Friday 23 April 2021

पुस्तकवाटेवरचा प्रवास

 

एखादी कविता आपल्या वाचण्यात खूप उशिरा येते. कवीला त्यातनं जे सांगायचं आहे, ते मात्र आधीच कधी तरी माहीत होऊन गेलेलं असतं; नकळतपणे जाणवतं. ती कविता अशीच कधी तरी 'भेटते', तेव्हा आनंद होतो खरा; पण तो नवं काही गवसल्याचा नसतो. समानधर्मा सापडल्याची खुशी असते ती. किंवा ह्यानं अगदी आपल्या मनातलंच कसं मांडलंय, असं वाटतं. अरेच्चा, आपल्याही खूप आधी कुणाला तरी हे सुचलेलं होतं, असं मनाशी म्हणतो.

सफदर हाशमी ह्यांच्या 'किताबें' कवितेची गोष्ट अशीच. लेखक-कवी दासू वैद्य ह्यांनी केलेला 'किताबें'चा अनुवाद पंचवीस-एक वर्षांपूर्वी दैनिक लोकमतनं मोठ्या देखण्या पद्धतीनं छापला. डाव्या बाजूला चार-पाच-सहा शब्दांच्या ओळींमागून ओळी, पुस्तकाची महती सांगणाऱ्या. आणि उजवीकडे पुस्तकांचा ढीग रेखाटलेला. त्यावर ज्ञानेश्वरी, तुकारामबुवांची गाथा, विश्वकोश असं लिहिलेलं. पुस्तकांचं मोठेपण सांगणाऱ्या ह्या कवितेचा अनुवाद वाचताना खूप आनंद झाला. त्याचं कात्रण आहे अजून कपाटावर चिटकवलेलं.

'पुस्तकं काही सांगू इच्छितात

तुमच्या सावलीत रांगू इच्छितात'

- हाशमीसाहेबांच्या ह्या ओळी वाचण्याच्या आधीच पटलेल्या होत्या. पुस्तकांचं 'ऐकायला' कधीची सुरुवात झाली होती!

'पुस्तकांमध्ये रमणारा', 'चांगलं वाचन असणारा' अशी माझी (प्रत्यक्षाहून उत्कट अशी!) प्रतिमा बनलेली आहे. स्वतःबद्दल असं ऐकायला मिळतं तेव्हा सुखावतो. पण ते तेवढं खरं नाही, ही जाणीव असतेच की आपली आपल्याला. स्वतःशी फार खोटं नाही बोलता येत. '...मनसे भाग ना जाए' असं साहिर लुधियानवी ह्यांनी लिहून ठेवलेलं आहे. ते नेमकं आठवतं.

आपल्याकडं स्वतःची पुस्तकं असावीत, त्याच्या पहिल्या पानावर मालकी सांगणारी आपली सही असावी, अमूक एक पुस्तक संग्रहात आहे, हे अभिमानानं सांगता यावं, असं नेमकं कधीपासून वाटायला लागलं? आठवणं अवघडच. पण लहानपणी घरीच पुस्तकांची ओळख झाली, एवढं खरं. गोष्टींची छोटी-छोटी, मोठ्या टंकातली पुस्तकं अधूनमधून आणली जात. सोलापूरला एस. टी. महामंडळात काम करणारे प्रभूमामा भाऊबीजेला हमखास येत. त्यांची फिरायला जायची जागा म्हणजे स्टँड. बरोबर गेलं की, तिथल्या वृत्तपत्राच्या स्टॉलमध्ये मिळणारी पन्नास पैसे, रुपया किमतीची छोटी गोष्टींची पुस्तकं ते घ्यायचेच. अशा पन्नास-साठ पुस्तकांची आम्ही भावंडांनी तेव्हा 'लायब्ररी' चालू केली. म्हणजे त्यांना कव्हर घालून, कॅलेंडरच्या पानांवरचे मोठे आकडे कापून चिकटवून त्यांना क्रमांक देऊन वगैरे. पुस्तकांची यादी केलेली. पण ती वाचण्यासाठी कोणी सभासदच नव्हते. साधारण चार दशकांपूर्वीच्या त्या घरगुती 'लायब्ररी'तलं एक छोटं ४८ पानांचं पुस्तक माझ्या देवघरात आहे - लहान मुलांसाठी असलेला नित्यपाठ. त्यात काही श्लोक, मारुतीस्तोत्र, गणपतिस्तोत्र, आरत्या असं बरंच आहे.

पुस्तकांचं असं 'घर' असतं, त्याला वाचनालय म्हणतात, हे आठव्या वर्षी कळलं. वाशिंबे ह्या खेड्यातून आम्ही तालुक्याच्या गावी - करमाळ्याला राहायला आलो तेव्हा. तालुक्याचं गाव, भुसार मालाची मोठी बाजारपेठ असलेल्या करमाळ्यातलं हे नगरपालिकेचं सार्वजनिक वाचनालय. शहराची लोकसंख्या असेल तेव्हा पंधरा ते वीस हजारांच्या घरात. गावातील नळांना २४ तास पाणी. 'करमाळा...पाण्यावाचून तरमाळा' ही जुनी ओळख विसरली होती. (पुढं ऐंशीच्या दशकात ती नव्याने निर्माण झाली, हा भाग वेगळा.) सोलापूर-नगर हा दक्षिणोत्तर रस्ता (तोच 'मेन रोड') शहरातून जायचा. त्याला काटकोनात ओलांडणारे गावाच्या वेगवेगळ्या पेठांना जोडणारे चार-पाच रस्ते. अगदी व्यवस्थित आखलेले. नियोजनबद्ध रचना. शहरात चांगली बांधलेली भाजी मंडई होती. तिला भिंत, विक्रेत्यांसाठी प्रशस्त ओटे. ह्याच मंडईत षट्कोनी दुमजली इमारत होती. दगडात बांधलेली. त्या भक्कम इमारतीत हे वाचनालय. खालच्या मजल्यावर पुस्तकांची देवघेव आणि टेबलांवर वृत्तपत्रं ठेवलेली. वरच्या मजल्यावर साप्ताहिकं. मुक्तद्वार वाचनालय. वाचण्यासाठी सर्वांना खुलं.

