नक्की?’ असं हसत विचारत कप उचलला. इथं त्यांची नेमकी भूमिका कोणती ह्या पडलेल्या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात मिळालं.

तारांकित हॉटेलांमधला चहा फार काही चांगला नसतो, असं तिथला (नेहमीचा) अनुभव असणाऱ्यांनी सांगून-लिहून ठेवलंच आहे. म्हणून मग कॉफीला प्राधान्य दिलं. तीही बिचारी चहाच्या भांड्याशेजारीच असल्यानं ‘वाण नाही पण गुण लागला’ अशी अवस्था होती. एवढ्या मोठ्या ठिकाणी मुंबईतला प्रसिद्ध भटाचा मसाला चहा किंवा माटुंग्याच्या ‘द मद्रास कॅफे’सारखी फिल्टर कॉफी मिळणार नाही, हे गृहीतच होतं. तरीही... एक गंमत सांगायची राहिलीच. तिथं म्हणे चहा-कॉफीत टाकण्यासाठी साखरेच्या पुड्यांप्रमाणंच गुळाच्या भुकटीच्या पुड्याही होत्या. सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत असलेला गुळाचा चहा! दुसऱ्या वेळी आमच्या बरोबर असलेल्या सहकाऱ्यानं गूळ घातलेला चहा पाजला.


हॉटेलच्या दालनातलं एक चित्र.

सभागृहात जाण्यापूर्वी असलेल्या त्या प्रशस्त दालनात खूप मंडळी येताना दिसत होती. अनिल काकोडकर, ज्यांच्या पुस्तकावर खूप पूर्वी लिहिलं त्या प्रियदर्शिनी कर्वे आणि अजून बरीच; ज्यांचे चेहरे ओळखीचे वाटायचे नि नाव आठवायचं नाही, असे.

कार्यक्रमाची सुरुवात सुरेल होती. त्याची जबाबदारी ‘द म्यूझिशियन्स’ ह्या बँडवर होती. फक्त आणि फक्त वाद्यसंगीत. कार्यक्रम अर्ध्या-पाऊण तासाचाच झाला. पण तेवढ्या वेळात जमलेले सारेच मंत्रमुग्ध झाले. सत्यजित प्रभू, अमर ओक, महेश खानोलकर, नीलेश परब, दत्ता तावडे, आर्चिस लेले अशी दिग्गज वादकमंडळी होती आणि सूत्रसंचालनाला पुष्कर श्रोत्री. कॉफीपानावेळी पडलेल्या प्रश्नाचं उत्तर. खानोलकरांनी व्हायोलीनवर मजा आणली. ‘ते गाण्याची चाल नाही, तर शब्द वाजवून दाखवतात,’ असं पुष्कर श्रोत्री ह्यांनी सांगितलं ते खरंच होतं. हिंदी-मराठी अशी बरीच गाणी ऐकायला मिळाली.

छोट्या पडद्यावर नेहमी दिसणारे नीलेश परब इथे होते. तिथल्यासारखेच हसत, बेभान वाजवत. ह्या छोट्या कार्यक्रमातही ते अगदी तल्लीन झाले होते. त्यांना विविध वाद्यं वाजवताना पाहिल्यावर वाटलं की, हा माणूस स्वतःसाठीच वाजवत असतो आणि त्याचा हर एक क्षणाचा आनंद लुटत असतो! त्यात सहभागी होता येतं, हे आपलं भाग्य. अमर ओक त्याच तल्लीनपणे बासरीतून सूर काढत होते आणि आर्चिस लेले तबल्यावर ठेका धरत होते.

‘ज्वेल थीफ’मधलं ‘होठों पे ऐसी बात...’ गाणं लागलं की, पुण्यातल्या नातूबागेचा गणपती आठवतो. गणेशोत्सवात त्यांचा देखावा रोषणाईचा असायचा आणि ह्या गाण्याच्या तालावर हजारो रंगबिरंगी दिवे नाचत असत. अर्धा तास रेंगाळल्यावर दोनदा तरी ही बात कानी पडायचीच. कार्यक्रमाची सांगता ह्याच गाण्यानं झालं. तो अनुभव भलताच थरारक होता. सारेच वादक कसे बेभान झाले होते. निवेदकाचं काम संपवून पुष्कर श्रोत्रीही वादकाच्या भूमिकेत शिरला होता.


