Tuesday 20 October 2020

इडली, अँडरसन आणि शब्दयुद्ध

अशी फुललेली, गुबगुबीत इडली असावी.
साथीला सांबार आणि चटणी. 
(छायाचित्र सौजन्य : सी. एन. एन.)

क्त नऊ शब्द. त्यांनी गेल्या पंधरवड्यात वादळ उठवलं. शब्दयुद्धच सुरू झालं. त्यात अनेक जण हिरिरीने उतरले. लेखण्या परजून नि कळफलक साफ करून. बरेच जण विरोधात, थोडे काही बाजूनं आणि काही जण कडेनं मजा बघणारे. हे योद्धे भारतातले, इंग्लंडमधले, अमेरिकेतले आणि इतर बऱ्याच देशांतले. त्यांच्या लिहिण्यामध्ये चेव होता, आवेश होता, मस्करी होती, हलक्याफुलक्या टिप्पण्या होत्या. मुद्दे होते, गुद्दे होते, पाल्हाळ होतं. खिल्ली उडवण्यासाठी, तिरकसपणे व्यक्त होण्यासाठी नवी पिढी वापरत असलेले 'मीम्स'ही दिसले.

ते नऊ शब्द ट्विटर, फेसबुक, क्वोरा अशा सामाजिक माध्यमांतून गाजले. वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली. 'न्यूज पोर्टल', संकेतस्थळं इथेही त्याचे पडसाद उमटले. बी. बी. सी. आणि सी. एन. एन. ह्यांनाही ह्याची आवर्जून नोंद घ्यावी, असं वाटलं. अमेरिकी अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूकही त्यात हळूच आली. तसंही राजकारण आणि 'खाणं' ह्यांचा निकटचा संबंध असतोच की!

इंग्लंडच्या न्यूकॅसलमधील नॉर्थम्ब्रिया विद्यापीठातील प्राध्यापकमहोदय एडवर्ड अँडरसन ह्यांचं विधान ह्या साऱ्याच्या मुळाशी आहे. त्यांचं हे नऊच शब्दांचं वाक्य - Idli are the most boring things in the world. त्यांनी काही सहज म्हणून किंवा आपणहून हे (वादग्रस्त) विधान केलं नव्हतं. विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं त्यांनी दिलेलं उत्तर होतं ते.

ट्विटरवर 'झोमॅटो इंडिया'नं प्रश्न विचारला होता - what's that one dish you could never understand why people like soo much. मुळात तो प्रश्न नव्हता, तर एक गुगली होती. लोकप्रिय पदार्थाच्या विरोधात बोलायला भाग पाडणारी आणि त्रिफळा उडवणारी गुगली. उत्तर असणार सर्वप्रिय नायकाला/नायिकेला खलनायक ठरवणारं. '...आ बैल मुझे मार'चं निमंत्रण देणारं. सर्वसामान्यांचा रोष ओढवून घेणारं.

'झोमॅटो'च्या प्रश्नाला प्रो. अँडरसन ह्यांनी 'इडली' असं उत्तर दिलं आणि मग चालू झालं शब्दयुद्ध. त्यांच्या ह्या उत्तरानं शेकडो लोकांचं लक्ष वेधून घेतलं. दक्षिण भारतीय मंडळी लुंग्या (किंवा वेष्टी) सरसावून इडलीच्या समर्थनासाठी पुढं आले. बायामाणसंही साडीचा पदर खोचून सरसावल्या. त्यांच्या ह्या (पहिल्या) ट्वीटवर जवळपास नऊशे जण व्यक्त झाले. पांढऱ्याशुभ्र वाफाळलेल्या इडल्या, सोबत नारळाची चटणी आणि सांबार, अशी रसनेला आवाहन करणारी (आणि त्यांच्या उत्तराला आव्हान देणारी) छायाचित्रं डकवण्यात आली. त्यांचा निषेध झाला. '...चव काय'च्या धर्तीवर इंग्लंडमधल्या साहेबाला इडलीची गोडी काय कळणार, असं कुत्सितपणे विचारण्यात आलं.