करमाळ्यात गेल्यावर लगेच आम्ही वाचनालयाचे सभासद झालो. इंग्रजी शब्द वापरण्याच्या सोसापायी 'लायब्री' म्हणत असू तेव्हा. एका वेळी प्रत्येकी एक पुस्तक नि मासिक घ्यायचं. अनामत दोन रुपये; पुस्तकाची वर्गणी महिन्याला एक रुपया आणि मासिकाची आठ आणे. आमचा सभासद क्रमांक होता ३२. तो सांगण्याची वेळ कधीच आली नाही. ग्रंथपाल चेहरे पाहूनच सभासदाचं कार्ड काढायचा.

भाजीबाजारातल्या टुमदार दगडी इमारतीत ते वाचनालय फार काळ राहिलं नाही. नगरपालिकेनं किल्ल्याच्या आत तटाला लागून कार्यालयासमोरच एक भव्य दुमजली इमारत बांधली वाचनालयासाठी. 'श्री संत ज्ञानेश्वर वाचनमंदिर' असं त्याचं नामकरण झालं. बी. जे. खताळ-पाटील, शंकरराव मोहिते-पाटील, शरद पवार, तेव्हा करमाळ्यातूनच विधानसभेवर पोटनिवडणुकीत निवडून गेलेले सुशीलकुमार शिंदे अशा मंत्रिमहोदयांच्या उपस्थितीत मोठ्ठा कार्यक्रम झाला. त्याच वेळी नगरपालिकेनं बांधलेल्या टाऊन हॉलचं आणि ह्या भव्य वाचनालयाचं उद्घाटन झालं. ही गोष्ट साधारण १९७४-७५ची असावी. वाचनालयाच्या भव्य, सुंदर इमारतीच्या मागेच कोंडवाडा होता. वाचनालयाचं मागचं दार कोंडवाड्यातच उघडायचं. तिथं नगरपालिकेचे तगडे बैल बांधलेले असायचे. वाचनालय मात्र कोंडवाड्यासारखं नव्हतं. अगदी प्रशस्त, हवेशीर.

प्रचंड मोठ्या दालनात वृत्तपत्रं वाचण्यासाठी सात लाकडी स्टँड. अलीकडच्या स्टँडवर मुंबईची डाक आवृत्तीची वृत्तपत्रं. पलीकडच्या चार स्टँडवर पुण्याची ताजी वृत्तपत्रं. सोलापूरची वृत्तपत्रं सकाळी अकराच्या सुमारास येत. ती संध्याकाळी मुंबईच्या वृत्तपत्रांची जागा घेत. मग 'टाइम्स ऑफ इंडिया', 'फ्री प्रेस जर्नल', 'नवभारत टाइम्स', अधूनमधून येणारा 'लोकसत्ता' मधल्या टेबलावर जाऊन पडे. टेबलाच्या चारही बाजूंना वाचकांना बसण्यासाठी बाक होते.

वृत्तपत्रांच्या स्टँडच्या थोडं पलीकडं एका मोठ्या टेबलावर सगळी साप्ताहिकं असत. त्याच्याच अगदी वर एक अर्धमजला होता. तिथं महिलांसाठी स्वतंत्र विभाग. महिला वाचकांसाठी एका नगरपालिकेनं चार-साडेचार दशकांपूर्वी केलेली स्वतंत्र सोय. दुर्दैवानं त्याचा लाभ घेण्याएवढं वाचनाचं वेड तेव्हा करमाळ्यातील महिलावर्गाला नव्हतं किंवा तसं स्वातंत्र्य त्यांना नसावं. मुलांसाठीही तिथंच विभाग होता. त्याचंही कुणाला फारसं अप्रूप नव्हतं.

आपल्या गावात एवढं मोठ्ठं वाचना-लय असल्याचा त्या वेळी अभिमान वाटायचा. पण त्या छोट्या शहरात, त्या काळात झालेल्या ह्या वास्तूचं आणि तिथं सहज उपलब्ध असलेल्या वाचन-साहित्याचं महत्त्व किती होतं, हे आता लक्षात येतं. नगराध्यक्ष होते गिरिधरदास देवी आणि उपनगराध्यक्ष बहुतेक डॉ. पानाचंद गांधी. त्यांनी आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी करमाळकरांसाठी ज्ञानेश्वर वाचनमंदिराच्या रूपानं फार मोठा ठेवा ठेवला, असं मनापासून वाटतं. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी.

करमाळ्यात येणारी सर्व वृत्तपत्रं, साप्ताहिकं वाचनालयात येत. नव्या पुस्तकांची दर वर्षी खरेदी होई. मासिकं, अनेक दिवाळी अंक येत. दिवाळी अंकासाठी वेगळं शुल्क नसे. फक्त पुस्तकाचे सभासद असलेल्यांना तेवढे दोन-तीन महिने मासिकासाठी असलेलं शुल्क भरून दिवाळी अंक वाचायला मिळत.

ज्ञानेश्वर वाचनमंदिरामुळेच भेटले भणगेकाका. माझ्यासारख्या अनेक वाचकांच्या ते आजही नक्की लक्षात असतील. तिथं येणाऱ्या सगळ्यांचे ते 'काका' होते. त्यांचं पहिलं नाव लक्षातच राहिलं नाही कधी. करमाळ्याचा पत्रकार सुनील सूर्यपुजारीला विचारल्यावर त्यानं नाव सांगितलं - हरिभाऊ. हो, हरिभाऊ भणगे! ह्या वाचनमंदिराचे ते सर्वेसर्वा. मुख्य ग्रंथपालासह सगळं काही तेच होते. मध्यम उंचीच्या काकांचा वेष साधा असे. तीन गुंड्यांचा सदरा (तोही बहुतेक रेघांचा), पांढरा घोळदार पायजमा, पायात गावठी वाटाव्यात अशा वहाणा. नवरात्राच्या काळात त्या बहुतेक नसत. डोळ्यांवर जाड चष्मा, कपाळावर जाणवण्याएवढ्या तीन-चार अठ्या, त्यावर उठून दिसणारं कुंकू-गंध. दत्तपेठेत राहणारे भणगेकाका सकाळी कमलादेवीचं दर्शन घेऊनच वाचनालयात येत. देवीच्या पायाचं कुंकू त्यांच्या माथी असे. त्यांच्या घरापासून देवीचा माळ साधारण सव्वा किलोमीटर आणि वाचनालय पाऊण ते एक किलोमीटर.

