Monday, 23 March 2020

जगापासून लांब पळा...

कोरोनोव्हायरसने पछाडलेले जग. (छायाचित्र सौजन्य : 'द गार्डियन')
विश्वातला सर्वांत बुद्धिमान प्राणी म्हणविला जाणारा माणूस कशाला अधिक घाबरतो? प्रत्यक्ष मरणाला? की मरणाच्या कल्पनेला? त्याचं उत्तर जगातल्या बहुतेक देशांमधून आता मिळू लागलं आहे.


'जग जवळ आलं,' असं विसावं शतक संपता संपता ऐकू येत होतं. वारंवार सांगितलं जाई तसं. एकविसावं शतक सुरू झालं आणि जग खूप जवळ आलं. इतकं जवळ की, मंगेश पाडगावकर यांनी म्हटल्याप्रमाणे 'जवळपणाचे झाले बंधन'!

जवळिकीच्या ह्याच बंधनातून सुटका करून घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. त्यासाठी निमित्त ठरलं, कोरोनाव्हायरसच्या साथीचं. 'कोवीड-१९' ह्या संक्षिप्त रूपात ही नवी जागतिक महामारी ओळखली जाते. तिनं अनेक देशांच्या प्रमुखांची झोप उडवली. झोपेचं सोंग घेतलेल्यांचीही उडवली. जे अजून झोपेत आहेत, त्यांच्यासाठी ही काळझोप ठरू नये, एवढीच त्यांना उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची अपेक्षा आहे.

जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी असलेल्या कोरोनाव्हायरसच्या साथीची मिठी दिवसागणिक भक्कम होत आहे. जणू विळखा घालून मरणाच्या दारात खेचून नेणारी मगरमिठी. जागतिक आरोग्य संघटनेच्या ('WHO') संकेतस्थळावर साथीच्या व्यापाचे आकडे रोजच्या रोज प्रसिद्ध केले जातात. संघटनेने जाहीर केलेल्या दि. २३ मार्चच्या माहितीनुसार ह्या साथीने आतापर्यंत १८७ देशांमध्ये प्रवेश केला आहे. कोणताही खंड कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णापासून मुक्त नाही. संसर्ग निश्चित झालेले रुग्ण - २ लाख ९४ हजार ११० (कालच्या दिवसातली भर २६ हजार ०६९). मृत्यू - १२ हजार ९४४ (कालच्या दिवसात १६००). 'द गार्डियन' ह्या ब्रिटिश दैनिकाने दिलेली संख्या याच्या खूप पुढची आहे. ती अशी : रुग्ण - ३ लाख ३१ हजार २७३; मृत्यू - १४ हजार ४५० आणि बरे झालेले रुग्ण - ९७ हजार ८४७.

कोवीड-१९ साथरोगाने किती हात-पाय पसरले आहेत, हे 'हू'ने दिलेल्या आकडेवारीवरून समजून येतं -
चीन - लागण ८१ हजार ४९८, मृत्यू  ३,२६७
इटली - लागण ५३ हजार ५७८, मृत्यू ४,८२७
स्पेन - लागण २४ हजार ९२६, मृत्यू १,३२६
इराण - लागण २१ हजार ६३८, मृत्यू १,५५६
जर्मनी - लागण २१ हजार ४६३, मृत्यू ६७
भारत - लागण ३४१, मृत्यू ५

सुरुवातीच्या काळात आशिया खंडाला हादरवून सोडणाऱ्या साथीनं आता संपूर्ण युरोपला अक्षरश: हतबल केल्याचं दिसतं. इटलीतील मृतांची संख्या चीनपेक्षाही जास्त झाली आहे. तिथला मृत्युदरही सरासरीपेक्षा अधिक आहे. परिणामी परिस्थिती हाताबाहेर गेल्यासारखी दिसते.

साथीच्या उद्रेकानं युरोपला मोठा फटका बसला. त्यामुळे युरोपीय युनियनने २६ देशांमध्ये जगातील जवळपास सर्व प्रवाशांना, अभ्यागतांना ३० दिवस प्रवेश न देण्याचा ठराव १७ मार्च रोजी केला. तथापि युरोप खंडातील परिस्थिती चिघळतच असल्याचं गेल्या आठवड्यात वाढलेल्या रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येवरून दिसून आलं.

जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल ह्यांना लस देणाऱ्या डॉक्टरची कोरोना चाचणी 'पॉझिटिव्ह' आली. त्यामुळे विलगीकरण कक्षात (क्वारंटाईन) दाखल होण्याची वेळ मर्केल ह्यांच्यावर आली. त्याही आता 'घरातून काम' करतील. ह्या घडामोडीमुळे जर्मनी हबकली नसेल, तरच नवल. तिथे आता दोनपेक्षा अधिक जणांनी भेटण्यावर सरकारने बंदी घातली आहे.

ह्या साथीचा धोका जर्मन नागरिकांनी फारसा गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्याबद्दल नाराजी व्यक्त करताना मर्केल म्हणाल्या होत्या की, साथीच्या उद्रेकाला आळा घालण्यासाठी म्हणून समाजापासून दूर राहा, असं सुचविण्यात आलं होतं. पण त्याचं पालन सर्व नागरिक करताना दिसत नाहीत. लोक एकमेकांना गटागटाने भेटत आहेत, अशी माहिती अनेक शहरांतून आणि राज्यांतून आली. त्यामुळे आता अधिक कडक उपाय योजावे लागतील.

इटलीत रविवारी (दि. २२ मार्च) एका दिवसात ६५१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्याच्या आदल्या दिवशीची ही संख्या होती ७९३. चीननंतर सर्वाधिक रुग्ण असलेला देश अशीच इटलीची नोंद झाली. देशाच्या सर्व २० प्रांतांमध्ये साथीचा फैलाव झाला आहे. सोमवारपासून (दि. १६) सहा कोटी इटालियन नागरिक 'लॉकडाऊन'चा अनुभव घेत आहेत. देशात साथ आल्याचं २० फेब्रुवारी रोजी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलं. लुम्बार्दी प्रांतातील कोदोन्यो येथील रुग्णालयात ३८ वर्षांच्या तरुणाने तपासणी केली व टेस्ट पॉझिटिव्ह आली. तो पहिला रुग्ण. अवघ्या महिन्याभरात रुग्णांची संख्या तीनवरून अर्ध्या लाखापेक्षा जास्त झाली. दि. ८ मार्चला रुग्णांच्या संख्येत पन्नास टक्के वाढ झाली. इटलीतील मृत्यूचं प्रमाणही अभ्यासकांना, तज्ज्ञांना बुचकळ्यात पाडत आहे. ते साधारण चार टक्के, म्हणजे सरासरीहून अधिक आहे.

इटलीतील एकूण रुग्णांपैकी ८५ टक्के लुम्बार्दी, वेनेतो, इमिया रोमानिया प्रांतांमध्ये आहेत. याच प्रांतांत मृत्यूचे प्रमाण ९२ टक्के. साथीचा एवढ्या मोठ्या प्रमाणात फैलाव होण्याचं आणि एवढ्या संख्येनं बळी जाण्याचं कारण काय असावं? पहिला रुग्ण दि. २० फेब्रुवारीला अधिकृतपणे आढळला, तरी तज्ज्ञांच्या मते त्याच्या फार आधीच हा विषाणू देशात आला असावा.

'टाईम'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तान्तानुसार इन्फ्लूएंझाची साथ जोरात असतानाच कोरोनाने गाठले, असे इटलीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमधील संसर्गजन्य रोग विभागातील संशोधक फ्लविया रिकार्दो यांनी सांगितले. पहिला रुग्ण उघड होण्याच्या आधी कोदोन्यो येथे न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये अचानक मोठी वाढ झाली होती. थोडक्यात या विषाणूचा संसर्ग झालेल्यांवर नेहमीचा फ्लू झाला असे समजून उपचार केले जात होते.

रोगाचे निदान न होताच विषाणूचा फैलाव झाला, हे साथ एवढी सर्व दूर फैलावण्याचे कारण असावे. कोरोनाची साथ असल्याचे आरोग्य खात्याच्या लक्षात आले, तोपर्यंत बऱ्याच जणांना संसर्ग झाला असावा, असा अंदाज आता वर्तविला जातो. हतबल, हताश झालेले पंतप्रधान ज्युजेपे कोन्ते म्हणतात की, इटलीचं भलं व्हावं यासाठी आपण सर्वांनी काही दिलं पाहिजे. आता अधिक वेळ नाही.

