बुधवार, ८ एप्रिल, २०२०

इंग्लडला इटलीचे पत्र : तुमच्या भविष्यात हे वाढून ठेवलंय...

इटली सरकारने पूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर निर्मनुष्य दिसणारे रोम.
(सौजन्य - theguardian.com)

जूनही आटोक्यात येत नसलेल्या कोरोनाव्हायरसच्या साथीने युरोप खंड हवालदिल झालेला आहे. इटली, स्पेन आणि त्या पाठोपाठ इंग्लंडमधील परिस्थितीही चिंताजनक आहे. या साथीत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी २९.४७ टक्के रुग्ण इटली व इंग्लंड ह्या दोन देशांतील आहेत.

युरोपातील स्थिती अजून अतिगंभीर असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी (दि. ७ एप्रिल) स्पष्ट केले. खुद्द ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन अतिदक्षता विभागात दाखल आहेत. जीवरक्षक प्रणालीचा उपयोग करण्याची वेळ आलेली नाही, हेच सुदैव.
 
जागतिक आरोग्य आणीबाणी असलेल्या या साथीच्या काळात युरोपमधील या दोन महत्त्वाच्या देशांमध्ये काय साम्य आहे? इटलीच्या प्रसिद्ध कादंबरीकार फ्रांचिस्का मिलांद्री यांनी खुले पत्र लिहून ते दाखवून दिलं आणि ब्रिटिशांना जणू सावध केलं. 'द गार्डियन' दैनिकानं २७ मार्च रोजी त्यांचं हे पत्र प्रसिद्ध केलं. आमच्याच वाटेनं तुमचा प्रवास सुरू आहे, असं त्यांनी ब्रिटिश नागरिकांना सांगितलं. हे एक हजार शब्दांचं पत्र म्हणजे जणू एक उदास दीर्घकाव्य. त्यात जे लिहिलं आहे ते महत्त्वाचं आहेच; पण त्याच्या दोन ओळींमध्ये दडलेला अर्थ अधिक काही सांगणारा आहे.

आपल्याकडेही दोन आठवड्यांपासून लॉकडाऊन आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढताना दिसते. आजचे प्रश्न तर भंडावत आहेतच; पण उद्याचे प्रश्न त्याहून भेसूरपणे उभे राहू पाहतात. या पार्श्वभूमीवर हे पत्र आपल्यासाठीही फार महत्त्वाचं आहे. 'द गार्डियन'ने या लेखाचा अनुवाद करण्यास व तो मराठी वाचकांसाठी या ब्ल़ॉगवर प्रसिद्ध करण्यास परवानगी दिली. त्यानुसार या पत्राचा हा ५०० शब्दांतील भावानुवाद.

कोण आहेत फ्रांचिस्का मिलांद्री?
इटलीच्या प्रसिद्ध कादंबरीकार, पटकथालेखक आणि माहितीपट निर्मात्या असलेल्या फ्रांचिस्का मिलांद्री (इंग्रजी उच्चार फ्रान्सेस्का मेलांद्री) यांनी तरुण वयातच लिहिण्यास सुरुवात केली. पटकथेपासून त्यांच्या लेखनाचा श्रीगणेशा झाला. विविध चित्रपट, टीव्ही. मालिका यांसाठी त्यांनी लेखन केलं आहे. त्यांच्या अनेक माहितीपटांना पुरस्कार लाभले आहेत.

फ्रांचिस्का यांची पहिली कादंबरी 'एवा दोरमे' २०१०मध्ये प्रकाशित झाली. प्रकाशनानंतर दोन वर्षांमध्ये वेगवेगळी पारितोषिके लाभलेल्या या कादंबरीचा इंग्रजी, जर्मन, डच, फ्रेंच भाषांमध्ये अनुवादझाला. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांची दुसरी कादंबरी 'पियू अल्तो दिल मारे' प्रकाशित झाली. तीही वेगवेगळ्या पारितोषिकांची मानकरी ठरली.
...
टलीतून, तुमच्या भविष्यकाळातून तुम्हाला पत्र लिहितेय मी! आम्ही आता आहोत, तिथे अजून काही दिवसांनी तुम्ही पोहोचाल. महाभयंकर साथीचा आपल्या देशांचा आलेख अगदी सारखाच आहे.

आम्ही तुमच्यापेक्षा काही पावलंच पुढे आहोत. वुहान आमच्यापुढे काही आठवडे होतं, तसंच. तेव्हा आम्ही वागलो, तसंच आहे तुमचं वर्तन.

तुम्हाला घरातच थांबायला सांगितलं आहे. सगळ्यांत आधी तुम्ही खादाडी चालू कराल.

मोकळा वेळ सत्कारणी कसा लावावा, याची शिकवणी घेणारी 'सोशल नेटवर्किंग'ची डझनावारी संकेतस्थळे सापडतील. त्यांचे सदस्य बनाल, काही दिवसांनी विसराल.