सकाळी आठच्या ठोक्याला वाचनालयाचं जाळीचं सरकतं दार उघडलं जाई. पालिकेतून सगळी वृत्तपत्रं घेऊन काका येत. ते किंवा त्यांचा मदतनीस आधी सगळ्या खिडक्या उघडत. मग सगळ्या वृत्तपत्रांवर काका 'श्री ज्ञानेश्वर वाचनमंदिर' असा शिक्का मारत. पहिल्या पानावर मास्टहेडच्या डाव्या-उजव्या कोपऱ्यात तिरपे दोन शिक्के; मग आतल्या पानात जमतील तसे. दोन-चार ठसे पेपरच्या पानांवर उमटवले की, शिक्का पुन्हा शाईच्या पॅडमधून येई. ठप्प, ठप्प असा लयबद्ध आवाज पाच-दहा मिनिटं त्या मोकळ्या जागेत घुमत राही.

पुस्तकांची देवघेव सकाळी साडेआठ ते साडेदहा आणि संध्याकाळी पाच ते आठ ह्या वेळेत होई. नंतरचा अर्धा तास काकांना आवराआवरीसाठी असे. त्यात सगळी वृत्तपत्रं गोळा करून व्यवस्थित लावणं, साप्ताहिकं त्याच टेबलावर नीट ठेवणं, खिडक्या बंद करणं अशी बरीच कामं असत. वाचनालय बंद होण्याच्या दहा मिनिटं आधीपासून त्यांना वाचकांना सांगावं लागे - चला आता, बंद करायची वेळ झाली.

भरपूर पुस्तकं असलेलं हे वाचनालय म्हणजे सहजगत्या उघडलेला खजिनाच. तिथं जायला नेहमीच आवडायचं. एका संध्याकाळी बहिणीसह पुस्तक-मासिक बदलायला गेलो. पावणेआठ वाजले असावेत. देवघेवीची वेळ संपत आली होती. बहिणीला तिच्यासाठी व आईसाठी 'वसुधा', 'ललना', 'गृहिणी', 'स्त्री' असं मासिक घ्यायचं होतं. मला खुणावत होती तिथं दिसणारी 'कुमार', 'टारझन' आणि 'बिरबल'. आमचा हळू आवाजातच वाद झाला. काकांना तो ऐकायला आलाच. त्यांनी घड्याळाकडं पाहिलं आणि म्हणाले, ''ए पिंट्या, तिला घेऊ दे काय पाहिजे ते. तुला हे 'बिरबल' ने आणि उद्या आणून दे बरं.''

अरे वा! एकाऐवजी दोन मासिकं. वाचणाऱ्या शाळकरी मुलाला नाराज करायचं नाही म्हणून काकांनी नियम थोडा वाकवला होता. वाचणाऱ्यांबद्दल काकांना आपुलकी आहे, हे त्या निमित्तानं लक्षात आल्यावर हीच युक्ती आम्ही पुढे तीन-चार वेळा केली. प्रत्येक वेळी जादा मासिक मिळालं.

वाचायला आवडतं, वेगवेगळी पुस्तकं नेली जातात, हे लक्षात आल्यावर भणगेकाकांनी एका उन्हाळ्याच्या सुटीत माझ्यावर कृपावर्षाव केला! पूर्ण सुटीचा महिना-दीड महिना त्यांनी एक जादा पुस्तक नेण्याची सवलत मला दिली. त्यांच्या ह्या कृपेमुळे कुमारांसाठी असलेली फास्टर फेणेसह अनेक पुस्तके वाचता आली. एके दिवशी सकाळी नेलेलं पुस्तक दुपारीच वाचून झालं आणि संध्याकाळी ते बदलायला गेलो. काका म्हणाले, ''अरे बाबा, दिवसात एकदाच पुस्तक न्यायचं.'' दिवसातून एकदाच पुस्तक-मासिक बदलता येईल, असा नियम होता. अधिकचे एक पुस्तक देत मोठा नियम वाकविणाऱ्या काकांनी तो छोटा नियम काही माझ्यासाठी शिथिल केला नाही!

ह्या सुटीत बरीच पुस्तकं वाचायला मिळाली. नवे लेखक भेटले. वाचनालयात कथा, कादंबरी, नाटक, कवितासंग्रह, हिंदी अशा विषयानुसार याद्या होत्या. विज्ञान, इतिहास, निबंध, कला अशा काही विषयांची पुस्तकांची सरसकट 'इतर' अशी यादी होती. त्यातली बरीच पुस्तकं सवलतीच्या निमित्तानं वाचायला मिळाली. इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरविणाऱ्या अजित वाडेकरांच्या नेतृत्वाखालील संघाचा 'पराक्रमी दौरा' इथंच सापडलं. क्रिकेटची आणखी काही पुस्तकंही वाचता आली. त्यातूनच खेळाची आवड वाढली.

भणगेकाकांचं ग्रंथपालनाचं काही औपचारिक शिक्षण झालं होतं का, ह्याची कल्पना नाही. नसावंच. तसंही त्यांचं एकूण शिक्षण फार झालं नसावं. त्या काळाला पुरे वाटावं एवढं. ते काय वाचत? तसं कधी दिसलं नाही. वाचनालय बंद करून घरी जाताना त्यांच्या हातात किंवा काखोटीला एखादं पुस्तक आहे, असं पाहिल्याचं लक्षात नाही. कधी तरी ते त्यांच्या पिंजऱ्यात वाचताना दिसत. एवढी वर्षं इतक्या छान पद्धतीने वाचनालय चालविल्याबद्दल त्यांना एखादा पुरस्कार मिळाला किंवा कसे, हेही माहीत नाही.

पुरस्काराची मुद्रा उमटलेली असो किंवा नसो, गुणवत्तेचं एखादं प्रमाणपत्र पदरी पडलेलं असेल-नसेल; एक गोष्ट नक्की की, भणगेकाका नावाचा माणूस अगदी अस्सल ग्रंथमित्र, ग्रंथसखा होता. हजारो पुस्तकांचं ते घर त्यानं कोणत्याही आदर्श कुटुंबप्रमुखासारखं संभाळलं. बहुसंख्य वाचकांची आवड जपली. वाचणाऱ्याची आवड वाढेल, असंच त्यांचं ग्रंथपाल ह्या नात्यानं वर्तन होतं.

