मंगळवार, १५ जुलै, २०२५

ओह! लॉर्ड्स... 😭😭

 


महंमद सिराज... प्रतिकाराला पूर्णविराम.
अडवूनही चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळलाच.
....................
सनसनाटी म्हणता येईल असा झाला तिसरा कसोटी सामना. त्यातल्या
प्रत्येक दिवसाचा रंग वेगळा होता. आशा दाखविणारा आणि निराश करणाराही. रवींद्र जाडेजा ह्यानं झुंजार खेळ करूनही भारत विजयापासून लांब राहिला. त्याची कारणं बरीच. पहिल्या डावात आघाडी मिळविण्याची गमावलेली संधी, दुसऱ्या डावात इंग्लंडला दिलेला बाईज धावांचा बोनस आणि आघाडीच्या फळीनं केलेली ढिसाळ फलंदाजी...
....................

लॉर्ड्सच्या मैदानावर विजयी पताका फडकवण्याची संधी गमावली. अँडरसन-तेंडुलकर करंडक कसोटी मालिकेत २-१ आघाडी मिळविण्याचीही संधी निसटली. कसोटी सामन्यांचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या सामन्यात भारत हरला. पाहता पाहता विजय दूर होत गेला. हळहळ वाटायला लावणारा हा पराभव.

‘सनसनाटी!’ ह्या सामन्याला असं विशेषण लावता येईल. त्याला रंगतदार म्हणता येईलच. पाचही दिवस चुरशीचा खेळ झाला. प्रत्येक दिवसातल्या सत्रागणीक पारडं हलकं नि जड होत राहिलं - कधी पाहुण्यांचं, तर कधी यजमानांचं. पण जखमी असूनही संघाची गरज म्हणून सहा षट्कं टाकणाऱ्या शोएब बशीरचा पस्तिसावा चेंडू महंमद सिराजनं अडवूनही यष्ट्यांवर जाऊन आदळला. त्या क्षणी इंग्लंडचं पारडं कायमस्वरूपी जड झालं! विजयावर शिक्कामोर्तब!!

पराभव स्वीकारणं अवघड असतंच. पण असे हे निसटते वाटणारे पराभव पचवणं फार जड जातं. आता लक्षात येतं की, ह्या पराभवाचं बीज पहिल्या दिवशीच पडलं होतं. पहिल्या डावातील आघाडी घेण्याची संधी घालवून त्या बीजारोपणाला खतपुरवठा केला. चौथ्या दिवशी भरपूर बाईज देऊन आणि शेवटच्या तासाभरात चार गडी गमावत त्याला पुरेसं पाणी दिलं होतं. त्याचीच फळं मिळतील, हे पाचव्या दिवशीच्या पहिल्या दोन तासांत आणखी चार गडी गमावून निश्चित केलं.

नेमक्या मोक्याच्या वेळी भारताची आघाडीची फळी कच का खाते? धावा फक्त २०० करायच्या होत्या आणि त्यासाठी दिवसभराहून अधिक वेळ होता. खेळपट्टीवर टिकून राहिलं असतं तरी त्या निघाल्या असत्या. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेनं ते दाखवून दिलं होतं. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी आवश्यक होतं तेव्हाच हे केलं नाही.

जयस्वाल आणि नायर
यशस्वी जयस्वाल फक्त स्वतःसाठी खेळतो का, असा प्रश्न विचारण्याची आणि त्याचं उत्तर शोधण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे. विनोद कांबळी आणि पृथ्वी शॉ ह्यांच्याच वाटेनं तो चालला आहे, असं म्हणणं घाईचं होईल का? आपल्या तिसऱ्या कसोटीत त्रिशतक झळकावणाऱ्या करुण नायर ह्याचा अध्याय आता संपल्यात जमा आहे. त्या त्रिशतकानंतरच्या १० डावांत त्याला पन्नाशीही गाठता आलेली नाही. एकच कसोटी खेळल्यानंतर बाहेर बसलेला साई सुदर्शन पुनरागमनासाठी उत्सुक असेल.

शेपटानं प्रतिकार केला नसता, तर भारताचा हा पराभव कदाचित अधिक मोठा असला असता. पाचव्या दिवशी उपाहारानंतरच्या तासाभरात तो झाला असता. अनुभवी रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह आणि महंमद सिराज ह्यांनी तो लांबणीवर टाकला. टिच्चून खेळत त्यांनी पराभवाचं अंतर कमी केलं. दोन्ही डावांमध्ये भारतानं दिलेल्या इतर धावांपेक्षा कमीच!