'मला अमूक पदार्थ अजिबात आवडत नाही,' असं ठामपणे सांगणाऱ्या बहुतेकांनी त्याची सहसा चवच घेतलेली नसते. त्या नावडीमागे पूर्वग्रह असतो. प्रा. अँडरसन ह्यांचं तसंच काही आहे की काय? तर अजिबात नाही! इडली (वारंवार) पचवूनच त्यांचं हे मत बनलेलं आहे. आणि हो, प्राध्यापकसाहेबांची सासूरवाडी आपल्या दक्षिण भारतातली, केरळची आहे. सासूरवाडीच्या पदार्थावर 'बोअरिंग' असा शिक्का मारण्याचं जाहीर धाडस जावईबापूंनी अधिकाच्या महिन्यातच केलं! त्याची जाणीव त्यांना बहुदा उशिरा झाली असावी. कारण नंतरच्या एका ट्वीटमध्ये त्यांनी 'केरळातील सासुरवाडीची मंडळी मला माफ करतील का बुवा?' असं मनात आलेलं जाहीरपणे विचारून टाकलं.


पंजाबी जेवणानं आपल्याकडची लग्नकार्यं, सण-समारंभ ह्यांतल्या मेन्यूवर आक्रमण केल्याची तक्रार ऐकायला मिळते. तसं नाश्त्याच्या बाबतही झालं आहे. दक्षिणेकडचा इडली-वडा-डोसा सगळीकडं सहज मिळतो. भारतात अगदी सगळीकडं. उडुपी हॉटेलांची परंपरा नसलेल्या आणि फार मोठ्या शहरांमध्ये न राहिलेल्या आपल्यापैकी अनेकांची 'इटली-सांभर' अशा पाटीतून ह्या इडलीची पहिली भेट झालेली असणार. प्रथमदर्शनी प्रेमात पडावं, असं काही नसतं बुवा त्यात. 'ती पाहताच इडली, काळजात जाऊनी घुसली,' अशी भावना किती जणांची होत असेल, माहीत नाही. पण गरमागरम, टपोरी फुगलेली, मऊ लुससुशीत इडली चविष्ट सांबाराच्या किंवा ओल्या नारळाच्या चटणीच्या संगतीनं बहार आणते. इडली-चटणी किंवा इडली-सांबार म्हणजे 'टू इज कंपनी.' पण तिसरा कोन समाविष्ट झाला, तरी त्याचा 'क्राऊड' बनत नाही. उलट ही 'कंपनी' अजूनच टेस्टी बनते! सोबत मेदूवडा असला, तर खाण्यातली मजा वाढतेच.

इडल्यांचे प्रकार तरी किती? अगणित! तांदूळ आणि उडदाची डाळ वाटून घरोघरी केली जाणारी इडली, रवा इडली, मसाला इडली, कांचीपुरम इडली, कडुबू (ग्लासात पीठ भरून उकडलेली) इडली, कर्नाटकातील छोट्या थाळीच्या आकाराची तट्टे इडली, आंध्र प्रदेशातली गन पावडर इडली... शिवाय इडली फ्राय, दही इडली, (आदल्या दिवशीच्या) इडल्यांचा उपमा आहेच. 'मनोरमा'च्या संकेतस्थळानं दिलेल्या माहितीनुसार तमिळनाडूत इडल्यांचे साधारण १८५ प्रकार बनतात. त्यात नेहमीची, ओट्स, तिनाई, कांचीपुरम, पोडी, खुशबू इडली ह्यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

चेन्नईतील साधा रिक्षाचालक असलेल्या एम. एनियवन ह्यांची ओळख आता इडली-तज्ज्ञ अशी आहे. त्यांच्याबद्दल 'द हिंदू' दैनिकात २९ मार्च २०१८ रोजी अकिला कन्नदासन ह्यांनी लेख लिहिला. दोन हजार प्रकारच्या इडल्या त्यांना बनवता येतात. त्यांच्या १२४.८ किलोच्या इडलीनं 'गिनेस बुक'मध्ये जागा मिळवलीय. पाहा हे इडलीचे माहात्म्य.

मऊ लुसलुशीत इडली साधायची असेल, तर तिचं पीठ कमी आंबायला नको नि जास्तही. असं म्हणतात की, आपण उडप्यांच्या उपाहारगृहात जी इडली खातो, ती त्या अर्थाने शिळीच असते. कारण पीठ चांगलं लागावं म्हणून अस्सल उडुपी आदल्या दिवशीच एक वाटी पीठ मुद्दाम राखून ताज्या पिठात मिसळतो. म्हणजे त्या हिशेबानं आजच्या इडलीत काही सहस्त्रांश भाग, एखादा क्षुद्र कण तरी त्या काही महिने वा वर्षे जुन्या पिठाचा असेलच की!