पुस्तक-मासिकांच्या देवघेवीसाठी वाचनालयाच्या एका बाजूला काउंटर होतं. त्याला जाळी ठोकलेली. एका बाजूला पुस्तकांच्या याद्या. दुसऱ्या कोपऱ्यात नाव दिसेल, अशा पद्धतीनं मासिकं मांडलेली. काका सारखे उभे. सभासदांच्या मागणीला प्रतिसाद देत, पुस्तक-मासिकांची देवघेव करीत. खालच्या बाजूला सभासदांच्या कार्डांचा गठ्ठा. मागे पुस्तकांची एक मोठ्ठी खोली. त्यात बरीच कपाटं. त्यात गठ्ठ्यानं लावलेली पुस्तक. अलिबाबाच्या त्या गुहेत एकदा का दोनदाच प्रवेश करता आला.

मागणी असलेल्या, सभासदांना आवडणाऱ्या, लोकप्रिय लेखकांच्या पुस्तकांची नावं आणि त्यांचे क्रमांक भणगेकाकांना जवळपास तोंडपाठ होते. यादीत पाहून विचारायचं, 'काका, १८२९ आहे का?' पुढच्या क्षणी उत्तर मिळायचं, 'बाहेर गेलंय.' मग पुढच्या अशाच कुठल्या तरी क्रमांकाला ते सांगत, 'फाटलेलं आहे थोडं. बायंडिंगला गेलंय.' एखाद्या पुस्तकाचा क्रमांक आणि नाव ह्याची सांगड घालताना क्वचित त्यांचा गोंधळ उडत असे.

शेकडो पुस्तकं, त्यांचे क्रमांक आणि ते कुणी वाचायला नेलंय किंवा नाही, हे एवढं काकांना कसं काय आठवतं लगेच? नेहमी प्रश्न पडायचा. त्याचं उत्तर आपल्या परीनं शोधलं - त्यांना काय तेवढंच काम असतं. रोज रोज ती पुस्तकं बघून पाठ होणारच की. त्यात विशेष काय एवढं?

हे उत्तर चुकीचं आहे, हे थोड्या दिवसांनी समजून आलं. मार्चअखेरीस वाचनालयात नव्यात काही शे पुस्तकं आली. ह्यातल्या पुस्तकाचा क्रमांक सांगितल्यावर काकांना लगेच नाव आणि पुस्तक आहे-नाही हे काय सांगता येणार लगेच, असं वाटलं. पण मेच्या मध्यापासूनच बहुतेक सगळ्या (नव्या) पुस्तकांचे क्रमांक त्यांच्या 'मेमरी कार्ड'मध्ये 'फीड' झालेले होते! आता कळतं की, त्यांना स्वतःच्या कामाबद्दल विलक्षण आस्था होती. त्यामुळेच लेखक-पुस्तकं-क्रमांक हा सगळा तपशील त्यांच्या लक्षात राहत असणार.

छोटं शहर, शंभरच्या आत-बाहेर सभासदसंख्या. त्यामुळे पुस्तक-मासिक बदलायला आलेल्या कुणाचा सभासद क्रमांक विचारण्याची वेळ कधी काकांवर आली नाही. कितीही गर्दी असली, तरी ह्याचं कार्ड त्याला नि त्याचं ह्याला असं कधी झालं नाही. दिवाळी अंकांचं वाटप सुरू होई, तेव्हा पहिल्या एक-दोन दिवशी महत्त्वाचे अंक मिळविण्यासाठी गर्दी होई. तिथंही काका फार कधी चिडल्याचं दिसलं नाही. वाचकाची आवड लक्षात ठेवून प्रत्येकाला हवं ते मिळेल, ह्याची काळजी ते घेत.

ज्ञानेश्वर वाचनमंदिरात आणखी एक सोय असायची. मासिकं जुनी झाली की, त्यांचे गठ्ठे एकत्र करून पुठ्ठ्याच्या वेष्टणात बांधले जात. मासिकाऐवजी किंवा पुस्तकाऐवजी असा एक गठ्ठा नेला की, बऱ्याच दिवसांची बेगमी होई.

लेखकाला-संपादकाला आपल्या वाचकाला काय हवं, हे माहीत असतं. अगदी त्याच प्रमाणं भणगेकाकांनाही वाचक माहीत होते. वर्गमित्र अनिल कोकीळ ह्याला महाविद्यालयीन शिक्षण घेताना वाचण्याची गोडी लागली. तोही ज्ञानेश्वर वाचनमंदिराचा 'भक्त' झाला. व. पु. काळे ह्यांच्या प्रेमातच पडला होता. सलग सातव्या-आठव्या वेळी त्यांचंच पुस्तक मागितल्यावर काका म्हणाले, ''अनिल, अरे एखाद्या लेखकाची पाच-सहा पुस्तकं वाचली की, कळतो तो. सारखं काय व. पु. - व. पु. नेतोस! आता दुसरे लेखक वाचून बघ जरा.''

एक अनुभव मलाही आला. शिक्षणासाठी पुण्यात होतो. विश्रामबागेजवळच्या सरकारी ग्रंथालयात पुस्तकं वाचायला मिळत. तिथं कधी तरी जात होतो. 'सोबत' वाचत असल्यामुळे भाऊ पाध्ये ह्यांचं नाव माहीत झालं. त्यांचं गाजलेलं 'वासूनाका' तिथं मिळालं. पण ते पूर्ण वाचून झालं नव्हतं. सुटीत करमाळ्याला आल्यावर एक दिवस पुस्तक बदलायला गेल्यावर काकांना विचारलं, ''आपल्याकडं 'वासूनाका' आहे का हो?''

काहीच बोलायला सुचत नसल्यासारखे काका क्षणभर पाहत राहिले. मी काही तेव्हा शाळकरी वयाचा नव्हतो. त्यांच्या चेहऱ्यावर थोडे उग्र भाव आले. त्यांनी विचारलं, ''तुला कुणी सांगितलं हे पुस्तक (वाचायला)?''