शेवटचे चार नि आघाडीचे पाच

एक अपयशी झुंज...
जाडेजा दुसऱ्या डावात संघाच्या वाट्याला आलेले ४० टक्के
चेंडू खेळला नि धावा केल्या 
३५ टक्के!
...............
भारताचा दुसरा डाव ७४.५ षट्कं म्हणजे ४४९ चेंडू चालला. त्यातले १८१ चेंडू सातव्या क्रमांकावर आलेला रवींद्र जाडेजा खेळला. म्हणजे ४० टक्क्यांहून थोडे जास्त. (आणि त्याच्या धावा ३५ टक्के!) पहिल्या सहा फलंदाजांनी मिळून खेळलेल्या चेंडूंपेक्षा ५१ जास्त. शेवटचे तिघे - नितीशकुमार रेड्डी, बुमराह व सिराज मिळून १३७ चेंडू खेळले. फलंदाज म्हणून घेतलेल्या पाच जणांपेक्षा १८ जास्त. ह्या चौघांनी डावातल्या ८१ टक्के चेंडूंचा सामना केला. डावातील ४८ टक्के धावा त्यांनी केल्या. जाडेजा आणि राहुल ह्या दोघांच्या धावांची बेरीज १०० होते. थोडक्यात हिशेब मांडायचा तर गोलंदाजांनी कमावलेलं फलंदाजांनी बेफिकिरीने घालवलं.

कर्णधारपदाचा फारसा अनुभव नसलेल्या शुभमन गिल ह्याला प्रतिस्पर्धी कर्णधाराकडून बरंच काही शिकता आलं असेल, असं म्हणता येईल. सामन्याचा मानकरी ठरलेल्या बेन स्टोक्स ह्यानं दोन्ही डावांत किल्ला लढविला. पहिल्या डावात शतकवीर जो रूटबरोबर महत्त्वाची भागीदारी केली. मग नेहमीप्रमाणे चेंडू हातात घेतल्यावर लगेच संघाला यश मिळवून दिलं. एखाद्या ॲथलीटसारखी चपळाई दाखवत तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत ह्याला धावचित केलं. पहिल्या डावात आघाडी मिळवण्याचं भारताचं स्वप्न तिथंच भंगलं. दुसऱ्या डावातही त्यानं ३३ धावा केल्या आणि तीन बळी मिळवले. निकाल लागेपर्यंत त्यानं प्रयत्नात कोणतीही कुचराई ठेवली नाही.

लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर यजमान संघाचा कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक ह्यांना हवी तशी खेळपट्टी मिळाली नाही, असं ‘द गार्डियन’च्या बातमीत म्हटलं होतं. त्यामुळे यजमानांचं फार काही बिघडलं नाही, हे पहिल्याच दिवशी दिसून आलं. पहिल्या दिवसाअखेर त्यांनी चार गडी गमावून अडीचशेचा टप्पा पार केला. दुसऱ्या कसोटीतील हीरो आकाशदीप इथं झीरो ठरलेला दिसला. विश्रांती घेऊन संघात परतलेल्या जसप्रीत बुमराहच्या बरोबर नवा चेंडू महंमद सिराजऐवजी त्याच्या हातात आला. पण भारताचा सर्वांत महागडा गोलंदाज तोच ठरला.


तिसऱ्या कसोटीतील एकमेव शतकवीर
जो रूट ह्याच स्वीपचा हुकुमी फटका.
.............................
रूट-स्टोक्सची भागीदारी
चौथा गोलंदाज म्हणून नितिशकुमार रेड्डी आला आणि त्यानं पहिल्याच षट्कात दोन झटके दिले. दोन्ही सलामीवीरांना त्यानं यष्टिरक्षक ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. त्यानंतर पोप-रूट जोडीनं पडझड होऊ न देता शतकी भागीदारी केली. त्यांनी फटक्यांची आतषबाजी केली नाही. कसोटीला साजेसा खेळ केला. तो बऱ्याच दिवसांनी पाहायला मिळाला. स्टोक्सनं मग रूटला चांगली साथ देत, ७९ धावांची भागीदारी केली. खुद्द कर्णधार मैदानात असतानाही त्याच्या संघानं बॅझबॉल शैलीचा खेळ आज केला नाही, ही सलामीच्या दिवशीची गंमत.

बुमराहनं दुसऱ्या नव्या चेंडूवर दुसऱ्या दिवशी सकाळीच करामत केली. आधी त्यानं बेन स्टोक्सची ऑफची यष्टी वाकविली. पुढच्या षट्कात शतकवीर रूटची मधली यष्टी गुल झाली. पुढच्याच चेंडूवर ध्रुव जुरेलकडे झेल देऊन ख्रिस वोक्स परतला. पहिल्या दिवसाच्या धावांमध्ये जेमतेम २० धावांची भर पडली असताना यजमान संघाने तीन गडी गमावले होते.

तीन त्रिफळे
हा दिवस बुमराहचा होता. त्यानं पुन्हा एकदा डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली. आपण पहिल्या नंबरचेच आहोत, हे त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं. त्याच्या पाच बळींपैकी तीन वरच्या फळीतले आहेत - ब्रूक, स्टोक्स आणि रूट; तिघांचाही त्रिफळा उडालेला.