लुम्बार्दी येथील क्रेमोना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात डॉक्टर इमानुएला कतेनाची काम करतात. त्यांच्या मते ह्या साथीवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे लॉकडाऊन! अमेरिकेसह अनेक देशांनी आता हाच उपाय स्वीकारला आहे. तथापि जागतिक आरोग्य संघटनेतील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एवढेच पुरेसे नाही.

इराणमध्येही साथ हाताबाहेर गेल्याची लक्षणं स्पष्टपणे दिसत आहेत. देशात गेल्या चोवीस तासांत १ हजार २८ नवीन रुग्ण आढळले. याच काळात १२९ जणांचा मृत्यू झाला. सरकारच्या मालकीच्या दूरचित्रवाणीच्या पत्रकाराने मंगळवारी (दि. १७ मार्च) इशारा दिला होता की, सरकारने प्रवासाबाबत दिलेल्या इशाऱ्याचे आणि सामाजिक अलगीकरणाच्या सूचनांचे पालन न केल्यास देशात चाळीस लाख रुग्ण होतील आणि पस्तीस लाखांचे मृत्यू. या उद्रेकामुळे देशात आता दोन आठवड्यांसाठी शटडाऊन आहे.

इराणमध्ये साथीचा उद्रेक झाला आहे. सुरू असलेली ही धूरफवारणी साथीला आळा घालण्यात कितपत यशस्वी ठरते, याचे उत्तर अजून मिळायचे आहे.

इराणवर विविध निर्बंध लादणाऱ्या अमेरिकेने साथीशी लढण्यासाठी देऊ केलेली मदत अध्यक्ष अयातोल्ला अली खामेनी यांनी नाकारली. कोरोनाव्हायरस लागण होण्याबाबत चीनने केलेल्या आरोपाचीच री ओढताना ते म्हणाले की, तुमच्या औषधांमुळे साथ अधिकच फैलावेल. तुमचे डॉक्टर व चिकित्सक येथे येतील आणि दिलेल्या विषाचा काय परिणाम होतो, हे पाहत बसतील! खामेनी ह्यांनी मांडलेल्या ह्या सिद्धांताशी तेथील जहालमतवादी सहमत आहेत.

काय आहे कोरोना विषाणू?
प्राण्यांना आजारी पाडणाऱ्या विषाणू समूहातील सात विषाणू आतापर्यंत माणसांपर्यंत संक्रमित झाले. त्यातीलच एक कोरोना (कोवीड-१९) आहे. या साथीची लागण झालेल्या बहुसंख्य रुग्णांचे प्रारंभिक लक्षण सर्वसाधारण सर्दीसारखेच दिसून आले. आतापर्यंत लागण झालेल्या कोरोनाच्या रुग्णांपैकी २० टक्के गंभीर आणि चिंताजनक, अशा अवस्थेत दिसतात. मृत्युदर . ते ३.४ टक्के असून, तो भौगोलिक परिस्थिती व रुग्णालयात मिळणाऱ्या उपचाराच्या दर्जानुसार कमी-अधिक होतो. मार्स आणि सार्स या तुलनेत तो खूप कमी दिसत असला, तरी लक्षणीयरीत्या धोकादायक आहे. चीनच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या विषाणूंमध्ये दोन उपभेद असून, त्यापैकी एक अधिक आक्रमक आहे. त्याच्या परिणामी लस शोधण्यात अडथळे येण्याची शक्यता वाटते.

ही आहेत लक्षणे
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोरडा खोकला, ताप, मरगळ वा थकवा, श्वास घेण्यास त्रास ही कोरोनाची लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये नाक वाहणे वा चोंदणे, ठणका-वेदना, अतिसार, घशात खवखव ही लक्षणेही दिसतात. सुरुवातीला सर्वसाधारण दिसणारी लक्षणे नंतर तीव्र होतात. ती श्वसनसंस्थेच्या अन्य रोगांसारखीच - फ्लू आणि सर्दी ह्यासारखीच वाटतात. काही विशेष उपचार न घेताही ८० टक्के रुग्ण यातून बरे होतात. असं असलं तरी १६ टक्के वृद्ध, उच्च रक्तदाब, हृदयविकार, फुफ्फुसाचा त्रास, मधुमेह असलेल्यांना यापासून अधिक धोका आहे. कोणतेही लक्षण दिसल्यास स्वतःचे अलगीकरण ('सेल्फ आयसोलेशन') महत्त्वाचे आहे.