नाही. मोठा लेखक आहे. म्हणून विचारलं, मी गुळमुळीत उत्तर दिलं.

''मिळणार नाही. वाचू नको असलं काही,'' काकांनी तिथल्या तिथे निर्णय दिला.

माझ्यासारख्या 'लाडक्या' वाचकाला ते असं काही सांगतील, असं कधीच वाटलं नव्हतं.

नंतर कधीच काकांकडे भाऊ पाध्येंची पुस्तकं मागण्याचं धाडस झालं नाही. 'राडा', 'बॅरिस्ट अनिरुद्ध धोपेश्वरकर', 'डोंबाऱ्याचा खेळ' ही त्यांची काही पुस्तकं विकत घेऊनच वाचली. तसं पाहिलं तर सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात बाबा कदम फार लोकप्रिय लेखक होते. त्यांची नवी कादंबरी आली की, तिच्यावर उड्या पडायच्या. त्या खानदानी बाजाच्या, शिकार, तमाशा असलेल्या कादंबऱ्या आम्हीही आवडीने वाचल्या. त्यांच्या कादंबरीवर आधारित 'ज्योतिबाचा नवस' सिनेमाही आवर्जून पाहिला. त्यांची पुस्तकं नेण्याबद्दल काकांनी कधी हटकलं नव्हतं. पण 'वासूनाका' म्हटल्यावर त्यांनी जी काही प्रतिक्रिया व्यक्त केली, ती विसरता येणार नाही.

काकांना त्रास द्यायला म्हणून काही जण खोड्या काढायचे. संसार कसा करावा, ह्याबद्दल भागवत ह्यांचं एक पुस्तक होतं. ते अर्थात संसारी माणसांसाठी, प्रौढांसाठी होतं. काकांनी चिडावं म्हणून काही तरुण ते पुस्तक मागायचे. परिणाम स्वाभाविकपणे अपेक्षित तोच व्हायचा.

क्रिकेटचं वेड करमाळ्यात तेव्हा पसरू लागलं होतं. क्रिकेटपटूंची छायाचित्रं जमवून संग्रह बनवणं, हा छंद झाला होता. पण ती मिळणार कुठून? अनेकांच्या घरी तर वृत्तपत्रही येत नसे. 'धर्मयुग'चे क्रिकेट विशेषांक प्रसिद्ध होत. छान कागदावर रंगीत छायाचित्रं छापलेली असायची. वृत्तपत्रांत क्रिकेटपटूंच्या चेहऱ्याचे फोटो येत. काही शाळकरी मुलं हे फोटो फाडून नेत. संध्याकाळच्या वेळी सभासदांची गर्दी असली की, ही मुलं टाचणीने किंवा करकटने वृत्तपत्राचं पान कुरतडून फोटो फाडून नेत. (त्यातली काही नावं आजही लक्षात आहेत.) अशा मुलांवर लक्ष ठेवणं, हे एक वाढीव काम काकांच्या मागे लागलं. नंतर वाचनालयात पालिकेचा टीव्ही. बसला. त्यानं वाचण्याचं वेळापत्रक बिघडवून टाकलं.

वाचनालयात येणाऱ्या वृत्तपत्रांच्या वेळेचं गणित काही वेळा बिघडे. मुंबईहून येणाऱ्या रेल्वेगाडीला उशीर झाला की, जेऊरला उतरविले जाणारे गठ्ठे साडेआठ-नऊनंतर यायचे. एका आठवड्यात सलग दोन-तीन वेळा अशी अडचण आली. एका तरुण, नवथर वार्ताहराने लगेच टीकात्मक बातमी केली. नगरच्या सायंदैनिकात ती प्रसिद्ध झाली.

बातमी वाचून भणगेकाका अस्वस्थ झाले. आपल्या कष्टाची किंमत नाही, असं त्यांना वाटलं. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी एक घटना घडली. सभासदाने परत केलेल्या पुस्तकात १० रुपयांची नोट आढळली. आलेलं पुस्तक व्यवस्थित पाहून घेण्याची सवय काकांना होती. तसं करताना त्यांना नोट दिसली. लगेच सभासदाला हाक मारून त्यांनी पैसे परत केले. चाळीस वर्षांपूर्वी ही मोठी रक्कम होती.

हे कळल्यावर त्यांना भेटून म्हणालो, ''वा काका. फार चांगलं काम केलं तुम्ही.''

''बातम्या देणाऱ्यांना कुठं दिसतं आमचं हे काम?'', असं ते म्हणाले, तेव्हा त्यांच्या बोलण्यातला विशाद लपत नव्हता.

प्रामाणिकपणाच्या गुणाला वर्तमानपत्रात चौकट ठरलेलीच असते. भणगेकाकांच्या ह्या गुणाचं रास्त कौतुक व्हायलाच पाहिजे आणि वर्तमानपत्रांबद्दल त्यांना आलेला राग जावा, अशा हेतूने मी 'वाचकांची पत्रे' सदरासाठी म्हणून हा सगळा तपशील पत्रानं सोलापूरच्या एका दैनिकाला पाठवला. त्यांच्या अग्रलेखावर मी एका पत्रातून जोरदार टीका केल्यामुळे संपादकमहोदयांनी मला 'ब्लॅक लिस्ट'मध्ये टाकलं होतं. त्यांनी पत्राला सरळ कचऱ्याची पेटी दाखवली. वर त्या सदरात एक चौकट प्रसिद्ध केली - काही लोक उगीच कुणाचं तरी अभिनंदन करण्याच्या नावाखाली स्वतःची टिमकी वाजवत राहतात!

त्या वेळी माझी पत्रं बऱ्यापैकी संख्येनं वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत असत. काकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो मला एक सहज सोपा मार्ग वाटला होता. पण तेवढीही प्रसिद्धी त्यांच्या नशिबात नव्हती.

दरम्यानच्या काळात नोकरी लागली. करमाळ्याला येणं-जाणं कमी झालं. नव्वदीच्या दशकात कधी तरी वडिलांनी ज्ञानेश्वर वाचनमंदिराचं सभासदत्व रद्द करून टाकलं. त्यांनी ते सांगितल्यावर वाईट वाटलं. पुस्तकवाटेवरचा मोठा टप्पा मागं पडला होता.