ट्विटरवर इडलीचे खंदे समर्थक ठामपणे उभे होते, त्याच वेळी महाराष्ट्रातही इडलीचं पीठ फसफसून ऊतू जात होतं. फुगून भांड्याबाहेर पडलेल्या पिठाची अनेक छायाचित्रं फेसबुकवरच्या 'खादाड खाऊ' ग्रूपवर पाहायला मिळाली. 'असं कसं झालं, माझ्या नशिबी आलं', असा सवाल गृहिणी करीत होत्या.

इडली कशी खावी, कधी खावी, कशासोबत खावी, कुणी बनवलेली खावी, अशा सगळ्या मुद्द्यांवर इडलीचे भोक्ते अँडरसन ह्यांना उत्तर देते झाले. 'फायरी'नं ट्वीट केलं - एक तर तुम्ही इडलीला चुकीचा जोडीदार निवडला किंवा परफेक्ट बनविता न येणाऱ्याच्या हातची इडली खाल्ली.

थोड्याशा सात्त्विक संतापानंच रवीनं लिहिलंय की, इडलीबरोबर व्यवस्थित सांबार, तीन पद्धतीच्या चटण्या आणि साजूक तूप पाहिजे. मग स्वर्गीय चव येते. व्यवस्थित खायला शिका जरा! प्रो. अँडरसन ह्यांनी इडलीला 'बोअरिंग' ठरवल्यानं दुखावली गेलेली शिवानी त्यांना विचारती झाली, 'असं कसं म्हणता तुम्ही? इडली मऊ, हलकी, स्पाँजी, गुबगुबीत असते. कशातही घातली तरी विरघळून, मिसळून जाते ती.'

कट्टर इडली-समर्थक (किंवा हल्लीच्या भाषेत लिहायचं तर 'इडलीभक्त!') डॉ. पी. एस. विष्णुवर्धन ह्यांनी इडलीला जगातला सर्वोत्तम नाश्ता ठरवून टाकलं. ते लिहितात, इडलीच्या आसपास फिरकणाराही दुसरा कुठला पदार्थ नाही! इडल्या तळलेल्या नसतात, तर वाफवलेल्या असतात. त्यामध्ये प्रथिने आहेत. पचायला हलक्या. तूप, तिखट, चटणी किंवा सांबार... कशाबरोबरही खा! यशवंत ह्यांनी सल्ला दिला की, इडलीबरोबर वड्याचीही ऑर्डर द्या. मग बघा. पैज लावतो मी, तुमचं मत बदलून जाईल.

इडलीचे समर्थक फक्त दक्षिण भारतातच नाहीत. उत्तर भारतीय आदित्यलाही उत्तम नाश्ता म्हणजे इडली-सांबाराचाच वाटतो. मानसी खंदेरिया लिहितात, मी दक्षिण भारतीय नसून गुजराती आहे. पण इडली नि डोसा फार आवडतो.

इडलीप्रमाणेच प्रा. अँडरसन ह्यांचेही समर्थक आहेतच की. त्यातही दक्षिण भारतीय दिसतात. कोणी तरी 'अंतरिक्ष्ययात्री' त्यांच्या मताशी १०० टक्के सहमत आहे. डॅनियलनं इडलीला असंच बोअरिंग ठरवत खुसखुशीत सोनेरी डोसा त्याहून किती तरी पट चविष्ट असल्याचं सांगितलं आहे. मी दक्षिण भारतीय आहे आणि तरीही इडली बोअरिगं असल्याचं मला मान्य आहे, असं सांगून दीपा संतोष लिहितात की, प्रत्येक बाबतीत 'राष्ट्रवादा'ची भूमिका घेण्यात काही अर्थ नाही.

शालिनी अर्स ह्यांनी फेसबुकवर लिहिलंय की, हे इडलीगेट विनोदीच आहे बुवा. ब्रिटिश प्राध्यापकाची एक टिप्पणी आपण दक्षिण भारतीयांना एवढी का अपमानास्पद वाटतेय? दक्षिण भारतीय असल्याचा अभिमान असला, तरी मी एडवर्ड अँडरसन ह्यांच्याशी सहमत आहे. मलाही इडलीचा कंटाळा आलाय. अनेक ट्विटर हँडलनी दक्षिण भारतीयांना 'दमानं घ्या', 'हलकेच घ्या', 'एवढं चिडायची गरज नाही' असे सल्लेही दिले आहेत.