‘लक्ष दे रे. नाही तर पुन्हा म्हणशील मी तयार नव्हतो..!’ लॉर्ड्स कसोटीत पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात महंमद सिराज ह्यानं पहिल्या स्लिपमध्ये उभ्या राहिलेल्या के. एल. राहुल ह्याला सुनावलं होतं म्हणे. राहुलनं ते दुसऱ्या दिवशीच्या सकाळीही लक्षात ठेवायला हवं होतं. सिराजच्या सोळाव्या आणि डावातल्या ८७व्या षट्कातल्या तिसऱ्या चेंडूवर त्यानं जेमी स्मिथ ह्याचा झेल सोडला. ह्या झेलाबरोबर भारतानं इंग्लंडला तीनशेच्या आत-बाहेर, फार तर सव्वातीनशेच्या आत गुंडाळण्याची संधी सोडली.

नेहमीप्रमाणंच जेमी स्मिथनं परिस्थितीचं दडपण घेतलं नाही. ब्रिडन कार्स ह्याला जोडीला घेऊन त्यानं ७४ धावांची अतिशय महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ती बऱ्यापैकी निर्णायक ठरली, असं आता म्हणता येईल. स्मिथनं सलग तिसऱ्यांदा पन्नाशीपुढे मजल मारली आणि नवव्या क्रमांकावर आलेल्या कार्स ह्यानंही तुलनेनं आक्रमक अर्धशतक झळकावलं. डावातला एकमेव षट्कार त्याच्याच नावावर होता.
भारतीय क्षेत्ररक्षकांच्या रूपाने दुर्दैवानं सिराजची पाठ सोडली नाही. त्याच्या गोलंदाजीवर कार्सला आकाशदीप आणि जुरेल ह्यांनी जीवदान दिलं. शेवटच्या तीन जोड्यांसाठी इंग्लंडला शंभराहून अधिक धावा  करू देण्याची चूक भारताला महाग पडलं.

स्टोक्स मदतीला धावलाच
यशस्वी जयस्वाल ह्यानं पहिल्याच षट्कात वोक्सला तीन चौकार मारत आतषबाजीची झलक दाखविली. पण पुनरागमन करणाऱ्या जोफ्रा आर्चर ह्यानं तिसऱ्याच चेंडूवर त्याला परतवलं. संघ व्यवस्थापनानं पुन्हा एकदा विश्वास टाकलेल्या करुण नायरनं आर्चरलाच नंतर दोन चौकार लगावले. राहुल - नायर जोडी जमते आहे, असं वाटत असतानाच इंग्लंडच्या मदतीला स्टोक्स आला. प्रत्येक वेळी त्यानं गोलंदाजीला आल्यावर संघाला यश मिळवून दिलेलं आहे. ह्या डावात चाळिशीपर्यंत गेलेल्या नायरचा रूटने स्लिपमध्ये सुंदर झेल घेतला.

कर्णधार शुभमन गिल ह्याला वोक्सनं स्मिथकडे झेल द्यायला लावला, तेव्हा संघाचं शतक नुकतंच झालं होतं. जखमी ऋषभ पंत कधी खेळायला येणार, ह्याबाबत संभ्रम असताना तो पाचव्या क्रमांकावरच आला. त्यानं आणि राहुलनं शेवटची तीन षट्कं अतिशय संयमानं खेळून काढली. तिसऱ्या दिवशी भारतानं आघाडी मिळविण्याच्याच उद्दिष्टानं खेळायला हवं होतं. पण शेवटचे चार खेळाडू अवघ्या बारा धावांची भर घालून बाद झाले.

राहुलचं शतक लवकर पूर्ण व्हावं, ही पंतची इच्छा त्याच्या अंगलट आली. त्यानंतर लगेच राहुलही परतला. जाडेजा, सुंदर आणि रेड्डी ह्यांच्यामुळे भारताला किमान बरोबरी तरी साधता आली. चौथ्या डावात आपल्याला धावांचा पाठलाग करायचा आहे, ह्याची जाणीव त्यांनी ठेवली नाही. त्याची किंमत २२ धावांच्या पराभवाच्या रूपाने चुकवावी लागली. कारण फलंदाज उभं राहतो, त्या भागातील धूळ उडत असल्याचं दुसऱ्या दिवशीच दिसलं होतं.

ह्या सामन्याच्या चार दिवसांनी वेगवेगळे रंग दाखवले. पहिल्या दिवशी कसोटीला साजेसा संथ खेळ झाला. गडी फक्त चार बाद झाले. दुसऱ्या दिवशी धावांची गती वाढली आणि बळींची संख्याही. तीस धावा आणि पाच गडी अधिक. तिसऱ्या दिवशी सर्वांत कमी धावा झाल्या - २४४ आणि गडी बाद झाले सात. चौथ्या दिवशी १४ फलंदाज बाद झाले आणि धावा निघाल्या २४८. शतक सोडा, कोणाचं साधं अर्धशतकही झालं नाही, असा हा एकमेव दिवस.

चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात हुकमी एक्का जसप्रीत बुमराह चालत नसताना महंमद सिराज ह्यानं दोन बळी घेतले - त्याला नितिशकुमार रेड्डी आणि आकाशदीप ह्यांनी साथ दिली. जो रूट आणि बेन स्टोक्स ह्यांची जोडी जमली होतीच. त्यांनी पाचव्या जोडीसाठी ६७ धावांची भागीदारी केली. पहिल्या डावाप्रमाणेच ही जोडी त्रास देणार असं दिसत होतं.