'आता जगाचा विनाश अटळ आहे' असं सांगणारं साहित्य पुस्तकांच्या कप्प्यातून काढाल. ते वाचण्यात रस नाही, हे लवकरच लक्षात येईल.

तुम्ही खाण्यात रमाल. शांत झोप लागणार नाही. विचाराल, लोकशाहीत हे चाललंय काय?

मेसेंजर, व्हॉट्सअॅप, स्काईप, झूम... अशा संकेतस्थळांवर तुम्ही अविरत दिसाल.

वाढत्या वयाच्या मुलांची आठवण येत राहील. त्यांना कधी पाहता-भेटता येईल, हे सांगणं कठीणच, हे लक्षात आल्यावर छातीत बाकबुक होईल!

'आयुष्यात पुन्हा तोंड बघणार नाही, कधीच बोलणार नाही,' अशी शपथ ज्यांच्याबद्दल घेतली, त्यांनाच फोन लावाल. बऱ्याच बायांना घरात मारपीट होईल.

स्वतःचं घर नसल्यामुळे घरात राहता येत नाही, त्यांचे काय हाल असतील, विचारानं अस्वस्थ वाटेल. काही आणण्यासाठी म्हणून तुम्ही घराबाहेर पडाल. सुनसान रस्ते पाहून घाबरायला होईल; विशेषत: बाईमाणसाला. 'समाज असेच उद्ध्वस्त होतात का? एवढ्या झटपट?' स्वतःला बजावाल, असला विचार करायचा नाही. घरी आल्यावर खायला बसाल!

वजन वाढेल. फिट राहाण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचा शोध घ्याल.

सुपरमार्केटमधील रांगेत मित्र किंवा प्रियकर-प्रेयसीशी भेटायंचं तुम्ही ठरवाल. थोडा वेळ का होईना, प्रत्यक्ष बघता येईल म्हणून. 'सोशल डिस्टन्सिंग'चा नियम पाळून...

भोवतालच्या माणसांचं खरं रूप लख्खपणे दिसेल.

आजवर सर्वव्यापी असणारे पंडित, विद्वज्जन बातम्यांममधून गायब झालेले दिसतील. त्यांच्याबद्दल कोणाला काडीची सहानुभूती नसेल. ह्यांच काय ऐकायचंय, अशा मतापर्यंत लोक येतील.

ह्याच्या उलट, दुर्लक्ष केलेली मंडळीच धीर देणारी, विश्वासार्ह, चाणाक्ष असल्याचं उमगेल.

पृथ्वीगोलावर नवा डाव मांडण्याची ही सुसंधीच आहे, असं म्हणून ते ह्या गोंधळाकडं पाहायला शिकवतील. आपल्या ग्रहावरील कार्बन उत्सर्जन निम्म्याने कमी झालंय, असा मोठा परिप्रेक्ष्य दाखवतील.

खरंय. पण पुढच्या महिन्याचा खर्च कुठून भागवायचा?

नवं जग जन्मास येताना पाहण्याचं भाग्य लाभल्यानं हरखून जायचं की हबकून जायचं? कळणार नाही!

आम्ही बाल्कन्यांमध्ये उभे राहून ऑपेरा गात होतो, तेव्हा तुम्ही 'ते बघा ते इटालियन' असे कौतुकोद्गार काढले. तुम्हीही खिडक्यांमध्ये, हिरवळीवर बसून  'आम्ही जगणार आहोत' अशा आशयाची प्रेरणादायी गीते गाल. वुहानमधील रहिवासी फेब्रुवारीमध्ये अशीच गाणी गात होते. आम्ही गात होतो तेव्हा ते मान डोलवत होते. अगदी तसंच आम्ही करू.

'लॉकडाऊन' उठल्यावर लगेचच घटस्फोटासाठी अर्ज करायचा, अशीच प्रतिज्ञा करून तुमच्यातले खूप जण गाढ झोपतील.

अनेक मुलांचा जन्म निश्चित होईल.

तुमच्या मुलाची ऑनलाईन शाळा सुरू होईल. त्यांच्याबद्दल 'काय उच्छाद मांडतात कार्टी' असं वाटेल आणि 'किती गुणाचं गं लेकरू माझं' असंही.

'घराबाहेर पडून साथीची लागण करून घेऊन वर जाऊ नका,' असं बजावत वयोवृद्धांना अडवावं लागेल.

अतिदक्षता विभागात एकाकी पडून येणाऱ्या मृत्यूचा विचार टाळायचा, असं बजावत राहाल मनाला.

सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वाटेवर गुलाबाच्या पायघड्या घालाव्या वाटतील तुम्हाला.

हे सारं महाकठीण आहे, अशी जाणीव तुम्हाला कोणत्या तरी क्षणी होईल. घाबरून प्रियजनांजवळ बोलून दाखवाल किंवा कशाला काळजीत भर घालायची, असं म्हणत ते गुपित काळजातच कोंडून ठेवाल.