करमाळ्याला कधी तरी जाणं होई. बसस्थानकावर सूर्यपुजारींचा वृत्तपत्रांचा स्टॉल आहे. सकाळी दहाच्या सुमारास किंवा संध्याकाळी भणगेकाका तिथे बसलेले दिसायचे. मांडी ठोकून कुठलं तरी वृत्तपत्र ते चाळत असल्याचं पाहायला मिळे. मला पाहिल्यावर त्यांचा चेहरा थोडा चमके. ख्यालीखुशाली विचारत. आपण ज्याला वाचायला दिलं, तो पेपरमध्ये लिहू लागला, ह्याचा थोडासा आनंद त्यांना होत असावा. हा आपला माझा समज.

पुस्तकांच्या दुनियेत थोडं अधिक रमायला लागल्यावर भणगेकाकांच्या कामाचं महत्त्व कळलं. त्यांच्याबद्दल लिहावं असं खूपदा वाटलं. ग्रंथपाल दिन, पुस्तक दिन असे वेगवेगळे मुहूर्त काढत गेलो. त्यांच्याबद्दल खूपदा लिहिलं, पण ते मनातच. माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. असंच कधी तरी वाटलं की, ह्याची एक प्रत भणगेकाकांना भेट दिली तर? पण तो विचार काही कृतीत आला नाही. जे काम सहज करता येण्याजोगं होतं, ज्यातून कृतज्ञता खऱ्या अर्थानं व्यक्त झाली असती, मनापासून आभार मानता आले असते, ते काही जमलं नाही.

श्री ज्ञानेश्वर वाचनमंदिरानं लावलेली पुस्तकांची गोडी पुढंही कायम राहिली. नोकरीला लागल्यावर 'मॅजेस्टिक'च्या योजनेत पैसे भरू लागलो. दरमहा १० रुपये भरायचे आणि वर्षानंतर १४० रुपयांची पुस्तकं न्यायची. महिन्याला २० रुपये योजनेत 'गुंतवायचे' ठरवलं. वर्ष उलटल्यानंतर असंच कधी तरी पुण्यात गेलो. शनिवार पेठेत 'मॅजेस्टिक'चं दुकान होतं तेव्हा. आत शिरल्यावर काय पाहू, किती घेऊ, असं झालं. दोन-तीन तास घालवून मी त्यांच्या कप्प्यातून अगदी जुनी, चांगली आणि स्वस्त पुस्तकं निवडली. तीस-पस्तीस पुस्तकं सहज असतील. त्याची पावती बनवताना दुकानातला जुना कर्मचारी हसून म्हणाला, ''फार निवडून निवडून पुस्तकं मिळवली हं तुम्ही.'' त्याला पाहून, त्याचं वाचकाला दाद देणारं बोलणं ऐकून भणगेकाकांचीच आठवण झाली.

नगरमध्ये राहात असल्यानं रस्त्यावरची जुनी पुस्तकं चाळायची, विकत घ्यायची संधी साधताच आली नाही कधी. मग पुस्तकांचं प्रदर्शन भरलं की, चक्कर ठरलेली. आधीच्या काळात नॅशनल बुक ट्रस्टची बरीच पुस्तकं घेतली. एकदा 'ग्रंथाली'चं प्रदर्शन होतं. नुकतीच ओळख झालेल्या सुदेश हिंगलासपूरकर ह्यांनी आवर्जून काही पुस्तकं घ्यायला लावली. नवीन लेखक कळत होते, आवडत होते.

'अक्षरधारा'चं प्रदर्शन पहिल्यांदा आलं आणि चांगले दोन आठवडे होतं नगरमध्ये. भरपूर पुस्तकं होती त्यात. रोज किंवा दिवसाआड चक्कर मारून वेगवेगळी पुस्तकं घेत होतो. हे प्रदर्शन कसं झालं, नगरकर काय वाचतात, किती विक्री झाली, अशा मुद्द्यांवर बातमी लिहायची ठरवलं. त्यासाठी शेवटच्या दिवशी संयोजकांना भेटलो. राठिवडेकर बंधूंपैकी एक कुणी तरी होतं. त्या दिवशी खरेदी केलेल्या पुस्तकांचे पैसे देताना डिस्काउंटबाबत विचारलं. ते म्हणाले, ''तुमचं चुकलंच. सगळ्या पुस्तकांचं एकत्र बिल केलं असतं, तर पंचवीस टक्के सूट दिली असती.''

पुस्तकांच्या खरेदीत हाही एक महत्त्वाचा भाग असतो, हे तेव्हा कळलं. पुढे पुण्यात काही दिवस कामासाठी असताना अत्रे सभागृहात 'अक्षरधारा'चंच प्रदर्शन चालू असल्याचं कळलं. तिथे हावऱ्यासारखी पुस्तकं घेतली. दोन-तीन पिशव्या हातात वागवणं शक्य नसल्यामुळं रिक्षानं जावं लागलं. त्या पैशात अजून दोन पुस्तकं आली असती, असं वाटत राहिलं.

सर रिचर्ड बर्टन ह्यांनी इंग्रजीत आणलेल्या 'अरेबियन नाईट्स'चं गौरी देशपांडे ह्यांनी भाषांतर केल्याचं वाचण्यात आलं. हे १६ खंड मिळविण्यासाठी पुण्यातल्या राजेंद्र ओंबासे ह्यांच्या मागं लागलो. सगळे खंड हवे होते आणि घसघशीत सवलतही. दहा-बारा वर्षांपूर्वी ओंबासे प्रसन्न झाले आणि तो ठेवा माझा झाला.

मोल्सवर्थचा शब्दकोश पुनःमुद्रित होणार अशी बातमी २५ वर्षांपूर्वी वाचली. तो आणि सोबतचे एन. बी. रानडे ह्यांच्या इंग्लिश-मराठी कोशाचे दोन खंड घ्यायचेच असं ठरवलं. त्याची किंमत तेव्हा एक महिन्याच्या पगाराएवढी होती. घेतलेले कोश कपाटात पडून होते. गेल्या वर्षी चार-पाच लेखांचा अनुवाद करताना तिन्ही कोशांचा पुरेपूर उपयोग झाला. ते पैसे वसूल झाले!