वॉशिंग्टनच्या फिरकीचं जाळं
चहापानाच्या थोडं आधी वॉशिंग्टन सुंदर ह्यानं ही जोडी फोडली. आपल्या तिसऱ्या षट्कात त्यानं रूटचा लेग स्टंप वाकवला. आकार घेत असलेल्या भागीदारी संपली. त्यानंतर आला होता आतापर्यंत धोकादायक ठरलेला जिमी स्मिथ. पण त्यालाही वॉशिंग्टननं टिकू दिलं नाही. त्याची ऑफची यष्टी त्यानं उखडली! वॉशिंग्टनच्या फिरकीचं जाळं आणि बुमराहचा धारदार मारा ह्यामुळे इंग्लंडची कोंडी झाली होती. त्यांनी शेवटचे सहा गडी ३८ धावांत गमावले. गमतीची गोष्ट म्हणजे ह्या मालिकेतली सर्वांत कमी धावसंख्या करणाऱ्या इंग्लंडचा एकही फलंदाज शून्यावर बाद झाला नाही. त्यांच्या सात फलंदाजांचा त्रिफळा उडाला, तर एक पायचित झाला.

दुसऱ्या डावात भारतानं चार गडी गमावल्यानंतरही चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यावर वॉशिंग्टन सुंदर ‘आम्हीच जिंकणार’ असं आत्मविश्वासानं सांगत होता. त्या आत्मविश्वासाला साजेसा खेळ करणं त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना पाचव्या दिवशी जमलं नाही. जोफ्रा आर्चर, स्टोक्स आणि वोक्स ह्यांच्यापुढे भारतीयांनी नांगी टाकली. अपवाद जाडेजा ह्याचा. दोन्ही संघांच्या दुसऱ्या डावातलं एकमेव अर्धशतक त्याचं. इंग्लंडला दुसऱ्या डावात बाईजच्या रूपात २५ धावांचा बोनस मिळाला होता. तो फार महागात गेला.

मालिका संपली नाही. दोन कसोटी बाकी आहेत. त्यात भारत दुसऱ्या सामन्याप्रमाणे उसळी मारून वर येईल का? त्यासाठी संघात काही बदल करावे लागतील. मैदानावर आक्रमक वागण्यापेक्षा खेळातली आक्रमकता वाढवावी लागेल. असं झालं तर इंग्लंडला नमवणं फार अवघड नाही.
.........
(छायाचित्रं सौजन्य - ‘आय. सी. सी.’,  ‘द गार्डियन’ व बी. सी. सी. आय.)
.........

#भारत_इंग्लंड #कसोटी_मालिका #अँडरसन_तेंडुलकर_करंडक #तिसरी_कसोटी #लॉर्ड्स #बेन_स्टोक्स #बुमराह #जेमी_स्मिथ #वॉशिंग्टन_सुंदर #जो_रूट #जोफ्रा_आर्चर
.........

सोमवार, ७ जुलै, २०२५

नवा नेता, नवा इतिहास

सामना अनिर्णीत राखणं, एवढंच मर्यादित उद्दिष्ट
बेन स्टोक्स आणि त्याच्या सहकाऱ्यांपुढे पाचव्या दिवसासाठी होतं.
पावसानं हजेरी लावल्यानंतरही इंग्लंडला पराभव टाळता आला नाही.
दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवून भारतीय संघानं
एजबॅस्टनवर नवीन इतिहास लिहिला.
कर्णधार शुभमन गिल, आकाशदीप, सिराज, जाडेजा,
सुंदर हे त्याचे शिल्पकार होत!
......................................


सामन्याचा मानकरी तो ठरला असला, तरी त्या पदकावर आणि शाम्पेनच्या
बाटलीवर ह्यानंही अधिकार सांगितला होताच की!

------------------------------
सामना जवळपास पाच दिवस चालला. धावा निघाल्या सतराशेच्या आसपास. दोन्ही संघांचे मिळून ३६ गडी बाद झाले. म्हणजे रोज सरासरी तीनशेहून अधिक धावा आणि पाच गडीही बाद. एकूण शतकं चार आणि अर्धशतकं सहा. सामन्यात १० बळी घेणारा एक गोलंदाज आणि डावात पाच वा अधिक गडी बाद करणारे त्याच्यासह दोघं. आणि सामन्याचा निकाल लागलेला. दणदणीत म्हणावा असा विजय पाहुण्या संघानं यजमानांवर मिळवला. आठवड्यापूर्वीच्या पराभवाची साभार नि सहर्ष परतफेड!

एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इथे झालेल्या भारत व इंग्लंड संघांमधील दुसऱ्या कसोटी सामन्याची ही रंगलेली कहाणी. सामन्याचा निकाल एकतर्फी लागेल, हे चौथ्या दिवशी आणि त्यातही शेवटच्या सत्रात स्पष्ट झालं. इंग्लंडपुढे एव्हरेस्ट सर करण्यासारखं आव्हान होतं आणि दुसऱ्या डावातले तीन गडी त्यांनी गमावलेले.