ट्विटरवरील शब्दयुद्धात खरी रंगत आली ती ईशान आणि शशी थरूर सहभागी झाल्यानंतर. त्याची सुरुवात ईशानने केली. चिरंजिवांना पाठिंबा देत शशी थरूरही पुढे सरसावले. इडली पचायला जेवढी सोपी, तेवढंच वाचायला नि पचायला कठीण थरुरसाहेबांचं इंग्रजी! त्यांनी पल्लेदार इंग्रजीत अँडरसनसाहेबांना नाश्त्यासाठी आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं. जागतिक इडलीदिन ३० मार्चला असतो. यंदा त्या दिवशी शशी थरूर ह्यांनी ट्वीट करून 'इडली माझ्यापुरता तरी सर्वोत्तम नाश्ता आहे,' असं जाहीर केलं होतंच की.

आपल्या साध्या विधानानं ट्विटरवर एवढा हलकल्लोळ माजेल, ह्याची प्रा. अँडरसन ह्यांना अजिबात कल्पना नसावी. त्यांनी नंतर दोन-तीन ट्वीट करून त्याची कबुलीही दिली. त्यातल्या एका ट्वीटमध्ये ते लिहितात की, ह्या चिडलेल्या दक्षिण भारतीयांच्या ट्वीटना उत्तर देणं मोठं अवघड दुखणंच बनलंय बुवा. ते जगाच्या सर्व भागात आहेत. त्यामुळे कोणत्याही वेळी त्यांचे रागावलेले ट्वीट येऊन आदळतात. आपल्या ह्या ट्वीटचे पडसाद सी. एन. एन., बी. बी. सी. ह्यांसह साऱ्या जगात उमटल्याचे पाहून त्यांना आश्चर्यही वाटलंय. अमेरिकी निवडणुकीशी ते जोडलं गेल्याचा उल्लेखही त्यांनी स्वतंत्र ट्वीट करून केला!

ट्वीटरवरच्या ह्या शब्दयुद्धाचे पडसाद इतर माध्यमांमध्येही उमटले. ह्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना 'क्वोरा'वर चेन्नईच्या अंबळगन ह्यांनी एक खुसखुशीत लेखच लिहिला. त्याच्यावरही प्रतिक्रियांचा पाऊस पडला. जवळपास ९५ प्रतिक्रिया होत्या दोन दिवसांपर्यंत.

'बी. बी. सी.'नं संकेतस्थळावर इडली शब्दयुद्धाचा 'आँखो देखा हाल' सादर केला. त्यात त्यांनी अमेरिकी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस ह्यांचा उल्लेख केला. लहानपणी सुटीत मद्रासला गेल्यावर आपली आई कशी प्रेमानं इडली खाऊ घालायची आणि तिनं इडलीची आवड कशी आपल्यात बिंबवली, हे कमला हॅरिस ह्यांनी ऑगस्टमध्ये कौतुकानं सांगितल्याची आठवण त्यात आहे. ह्या विषयावरील वृत्तान्ताचा 'डेली यूएस टाइम्स'च्या संकेतस्थळाचा मथळा होता - Backlash over ‘insult’ to Indian dish Kamala Harris likes. 'यूएस हेडलाईऩ न्यूज'च्या संकेतस्थळानंही ह्या विषयावर भाष्य करताना कमला हॅरिस ह्यांचा उल्लेख केलाच. 'A British academic dissed a popular Indian snack. It didn't go down well', असं 'सी. एन. एन.'नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तान्ताचं (भडक) शीर्षक आहे. इडली हा फार सोयीचा आणि जगभरात आवडीनं खाल्ला जाणारा पदार्थ असल्याचंही त्यात म्हटलंय.

भारतातही 'द प्रिंट', 'इंडिया टुडे' ह्यांनी इडलीचा गरमागरम, वाफाळता विषय सोडला नाही. बंगळुरूच्या 'डेक्कन हेरल्ड' दैनिकानं ह्या विषयावर मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेतल्या. अभिनेता गुलशन देवय्या म्हणाला की, ह्या अशा विधानांकडं विनोद म्हणून पाहायला हवं. इडल्या चांगल्या बनवल्या नसतील किंवा सोबतच्या चटण्या-सांबार चांगलं नसेल तर त्या वाईटच लागतील. पण हे असं इतर कुठल्याही पदार्थाबाबत होतं. 'मल्याळम मनोरमा'नं लेख प्रसिद्ध केलाच; पण तो (इडलीसारखा?) सपक वाटू नये म्हणून, जावईबापूंच्या व्यंग्यचित्राची  चरचरित फोडणीही दिली.