कितीही पुस्तकं विकत घेतली, तरी ताज्या, नव्या आणि अनपेक्षितपणे भेटणाऱ्या चांगल्या पुस्तकांसाठी वाचनालय हवंच असतं. वाचकाला फिरून, पुस्तकं चाळू देणारी वाचनालयं मला फार आवडतात. त्यातून वेगळे लेखक आणि वेगळी पुस्तकं हाती लागतात. सोलापूरचं हिराचंद नेमचंद वाचनालय त्यासाठीच लक्षात राहिलं. 

पुण्याचं ब्रिटिश ग्रंथालय असंच एखाद्या प्रसन्न मंदिरासारखं वाटत आलेलं. तिथं बसून पुस्तकं चाळण्याची, वाचण्याची सोय होती. त्या ग्रंथालयाचं सभासदत्व मिळावं, असं फार वाटायचं. आता ते शक्य नाही. महाराष्ट्र बँकेचं मुख्यालय असलेल्या 'लोकमङ्गल'च्या कार्यालयात बहुतेक तळमजल्यावर असंच एक प्रशस्त ग्रंथालय होतं. तिथंही तीन-चार वेळा जाण्याचा आणि आरामात बसून काही नियतकालिकं, संदर्भ पुस्तिका चाळण्याची संधी मिळाली.

पुस्तकांची आणि वाचकांची थेट भेट व्हायलाच हवी. ठरावीक लेखक, लोकप्रिय पुस्तकं ह्यांचा कालांतराने कंटाळा येऊ लागतो. त्याचा परिणाम वाचनापासून फारकत घेण्यापर्यंत होण्याची भीती असते. करमाळ्याच्या वाचनालयात ही सोय नव्हती. पण भणगेकाकांसारखा ग्रंथमित्र असल्यामुळे तिथं ती अडचण नव्हती. आमच्या नगरच्या वाचनालयात पुस्तकं चाळण्याची सोय नाही. पावणेदोनशे वर्षांची परंपरा आणि लाखांहून अधिक पुस्तकं असलेल्या ह्या वाचनालयाची ही मोठीच त्रुटी.

'कोट जुना वापरा आणि पुस्तक मात्र नवीनच घ्या,' असं ऑस्टिन फेल्प्स ह्यांनी सांगून ठेवलंय. कोट जुना काय नि नवा, वापरलाच नाही कधी. पुस्तकं मात्र शक्यतो नवीच विकत घेत आलो.

'पुस्तकप्रेमी' अशा बन(व)लेल्या प्रतिमेबद्दल वर सांगितलंच आहे. पण हौसेनं घेतलेली सगळीच्या सगळी पुस्तकं वाचणं अजून तरी जमलेलं नाही.

स्वस्तात आहे, पुन्हा मिळणार नाही, दुर्मिळ होईल, चांगला लेखक आहे, संदर्भासाठी उपयोगी पडेल... अशा अनेक कारणांमुळं हावरेपणानं, असोशीनं, लोभानं घेतलेली खूप पुस्तकं आहेत घरात. आवरायला घेतल्यावर वाटतं, कधी वाचणार ही एवढी सगळी आपण?

पण हा 'आपला संग्रह' आहे, ह्याचं एक वेगळं समाधान असतंच. कधीही वाचायला आवडेल, असं वाटणारं पुस्तक हाताशी असणं ह्यासारखं सुख नाही. अशी पुस्तकं हाताशी असल्यामुळेच 'पुस्तकवाटा'सारखं सदर वर्षभर लिहिता आलं आणि त्यात फारशा लोकप्रिय नसलेल्या, कमी माहीत झालेल्या ५१ पुस्तकांची ओळख करून देता आली. पुस्तकवाटेवरचा तोही एक सुखद टप्पा होता.

ह्या न संपलेल्या प्रवासाबद्दल तूर्त एवढंच!

….

(जागतिक पुस्तक दिनानिमित्त हा लेख. तो पहिल्यांदा प्रकाशित झाला 'शब्ददीप'च्या यंदाच्या दिवाळी अंकात. श्री. प्रदीप कुलकर्णी व श्री. विनायक लिमये ह्यांच्यामुळे लिहिलेला हा लेख इथे 'शब्ददीप'च्या सौजन्याने.)

(वाचनालयाची छायाचित्रे आंतरजालावरून साभार)

13 comments:

  1. नमस्कार ,
    पुस्तकं , भणगे काका, करमाळा ग्रंथालय आणि तुमची पुस्तक खरेदी... संपूर्ण लेख असोशीनं वाचला. ग्रंथालयाचं पूर्ण चित्र डोळ्यासमोर जिवंत झालं.खूप सुंदर आठवणी आहेत तुमच्या ! हा लेख म्हणजे भणगेकाकांना तुम्ही दिलेली मानवंदनाच आहे , असं मला वाटतं. तुमच्या अनेक लेखांमधे हा लेख मला सर्वोत्कृष्ट वाटला. कदाचित मी पुस्तक प्रेमी आहे म्हणूनही असेल. खूप छान. पुढील कार्यासाठी शुभेच्छा. सुंदर लेख वाचायला दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
    --- रामदासी पु. रा.

    ReplyDelete
  2. ज्यांना ग्रामीण भागातील पुस्तक संस्कृती समजून घ्यायची असेल त्यांनी या लेखासोबत जरूर फेरफटका मारावा. हातातील मोबाईल, लॅपटॉप आपोआप गळून पडतील. 

    श्रीराम वांढरे.
    भिंगार,अहमदनगर.

    ReplyDelete
  3. सतीश
    फार सुंदर
    जुन्या आठवणी जाग्या झाल्या...
    धन्यवाद...
    असाच लिहीत रहा...