सामना अनिर्णीत राखणं, एवढंच मर्यादित उद्दिष्ट बेन स्टोक्स आणि त्याच्या सहकाऱ्यांपुढे पाचव्या दिवसासाठी होतं. ते अवघड होतंच आणि पावसानं दिवसाच्या सुरुवातीलाच हजेरी लावल्यानंतरही इंग्लंडला पराभव टाळता आला नाही. ह्या पावसामुळे भारतीय चाहत्यांची धडधड सकाळी वाढली होती. पण निसर्गानंही साथ दिली. बर्मिंगहॅममध्ये आठपैकी सात कसोटी सामन्यांत पराभूत झालेल्या भारतानं नवव्या सामन्यात नव्या दमाच्या नेतृत्वाखाली नवा इतिहास लिहिला.

एकटा गिलच भारी
आकड्यांचाच आधार घेऊन बोलायचं तर ह्या सामन्याची किती तरी वैशिष्ट्यं सांगता येतील. भारताचा कर्णधार शुभमन गिल ह्यानं सामन्यात एकूण ४३० धावा केल्या. इंग्लंडला एकाही डावात तेवढ्या करता आल्या नाहीत. त्यानं पहिल्या डावात केल्या, त्याहून फक्त दोन अधिक धावा इंग्लंडला दुसऱ्या डावात करता आल्या. (शेवटच्या दोन जोड्यांनी टोलवाटोलवी करीत ४५ धावांची भर घातलेली, इथे लक्षात घेतली पाहिजे.)

शुभमनचं पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात आक्रमक दीडशतक. इंग्लंडकडून पहिल्या डावात तुफानी खेळ करणाऱ्या यष्टिरक्षक जेमी स्मिथच्या नाबाद १८४ धावा. दुसऱ्या डावातही त्याच्याच धावा सर्वाधिक - ८८. पराभव अटळ आहे हे लक्षात आल्यावर इंग्लंडच्या फलंदाजांनी चार षट्कार ठोकले. त्यातले दोन नवव्या व अकराव्या क्रमांकावरच्या गोलंदाजांचे. भारताने चौथ्या दिवशी, दुसऱ्या डावात एक दिवशीय सामना खेळत असावा, त्या गतीने धावा केल्या. त्यात एकूण १३ षट्कार आणि पैकी आठ गिलचे. इंग्लंडच्या दोन्ही डावांतील षट्कारांची संख्या ११ आणि दोन्ही डावांमध्ये स्मिथने षट्कारांचा चौकार मारलेला.

सर्वांत मोठी भागीदारी पराभूत संघाची
सामन्यातली सर्वांत मोठी भागीदारी विजयी संघाची नव्हती, तर पराभूत संघाकडून झालेली. निम्मा संघ शंभराच्या आत गारद झालेला. समोर आव्हानं ६०० धावांच्या जवळचं. त्याचं अजिबात दडपण न घेता, किंबहुना ते झुगारून हॅरी ब्रूक व स्मिथ ह्यांनी सहाव्या जोडीसाठी त्रिशतकी भागीदारी केली. त्या डावातली त्यांच्याकडून तेवढीच एक शतकी भागी. संपूर्ण सामन्यातील चौदापैकी दोनच सत्रांवर इंग्लंडचं वर्चस्व होतं आणि त्याचं कारण ही भागीदारी आकार घेत होती.

गंमत अशी की, दुसऱ्या डावातही सर्वांत मोठी भागीदारी सहाव्या जोडीसाठीच झाली. त्यातला एक भागीदार पुन्हा स्मिथच होता आणि त्याचा जोडीदार कर्णधार बेन स्टोक्स. पहिल्या डावात ५ बाद ८४ आणि दुसऱ्या डावात ८३. ह्या वेळची भागीदारी डावातली सर्वाधिक असली तरी फक्त ७० धावांची. पराभवाची नामुष्की थांबविण्याची ताकद तीत नव्हती.


जाडेजा आणि गिल. पहिल्या डावातील ह्यांच्या भागीदारीनं
विजयाचा पाया रचला.
------------------------------
भारतीय संघाची सामन्यातील सर्वांत मोठी द्विशतकी भागीदारी पहिल्याच डावातली आणि सहाव्या जोडीसाठी. ती गिल आणि रवींद्र जाडेजा ह्यांची. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या रूपाने पुन्हा एका फिरकी गोलंदाजाला साथीला घेऊनच गिलने सातव्या जोडीसाठी दीडशतकी भागीदारी केली. गिल व जाडेजा ह्यांनी दुसऱ्या डावातही पावणेदोनशे धावांची भागीदारी केली. सातव्या आणि सहाव्या क्रमांकावर येऊन अर्धशतकं झळकावण्याची कामगिरी एकट्या जाडेजालाच साधली!