अग्रगण्य वृत्तसंस्था 'प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया'नं ह्या विषयावर एक मोठी बातमी केली. खाद्यपदार्थांबद्दल, त्याच्या इतिहासाबद्दल लिहिणारे पुष्पेश पंत, राहुल वर्मा, पृथा सेन ह्यांच्या प्रतिक्रिया त्यात आहेत. 'इडली इंडोनेशियातून भारतात आली,' असं के. टी. आचार्य ह्यांच्या लेखनाचा हवाला देऊन वर्मा सांगतात. आता त्यावरून नवीन युद्धाला सुरुवात होऊ नये म्हणजे मिळवली!

....

इडलीच्या प्रेमात असलेल्यांसाठी एक नोंद

'इडली, ऑर्किड आणि मी'मध्ये विट्ठल कामत लिहितात -

लंडनमधील 'शान' रेस्टॉरंटमध्ये मला पहिली नोकरी मिळाली. तिथे ढीगभर अन्न बनायचं, पण त्याला कणभरही चव नसायची. विशेषतः तिथे बनणारी इडली. असली दगडासारखी इडली मी तोपर्यंत कधीच पाहिली नव्हती. असं का व्हावं? मी शोध घेतला तेव्हा कळलं की श्रीमती टन्ना (उपाहारगृहाच्या मालकीणबाई) उडीद डाळ आणि तांदूळ ह्यांचं वाटलेलं मिश्रण आंबवत नव्हत्या. त्या ऐवजी त्या पिठात यीस्ट मिसळायच्या. पण पिझ्झाचं पीठ फुगविण्यासाठी यीस्ट उपयोगी पडलं, तरी इडलीच्या पिठावर त्याचा अपेक्षित परिणाम होत नव्हता... माझ्या आईला इडली बनविताना मी पाहिलं होतं. आई जगात बेस्ट इडली बनविते, असं माझं प्रामाणिक मत. तेव्हा आई जशी इडलीची तयारी करायची, तशीच तयारी मी केली. पहिली गोष्ट म्हणजे मी उडदाची डाळ चांगली पाच-सहा वेळा स्वच्छ धुऊन घेतली. नंतर डाळ आणि तांदूळाचं वाटलेलं मिश्रण स्वयंपाकघरात असलेल्या, भट्टी शेजारच्या ऊबदार वातावरणात आंबायला ठेवलं... सकाळी मस्त फुगून आलेल्या पिठाच्या मी इडल्या केल्या. त्या अगदी कापसासारख्या नरम आणि लुसलुशीत झाल्या. (पान ४३-४४)

----

(संदर्भ - ट्विटर, बी. बी. सी., क्वोरा, सी. एन. एन., मल्याळम मनोरमा, डेक्कन हेरल्ड, द हिंदू, आऊटलूक, इंडिया टुडे ह्यांची संकेतस्थळे.)

#Idli #IdliSambar #IdliChuteney #IdliWada #BoringDish #Zomato #EdwardAnderson #SouthIndia #breakfast #ShashiTharoor #SocialMedia #KamalaHarris #USA #foodie #twitter

15 comments:

  1. सासूरवाडीच्या पदार्थावर 'बोअरिंग' असा शिक्का मारण्याचं जाहीर धाडस जावईबापूंनी अधिकाच्या महिन्यातच केलं!!!!!!
    Mast Satish Rao , keep it up. 👏👏👍👍

    ReplyDelete
  2. व्वा! मजा आली. इथे पाहीपर्यंत अनभिज्ञ होतो. धन्यवाद!

    ReplyDelete
  3. झकास. खूप दिवसांनी चांगलं वाचायला मिळालं.

    ReplyDelete
  4. Dear Satish,
    Your article as usual conveys much more than the title suggests.
    It has several layers.
    First is idli itself. Every Indian has eaten idlis:good, bad and indifferent. An unfavourable comment on it by a North
    Indian would have gone unnoticed. But we cannot tolerate it from a foreigner. That is because we constantly hanker after foreigners' opinion especially westerners. That is part of our deep inferiority feelings re western people.
    Secondly, the comment is absolutely correct. It could not have been otherwise. Idli is our staple food. And all staple foods by definition are boring.
    Can you really eat rice or chapati on its own without any accompaniments? You cannot because they are boring on their own. They need वरण, आमटी, भाजी etc. to enliven it. In your article you have spent a lot of space on chutneys and other stuff and rightly so. Otherwise the article would have been boring.
    Thirdly, in corona times there is hardly any real hard news to report. Hence we have such diversions for our entertainment. I pity those who take this matter seriously. They miss the fun.
    Sorry for the long reply. It has become almost as long as the article.
    My मराठी font is acting up. Hence this change of language. Hope you don't mind.
    Incidentally idli tastes wonderful with coconut milk, jaggery and banana. Try it if you haven't done it so far.
    Happy writing and eating.
    - Haily Dalvi