चीनच्या हुबेई प्रांतातील वुहानमध्ये या साथीचा उद्रेक झाला. तेथील 'वेट मार्केट'मधून (वेट मार्केट म्हणजे जिवंत व मृत प्राणी (मांस), मासे, पक्षी आणि अन्य प्राणीज उत्पादनांची विक्री जेथे होते तो बाजार) कोरोनाच्या विषाणूचा फैलाव झाला. अशाच बाजारातून हे विषाणू प्राण्यांतून माणसामध्ये संक्रमित होण्याचा धोका सर्वाधिक असतो. कारण या परिसरातील स्वच्छता, आरोग्य यथातथाच असते. जिवंत प्राण्याची तिथेच कत्तल केली जाते. कोरोना कुठल्या प्राण्याकडून संक्रमित झाला हे अजून निश्चित झाले नसले, तरी ही देणगी वटवाघळाची असावी, असे मानले जाते. एबोला, एचआयव्ही आणि रॅबीज यासह विविध झूनोटिक व्हायरसची साखळी वटवाघळांपासून जन्माला येते. वुहानच्या बाजारात वटवाघळे विकली जात नाहीत. पण त्यांच्यापासून कोंबड्या किंवा अन्य प्राण्यांना संसर्ग झाला असावा.

धोकादायक सवय मोडीत काढणार
चीनमध्ये खाद्य म्हणून कशाचा वापर केला जातो, यावर बरेच विनोद प्रचलित आहेत. असं असलं तरी वैशिष्ट्यपूर्ण 'चायनीज क्यूझिन' आब राखून आहे. ह्याच खाद्यसंस्कृतीबद्दल विचार करण्याची वेळ चीनवर आली. साथीच्या उद्रेकाचे संभाव्य कारण वन्यजीव असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याचा खाद्य व व्यापारासाठी वापर करण्याबाबत विचार करीत असल्याचे चीनने सांगितले. सर्वोच्च लोकप्रतिनिधी सभागृहाच्या (काँग्रेस) स्थायी समितीने १७ फेब्रुवारीस निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, वन्यजीव खाण्याची ही धोकादायक, अपायकारक सवय मोडीत काढण्याच्या उद्देशाने करावयाच्या कायद्याचा मसुदा अधिकाऱ्यांनी बनविला आहे.
वुहानच्या पाच क्रमांकाच्या हॉस्पिटलमधून लिशेन्शान हॉस्पिटलमध्ये हलविण्याची वाट पाहणारे रुग्ण. हे रुग्णालय कोविड-19 रुग्णांसाठी नव्या बांधण्यात आले आहे. एएफपी गेटी इमेजस यांचे हे छायाचित्र ३ मार्चचे आहे.
खरं तर चीनचा पोलादी पडदा आड आला नसता, तर ही साथ किती तरी आधीच ओळखता आली असती. वुहानमधील अधिकाऱ्यांनी न्यूमोनियाचे डझनभर रुग्ण असल्याचे ३१ डिसेंबर रोजीच जाहीर केले. न्यूमोनियाचे कारण मात्र तेव्हा अज्ञात होते. ही साथ म्हणजे नवीन कोरोनोव्हायरस असल्याचे ७ जानेवारीला स्पष्ट झाले. या आजाराचा पहिला बळी ११ जानेवारीला गेला. मृत वुहान प्रांतातील ६१ वर्षांचा पुरुष होता.

साथ आटोक्यात येत नसल्याचे पाहून एक कोटी १० लाख लोकसंख्येचे वुहान शहर क्वारंटाईनमध्ये असल्याची घोषणा चीनने २३ जानेवारीला केली. शहरातून उडणारी विमाने व रेल्वेगाड्या रद्द केल्या आणि बस, भुयारी रस्ते, फेरीबोटी स्थगित करण्यात आल्या.

या साथीमुळे परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा लाल बावटा डॉ. ली वेनलियांग यांनी आधीच दाखविला होता. पण प्रशासनाने त्यांना फटकारले. हा इशारा निराधार आहे, अफवा आहे अशा निवेदनावर त्यांना सही करणे भाग पाडले. लवकर माहिती न देता आणि व्हिसन ब्लोअर्सना गप्प बसवून चीन सरकारने परिस्थितीचा बट्ट्याबोळ केला, ही साथ नीटपणे हाताळली नाही, याबद्दल वैफल्यग्रस्त डॉ. ली संताप व्यक्त करीत राहिले. संसर्गबाधित होऊन त्यांचे ७ फेब्रुवारी रोजी निधन झाले. चीनमध्ये अनेकांसाठी ते 'हीरो' होते.