सहा जणांचा भोपळा
ब्रूक आणि स्मिथ ह्यांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडनं फॉलो-ऑन वाचविला. पण संघाच्या फलंदाजीची वैगुण्यं त्याच डावात दिसून आली. संघाच्या धावा चारशे पार आणि तरीही सहा फलंदाजांना भोपळा फोडण्यात अपयश! दोघे शतकवीर सोडले, तर इतर दोघांनाच दुहेरी धावा करता आलेल्या.

दुसऱ्या डावात मात्र सलामीवीर झॅक क्रॉली हा एकटाच भोपळ्याचा मानकरी. तळाच्या दोघांसह आठ फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठलेली. पण खेळपट्टीवर टिकाव कोणी धरला नाही. अपवाद स्मिथ आणि काही काळ स्टोक्स ह्यांचा. परिणामी पावणेतीनशे धावा करताना संघाची दमछाक झाली.

पहिल्या कसोटीत भारताच्या तळाच्या फलंदाजांनी दोन्ही डावांची माती केली. ते चित्र एजबॅस्टनला दिसलं नाही आणि त्याहून ते फार जाणवलं नाही. पहिल्या डावात सहाशेचा उंबरठ्यावर आणि दुसऱ्या डावात सव्वाचारशेच्या वर एवढ्या धावा निघाल्या. धावांची गंगा वाहत असताना कोरडा राहिला तो एकटा नितिशकुमार आणि काही प्रमाणात करुण नायर. ब्रिडन कार्स ह्यानं तर पहिल्या डावासारखंच दुसऱ्या डावातही नायरला मामा बनवलं.

तिघांहून आकाशदीप फार सरस!
आकाशदीपनं सामन्यात १० बळी घेतले - पहिल्या डावात चार नि दुसऱ्या डावात सहा. यजमानांचे आघाडीचे तीन गोलंदाज - ख्रिस वोक्स, ब्रिडन कार्स आणि जॉश टंग ह्यांनी मिळून भारताचे सोळापैकी आठ गडी बाद केले. त्यासाठी त्यांनी दोन्ही डावांत मिळून ११८ षट्कं टाकली. आकाशदीपपेक्षा ७७ षट्कं अधिक!

फलंदाजीप्रमाणंच आघाडीच्या गोलंदाजांचं अपयश स्टोक्सला सतावत असणार. जेमतेम बाविशीच्या घरात असलेल्या शोएब बशीर ह्यानं पहिल्या डावात ४५ षट्कं टाकत इंग्लिश गोलंदाजीचा भार वाहिला. त्याला तीन बळी मिळाले, ते दीडशेहून अधिक धावा देऊन. पहिल्या डावात पाच षट्कं टाकणारा हॅरी ब्रूक आणि नितिशकुमार रेड्डी, हे दोघेच बळी न मिळालेले गोलंदाज.

नव्या चेंडूवर भारतीय जलदगती गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांपेक्षा किती तरी अधिक सरस ठरले. विजय आणि पराभवातलं हेच अंतर होतं. जगातला पहिल्या क्रमांकाच्या गोलंदाजाला विश्रांती देण्याच्या भारतीय व्यवस्थापनाच्या निर्णयावर सामना सुरू झाला तेव्हा बरीच टीका झाली. तथापि महंमद सिराज आणि आकाशदीप ह्यांनी जसप्रीत बुमराह ह्याची उणीव भासू दिली नाही. ही जमेची फार मोठी बाजू म्हणावी लागेल.

अँडरसन-तेंडुलकर करंडकासाठी चाललेल्या ह्या मालिकेतील पहिलाच सामना गमावल्यानंतर लगेच भारतीय संघ एवढ्या ताकदीनं उसळून आला. अशी उदाहरणं पाहायची झाल्यास ऑस्ट्रेलियाचा २०२०-२१चा दौरा आठवतो. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावांत नीचांकी ३६ धावांमध्ये गुंडाळला गेलल्या भारतीय संघाने नंतरच्या तीनपैकी दोन सामन्यांत कागांरूंना नमवलं. त्या आधी २००१च्या ऑस्ट्रेलियानं केलेल्या दौऱ्यात पहिली कसोटी हरल्यावर खचून न जाता भारतानं मालिका जिंकली होती. शुभमन गिलचा संघ तोच कित्ता गिरवणार काय, हे पाहायला हवं.

पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारणाऱ्या बेन स्टोक्सवर मोठी टीका झाली. पण 'बेझबॉल' शैलीनं विजय मिळवून स्टोक्सनं टीकाकारांना उत्तर दिलं. त्यामुळेच ह्या कसोटीतही त्यानं तसाच निर्णय घेतला. तो मात्र पूर्ण अंगलट आला. सामन्याच्या पहिल्या दिवशी दोनशेच्या आसपास धावा आणि पाच गडी बाद, ही परिस्थिती म्हटलं तर दोन्ही संघांसाठी सारखीच होती. आधीच्या सामन्यातील दोन्ही डावांत भारतीय संघ कोलमडून पडलेला. त्यामुळे स्टोक्सला फार काही वाईट वाटलं नसावं.