    ReplyDelete
  5. ह्या प्रकरणाच्या निमित्ताने तुम्ही घेतलेला इडलीचा आढावा माहितीपूर्ण आहे. दक्षिण भारतात अनेक वर्षे राहिल्याने इडलीचे काही प्रकार परिचयाचे झाले; पण ते शेकडोंच्या संख्येने आहेत हे दर्शन 'खिडकी'तून घडले.
    धन्यवाद.
    - मुकुंद नवरे

    ReplyDelete
  6. 'गरमागरम, चवदार इडली-सांबार व चटणी'च्या नाश्त्याप्रमाणे आपला लेख झाला आहे.

    विठ्ठल कामत ह्यांच्या पुस्तकांतील उतारा मार्मिकपणे दिला आहे .

    आपल्या ह्या लेखाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

    - अशोक जोशी, बंगळुरू

    ReplyDelete
  7. सतीश मित्रा
    केवळ अप्रतिम...

    - मिलिंद शिंदे

    ReplyDelete
  8. व्यक्ति व्यकित मतर्भिन्ना. मी तरी इडली पेक्षा E & beckon किंवा Eggs & B जास्त पसंत करीन. यासाठी मला पुल आणि वुडहाऊस वाचून माझ्या ज्या आवडी झाल्या आहेत त्यांचे आभार मानावे लागतील.

    ReplyDelete
  9. इडली, इडली ऊ !!!
    😊😊👍👍

    ReplyDelete
  10. 'इडली म्हणजे निकडीला पटकन होणारा पोटभरीचा अन्नपदार्थ !' माझ्या लेखी इडलीचं माहात्म्य तेवढंच आहे. पण त्या इडलीवर असा थालिपिठाहून खमंग, खरपूस आणि खुसखुशीत लेख वाचला आणि त्या अँडरसनबाबाला आशीर्वाद पाठवले. देव त्याला रोज कांदा भजी आणि बटाटेवडे खाऊ घालो. 🙏

    ReplyDelete
  11. काका तुही होशीलच की इडली तज्ञ

    इडली सारखा झाला तुझा लेख, मऊ, लुसलुशीत, पचायला हलका पण भरपूर प्रोटीन वाला.

    ReplyDelete
  12. आपण आपल्या शब्दरूपी सांबर मध्ये इडली बुडवली त्यामुळे ती अधिक चविष्ट झाली. अँडरसन साहेबांनी खिडकीतील सांबर मध्ये इडली कुस्करून खाल्ल्यास त्यांचे निश्चितच मतपरिवर्तन होईल. अन्यथा "...........ला गुळाची चव ती काय"

    श्रीराम वांढरे.
    भिंगार, अहमदनगर.

    (भिंगारला असल्यावर माझ्या सोबत मोबाईल, फोन, इंटर्नेट नसल्यामुळे विलंब)

    ReplyDelete
  13. नवरात्र सुरू झाले आणि कडक उपवास म्हणून जाणीव पूर्वक हा सतीशच्या लेखाकडे दुर्लक्ष केले .टायटल वाचले तेव्हाच लक्षात आले की आपण इडली च्या मोहात पडणार. भीती खरी ठरली आणि आज इडलीच्या बेत नक्की केला.खूपच छान लिहितोस सतीश ,तू खरच वाचत वाचता समरस होऊन विषयाशी पूर्ण तल्लीन होऊन जाते.

    ReplyDelete
  14. प्रथम अँडरसन ह्यांचे आभार... कारण त्यांना मिळालेल्या लाखोल्यांमुळे आम्हाला हा पदार्थ खूप वेगवेगळ्या पद्धतीने चाखायला मिळाला. हा पदार्थ आम्हा मुंबईकरांचा अविभाज्य खाऊ आहे... आमचा आधारवड आहे!
    - चंद्रकांत कुटे, मुंबई

    ReplyDelete
  15. लेख वाचला.
    खुसखुशीत, हलकाफुलका आणि त्या बरोबर 'इडली'ज्ञानाच्या कक्षा वाढवणारा...

    मजा आली वाचताना...
    - स्वाती लोंढे

    ReplyDelete

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...