काही सिद्धांत
या रोगाच्या प्रसारामागे षड्यंत्र असल्याच्या काही वेडगळ कथा थोड्याच दिवसांत प्रसृत झाल्या. चीन जैवअस्त्र बनवित असून, त्याची प्रयोगशाळा वुहान येथे होती. याच प्रयोगशाळेतून जंतू अपघाताने बाहेर पडला किंवा हेतुपूर्वक बाहेर काढण्यात आला. त्यातून साथ फैलावली. ही कथा तद्दन बनावट असल्याचे 'द टेलिग्राफ' दैनिकाचे म्हणणे आहे.

थोडे सावरल्यानंतर चीनने साथीचे खापर अमेरिकेवर फोडले. हा व्हायरस अमेरिकेचीच खेळी असावी असा आरोप चिनी अधिकाऱ्यांनी केला. चीन सरकारचे प्रवक्ते लीचीन चाओ यांनी ट्विट केले होते - 'अमेरिकी लष्कराने वुहानमध्ये ही साथ आणली असावी, अशी दाट शक्यता आहे.' त्याचीच री खामेनी यांनी ओढली. पण या दोन्ही आरोपांसाठी ना चीनने पुरावे दिले, ना इराणने. त्यातून एवढंच दिसून येतं की, राजकारण करण्यासाठी कोणतीही संधी वर्ज्य मानली जात नाही.

कोरोनाच्या साथीवर अजून निश्चित उपचार सापडलेले नाहीत. लस शोधण्यासाठी किमान एक ते दीड वर्ष वेळ द्यावा लागेल. सार्वजनिक जागी कमीत कमी जाणं, गटांमध्ये शक्यतो न मिसळणं, हात वारंवार स्वच्छ धुणं हेच उपाय तूर्त कटाक्षाने अमलात आणणं आवश्यक आहे.

ह्या साथीनं संपूर्ण अनेक प्रश्न उभे केले आहेत. 'चाक रुतले' अशीच जगाची अवस्था झाली आहे. विमानसेवा बंद करण्यात आली, उद्योग बंद आहेत, पर्यटनाच्या व्यवसायावर गदा आली. एनबीसी न्यूजने 'कोरोनाव्हायरस फीअर्स क्लीअर द क्राउड्स' शीर्षकाचे फोटो-फीचर प्रसिद्ध केले आहे. त्यात बीजिंग, अङ्कोरवट (कंबोडिया), टोक्यो, सिंगापूर, मक्का (सौदी अरेबिया), शांघाय, तेहरान, मिलान आदी शहरांमधील कोरोना साथीपूर्वीची आणि आताची परिस्थिती मांडली आहे. देशोदेशीच्या सीमा परकियांसाठी बंद होत आहेत.

थोडक्यात एवढं की, फार जवळ आलेलं जग पुन्हा लांब जाऊ पाहत आहे. जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी लांब राहण्यातच हित आहे, हे जगाला सध्या तरी पटलं आहे.
...
'जनता कर्फ्यू'च्या दरम्यान रविवारी सायंकाळी वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, पोलिस दल व अन्य अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची होती. त्यासाठी मुंबईतील एका इमारतीत 'एकत्र झालेले' रहिवासी. (छायाचित्र सौजन्य : 'द गार्डियन')
...आणि भारतातलं चित्र
कोरोनाव्हायरस जगभर धुमाकूळ घालत असताना आपल्याकडे गेल्या आठवड्यापर्यंत सर्वसामान्य माणसानं त्याच्याकडे फारशा गांभीर्यानं पाहिलं नव्हतं. मास्क आणि सॅनिटायजर याची खरेदी; दोन्ही गोष्टींचा तुटवडा असल्याबद्दल दूषण देण्याइतपतच त्याची दखल घेण्यात आली.