लाजवाब द्विशतक
गिल, जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर ह्यांच्या मनात मात्र वेगळं काही होतं. ते दुसऱ्या दिवशी दिसून आलं. गिलनं खणखणीत द्विशतक झळकावलं. त्याचा स्ट्राईक रेट दीड शतकानंतर कमालीचा वाढलेला दिसला. प्रतिस्पर्ध्याला एकही संधी न देता त्यानं केलेला खेळ लाजवबाच! पहिल्या दिवशीच्या ३१० धावांत गिलचा वाटा होता ११४ धावांचा आणि  दुसऱ्या दिवशी केलेल्या २७७ धावांमध्ये १५५. सुंदरने आधी खेळपट्टीवर ठिय्या मांडून नंतर केलेली फटकेबाजी महत्त्वाची ठरली.

भारतानं दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात तीन गडी बाद करीत इंग्लंडला झटका दिला. पहिल्याच षट्कात १२ धावांची खिरापत वाटणाऱ्या आकाशदीपनं दुसऱ्या षट्कात कमाल केली. बेन डकेट ह्याचा गिलनं सुंदर झेल घेतला. त्याच्या पाठोपाठच्या चेंडूवर ओली पोप के. एल. राहुलकडे झेल देऊन परतला. महंमद सिराज ह्यानं क्रॉलीला बाद केलं.

सामना रंगतदार ठरणार, असं दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर स्पष्ट झालं होतं. तिसऱ्या दिवशी खेळ सुरू झाल्यावर पहिल्या तासातच सिराजनं लागोपाठच्या चेंडूंवर रूट आणि स्टोक्स ह्यांचा अडथळा दूर केला. निम्मा संघ गारद! आणखी ५०० आणि फॉलो-ऑनची नामुष्की टाळण्यासाठी किमान ३०० तरी धावा करायला हव्या. मोठंच आव्हान होतं हे.

धडाकेबाज ब्रूक-स्मिथ
हे दडपण ब्रूक आणि स्मिथ ह्यांनी झुगारून दिलं. उपाहारपर्यंतच्या २७ षट्कांमध्ये १७२ धावांची भर पडलेली. म्हणजे षट्कामागे जवळपास साडेसहा धावांची गती. वरची फळी कापलेली आणि सहा शतकी लक्ष्य असताना ह्या दोघांनी केलेला खेळ धडाकेबाज म्हणावा असाच होता. त्यातही स्मिथचा तडाखा औरच होता. त्याचं अर्धशतक ४३ चेंडूंमध्ये आणि शतकासाठी लागले ८० चेंडू.


ब्रूक-स्मिथ ह्यांची त्रिशतकी भागीदारी.
------------------------------
उपाहार ते चहापान ह्या दोन तासांमध्ये ह्या जोडीनं भारतीय गोलंदाजांची अजिबात डाळ शिजू दिली नाही. त्यात त्यांनी १०६ धावांची भर घातली. कारकिर्दीतलं दुसरं शतक करणाऱ्या स्मिथची गती दीडशे धावा करेपर्यंत चेंडूमागे धाव अशीच होती. त्यानंतर मात्र तो काहीसा संथ झाला. तरीही त्याची नाबाद १८४ धावांची खेळी फक्त २०७ चेंडूंमधली. त्यात २१ चौकार आणि ४ खणखणीत षट्कार.
 
चहापानानंतर पाच षट्कं झाली आणि भारताला नवा चेंडू उपलब्ध झाला. ब्रूक-स्मिथ जोडीनं फॉलो-ऑन टाळला आणि लगेचच आकाशदीप ह्यानं कमाल केली. त्यानं आधी ब्रूकचा त्रिफळा उडवला. त्या पाठोपाठ ख्रिस वोक्स बाद झाला. पुढे धमाल केली महंमद सिराज ह्यानं. त्यानं इंग्लंडचं शेपूट झटपट गुंडाळत खात्यात अर्धा डझन बळींची नोंद केली. सकाळच्या पहिल्या तासात आणि इंग्लंडचा डाव गुंडाळताना त्यानं केलेला मारा बुमराहची उणीव जाणवू न देणारा ठरला.

इंग्लंडचे शेवटचे पाच गडी फक्त २० धावांमध्ये बाद झाले. पाहुण्यांचं यजमानांनी केलेलं नकोसं अनुकरण!
 
पहिल्या डावातली १८० धावांची आघाडी फारशी नाही, असं समजूनच भारतानं चौथ्या दिवशी खेळ केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताच्या चाहत्यांना पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तीनपैकी अडीच सत्रांमध्ये गिल, ऋषभ पंत, जाडेजा ह्यांनी दिली. ‘एकही गिल, सबका दिल’ असंच कर्णधाराच्या दणकेबाज दीड शतकाचं वर्णन करताना लिहावं लागेल.