खादाडी पुन्हा चालू होईल.

हे भविष्यकथन अगदीच जुजबी आहे.

नजिकच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय, याचा अंदाज ना तुम्हाला, ना आम्हाला! एवढं नक्की की, हे सारं संपेल तेव्हा जग कालच्यासारखं खचितच नसेल!

© Francesca Melandri 2020
...

(Guardian News & Media Ltd यांच्या सौजन्याने)
(लेखाचे सर्व बौद्धिक संपदा अधिकार 'द गार्डियन' व लेखिका यांच्याकडे आहेत. त्यांच्या सूचनेनुसार या अनुवादाचा पूर्ण अथवा संपादित अंश परवानगीविना वापरण्यास मनाई आहे.)
....
(अनुवादासाठी डॉ. नचिकेत विजय पोतदार व ईशान कुलकर्णी यांचे सहकार्य मिळाले.)
....
पूर्ण व मूळ इंग्रजी लेख वाचण्यासाठी दुवा
https://www.theguardian.com/world/2020/mar/27/a-letter-to-the-uk-from-italy-this-is-what-we-know-about-your-future

११ टिप्पण्या:

  1. कटु सत्य परखड भाषेत मांडलंय. जे स्वतः भोगलंय ते दुसऱ्या ला भोगावं लागणं अटळ आहे याची काहीशी खंतही आहे लेखनात. आणि भयंकर संकटात मनुष्यप्रवृत्ती कशी होऊ शकते याची चुणूक ! भाषांतर करणा-यांना धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  2. मुकता बर्वे यांनी वाचन केले आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. मूळ लेखाचा अनुवाद अगदी छान जमून आलाय सर! तसं म्हणायला गेलं तर तुमचं लेखन मला नेहमीच भावतं आपलंसं वाटत पण आता तर तुमचं अनुवादही भावला मुळात इतक चांगलं पत्र तुम्ही स्वतः वाचून त्याचा अनुवाद करून आमच्या सारख्या अनेक रसिकांवर आपण एक प्रकारे साहित्याची एक नवी मेजवानीच उपलब्ध करून दिली आहे ।।आणि सगळयात महत्वाचं म्हणजे भिषण वास्तवाची जाणिव..

    उत्तर द्याहटवा
  4. खूप अस्वस्थ करणारा; पण मराठी लेख चांगला उतरला आहे.
    - प्रकाश बाळ जोशी, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  5. महोदय,
    कोरोनामुळे सार जग दार-खिडक्या बंद करून घरात बसलं असतांना आपण मात्र आपली खिडकी उघडी ठेऊन ज्या पोटतिडकीने कोरोनाबाबत लिखाण करत आहात त्याची दाद देतो.
    'Deserted Rom' चे छायाचित्र पाहिल्यानंतर सजीवाशिवाय 'सृष्टी'ची भयानक कल्पना येते.

    मृत्युच्या दारात उभा राहिल्यानंतर जे सुचतं ते म्हणजे हे पत्र..! अशा पत्राचा भावानुवाद करण्याचं जे आपणाला सुचलं हि आपली तळमळ. भावानुवाद भावाला.
    धन्यवाद......!

    श्रीराम वांढरे.
    भिंगार, अहमदनगर.

    उत्तर द्याहटवा
  6. मूळ लेखक,अनुवादक व निवेदिका मुक्ता बर्वे या सर्वांचे आभार! त्यामुळे इटलीतील एका लेखिकेच्या भावना महाराष्ट्रातील मराठी लोकपर्यंत पोहोचल्या.हे कटू सत्य आहे. कोरोनाचे हे वैश्विक संकट आहे.परंतु, भविष्यकाळात येऊ पाहणाऱ्या वैश्विक महासंक टाची ही रंगीत तालीम तर नाही ना? - भालचंद्र देशपांडे, हडपसर,पुणे.

    उत्तर द्याहटवा
  7. मित्रा, आज 'खिडकी'तून पाहताना उद्याचं एक भेसूर चित्र दिसत असल्याचं जाणवत होतं. काल इटलीची अवस्था होती, ती उद्या इंग्लंडची. कदाचित परवा आपली? वाचताना सतत असंच वाटत होतं.

    कोरोनामुळे जाणारे बळी, लॉकडाऊन, त्यानंतर रसातळाला जाणारी अर्थव्यवस्था ह्या सगळ्याचं चित्र तू पत्राच्या मुक्तानुवादातून उभं केलं आहेस...

    लिखाण म्हणून जेवढं यश मूळ प्रथितयश लेखिकेचं, तितकाच तू केलेला मुक्तानुवाद समर्थ... खरंच मनाला भिडतं आणि भविष्य सांगतं हे पत्र!
    - प्रबोधचंद्र सावंत, पुणे

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...