सामाजिक माध्यमात मात्र दीड महिन्यांपासून यावर मिम्स, पन, विनोद चालू होते. कोरोनामुळे तुम्ही नॉनव्हेज खाणं सोडलं का, यावरही खल चाललेला दिसला. गोमूत्रापासून कापरापर्यंत तऱ्हेतऱ्हेचे उपाय कोरोनावर कसे रामबाण आहेत, हे छातीठोकपणे सांगणारे मेसेज मोठ्या संख्येनं पृथ्वी-प्रदक्षिणा करत होते.

मोदी व ठाकरे सरकारांनी साथीचा बंदोबस्त करण्यासाठी आग्रही पावलं उचललीही. तथापि एकूणच गांभीर्य जाणवत नव्हतं. जनतेचं प्रबोधन करण्यासाठी आकाशवाणीवरून ऐकविली जाणारी निवेदनंही 'कोरोना-डरोना' अशी यमक साधणारी होती.

चीनचा सख्खा शेजारी असूनही भारताला कोरोनाव्हायरस साथीनं कसं झपाटलं नाही, याची आश्चर्ययुक्त चर्चाही झाली. कोरोनाच्या चाचण्या होण्याची आवश्यक त्या प्रमाणात सोय नसल्यानं 'पॉझिटिव्ह' असलेले उघडकीस येत नाहीत आणि ते उघड होईल, तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल, अशीही भीती व्यक्त केली जात होती.

तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केल्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. सरकार नियंत्रणाबाबत अधिक आग्रही झालं. ठिकठिकाणी प्रशासनानं थोडी कडक पावलं उचलायला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 'जनता कर्फ्यू'च्या आवाहनानंतर ही साथ घातक आहे, याची जाणीव अधिक तीव्रतेनं झाली. त्यानुसार बहुसंख्य भारतीय रविवारी दिवसभर घराबाहेर पडले नाहीत. तथापि डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलिस यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या निमित्तानं सायंकाळी पाच वाजता शंखनाद, थाळीनाद करताना आणि टाळ्या पिटताना पुन्हा एकदा (अति)उत्साही, समारंभप्रिय वृत्तीचं दर्शन घडलं. फटाके वाजवणं, घोषणा देणं, पक्षाचे झेंडे फडकावणं... हे असं काही अपेक्षित नसलेलं ठळकपणे दिसलं. सामूहिकपणे एकत्र येणं टाळायचं असताना, पुन्हा तेच होताना दिसलं.

एक दिवसाचा 'जनता कर्फ्यू' म्हणजे कोरोनाव्हायरसविरुद्धच्या लढाईतील जय नव्हता. एका दीर्घ लढ्यासाठी आपण तयार आहोत की नाही, हे पाहणारी ती चाचणी होती. चौथा टप्पा आता सुरू झाला आहे. कसोटी पाहणारा टप्पा. आपल्या संयमाची, सहनशीलतेची, धैर्याची परीक्षा इथं लागेल.

आणखी एक मुद्दा - 'सोशल डिस्टन्सिंग'च्या सोबतीनेच भारतात 'सोशल मीडिया डिस्टन्सिंग'ही गरजेचं आहे, असं वाटतं. 

शाळांमध्ये 'हात धुवा' आग्रहानं का शिकवलं जातं आणि 'स्वच्छ भारत' मोहिमेचं महत्त्व काय, एवढं जरी या साथीच्या निमित्तानं कळलं, तरी आपण आरोग्याचा मोठा धडा शिकलो, असं म्हणता येईल.

सामाजिक माध्यमावर कुणी तरी एक पोस्ट टाकली. त्यात म्हटलं होतं, की काही वेळा आजवर शिकलेल्याच्या विपरीत अमलात आणावं लागतं.
'Divided we STAND
United we FALL'
कोरोनाव्हायरसनं ती वेळ आणली आहे.
.....
(माहितीचा स्रोत : जागतिक आरोग्य संघटना, 'द गार्डियन', 'न्यू यॉर्क टाइम्स', 'एनबीसी न्यूज', 'टाईम', 'बिझनेस इनसायडर', 'द टेलेग्राफ', 'विकिपीडिया', 'अल-जझीरा' आदी संकेतस्थळे.)

22 comments:

 1. उत्तम आढावा. जराही अतिशयोक्ती नाही की उडवाउडवी नाही. त्याशिवाय स्वतःची टिप्पणी.
  पत्रकारितेचा उत्तम नमुना.

  ReplyDelete
 2. जबरदस्त लिखाण..