ह्याची सुरुवात पंतनं केली. त्यानं एक दिवशीय सामन्याला साजेशी फलंदाजी केली. तो सुटला होता, तेव्हा समोर कर्णधारानं दुय्यम भूमिका स्वीकारलेली. पंत एवढ्या सैल हाताने खेळतो की, त्याची बॅट दोन वेळा लांबपर्यंत उडून गेली. परिस्थिती अशीच राहिली तर ह्यानंतर पंत खेळत असताना ३० यार्ड वर्तुळाच्या आतल्या सगळ्याच क्षेत्ररक्षकांना हेल्मेट घालणं अनिवार्य होईल! 😂😃

अवघ्या एका धावेवर असताना पंतला दोन जीवदानं मिळाली - एक कठीण आणि दुसरं सोप्पं! त्याची पुरेपूर किंमत इंग्लंडनं मोजली. पंत बाद झाला, तेव्हा गिल ५८ धावांवर (७० चेंडू) खेळत होता. पुढच्या १०३ धावा त्यानं ९२ चेंडूंमध्ये करीत धावफलक हलता नव्हे तर पळता ठेवला. ख्रिस वोक्स, जो रूट ह्यांच्या गोलंदाजीच्या त्यानं निर्दयीपणे चिंधड्या केल्या.

महंमद सिराजनं झॅक क्रॉली ह्याला बाद करून सुरुवात करून दिली. मग आकाशदीपनं बेन डकेटची दांडी उडवली. त्यानं क्रीजचा सुंदर वापर केला. रूट ज्या चेंडूवर बाद झाला, त्याची तर फारच चर्चा झाली. त्या बळीचं वर्णनं ‘द गार्डियन’ दैनिकाने ‘द शाम्पेन मूमेंट ऑफ द एंटायर मॅच’ असं केलं!

पावसानं व्यत्यय आणल्यावरही पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला, तेव्हा एजबॅस्टनचं स्टेडियम भारतीय प्रेक्षकांनी भरलेलं. ‘आपण जिंकलंच पाहिजे’ एवढीच त्यांची अपेक्षा. आकाशदीपनं आली ओले पोपचा त्रिफळा उडवला आणि नंतर लगेच ब्रूकला पायचित पकडलं. भारतीय संघाला विजयाचा वास तेव्हाच आला. सावध खेळणारा स्टोक्स डावाला आकार देऊ पाहत होता ते स्मिथच्या साथीने. स्मिथचा धावा काढण्याचा वेग ह्या डावातही सुरुवातीला तसाच होता - जवळपास चेंडूमागे धाव. कर्णधारपदाचं ओझं असलेला स्टोक्स तुलनेनं संथ.

वॉशिंग्टनच्या फिरकीनं स्टोक्सला परत धाडलं. त्यानंतर यजमानांनी शंभर धावांची भर घातली, तरी पराभव टळेल, असं क्वचितच कधी वाटलं. स्मिथला ख्रिस वोक्स साथ देत होता, तेव्हा काहीशी काळजी वाटत होतीच. नाही असं नाही. पण महंमद सिराजनं त्याचा फार अफलातून झेल घेतला. त्यामुळे प्रसिद्ध कृष्णाच्या खात्यात एक बळी जमा झाला.

आकाशदीपला स्मिथनं सलग दोन षट्कार खेचले, तेव्हा निकाल लांबणार असं वाटत होतं. पण पुढचा चेंडू हळुवार बाउन्सर टाकून आकाशदीपनं त्याला बरोबर जाळ्यात अडकवलं. आकाशदीपच्या रूपानं भारतीय भात्यात चांगलं अस्त्र असल्याचं, त्याच्या ह्या सामन्यातील गोलंदाजीवरून वाटतं.

काही न सुटलेले प्रश्न
विजय मिळविला असला, तरी भारतीय संघापुढचे काही प्रश्न सुटलेले नाहीतच. क्षेत्ररक्षण हा त्यातला महत्त्वाचा. के. एल. राहुलच्या हातून आज एक सोपा झेल सुटला. चेंडू अडवतानाही गोंधळ होताना दिसला. पुढच्या कसोटीत करुण नायर, प्रसिद्ध कृष्णा, रेड्डी ह्यांना सक्तीची विश्रांती मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. साई सुदर्शन, कुलदीप, अर्षदीपसिंग देवाची प्रार्थना करीत असतीलच असं नाही. पण त्यांनाही ‘संधी’ हवी आहे. बुमराहचंही पुनरागमन होईल.

ह्या विजयानं एजबॅस्टनवरचा नवा इतिहास लिहिला आहेच. ह्याच इतिहासातली पुढची पानं अधिक दमदारपणे उरलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये लिहिल्या जातील, अशा अपेक्षा उंचावलेल्या असणं स्वाभाविकच.

(छायाचित्रं ‘आय. सी. सी.’,  ‘द गार्डियन’ व ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’  संकेतस्थळांवरून साभार.)
--------------------------
#भारत_इंग्लंड #कसोटी_मालिका #अँडरसन_तेंडुलकर_करंडक #एजबॅस्टन_कसोटी #शुभमन_गिल #आकाशदीप #जेमी_स्मिथ #बेन_स्टोक्स #महंमद_सिराज #नवा_इतिहास
......

डायरीची चाळता पाने...

थोडी आवराआवरी सुरू आहे घरात. पुस्तकं, जुनी वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं, कातरणं... पाहायची आणि निकाली काढायची. एरवीचा निकष ह्या वेळी ना...