    ReplyDelete
  4. अमेरिकेतील एका सार्वजनिक वाचनालयात, प्रवेशद्वाराच्या आधीच एका दगडावर कोरलेले एक वचन आठवले - " You may be sitting , reading a book , in the four walls of the library but can at the same time, be anywhere in the World."
    - अशोक जोशी, बंगळुरू

    ReplyDelete
  5. लेख वाचल्यावर Man is known by the company he keeps या लहानपणी शिकलेल्या वाक्याची आठवण झाली. पुस्तक दिनाच्या निमित्ताने लिहिलेल्या लेखावरून आपली पुस्तकांशी 'कंपनी' कशी लहानपणापासून आहे ते कळले. करमाळ्यासारख्या लहान तालुक्याच्या ठिकाणी किती चांगले वाचनालय होते हे कळले. तसेच त्याला योग्य जोड म्हणून हरिभाऊ भणगेकाका यांच्यासारखे व्यवस्थापकही लाभणे, हा परत आपणासाठी सुयोग ठरला असे म्हटले पाहिजे. प्रत्येक वाचकाची आवड लक्षात ठेवणारा आणि कुणी काय वाचू नये यावर मार्गदर्शन करणारा असा ग्रंथपाल विरळा म्हटला पाहिजे.
    - मुकुंद नवरे

    ReplyDelete
  6. अप्रतिम लेख! फारच सुंदर लिहिता हो तुम्ही.

    आपणा सर्व पुस्तकवेड्यांच्या वाचनवेडाची सुरुवात घरातून तरी होते किंवा अशा वाचनमंदिरांतून. पुढे मग ती स्वतःचा संग्रह उभा करण्यात परावर्तित होते. तुम्ही हा सगळा प्रवास फार अप्रतिम रेखाटला आहेत. मी जास्त लिहू शकत नाही पण मनापासून कौतुक करते आणि असंच लिहीत राहा असा आशीर्वाद देते.

    - मृदुला जोशी, मुंबई

    ReplyDelete
  7. ������������
    संध्याकाळीच वाचलं. खूप सुंदर आणि सविस्तर लिहिलं आहेस. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. भणगेकाका डोळ्यांसमोर आले. मी पण शाळेत असताना ज्ञानेश्वर वाचनालयातील खूप पुस्तकं वाचली. कऱ्हेचं पाणी, फास्टर फेणे, एस. एम. काशीकर, गुरुनाथ नाईक यांच्या रहस्यकथा आणि बरीच.
    आणि हो, अजून एक आठवलं, दादा (डॉ. पानाचंद गांधी) नगरपालिकेच्या शिक्षण समितीचे सभापती असताना ज्ञानेश्वर वाचनालयाने फिरते वाचनालय उपक्रम राबविला होता. पत्र्याच्या पेटीतून ग्रामीण भागात रोटेशननं पुस्तकं पाठवली जायची.
    - डॉ. पंकज गांधी, पुणे

    ReplyDelete
  8. सतीश, करमाळ्याचे समृद्ध वाचनालय आणि ग्रंथपाल भणगे यांचं शब्दचित्र अतिशय समर्थपणे रेखाटलं आहेस. दोन्ही गोष्टी अक्षरशः डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. मन भूतकाळात गेलं.
    आपले बालपण व व्यक्तिमत्त्व घडविण्यात करमाळ्याचे किती मोठे योगदान आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली.
    - आर. डी. कुलकर्णी, पुणे

    ReplyDelete
  9. सतीश, खरचं छान. तुझ्या इतकं सर्वांगीण वाचन नाही होत पण आजही वाचन चालू आहे. दिवाळीच्या वेळी अॅटलस श्रग्ड आणि आता शांताराम ही दीड हजार पानांची पुस्तकं वाचू शकलो, ते लहानपणी वाचनाची आवड निर्माण झाल्यामुळे.
    ����
    - राजेंद्र बागडे, कोल्हापूर

    ReplyDelete
  10. सतीश , भणगेकाकांबद्दल खूप छान लिहिलं आहेस. तुझी मेमरी शार्प आहे. तुझ्या वाचनाचा, लिखाणाचा पायाच मजबूत आहे.
    तुझी लेखनशैली म्हणजे अप्रतिम.
    - रवींद्र चव्हाण, पुणे

    ReplyDelete
  11. खुप छान लेखन. वाचन...चिंतन...
    ग्रंथपाल 'भणगेकाका' चित्रपट पाहिल्याचा भास झाला..��
    - चंद्रकांत कुटे, मुंबई

    ReplyDelete
  12. रवी चव्हाणने forward केलेला 'पुस्तकवाटेवरचा प्रवास' हा लेख वाचला. खूपच सुंदर. मनापासून दाद दिल्याशिवाय राहवले नाही...
    आपल्या लेखातून वाचनालय व भणगेकाका यांचे केलेले चित्रण अतिशय भावले. अनेक आठवणी मनात ताज्या झाल्या. मीसुद्धा १९७२ ते १९७८ ह्या काळात ज्ञानेश्वर वाचनालयाची सभासद होते. अनेक उत्तमोत्तम पुस्तके, मासिके, दिवाळी अंक वाचायला मिळाले.
    समग्र पु. ल., अत्रे, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, व. पु. काळे, ज्योत्स्ना देवधर, सानिया, विजया वाड... किती तरी लेखक-लेखिका अक्षरशः दैवत बनले. रोज एक कादंबरी किंवा कथासंग्रह आणि एक मासिक मिळायचे. रात्री जागून वाचन पूर्ण केल्याशिवाय चैन पडायची नाही. माझ्या आयुष्यातील तो सुंदर काळ होता..!
    श्री. भणगेकाकांबद्दल आपण जे जे लिहिले, ते अगदी समर्पक होते. चेहरा थोडा गंभीर, पण आपल्या कामात अगदी निपुण. प्रसिद्ध पुस्तकांची नावे व नंबर तोंडपाठ असायची त्यांची...आणि कुठले पुस्तक उपलब्ध आहे, कुठले बाहेर गेले ह्याबाबत त्यांची स्मरणशक्ती कौतुकास्पद होती. वाचनालयाला ज्ञानमंदिर समजून अतिशय प्रामाणिकपणे व निरलस सेवा केली त्यांनी.
    आपल्या लेखामुळे अनेक स्मृतींना उजाळा मिळाला..
    मनापासून धन्यवाद....��
    - शोभा नंदलाल देवी, निगडी प्राधिकरण

    ReplyDelete
  13. Satish,
    Bhanage kaka...
    Khup chhan.
    Became nostalgic...
    Thank you..!
    -Anil Kokil, Pune

    ReplyDelete

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...