  ReplyDelete
 3. महोदय,
  आपल्या लेखणीतून आपण कोरोनाला खिडकीत क्वारंटाईन करून अशा तणावपूर्ण परिस्थितीतहि एका दृष्टीक्षेपात सद्यस्थितीची माहिती देऊन जनजागृती करत अहात, एकप्रकारे डॉक्टरांच, स्वयंसेवकाच कार्य करतं आहात. हि बाब कौतुकास्पद आहे.

  या विषाणूची निर्मिती कृत्रिम का नैसर्गिक? कोणत्या देशात कोठे, कसा निर्माण झाला? हे सत्य यथावकाश बाहेर येईलच. भारतापुरता व लोकसंखेचा विचार केल्यास सद्यस्थितीत याचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. असं का? यावर विचारमंथन होऊन भविष्यात अशी परिस्थिती येऊ शकते, हे न नाकारता राजकीय स्वार्थासाठी निर्माण केलेली मुंबई-पुण्याची औद्योगिक व अन्य अनेक क्षेत्रातील मक्तेदारी टप्प्या-टप्प्याने बंद करणे आवश्यक वाटते.

  दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बंगलोर, हैद्राबाद इ. ठिकाणीही हाच निकष आवश्यक आहे. वाढत्या लोकसंखेबाबत तर साराच यळकोट. तसेच अशा आणिबाणीतही संधिसाधू हात धून घेतात हे आपले दुर्दैव आहे.

  लसनिर्मिती (विरजण लावण्याइतके सोपे नाही) होयीतोपर्यंत प्राथमिक उपचार एव्हडच आपल्या हातात आहे.
  धन्यवाद..! श्रीराम वांढरे. भिंगार.

  ReplyDelete
 4. डोकं ठिकाणावर आणणारे शब्द...! मार्गदर्शक, विस्तृत आणि जागृत करणारं लिखाण... मी पामर काय बोलणार ??

  ReplyDelete
 5. उत्तम! कुठेही अतिशयोक्ती नाही...
  - राजन कुटे, नगर

  ReplyDelete
 6. 'सोशल मीडिया डिस्टन्सिंग' हा कोणीही न मांडलेला मुद्दा विचार करायला लावणारा आहे.
  वस्तुनिष्ठ लेख. फार आवडला.
  - संजय आढाव, नगर

  ReplyDelete
 7. कोरोनाव्हायरसवर आतापर्यंत जेवढ्या बातम्या/लेख वाचले किंवा टीव्ही.वर चर्चा ऐकल्या, त्यापेक्षा फारच सुंदर व अभ्यासपूर्ण लेख. त्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन! लेख लिहिण्यासाठी कोणत्या साधनांचा आधार घेतला, हेही तू फार प्रामाणिकपणे नमूद केले आहेस.

  एक गोष्ट थोडी खटकली - 'ह्या रोगाचे संक्रमण कोंबड्यांपासून झाले असावे', हा उल्लेख तेवढा पटण्यासारखा नाही. कारण ते अजून सिद्ध झाले नाही. हा उल्लेख टाळता आला असता, तर बरे झाले असते.
  - विकास पटवर्धन, नगर

  ReplyDelete
 8. उत्तम लेख. त्याबद्दल खूप धन्यवाद. अशा विवेकी लिखाणाचीच गरज आहे.
  - सीमा मालाणी, संगमनेर

  ReplyDelete
 9. अभ्यासपूर्ण लेख.
  - संजीवनी कुलकर्णी, चिंचवड

  ReplyDelete
 10. लेख वाचला. नागरिकांमध्ये अजून जागरूकता हवी. सतर्कता बाळगली पाहिजे. येते आठ दिवस फार महत्त्वाचे आहेत.
  - रोहिणी पुंडलिक, नगर

  ReplyDelete
 11. उत्तम लिखाण..

  ReplyDelete
 12. सर,
  खूप दिवसांनी खिडकीतून डोकावून बघितलं...

  समाजमाध्यमं आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या भडिमारातून वैतागलेल्या मेंदूला-सविस्तर, नीट, अभ्यासपूर्ण, तार्किक, डोळे उघडायला लावणारं आणि डोकं ताळ्यावर आणणारं लेखन वाचायला मिळालं.
  शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद न देता टाळ्या आणि थाळ्याचा उठवळपणा पाहून कीव येत होती. असंच जर चालू राहिलं तर आपली एकूण कुवत पाहता आपला इटली व्हायला वेळ लागणार नाही.
  अभ्यासपूर्ण लेखाबद्दल ( आपलं हरेक लेखन अभ्यासपूर्णच असतं 🙏🏻) मनापासून आभार...