कार्यक्रम संपल्यानंतरचा छोटा सा ब्रेक कॉफीच्या कपाच्या साथीनं.

ह्या कार्यक्रमानंतर ही सारी मंडळी चहाच्या कपाच्या संगतीने ‘छोटा सा ब्रेक’ घेत होती, तेव्हा त्यांना मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपलं. आठवण म्हणून! दहा मिनिटांपूर्वी काय कहर माजवित होती, ह्याची कल्पनाही येऊ नये इतक्या निवांतपणे हास्य-विनोद करीत ते ब्रेकची मजा घेत होते.


मानसी जोशी... तरुण तेजांकित
(छायाचित्र तिच्या ट्विटर खात्यावरून)
बाकी मुख्य कार्यक्रम फार छान झाला. एकूण १६ तरुण तेजांकितांना गौरवण्यात आलं. पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित केलं जाई, तेव्हा त्यांच्या कामगिरीची छोटी चित्रफित दाखविली जाई. बॅडमिंटनपटू मानसी जोशी हिचा जीवनप्रवास थक्क करणारा होता. अभियंता असलेल्या ह्या तरुणीला अपघातांना आणि त्यानंतर अनेक वैद्यकीय उपचार-शस्त्रक्रिया ह्यांना सामोरं जावं लागलं. मग बॅडमिंटन खेळू लागली. सलाम! तिची चित्रफित सुरू झाल्यापासून टाळ्यांचा गजर चालू झाला आणि पुरस्कार घेऊन ती खाली आल्यावरच तो थांबला. तिला व्यासपीठावर येण्याकरिता हात देण्यासाठी जॉर्ज वर्गिसही नकळत क्षणभर पुढे आले होते. पण मानसीची कर्तबगारी कानी पडत असल्याने ते तत्क्षणीच मागे झाले.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान ह्यांची छोटी मुलाखतही छान झाली. पुरस्कार देताना प्रत्येक विजेत्याशी ते एखादा मिनिट आवर्जून बोलत होते. क्वचित एखाद्याच्या पाठीवर हात टाकत होते. एकूणच हा तीन-साडेतीन तासांचा कार्यक्रम फार छान झाला आणि तो जवळून अनुभवता आला.

...फक्त एकच - मुंबई पाहायची राहूनच गेलं की पुन्हा!

आणि ‘ये है बॉम्बे, ये है बॉम्बे मेरी जान...’ गुणगुणायचं राहून गेलं!!

.........

#तरुण_तेजांकित #ओंकार_कलवडे #लोकसत्ता #मुंबई #ब्लॉग_माझा  #मानसी_जोशी #नीलेश_परब #पुष्कर_श्रोत्री #द_म्यूझिशियन्स_बँड

3 comments:

  1. तुमचा ब्लॉग नंबर १ असल्याने सर्वप्रथम अभिनंदन. तुम्ही कार्यक्रमाबद्दल छान लिहिले आहे. तुम्ही लेखात उल्लेख केलेले वादक खरोखरच कौतुक करण्यासारखेच आहेत. मीदेखील त्यांना जवळून ऐकले आहे, भेटले आहे . मुंबई बघण्यासाठी मुद्दाम या आता... म्हणजे ‘यह बॉम्बे...’ मनातच गावे लागणार नाही. मृदुलाताईंची ही भेट होईल.
    - स्वाती वर्तक, मुंबई

    ReplyDelete
  2. सतीश, निवेदनाच्या ओघात सहजपणे माझा उल्लेख झालेला पाहून मी आश्चर्यचकित तर झालेच; पण रोमांचितही झाले!
    - मृदुला जोशी, मुंबई

    ReplyDelete

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...