Thursday 26 May 2016

‘दिल की बात!’

बँड वाजवून, ढोल-ताशे बडवून दोन वर्षांपूर्वी मोदी सरकार सिंहासनारूढ झालं. त्या वेळच्या आनंदाच्या लाटा आता काहीशा ओसरल्या आहेत. उत्साहाच्या वाटाही बंद झाल्या की काय, असं वाटू लागलं आहे. मोदी सरकारच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त इथेच वर्षापूर्वी बाई आणि भाई असा लेख लिहिला होता. त्यानंतर अजून एक वर्ष गेलं. या सरकारबद्दल सामान्यजनांच्या मनातले आम आदमीने जाणून घेतलेले भाव.
















पुन्हा एकदा बोलबाला
सव्वीस मे जवळ आला
दिवस हॅप्पी बर्थडेवाला
कसा करावा साजरा बोला!

रांगोळीने सजवावे अंगण
लाल किल्ल्या बांधावे तोरण?
आकाशी सोडावा मोठ्ठा फुगा?
की रोषणाईने दीपवावे जगा?

यमुनेच्या तिरी भरवू मेळा 
भाईयों-बहनों साद घाला
पुन्हा भक्तजन करू गोळा 
जुनाच खेळ नव्यानं खेळा 

केक कापूया भला थोरला,
बर्गर नि पिझ्झा इटलीवाला
नको! बरा अपुला तो ढोकळा
चाट-पापडी अन्‌ मिर्च-मसाला 

नमो-नमोचा जपावा मंत्र
कॉंग्रेसमुक्तचे शिकावे तंत्र
साठ साल-साठ सालचा जप
करीत राहावा अत्र-तत्र-सर्वत्र

नवसा-सायासाचं लेकरू
बोलतंय कधीचं चुरुचुरू
चालेल ना पण तुरुतुरू?
की तेवढंच गेलंय विसरू?

द्यावी त्याला बार्बी विदेशी.
की बरी आपली ठकीच देशी?
मेक इनचा होईल दाखला
मेड इन इंडियाचा बोलबाला

बिहार,
 जेएनयू, उत्तराखंड
तयांमुळे झाला की मुखभंग
पुण्यामधली एफटीआयआय
तिनं केलं दे माय धरणी ठाय

शिजेना डाळ,
 रडवतोय कांदा
त्यामुळं झाला ­खाण्याचा वांधा
दुष्काळामुळं फोडलाय टाहो
सरकार असूनही दिसंना का हो?

झालीत पुरती वर्षं दोन
उरलीत आता बाकी तीन
भाई, कुछ देते क्यूँ नही ?’
विचारतेय जनता चिनभिन

आल्या आहेत योजना बावन
मिळू द्या घर, जनांकडे धन
सुकन्या होईल समृद्ध-संपन्न
कोमात का हो स्वच्छता मिशन?

स्मार्ट होताहेत महानगरे
खेड्यांचेही बदला की चेहरे
स्वच्छ होतेय भगीरथाची गंगा
मंत्र राहू द्या तोच, न खाऊँगा

एवढ्यात कुठला नाही गफला
दृष्ट लागण्याएवढाही नसे घोटाळा
परदेशात रंगवली प्रतिमा छान
ताठही राहिलीय देशाची मान

तरीही घार उडू द्यावी आकाशी
चित्त असो द्यावे पिलापाशी
तळावरच राहू द्यावं विमान
आपला देश नि आपलंच इमान

सांगू नका पेंड खातंय घोडं
बदलू द्या देश, जाऊ द्या पुढं
मन की बातचं एक म्हणणं
लई न्हाई राव आमचं मागणं

नको नको लाखांच्या बाता
दिल्या वचनांची करी पूर्तता
अच्छे दिनची हवीय हमी
आशाळभूत एक आम आदमी
--------
(पूर्वप्रसिद्धी - दैनिक सकाळ, 23 मे 2016)
(व्यंग्यचित्र सौजन्य – श्रेयस नवरे, हिंदुस्तान टाइम्स)

1 comment:

  1. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर गेले २ वर्षे त्यांच्या तमाम समर्थकांचे भक्तिपर्व सुरू होते.मोदींना देवस्थानी मानून त्यांच्या आरत्या ओवाळताना समर्थक दिसत होते ,परंतु त्यांचा हा करिष्मा आता ओसरताना दिसतोय.'अच्छे दिन ' येण्याची स्वप्न पाहणाऱ्यांच्या संयमाचा बांध आता तुटायला लागला आहे . त्यातच सरकार आणि पक्षाचे केंद्रीकरण एकट्या मोदींभोवती झाले असल्याने दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेत्यांची मुस्कटदाबी होत असल्याचे चित्र आहे. सत्येचे विकेंद्रीकरण होण्याची गरज निर्माण झाली आहे .
    देशाच्या विकासासाठी ठोस कृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. दोन वर्षात मोदी सरकारच 'बाळसं' मोडलं असून आता विकासाच्या मार्गावर धावण्याची वेळ आली आहे . असे न झाल्यास दगडाला देव मानणाऱ्या या देशात देवाचाही दगड व्हायला वेळ लागत नाही याचे भान पंतप्रधानांनी ठेवायला हवे .

    ReplyDelete

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...