  हा लेख मी अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवणं ही सांप्रत अवस्थेत माझी बांधीलकी आहे.

  ReplyDelete
 13. परफेक्ट मांडणी.....

  ReplyDelete
 14. लेख वाचून डोळे उघडल्याशीवाय रहाणार नाही

  ReplyDelete
 15. Chandrakant Kute24 March 2020 at 14:26

  सतर्कता..खूप छान लेख "शहाणे करुनी सोडावे सकळ जन."
  "दैवजात दुखेःभरता..दोष ना कुणाचा..
  पराधीन आहे जग़ती पुत्र मानवाचा"

  ReplyDelete
 16. 'एक दिवसाचा 'जनता कर्फ्यू' म्हणजे कोरोनाव्हायरसविरुद्धच्या लढाईतील जय नव्हता. एका दीर्घ लढ्यासाठी आपण तयार आहोत की नाही, हे पाहणारी ती चाचणी होती. चौथा टप्पा आता सुरू झाला आहे. कसोटी पाहणारा टप्पा. आपल्या संयमाची, सहनशीलतेची, धैर्याची परीक्षा इथं लागेल.'

  तुझा संपूर्ण लेख परिस्थितीचे गांभीर्य दाखविणारा आहेच; पण त्यात सर्वाधिक महत्त्वाचा आहे तो वरील परिच्छेद.

  आपल्याच नव्हे, तर जगभरातील लोकांना परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे लेखात अतिशय सोप्या भाषेत सांगितले आहे. आपल्याकडे तर विचारायलाच नको. मूर्खपणा करण्यात आम्हां भारतीयांचा हात कुणी धरू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. पण लोकांना उशिरा का होईना, भान येऊ लागले आहे. तथापि 'आपल्याला काही होत नाही' असा अतिरेकी विचार करणारे दहा-पंधरा टक्के लोक उर्वरित जनतेचे आरोग्य धोक्यात आणत आहेत. कठोर कारवाई केली तरच त्यांना आळा बसेल.

  तुझा हा लेख नेहमीपेक्षा वेगळा आणि डोळ्यांत अंजन घालणारा आहे.
  - प्रबोधचंद्र सावंत, पुणे

  ReplyDelete
 17. खूप छान आणि सविस्तर माहिती.
  - संदिपान तोंडे, किल्ले धारूर (बीड)

  ReplyDelete
 18. मन:पूर्वक धन्यवाद. खूपच छान माहिती दिली आहे.
  - देवेंद्र भुजबळ

  ReplyDelete
 19. चांगला आहे लेख. माझ्याकडून एक सांगते, आपली रोगप्रतिकारक शक्ती छान असते. तिच्यावर विश्वास ठेवा. जरा शिंक आली, तर घाबरू नका. साधारण सर्दी जशी आठेक दिवसात बरी होते, तशीच ही देखील १०-१२ दिवसांत बरी होते. न झाली तर मात्र डॉक्टर बघा. शांत राहा.
  - प्रियंवदा कोल्हटकर

  ReplyDelete
 20. सतीश,अगदी योग्य व अचूक विश्लेषण. प्रथम शासकीय अहवाल वाचत असल्यासारखे वाटत होते,परंतु आकडेवारी दिल्याने परिस्थितीचे गांभिर्य
  दाहकता व काळजी वाढली.
  नेहमीच जन मनाचे लेखन खिडकीत असल्याने तिची उंची मात्र वाढली आहे

  ReplyDelete
 21. नेहमीप्रमाणे उत्तम लिखाण व महत्वपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद

  ReplyDelete
 22. वस्तुनिष्ठ माहिती... संयत अभिव्यक्ती

  ReplyDelete

'हिंडता फिरता' अध्यक्ष उदगीरला लाभता

  'करून दाखवले!', असं काही कौतिकराव ठाले पाटील ह्यांनी कधी बोलून दाखवलं नाही. पण एखादी गोष्ट बोलून दाखवल्यावर करून दाखवण्याचाच त्या...